Showing posts with label विज्ञान. Show all posts
Showing posts with label विज्ञान. Show all posts

Monday, August 24, 2020

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट

 (महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२)

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट

(प्रस्तावना: कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल हे लेखकाच्या मनात आल्याने "इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजारः जगावरचे संकट" हा पाठ लिहीला आहे. )

जगात सर्वप्रथम कोरोना अर्थात कोविड-१९ या आजाराचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात डिसेंबर २०१९ च्या दरम्यान झाला होता. या शहरातून इतरत्र तसेच इतर देशात गेलेल्या व्यक्तींमार्फत हा आजार इतर देशांत पसरला. साधारण जानेवारी २०२० च्या शेवटी कोरोना या आजाराची लागण असलेले रुग्ण भारतात सापडले. एप्रिल २०२० च्या मध्यानंतर हा आजार भारतात सर्वत्र पसरला होता.

या आजारात कोवीड विषाणू हवेतून तसेच स्पर्शामधून पसरत असत. त्या काळात या आजारावर कोणतेच औषध तसेच लस उपलब्ध नव्हती. लाखो लोक या आजारामुळे जगात दगावले. अनेक देशांनी आपल्या देशांतील सार्वजनीक व्यवहार अनेक महिने बंद ठेवले होते. जगभरातील विमानसेवा ठप्प होती. इतकेच नव्हे तर अनेक गावेच्या गावे एकमेकांपासून विलग केलेली होती. प्रशासनाच्या परवानगी विना कोणीही व्यक्ती दुसर्‍या गावात प्रवेश करु शकत नव्हता. भारतात देखील प्रशासनाने जिल्हाबंदी, गावबंदी असे उपाय अंमलात आणले होते. सार्वजनीक ठिकाणी वावरतांना तोंडावर रुमाल किंवा मास्क लावणे सक्तीचे होते. दोन व्यक्तीत कमीतकमी तिन चार फुटांचे अंतर राखावे अशी अपेक्षा होती. कोरोना विषाणू स्पर्शाद्वारे पसरत असल्याने वरचेवर हात सॅनिटायझरने किंवा साबणाने धुवावे असे वारंवार सांगितले जात होते.

त्या कालावधीत होणार्‍या परिक्षा रद्द झाल्या होत्या. मात्र शैक्षणिक वर्ष चालू झाल्याने अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग घेणे चालू केले होते. त्या वर्गात दहावी बारावी सारखे मोठे वर्ग तर होतेच पण अगदी बालवाडी, पहिली दुसरीचेही वर्ग होते. शिक्षक, विद्यार्थी, पालक इत्यादींना नवे तंत्र शिकणे, इंटरनेटचा अभाव, मोबाईल, लॅपटॉप आदींची अनुपलब्धता अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यावर मात करत अनेक ठिकाणी शिक्षण चालू झाले होते.

त्या काळात कामगार वर्गाचे फार हाल झाले. लॉकडाऊनमुळे कित्येक कारखाने चार महिने बंद होते. अनेक व्यापारी दुकाने बंद पडली. कित्येकांनी आपले व्यवसाय बदलले. कारखान्यातले कामगार, मजूर आदी आपापल्या गावी परतू लागले. रेल्वे, बस सेवा बंद असल्याने कित्येक कामगार आपले कुटूंबाबरोबर पायी आपल्या गावी जात असणारे चित्र रस्त्यावर दिसत होते. अनेक जणांनी रस्त्यातंच प्राण गमावले. कित्येकांचे पगार होत नव्हते किंवा त्यात कपात केली जात होती. आर्थीक कुचंबणा होत होती. बाजारपेठेत पैशाचे चलनवलन थांबलेले होते. भारतातच नव्हे तर अनेक विकसीत देशांतही परिस्थीती काही निराळी नव्हती.

ऑगस्ट २०२० महिन्यात सार्वजनिक व्यवहार साधारणपणे चालू करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली. त्यामध्ये सुरूवातीला काही बाजारपेठा सम आणि विषम पद्धतीने चालू करणे, मोठे मॉल्स बंद ठेवणे, चित्रपट गृहे बंद ठेवणे, हॉटेल व्यवसाय बंद, बस सेवा चालू जरी असली तरी त्यात ई-पास आणि दोन प्रवासीदरम्यान अंतर राखणे आदी पद्धती अवलंबल्या गेल्या. 

