Wednesday, June 30, 2010

गीत: डायवर दादा

डायवर दादा
डायवर दादा चला की आता
कशाला पब्लिक जादा घेता
डब्बल वाजली आता तरी
तुम्ही उगाच पब्लिक वर चढवता ||धृ||

रेटारेटी करतात सारी
गर्दीत बाईमाणूस एकटी तरी
बसायला जागा कुठं शोधू आता
तुम्ही उगाच पब्लिक वर चढवता ||१||

कोरस: "ह्यो डायवर गाडी काय पुढं नेत न्हाई, उगा वेळ होई, मुडदा बशीवला त्याचा
म्होरल्या कामाचा इस्कोट झाला, गर्दीचा महापुर आला, लवकर हाण म्हणावं गाडी त्याला"


कंडक्टर भाऊ लांब उभा मागं
"सरका पुढं, सरका पुढं ", वरडू लागं
गर्दीत पाकीट कशी काढू आता
तुम्ही उगाच पब्लिक वर चढवता ||२||

सामान माझं न्हाई लई जड
हात कोनी लावंना उचलाया थोड
उगा सामानाचंबी तिकीट का मागता?
तुम्ही उगाच पब्लिक वर चढवता ||२||

तिकडं तालूक्याचा बाजार भरलाय सारा
जाऊद्याना गाडी आता वाजले की बारा
नुसतं एक्शिलेटर दाबूनी गाडी उभी का करता
तुम्ही उगाच पब्लिक वर चढवता ||३||

कोरस: "ह्यो डायवर गाडी काय पुढं नेत न्हाई, उगा वेळ होई, मुडदा बशीवला त्याचा
म्होरल्या कामाचा इस्कोट झाला, गर्दीचा महापुर आला, लवकर हाण म्हणावं गाडी त्याला"


st bus

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१६/०६/२०१०

Tuesday, June 29, 2010

वंशावळी : एक ओळख

वंशावळी : एक ओळख

मागच्या आठवड्यात मी सकाळी घरी होतो त्यावेळी एक जोडपे घरी आले. ते वडिलांना त्यांचे आडनाव विचारत तुम्ही अमक्याचे नातेवाईक, तमक्याचे भाऊ, येथून तुम्ही येथे आले वैगेरे वैगेरे सांगत असलेले मी ऐकले. मी ताबडतोब समजलो की ते एक भाट आहेत, व ते आता वंशावळ वाचणार

आपल्या समाजात अनेक जाती आहेत. या प्रत्येक जातीच्या वंशाची माहीती भाट समाज ठेवत असतो. असलीच कामे वडिलोपार्जीत व्यवसाय म्हणून करणारे ब्रम्हभट - श्री. कैलास रामदेवराय ब्रम्हभट हे होत. Kailas Bramhabhata
श्री. कैलास ब्रम्हभट (वंशावळ वाचणारे)

ते त्यांच्या वडिलांपासून असणारे हे काम सांभाळतात. आल्यानंतर चहापाणी झाला. अन त्यांनी आमची वंशावळी वाचायला सुरूवात केली. वंशावळ वाचण्याच्या आधी त्यांनी गणेश व इतर देवतांना वंदन केले अन मग एका विशिष्ट सुरात वंशावळीतील नावे वाचू लागले. कोण व्यक्ति कुठे होता, त्याला मुलगे किती, मुली किती, सुनबाई कोणत्या कुळातली, तिचे माहेरचे गाव कोणते आदी उल्लेख त्यात येत गेले. अगदी शंभर वर्षे च्या वरचा उल्लेख त्यात आला होता. नंतर नंतर जेव्हा पणजोबा, आजोबांचा उल्लेख त्यात आला तेव्हा ओळख पटायला लागली. एक प्रकारचा आपल्या कुळाचा इतीहासच होता तो. त्यानंतर त्यात आताच्या नविन पिढीची/ मुलांची नावे लिहील्या गेली. नंतर त्या पोथीची पुजा करून व दक्षिणा अन शिधा देवून समाप्ती झाली.
Vanshaval
वंशावळीतील एक पान

