Monday, May 23, 2011

सरकारी योजना

सरकारी योजना

माझ्या गावाचा रस्ता कधी सवान* होतच न्हाई
सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई

गाई म्हशी आम्ही पाळतो, सकाळी धारा काढतो
उन वारा थंडीचं, दोन पैशासाठी दुध शहरात पाठवतो
घरात पोरांच्या ओठांना दुध राहातच न्हाई
सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई

शाळा! म्हनं झेडपीची शाळा !!
मोफात शिक्षान, मोफात शाळा
मास्तर खिचडी शिजवीत शिकवीतो
तिच्यात टाकायला तेलतूप राहातच न्हाई
सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई

सरकारी दवाखान्याची काय पन तर्‍हा
खाजगी दवाखानाच वाटं त्याच्यापुढं बरा
सरकारी दवाखान्यात तर डाक्टर राहातच न्हाई
सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई

पुढारी फाडारी बेनं आसलं कसलं
त्यांनी मढ्याचं धोतार फेडलं आन नेसलं
बी बीयाण्यांच्या अनूदानात आमचाच वाटा न्हाई
सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई

स्वातंत्र आलं, साठ वर्ष झाली
गुलामगीरीची स्थिती काय सुदरंना साली
भ्रष्टाचाराचं पाप आता थांबायचं नावचं घेत न्हाई
सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई

*सवान= सारखा

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१५/१०/२०१०

बाई इथंच ठोकू का हा खिळा?

बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरः
ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?
मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

मास्तरः
ह्या वर्गात आडवे बेंचेस ठेवू
उभं रहायला उंच प्लॅटफॉर्म करू

मास्तरीणबाई:
समोर टेबल अन आहे खुर्ची बसायला
डस्टर द्या मला, नाही वापरत कापडी बोळा

मास्तरः
ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

मास्तरः
दरतासाला मी हो हजेरी मुलांची घेईन
सार्‍या मुलांना मी लाईनीनं उभं करीन

मास्तरीणबाई:
भरलेली शाळा खुपच आवडते मला
वर्ग कधीच ठेवणार नाही मोकळा

मास्तरः
मग ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

मास्तरः
प्रयोग करायसाठी आहे ही प्रयोगशाळा
बाजूलाच उभी केली व्यायामशाळा

मास्तरीणबाई:
कृषीशाळेत घेतला मी हाती विळा
तण काढून दाखवले मी कितीक वेळा

मास्तरः
मग ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

मास्तरः
हि घंटा मी अशी हातात पकडीन
शाळा सुटायची घंटा मी वाजवीन

मास्तरीणबाई:
चला शिकवू दोघे मिळून मुलांना
आता मुले झालीत शाळेत गोळा

मास्तरः
मग ठोकू का ठोकू का, बाई इथंच ठोकू का हा खिळा?

मास्तरीणबाई:
चला लावूया, सर लावूया, इथेच काळा फळा

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१४/१०/२०१०

माझा नवरा पैसं खातो

माझा नवरा पैसं खातो

खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो
अहो खातो माझा नवरा पैसं खातो
जातो जातो माझा नवरा मुन्शिपाल्टीत कामाला जातो ||धृ||

आठवड्याला नवी साडी घेई
पोराबाळांना खावू रोज देई
पण दारू लई जास्त पितो
खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो
जातो जातो नवरा पोलीस श्टेशनात कामाला जातो ||१||

रस्त्यावर तो उभा राहतो
शिट्टी मारून लायसन पाहतो
पावतीचं पैसं खिशात टाकतो
खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो
जातो जातो नवरा ट्रॅफीकच्या कामाला जातो ||२||

आम्ही म्हैन्यात मॉलला जातो
दोन म्हैन्यात मोबाईल बदलतो
पण डॉक्टरचं खिसं आठ दिसात भरतो
खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो
जातो जातो नवरा सरकारी कचेरीत जातो ||३||

हौसमौज आम्ही न्हेमी करतो
अंडी मटन रोजरोज हाणतो
पण भांडण रात्रंदिस करतो
खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो ||४||
जातो जातो नवरा पी.डब्लू.डी.त कामाला जातो

क्रेडीट कार्ड आम्ही वापरतो
म्हैन्याचा किराणा उधार आणतो
रोज वसूलीवाला दारी तगादा लावतो
खातो खातो माझा दाद्ला रोजरोज पैसं खातो
जातो जातो नवरा फुकटपुढारीपणाला जातो ||५||