जागतीक आरोग्य संघटना अर्थात डब्लू.एच.ओ. ने या आजाराविषयी विश्वासार्ह माहिती देण्याचे काम केले नव्हते. त्यांच्या वेळोवेळी प्रसारीत होणार्‍या बातम्यांबद्दल दुमत व्यक्त केले जात होते. जगात चीन देशानेच हा आजार मुद्दाम तयार केला आणि पसरवला याविषयी मत बनत चालले होते. अमेरीकेसहीत अनेक देशांनी याबाबत चीनविरूद्ध उघड भुमिका घेतल्याने जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंभरठ्याच्या दिशेने जात आहे की काय अशी शंका वेळोवेळी येत होती. संपूर्ण जगाचे राजकारण कोरोना या आजाराभोवतीच फिरत होते.

अनेक देशांतील औषधे निर्माण करणार्‍या किंवा संशोधन करणार्‍या संस्थांनी या आजारावर प्रतिबंधक लस निर्माण करण्याचे संशोधन सुरू केले होते. त्यात यश मिळण्याचे प्रमाण मात्र अगदी नगण्य होते. ऑगस्ट २०२० महिन्याच्या मध्यावर रशीया देशाने सर्वप्रथम कोरोना आजारवरची लस बनवल्याचे आणि ती लस बाजारात आणल्याच्या बातम्या येत होत्या. परंतु या लशीच्या यशाच्याबाबत बरेच देश आणि जागतीक आरोग्य संघटनाच साशंक होत्या.

कोरोना या आजारानंतर सर्वसामान्य मानव समाजाची जिवन जगण्याची शैली बदलली होती. सार्वजनीक उत्सव, सण, समारंभ एवढेच नाही तर दुख:द प्रसंगी जमावाने एकत्र येणे टाळले जात होते. एकमेकांच्या घरी सहज जाणे, गप्पा मारणे आदी लक्षणीय रित्या कमी झालेले होते. बाजारात जातांना किंवा घराबाहेर पडतांना तोंडाला मास्क लावूनच पडावे लागत होते. हात साबणाने धुणे, सॅनिटायझर वापरणे आदी सवयी लोकांच्या अंगवळणी पडले होते. पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस आणि हॉस्पीटलमधील सेवा देणारे, नगर/महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी यांनी या काळात जीवाची पर्वा न करता काम केले. लॉकडाऊन काळात बंदोबस्त ठेवून पोलीस आणि प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मदत केली. कित्येक डॉक्टर तसेच नर्सेस हे इतरांवर उपचार करतांना दगावले. 

कोरोनासारखा आजार, निसर्ग वादळ या नावाचे महाराष्ट्रावर आलेले संकट, बेरोजगारी, व्यापार, व्यवसाय कमी होणे, नोकर्‍या जाणे, बंद शाळा, आर्थिक चणचण, बदललेली जीवनशैली अशा अनेक अर्थांनी साल २०२० हे एक वेगळेच वर्ष आहे हे जाणवत होते. जागतीक स्तरावरील ही स्थिती कशा प्रकारे बदलेल आणि पूर्वीचे जिवन कसे सुरळीत होईल याविषयी सर्वांच्याच मनात शंका होती.

Monday, March 02, 2020

क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन: समीक्षा (BLDC Ceiling Fan Review)

क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन: समीक्षा (BLDC Ceiling Fan Product Review)

पार्श्वभुमी:
माझ्या एका रूममधल्या सिलिंग फॅनचा खूप आवाज येत होता. तो पोलर कंपनीचा होता. तो चालू केल्यानंतर घर्रघर्र असा आवाज करायचा. त्याला दोन वेळेस दुरूस्तही केले गेले होते. पण आता उन्हाळा सुरू होणार अन त्यात त्याचा न सहन होणारा आवाज ऐकून तो फॅन बदलायचा निर्णय घेतला.

बाजारात अनेक प्रकारचे सिलींग फॅन्स उपलब्ध आहेत. त्यांच्या किंमती अगदी ९०० रूपयांपासून सुरू होतात.

नवा फॅन घेण्यासाठी मी मार्केट मध्ये फिरलो. त्याचप्रमाणे इंटरनेटवरही सर्च केले. त्यात BLDC Motor असणारे नवे तंत्र असणारे सिलींग फॅन्स देखील आले आहेत.

घरात दुसर्‍या रूम मध्ये ओरीएंट कंपनीचा चांगला चालणारा फॅन असल्याने ओरीएंट चे फॅन्स बघीतले. इतर कंपन्यांचेही फॅन्स उपलब्ध आहेत आणि ते चांगले आहेतच. तर बीएलडीसी मोटर असणारा पोलर कंपनीचा फॅन हा ३२ वॅट मध्ये १२०० एमएम अ‍ॅल्यूमीनीअम पाती असणारा, कॉपर वायंडींग मध्ये उपलब्ध होता. हा फॅन रिमोट कंट्रोल करून वापरता येतो. त्याची किंमत २९५०/- इतकी सांगितली गेली. वॉरंटी २ वर्षे. (इलेक्ट्रीक प्रॉडक्टसमध्ये एमआरपी वेगळी आणि जास्त असते. एमआरपीला काही अर्थ नसतो.)

