Sunday, July 4, 2021

अपघात - एका नव्या ट्रकचा

 आज सुरेवारसिंगला ट्रकलोड घेवून मध्यप्रदेशातल्या सतना या गावी जायचे होते. नवी मुंबई ते सतना या प्रवासासाठी त्याने मनाची तयारी काल दुपारीच केली होती. साधारण चार दिवसाचा एकूण प्रवास होणार होता. इकडून काहीतरी केमीकल फिल्टर प्लांटचे मशिनरी घेवून तिकडे एका फॅक्टरीत अनलोड करायचे अन तिकडून इंदूरपर्यंत अनलोड येवून इंदूर जवळच्या पिथमपूरहून बजाज टेंम्पोमधून सामान घेवून ते चाकणला उतरवून परत नवी मुंबई. त्याच्या अनुभवाने एखादा दिवस जास्तच लागणार होता हे त्याला जाणवले होते.

बायकोने आणायला सांगितलेले किरकोळ किराणा सामान अन मुलीसाठी खाऊ घेवून तो काल दुपारीच लवकर घरी आला होता. रात्री आराम करून तो सकाळी उठला. लवकर आवरून मोटरसायकल घेवून कळंबोलीच्या इंपोर्ट एक्स्पोर्ट च्या त्याच्या मालकाने ट्रक लावलेल्या गोडावूनकडे तो सरळ निघाला. साडेनऊच्या सुमारास ट्रांसपोर्ट मालक त्याला स्व:त भेटायला आले. मालक स्व:त आलेले पाहून सुरेवारसिंग आश्वर्यचकीत झाला. आजवर असे कधी झाले नव्हते. मालक रणदीप चौघूले एक मोठे प्रस्थ होते. त्यांच्या ट्रकव्यवसायातून व कारखानदारीतून ते नव्या ट्रकच्या किल्या सुरेवारसिंगला द्यायला आले हे ऐकून तो हरखला. तसे ते नहमीच सुरेवारची काळझी घेत असत. वेळोवेळी पगारवाढ अन बोनस त्याला याच ट्रानंपोर्ट कंपनीत मिळत होता. आधीच्या कंपनीच्या मानाने येथे सगळे स्थिस्थावर होते. चार पाच वेळा चौघूले साहेब स्वत: त्याच्या घरीही आले होते. त्या लहानशा घरी साहेब कसे आले याचेच सुरेवारसिंगला आश्चर्य वाटत होते.

एखाद्या लहान मुलाला नवे खेळणे भेटावे तसा भारत बेंझचा 3523R हा नवा कोरा ट्रक त्याच्यासाठी माल लादून सज्ज होता. मालकांनी गेल्याच आठवड्यात असलेच चार ट्रक खरेदी केले होते. प्रशस्त कॅबीन, एसी, नवे मिटर असलेले कंसोल, झोपायला प्रशस्त जागा, कमी आवाज करणारे इंजीन, म्युझीक सिस्टम इत्यादी अनेक आधूनीक सुविधा त्या नव्या ट्रकमध्ये होत्या. गेल्या गुरूवारीच त्याने त्या ट्रकच्या डिलीव्हरीच्या वेळचे पेढे खाल्ले तेव्हा आपल्या हातीही हा ट्र्क हवा होता असे त्याला वाटले. ते स्वप्न आज सत्यात उतरले होते.

मालकांनी किल्या सुरेवारच्या हातात दिल्या, फोटो निघाले अन काळजीपूर्वक ट्रक चालवायच्या सुचना देऊन ते निघून गेले.

आता सुरेवारसिंग अन क्लिनर रघूनाथ यांनी ट्रकचा ताबा घेतला. सुरेवारइतकाच रघूनाथही नव्या ट्रकमध्ये बसायला मिळणार म्हणून आनंदी होता. सकाळी आल्या आल्या त्याने ट्रक पुसून चकाचक ठेवला होता. ह्या ट्रीपच्या वेळी रघू आपल्याबरोबर असल्याने सुरेवारसिंगला बरे वाटले. दोघेही उत्तराखंडातील एका जिल्ह्यातील आजूबाजूच्या गावचे असल्याने मनमोकळे बोलणे होत असे. रघू तसा बावीशीचा तरूण होता. पण गावाकडे काही नसल्याने ओळख काढत तो कळंबोलीला आला अन या ट्रकच्या लायनीत पडला. रघूही त्याच्या घरी वरचेवर येत असे. येतांना मुलीला खाऊ, खेळणी घेवून येत असे. सुरेवारसिंगची लांब ड्यूटी असेल तर घरची काळजीही घेत असे.

ट्रक डिजल अन लोड भरून तयारच होता. लोड एकदम मापात अन वजनात असल्याने पोलीसांची भिती नव्हती. तरी पण कोठेतरी पैसे लागतीलच याची खात्री मालक चौघूलेसाहेबांना असल्याने त्यांनी पाच हजार कॅश द्यायला सुपरवायजरला सांगितले होते. कॅश हातात पडताच सुरेवारसिंगने ट्रकला नमस्कार केला अन व्हिलवर जाऊन सेल मारला. आनंद अन उत्सूकतेने हसत हसत त्याने तेथील उपस्थितांचा निरोप घेतला.

नवी मुंबईची हद्द ओलांडून कळवा ब्रीजला आज फारशी ट्राफीक नशीबाने लागली नव्हती. बहूदा कोवीडचा परिणाम असावा. उल्हास नदी ओलांडल्यावर रघूने गाण्याचा युएसबी ड्राईव्ह बदलला अन कोळीगीतावर त्याने ठेका धरला. सुरेवार एकदम आरामात चालवत होता. घाई करायची नव्हती. ट्रकलोड असतांना तो सावध चालवत असे. मागच्या मालकाने त्याचा हा गुण हेरला होता अन आताच्या मालकालाही त्याने तसा निरोप दिला होता. त्याचमुळे कदाचित नवा कोरा ट्रक आज सुरेवार चालवत होता.

शहापूर सोडल्यानंतर कसार्‍याच्या अलीकडे घाटातील उतारावर ट्रकच्या ब्रेकमध्ये काहीतरी गडबड असल्याचे सुरेवारच्या लक्षात आले. ट्रक साईडच्या लेनमध्येच होता पण नाही म्हणायला वेग होताच. त्यात घाटाचा उतार. ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच त्याने रघूला सावध केले अन खालच्या गीअरमध्ये ट्रक टाकला. आवाज मोठा होता तरीपण गीअर बदलला, परत एक, परत एक असे करत ट्रक तिसर्‍या गिअरमध्ये आणला. वेग कमी झाला तरी उतारावरून ट्रक चालतच होता. रघूला चौघूले साहेबांना फोन लावायला सांगत सुरेवारने हॉर्न वाजवत , हजार्ड लॅम्प लावत इतरांना सावध करण्याचा प्रयत्न केला. साहेब फोनवर येताच रघूने फोन स्पिकरवर टाकला अन सुरेवारने जी काही परिस्थिती आहे ती सांगितली. ट्रक अजून कंट्रोलमध्ये आहे पण उतार असल्याने काही करू शकत नाही असे सुरेवारने सांगितले. ट्रक झाड किंवा एखाद्या दगडाला, रेलींगला धडकवण्याशिवाय इतर मार्ग नव्हता. घाईतच निर्णय घ्यावा लागणार होता. आपण तसे करणार किंवा तसेच केले तर ट्रकमधला माल, अन इतरांचे प्राण धोक्यात येणार नव्हते. सुरेवारसिंगने रघूला दरवाजा उघडून उडी मारायला सांगितले होते. त्याप्रमाणे त्याने उडी घेतली. हायवे चार लेन चा असल्याने फारशी अडचण ने येता तो पायावर तोल सावरून ट्रकच्या बाजूने पळत राहीला. अगदी काही सेकंदात आता सुरेवारने उडी मारली तरच तो वाचणार होता अन्यथा ट्रक ज्या दिशेने जाईल त्या दिशेने त्याला जाणे भाग होते. मागून इतर वाहने येत असल्याने ड्रायव्हरसाईडने खाली उडी मारणे शक्य नव्हते. शेवटी मनाचा हिय्या करत सुरेवारने क्लिनरच्या बाजूच्या दरवाजातून उडी मारली. पन्नास एक मिटर ट्रक सरळ पळत राहीला. त्या दरम्यान रघू अन सुरेवारही ट्रकच्या बाजूने पळत गेले. तेवढ्यात एक पक्षी ट्रकच्या क्लिनरसाईडच्या खिडकीतून कॅबिनमध्ये पाहत समांतर उडत राहीला. रघू त्या पक्षाकडे पाहतच राहीला. शेवटी ट्रक डाव्या बाजूला वळला अन रस्त्याच्या साईडपट्यांमधून जावून एका झाडाला धडकला. एक मोठा आवाज झाला अन ट्रक गीअरमध्ये बंद पडला. त्या झाडाच्या बाजूलाच घाटाच्या रस्त्याचे रेलींग होते तेथे ट्रकचा ड्रायव्हरकडचा भाग दाबल्या गेला. क्लिनरसाईडची पूर्ण बाजू झाडाला धडकून दाबल्या गेली होती. समोरील काचेचे तुकडे तुकडे झाले होते. हिर्‍यांचा पाऊस पडावा त्याप्रमाणे समोरील काचेचे तुकडे खाली पडलेले होते. कुलंटचे पाणी, संपमधले ऑईल इतस्तत: उडाले होते. रबराचे पॅकींग गळून पडलेले अशा अवस्थेत ट्रक शांत उभा होता.

सगळ्यांचे नशीब बलवत्तर होते असे म्हणायला हरकत नव्हती. ट्रकच्या कॅबीनचे इंजीनचे नुकसान सोडल्यास इतर जिवीत अन वित्त हानी झालेली नव्हती. मागील मशीनरीचा कोणताही भाग ट्रकबाहेर आलेला दिसत नव्हता. चौघूले साहेबांचा फोन रघूच्या फोनवर चालूच होता. रघू जसा काही त्यांना अपघाताची लाईव्ह कॉमेंट्रीच ऐकवत होता. ट्रक धडकून थांबल्याचे अन जास्त नुकसान न झाल्याचे ऐकून पुढील कारवाईसाठी त्यांनी रघूला अन सुरेवारसिंगला तेथेच थांबायला सांगितले. असाही ट्रक चालू करून रिव्हर्स घेता आला असता पण ब्रेक फेलचे कारण असल्याने तो सुस्थितीत एखाद्या ठिकाणी नेणे शक्य नव्हते. ट्रांसपोर्ट कंपनीने जवळच्या पोलीस स्टेशनला कळवलेले होते.

झालेल्या नुकसानीचा अंदाज घेत सुरेवारसिंग अन रघू ट्रकजवळ उभे होते. ट्रकचे कागदपत्र अन कॅबीनमधले पैसे इत्यादी सुरेवारने आपल्या ताब्यात घेतले. रघूला त्याने मोबाईलमध्ये ट्रकचे निरनिराळ्या अ‍ॅंगलने फोटो काढायला सांगितले. घाटातला रस्ता असल्याने आजूबाजूला वस्ती नव्हती तरीपण आवाज ऐकून पाठीमागचे पाच सहा ट्रक तेथे थांबले. थोडीफार ट्राफीक जाम झाली. आजूबाजूचे रहीवासी तेथे जमले.

----XXXX--------XXXX--------XXXX--------XXXX--------XXXX--------XXXX--------XXXX--------XXXX----

दुपारच्या साडेबारा पाऊणच्या दरम्यान मला माझ्या हेड ऑफीसातून फोन आला. एखादी नवी क्लायंट विजीट असावी असा माझा अंदाज होता. पण तो साफ चुकला. क्लेम इंटीमेशन डिपर्टमेंटच्या मॅनेजरने मला शहापूरच्या अलीकडे कसार्‍याच्या पुढे ट्रक अपघात कव्हर करायला सांगितले होते. नाशिकहून एवढ्या लांब मोटरसायकलवर जाणे शक्य नव्हते. मी त्याला ठाणे ऑफीसमधून माणूस पाठवायला सांगितले. त्याने तसे आधीच प्रयत्न केले होते आणि तेथील फिल्ड विजीटवाला मुरबाडला गेलेला होता. त्याला दुपारपर्यंत वेळ लागला असता अन कोरोनामुळे इतर कुणाची उपस्थिती शक्य नव्हती, म्हणून जवळचा पोहोचणारा मीच सापडलो होतो. मॅनेजरने लगेचच निघ मी अपघाताचे लोकेशन तुला व्हाटसअ‍ॅप केले आहे असे सांगितले. शेवटी मी कार घेवून तिकडे जाईन पण कार घेण्यासाठी मला घरी जावे लागेल असे मी त्याला सांगताच मॅनेजर राजी झाला. तो फोन ठेवतो तितक्यात अपघात झालेल्या ट्रकचा ड्रायव्हर सुरेवारसिंगचा मला फोन आला. त्याला मी एक तासात तिकडे पोहोचतो असे आश्वासन दिले. इतर जिवीतहानी वगैरेची चौकशी केली. पोलीस आलेत का ते विचारले. अपघात मोठा होता तरी फारसा गंभीर नसल्याने घरी मी जेवायला येत असल्याचा फोन केला. घरी गेल्यानंतर घाईत जेवण केले अन कॅमेरा, कागदपत्रे घेवून कार बाहेर काढली. घोटीपर्यंत लोकल ट्राफीक फार असते. त्यानंतर मात्र ट्राफीक शिस्तीची पण विरळ झाली. कोरोनामुळे सगळ्याच गोष्टींवर परिणाम झालेला होता.

अपघाताचे ठिकाण कसारा अन खर्डीच्या मध्ये एका पुलाच्या पलीकडे आहे असे गुगलमॅपमध्ये दिसत होते. अडीच वाजता इगतपूरी सोडले तसे ड्रायव्हरला लोकेशनसाठी फोन केले. शहापूरमधले पोलीसही तेथे पोहोचले असल्याचे त्याने सांगितले. रस्त्याने जातांना मोबाईलमध्ये अपघाती ट्रकचे डिटेल्स बघीतले. आर सी बूक वरून ट्रक तर एप्रील 2021 पासींगचा होता. जास्तीत जास्त दोन एक हजार किलोमीटरदेखील मुश्कीलीने चाललेला असावा. अशा ट्रकचे ब्रेक फेल होतात ही आश्चर्याची घटना होती. नक्कीच काहीतरी मॅन्यूफॅक्चरींग बिघाड होता. अर्थात आमचे काम इंन्शूरंस क्लेमचे होते.