Vanshaval-2
वंशावळीतील एक पान

कैलास ब्रम्हभट यांच्याशी केलेल्या गप्पामधून बरीच माहिती मिळाली. कैलास यांचे पणजोबा/ आजोबा हेच काम करत असत. वंशावळीसच नामावळी किंवा वडलोपाजी असे म्हणतात. आता ते मध्यप्रदेश, गुजरात अन महाराष्ट्राचा प्रदेश या वंशावळ वाचण्यासाठी सांभाळतात. जोडीने ते एका मोटरसायकल ने घरून दिवाळीनंतर निघतात अन जुन पर्यंत ते फिरत राहतात. एखाद्या गावात ते एखाद्या घरी राहतात अन मग त्या गावातल्या समाजबांधवांच्या घरी वंशावळी वाचत फिरतात. त्यानंतर जवळच्या गावात चक्क्कर असतो. असे जुन पर्यंत चालू असते. आमच्या घरचे वाचन संपल्यानंतर ते गल्लीतील दुसर्‍या समाजबांधवांकडे जाणार होते. त्यांचे नाव सांगितल्याबरोबर त्यानी ते कोठले, त्यांचे भाऊबंद कोण याचा उल्लेख बरोबर केला. प्रत्येक कुळाच्या वह्या स्वत्रंत्र असल्याने व शेजारच्यांच्या वह्या आणल्या नसल्याने त्यांच्याकडे वाचन होवू शकले नाही. पुर्वी मोटरगाडीने प्रवास व्हायचा पण आता मोटरसायकल घेवूनच प्रवास केला तर परवडतो. जुन नंतर ते परत राजस्थान (मदनगंज ता किशनगंज, जि अजमेर) ला जावून त्यांच्या स्व:ताचा इलेक्ट्रीकलचा व्यवसाय बघतात.

Saturday, June 26, 2010

गीत: पहाटे पहाटे जवळ तू ये ना

पहाटे पहाटे जवळ तू ये ना


पहाटे पहाटे जवळ तू ये ना
धुंदीत झोपतांना जागी तू हो ना
पहाटे पहाटे मिठीत तू ये ना ||धृ||

थंडी गुलाबी न सोसणारी
अशातच रात्र गेली न संपणारी
अनुभूती वेगळी सारी, आली माझीया तना
पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||१||

आठवणी सार्‍या डोळ्यात जाग्या होवोनी
झोप ही सुखाची डोळ्यात येवोनी
स्वप्नात माझ्या तू येशी का पुन्हा पुन्हा
पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||२||

आठवून सारी रात झोपलेली
उमगते गुढ काव्य मंतरल्या वेळी
रोम रोम फुलले अंगी सुखावी तना
पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||३||

मखमली त्या केसांत सारे
विश्व माझे मलाच फासणारे
गुंतवून माझे मला मी सोडवू कुणा
पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||४||

मोगर्‍याचा सुगंध वेड लावतो जीवा
माळलास तो तेव्हाचा, कुस्करला केव्हा?
समरसून अलिंगना नाही म्हणू नको ना
पहाटे पहाटे जवळ तू ये ना ||५||

पहाटे पहाटे जवळ तू ये ना
धुंदीत झोपतांना जागी तू हो ना
पहाटे पहाटे मिठीत तू ये ना ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१५/०६/२०१० ( पहाटे ५:१७!)

Wednesday, June 23, 2010

युगलगीत : ही धुंद पावसाळी हवा

युगलगीत: ही धुंद पावसाळी हवा

मंडळी, काव्यातील ओळीचा शेवटच्या शब्दाने पुन्हा नविन ओळ सुरू होणारी हे काव्य आहे. एक नवा प्रयत्न केला आहे. आस्वाद घ्या.

ती: ही धुंद पावसाळी हवा
तो: हवा हवासा गारवा
ती: गारव्यात तनू ही धुंद
तो: धुंदीत रंगला खेळ नवा
दोघे: ही धुंद पावसाळी हवा.... ||धृ||

तो: स्वप्नांच्या वाटेने चालतांना
ती: चालतांना स्पर्शून घेना
तो: घेवून कवेत साजणीला
ती: साजणीचा लाजूनी चुर मरवा
दोघे: ही धुंद पावसाळी हवा....||१||

ती: रात्र अशी ही सुखावणारी
तो: सुखावून मने तृप्त झाली
ती: होवोनी एकरूप मिलनाने
तो: मिलनास साक्षी चांदवा
दोघे: ही धुंद पावसाळी हवा....||२||