दुसर्‍या दुकानात क्रॉम्टन कंपनीचे बीएलडीसी मोटर सोडून इतर फॅन्स होते. त्यांच्या किंमती साधारण १२००/- रुपयांपासून पुढे होत्या.

आणखी एक दुकान पाहिले असता तेथे एक ग्राहक बीएलडीसी मोटर आणि रिमोट कंट्रोल असलेले क्रॉम्टन कंपनीचे दोन फॅन्स घेवून जात असतांना दिसला. मलाही त्या फॅन्सबाबत उत्सूकता होतीच. मी त्या फॅन बाबत दुकानदाराला विचारले. त्यात सध्या क्रॉम्टन Energion HS (रिमोट कंट्रोल सहीत) हे एकच मॉडेल बीएलडीसी मध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले. त्याची किंमत रुपये ३०००/- होती. या फॅनवर वॉरंटी पाच वर्षांची आहे. मी तो फॅन घेणार असे त्या दुकानदाराला सांगितले. त्याचेकडे केवळ आयव्हरी रंगात तो फॅन उपलब्ध होता. मला तपकिरी - ब्राऊन रंगात फॅन हवा होता. मला थोडा वेळ असल्याने अन फॅन घेवूनच घरी जायचे असल्याने मी तो त्यांना उपलब्ध करून द्यायला सांगितला. त्या मालकाने होकार दिला. ग्राहकाने आग्रह केल्यास दुकानदार शेजारपाजारच्या त्याच्या ओळखीतून ती वस्तू अ‍ॅरेंज करून देतो. तो कुठून आणतो याबाबत मला काही घेणे नव्हते. मला वस्तू हवी होती आणि दुपारच्या उन्हात आणखी दुसरे दुकान पाहण्याची माझी इच्छा नव्हती. अर्थात या दुकानापासून थोडे दूर - समोरच माझ्या कॉलेज मित्राचे असलेच फॅन, कूलर, कूकर, ओव्हन, मिक्सर इत्यादी विकण्याचे दुकान आहे पण मी ते टाळले. आणि त्याचेकडे हे मॉडेल उपलब्ध असेलच असे नव्हते.

मला हव्या असलेल्या रंगाचा फॅन येईपर्यंत मग मी तेथल्या काउंटरवरील विक्रेत्याशी त्या फॅन बाबत चौकशी केली. त्याला वॅटेज विचारले असता तो ५० वॅटचा फॅन असल्याचे सांगितले. पण मला विश्वास बसला नाही. कारण रेग्यूलर फॅन्स हे साधारण ७५-८० वॅट असतात आणि आधीच्या दुकानात ओरीएंट कंपनीचा बीएलडीसी मोटर असणारा फॅन हा ३२ वॅट मध्ये उपलब्ध होता तर या क्रॉम्टन Energion HS फॅनचे वॅटेज जवळपास तितकेच असायला हवे होते. बीएलडीसी मोटर असणारा फॅन वीजेची बचत ५०% पर्यंत करतो.


माझा गोंधळ पाहून दुकानाचा मालक तेथे आला. त्याने मोबाईलमध्ये क्रॉम्टन Energion HS चे स्पेसीफिकेशन पाहून या मॉडेलचे इनपूट वॅटेज हे ३५ वॅट असल्याचे मला दाखवले. माझी खात्री पटली. तो तेथे येईपर्यंत मी देखील माझ्या मोबाईलमध्ये इंटरनेटवर या मॉडेलचे वॅटेज किती हे पाहिले. तेच दुकानमालकाने दाखवल्याने मला समाधान वाटले. या फॅनची एमआरपी रु. ३८००/- आहे.

