दिवाळीकथा: चंद्या सख्याची सहल
चंद्या आन सखाराम दोघं जिगरी दोस्त हुते. शाळंत जायचं बरूबर. इटीदांडू खेळायचं बरूबर. त्याल, साकर, बा ची तमाखू, इडी आनाया गावात बरूबर जात. सकाळची शाळा सुटली म्हंजे संगच दोघांच्या बकर्या बरूबर चरायला रानात न्येत आसत. चंद्याच्या ५ आन सख्याच्या ८ बकर्या व्हत्या. रानात जातांनाबी त्ये मजा करत जात. कुनाच्या बांधावरच्या बोरी झोडपाया थांबत तर कधी कुनाच्या उसात शिरून मनगटाएवढा जाड उस तोडून खायाला सुरुवात करत.
शेळ्या घेवून तसं त्ये मदुनच माळावरनं जात. तिथं थोड्या येड्या बाभळी व्हत्या. चंद्यापाशी इळा बांधेल लांब बांबू व्हता. दररोज तिथं एखांदी बाभूळ त्ये खरवडत आन शेळ्यांना त्यो पाला खाऊ घालत. नंतर पुढं हत्ती नदी लागे. तिथं सगनभाऊचा मळा व्हता. त्याच्या बांधावर एक डेरेदार आंब्याचं झाड व्हतं. एकजन बकर्यांच्या मागं थांबून उरल्याला एकजन बरूबर आनल्याली भाकरी खाउन घेई आन मंग दुसर्याची जेवायची पाळी व्हई. त्येंला जेवाया आल्याचं पाहून मळ्यातला सालदार त्येंला पानी पेयाला हिरीची मोटार चालू करी. शेळ्याबकर्या नदीचं पानी पिवून आल्या की मंग त्ये दोघं बी पुढं तवलीच्या टेकाडावर जात आन बकर्यांनी प्वाटभर चारा खाल्ला का ते समदे माघारी फिरतं. दिवेलागन व्हईपत्तूर त्ये घरी येत. आल्यानंतर बकर्यांना बांधून तेंची आय बकर्यांचं दुध काढी. गावातले काहीजनं मंग रुपाया दोन रुपायाचं दुधं ध्येवून जाई. तशी काय जास्त कमाई नाही पन घराला त्येवढाच आधार व्हई.
चंद्याला उसाचं लई याड व्हतं. शेळ्या चारायला जातांना त्यो कोनाच्यातरी उसात शिरं आन एखांदा उस तोडून खायला लागं. सख्याला उसाचं त्याच्याएवढं याड नव्हत. तरीबी चंद्यासंगती राहून कधीमधी उस खाई. आता उस तोडनं न्हेमीचंच झालं म्हंजी कायकाय मळेवाले त्यांच्यावर वरडत. मंग चंद्या त्या मळ्यात जात नसं.
एकडाव चंद्या आन सख्या गांधीबाबाच्या सुटीचं घरीच व्हते. सख्याच्या बा ला तीन शेरडं विकाया शेरात न्यायचं व्हतं. त्यामुळं त्यो काय बकर्या चारायला नेनार नव्हता. आता सख्या बकर्या चाराया येत नाय हे पाहूनशान चंद्यानं घरी कांगावा क्येला आन त्यो बी घरीच र्हायला. त्याच्या म्हतारीनं मातर त्येला बकर्यांसाठी झाडाचा पाला आन थोडा घास आनाया सांगितला तवा चंद्यानं सख्याला हाक मारून बोलावून घेतलं. दोघांनी समोरच्या बाभळीचा पाला खरडला, दोनचार फांट्या तोडल्या अन त्यांच्या बकर्यांसाठी घरी आनून टाकला.
आता त्ये दोघंबी मोकळेच व्हते. बाभूळ झोडपतांना चंद्यानं सख्याला एक गोष्ट सांगितली. आजच्या सुट्टीच्या दिशी साकरकारखान्यावर उस खायला जायचं चंद्याच्या मनात व्हतं. त्ये त्यांनं सख्याला बोलून दावलं. सख्या तर सुट्टी कशी घालवायची याचा विचारच करत व्हता. नायतरी गोट्या इकत घेवून खेळाया त्याच्यापाशी पैकं नव्हतं अन जरी गोट्या घेतल्याबी तरी त्यो चंद्याबिगर थोडीच खेळणार व्हता? आन इटीदांडू खेळाया बाकीचे गल्लीतले प्वारं तयार नव्हते. मंग दोघांनीबी साकरकारखान्यावर जायाचं ठरीवलं.