दोघे: ही धुंद पावसाळी हवा
दोघे: हवा हवासा गारवा

- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/०६/२०१०

Tuesday, June 22, 2010

उन्हेरे - गरम पाण्याचे झरे

उन्हेरे - गरम पाण्याचे झरे

"सुखोदकाने होई न्हाणे, दिले उन्हेरे देवाने"


सर्व ऋतुंमध्ये सर्वकाळ स्नानासाठी गरम पाण्याची योजना नियतीने उन्हेरे या गावी केली आहे. उन्हेरे हे गाव पाली (अष्टविनायक बल्लाळेश्वर- ता. सुघागड, जि. रायगड) येथून उत्तरेस २ किमी अंतरावर आहे.
Unhere , Tal- Pali-Sidhagad-Raigad-Maharashtra
छायाचित्र १: उन्हेरे येथे जाण्यासाठी मार्गदर्शन
Sarasghad Fort- Pali-Tal Sudhagad- Raigad-Maharashtra
छायाचित्र २: पाली येथील सरसगड

श्रीरामाने बाण मारून सितामाईस स्नानासाठी हे स्थान तयार केले अशी पुराणात अख्याईका आहे.

उन्हेरे या गावाजवळील या गंधकमिश्रीत कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार व वाताचे विकार बरे होतात. येथे गरम पाण्याच्या झर्‍यांचे कुंड बांधण्यात आलेले आहेते.
एकुण तीन कुंडे आहेत. त्यापैकी एक स्रीयांसाठी, एक पुरूषांसाठी आहे.
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ३: उन्हेरे येथील गरम पाण्याची कुंडे

या दोन्ही कुंडातील पाण्याचे तापमान आपल्या त्वचेला सुसह्य इतके आहे. तिसर्‍या कुंडाचे तापमान मात्र जास्त आहे. कुंडाच्या तळाशी आशानी लाकडाच्या फळ्या टाकल्या आहेत. त्यावर उभे राहून स्नान करता येते.
Unhere , Tal- Pali-Sidhagad-Raigad-Maharashtra
छायाचित्र ४: उन्हेरे येथील गरम पाण्याची कुंडे

Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ५: उन्हेरे येथील गरम पाण्याची कुंडे

स्नान करतांना साबण लावणे, चुळ भरणे, कपडे धुणे, पोहणे आदी प्रकार टाळावेत. हे पाणी पिऊ नये.
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ६:

या पाण्यात जास्त वेळ थांबल्यास चक्कर येवू शकते. भुगर्भातील लाव्हारसामुळे खडक तापतात. त्याच्या संपर्कामुळे पाणीही तापते. त्यात गंधक आदी क्षार मिसळतात व ते पाणी खडकांच्या फटीतून बाहेर पडते. हेच गरम पाण्याचे झरे असतात.

उन्हेरे कुंडाचा परीसर अनेक सामाजीक राजकिय चळवळींचा साक्षीदार आहे. स्वातंत्रपुर्व काळात मो. कृ. देवधर यांचे अध्यक्षतेखाली हरिजन परिषद झाली होती. अनेक परिषदा, सभा या स्थानी झाल्या होत्या. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटीशांना मदत करू नये अशा अर्थाचे भाषण बापूसाहेब लिमये यांनी याठिकाणाहून केल्याने त्यांना शिक्षा झाली होती. ताकई येथील विठोबाची यात्रा संपली की येथे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला येथे यात्रा भरते. सुकी मासळी व घोंगड्या हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे.

सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने कुंडात आंघोळ करणार्‍यांना एक भावनिक आवाहन: -

उन्हेरे गरम पाण्याची कुंडे,
ही धारोष्ण गंगा आहे!
साबण लावून, कपडे धुवून,
या गंगेला मलीन करू नका!!


(संदर्भ: पाली तालुक्याचा इतिहास : लेखक: सुरेश पोतदार)

बाकी आमची कलाकारी:
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ७
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ८
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ९
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र १०
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ११:
वरील छायाचित्रे (क्र. ७ ते ११) कुंडातल्या पाण्यातून घेतलेली आहेत.