माझ्या आवडीच्या रंगाचा फॅन येईपर्यंत त्या मालकाने मला त्याच्या डोक्यावर गरगरणारा फॅन दाखवला. तो फॅन (कंपनीचे नाव विसरलो) साध्या मोटरमध्ये होता पण तो फॅन मोबाईलमधल्या अ‍ॅपवर कंट्रोल करता येणारा होता. त्यात १ ते १०० पर्यंत फॅन स्पिड कंट्रोल करता येतो. त्यात क्वाडकोर असलेला क्वालकॉम्पचा मायक्रोप्रोसेसर होता. त्यात असंख्य सेटींग्ज होत्या जेणे करून फॅन ब्रीझ मोडवर जाणे, थांबून थांबून चालवणे, टायमर लावून चालवणे इत्यादी सोई होत्या. त्याची किंमत ४९०० रुपये होती. त्याच्याच खालचे मॉडेल ३५०० रुपयांत होते पण त्यात स्मार्ट मायक्रोप्रोसेसर नव्हता. तो नंतर आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा रुपये १५००/- मध्ये जोडून मिळण्याची सोयही होती.

माझ्या आवडीचा क्रॉम्टन Energion HS फॅन आला आणि मग मी तो पैसे देवून घरी घेवून आलो.

अनबॉक्सींग क्रॉम्टन Energion HS फॅन:
फॅनची मोटर आणि तीन पाती दोन वेगवेगळ्या बॉक्स मध्ये होती. पात्यांचे बॉक्स उघडून पाती निराळी ठेवली.

फॅनचे बॉक्स उघडल्यानंतर त्यात फॅनचे मोटर असणारा मुख्य भाग होता. त्याबरोबरच एक दांडी, हुकला टांगायचे रबरी बूश, त्याला असणार्‍या क्लॅम्स, नट बोल्ट्स, वॉशर, लॉकींग पीन्स इत्यादी होते. मुख्य म्हणजे रिमोट होता. रिमोटमध्ये बॅटरी-सेल्स नव्हत्या. ते दोन सेल्स मी बाहेरून घेतले.



फॅनची जोडणी:
बॉक्समधले सर्व पार्टस मी टेबलावर काढून ठेवले. सर्वात आधी आवाज करणारा जुना फॅन सिलींगमधून काढून घेतला. (मेन एमसीबी अर्थातच बंद केला होता.) त्या जुन्या फॅनच्या दांडीमधून असणारी पाऊण-एक फुटाचीच वायर मला नव्या फॅनमध्ये बसवायची असल्याने मी ती आधी काढून घेतली.  सर्वात प्रथम नव्या फॅनच्या दांडीमध्ये ती वायर ओवून घेतली. नंतर मोटर असणार्‍या मुख्य भागाला तीन पाते जोडून त्यांना नट आवळून टाईट केले. फॅनला दांडी जोडून खाली नट टाईट केले. दांडीतून खाली आलेल्या वायर्स फॅनच्या इनपूटला जोडल्या. पण मोटर आणि छताला असणारे दोन कप मी त्या दांडीत टाकायचे विसरलो. लक्षात आल्यानंतर पुन्हा दांडीच्या वरच्या बाजूला मी वायरला जोडणे सोपे जावे म्हणून कपलींग लावतो ते काढावे लागले. त्यानंतर ते दोन कप दांडीत टाकले. (वाळूचे घड्याळ कसे असते तसे ते कप दिसतात. येथे फोटो टाकत नाही पण आपल्याला कल्पना यावी म्हणून हे लिहीले आहे.) पुन्हा वायरच्या वरच्या बाजूला कपलींग लावले.

फॅनची छताला जोडणी:
या बीएलडीसी फॅनला भिंतीवरच्या रेग्यूलेटरची गरज नसते. रिमोटवरच हे फॅन चालतात. तशी सुचना ऑपरेटींग मॅन्यूअल मध्ये आणि रिमोटवरही लिहीलेली आहे. ऑपरेटींग मॅन्यूअलमध्ये असेही लिहीलेले होते की तुम्ही भिंतीवरचे रेग्यूलेटर जरी काढले नाही तरी ते कायम फूल स्पिडच्या सेटींगवर ठेवा. भिंतीवरचे रेग्यूलेटर काढायचे ठरवले असते तर आणखी काम वाढले असते. त्यामुळे मी भिंतीवरचे इलेक्ट्रॉनीक रेग्यूलेटर तसेच ठेवण्याचा निर्णय घेतला.

नंतर शिडीवर उभे राहून नवा फॅन मी बूश सहीत छताच्या हूकला टांगला. नट थोडे लूजच सोडले. कारण मला पहिल्यांदा फॅनची ट्रायल घ्यायची होती. आधीच नट टाईट करून नंतर काही झाले अन फॅन चालला नाही तर शिडीवर उभे राहून वरचे नट खोलणे किती त्रासदायक असते अन ते देखील उन्हाळ्यात वीज/ फॅन बंद करून - ते आपण अनूभवले असेलच. (आपण हवेसाठीच फॅन लावत असतो तर मग आपल्याला उंचावर काम करतांना हवा देणार कोण?) असो.