साईटवर पोहोचलो तसे तेथे उपस्थित पोलीस अन किरकोळ गर्दी दिसली. लगोलग कॅमेरा तयार केला अन सगळ्या बाजूचे फोटो काढायला सुरूवात केली. चेसीस नंबर, इंजीन नंबर शोधायला थोडा वेळ गेला. या ट्रकचा अपघात पहिल्यांदा कव्हर करत होतो. रजिस्ट्रशन नंबर प्लेट झाडाखाली दाबल्या गेली होती म्हणून बाजूने अन मागील बाजूने ट्रकचे फोटो काढले. ड्रायव्हरला गाडीच्या कागदपत्रांबद्दल विचारले असता त्याने आरसी बूक, परमिट बुक, रजिस्ट्रेशन, ड्रायव्हींग लायसंस इत्यादी कागदपत्रांची फाईल मला दिली. त्यात एक मेंटेनंस रजिस्टरही होते. मधल्या वेळेत माझी नजर टायर, मागचा लोडेड माल यावर गेली. नवाच ट्रक असल्याने काही अडचण नव्हती. सरळ सरळ ब्रेक फेलची केस होती. ड्रायव्हरने दिलेल्या मेंटेनंस रजिस्टरमध्ये शेवटच्या पानावर ड्रायव्हरने आडव्हांस घेतलेले घेतलेले पैसे, नेपाळ मध्ये उतरवलेला माल इत्यादी उल्लेख दिसून आले. अर्थात ते रजिस्टर अन उल्लेख जुने होते.

तेव्हढ्यात ड्रायव्हर बोलला की, "साहबजी, वहा नही मिलेगा. दिखाईए, मै पन्ना निकालता हू", असे बोलुन त्याने रजिस्टरमधून त्याच्या ट्रकच्या शेवटच्या मेंटेनन्सचे पान काढून दिले. पहीली सर्वीसींग झालेली होती अन त्यात काहीतरी लिहीले असते पण "विडॉल झुम" हे ग्रीस (असे ग्रीस आहे हे मला माहीत नाही) वापरलेले असते याचा उल्लेख अन त्या ग्रीस बॅरलचा फोटो होता. त्यात ट्रक, मोटरसायकल, चेन, बेअरींग्ज यांचे चित्र होते. आधीच्या मेकॅनीकने ते ग्रीस वापरले असावे.

पोलीसांची एफआयआर कॉपी अन पंचनामा कॅमेर्‍यात फोटो काढून ठेवला. मी माझा फिल्ड रिपोर्ट तयार करणार तेव्हढ्यात ट्रक मालक असलेल्या कंपनीतून दुबे या नावाच्या माणसाचा मला फोन आला. फोनवर तो जरा रफ बोलत होता. अर्थात कामाच्या स्वरूपात असल्या फोनची आम्हाला सवयच असते. ड्रायव्हरची बाजू सावरा जास्त लफडी होतील असे लिहू नका वगैरे वगैरे. पण या दुबेने सरळसरळ सांगितले की ट्रकच्या ब्रेकच्या बाजूने, तेथील केबल्स वगैरेचा फोटो अजिबात काढू नका. ब्रेक पिस्टन, तेथील ऑईल वगैरे फोटो काढा पण त्याच्या पुढील असेंब्लीचे फोटो अन उल्लेख अजिबात येवू देऊ नका. पोलीस देखील सहकार्य करत आहेत. तुम्हीही करा. तेव्हढ्यात मला माझ्या मॅनेजरचाही फोन आला. त्याचाही रोख प्रकरण मिटवण्याकडे होता.

मी माझे काम संपवले. कागदपत्रांवर ड्रायव्हरच्या सह्या घेतल्या अन परत नाशिककडे निघालो. अपघातात नक्की कसला घोळ होता ते मला अजूनपर्यंत समजले नाही.

- पाषाणभेद
०४/०७/२०२१

Monday, June 28, 2021

वडीलांना काव्यसुमनांजली

 तुमच्या जाण्याने जग सुने झाले

सुख सारे असूनही भासे काहीतरी उणे ||

किती आठव काढावी
किती स्मृती जपावी
त्या आठवांनी डोळा पाणी आले
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||१||

रिक्त झाली तुमची नेहमीची जागा
तुम्ही दिसणार तेथे आम्हा असे आशा
असे कसे मधूनच जग सोडूनिया गेले?
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||२||

कार्ये केली अनेक; ओंजळ भरून दिले दान
दया केली दीनांवर; सदा काळजी काळीज भरून
रिक्त राहीले स्वतः केले दुसर्‍यांचे भले
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||३||

आयुष्यातले दु:ख कधी जाणवू दिले नाही
शरीराच्या कष्टाने डोळा पाणी आणले नाही
काळाने तुम्हाला असे अकाली का नेले?
तुमच्या जाण्याने जग सुने झाले ||४||

(माझे वडील जाण्याला आज सव्वा महिना झाला. वडीलांना हाक मारण्यास मी पोरका झालो. त्यांच्या आठवणी तर येतच राहतील.
आजच्या जागतिक फादर्स डे निमित्ताने ही काव्यसुमनांजली वडीलांना अर्पण.)

- पाषाणभेद
२०/०६/२०२१

"वैरी भेदला" या विनोदी वगनाट्याचे ई पुस्तकाचे आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशन

 http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/vairi_bhedala_sachin_boras...

https://www.facebook.com/Vagnatya/photos/a.395135740861318/395135597527999येथील मुख्य पानावर "वैरी भेदला" हे विनोदी वगनाट्य असलेले माझे ई पुस्तक आज ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुन:प्रकाशीत झालेले आहे.

सदर पुस्तक हार्डकॉपी स्वरूपात 2017 सालीच अमिगो पब्लिशरतर्फे प्रकाशीत झालेले होते.

सदर पुस्तक आपण विनामूल्य स्वरूपात "वैरी भेदला" विनोदी वगनाट्य येथून किंवा ई साहित्य प्रतिष्ठान- नाटक विभाग येथील नाटक विभागातून डाऊनलोड करून वाचावे.

"वैरी भेदला" या पुस्तकासाठी आपणास कोणतेही मूल्य देण्याची गरज नाही. हे पुस्तक विनामूल्य आहे. आपण ते वाचावे आणि आपल्या ओळखीच्या वाचकांत विनामूल्य वाचनास देण्याचे करावे ही विनंती.

हे ई पुस्तक वाचल्यानंतर आपण तीन मिनिटात तीन गोष्टी करू शकतात.

1. आपणास हे पुस्तक कसे वाटले ते फोन, व्हाटस अ‍ॅप मेसेज किंवा ईमेल करून लेखकाला कळवू शकतात.
2. ई साहित्य प्रतिष्ठानला ईमेल करून हे पुस्तक कसे वाटले ते सांगावे.
3. आपले मित्र तसेच सर्व मराठी लोकांना या पुस्तकाबद्दल आणि ई साहित्य प्रतिष्ठानबद्दल सांगा.

कळावे.

आपला,
पाषाणभेद उर्फ सचिन बोरसे
982 Three4 O2554

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले.

त्यातील एक संदर्भ म्हणजे, संस्कृतग्रंथ "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) .
सदर ग्रंथ संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे.
( "भुकंबलीतम: - वेदोपदेश" ग्रंथ प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी "भुकबळी" या नावाने केला आहे. (रचनाकालखंड उपलब्ध नाही.)
(सदर दोनही ग्रंथांची उपलब्धता अतिशय दुर्मीळ आहे. इच्छूकांनी शोध घ्यावा.‌)

सदर ग्रंथात "पोळीयस्य कारणेन" (पोळीच्या कारणाने) या अध्यायात तत्कालीन भिकारी अन एक साधूजन यांच्या भुकेची तुलना एक धनवान सावकार कसा करतो याचा स्पष्ट उल्लेख आहे. पोळी न मिळाल्याने भिकारी जग सोडतो आणि तो साधू त्या सावकाराकडून पोळी मिळवून ती खाऊ घालण्यासाठी त्या भिकार्यास जीवदान देतो अशी कथा आलेली आहे.

ती कथा येथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

कथा सुरू होते आहे:

प्राचीन काळी मर्‍हाटी राज्यात जनटक प्रांतात त्रिकंस्थान नावाचे एक गाव होते. गाव तसे लहानच होते. गावाच्या आसपास शेती करणारे आणि त्या अनुषंगाने व्यवसाय करणारे राहत असत. पर्जन्यछायेच्या प्रदेशात हे गाव येत असल्याने दुष्काळ तर गावाच्या पाचवीलाच पुजलेला होता. अनेकदा बियाणे पेरावे अन ते उगवण्याआधीच पक्षांचे अन्न व्हावे अशी परिस्थीती होती. होता येईल तितके अन्न उगवावे अन ते पुरवून पुरवून वापरावे, इतर वरकामे करून जीवन जगावे अशी तेथल्या गावकर्‍यांना सवय झालेली होती.

गावात एक औंदाजी नावाचा गरीब राहत होता. गावाच्या सीमेवर त्याची झोपडी होती. मजूरी करून दिवस कंठत तो म्हातारा झालेला होता. आताशा त्याचेकडून काही काम होत नसे. दिवसभराचे कोरान्न मिळवायला तो काम करण्यासाठी इतरांकडे याचना करत असे पण त्याच्या शारिरीक विपन्नावस्थेकडे पाहून कोणताही स्त्री-पुरूष त्याला दया म्हणून चतकोर शाक भाकरी देत असे. औंदाजी बापडा देखील त्याला आता सरावला होता. एक पाय ओढत तो चारपाच दारी भिक्षा मागे अन आपल्या पोटाची खळगी भरण्याइतके अन्न मिळवून आपल्या झोपडीत जाऊन पडत असे. गेला आठवडा औंदाजीच्या पायाचे दुखणे वाढलेले होते. त्यातच अन्न न मिळाल्याने त्याला ग्लानी येत होती. कसेबसे पाण्यावर दिवस काढत होता बापडा.

त्याच समयाला त्रिकंस्थान गावाच्या दामाजी सावकारांकडे नातवाच्या बारशाच्या समारंभ होता. पंचपक्वान्नाची जेवणे नुकतीच आटोपल्यामुळे मंडळी सुस्तावलेली होती. विडा पान खाऊन वडीलधारे वामकुक्षी घेत होती. स्त्रीया माजघरात आवराआवर करत होत्या. लहान मुले वाड्यातल्या चौकात खेळत होती. अशा समयाला औंदाजी आपला दुखरा पाय सरकत सरकत तेथे भिक्षा मागण्यासाठी आला. त्याने फार काही नको, फक्त चतकोर अर्धी पोळी अन प्यायला पाणी द्या अशी विनंती तेथे केली. सुस्तावलेल्या दामाजी सावकारांनी पाहुण्यांसमोर आपली आब दाखवण्यासाठी औंदाजीला पोळी, भाजी, पाणी देण्यास साफ नकार दिला. इतकेच नव्हे तर त्या वाड्यासमोरून लगेच निघून जाण्यास त्याला फर्मावले.

पोटातली दोन दिवसांची भुक, उन्हाचा त्रास, आजारी शरीर, झालेले वयोमान या सगळ्यांचा एकत्रीत विपरीत परिणाम होवून औंदाजीने सावकाराच्या वाड्याच्या पायरीवरच आपले प्राण सोडले.

हे सर्व पाहुणे अन सावकारासमोर घडले. सावकारासही आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला व तो त्याने सगळ्यांना बोलून दाखवला. घटना तर घडून गेली होती. आता पश्चाताप करण्यात काही अर्थ नव्हता. कदाचित औंदाजीला तेथेच मरण यावे अशी नियतीची इच्छा असावी.

याच दरम्यान संत पाषाणभेद तेथे अवतिर्ण झाले. काखेत झोळी, हातात कमंडलू, पायी खडावा, अंगात कफनी, डोईस मुंडासे, कपाळी रेखीव चंदनी सूर्य अशा वेशात ते सावकाराच्या वाड्यासमोर उभे ठाकले. आपल्या उंच आवाजात ओमकाराचे स्मरण करून त्यांनी सावकाराकडे कोरडा शिधा मागितला. परंतु सावकार, तेथील पाहुणे, स्त्रीया इत्यादी मंडळी औंदाजीच्या शवाभोवती गोळा झालेली होती. संतांकडे कुणाचेही लक्ष नव्हते. अजून दोन वेळा ओमकार करून भिक्षा मागून जर नाही मिळाली तर पुढल्या घरी जाण्याचा संतांचा विचार होता तितक्यात सावकाराचे लक्ष त्यांच्याकडे गेले. सावकाराने घडलेला सगळा प्रकार पाषाणभेदांच्या कानावर घातला. तसेच थोडी वाट पाहून औंदाजीला पोळी भाजी तसेच गोडान्न देण्याची त्यांच्या मनीची प्रांजळ भावना होती हे देखील सावकार वदले.

संत पाषाणभेदांनी आपल्या ठाई असलेल्या आंतरीक ज्ञानाने सर्व काही आधीच जाणले होते. झालेल्या घटनेत सावकाराची काही चूक नव्हती. भिक्षा देणे न देणे हे सर्वस्वी दात्याच्या मनात असते. त्याला भिक्षेकरी आक्षेप घेवू शकत नाही, तसेच कसलाही श्राप देणे हे देखील उचीत नाही हे ते जाणत होतेच.


त्यांनी सावकारास मानसीक धीर दिला आणि सावकाराने त्यांचे चरण धरले. थोडे मागे सरत लगोलग संत पाषाणभेदांनी औंदाजीचे शव उचलले आणि ओसरीवर ठेवले. शवाच्या बाजूस डोळे मिटून सिद्धासनात त्यांनी बैठक घेत ईश्वराचे स्मरण केले. आपली प्रार्थना संपवत संत पाषाणभेदांनी उपचार म्हणून आपल्या कमंडलूतील पाणी औंदाजीच्या पापण्यांना आणि कपाळाला लावले. पुन्हा एकवार संतांनी ईश्वराचे स्मरण केले. अगदी थोड्या कालाने औंदाजीच्या शरीरात श्वास वास करू लागला. हाती पायी थरथर जाणवली. पुढच्याच क्षणाला औंदाजीने डोळे उघडले. समस्त मंडळींच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. वयस्कर स्त्रीयांनी आपल्या सुना-मुलांना औंदाजीसाठी पोळी भाजी घेवून येण्यास पिटाळले. सावकारांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. त्यांनी औंदाजीला बसते केले अन पोळी भाजीचा पहिला घास आपल्या हाताने त्याला भरवला. 'पोट भरून खा अन तुझ्या दुखर्‍या पायाच्या उपचाराची जबाबदारीही मी घेतो', हे सावकारांचे बोलणे ऐकून औंदाजीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. काय घडले हे तो समजून चुकला होता. मनोमन त्याने संताचे आभार मानले. पाहूणे मंडळीही ते द्रृष्य बघून भावूक झाली होती.