Sunday, June 20, 2010

ऑफिसातले गाणे

ऑफिसातले गाणे

जय महाराष्ट्र मंडळी!
आपण बहूतेक सगळेच नोकरदार मंडळी आहोत. कुठे ना कुठे कळफलक बडवतो, खर्डेघाशी करतो, हात काळे करतो. तर बहुतेक ठिकाणी (म्हणजे आय टी सेक्टर मध्ये) कामे करतांना गाणे ऐकणे आता सर्वसाधारण आहे. कुठे एका सेंट्रल स्पिकरवर गाणे वाजवले जाते. कुठे सेंट्रलाईझ म्यूझीक सिस्टीम असते. तर कोठे अशी व्यवस्था नसल्याने जो तो आपापला हेडफोन लावून गाणे ऐकत बसतो. आता आपण या 'ऑफिसात गाणे ऐकणे' या विषयावर जी चर्चा त्या अनूषंगाने जाणारे काही प्रश्न असे:

१) गाणे सेंट्रलाईज आहे का? म्हणजे एका ठिकाणी स्पिकर ठेवलेले आहेत अन कुणीतरी त्याच्या/ तिच्या आवडीचे गाणे वाजवतो.
२) त्या गाण्याचे ट्रॅक्स तुम्हाला नेहमीच आवडतात काय?
३) तुम्हाला तेथे तुमच्या आवडीचे गाणे वाजवता येते काय?
४) न वाजवता आल्यास अन दुसर्‍याच्या आवडीचे गाणे ऐकून कंटाळा, राग येतो काय? तो राग व्यक्त करता तेतो काय? राग आल्यास काही उपाय आहे काय?
५) चालू असलेले गाणे न आवडल्यास बंद करता येतो काय?
६) गाणे चालू असले म्हणजे कामात व्यत्यय येतो असे वाटते काय?
७) गाण्याचा व्हॉल्यूम कमी/ जास्त/ सहन करण्याईतपत/ बारीक/ जवळजवळ नाहीच असा असतो काय?
८) महाराष्ट्राबाहेर काम करत असतांना त्या त्या भाषेतले गाणे एकतांना कंटाळा, राग येतो काय? तो राग व्यक्त करता तेतो काय? राग आल्यास काही उपाय आहे काय?
९) "गाणे वाजवणे" या बाबत कंपनीची काही पॉलीसी आहे काय?
१०) गाण्याचा प्रकार कोणता: नेहमी शांत/ उल्हासीत करणारे/ क्लासिकल / इंन्स्ट्रूमेंटल/ आधूनिक सिनेमा संगीत / जुनी चित्रपट गीते/ इंग्रजी/ प्रादेशीक भाषेत आदी.
११) गाणे ऑनलाईन असते का? की कॉम्पूटरवर ? की सेंट्रल म्युझीक वर लागणारे?
१२) प्रत्येक जण त्याच्या त्याच्या सिस्टीम वर गाणे लावू शकतो काय?
१३) तुमचे या प्रकारामुळे वाद झालेला आहे काय?
१४) "गाणे वाजवणे " या प्रकारात केवळ एफ. एम. रेडीओच वाजवला जातो काय?
१५) तुम्हाला काम करतांना "गाणे वाजवणे " किंवा "गाणे ऐकणे "हा प्रकार आवडतो काय? हो/ नाही/ अजीबात नाही/ नकोच ते प्रकार
१६) ऑनलाईन गाणे हार्डडिस्कवर कॉपी करणे कॉपिराईट गुन्हा आहे हे तुम्हास/ तुमच्या मॅनेजमेंटला माहित आहे काय? त्या विरूद्ध काय पावले उचलली आहेत?
१७) ऑफिसची बँन्डविड्थ/ रिसोर्स वापरून ऑनलाईन गाणे डाउनलोड करणे/ शेअर करणे तुम्ही करता काय? ते योग्य वाटते काय? त्यात किती वेळ खर्ची जातो?
१८) नॉन आय टी नोकरी करणार्‍यांची काय मते/ अनुभव आहे?
१९) "ऑफीसात कामे करायला जातो. गाणे हे नकोच. मग चर्चा कशाला"

Friday, June 18, 2010

गीत: कसं जगावं या असल्या दिवसात

गीत: कसं जगावं या असल्या दिवसात


देवा एकदातरी चांगला आशिर्वाद मला दे ना
कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||धृ||