त्यानंतर एमसीबी चालू केला असता फॅन लगेचच गोल फिरायला लागला! (भिंतीवरचे इलेक्ट्रॉनीक रेग्यूलेटर फूल स्पिडच्या सेटींगवर होते.) नंतर रेग्यूलेटर बंद करून शीडीवर चढून छताच्या हूकला टांगलेल्या फॅनचे सगळे बोल्ट्स टाईट केले. दोन कप्स फॅनची मोटरची असेंब्ली अन छताची हूकची जोडणी झाकतील असे सरकवले.

त्यानंतर भिंतीवरचे रेग्यूलेटर फूल स्पीडला ठेवून फॅन चालू केला.

फॅनचे रिमोट कंट्रोल टेस्टींग:
बीएलडीसी फॅनला भिंतीवरचे रेग्यूलेटरची गरज नसते हे आधीच सांगितले आहे. रिमोट कंट्रोल ने सर्वात प्रथम मी फॅन ऑफ बटन दाबून थांबवला. नंतर तो ऑन बटन दाबून चालू केला. तो पाच या सेटींगवर फूल स्पीडमध्ये फिरत होता. नंतर मी एक नंबर स्पीडचे बटन दाबून पाहिले. फॅनचा स्पीड कमी झालेला होता. नंतर २, ३, ४ असे सर्व रिमोटवरील बटन दाबून फॅन टेस्ट केला. फॅन त्या त्या स्पीडला योग्य रितीने फिरत होता.
त्या रिमोटवरच १ तास, २ तास, ३ तास आणि ४ तास असे बटन आहे. म्हणजे ते दाबले असता फॅन त्या त्या तासांपूरता चालून आपोआप थांबतो. अर्थात मला त्याची टेस्टींग करायची नव्हती. हा एक रिमोट दोन क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन कंट्रोल करण्याकरता वापरता येतो असे मॅन्यूअल मध्ये लिहीलेले आहे. त्यासाठी एक नंबरचे बटन दहा सेकंद दाबून ठेवल्यास बीप असा आवाज होतो आणि तो रिमोट त्या त्या फॅनला सेट होतो.

निष्कर्ष:
बीएलडीसी फॅन हे तुलनेने नव्या टेक्नॉलॉजीचे फॅन आहेत. हे फॅन कन्व्हेंशनल फॅनच्या तुलनेत ५०% वीज वाचवतात. (असे स्पेसीफीकेशन मध्ये लिहीलेले आहे. मी घेतलेल्या क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅनचे बॉक्स पॅकींग व्यवस्थित होते. त्यावर सर्व सूचना आहेत.

ऑपरेटींग मॅन्यूअल सुचनांमधील तृटी:
* २३० व्होल्ट इनपूट वायर्स कोठे जोडाव्यात हे कोठेही लिहीलेले नाही.
* दोन कप्स आधीच दांडीत टाकून घ्यावेत हि सुचना किंवा चित्र देखील नाही.
या दोन बाबी खटकल्या.

क्रॉम्टन Energion HS सिलींग फॅन वापरल्यानंतर योग्य हवा देतो असे आढळले. फॅन रूममध्ये सर्वदूर हवा फेकत होता. रिमोटने फॅन कंट्रोल करणे सुखदायक आहे. हा रिमोट फॅनकडे वळवायलाच हवा असे नाही. कुठल्याही अँगलमध्ये (जमीनीकडे सुद्धा) बटन दाबून फॅन कंट्रोल करता येतो. यात इन्फारेड टेक्नॉलॉजी आहे. (दुकानमालक वाय-फाय आहे असे सांगत होता. आपण ऐकून घ्यायचे.)

या फॅनची बाजारात तुलनात्मक किंमत योग्य आहे. फॅनवर डिजाईन वगैरे काही नाही. एकदम सोबर दिसतो.

सुचना:
* क्रॉम्टन कंपनीचा आणि माझा फॅन विकत घेण्याशिवाय काहीही संबंध नाही.
* हा रिह्यू (समीक्षा - review) लिहीण्यासाठी मला कुणाकडूनही आर्थिक प्राप्ती झालेली नाही.
* फॅनच्या जोडणीबाबत व्यक्तीपरत्वे निराळे अनूभव येवू शकतात.
* कोणत्याही इलेक्ट्रीकल वस्तू हाताळतांना वीजेचा मुख्य प्रवाह मेन स्विच किंवा एमसीबी बंद करावा.
* जरूर तेथे तांत्रीक भाषेतले इंग्रजी प्रतीशब्दच लेख लिहीतांना वापरले आहेत.