उपस्थित सज्जन भावनेतून सावरत असतांना सावकारांना संत पाषाणभेद भिक्षा मागण्यासाठी आल्याची आठवण झाली. ते सभोवार पाहू लागले. पण संत पाषाणभेद तेथे होतेच कोठे? ते तर तेथून केव्हाच निघून गेले होते. तेथील सज्जनांनी संत पाषाणभेद निघून गेल्याच्या दिशेने श्रद्धेने हात जोडले.

"भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) या ग्रंथातील "पोळीयस्य कारणेन" (पोळीच्या कारणाने) हा अध्याय येथे संपतो.

"पोळी" या शब्दाच्या अर्थाचे विवेचन:
जनटक प्रांत तसेच त्रिकंस्थान नावाचे एक गाव महाराष्ट्रातच नाशिक भागात होते असे विद्वान इतिहासकारांचे मत आहे. "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) या ग्रंथाची रचना कालखंड हा शके १६६१ च्या आधीचा असावा. तो संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे. त्याकाळी महाराष्ट्र प्रांतात पाकृतात पोळी हा शब्द असल्याचे या ग्रंथवाचनावरून सिद्ध होते. थोडक्यात 'पोळी' हा अस्सल मराठी शब्द आहे.

तसेच सदर ग्रंथांत अनेक मराठी शब्दांचा उलगडा होऊ शकतो इतके शब्द आलेले आहेत. वेळोवेळी आपण ते अभ्यासू या.

३०/०४/२०२१

आमचीबी आंटी जन टेस

आमचीबी आंटी जन टेस

गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं.
त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला.

या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

तर मलाबी वाटलं की आपलीबी करून घ्यावी आंटी जन टेस. आंटी जन टेसला काय काय करावं आसं कोनाला तरी विचारावं आसं वाटत व्हतं. कारन, आंटीपर्यंत ठिक हाय पन जन म्हणजे जनता. आता ती आंटी आन मी, समद्या जनांसमोर काय आन कसं करनार आसा मला प्रेश्न पडला. कोनाला विचारायचीबी लय लाज वाटत व्हती. जनांसमोर काय झालं तर गावात त्वांड दाखवायला जागा नव्हती. सगळे सगे सोयरे गावातच. तसं झालं तर कायम तोंडाला पट्टी लावावी लागणार आशी भिती मनात आली. पन आंटी काय करनार, ती कशी आसंल, ती काय काय देईल, न देईल या विचारानं रात्रीची झोपबी येईना झाली.

संज्या आन राम्या तसं आंटी टेस करून आल्यालं व्हतं, पन त्यांना विचारावं म्हंजे आगीत हात घालन्यासारखं व्हतं. आन संज्या तर माझी हिरॉईन करीनाच्या शेजारीच राहतो. भाड्या मुद्दाम माझ्यासमोर तिचं खरं नाव करूना मोठ्यानं बोलत राहतो. माला सांगा, कोरूनाच्या काळात आसं चिडवनं बरं हाय का? ऊस जळलं त्याच्या वावरातला अशानं. कांदा करपलं उन्हाळ्यातला त्याचा.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

मनाचा हिय्या करून लालचंद मारवाड्याच्या दुकानातून मुद्दाम वीस किलो तांदूळ घेतांना या आंटी जन टेसची थोडी माहीती काढली. त्ये म्हनलं की, आधार कार्ड घेवून जा आन लायनीत थांब. नंबर आला की आंटी टेस व्हईल.

आता या आंटी जन टेसला आधार कार्ड नंबर देऊन लायनीत थांबायचं म्हनजे लई काळजी वाटू लागली. आंटीनं आधार नंबर कुनाला दिला आन त्ये आपल्या घरी पत्ता काढत आलं म्हणजे? आंटीनं काय काळाबाजार केला तर काय आशी चिंता मनाला लागून राहीली.

धडगत करून आरोग्य शेंटरला गाडी लावली. सकाळी गेलेलो. बाहेर धा बारा जनांची लाईन व्हती. वळखीचं कुनीच नव्हतं हे बरं होतं. मधी आसलेली आंटी जन, लोकांना कवा भेटल आसं वाटत व्हतं. एकानं आधार नंबर घेतला. नाव बीव लिहून घेतलं. एक आडूसा होता. तिथंच आंटी आसल, अन जन, लोकं तिथंच तिला भेटत आसतील आसं वाटलं. एवढ्या गर्दीत आंटीला भेटनं काय बराबर वाटंना. पन एकदा का व्हईना भेट झाली म्हंजे आपलं गाडं पुढं रेटता येईल आसा विचार मनात आला.

माझ्यावाला लंबर आला आन मी आडूशामागे गेलो. तवा आंटी बिंटी काय दिसली नाय.

तिथं दवाखान्यासारखं मांडलेलं व्हतं अन एक नर्स व्हती. मंग त्या पोरीनंच नाकात कायतरी खुपासलं. आन जा म्हनाली.

लय फसगत झाली राव. द्राक्षे काढणीला यावे आन पाऊस पडून सगळा माल बेचीराख व्हावा, अगदी पावडरी मारायलाबी येळ मिळू नये आसं झालं. आसं कुठं आसतंय व्हय?

आशी झाली आमच्यावाली आंटी जन टेस.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

- पाषाणभेद
२६/०४/२०२१

Tuesday, June 8, 2021

आवाज बंद सोसायटी - ध्वनी प्रदूषणाविरूद्ध एक चळवळ

आवाज बंद सोसायटी - ध्वनी प्रदूषणाविरूद्ध एक चळवळ

लेख वाचण्याआधी खाली दिलेली विडीओक्लीप क्रृपया प्रथम 'ऐका'.

ध्वनी प्रदूषण

तर मंडळी, असले आवाज ऐकून माझी देखील अवस्था तुमच्या सारखीच झालेली असते.

माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगतो. एकदा आमच्या कॉलनीत, माझ्या घरासमोरच एका जणाने एक घर भाड्याने घेवून तेथे गायन क्लास सुरू केला. गायन, वादन, संगीत आदी कलांबद्दल मला आकस नाही. उलटपक्षी, मी अनेक गाणी, पोवाडे, लावण्या इत्यादी लिहील्या आहेत. पण समोरच्या त्या गायन आणि वाद्यांच्या वादनाचा जाणवण्याइतपत त्रास होऊ लागला होता. शेजारी एखादा जण गायन करत असेल त्यात अन दररोज आठ, नऊ तास अनेक विद्यार्थ्यांनी गायन, वादन करणे यात फार फरक आहे. एकतर रहिवासी भागात गायन क्लास, तो सुद्धा ध्वनीरोधक - साऊंडप्रूफ नसलेल्या घरात चालू असल्याने माझ्या उद्वेगात भर पडत गेली. तेथील वाद्य, गायन आदींचा केवळ मलाच त्रास होत होता असे नाही, तर आजूबाजूच्या रहिवाशांनादेखील तो त्रास होत होता पण कुणीही त्याबद्दल संकोचाने आक्षेप घेतला नाही. त्यांचा हा एकप्रकारे निष्काळजीपणाच होता. क्लासच्या संचालक आणि घरमालक यांना या आवाजाच्या प्रदूषणाचे, त्याच्या परिणामांचे काहीच सोयर सुतक नव्हते. त्यांच्या मते त्यांनी चालविलेला हा क्लास त्यांच्या उच्च अभिरूचीचे लक्षण होते.

मला ध्वनी प्रदूषणाचे नियम आणि कायदे माहित होते, त्यात मित्र श्री. संतोष भोई वकील साहेब यांनी भर घातली. सरतेशेवटी, श्री. वकील साहेब यांच्या सल्याने मी पोलीसांत तक्रार दाखल करण्याची कल्पना गायन क्लासच्या संचालक, त्यांच्या घरमालकाला दिली. अर्थातच पोलीसस्टेशनमध्ये जाण्याची गरज पडली नाही आणि गायन क्लासच्या संचालकाशी, त्याच्या घरमालकाशी बोलल्यानंतर त्यांनी ती जागा रिकामी केली आणि कॉलनीत शांतता प्रस्थापित झाली.

आजकाल आपल्याकडे जल आणि वायू प्रदूषणाबद्दल बरीचशी जागरूकता झालेली आहे. कमीतकमी त्याची चर्चा तरी होते. पण आपल्या समाजात ध्वनी प्रदूषणाबद्दल जागरूकता कमी आहे. मोबाईलवरील स्पिकरवर गाण्याचा आवाज वाढवला आणि दुसर्‍याने त्यावर आक्षेप घेतला तर आवाज वाढवणार्‍याला त्याचे काहीच वाटत नाही. आवाजाबद्दल बेफिकीरीची प्रवृत्ती समाजात वाढत आहे. आवाज हे माध्यम हवेसारखे दिसत नसल्याने त्याची घनता, तीव्रता लगेचच जाणवत नाही. आपले कानही आपण बंद करू शकत नाही. काही आवाज आपली इच्छा नसली तरी बळजबरी आपल्याला ऐकावेच लागतात. त्या आवाजाने आपल्या कानांवर, शरीरावर व मनावर परिणाम केल्यानंतरच त्या आवाजाबद्दल चांगले किंवा वाईट मत आपण बनवतो. कित्येक व्यक्तींना आवाजाचेही (ध्वनी) प्रदूषण असते हेच माहीत नसते. हे दुर्दैवी आहे.

सततच्या आवाजाच्या गोंधळाने आपली चिडचिड होते. आजूबाजूचे आवाज नकोसे होतात. शांततेची आवश्यकता भासते. अवाजवी, गरजेचा नसलेला आवाज हा देखील प्रदूषणात मोडतो आणि मानवी स्वास्थ्यावर त्याचे परिणाम होतात.

ध्वनी प्रदूषणाबद्दल इतरांचे प्रबोधन करणे आपले कर्तव्य आहे. लहान मुलांमध्ये याबाबत जागरूकता लहान वयातच आणली असता ते मोठे झाल्यानंतर सभ्य नागरीक बनू शकतील. ध्वनी प्रदूषणाबद्दल आपल्याला जागरूक करणे या हेतूने हे सादरीकरण बनवले आहे. हे लिखाण मुक्त स्रोत परवान्यासारखे लिहीले आहे असे समजून आपण त्यात भर टाकाल व हे लिखाण जास्तीत जास्त व्यक्ती, संस्थांपर्यंत पोहोचण्याकामी आपण सहकार्य कराल ही मला आशा आहे. येत्या काळात आवाजाचा भस्मासूर आपल्या कानांना गिळंकृत करण्याच्या आधी आपण सजग राहून त्याचा नायनाट करूया.

जय हिंद, जय महाराष्ट्र!

विषय प्रवेश

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक प्रकारच्या ताण तणावांना सामोरे जात असतो. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किंबहूना झोपलेल्या अवस्थेत आपले मन अर्धवट जागे राहून अनेक प्रकारचे तणाव झेलत असते. जीवनात समस्या काही वैयक्तिक खाजगी तर काही सामाजीक असतात. अनेक संस्थांनी केलेल्या पाहणीत जागतीक समस्यांच्या यादीत वातावरणातील बदल तसेच त्यात होणारे प्रदूषण वरच्या स्थानी आहे. हवेच्या प्रदूषणाच्या बाबतील बोलायचे झाल्यास शेकडा ९% म्रृत्यू हे हवेच्या प्रदूषणामुळे होत आहेत. काही देशात तर याचे प्रमाण शेकडा १५% इतके भयावह आहे. शेकडा ९५% लोकसंख्येला प्रदूषीत हवेत जगावे लागत आहे. प्रदूषीत पाणी पिण्यामुळे जवळपास १ अब्ज लोकसंख्या आजारी पडत असते. २०१५ साली १८ लाख बळी हे केवळ दुषीत पाण्यामुळे झालेले आहेत. हवा तसेच पाण्याच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम केवळ मानवालाच नव्हे तर इतर सजीव, वनस्पती, प्राणी, जलचर आदींनादेखील भोगावे लागतात.

दुषीत वातावरणातील वायू, जल प्रदूषण प्रदूषणाप्रमाणेच ध्वनी प्रदूषण हा देखील महत्वाचा घटक आहे. सर्वसामान्य जनतेला ध्वनी प्रदूषण ही समस्याच माहित नाही. ध्वनी, आवाजामुळेदेखील वातावरण प्रदूषीत होते हे सांगितले तर अनेक जण आश्चर्यचकीत होतील. दुषीत हवा, पाणी, अन्न यामुळे होणारे म्रृत्यू समोर दिसत असतात. ते मोजता येत असल्याने त्यांची आकडेवारी मांडता येते. ध्वनी प्रदूषण सरळ सरळ म्रृत्यूला जरी कारणीभूत ठरत नसले तरी अनेक प्रकारच्या शारिरीक तसेच मानसीक समस्यांना ते कारणीभूत ठरते. इतर प्रदूषणाप्रमाणेच ध्वनीप्रदूषणामुळे मानव तसेच प्राणी, पक्षी, मासे, इतर जलचर आदींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आपला भारतीय समाज हा उत्सवप्रिय आहे. वर्षातल्या दर दिवशी कोठे ना कोठे उत्सव साजरे होतच असतात. उत्सव म्हटला की मग वाद्य वाजवणे हवेच हवे. मनुष्य जन्माला आला तेव्हा गाणी गाऊन उत्सव साजरा होत असतो आणि तो म्रृत्यूमुखी पडतो तेव्हाही काही समाजात समाजात उत्सव रुपाने अनेक प्रकारची वाद्ये किंवा भजन गाण्याचा उत्सव होतो. लग्न समारंभ, धार्मिक उत्सव, सण, जत्रा, यात्रा, देवाचे नवस सायास इत्यादी आवाजाविना साजरे होतील अशी कल्पनाही आपण करू शकत नाही. एका समाजाच्या प्रार्थनास्थळावर लाऊड स्पिकर आहेत म्हणून दुसरा समाजही त्यांच्या प्रार्थनास्थळावर स्पिकर लावण्यात पुढाकार घेतो. त्या स्पिकरवरून होणार्‍या आवाजामुळे होणार्‍या ध्वनी प्रदूषणाकडे कुणाचेही लक्ष जात नाही. सर्व समाजातील व्यक्ती एक महत्वाचा मुद्दा विसरतात की, असली प्रार्थानास्थळे पूर्वकालापासून होती त्या काळात लाऊड स्पिकर होते काय? त्या त्या धार्मियांच्या धर्मग्रंथात किंवा धर्मगुरूंनी लाऊड स्पीकर असेल तरच प्रार्थना करा असे लिहीलेले किंवा म्हटलेले आहे काय?