त्यांच्या वाडीपास्नं ४ मैलावर भाऊसाहेबनगरचा आण्णाभाव सहकारी साकर कारखाना व्हता. चंद्या मागल्यावर्षीच तिथं त्याच्या बा बरूबर सायकलवर ग्येला व्हता. तिथं त्यांच्यावाली सायकल पंचर झाली व्हती आन त्याचा बा चंद्यावर इनाकारन डाफरला व्हता. त्यायेळी सायकल दुकानीत पंचर काढायच्या येळी त्यानं एका टरक मधून उस खाल्यालं त्याला आठवलं. आन म्हनूनच आजच्या सुट्टीच्या दिशी त्यानं कारखान्यावर जायाचं ठरीवलं व्हतं.
घरी दोघंबी त्यांच्या आयांना 'आमी सांजच्याला येवू गं' सांगून निघाले. चंद्याच्या आयला वाटलं आज त्ये सुटीचं हत्ती नदीत मासं मारायाला जात आसतील. आज काय दोघा सौगड्यांकडं शेरडं नव्हती अन भाकरतुकडाबी नव्हता. दोघंबी मोकळेच चालत व्हते. त्येंच्या गावापास्न साकरकारखान्यात जायाला दोन रस्तं व्हत. म्हंजी तसं पक्का रस्ता एकच व्हता अन दुसरा रस्ता आगीनगाडीचा व्हता.
आगीनगाडीचा साकरकारखान्यापासून आगदी जवळून जात आसूनबी साकरकारखान्याला रेल्वे टेसन नव्हतं. तिथंली सम्दी साकरेची पोती चंद्या-सख्याच्या गावच्या टेसनावर यायची. तिथं मोठं गोडावन बी व्हतं. सख्याचा बा कधीमधी तिथं पोतं उचलाया जायचा. त्या गोडावन च्या फर्लांगभर आंतरावरून डांबरी रस्ता सरळ म्होरं कारखान्यावरच जायचा. आन गोडावन च्या जवळूनच दोन रेल्वेचे रूळ सरळ कारखान्याच्या मागच्या अंगावरून पुढं जायचे. त्ये रुळ भाऊसाहेबनगरच्या साकरकारखान्याच्या गाडीतळाजवळून म्होरं जायचे. गाडीतळावर उसं भरलेल्या बैलगाड्या, टरका, टॅकटरं रांगंनं उभं रहायचं. हंगामाच्या येळीतर कदी कदी संबंर टरकाबी लायन लावून थांबत. लय मोठं मैदान व्हतं. आख्या पंचक्रोशीत भाऊसाहेबनगरचा आण्णाभाव सहकारी साकर कारखाना मोटा व्हता. एकायेळी दोन दोन गव्हानी चालत. गळीत हंगामात चार लाख साकरंची पोती उतारा मिळत व्हता. पुढारीबी मन लावून एकीची कामं करायची. त्यामुळं त्या कारखान्याचा कामगार आन त्या कारखान्याला उसं देनारे शेतकरीबी सुखाचे दोन घास जास खायाचे. टरका थांबत त्या मैदानाच्यासमूरच आण्णाभावचा ऐन जवानीतला आसनारा पुतळा व्हता. त्याच्या म्होरं आता नवीनच झाल्याली दुकानांची रांग व्हती. त्या दुकानांमदी चार पाच हाटेली, एकदोन न्हाव्याची दुकानं, एखांदं कापडं शिवायचं शिंप्याचं दुकान, दोन मोटरगॅरज, दोन पंचरवाल्याची दुकानं हारीनं लागलेली व्हती. मैदानाच्या दुसर्या टोकाला बैलगाड्या उभ्या राहत. तिथं साताठ टपर्या हुत्या. एकदोन बिडीकाडी चा पान्याचं दुकानं व्हती. मदीच कदी कदी एखांदा गडी हातगाडीवर केळं बिळं इकत बसल्याला आसं.