- पाषाणभेद
०२/०३/२०२०

पूर्वप्रकाशित

Friday, September 02, 2011

अंतर्वस्त्रे परिधान करण्याची योग्य रीत

आता केवळ 'अंतर्वस्त्रे' (अंडरविअर) हा शब्द या धाग्यात आहे म्हणून नाक मुरडू नका. 'अंतर्वस्त्रे' म्हणजे जे बाहेरील कपड्यांच्या आतच घालतो तशीच वस्त्र हे लक्षात घ्या अन पुढे वाचा.

आता ही अंतर्वस्त्रे' किंवा अंडरविअर (उदा. बनियन) आपण शर्ट किंवा पँटच्या आत आपण घालतो. त्या अंतर्वस्त्रांवर (बनियनवर) एक लेबल त्या त्या कंपनीने लावलेले असते. ती त्यांची जाहीरात असते अन त्यावर त्या बनियन च्या मापाचा एक नंबर लिहीलेला असतो. तो साधारणता: इंचात असतो. म्हणजे ज्याची छाती २८ इंचाची असते त्याला २८ नंबरचा बनियन फिट होतो. (फिट्ट नाही तर फिट म्हणजे योग्य मापात बसतो).
तर आपले लेबल. हे लेबल आजकाल सिन्थेटीक धाग्यातले येते किंवा बनीयनच्याच कापडाचे ते नसते. तुम्ही जर ते लेबलचे अंडरविअर (बनियन) अंगात घातले तर ते सेन्सीटीव्ह त्वचा असणार्‍याला रूतते. हे कधी कोणाच्या लक्षात आले नसेल पण आता त्याकडे निट लक्ष द्या म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. उन्हाळ्यात घामाची पहीली धार मानेच्या त्याच भागातून खाली जात असल्याचे तुमच्या लक्षात येईल.




काही शर्टच्या कॉलरच्या आतल्या बाजूलाही टेलरचे नाव असलेले लेबल असते. ते सुद्धा असेच रुतते किंवा त्या भागात खाजवावे लागते. नविन शर्ट किंवा अंडरविअर असल्यास तेथे जास्तच लागते.
हा झाला मुद्दा क्रमांक १.


आता मुद्दा क्रमांक २. बनियन जर सँन्डो असेल तर त्याचे वरचे दोन निमूळते भाग गळ्याजवळील भागाजवळ जुळलेले असतात. अन बाहीचे असेल तर त्याचा गळा शिलाईने शिवलेला असतो. तेथे शिलाई मारलेली असल्याने तेथील भाग जास्त फुगीर असतो. आता तो कुणाला रुतत वैगेरे नाही. अंतर्वस्त्रांचे (बनियनचे) काम शरीराला आलेला घाम शोषून घेणे हा असतो. अन ते शर्ट-पँटच्या आत असते. त्यामुळे ते सुलट घातले काय किंवा उलट घातले काय काही फरक पडत नाही.
पण त्यावर असलेले लेबल मानेला रूतू नये म्हणून व बाह्यांचे बनियन असेल तर गळ्याला अन काखांना त्याची शिलाई रूतू नये म्हणून ते अंतर्वस्त्र (किंवा बनियन) हे उलटे (म्हणजे शिलाई किंवा ते लेबल बाहेर असलेले ) घातले पाहीजे असे माझे मत आहे.

आता शर्टतर उलटा घालू शकत नाही, म्हणून त्याचे कॉलरचे लेबल अन बनियनचे लेबल आपण नक्कीच फाडू शकतो.

तर मित्रांनो, घ्या कात्री अन फाडून टाका अंडरविअर अन कॉलरचे लेबल, अन बघा तो किती 'आराम का मामला' होतो ते.

Friday, May 14, 2010

ज्वालामुखीचे कवन

ज्वालामुखीचे कवन

नुकत्याच झालेल्या आईसलँडमधील ज्वालामुखीने घातलेला गोंधळ आपण वाचलाच असेल. त्या ज्वालामुखीची माहिती आपण कवनात पाहुयात.
इतर काही आकृत्या ज्यामुळे आपणास हा भुगोलाचा भाग निट समजून घेता येईल:
http://www.didcotgirls.oxon.sch.uk/depts/geog/bcs_geography/earth_structure.htm
http://www.ifa.hawaii.edu/~barnes/ast110_06/quizzes/disc04.html
http://visual.merriam-webster.com/images/earth/geology/structure-earth.jpg