पुढील काही प्रकरणांमध्ये आवाजाच्या प्रदूषणाविषयी आपण अधीक माहिती घेणार आहोत. ध्वनी प्रदूषणाचे स्त्रोत काय आहेत त्याचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम तसेच वन्यजीव व सागरी जलचरांवर होणारे परिणाम या बाबत सखोल विवेचन या छोटेखानी पुस्तीकेत केलेले आहे. लिखाणाचा हा प्रयत्न काही संशोधनाचा प्रकल्प नाही. ध्वनीप्रदूषणाने पिडीत असलेल्या एका व्यक्तीच्या अनुभावातून आलेला तो सार आहे. या लेखनकामी इंटरनेटवरील अनेक लेख संदर्भासाठी वापरलेले आहेत. त्या लेखांवरून स्वतंत्रपणे लिखाण केल्यामुळे तसेच इंटरनेटवरील संदर्भ अनेक अर्थांनी मोठे असल्याने प्रत्येकाचा येथे उल्लेख करणे अशक्य असल्याने मोजक्या संदर्भांचा उल्लेख परिशिष्ठात तसा उल्लेख केला आहे.

=========================================================================

आवाजासंदर्भात अनेक महत्वपूर्ण व्यक्तींचे वक्तव्य:

आपल्याला देवाला शोधायचे आहे. तो गोंधळाच्या तसेच अस्थिरतेच्या ठिकाणी सापडणार नाही. शांततेचे दुसरे नाव देव आहे. निसर्गातील झाडं, फुले, गवत पहा, कसे शांततेत वाढतात; तारे, चंद्र आणि सूर्य पहा, ते शांततेत कसे फिरतात...आपल्या आत्म्याला स्पर्श करण्यास सक्षम होण्यासाठी आपल्याला मौनाची आवश्यकता आहे.
- मदर टेरेसा (कॅथोलिक चर्चमध्ये संत म्हणून सन्मानित)

हे मानवा, या दुनियेत तू किती आवाज करशील?
- विनीत राज कपूर (लेखक, गीतकार आणि कवी आहेत)

अत्यंत श्रवणीय संगीतातही काही वेळ शांततेची असते म्हणूनच त्या शांततेचे महत्व अधोरेखीत होते. पूर्वीपेक्षाही आता शांततेची आवश्यकता जास्त आहे कारण आताचे आयुष्य आवाजाने भरलेले आहे. आपण पर्यावरणातील प्रदूषणाबद्दल बरेच काही बोलतो परंतु ध्वनी प्रदूषणाबद्दल पुरेसे बोलत नाही.
- अँड्रिया बोसेलई (एक इटालियन ऑपेरा गायक आणि वादक. - वयाच्या 12 व्या वर्षी पूर्णपणे अंध बनलेले.)

चर्चेस (प्रार्थनास्थळे) ही भोंगा वाजवत राहणार्‍या कारखान्यांसारखी असतात जे विषारी पातळीवर जाणारा ध्वनी वातावरणात सोडतात.
- स्कॉट मॅकक्लेलन (अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश प्रेस सचिव)

जागतीक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार ध्वनी प्रदूषणामुळे युरोपमध्ये दरवर्षी १.६ दशलक्ष वर्षे निरोगी जीवन गमावले जाते असा अंदाज आहे.
- जागतीक आरोग्य संघटना (डब्ल्यू. एच. ओ.)

आधुनिक प्रदूषणाच्या सर्व प्रकारांपैकी आवाज हा सर्वात कपटी, खोटारडा आहे.
- रॉबर्ट लेसी (एक ब्रिटिश इतिहासकार आणि चरित्रकार)

आपली संस्कृती आवाजाचा संबंध शक्ती आणि प्रगतीशी जोडते. वस्तूत: आवाज वाया घालवलेली उर्जा आहे. कोलाहल, आवाजाचा गोंधळ हा शक्तीसारखा आहे हे आम्हाला वाटते. हार्ले (मोटरसायकल) जितका मोठा आवाज करेल तितके चांगले असे आपल्याला वाटते.
- ज्युलिया कॉर्बेट, आऊट ऑफ द वुड्सच्या च्या लेखीका

शेजार्‍याच्या कुत्र्याचा आवाज येत असेल अशा ठिकाणी कुणी राहू नये.
- नॅथॅनिएल मॅकन (अमेरिकन राजकारणी)

जे लोक पक्षांचे आवाज रेकॉर्ड करतात ते शक्यतो पहाटे किंवा सहा वाजण्यापूर्वी करतात. त्यानंतर लवकरच दूरवरच्या आवाजाचे अतिक्रमण जंगलात सतत आणि जोरजोरात होत असते.
- रिचर्ड अ‍ॅडम्स लेखक आणि कादंबरीकार

आवाजाच्या प्रदूषणाची स्थिती किती गंभीर आहे हे वरील महनिय व्यक्तीच्या वक्तव्यावरून अधोरेखीत होते. विकसीत देशात सभोवती निर्माण होणार्‍या आवाजाला फार गंभिरतेने घेतले जाते. तेथील नागरीक आणि कायद्याचे पालक याबाबतीत अधीक सजग आहेत. त्याचेच द्योतक वरील वक्तव्य आहेत असे म्हणावे लागेल.

भाग २ समाप्त

व्याख्या व विकास

एखाद्या वस्तूमधून निघणार्‍या सामान्य ध्वनीला आवाज म्हणतात. आवाज किंवा ध्वनी म्हणजे एखाद्‍या माध्यमातून (जसे-हवा,पाणी;) कानाद्वारे कंपनाचे होणारे आकलन, ध्वनीलहरी उर्जेचा एक प्रकार आहे. हवेचे रेणू थरथरल्यावर ध्वनीलहरी निर्माण होतात. माणसाला ऐकण्याच्या क्रियेतून कानाद्वारे ध्वनीचे आकलन होते. जेव्हा आवाजाची तीव्रता जास्त असते आणि ऐकणार्यांना त्रास होतो, तेव्हा त्यास गोंगाट म्हणतात.

आपले कान २० हर्ट्झ ते २० किलोहर्ट्झ या टप्यातीलच आवाज ऐकू शकतात. २० किलोहर्ट्झ पेक्षा जास्त कंपनक्षमता असलेल्या ध्वनीलहरी आपण ऐकू शकत नाही.

एखादी वस्तू कंप पावत असेल तर त्यापासून ध्वनीची निर्मिती होते. आवाजाची पातळी मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरले जाते. हवेतील आवाजाचा वेग ३४३ मीटर प्रती सेकंद तर तासाला १२३५ किमी इतका असतो.

निर्वातपोकळी मधील ध्वनीची गती शून्य मीटर प्रति सेकंद आहे, कारण आवाज निर्वातपोकळी मध्ये प्रवास करू शकत नाही. आवाज एका लाटेसारखे आहे. ध्वनीलहरी पाणी किंवा हवेसारख्या माध्यमांच्या कणांच्या कंपनातून पसरते. निर्वातपोकळी रिक्त जागा असल्याने, ध्वनीलहरी त्यातून पसरू शकत नाहीत.

अनावश्यक, गरजेचा नसलेला किंवा जास्त मोठा आणि त्रासदायक आवाज ज्याचा मानवी आरोग्यावर, वन्यजीवनावर आणि पर्यावरणीय गुणवत्तेवर हानिकारक परिणाम होऊ शकतो, अशा आवाजाला ध्वनी प्रदूषण म्हणतात.

आपल्या सभोवताली खूप प्रकरचे आवाज होत असतात जसे की प्राण्यांचे, झाडांचे, माणसांचे, पक्ष्यांचे आवाज, मोटरगाडी, काही यंत्रे, दुरध्वनी, दुरदर्शन आदींमधले आवाज इत्यादी. आवाज किंवा ध्वनीची पातळी मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरले जाते. जागतिक आरोग्य संघटनेने आवाजाची पातळी दिवसाला ४५ डीबी आणि रात्री ३५ डीबी पर्यंत निश्चित केली आहे. ध्वनीची पातळी विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यास ध्वनी प्रदूषण होते. सर्व साधारणपणे ८० डेसिबलच्या पुढे असणार्‍या आवाजामुळे मानव तसेच इतर सजीवांच्या जिवनशैलीवर परिणाम होतो.

=========================================================================

कारणे व स्त्रोत

आवाज निरनिराळ्या प्रकाराचे असतात. हळू आवाज, कुजबूजणे, संभाषण, सहन करण्याइतपत मोठे, गोंगाट ते अगदी कानाला इजा होईल इतके मोठे आवाज असू शकतात.

आवाजाचे दोन मुख्य स्त्रोत आहेत.

१. घरातील आवाज जसे की घरातील व्यक्तींमधील संवाद, रेडीओ, टिव्ही, कुलर, मिक्सर, स्पीकर, व्हॅक्यूम क्लीनर, वॉशींग मशीन इत्यादींचा आवाज. यातील कोणत्याही आवाजाचे स्वरूप गोंगाटाकडे वाढले, तर ते आवाज त्रासदायक होतात. अगदी रेडीओ, टिव्ही, कुलर, मिक्सर, स्पीकर, व्हॅक्यूम क्लीनर, वॉशींग मशीन इत्यादींचा आवाज जरी तुम्हाला सामान्य वाटत असला तरी डेसीबल मिटरच्या आकड्यांत तो ध्वनी प्रदूषणाकडे वळलेला असू शकतो.

२. बाहेरील आवाज जसे की, सार्वजनीक कार्यक्रम, औद्योगीक आणि व्यावसायीक आवाज, बाजार, शॉपींग मॉल्स, बांधकामाच्या जागा, तेथील यंत्रे. छापखाने, वाहनांचे आवाज.

कोणताही उत्सव, सभा, संमेलन यातील आवाजामुळे आसपासच्या रहिवाशांना त्रास होतो. काही उत्सवांदरम्यान फटाके फोडले जातात. लग्नसमारंभात मोठ्या आवाजात गाणी वाजवली जातात. नव्या वर्षाच्या शुभेच्छा फटाके वाजवून आणि दणदणीत गाणी वाजवून दिल्या जातात. आजकाल एखाद्या गल्लीत कुणाचातरी वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री बाराच्या ठोक्याला फटाके फोडले जातात. उद्योंगामधल्या यंत्रातील आवाजामुळे तेथील कामगारांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परीणाम होतो. बांधकामाच्या ठिकाणी अनेक यंत्रे आवाज करत असतात. वाहनांचे निरनिराळ्या प्रकाराच्या इंजीनाचे आवाज तसेच हॉर्न, सायरन इत्यादीच्या आवाजामुळे त्या रस्त्यावरील नागरीकांचे जगणे असह्य होत असते.

मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर खेडेगाव किंवा गावाजवळील जंगलातील काही भाग येथे वाढलेले ध्वनी प्रदूषण एक मोठी समस्या बनलेली आहे. सजीव तसेच पर्यावरणासाठी ध्वनी प्रदूषण हा एक अदृश्य धोका आहे. ध्वनी प्रदूषण दिसू शकत नाही, परंतु ते पृथ्वीवर आणि समुद्राखाली दोन्ही ठिकाणी आहे. ध्वनी प्रदूषण त्रासदायक आवाज आहे. त्यामुळे मानव आणि इतर जीवनांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

साधारणपणे शांत वातावरणातही, अचानक जोरात असणारा आवाज ऐकू आला तर तो आपल्या श्रवणशक्तीवर परीणाम करू शकतो.

आता आपण आवाजाचे आणि ध्वनी प्रदूषणाचे विविध प्रकार याविषयी माहिती घेऊ या .

आवाजाचे प्रकार:

आवाजांचे वेगवेगळ्या प्रकारचे ४ आवाज आहेत: सतत, निरंतर असणारे आवाज, मधूनमधून येणारे आवाज, आवेगपूर्ण, उन्माद असणारे आवाज आणि कमी वारंवारता असणारे आवाज.

१. सतत, निरंतर असणारे आवाज: सततचा आवाज म्हणजे काम न थांबवणाऱ्या, बंद न पडणार्‍या यंत्रांद्वारे सतत निर्माण होणारा आवाज. उदा. कारखान्याची उपकरणे, इंजिनाचा आवाज किंवा पंखा, ए.सी. आणि व्हेंटिलेशन सिस्टीम.

२. मधूनमधून येणारे आवाज: आवाजाच्या या प्रकारातआवाजाचे प्रमाण झपाट्याने वाढते किंवा कमी होते. उदा. जवळून जाणारी ट्रेन, सायकलींमध्ये चालणारी कारखान्याची उपकरणे किंवा तुमच्या घराच्या वरून उडणारी विमाने.

३. आवेगपूर्ण, उन्माद असणारे आवाज: आवेगपूर्ण आवाज हा अचानक आणि वेगवान रितीने कानावर येतो. उदा. स्फोट किंवा बांधकाम उपकरणे, ट्रॅक्टर, मातीकाम करणारे वाहन किंवा घराशेजारील व्यक्ती ड्रील मशीन वगैरे वापरत आहे तो आवाज.

४. कमी वारंवारता असणारे आवाज: कमी वारंवारतेचा आवाज म्हणजे आपल्या परिसरात असणार्‍या पार्श्वभूमीवरील (background) आवाज होय. उदा. जवळपासच्या एखाद्या पॉवरस्टेशनमधील रोहीत्राचा (transformer) आवाज किंवा मोठ्या डिझेल इंजिनांचा आवाज. यामुळे आपल्याला सतत कमी वारंवारतेच्या (frequency) आवाजाचा सामना करावा लागतो. आवाजाचा स्रोत कमी करण्यासाठी हा सर्वात कठीण प्रकारचा आवाज आहे. हा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत सहज पसरू शकतो.

शहरात खालील ४ प्रकारच्या आवाजांमुळे आपण ध्वनी प्रदूषणास दररोज हातभार लावत असतो.

ध्वनी प्रदूषणाचे प्रकार:

औद्योगिक ध्वनी प्रदूषण, वाहतूकीमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि परिसरातील ध्वनी प्रदूषण अशा तीन मुख्य प्रकारांमध्ये ध्वनी प्रदूषणाचे वर्गीकरण करता येते.

१. औद्योगिक ध्वनी प्रदूषण औद्योगिक यंत्रसामग्री आणि उपकरणे चालविण्यामुळे होते. यात सतत आवाज येऊ येत असतो. उदाहरणार्थ, २४/७ चालणारे एक्झॉस्ट पंखे, बांधकामात वापरण्यात येणारी यंत्रसामग्री.

२. वाहतुकीचा आवाज हा वाहन आणि त्यासंबधातून उत्पन्न होणारा आवाज आहे. यामध्ये मोटार इंजिन, रेल्वे, विमान चालण्याचा आवाज, वाहतूक कोंडीदरम्यान ऐकू आलेला हॉर्नचा गोंगाट आणि रहदारीस अडथळा होण्याच्या दरम्यान ऐकण्यात येणारा आवाज यांचा समावेश आहे.