काय म्हणू मी अशा नशीबाला
रोज विनवीते मी देवाला
पैसं नको पण सुख घरी माझ्या येवो
नको नको फुकटचे पैसे नको
नको नको लाचखोरीचं पैसे नको ||६||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/१०/२०१०

रुसली ग रुसली, माझी बायको रुसली

रुसली ग रुसली, माझी बायको रुसली

हिरो:
रुसली ग रुसली, माझी बायको रुसली
बसली ग बसली, कोपर्‍यात जावून बसली

हिरो:
तूला प्रफुल्लची साडी आणू का ग?
तूला नवा मोबाईल घेवून देवू का ग?
तूला कसला कंटाळा आलाय का ग?
मग टिव्हीवर 'सासबहू' बघ ना ग

हिरवीन:
जावा तिकडं नका येवू इकडं
नशीब माझं फुटकं
काय वस्तू देता असली कसली?
कशी वेळ माझ्यावर आली

हिरो:
आत्तां?
साडी नको अन मोबाईलबी नको
तुझी तर्‍हा ही असली कसली?
रुसली ग रुसली, माझी बायको रुसली

हिरो:
नको घरी सैपाक करू आज
बाहेर हाटेलीतच जेवू या ग
तूला काय लागते ते सांग ना ग
आणून देतो का नाय मग बघ

हिरवीन:
हाटेल नको न बिटेलबी नको
मला नका लालूच दावू कसली

हिरो:
रुसली ग रुसली, माझी बायको रुसली

हिरो:
तूला मॉलला घेवून जातो
बॉक्समधी सिनेमा दावतो
मधी आयस्क्रीम थंडगार खावू
आत्ता तुझा राग शांत कर पाहू

हिरवीन:
मॉल नको मला सिनेमाबी नको
नका माझ्या रावन्या करू
रातदिस तूमची डूटी हाय सुरू
तुमच्यासाठी किती मी झुरू
सोडा की नोकरी असली

हिरो:
रुसली ग रुसली, माझी बायको रुसली

हिरो:
तू घरचं काम नको करू
धुनं भांड्याला बाई कर सुरू
सासू तूझी काय बोलली का ग?
जरा जिवाला खात पित जा ग

हिरवीन:
घरच्या कामाला माझी ना नाही
सासू हाय चांगली, काय बोलत नाही
तुमाला काय करावं समजत नाही
अशा एकांताच्या वेळी

हिरो:
आँ?! आस्सं हाय का!!

हिरो:
आगं मग चल ये ना जरा इकडं
नको जावू सोडून मला तिकडं
आज मी डूटीवर जातच न्हाई
शेवटी माझी अक्कल परत आली

हिरवीन:
या बया! चला जावा तिकडं

हिरो:
हसली ग हसली, माझी बायको हसली
फसली ग फसली, माझ्या मिठीत बायको फसली

(वरील गाण्यात ग्रामीण शब्द काढून टाकायचे असतील तर शहरी हिरो-हिरवीन यांची जोडी डोळ्यासमोर येवूद्या.)

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१४/१०/२०१०

लग्नगीतः पतीची ग वाट पाही, मंडपी सजली नवरी

लग्नगीतः पतीची ग वाट पाही, मंडपी सजली नवरी

पतीची ग वाट पाही, मंडपी सजली नवरी
येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||धृ||

हिरवा शालू तूला सासू आणील ग
शालूत तू खुलून दिसशील ग
शालूसंगे आणायला सांग पैठणी भरजरी
कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||१||

पाटल्या बांगड्या तूला सासरा आणील ग
गळा कोल्हापुरी साज तुला करील ग
वाकेसरी आणायला सांग साजा बरोबरी
कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||२||

अनवट, मासोळ्या तूला दिर आणील ग
पायी घालून तू चालशील ग
गेंद, जोडवी आणायला सांग त्याच्या बरोबरी
कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||३||

तोळबंद, वाकी तूला नणंद आणील ग
हाती घालून तू काम करशील ग
गोठ, बिल्वर आणायला सांग त्याच्या बरोबरी
कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||४||

डूल, कर्णफुले तूला देराणी आणील ग
कानी घालून तू मिरवशील ग
लफ्फा, कुडी आणायला सांग त्याच्या बरोबरी
कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||५||