भुगोल इ. ८ वी (महाराष्ट्र एस. एस. सी. बोर्ड, मराठी माध्यम) या पुस्तकाचे आभार.
-----------------------------------------------------------


१४ एप्रिल २०१० ला आईसलँडमध्ये ज्वालामुखी झाला
'एय्जाफ्जाल्लाज्योकुल' असे नाव दिले लोकांनी त्याला ||१||

आगडोंब तो गगनी उद्रेकला धरतीच्या प्रावरणातूनी
लपलपल्या हजार जीव्हा ओसांडूनी धावती ज्वालामुखीतूनी ||२||

सभोवताली शीतप्रदेश असूनी वाहे ज्वाला धरतीतून
निसर्गाची किमया बघती आपण सारे जन ||४||

केवळ काही दिसांचे नाटक सारे घडविले निसर्गाने
युरोपखंडीय जीवन सारे कवेत घेतले त्याने ||५||

लाव्हा तो उसळे उष्ण, लाल, भेदक जणू रवी उगवला धरतीचा
का कुणी मारीला तीर हृदयी जणू फुटे झरा रक्ताचा ||६||

असे कसे घडते हे सारे जाणून घ्या तुम्ही जन
म्हणजे समजेल तुम्हा मानव असे निसर्गापुढे लहान ||७||

प्रावरणामध्ये १००/२०० कि.मी. खोल भागात
उष्णतेमुळे आतील सारे खडक वितळतात ||८||

भुपृष्ठाखाली वितळलेल्या असल्या या स्थितीत
तप्त स्वरूपात असतो पदार्थ एक, म्हणती शिलारस ||९||

या शिलारसामुळे शिलारसकोठी तयार या भागात
ज्वालामुखीय क्रियेत भुपृष्ठावर शिलारस येई अर्धप्रवाही स्वरूपात ||१०||

भुकवचात शिलारस थंड होवोनी आंतरनिर्मीत अग्नीज खडक बनती
हाच लाव्हा भुपृष्ठावर थंड होवोनी बहिनिर्मीत अग्नीज खडक होती ||११||

ज्वालामुखीय क्रिया म्हणजे शिलारस येई भुपृष्ठावर पृथ्वीच्या प्रावरणातून
दृष्य स्वरूपात सारे रूप त्याचे असे वायू, द्रव अन घन ||१२||

या उद्रेकातूनी बाहेर पडती राख, वाफ अन अनेक वायू तप्त
तसाच लाव्हाही बाहेर येई उष्ण विरघळलेल्या खडकांच्या स्वरूपात ||१३||

ज्वालामुखी फुटण्याचे दोन प्रकार असती
एकास केंद्रिय अन दुसर्‍यास भेगीय म्हणती ||१४||

केंद्रिय ज्वालामुखीतून लाव्हा, राख अन वायू एकाच ठिकाणातून येती
भेगीय ज्वालामुखीत हेच सारे निरनिराळ्या भेगांतूनी येती ||१५||

असेच असते निसर्गाचे वर्तन ज्वालामुखीसाठी
सच्च्या पाषाणाने वर्णन केले हे सारे तुमच्यासाठी ||१६||

आगामी कवनांतूनी जाणूनी घेवू इतरही भुगोल सारा
जो वाचील अन परीक्षेत लिहील तोची विद्यार्थी उत्तीर्ण होईल खरा ||१७||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/०५/२०१०

Wednesday, March 17, 2010

सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?

सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?

सुर्यग्रहण नुसत्या उघड्या डोळ्यांनी पाहू नये. (ग्रहण नसते तेव्हा व ग्रहणात असा काय बदल होतो जेणेकरून ग्रहणकाळातच सुर्याकडे उघड्या डोळ्यांनी बघू नये ते?) नासाच्या या साईटवर ते चांगले स्पष्ट केले आहे पण त्याचे मराठीकरण काय आहे?

आज होणारे सुर्यग्रहण पाहण्याचा सोपा व धोकादायक नसणारा मार्ग कोणता?
१) ग्रहणाचे चष्मे (ते बनावट कंपनीचेही किंवा चायनीज पण मिळू शकतात.)
२) पाण्यात / कागदावर ग्रहणाची प्रतिमा घेवून
३) पिनहोल कॅमेरा बनवून
४) डिजीटल कॅमेरॅच्या स्र्किन मध्ये
५) दुरदर्शनवर :-)

माझ्या मते सुर्यग्रहण हे डिजीटल कॅमेरॅच्या स्र्किन मध्ये बघितले असता डोळ्यांवर होणारा परिणाम हा सर्वात कमी असावा व त्यात ग्रहणही चांगले व रंगीत दिसेल.
आपले मत काय?