चंद्याला त्ये सम्दं आटवलं. मागं एकडाव त्याचा बा सायकल पंचर झाली तवा तिथंच तर डाफरला व्हता. उसाच्या नादानं त्याच्या तोंडाला पानी सुटलं. त्यानं लगोलग सख्याला रेल्वे रूळावरनंच थेट गाडीतळावर जायाचं का त्ये इचारलं. तसं गेलं म्हंजी ते थोडं लवकर पोचनार व्हते. सख्यालाबी मजा वाटत व्हती. त्यामुळं दोघं रुळावरूनच चालाया निघालं.
वरून उन आग टाकीत व्हतं आन हे दोघं रुळावरून चालत व्हतं. उनाची सवय आसल्यामुळं त्येंला उनाची कायबी फिकीर नवती. दोघांच्या बी पायात शिलीपर व्हत्या. चटकपटक चटकपटक आवाज करून दोघंबी मधल्या शिमेटच्या फरश्यांवरून माकडागत उड्या मारत, पळत चालत व्हते. त्ये चालत आसनारं रूळ सायडींग चे व्हते. त्यामुळं तिथंनं कोनतीच रेल्वेगाडी जात नसं. मदीच त्ये एका लहान पुलावर थांबले. मागून एका मालगाडीचा आवाज त्यांनी ऐकला. रुळाच्या खाली आसनारी एकदोन खडी चंद्यानं रूळावर ठेवली. सख्यानंबी चंद्यासारखंच केलं. धाडधाड करत मालगाडी त्या दगडांवरून गेली. दगडांचा चक्काचूर झाला.
चंद्या-सख्या आता रूळांवरून थोडं पुढं गेले. आता कारखान्याची हद्द सुरू झाली व्हती. एका टेकाडाच्या मागून गेलं की मंग गाडीतळ लागनार व्हता. त्या टेकाडाच्या खालीच कारखान्यानं उसाची मळी साठवायचे पाच सहा तळी केलेली व्हती. चंद्या-सख्या जसे जसे त्या उसाच्या मळीच्या तळ्यांच्या जवळ आले तसतसा त्या मळीचा आंबूस वास जास्तच यायला लागला. चंद्या-सख्यानी त्यांच्या नाकावर हात ठिवलं. पन किती येळ हात ठिवनार? त्ये दोघं हासाया लागले. आन आता त्यांच्या नाकपुड्या त्या वासाला सरावल्या व्हत्या. त्ये पुढं निगाले. थोडं पुढं गेल्यावर त्यांला उसं भरलेल्या बैलगाड्या लागल्या. लायनीत बैलगाड्या उसं भरून उभ्या व्हत्या. बैलांच्या मानंचं जू उतरलेलं व्हतं. कारखान्यानं केलेल्या निलगीरीच्या झाडांच्या सावलीत गाडीवानांनी बैलं बांधली व्हती.
एका हापशावर जावून चंद्या-सख्यानं पानी पिलं. हातपाय तोंड धुतलं. चंद्याला उस खायची घाई झाली व्हती. चंद्या एखांद्या मळ्यातला उस तोडायला जायी तवा एखांदा शेतकरी त्याच्या अंगावर धावून जाई. 'उस तोडू नको' म्हने. त्ये आटवून चंद्या एका बैलगाडीजवळ गेला. मागून एक उस त्यांनं मागं वढला. पुरा उस हातात आला. मंग चंद्यानं मांडीवर त्या उसाचे दोन तुकडे केले आन एक भाग सख्याला दिला. उस खात खात त्ये पुढं निघाले.
पुढं आल्यावर मोटं मैदान लागलं. तिथं पन्नास टरका तरी उस घेवून उभ्या व्हत्या. चंद्याला उसाचा मोटा खजीनाच गावला. त्येनं हातातला उस टाकून दिला आन त्यो एका टरकेजवळ आला. टरकंजवळ कोन न्हाय ह्ये पाहून तो मागच्या चाकावर पाय ठेवून टरकंवर चढला. डाव्या हातात त्यानं उसाची मोळी बांधलेला लोखंडी दोर धरला आन उजव्या हातानं एक उस मागं वढला. उस त्यानं खाली सख्याकडं फेकला. नंतर आनखी एक उस चंद्यानं खाली फेकला. सख्यानं लगोलग दोनी उस उचलले. चंद्यानं चाकावरून खाली उडी मारली.
दोनी दोस्त उस खायला लागले. एका कट्यावर त्ये आले. मनसोक्त उस खायला सुरवात केली. निम्मा उस खाल्यावर सख्यानं खालची बांडी फेकून दिली. चंद्या आता दुसर्या टरकंजवळ आला आन मघासारकाच वर चढला.