३. ध्वनीप्रदूषणाचा शेवटचा प्रकार म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परीसरातील, वातावरणातील आवाज. उदाहरणार्थ आपल्या आजूबाजूला मोबाईल, टीव्ही, रेडीओ इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर होत असतो. संभाषण, संवाद इत्यादींमधून होणारा आवाजाचा गोंधळ यात मोडतो.

आताच आपण पाहिले की, ध्वनीप्रदूषणाचे प्रकार प्रत्यक्षात त्याच्या स्रोतांशी संबंधित आहेत. ध्वनीप्रदूषणाचे स्रोत जाणून घेतले की त्याचे दुष् परिणाम कसे कमी करायचे हे आपल्याला शिकता येईल.

जेव्हा ध्वनी पातळी त्याची सुरक्षित सीमा ओलांडते तेव्हा धूम्रपानाप्रमाणे, ध्वनी प्रदूषण त्याच्या सभोवती असणार्‍या संबंधीत किंवा संबंध नसणार्‍या सजीवांवर परीणाम करते.

इतर प्रदूषणाप्रमाणे ध्वनी प्रदूषण ही भारतातील एक मोठी समस्या आहे. सण, समारंभ, उत्सव यावेळी उत्पन्न होणारे तीव्र आवाज, होणारे ध्वनी प्रदूषण भारत सोडून जगात इतरत्र कोठेही नसावेत. आपल्या भारतीयांत आवाज करणे, गोंगाट करणे हे एक आनंदाचे प्रतिक असते. जन्माला येण्यापासून म्रृत्यू पर्यंत, सकाळपासून रात्रीतही, कोणताही सण असो, यात्रा असो, उत्सव असो आपल्या भारतीय समाजाला कोणते ना कोणते वाद्य वाजवावेसे वाटते. फटाके आणि लाउडस्पीकर यांचा आपल्याकडे सढळ हाताने वापर होतो. त्यासंबधी कायदे आहेत पण प्रत्यक्ष वापर करणारे ते निर्बंध पाळत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडणे आणि लाउडस्पीकर वाजवणे याला कायद्याने परवानगी लागते हे कुणाच्या गावीही नसते. नेते आणि पुढारी यांना मोठ्या आवाजात लाउडस्पीकरवर भाषण देणे म्हणजे शक्तीप्रदर्शन वाटते. निवडणूकांच्या काळात प्रचारसभा असोत किंवा एखादा उद्घाटन समारंभ असो, जितका जास्त जमाव, जितका जास्त आवाज तितक्या प्रमाणात त्या प्रसंगाचे यश मानले जाते. एखाद्या कार्यक्रमासाठी न्यायालयाने लाउडस्पीकरला परवानगी दिलेली असेल तरी आवाजाच्या डेसीबल मर्यादेकडे कुणाचेच लक्ष नसते. यामुळे परीसरात काळजी करण्याइतके ध्वनी प्रदूषण होते.

त्याचमुळे भारतातील ध्वनी प्रदूषण ही संवेदनशील सामाजीक समस्या आहे असे देखील म्हणता येईल. आपल्याकडे कित्येकांना अवाजवी आवाज कमी करण्यास सांगितले की राग येतो. त्यामुळे भांडण, मारामारी अगदी खून करण्यापर्यंच्या बातम्या आपण वाचल्या असतील. इतरांच्या मनाचा विचार करून सौजन्य दाखवून स्वत:च आधीच आवाज कमी करणे हे अपमानास्पद वाटते. मोबाईलवर हळू आवाजात बोलणे, टीव्हीचा आवाज मर्यादीत ठेवणे, संवादात योग्य आवाजाची पातळी राखून ठेवणे हे गरजेचे आहे. सामाजिक वर्तन (social behavior) कसे करावे याचे प्रशिक्षण आम्हा भारतीयांना देण्याचे अतिशय गरजेचे झाले आहे.

भाग तिसरा समाप्त.

परिणाम

ध्वनी, आवाज, गोंगाट तसेच ध्वनी प्रदूषण आदींबद्दल वर आपण चर्चा केली. आपली इच्छा असो वा नसो, अनावश्यक आवाज आपल्याला ऐकावेच लागतात. एखादी गोष्ट आपल्याला पहायची नसल्यास आपण आपले डोळे जसे आपण बंद करू शकतो तसेच अनावश्यक गोष्टी न ऐकण्यासाठी जर आपले कान बंद करता आले असते तर! पण ते शक्य नाही.

ध्वनी प्रदूषणाचे मानवी जीवनावर तसेच पर्यावरणावर विविध परिणाम दिसून येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने बहिरेपणा, संभाषणात व्यत्यय, मानसिक तणाव, थकवा असे दैनंदीन जीवनावर विशेषकरून आरोग्यावर परिणाम दिसून येतात. अमेरिकेत ध्वनी प्रदूषणामुळे सुमारे ४०% लोकांना निद्रानाशाचा त्रास जाणवतो असे एका निरीक्षणाअंती दिसून आले आहे. आवाजाच्या प्रदूषणाच्या दुष्परिणामांचे अनेक व्यक्ती शिकार होत आहेत. कित्येकांना आपल्या अंगी असणारे विकार हे आवाजामुळे देखील अधीक बळावतात हेच लक्षात येत नाही.

ध्वनीप्रदूषण हा आरोग्याला गंभीर धोका आहे आणि यामुळे चिडचिड आणि आक्रमकता, उच्च रक्तदाब, उच्च तणावाची पातळी, टिनिटस (कानात बारीक आवाज येत वारंवार राहणे), श्रवणशक्ती कमी होणे, बहिरेपणा, श्रवणदोष, झोपेचा त्रास, हृदयरोग, पक्षाघात मानसिक आजार आणि शारीरिक आघात, मेंदूभोवती रक्तस्त्राव होणे आणि इतर अनेक गुंतागुंत अशा अनेक मार्गांनी लोकांच्या आरोग्यावर आणि वागणुकीवर परिणाम होतो. नजीकच्या काळात ध्वनी प्रदूषणाचे दुष्परिणाम अधिक धोकादायक आणि चिंताजनक असू शकतात.

ध्वनीप्रदूषणाचा दररोज लाखो लोकांवर परिणाम होतो. आरोग्याची सर्वात सामान्य समस्या म्हणजे ध्वनी प्रेरित श्रवणदोष (Noise Induced Hearing Loss (NIHL)). मोठ्या आवाज ऐकल्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग, झोपेचा त्रास, कायमची बधीरता आणि तणाव ही उद्भवू शकते. या आरोग्याच्या समस्या सर्व वयोगटांवर, विशेषत: मुले आणि वृद्ध व्यक्तींवर परिणाम करतात. विमानतळांजवळ किंवा गोंगाट करणाऱ्या रस्त्यांजवळ राहणाऱ्या अनेक मुलांना तणाव आणि इतर समस्या जसे की स्मरणशक्ती, एकाग्रता आणि वाचन कौशल्य यांचा अभाव आदींना तोंड द्यावे लागत असल्याचे आढळून आले आहे.

२०११ मध्ये सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंटने (सीएसई) डेसिबल सर्वेक्षण केले ज्यात दिल्लीत भारतातील सर्वात गोंगाटाचे रस्ते असल्याचे दिसून आले. २०११ च्या डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, झोपेचा त्रास आणि चिडचिडेपणा हे आरोग्यावर आवाजामुळे परीणाम होणारे प्रमुख घटक होते.

भारतातील घोषित केलेली शांतता क्षेत्र (silent zones) किती शांत आहेत?

एका अभ्यासात दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकाता, बंगलोर, हैदराबाद आणि लखनऊ येथील १७ शांतता क्षेत्र तपासली असता त्यापैकी कोणतेही क्षेत्र राष्ट्रीय मानकानुसार नव्हते.

ध्वनी प्रदूषण इतके धोकादायक झाले आहे की याची तुलना कर्करोगासारख्या इतर सर्वात घातक रोगांशी केली जाऊ शकते. ध्वनी प्रदूषण हा आधुनिक जीवनशैलीचा परीणामआहे. शहरीकरण, आर्थिक विकास आणि वाहतूक, यांत्रिक प्रगती हे पर्यावरणीय ध्वनी प्रदूषण आणि आरोग्यावर करणारे घटक आहेत. जर नियमित आणि प्रभावी उपाययोजनेद्वारे ध्वनी प्रदूषण नियंत्रणात ठेवले गेले नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी ही बाब फार गंभीर असू शकते.

उच्च पातळीच्या आवाजाने बर्याच लोकांना विशेषतः आजारी, वृद्ध आणि गर्भवती महिलांना त्रास होतो. अनावश्यक आवाजामुळे बहिरेपणाची समस्या, कान दुखणे, कानांना इतर गंभीर समस्या निर्माण होतात. संगीत श्रोत्यांना आवडते परंतु इतर लोकांना त्रास देतो. ६० डीबीचा आवाज सामान्य आवाज म्हणून समजला जातो. परंतु ८० डीबी किंवा त्यापेक्षा जास्त आवाज शारीरिकदृष्ट्या वेदनादायक आणि आरोग्यास हानिकारक असतो. दिल्ली (८० डीबी), कोलकाता (८७ डीबी), मुंबई(८५ डीबी), चेन्नई (८९ डीबी) इत्यादी शहरे ध्वनी प्रदूषीत आहेत. जीवनासाठी सुरक्षित असलेल्या पातळीवर आवाज मर्यादित करणे आवश्यक आहे. अनावश्यक आवाज मनुष्य आणि प्राणी यांच्या आरोग्यावर परिणाम करतो.

आवाजाच्या पातळीत अलीकडच्या शतकात वाढ दिसून येते. अंदाजे ३० टक्के युरोपीय लोकसंख्येला रात्रीच्या वेळी ५५डीबी (डेसिबल) पेक्षा जास्त रस्ते वाहतुकीच्या आवाजाला सामोरे जावे लागते. दुर्गम, नैसर्गिक भागदेखील मानवनिर्मित आवाजापासून सुटत नाहीत. अमेरिकेच्या २२ राष्ट्रीय उद्यानांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले की आवाजाचा गोंगाट सरासरीपेक्षा २८% जास्त होता.

ध्वनीप्रदूषणामुळे होणारे इतर सजीवांवर परिणाम:-

ध्वनीप्रदूषण केवळ जमिनीवरील सजीवच नव्हे तर वन्यजीव आणि समुद्रातील जीवांच्याही आरोग्याच्या तसेच वर्तनाच्या समस्येचे कारण ठरत आहे.

वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे पक्ष्यांच्या जीवनावर प्रचंड परिणाम होत आहे. त्यांच्या प्रजननची शक्ती कमी होते आणि त्यांचे वर्तनही बदलत आहे. जर्मनीतील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर ऑर्निथॉलॉजीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला. त्यांनी झेब्रा फिंच नावाच्या पक्ष्याचा अभ्यास केला आणि त्यांना असे आढळून आले की, वाहतुकीमुळे होणार्‍या गोंगाटामुळे त्या पक्षांच्या रक्तातील नेहमीचे ग्लॅकोकोरॉइड प्रोफाइल कमी झाले आहे आणि पक्ष्यांच्या पिल्लांचा आकारही सामान्य पिल्लांपेक्षा लहान होता. वाहतुकीच्या आवाजामुळे पक्ष्यांच्या साद घालण्यातही फरक पडतो असा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे.

उत्क्रांतीच्या दृष्टीने मानवनिर्मित आवाज ही एक तुलनेने अलीकडील घटना आहे. वैज्ञानिक अभ्यासांवरून हे दिसून आले आहे की वर्तणुकीत फेरबदल करण्याची, शरीरशास्त्रात बदल करण्याची आणि समुदायांची पुनर्रचना करण्याची क्षमता प्राण्यांमध्ये आहे. त्यानुसार आवाजाच्या प्रदूषणामुळे काही पक्षांनी आपली जीवनशैली बदलली आहे. काही प्राणी आणि पक्षी खोल जंगलात गेले आहेत. काही पक्षांनी आपली संवाद साधण्याची शैली तसेच आवाज बदलले आहेत.

ध्वनी प्रदूषण वन्यजीवांच्या देखील आरोग्यावर परिणाम करते असे अभ्यासानुसार असे दिसून आले आहे . मोठ्या आवाजामुळे सुरवंटांच्या हृदयाचे ठोके वाढतात. ब्लूबर्ड्स कमी पिल्लांना जन्म देतात. जंगलात भटकणे, अन्न शोधणे, जोडीदारांना आकर्षित करणे आणि भक्षकांपासून दूर जाणे यासारख्या विविध कारणांसाठी प्राणी ध्वनीचा वापर करतात. ध्वनी प्रदूषणामुळे त्यांना ही कार्ये पूर्ण करणे अवघड झाले आहे. एकुणच, आवाजामुळे प्राणी तसेच पक्षांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्याचे अभ्यासाअंती दिसून आलेले आहे.

वाढत्या आवाजाचा केवळ जमिनीवरील प्राण्यांवरच परिणाम होत नाही, तर समुद्रात राहणाऱ्या जलचरांसाठीही वाढती समस्या आहे. परंतु औद्योगिक युगाच्या उदयामुळे, जहाजे, सोनार (पाणबुडी मध्ये वापरतात ते) , नैसर्गिक तेल उत्खनन, युद्धनौकांचा अभ्यास आणि मासेमारी यासह इतर अनेक मानवी हालचालींमधून पाण्याखालच्या आवाजाची पातळी नाट्यमयरित्या वाढली आहे.

सर्वच आवाज एकसमान निर्माण होत नाहीत. आवाजाचे गुणधर्म अनेक प्रकारे वेगवेगळे असतात, जसे की ते किती जोरात असतात (तीव्रता, डेसिबलमध्ये मोजले जातात), ते किती काळ टिकतात (सेकंदाचे अंश) आणि त्यांचा पिच किंवा स्वर (फ्रिक्वेन्सी, हर्ट्झमध्ये मोजले जातात). उदाहरणार्थ, पियानोवरील स्वरांच्या खालच्या पट्टीतील जी वारंवारता (frequency)असते ती वारंवारता बहुतेक मोठ्या देवमाशाच्या प्रजाती तसेच मोठ्या संख्येने माशांच्या प्रजाती संवाद साधण्यासाठी वापरतात.