जिथं बघावं तिथं चालते लाच अन लुटमार
नव्याणवाचा आकडा येई शेवटी वस्तूच्या किंमतीवर
फसवणूक करूनी धंदा करता, गिर्‍हाइकांचं कोन ऐकेना
कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||१||

झाली भाजी महाग, गेली कुठं किफायत?
प्रवास नाही स्वस्त, रिक्षावाले लुटतात मस्त
अन्नधान्यात भेसळ होवोनी, वरणासाठी डाळं मिळेना
कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||२||

कामावर राबराबूनी, येई घरी परतूनी
टिव्ही ची कटकट असते सुरू प्राईमटायमातूनी
विरंगुळा म्हणूनी काहीतरी चांगले लावाना
कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||३||

बाहेर असते तारांबळ, माझ्या घरी झाली आबाळ
बायको सारखी म्हणे, "तुम्हांघरी सारखा दुष्काळ"
बायको तर सोडा पन शेजारीन ढुंकूनही बघेना
कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||४||

गरीब झाले गरीब अधिक, श्रीमंतांची नावे फोर्ब मासिकात
खायची असतांना ददात, ऑस्कर बक्षीस मिळतात
कोठे दाद मागायची कळेना या तुझ्या पाषाणा ||५||
कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना

देवा एकदातरी चांगला आशिर्वाद मला दे ना
कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||धृ||

- गरीब पाषाणभेद (दगडफोड्या)
०३/०६/२०१०

Thursday, June 17, 2010

तुझी जीन्स पॅन्ट

तुझी जीन्स पॅन्ट

तुझी जीन्स पॅन्ट चाललीय खाली खाली
काय शोभेना तूझ्या असल्या चाली ||धृ||

शॉर्ट शर्ट जाई वरती वरती
मधेच अंग दिसतया
मागं कंबर लचकवूनी
का उगा आसं चालतीया
गॉगल घालूनी बघतेस कुठे
जरा भडकच पावडर गाली
काय शोभेना तूझ्या असल्या चाली ||१||

सॅन्डल पायात घालूनी
नार नखरेदार चाले
नजरा लोकांच्या झुलवी
कानात झुबके बाळी हाले
काळीज धडधड उडे
जेव्हा स्किन टाईट जीन्स तू घाली
काय शोभेना तूझ्या असल्या चाली ||२||

अशी ग कशी फॅशन तूझी
अंग त्यातून दिसतया
कोण कोणाची तू समजना
रूमालानं तोंड झाकतीया
कापडं घालायची रीत नाही बरी
दुनिया जरी इतकी पुढे गेली
काय शोभेना तूझ्या असल्या चाली ||३||

नविनता सगळीकडे आली
हौस जीवाची करावी न्यारी
रीत जुन्या जमान्याची गेली
नव्याची आस नेहमीच लागते प्यारी
अंगभर साडी चोळी जावूनी
हि काय नविन तर्‍हा आली
काय शोभेना तूझ्या असल्या चाली ||४||

तुझी जीन्स पॅन्ट चाललीय खाली खाली
काय शोभेना तूझ्या असल्या चाली

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०२/२०१०

Wednesday, June 16, 2010

पिकल्या आंब्याला

पिकल्या आंब्याला

सिच्यूऐशन: हिरवीन आंबे विकणारी आहे. आंबे विकतांना ती गिर्‍हाईकांशी काव्यातून संवाद साधते...

गद्य:
आंबे घ्या आंबे, गोड गोड रसाळ आंबे
आंबे घ्या हो आंबे!