नको सखे मला शालू अन नको मला पाटल्या ग
नको मला जोडवी वाकी अन मासोळ्या ग
मी माझ्या 'यांची' वाट पाहे खरी
कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||६||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/१०/२०१०

कशी दिसते दिसते लाडाची लाडी तुमची

कशी दिसते दिसते लाडाची लाडी तुमची

मी नेसली नेसली, साडी अंजीरी ग रंगाची
कशी दिसते दिसते, लाडाची लाडी तुमची ||धृ||

गजरा माळला माळला, शेवंती फुलांचा
डोई घेतला घेतला, पदर लाल बुट्टीचा
भांगी भरलं भरलं, कुंकू सवाष्णीचं
आहे मौलीक मौलीक, माझं कपाळीचं लेणं
नको नजर लागो या वैभवाला कुणाची
कशी दिसते सांगा लाडाची लाडी तुमची ||१||

गळा घातला घातला, चंद्रहार सोन्याचा
मंगळसुत्र मिरवीते मिरवीते, ऐवज धन्याचा
कानात घातले घातले, कर्णफुले झोकाची
नाकात घातली घातली, नथ आकडी मोत्याची
डोरले गाठले ल्याले माझ्या आवडीची
कशी दिसते सांगा लाडाची लाडी तुमची ||२||

गोर्‍या दंडी शोभते शोभते, वाक घट्टसर
माझ्या आवडीचा आवडीचा, गोफ जाडसर
हातात आहेत आहेत, पाटल्या दहा तोळी
नवीनच घडवली घडवली, वजनी पाटली
नक्षी केली त्यावर बारीक नजरेची ||३||
कशी दिसते सांगा लाडाची लाडी तुमची

बोटात घातली घातली, अंगठी नक्षीदार
कमरपट्टा बांधला बांधला, आवळून झुबकेदार
पायी वाजती वाजती, छुमछुम पैंजण
जोडवी घातली घातली, वेढेदार दोन
आहे जोडीला जोडीला विरोदी चांदीची
कशी दिसते सांगा लाडाची लाडी तुमची ||४||

मोठा दागीना दागीना, आहेत तुम्ही माझे पती
लाभो आयुष्य आयुष्य, करते प्रार्थना दिनराती
हाती शोभतो शोभतो, हात तुमचा माझ्याच हाती
कशी दिसते सांगा लाडाची लाडी तुमची ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/१०/२०१०

जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम

जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम

(आज नाशिकचे आमदार डॉक्टर वसंत पवार यांची अंत्ययात्रा बघीतली. त्यांच्या नविन पंडीत कॉलनीच्या हॉस्पीटलाच्या शेजारच्या बिल्डींगमध्येच माझ्या कंपनीचे ऑफीस आहे. मी नाईट शिफ्ट करत होतो. ऑफीसमधल्या काचेमधून त्यांच्या अंत्ययात्रेचा सोहळा पाहत होतो. त्याचवेळी खालील कवीता सुचली. डॉ. पवारांना श्रद्धांजली. )

जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम
जेव्हा जातो जीव, तेव्हा बोला रामनाम ||धृ||

जिवंत असता पुण्य कमवावे
पाप दुराचारा सोडूनी द्यावे
आठवेल जग केवळ तुमचे काम ||१||

काळ आला असता नसे जवळी कोणी
उचलोनी नेती सारे, सरे सारी घेणी
पुढे चालती सारे, मागे उरे सामसूम ||२||

जगामध्ये माणूस एकटाच येतो
माणसात जगूनी एकटाच जातो
कमवतो काय येथे? जातो सारे ठेवून ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०९/१०/२०१०

गौळण: अरे कान्हा तू मजला असा छेडू नको

गौळण: अरे कान्हा तू मजला असा छेडू नको


अरे कान्हा तू मजला असा छेडू नको
हात धरूनी वाट माझी तू अडवू नको ||धृ||

नेहमीची मी गवळणबाई, जाते आपल्या वाटंनं
डोक्यावरती ओझं आहे, लोणी आलंय दाटून
बाजारात मला जावूदे, वाट माझी अडवू नको
अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||१||

लांबून मी आले बाई, जायचे अजून कितीक लांब
चालून चालून थकून गेले, करू किती मी काम
इथे थांबले थोडा वेळ, दम माझा तोडू नको
अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||२||

सासू माझी कशी आहे तूला नाही ठावं
समोर मी रे गरीब गाय उभी बांधून दावं
छळेल मजला सासू माझी, लोणी तू मागू नको
अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||३||