समुद्राच्या वाढत्या आवाजाचा सागरी प्राण्यांवर आणि अधिवासावर गुंतागुंतीच्या पद्धतीने परिणाम होतो. एक तर पृष्ठभागाखालचे आवाज लाटांपेक्षा वेगळे असतात. हवेपेक्षा पाण्यात किंवा पाण्याखाली, आवाज अधिक दूरवर प्रवास करतो हा मुद्दा महत्वाचा आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धातील एका प्रयोगात, संशोधकांनी अंटार्क्टिकाजवळ एक स्पीकर ठेवला, काही कमी वारंवारतेचे किंवा खोल आवाज त्यावर प्रसारण केले आणि बर्म्युडाजवळ ते ऐकल्या जाऊ शकले. या प्रयोगाने सिद्ध झाले की आवाज समुद्रातून अक्षरशः अर्ध्या जगभरात जाऊ शकतो.

समुद्रात आपल्याला सोनार प्रणाली (२०० ते २५० डीबी), पाणबुडी, हायड्रोफोन, टँकर, लष्करी जहाजे इत्यादी अनेक ध्वनी उत्पादन प्रणाली सापडू शकतात. क्रृपया दोन मुद्दे लक्षात असू द्या की, १००-१२५ डीबी दरम्यान असणारा ध्वनीं सजिवांना अस्वस्थ करतो आणि पाण्यात आवाज अधिक दूरवर प्रवास करतो. ध्वनी समुद्राच्या पाण्यात सुमारे १५०० मीटर प्रति सेकंद प्रवास करतो तर आवाज हवेत हवेत सुमारे ३४३ मीटर प्रति सेकंद म्हणजेच पाण्यातल्या प्रवासाच्या तुलनेने हळू प्रवास करतो. म्हणजेच एखादी सोनार प्रणाली असणारी बोट किंवा पाणबुडी भारताच्या पुर्व किनार्‍यावर उभी असेल तर त्यातून निघणारा आवाज अगदी दुरवर असलेल्या आग्नेय आशियातल्या समुद्रात असणार्‍या देवमाशांना किंवा इतर पाण्यातल्या सजीवांना तितकाच हानीकारक ठरू शकतो.

सागरी जीव पाण्याखालील ध्वनीचा उपयोग अनेक महत्त्वपूर्ण कामासाठी करतात. ज्याप्रमाणे लोक एकमेकांशी बोलतात त्याचप्रमाणे सागरी प्राणी संवाद साधण्यासाठी आवाजाचा वापर करतात. तथापि, सागरी प्रजाती बोलण्यापेक्षा जास्त ऐकतात. सागरी प्रजाती आपल्या श्रवणाचा उपयोग अन्न आणि जोडीदार शोधण्यासाठी, प्राणभक्ष्यांना टाळण्यासाठी आणि पाण्यात प्रवास करण्यासाठी करतात. अनेक सागरी प्रजातींच्या अस्तित्वासाठी ध्वनी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचमुळे समुद्रात जहाजांमधून आणि मानवी हालचालींमुळे निर्माण होणारा अवास्तव आवाज, जिवंत राहण्यासाठी प्रतिध्वनीवर अवलंबून असलेल्या सागरी जीव, देवमासे आणि डॉल्फिनसाठी हानिकारक आहे.

सागरी प्राण्यांना ध्वनी तरंगासोबत वातावरणात विकसित होण्यासाठी ४० ते ५ ० दशलक्ष वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षे लागली. परंतु औद्योगिक युगाच्या आगमनामुळे केवळ शंभर वर्षांच्या कालावधीत मानवाने पाण्याखालील आवाजात आमूलाग्र बदल केला आहे. मानवाच्या समुद्रातील हस्तक्षेपामुळे सागरी वातावरण गढूळ होत असून ध्वनी प्रदूषणामुळे सागरी प्रजातींच्या दैनंदिन जीवनावर आणि कार्यांवर परिणाम होऊ घातलेला आहे.

दुर्दैवाने अनेक देवमासे, डॉल्फिन आणि इतर सागरी जीवांसाठी, पाण्याच्या पृष्ठभागाखालील सोनार प्रणालीचा (Sound Navigation and Ranging)वापर केल्याने इजा होऊ शकते आणि मृत्यूही होऊ शकतो. पाण्यात 'पाहण्यासाठी' सोनार प्रणाली ध्वनी लहरींचा वापर करते.

शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यासाठी अमेरिकन नौदलाने सर्वप्रथम विकसित केलेल्या सोनार प्रणालींमध्ये सुमारे २३५ डेसिबलच्या ताकदीच्या मंद गतीने पुढे जाणार्‍या, फिरत्या ध्वनी लहरी तयार होतात. या ध्वनी लहरी पाण्याखाली शेकडो किलोमिटरपर्यंत प्रवास करू शकतात आणि त्यांच्या उगमाच्या स्रोतापासून ४८२ किलोमिटरपर्यंत १४० डेसिबलची तीव्रता टिकवून ठेवू शकतात. या आवाजाची तुलनाच करायची झाल्यास जगातील सर्वात मोठा रॉक बँडचा आवाज १३० डीबी आहे. म्हणजेच सोनार यंत्रांमधून निघणारा आवाज समुद्री जीवांसाठी किती हानिकारक ठरू शकतो याचा तुम्हीच विचार करा.

सोनार यंत्रणेतून निघणार्‍या ध्वनीच्या लाटांचा जलचरांवर होणार्‍या थेट शारीरिक परिणामांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली, तरी पुराव्यांवरून असे दिसून येते की देवमासे अशा ध्वनीपासून दूर जाण्यासाठी शेकडो मैल लांब पोहत जातात किंवा पाण्यात अगदी खोलवर जात राहतात. यामुळे त्यांच्या कान आणि डोळ्यातून रक्तस्त्राव होतो. कधीकधी आत्मघात करण्यासाठी देवमासे समुद्रकिनाराही जवळ करतात. (समुद्रकिनार्‍यावर आल्यामुळे त्यांना प्राणवायू मिळत नाही आणि त्यात त्यांचा म्रृत्यू होतो.)

जागतिक अंदाजानुसार, जहाजांच्या आकार आणि संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यात अजून जास्त ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता आहे.

भविष्यातील पिढ्यांसाठी सागरी संसाधने शाश्वत उपलब्ध करून देण्याचे ध्येय राखण्याचे तसेच मानवनिर्मित सागरी आवाजाच्या प्रदूषणाचा प्रश्न सर्वसमावेशक पद्धतीने हाताळण्याची आवश्यकता आजघडीला आहे. समुद्रातील आवाजाची गुंतागुंत अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, नवीन साधने विकसित करण्यासाठी जगभरातील सामाजिक संस्था, देश आणि उद्योगांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी, मदत करणारी धोरणे विकसित केली पाहिजे. मानवनिर्मित आवाजाच्या परिणामांचे मूल्यमापन करण्यासाठी अधीक संशोधन करून आतापर्यंत वापरलेल्या साधनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्धार संस्थांनी केला पाहिजे. प्रदूषणाच्या पातळीची वेळोवेळी नोंद घेवून त्या बदलाचा मागोवा घेणे. आवाजात जे बदल होत आहेत ते का होत आहेत, तसेच त्यावर काय उपाय योजना आहेत ते समजावून घेतले पाहिजे.

सागरी हालचालींचे नकाशे तयार करणे. जलचर प्राणी कोठे आहेत, कोणत्या देशाजवळ, कोणत्या घनतेत आहेत, मानवी हालचालींमधून पाण्याखालच्या आवाजाच्या पातळीचा अंदाज वर्तवण्यासाठी, पाण्याखाली काय चालले आहे, सागरी सस्तन प्राण्यांबरोबर मानवनिर्मित आवाजाची उच्च पातळी कोठे वाढते हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ या नकाशांचा वापर करू शकतात. सागरी आवाजाच्या परिणामांबाबत दीर्घकालीन दूरदर्शी योजना आखण्यात याव्या.

सर्व देशांच्या सरकारांनी सागरी आवाजाबाबतीत एकसमान धोरण आखणे, आवाजाच्या परिणामांचे अधिक व्यापक आणि प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी एक समीती नेमून योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करणे, जे देश, संस्था, उद्योग या उद्देशांविरूद्ध कामे करतील त्यांना दंड करणे आदी उपाययोजना राबविण्याची गरज आहे. जलचरांवर आवाजाचे परीणाम अभ्यासण्यासाठी नवे नवे तंत्रज्ञान वापरणे, मासेमारी, उत्खनन आदींसाठी नेहमीचे यंत्र साधने असलेल्या बोटी, जहाजे यात सुधारणा करणे आदी पर्यांयांचा वापर करणे शक्य आहे.

काही सामाजीक तसेच पर्यावरणवादी संघटना अमेरिकेच्या नौदलाला लष्करी प्रशिक्षणासाठी सोनाराचा वापर थांबवण्याचे किंवा कमी करण्याचे आवाहन करत आहेत. आपल्या भारतातदेखील आवाजाप्रती अशी जाणीव नागरीकांमध्ये आणण्याची गरज आहे.

खोल समुद्रातील तेल किंवा वायूसाठा शोधणारी जहाजे एअर गन्स नावाचे उपकरण वापरून खोल समुद्रात ध्वनी सोडतात. त्या ध्वनींमुळे भूकंपासारखा आवाज सागरात निर्माण होतो. या असल्या ध्वनींच्या स्फोटांमुळे सागरी प्राण्यांच्या कानाला हानी होवून गंभीर दुखापत होऊ शकते. या आवाजामुळे देवमाशांच्या वर्तन बदलले असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवलेली आहे.

ध्वनीप्रदूषणाच्या दुष्परिणामांवर संशोधन करणाऱ्यांमध्ये स्पेनमधील संशोधक मिशेल आंद्रे यांचा समावेश आहे. ते हायड्रोफोन नावाच्या उपकरणांचा वापर करून सागरी ध्वनी रेकॉर्ड करत आहेत. त्या प्रकल्पात ते निरनिराळ्या ठिकाणांमधून माहिती संकलीत करतात. पाण्याखालच्या आवाजाचा या प्राण्यांवर काय परिणाम होत आहे हे ठरवणे हा या माहितीच्या विश्लेषणाचा उद्देश आहे. समुद्राच्या आवाजाच्या धोक्यांपासून सागरी प्राण्यांचे संरक्षण करण्याचे मार्ग अशा प्रकल्पातून सापडण्याची आशा भावी काळात मिळणार असल्याने अशा संशोधन प्रकल्पांना सरकार तसेच बड्या उद्योगांनी साथ दिली पाहिजे.

भाग ४ समाप्त. (हा भाग अजून विस्तृतरित्या लिहायचा आहे. माझ्या आठवणीत राहण्यासाठी ही सुचना येथे लिहीली आहे.)

( भाग ४ मध्ये सांगितल्याप्रमाणे, तो भाग विस्तृतरित्या लिहायचा होता. काही वैयक्तिक कारणांमुळे तो लिहायचा राहून जात होता. आता ४.१ हा उपभाग ४थ्या भागाला जोडला जाणार आहे. )

आवाज बंद सोसायटी - भाग ४ मध्ये आपण ध्वनी प्रदूषणामुळे इतर सजीवांवर होणारे परिणाम विस्तृतरित्या वाचले. या ४.१ उपभागात ध्वनी प्रदूषणामुळे मानवावर होणारे परिणाम बघणार आहोत. 

आवाजाचे प्रदूषण मानवासाठी तसेच इतर सजीवांसाठी कायमच त्रासदायक ठरलेले आहे. अगदी जून्या जमान्यातही आवाजामुळे झोपेच्या होणार्‍या खोबर्यावर तत्कालीन राजेमंडळींनी काही नियम आणि दंड लागू केलेले होते.  इतर प्रदूषणांच्या तुलनेत, आवाजाच्या बाबतीत समाजात अपुरे ज्ञान, जाणीव, जागरूकता नसल्याने तसेच आवाजाप्रती आपला समाज कसा प्रतिसाद देतो याबाबत पुरेशी माहिती - विदा - डेटा नसल्याने आवाजावर नियंत्रण आणणे कठीण बनले आहे. आवाजाच्या परिणामाबाबत आपला समाज तसेच कायदेही, कायदे राबविणार्‍या संस्था आदी अनभिज्ञ आहेत. "चलता है" ही वृत्ती आपल्या समाजाने टाळली पाहिजे. 

परदेशातील अनेक संस्थांनी अवाजवी आवाज, ध्वनी प्रदूषण याबाबत शास्त्रीय अभ्यास केलेला आहे. ध्वनी प्रदूषण व त्यासंबंधाने उद्भवणार्‍या आजारांमुळे मानवाचे हजारो "अपंगत्व-समायोजित जीवन-वर्षे" ( Disability Adjusted Life Years) वाया गेलेली आहेत.  उदाहरणार्थ, युरोपीय देशांतील समाजाची आवाजामुळे सुमारे ९०३००० एकूण वर्षे वाया गेलेली आहे. साध्या भाषेत सांगायचे झाल्यास आवाजाच्या आजारामुळे मानवाचे हजारो वर्षे वाया गेलेली आहेत. रस्त्यावरील वाहतूक यामुळे झोपेचे खोबरे होणे आणि चिडचिडेपणा वाढीस लागणे हा मुख्य आजार असल्याचे अभ्यासात दिसून आलेले आहे.  आवाजामुळे दिवसा तीन जणांपैकी एक व्यक्ती चिडचिडी होते आणि पाचपैकी एका व्यक्तीची रात्रीची झोप रात्रीच्या रहदारीमुळे विस्कळीत होते. आवाजाच्या वातावरणात दीर्घकालीन वास्तव्य केल्यास हृदयरोग तसेच हृदयस्नायूमध्ये रक्ताची गुठळी होऊन बसणे (myocardial infarction) हा गंभीर आजार बळावलेला आहे याबाबत अनेक पुरावे उपलब्ध आहेत. अशाप्रकारे ध्वनी प्रदूषण हे पर्यावरणीय उपद्रव ठरते. आवाजामुळे सार्वजनिक आरोग्यास देखील धोका निर्माण केलेला आहे.

वातावरणातील आवाजामुळे हृदयरोग व रक्तवाहिन्यासंबंधी आजार,  संज्ञानात्मक दोष - (cognitive impairment - एखादी नवीन गोष्ट न शिकणे, लक्षात न ठेवणे,  संज्ञानात्मक कमजोरी, एकाग्रतेचा अभाव किंवा निर्णय घेण्यास त्रास होणे), झोपेतील व्यत्यय आणि टिनिटस (कानात सतत आवाज ऐकू येणे), अकाली येणारे श्रवणदोष, आवाजाच्या एखाद्या तरंगाचा, फ्रीक्वेन्सीमुळे त्रास होणे, चिडचिडेपणा वाढीस लागणे इत्यादी आजार बळावू शकतात. दुर्दैवाने या गंभीर असणार्‍या आरोग्य समस्यांचे मूळ कारण अवाजवी आवाज सतत ऐकणे असू शकते हेच आपल्या नागरीकांना मान्य नसते किंवा ते त्याबाबत अजाण असतात. आवाजामुळे होणार्‍या मानसिक-सामाजिक प्रभावांबरोबरच, सार्वजनिक आरोग्यावर परिणाम होतो हे चिंताजनक आहे. आवाजामूळे मानवाच्या शरिरावर परिणाम होवून बळावळार्‍या आजारांची आपण माहिती घेवूया. 