चाल सुरू:
पिकल्या आंब्याला दाबून पाहू नका
घ्यायचा आसलं तर घ्या, नाय तर नका ||धृ||

आंबा माझा रायवळ, नाही हापूस की पायरी
रस जरा चाखून बघा, म्हणाल नमून्याची चव बरी
रसासाठीचं आंबं हे आहे, दुसरीकडे जावू नका
पिकल्या आंब्याला दाबूनी पाहू नका ||१||

आंबे आहे घरच्या झाडाचे, नाही काही वाडीचे
फळ आहे लयी न्यारं, कलम केलेल्या पाडाचे
पानी सुटतं कैरी पाहून, तिला हात लावू नका
पिकल्या आंब्याला दाबूनी पाहू नका ||२||

यावर्षी आंबेमोहर बहरला, असा की हो फुलला
कैकांनी टेहळणी केली, मी तो राखीयला
आणला चाखायला केवळ, तुम्हांसाठी बरंका
पिकल्या आंब्याला दाबूनी पाहू नका ||३||

तुम्ही आंबं इथंतिथं दाबीता, हात इथंतिथं लावता
पाटीत आंबं रचलेत निट, का उगा खाली हात घालता
निसंतं बघायचं बघता, आन येळ घालवीता फुका
पिकल्या आंब्याला दाबूनी पाहू नका ||४||

म्हनून शेवटलं सांगते

पिकल्या आंब्याला दाबून पाहू नका
घ्यायचा आसलं तर घ्या, नाय तर नका ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०५/२०१०

Tuesday, June 15, 2010

बजरंगाचा भक्त पैलवान

बजरंगाचा भक्त पैलवान


हि कविता आपला सगळ्यांचा लाडका टारझन यास अर्पण


मी आहे बजरंगाचा भक्त, त्याचा डोक्यावर वरदहस्त
मेहनत करतो कसूनी, मैदानी कुस्ती करतो फक्त ||धृ||

शाळेत होतो द्वाड, घरी करायचे नाही लाड
चिंचा बोरे आवळे पाडूनी खायी नाही कसली त्याला तोड
लहाणपणी म्हणती सगळे तू अभ्यासात सुस्त
आता मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||१||

दंड बैठका तालीम करतो, जोर मारूनी घाम गाळतो
शड्डू जोरात ठोकतो, गडी समोरचा घाबरतो
दुध, बदाम, खारीक यांचा खुराक करतो मस्त
म्हणून मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||२||

कुस्ती खेळ आहे भारी, धोबीपछाड डावपेच करी
समोरच्याची ओढावी तंगडी, चढावे त्याच्या छाताडावरी
जिरवावी खोडी असेल जर समोरचा पैलवान मत्त
म्हणून मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||३||

पंचक्रोशीत नाव गाजे, जेव्हा कुस्तीत पानी पाजे
पदके अन गदा घेवूनी मी नाचे, संगे ढोल अन ताशे वाजे
सांगतो अंगमेहनत करा अन रहा कायमचे तंदूरूस्त
त्यासाठी मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||४||

मी आहे बजरंगाचा भक्त त्याचा डोक्यावर वरदहस्त
मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||धृ||


- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/५/२०१०

Thursday, June 3, 2010

नदीकाठी सासूरवाशीण

नदीकाठी सासूरवाशीण


अल्याड आहे सासर माझं,
पल्याड माहेरा पाहते
मधी वाहे चंद्रभागा,
त्यात धुनं मी गं धुते ||

पानी वाहे दुधगंगा,
जसं अमृताच्या चवीचं
त्याची गोडी काय सांगू,
त्याची गोडी अविट ||

नदीकाठची शाळू वाळू,
बारीक बारीक
मदी आसतील गोटे,
बी संगे खारीक ||

माहेर मोठं दांडगं,
नाही कसली वनवा
सासर बाई आसलं द्वाड,
त्याला कसली पर्वा ||

सोडले मोकळे पाय
नदीच्या ग पान्यात,
ऐन्यात रूप दिसे,
रूपे सोनेजडीत ||

जा ग माय जा ग माय,
अशीच ग तू वाहत
भरव तुझ्या लेकरांना,
चारा देई दुष्काळात ||

कितीकदा येते मी ग,
तुझ्या भरलेल्या काठाशी
गर्दी कितीका आसंना,
धरते मला पोटाशी ||

नदी बाई तू अन मी ग,
एकसारखे वाही पानी
तू धूते जनांचे पापं,
मी धूते माझी धूनी ||

ऐकते का ग सारं काही,
जे बोल मी बोलते
काय नको वाटून घेवू,
संन्याशीन तू तूझं कर्म करते ||

नदी काठी आली मी ग,
आहे सासूरवाशीण
सांगे आपली सुखदु:ख्ख,
पिंजर्‍यातील पक्षीण ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२९/०५/२०१०