इतर सार्‍या गवळणी गेल्या का रे माझ्या पुढे?
का मीच आली पुढे त्यांच्या, सांग तू आता गडे
घाई करूदे मला जायची, वेळ माझा दवडू नको
अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०९/१०/२०१०

खेळस्पर्धा प्रकार आणि सैन्याचा सहभाग

सध्या चालू असलेल्या राष्ट्रकुलस्पर्धांत भारत पदकांची लयलूट करत आहे. फारच समाधानाची बाब आहे. भारताने वैयक्तिक तसेच सांघिक खेळात अनेक पदके जिंकली आहेत.
नेमबाजी, बॉक्सिंग, कुस्ती, घोडेस्वारी आदी सांघिक तसेच वैयक्तिक खेळांना कुठल्याही देशाच्या सैन्यात महत्व असते. सैन्यात शक्यतो सांघिक खेळात महत्व असते. (क्रिकेट हा खेळ सैन्यात खेळला जात नाही.) सैन्यात वरचेवर बंदूकांनी नेमबाजीचा सराव केला जातो. या सरावाने चांगले नेमबाज तयार होवून शत्रूचे सैनीक मारणे हा हेतू असतो. किंबहूना नेमबाज असणे हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो. सध्याच्या स्पर्धा पाहून खालील प्रश्न उपस्थीत होतात:
१. नेमबाजी या स्पर्धांत सैन्यातले लोक आहेत काय?
२. आपले सैन्याची संख्या पाहता हे प्रमाण कितीसे आहे?
३. नेमबाजी या स्पर्धेत सैनीक जास्त प्रमाणात यायला हवे. त्यांचा सराव नेहमीचा असतो.
४. की सैन्यातील लालफित अशा कमी सहभागाला कारणीभुत असावी?
५. भारताशिवाय इतर देशांत काय परिस्थीती आहे?

तसेच नेमबाजी या स्पर्धांत १० मीटर, २५ मीटर, ५० मीटर, पुर्ण बोर, स्किट (सर्व वैयक्तिक व सांघीक) आदी प्रकार आहेत. हे अंतर फारच कमी आहे. मान्य आहे की अशा स्पर्धा जागतीक नियमांच्या आधारेच होतात तरीही आजकालचे पिस्तूल, रायफल यांच्या तुलनेने हे अंतर फारच कमी आहे. इतक्या कमी अंतरावरच्या स्पर्धांसाठी सैन्यातले लोक अगदी तयार असावेत हे माझे मत आहे.

सैन्याच्या लोकांचा सहभाग अन आताच्या इतर स्पर्धा व प्रकार (केवळ राष्ट्रकूलच नव्हे तर आशियन, ऑलंपीक, राष्ट्रीय आदी. व केवळ नेमबाजीच नव्हे तर बॉक्सींग, घोडेस्वारी, कबड्डी, व्हॉलीबॉल आदी.) यावर चर्चा होवू शकते. जाणकारांनी आपली मते द्यावीत.

नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता

नाट्यगीतः सोडा हातातल्या हाता नाथा आता

ह्या नाट्यगीतास श्री. निल्या यांनी दमदार आवाजात सुरेख चाल दिली आहे. त्याची ही लिंक आहे:
http://www.youtube.com/watch?v=Av-whAOa2wA&featureसोडा हातातल्या हाता नाथा आता
हातातल्या हाता

अहो सोडा हातातल्या हाता नाथा
हातातल्या हाता ||धृ||

मनाचीये गुंत्यामधे
होssओssहोssओ
मनाचीये गुंत्यामधे
नका अडकू आता नाथा
सोडा हातातल्या हाता ||१||

आलात जरी दुरवरूनी
आssआssआssआss
आलात तुम्ही मोहीम करूनी
का बळेची ओढता
नाथा आता
सोडा हातातल्या हाता ||२||

सासू सासरे दिर जावा
हंssअंssअंssअंss
सासू सासरे दिर जावा
बोल बोलतील असे एकांती पाहता
नाथा आता
नका....नका
सोडा हातातल्या हाता ||३||

काळ वेळ नाही बरी
लाssलाssलाssलाss
काळ वेळ नाही बरी
वेळ झाली, पुरे करा बाई आता
सांगते जाता जाता
सोडा हातातल्या हाता ||४||