१) झोपेचा त्रास:
आवाजामुळे झोपेचे खोबरे झालेले तुमच्यापैकी बर्‍याच जणांनी अनुभवले असेल. झोपेचा त्रास ही तक्रार सर्वसामान्यपणे ज्या व्यक्ती ध्वनी प्रदूषण अनुभवतात त्यांत पहायला मिळते. त्याचा त्यांच्या आरोग्य आणि जीवनाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होऊ शकतो. कोणताही सजीव झोपेतही आवाज ओळखतो. आवाजामुळे झोपेच्या रचनेत बदल घडतात, हृदयाचे ठोके वाढतात. हे नैसर्गिक असले तरी असे वारंवर घडले तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. अशाने झोप अपुरी होवून झोपेत शरीराची झीज भरून निघत नाही. अभ्यासातून असे दिसून आले आहे की आवाजाचा झोपेवर लगोलग परिणाम होतो.  झोप लागण्याच्या अवस्थेत ती व्यक्ती उत्तेजनात्मक प्रतिसाद, झोपेच्या टप्प्यातील बदल, जागृत अवस्था, शरीराच्या हालचाली, संपूर्ण जागे राहण्याचा वेळ वाढणे, प्रतिसाद देणे अशा अनुभवातून जाते. पुरेशी झोप झाली नाही तर त्या पश्चात इतर परिणामही त्या व्यक्तीवर होतच असतात जसे - दिवसा झोप येणे, आळसात दिवस जाणे, कामात उत्साह नसणे इत्यादी. अपुर्‍या झोपेचे व्यक्तीपरत्वे दीर्घकालीन परिणाम असू शकतात. झोपेचा त्रास, इलेक्ट्रो-फिजिओलॉजिकल किंवा सर्वेक्षण प्रश्नावलीचा उपयोग करून, स्वत: चा अहवाल देऊन मोजला जाऊ शकतो. या अभ्यासामध्ये "स्वत: नोंदवलेला झोपेचा त्रास" हा सर्वात सहज मोजता येणारा परिणाम सूचक आहे, कारण इलेक्ट्रो-फिजियोलॉजिकल मोजमापासाठी मोठ्या प्रमाणात नमुने घेणे महाग आणि अवघड आहे आणि तसे करण्यामध्ये अवास्तव उत्तरे मिळू शकतात. झोपेच्या आवाजाचा त्रास होणे या समस्येच्या अभ्यासामध्ये संशोधकांना अनेक अडथडे येवू शकतात. ज्या व्यक्तींवर संशोधन करायचे आहे त्यांची संख्या तसेच त्यांच्या आसपास असलेल्या विमानतळ, वाहतूकीचे रस्ते, वाहने व त्यांचा गोंगाट यामध्ये भरपूर तफावत आढळते. त्या कारणांमुळे ठोस कारणमिमांसा करणे थोडे अवघड होते. तरीदेखील जो काही अभ्यासाद्वारे डाटा समोर येत आहे त्यामुळे आवाजामुळे झोपेची समस्या गंभीर होत आहे हे समजते. 

२) श्रवणदोष:
संपुर्ण जगात श्रवणदोषाने बाधीत व्यक्तीपैकी २०% भारतीय असतात यावरून आपल्या देशातील श्रवणदोषाचे गांभिर्य लक्षात यावे. कानामध्ये निरनिराळ्या कारणाने दोष निर्माण होणे, कानाच्या कोणत्याही भागाला इजा होणे, घाव बसणे, कानातून पू येणे, जंतूसंसर्ग होणे, कान फुटणे हे कानाचे दोष आहेत. पण कमी ऐकू येणे किंवा अजिबातच ऐकू न येणे हे श्रवणदोषात मोडते. श्रवणशक्ती कमी होवून ऐकू न येण्याच्या समस्येला बहिरेपण असे म्हटले जाते. आवाजाच्या प्रदूषणामुळे श्रवणदोष निर्माण होवू शकतात. एखाद्या यंत्रावर काम करण्यामुळे तेथून येणार्‍या आवाजामुळे तेथील कामगारांच्या कानामध्ये ऐकण्याच्या समस्या येतात. वाहन चालवण्यार्‍या वाहनचालकांमध्ये श्रवणदोष निर्माण होवून चिडचिड होवू शकते. अकारण ऐकलेल्या सततच्या आवाजामुळे बधीरत्व येवू शकते. श्रवणदोषामुळे केवळ कमी ऐकू येते असे नाही तर त्या बाधीत व्यक्तीच्या बोलण्यातही बाधा येते. ऐकू न आल्याने बोलणे देखील बिघडते. भाषा विषयक विकास खुंटतो. अनुवंशिक श्रवणदोषाशिवाय आजूबाजूच्या वातावरणात असलेल्या मोठ्या आवाजामुळे निर्माण होणारे कर्णबधिरत्व परिस्थितीजन्य असते. निरनिराळे औषधोपचार, शस्त्रक्रिया, कानात ऐकू येणारे यंत्र बसवणे इत्यादी उपाययोजना करून काही प्रमाणात श्रवणदोष घालविता येतात.

३) हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग:
गरजेचा नसलेला आवाज हा कुणालाही नकोसा वाटतो. हा अनुभव आपणा सर्वांनी कधी ना कधी घेतलेला असतोच. असला आवाज आपल्या नेहमीच्या जगण्यावर परिणाम करत असतो. यामुळे एखाद्या व्यक्तीच्या एकाग्रतेमध्ये, संवादामध्ये, विश्रांती तसेच झोप यामध्ये अडथळे येत असतात.  सार्वजनिक आरोग्यावर परिणाम करणार्‍या या आवाजामुळे इतर आजारांबरोबरच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जे दुष:परिणाम समोर येत आहेत ते जास्त गंभीर आहेत.  अलीकडील काही वर्षांत रस्त्यांवरील वाहतूक व रहदारी आणि विमानाचा आवाज यामुळे आजूबाजूच्या रहिवासींमध्ये उच्च रक्तदाब , हृदयरोग इत्यादी आजार वाढलेले आहेत. रस्ते वाहतुकीच्या आवाजामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो, ज्यात हृदयस्नायूमध्ये रक्ताची गुठळी होऊन बसणे (myocardial infarction)हा धोका असल्याचे दिसून आले आहे. रस्ते वाहतुकीचा आवाज आणि विमानांचा आवाज या दोन्हीमुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.  सजीवांचा मेंदूतील श्रवण प्रणाली आवाज, ध्वनी, गोंगाट आदींचे फरक लक्षात घेवून सतत त्या माहितीचे विश्लेषण करत असतो. सततच्या मोठ्या आवाजाच्या तणावाचा परिणाम शरीरातील जैवीक संस्थेवर होत असतो. आवाज हा एक अविशिष्ट तणाव मानला जातो ज्यामुळे दीर्घकाळात आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. साथीच्या रोगांच्या अभ्यासानुसार आवाजाची पातळी जास्त असते अशा रस्ता किंवा हवाई वाहतुक इत्यादी सेवा देणार्‍या उद्योगात काम करणार्‍या लोकांमध्ये उच्च रक्तदाब आणि रक्ताची गुठळी होणे (मायोकार्डियल इन्फ्रक्शनसह) हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा उच्च धोका जास्त असतो. 

४) चिडचिड, राग, क्रोध, त्रास, वैताग, उपद्रव, नैराश्य:
परिपूर्ण आरोग्य असणे म्हणजे केवळ रोग किंवा अशक्तपणा नसणे नसून संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची स्थिती सर्व समाजाला प्राप्त होणे परिपूर्ण आरोग्याचे द्योतक आहे.  म्हणूनच, वातावरणात होणार्‍या आवाजामुळे होणारी चिडचिड, त्रास हा सामाजिक आरोग्यावरील संकट मानले पाहिजे. आवाजामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात हे आता पुराव्याने जवळपास सिद्ध झालेले आहे. म्हणूनच, वातावरणातील आवाज केवळ उपद्रवाचे कारण नव्हे तर सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाच्या आरोग्यासाठी देखील चिंताजनक मानला पाहिजे. वातावरणातील अवाजवी आवाजाची परिणीती ध्वनीप्रदूषणामुळे होणार्या त्रासात होते. अशा त्रासामुळे चिडचिड, राग, क्रोध, त्रास, वैताग, उपद्रव, नैराश्य इत्यादी मानसिक आजार होवू शकतात. आवाजामुळे होणारी चिडचिड आरोग्यावर विपरीत परिणाम करते. आवाजाने चिडलेल्या लोकांना राग, निराशा, असंतोष, माघार, असहाय्यता, नैराश्य, चिंता, विचलित होणे, मानसिक आंदोलने किंवा थकवा अशा विविध नकारात्मक प्रतिसादांचा अनुभव येऊ शकतो. शिवाय, थकवा, पोटाची अस्वस्थता आणि तणाव यांसारख्या तणावाशी संबंधित मनोसामाजिक लक्षणे आवाजाच्या संपर्कात येण्याशी तसेच आवाजाने होणार्‍या चिडचिडीपणाशी संबंधित असल्याचे आढळले आहे. आवाजाशी संबंधित तीव्र प्रकारच्या चिडचिडेपणा हा वातावरणातील आवाजाच्या संपर्कात असलेल्या मानवसमुहाच्या जगण्याच्या शैलीवर आणि समाधानावर परिणाम करणारा एक वैध पर्यावरणीय मुद्दा मानला पाहिजे असे काही सार्वजनिक आरोग्य तज्ञांना वाटते.

५) मुलांमध्ये संज्ञानात्मक दोष Cognitive impairment (एखादी नवीन गोष्ट न शिकणे, लक्षात न ठेवणे,  संज्ञानात्मक कमजोरी, एकाग्रतेचा अभाव किंवा निर्णय घेण्यास त्रास होणे):
मुलांच्या शिकण्यावर आणि स्मरणशक्तीवर आवाजाचा नकारात्मक परिणाम होतो. आवाजाशी संपर्क असताना व आवाजाचा संपर्क थांबल्यानंतरही शालेय वयाच्या मुलांमध्ये संज्ञानात्मक क्षमतेत घट होतच असते असा अभ्यास प्रायोगिक आणि साथीच्या रोगांच्या अभ्यासकांनी केला आहे. २० वर्षांपेक्षा जास्त अभ्यासानुसार मुलांमधील वाचन आणि स्मरणशक्तीवरील ध्वनीचा नकारात्मक परिणाम दिसून आला आहे. तीव्र आवजाचा तेवढ्याच तीव्रतेने लहान मुलांवर परिणाम होतो. वाचन, आकलन, स्मरणशक्ती आणि लक्ष देणे तसेच भाषेचा समावेश असलेली कामे आवाजामुळे प्रभावित होतात. शालेय शिक्षणाच्या वयात जर असे दुष्परीणाम झाले तर मुलांच्या बौद्धीक आणि भावनात्मक विकासात बिघाड होऊ शकतो व त्याचा गंभीर परिणाम त्यांच्या पुढील जीवनावर होऊ शकतो.  १९९२ मध्ये जर्मनीमधल्या म्यूनिच येथील जुने विमानतळ बंद करून नवीन जागी त्याचे स्थलांतर झाले. त्याकाळी त्या भागातील वय वर्षे ९ ते १० मधल्या शालेय मुलांचा अभ्यास करण्यात आला. स्थानांतरणापूर्वी, उच्च आवाजाचा संपर्क असणार्‍या मुलांमध्ये दीर्घकालीन स्मरणशक्ती आणि वाचन आकलनातील कमतरता आढळून आली. विमानतळ स्थलांतरीत झाल्यानंतर काही कालावधीनंतर त्या मुलांमधील अशी कमतरता भरून निघाली ही चांगली गोष्ट देखील लक्षात आली. जरी जुन्या जागी असलेल्या मुलांमध्ये दोन वर्षांनंतर ही समस्या कमी झाली असली तरी नव्या विमानतळाजवळ असलेल्या मुलांमध्ये आवाजामुळे अशी समस्या जाणवायला सुरूवात झाली होती. 

६) कर्णनाद - टिनिटस (कानात सतत आवाज ऐकू येणे) Tinnitus:
आजूबाजूला कोणताही आवाज नसतांना सतत एखाद्याच्या कानात बारीक गुणगुण, खरखर, कुजबुज, शिट्टी, घंटी वाजल्यासारखा, एखाद्या मोटरची घरघर, रातकिड्याची किरकिर इत्यादी बारीक आवाज येत असेल तर ती व्यक्ती टिनीटस या आजाराची शिकार असू शकते. असे कर्णनाद असलेले आवाज केवळ त्या आजाराने बाधीत व्यक्तीलाच येत असतात. आवाज  बाह्य ध्वनी स्रोताच्या अनुपस्थितीत आवाजाची संवेदना म्हणून 

कर्णनाद-टिनिटसची व्याख्या केली जाते. अंतर्कर्णामधल्या कर्णशंकू (Cochlea)असलेल्या नलीकेत बारीक केसांच्या झुबक्यासारख्या लोमकोशिकांची रचना असते. बाह्य आवाजामुळे, वयोमानामुळे या लोमकोशिका काही प्रमाणात खराब झाल्या तर कर्णनाद या आजाराची सुरूवात होते. अनेक डॉक्टर कर्णनाद-टिनिटसला आजार नव्हे तर श्रवण प्रणालीतील समस्येचे लक्षण मानतात. हा आजार कमी न होता वाढत जातो. ऐकू येणार्‍या गुणगुण, घंटी वाजण्याची त्रीव्रता वाढत जाते. जास्त मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्यामुळे, डोके व मान यांना इजा झाल्यास, कानात जंतूंचे संक्रमण व वयोमानानुसार कर्णनाद - टिनिटस आजार उद्भवतो. जी मुले सतत हेडफोन लावून गाणी वगैरे ऐकत असतात अशांमध्येही कर्णनाद - टिनिटस या आजाराचे लक्षण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आवाजामुळे श्रवणदोष निर्माण झालेल्या ५०% ते ९०% व्यक्तींमध्ये कर्णनाद - टिनिटस आजार दिसून येतो. काही लोकांमध्ये टिनिटसमुळे झोपेचा त्रास, संज्ञानात्मक परिणाम (एखादी नवीन गोष्ट न शिकणे, लक्षात न ठेवणे), चिंता, मानसिक त्रास, नैराश्य, संप्रेषण समस्या, नैराश्य, चिडचिडेपणा, तणाव, काम करण्यास असमर्थता, कार्यक्षमता कमी होणे आणि सामाजिक जीवनातील मर्यादित सहभाग कमी होणे इत्यादी प्रकार घडू शकतात. श्रवणशक्ती कमी (बधीरता) होण्यासह आणि कर्णनादाचा त्रास होणे या समस्या बर्‍याचदा एकत्र होवू शकतात. अत्यधिक, प्रमाणापेक्षा जास्त असलेल्याआवाजाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस कर्णनाद - टिनिटसचा अनुभव येऊ शकतो. या आजारावरील उपायात शस्त्रक्रिया सांगितली जाते पण शक्यतो तिचा उपयोग होत नाही. 