(डिजीटल किंवा साधी) फोटोग्राफी - एक कला की विज्ञान ?

(डिजीटल किंवा साधी) फोटोग्राफी - एक कला की विज्ञान ?

डिस्क्लेमर : या काथ्याकूटात फोटोग्राफरांना व कलादालनात फोटो टाकणार्‍यांना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. या बाबत मागेच मी एका धाग्यात या बद्दल चर्चा करण्याबाबत विचारले होते.

साधा फिल्मवरचा फोटो घ्या किंवा आताचे डिजीटल कॅमेरॅवरचे काढलेले फोटो घ्या, फायनल रिझल्ट (फोटो) तुमच्या हातात येईपर्यंत तुम्हाला कोणतेतरी तांत्रीक हत्यार वापरावी लागते किंवा त्या हत्यारांद्वारे केलेली क्रिया वापरावी लागते. यात ज्याचा फोटो काढायचा आहे तो ऑब्जे़क्ट, फोटोग्राफर, फोटो कॅमेरा, फोटो डेव्हलप करण्याची रसायने, त्यातील केमीकल क्रिया, प्रिंटींग आदी क्रिया येतात.

फोटोग्राफीच्या जन्मापासूनच फोटोग्राफी ही एक कला आहे की एक तांत्रीक क्रिया आहे या बद्दल वाद आहे. काही लोकांच्या मते कलाकारांचे (चित्रकार) पोट भरण्याचा मार्ग फोटोग्राफीमुळे खुंटला गेल्याने ते फोटोग्राफी ही कला नाही अशी तक्रार करतात असे म्हणणे आहे. इतिहास तपासला असता काही समूदायाने (चित्रकारांनी) या बाबत आपला आक्रोश देखील जाहिरपणे दाखवला होता.

आता असे समजा की तुम्हाला एक फुलपाखरू आवडले. त्याचे तुम्ही ५/६ (फिल्मअसलेल्या व डिजीटल कॅमेरॅने) फोटो काढले. त्यातला एक चांगला फोटो तुम्ही डेव्हलप केला व डिजीटल फोटो सॉफ्टवेअरने प्रक्रियेने उन्नत केला. त्याच फुलपाखराचे तुम्ही मेमरी ड्रॉइंग काढले. या दोन्ही किंवा तिनही क्रियेत कोणती क्रिया त्या माणसाची जास्तीत जास्त कलेकडची नजर दाखवते? प्रत्येक जण जसा विचार करेल त्या त्या प्रमाणे त्याचे उत्तर येईल. यात अनेक वादही होतील.

अगदी उलट विचार केला तर माझ्या पाहण्यात पुर्वीचे चित्रकार होते ते आता कॉम्पुटर वापरून आपली चित्रकारीतेचा व्यवसायात रूपांतर करणारे लोकही आहेत. त्यांच्या बाबतीत कला ही पैसे कमवण्याचे माध्यम झालेले आहे.

काही जणांचे असेही म्हणणे आहे की केवळ काढलेले फोटो जसेच्या तसे (प्रोसेस न करता, कोणताही लाईट, कॉस्चूम, सॉफ्टवेअर टचींग न करता ) बघीतले /वापरले तरच ती एक कला असे आहे.

माझ्या मते फोटोग्राफी एक आनंद देणारे, भूतकाळ सांभाळून ठेवणारे एक वैज्ञानीक माध्यम आहे तर चित्रकला हीच त्याची मुळ जननी आहे व ती कला आहे. फोटोग्राफी जोपर्यंत काही प्रोसेस न करता वापरात येते तोपर्यंत काही प्रमाणातच फोटो काढणार्‍याच्या अँगलने व तो फोटो कलेच्या अँगलने बघणार्‍याच्या अ‍ॅंगलने कला आहे. अन्यथा ती एक केवळ वैज्ञानीक प्रक्रिया आहे.

Tuesday, August 25, 2009

महाभयंकर सत्य

पुर्वप्रसिद्धी : http://www.misalpav.com/node/8401

सगळ्या जगाचा प्राण आहे असे वाटणारे ईंधन आता लवकरच संपणार. लवकरच म्हणजे किती ? अहो आपण किंवा आपली मुलं किंवा अगदी फार फार तर आपली नातवंडं जग बघू शकतील. हे काही तथाकथीत भविष्य नव्हे तर ते एक सप्रमाण सिद्ध केले जाणारे भाकीत आहे. ते लोकप्रभात मांडलय मिलिंद जोशींनी. सगळ्यांना माहीत व्हावे हा या दोन ओळींच्या माहितीचा हेतू.