'आरं कोन हाय टरक वर?' एक मोठा आवाज आला. चंद्यांनं तिथून लगेच उडी खाली मारली. तिथंच एक मानूस उभा व्हता.
'कारं उस खायाचा हाय काय? मंग ह्या माझ्यावाल्या गाडीचा काहून खाता?', तो टरक डायवर बोल्ला.
'न्हाय.. म्हंजी...न्हाय', सख्या बोलाया लागला.
'आरं घाबरता काम्हून? उसंच खायाचा आसलं तर माझ्या टरकीचा नका खावू. त्यो फुले-२६५ हाय. त्या उसाला लवकर तुरं आल्याती. त्यो नका खाऊ. त्याच्यात साकर बी उतरलेली न्हाय. त्या समुरच्या टरक मंदी २१८९ जातीचा उस हाय. न्हाय तर ह्या शेजारच्या टरकमधला ६७१ खावा. उतार्याला लय भारी जात हाय ती. आन आगदीच ग्वाड खायाचा आसंल तर चला बरूबर. म्या ८६०३२ न्हायतर ९४०१२ खावू घालतो तुम्हास्नी.'
त्या डायवरनं निरनिराळ्या उसाच्या जाती सांगून दोघांना यडं करून सोडलं. आता त्यांच्यात बर्यापैकी मनमोकळं बोलनं व्हया लागल व्हत.
डायवरनं इचारलं, 'कोन्या गावचं रं तुमी दोघं? आन घरून पळून बिळून आलात काय?'
चंद्या बोलला, 'न्हाय न्हाय. आमी काय पळून नाय आल्यालो. आमी कसबे वनीहून सकाळीच निघालो उस खायाला.'
'बरं बरं. प्वाटाला काय भाकरतुकडा खाल्ला का न्हाय? का निसतं उसचं खाताय सकाळधरून?'
'न्हाय आमी कायबी खाल्लं नाय. आता घरी जावून जेवूच की', सख्या बोलला.
'व्वा रं प्वारा. आरं आता दुपारचं २ वाजाया आलं आन तुमी आजून काय खाल्लं न्हाय? चला माज्यासंगती हाटेलीत. आरं मलाबी तुमच्यावानी एक पोरगा हाय.'
ते तिघेही मग एका हाटेलीत गेलं. तिथं त्यांनी मिसळ खाल्ली. डायवरदादा लयच दयाळू व्हता जनू.
नंतर डायवरदादानं एका टरकवर जावून चांगले काळेभोर दोन उस घेवून आला. चंद्या सख्यानं त्ये उस हातात घेतले. त्येच्यानंतर डायवरदादा त्येच्या गाडीचा नंबर येईल म्हनून निघून ग्येला. चंद्या अन सख्या आता घरला परत जायचं म्हनून तिथनं बाहीर पडले. रस्त्यानं उस खानं चालूच व्हतं. आता त्यांनी पक्या रस्त्यानं जायाचं ठरीवलं. दोघंबी चालत निघाले. कारखान्याची वस्ती सरल्यावर त्यांना मळे लागले. कुनाच्या मळ्यात कांदे पेरेल व्हते. कुनाचा द्राक्षेचा बाग व्हता. आजून द्राक्षेच्या वेली मांडवावर चढेल नव्हत्या. रस्त्यामधी कायबाय वडाचे झाडं, कडूलिंब, बाभूळ आसले झाडं व्हती. एका मळ्यात पीकाला पानी देन्यासाठी मोटर चालू व्हती. चंद्या सख्यानं तिथं जावून हातपाय धुवून पानी पिले. पुढं चंद्याला एका वढ्याच्या ठिकानी बोरीचं झाड दिसलं. जवळच्या गुलमोहराची काठी तोडून त्यानं ती बोर झोडपली. खाली पडलेले बोरं दोघांनी खिशात टाकले आन खात खात पुढं निघाले. त्यांचं गाव एखादं कोस राहीलं आसंल तवा संध्याकाळ व्हत आली व्हती.
आजचा सुटीचा दिवस त्या दोघा मित्रांनी मजेत घालवला व्हता. उद्याच्याला पुन्ना शाळेत जायाचं आन नंतर शेळ्या राखायला जायचं ठरवून चंद्या आन सख्या ज्याच्यात्याच्या घरी गेले.
No comments:
Post a Comment