भाग ४.१ समाप्त. 

(क्रमश:)

- पाषाणभेद
०३/०८/२०२१

आमचीबी आंटी जन टेस

आमचीबी आंटी जन टेस

गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं.

त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला.
या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

तर, मलाबी वाटलं की आपलीबी करून घ्यावी आंटी जन टेस. आंटी जन टेसला काय काय करावं आसं कोनाला तरी विचारावं आसं वाटत व्हतं. कारन, आंटीपर्यंत ठिक हाय पन जन म्हणजे जनता. आता ती आंटी आन मी, समद्या जनांसमोर काय आन कसं करनार आसा मला प्रेश्न पडला. कोनाला विचारायचीबी लय लाज वाटत व्हती. जनांसमोर काय झालं तर गावात त्वांड दाखवायला जागा नव्हती. सगळे सगे सोयरे गावातच. तसं झालं तर कायम तोंडाला पट्टी लावावी लागणार आशी भिती मनात आली. पन आंटी काय करनार, ती कशी आसंल, ती काय काय देईल, न देईल या विचारानं रात्रीची झोपबी येईना झाली.

संज्या आन राम्या तसं आंटी टेस करून आल्यालं व्हतं, पन त्यांना विचारावं म्हंजे आगीत हात घालन्यासारखं व्हतं. आन संज्या तर माझी हिरॉईन करीनाच्या शेजारीच राहतो. भाड्या मुद्दाम माझ्यासमोर तिचं खरं नाव करूना मोठ्यानं बोलत राहतो. माला सांगा, कोरूनाच्या काळात आसं चिडवनं बरं हाय का? ऊस जळलं त्याच्या वावरातला अशानं. कांदा करपलं उन्हाळ्यातला त्याचा.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

मनाचा हिय्या करून लालचंद मारवाड्याच्या दुकानातून मुद्दाम वीस किलो तांदूळ घेतांना या आंटी जन टेसची थोडी माहीती काढली. त्ये म्हनलं की, आधार कार्ड घेवून जा आन लायनीत थांब. नंबर आला की आंटी टेस व्हईल.
आता या आंटी जन टेसला आधार कार्ड नंबर देऊन लायनीत थांबायचं म्हनजे लई काळजी वाटू लागली. आंटीनं आधार नंबर कुनाला दिला आन त्ये आपल्या घरी पत्ता काढत आलं म्हणजे? आंटीनं काय काळाबाजार केला तर काय आशी चिंता मनाला लागून राहीली.

धडगत करून आरोग्य शेंटरला स्कार्पीओ लावली. एकदम सकाळी गेलेलो. बाहेर धा बारा जनांची लाईन व्हती. वळखीचं कुनीच नव्हतं हे बरं होतं. मधी आसलेली आंटी जन, लोकांना कवा भेटल आसं वाटत व्हतं. एकानं आधार नंबर घेतला. नाव बीव लिहून घेतलं. एक आडूसा होता. तिथंच आंटी आसल, अन जन, लोकं तिथंच तिला भेटत आसतील आसं वाटलं. एवढ्या गर्दीत आंटीला भेटनं काय बराबर वाटंना. पन एकदा का व्हईना भेट झाली म्हंजे आपलं गाडं पुढं रेटता येईल आसा विचार मनात आला.

माझ्यावाला लंबर आला आन मी आडूशामागे गेलो. तवा आंटी बिंटी काय दिसली नाय. तिथं दवाखान्यासारखं मांडलेलं व्हतं अन एक नर्स व्हती. मंग त्या पोरीनंच नाकात कायतरी खुपासलं. आन जा म्हनाली.

लय फसगत झाली राव. द्राक्षे काढणीला यावे आन पाऊस पडून सगळा माल बेचीराख व्हावा, अगदी पावडरी मारायलाबी येळ मिळू नये आसं झालं. आसं कुठं आसतंय व्हय?

आशी झाली आमच्यावाली आंटी जन टेस.

जाऊद्या, आपल्याला काय म्हना.

- पाषाणभेद
२६/०४/२०२१

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

कथा: पोळी शब्दाच्या इतिहासातील उल्लेखाची

चेहरापुस्तकावर पोळी आणि चपाती यापैकी योग्य मराठी शब्द कोणता यावर वाद झडत असतांना इतिहासाची पाने चाळतांना काही ऐतिहासीक पुरावे हाती लागले.

त्यातील एक संदर्भ म्हणजे, संस्कृतग्रंथ "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) .
सदर ग्रंथ संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे.
( "भुकंबलीतम: - वेदोपदेश" ग्रंथ प्राकृतात अनुवाद दगडफोड्या यांनी "भुकबळी" या नावाने केला आहे. (रचनाकालखंड उपलब्ध नाही.)

(सदर दोनही ग्रंथांची उपलब्धता अतिशय दुर्मीळ आहे. इच्छूकांनी शोध घ्यावा.‌)
सदर ग्रंथात "पोळीयस्य कारणेन" (पोळीच्या कारणाने) या अध्यायात तत्कालीन भिकारी अन एक साधूजन यांच्या भुकेची तुलना एक धनवान सावकार कसा करतो याचा स्पष्ट उल्लेख आहे. पोळी न मिळाल्याने भिकारी जग सोडतो आणि तो साधू त्या सावकाराकडून पोळी मिळवून ती खाऊ घालण्यासाठी त्या भिकार्यास जीवदान देतो अशी कथा आलेली आहे.

ती कथा येथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
कथा सुरू होते आहे:
प्राचीन काळी मर्‍हाटी राज्यात जनटक प्रांतात त्रिकंस्थान नावाचे एक गाव होते. गाव तसे लहानच होते. गावाच्या आसपास शेती करणारे आणि त्या अनुषंगाने व्यवसाय करणारे राहत असत. पर्जन्यछायेच्या प्रदेशात हे गाव येत असल्याने दुष्काळ तर गावाच्या पाचवीलाच पुजलेला होता. अनेकदा बियाणे पेरावे अन ते उगवण्याआधीच पक्षांचे अन्न व्हावे अशी परिस्थीती होती. होता येईल तितके अन्न उगवावे अन ते पुरवून पुरवून वापरावे, इतर वरकामे करून जीवन जगावे अशी तेथल्या गावकर्‍यांना सवय झालेली होती.

गावात एक औंदाजी नावाचा गरीब राहत होता. गावाच्या सीमेवर त्याची झोपडी होती. मजूरी करून दिवस कंठत तो म्हातारा झालेला होता. आताशा त्याचेकडून काही काम होत नसे. दिवसभराचे कोरान्न मिळवायला तो काम करण्यासाठी इतरांकडे याचना करत असे पण त्याच्या शारिरीक विपन्नावस्थेकडे पाहून कोणताही स्त्री-पुरूष त्याला दया म्हणून चतकोर शाक भाकरी देत असे. औंदाजी बापडा देखील त्याला आता सरावला होता. एक पाय ओढत तो चारपाच दारी भिक्षा मागे अन आपल्या पोटाची खळगी भरण्याइतके अन्न मिळवून आपल्या झोपडीत जाऊन पडत असे. गेला आठवडा औंदाजीच्या पायाचे दुखणे वाढलेले होते. त्यातच अन्न न मिळाल्याने त्याला ग्लानी येत होती. कसेबसे पाण्यावर दिवस काढत होता बापडा.

त्याच समयाला त्रिकंस्थान गावाच्या दामाजी सावकारांकडे नातवाच्या बारशाच्या समारंभ होता. पंचपक्वान्नाची जेवणे नुकतीच आटोपल्यामुळे मंडळी सुस्तावलेली होती. विडा पान खाऊन वडीलधारे वामकुक्षी घेत होती. स्त्रीया माजघरात आवराआवर करत होत्या. लहान मुले वाड्यातल्या चौकात खेळत होती. अशा समयाला औंदाजी आपला दुखरा पाय सरकत सरकत तेथे भिक्षा मागण्यासाठी आला. त्याने फार काही नको, फक्त चतकोर अर्धी पोळी अन प्यायला पाणी द्या अशी विनंती तेथे केली. सुस्तावलेल्या दामाजी सावकारांनी पाहुण्यांसमोर आपली आब दाखवण्यासाठी औंदाजीला पोळी, भाजी, पाणी देण्यास साफ नकार दिला. इतकेच नव्हे तर त्या वाड्यासमोरून लगेच निघून जाण्यास त्याला फर्मावले.

पोटातली दोन दिवसांची भुक, उन्हाचा त्रास, आजारी शरीर, झालेले वयोमान या सगळ्यांचा एकत्रीत विपरीत परिणाम होवून औंदाजीने सावकाराच्या वाड्याच्या पायरीवरच आपले प्राण सोडले.

हे सर्व पाहुणे अन सावकारासमोर घडले. सावकारासही आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला व तो त्याने सगळ्यांना बोलून दाखवला. घटना तर घडून गेली होती. आता पश्चाताप करण्यात काही अर्थ नव्हता. कदाचित औंदाजीला तेथेच मरण यावे अशी नियतीची इच्छा असावी.

याच दरम्यान संत पाषाणभेद तेथे अवतिर्ण झाले. काखेत झोळी, हातात कमंडलू, पायी खडावा, अंगात कफनी, डोईस मुंडासे, कपाळी रेखीव चंदनी सूर्य अशा वेशात ते सावकाराच्या वाड्यासमोर उभे ठाकले. आपल्या उंच आवाजात ओमकाराचे स्मरण करून त्यांनी सावकाराकडे कोरडा शिधा मागितला. परंतु सावकार, तेथील पाहुणे, स्त्रीया इत्यादी मंडळी औंदाजीच्या शवाभोवती गोळा झालेली होती. संतांकडे कुणाचेही लक्ष नव्हते. अजून दोन वेळा ओमकार करून भिक्षा मागून जर नाही मिळाली तर पुढल्या घरी जाण्याचा संतांचा विचार होता तितक्यात सावकाराचे लक्ष त्यांच्याकडे गेले. सावकाराने घडलेला सगळा प्रकार पाषाणभेदांच्या कानावर घातला. तसेच थोडी वाट पाहून औंदाजीला पोळी भाजी तसेच गोडान्न देण्याची त्यांच्या मनीची प्रांजळ भावना होती हे देखील सावकार वदले.

संत पाषाणभेदांनी आपल्या ठाई असलेल्या आंतरीक ज्ञानाने सर्व काही आधीच जाणले होते. झालेल्या घटनेत सावकाराची काही चूक नव्हती. भिक्षा देणे न देणे हे सर्वस्वी दात्याच्या मनात असते. त्याला भिक्षेकरी आक्षेप घेवू शकत नाही, तसेच कसलाही श्राप देणे हे देखील उचीत नाही हे ते जाणत होतेच.त्यांनी सावकारास मानसीक धीर दिला आणि सावकाराने त्यांचे चरण धरले. थोडे मागे सरत लगोलग संत पाषाणभेदांनी औंदाजीचे शव उचलले आणि ओसरीवर ठेवले. शवाच्या बाजूस डोळे मिटून सिद्धासनात त्यांनी बैठक घेत ईश्वराचे स्मरण केले. आपली प्रार्थना संपवत संत पाषाणभेदांनी उपचार म्हणून आपल्या कमंडलूतील पाणी औंदाजीच्या पापण्यांना आणि कपाळाला लावले. पुन्हा एकवार संतांनी ईश्वराचे स्मरण केले. अगदी थोड्या कालाने औंदाजीच्या शरीरात श्वास वास करू लागला. हाती पायी थरथर जाणवली. पुढच्याच क्षणाला औंदाजीने डोळे उघडले.

समस्त मंडळींच्या आश्चर्यास पारावार उरला नाही. वयस्कर स्त्रीयांनी आपल्या सुनामुलांना औंदाजीसाठी पोळी भाजी घेवून येण्यास पिटाळले. सावकारांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. त्यांनी औंदाजीला बसते केले अन पोळी भाजीचा पहिला घास आपल्या हाताने त्याला भरवला. 'पोट भरून खा अन तुझ्या दुखर्‍या पायाच्या उपचाराची जबाबदारीही मी घेतो', हे सावकारांचे बोलणे ऐकून औंदाजीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. काय घडले हे तो समजून चुकला होता. मनोमन त्याने संताचे आभार मानले. पाहूणे मंडळीही ते द्रृष्य बघून भावूक झाली होती.

उपस्थित सज्जन भावनेतून सावरत असतांना सावकारांना संत पाषाणभेद भिक्षा मागण्यासाठी आल्याची आठवण झाली. ते सभोवार पाहू लागले. पण संत पाषाणभेद तेथे होतेच कोठे? ते तर तेथून केव्हाच निघून गेले होते. तेथील सज्जनांनी संत पाषाणभेद निघून गेल्याच्या दिशेने श्रद्धेने हात जोडले.

"भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) या ग्रंथातील "पोळीयस्य कारणेन" (पोळीच्या कारणाने) हा अध्याय येथे संपतो.

"पोळी" या शब्दाच्या अर्थाचे विवेचन:
जनटक प्रांत तसेच त्रिकंस्थान नावाचे एक गाव महाराष्ट्रातच होते असे विद्वान इतिहासकारांचे मत आहे. "भुकंबलीतम: - वेदोपदेश" (प्राकृतातः भुकबळी) या ग्रंथाची रचना कालखंड हा शके १६६१ च्या आधीचा असावा. तो संत पाषाणभेद ( जन्मसाल: उपलब्ध नाही, मृत्यू: शके १६६१ किंवा ६२) यांनी लिहीलेला आहे. त्याकाळी महाराष्ट्र प्रांतात पाकृतात पोळी हा शब्द असल्याचे या ग्रंथवाचनावरून सिद्ध होते. थोडक्यात 'पोळी' हा अस्सल मराठी शब्द आहे.

तसेच सदर ग्रंथांत अनेक मराठी शब्दांचा उलगडा होऊ शकतो इतके शब्द आलेले आहेत. वेळोवेळी आपण ते अभ्यासू या.

३०/०४/२०२१