Sunday, September 26, 2021

शब्दांची कर्णफुले

शब्दांची कर्णफुले

प्रसन्न सुंदर सुगंधी सकाळी
प्रेम बरसले अवचीत अवकाळी
नाहत्या ओलेत्या भोर केशांतून
थेंब तयाचे अवतरले भाळी

ओठी शब्द फुलून आले
शब्दांचे मग मोती झाले
तु ते हळूवार उचलूनी घेत
कर्णफुलांसम कानी ल्याले

(मिपाच्या यंदाच्या दिवाळीअंकासाठी काही उत्पादन करावे म्हणून या शब्दफुलांचे उत्पादन घेतले होते. पण आम्हा शब्दशेतकर्यांच्या मनाच्या गोदामात अनेक प्रकारचा लगोलग नष्ट पावणारा पण भरघोस उत्पन्न मिळणारा माल तयार होत असल्याने आहे ते उत्पादीत शब्दपीक मिपाच्या साहित्य मंडईइत विकायला ठेवले आहे. वाचक ग्राहकाकडून आहे त्या मालाला उठाव मिळेल ही शब्दशेतकर्याची आशा आहे.)

- शब्दमाल उत्पादक शेतकरी - पाषाणभेद
२४/०९/२०२१

  

Friday, September 24, 2021

पंचतत्व

पंचतत्व

अनंत आकाश पाहता  
मन माझे मोठे झाले 
तेच आकाश मनात कोंबले 
क्षणात सुक्ष्म अ‍ती लघू झाले ||१||

विस्तीर्ण जलाशय तो सागर 
त्यापुढती मी यकश्चित केवळ
नाव घडवली फळकुट घेवून 
लिलया पार कराया मिळे बळ ||२||

डोंगरांचे पर्वत जाहले
लंघून जाण्या उर धपापले
विमानात मात्र बसता 
गिरिशिखर भव्य भासले ||३||

संकटांची धग आली पेटून 
शत्रूसमान खिंडीत गाठून 
वारामागून वार करून
पराजीत केले त्यांना जिंकून ||४||

मार्ग समोरील नवीन अवघड 
चरण थकले चालून चालून
उत्साहाचा झरा न थकला
ध्येय समोर आले चालून ||५||
 
- पाभे
२४/०९/२०२१

Tuesday, September 21, 2021

मुखवटे

खरे चेहरे झाकण्या चढवूनी खोटे मुखवटे 
खरेच आहे भासवतात मग ते चेहरे खोटे ||१|| 

मनात कटूता असूनी वाहवा करती 
हसूनी खोटे वार करती पाठीवरती  ||२||

तोंडदेखला आदर देवूनी स्वागत होई 
पाठ वळता निंदा करण्याची करती घाई  ||३|| 

स्वार्थ साधण्या स्तूती करती तोंडभरूनी
कार्यभाग संपला, टिकेची झोड वदनी  ||४||

खोटे चेहरे वागवीत खोटे जीवन का जगावे?
मुखवट्याविना खरे चेहरे जगाला दाखवावे ||५||

- पाषाणभेद
२१/०९/२०२१

Sunday, September 19, 2021

माझे अन इतरांचे

माझेच दु:ख मोठे का?
इतरांचे दु:ख छोटे का?

हातातले गमावले सारे काही
त्यांनी तरी कमावले का?

पर्वतासम संकटे आली
हादरून मी गेलो, ते नाही का?

जे गेले ते माझे होते
इतरांचे काहीच नव्हते का?

मानले माझे माझे, केले माझे माझे
असेच असते इतरांचेही, नव्हे का?