विनवणी माझी तुम्ही ऐका
हंssअंssअंssअंss
विनवणी माझी तुम्ही ऐका
नका मज भेटू एकांती असता
सोडा आता नाथा
सोडा हातातल्या हाता ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०९/२०१०

Friday, May 20, 2011

मै तुझसे कुछ कहेना चाहता हूं

मै तुझसे कुछ कहेना चाहता हूं

मै तुझसे कुछ कहेना चाहता हूं
पर डर लगता है और चुप रहेता हूं ||धृ||

कितने दिन गुजरे कितनी गुजरी रातें
याद आते है वो मिठे पल वो मिठी बातें
कुछ अरसों से उम्मीद लिए बैठा हूं ||१||

क्या भुली हो तुम सागर की लहेरें
रेत मे बैठे थे हम डालके बाहोमें बाहे
अब अकेलेही मेरे पैर पानी मे भिगोता हूं ||२||

माना के दिल एक शिशा होता है
कभी ना कभी वह टुट ही जाता है
वही टुटे शिशे में तेरी तस्वीर लिए बैठा हूं ||३||

- पाषाणभेद
२१/०५/२०११

महागाईगीत: कसली भाजी करू मी आज

महागाईगीत: कसली भाजी करू मी आज

अहो काही सुचेना मला रोजरोज
कसली भाजी करू मी आज ||धृ||

दोडके गिलके भेंडी मटार
शेवगा भोपळा वाल गवार
सार्‍यांनीच मार्केटात संप केला आज
कसली भाजी करू मी आज ||१||

बटाटे आणले सगळेच संपले
फ्रिजमध्ये टोमॅटो काहीच न उरले
काय! चिकन करू म्हणता ताजं?
कसली भाजी करू मी पतिराज ||२||

८० रुपये किलो आहे तुरदाळ
असलीच महाग झाली मुगदाळ
महागाईने केला कसला हा माज
कसली भाजी करू मी आज ||३||

साखरेची तसलीच गत झाली
तेलातुपाविना रयाच गेली
खिर पुरी खाऊन झालेत फार दिवस
कसली भाजी करू मी आज ||४||

काय करू मी आज सैपाकाला
भाजी नाही आज डबा करायला
रोजचीच कटकट झाली आहे मज
कसली भाजी करू मी आज ||५||

गहू तांदूळाने केली फार दैना
एका पगारात कसा काढावा महिना
काहीतरी आणा घरी कामकाज
कसली भाजी करू मी आज ||६||

जे आहे ते सुखाने खाऊ
महागाईचा नका करू बाऊ
चैनीचा परवडणार नाही माज
कसली भाजी करू मी आज ||७||

अहो काही सुचेना मला रोजरोज
कसली भाजी करू मी आज ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०१/१०/२०१०
(3rd Page)

युगलगीतः मी सिता अन तुमी माझं राम

युगलगीतः मी सिता अन तुमी माझं राम

हिरो:
तुझ्या डोईचे केस हाय लांब लांब लांब
तुझ्या डोईचे केस हाय लांब
तू कोनाची प्वार हाय सांग सांग सांग
तू कोनाची प्वार हाय सांग ||१||

हिरोईन:
तू वांड पोरगा या गावचा, जा रे तू लांब लांब लांब
वांड पोरगा गावचा, जा रे तू लांब
माझ्या बापाच्या नावाशी काय तुझं काम काम काम
माझ्या बापाच्या नावाशी काय काम ||२||

हिरो:
तरणी ताठी पोर चालली, ठुमकत तू रस्त्यानं
पाहून जीव झाला खुळा, तुझ्या अशा चालन्यानं
वळख द्यावी घ्यावी, विचारपुस करावी
म्हनून पोरी सांग तूझं नाव नाव नाव
पोरी सांग ग तूझं नाव ||३||

हिरोईन:
नाव गाव इचारनारा तू एकलाच न्हाई
सार्‍या गावाला मी ओळखून हाई
इचारपुस करनारं कितीक आलं कितीक गेलं
तू जातूस इथून, का काढू पायाची व्हान व्हान व्हान?
काढू का पायाची व्हान? ||४||

हिरो:
आगं गावचा पाटील इथंला मी हाय
वाड्यावर ग माझ्या काय कमी न्हाय
उस धा एकरी, केला द्राक्षबाग मळा
तालूक्यात हाय मोठं माझं रान रान रान
हाय मोठं ग माझं रान ||५||

हिरोईन:
तुझा मोठा वाडा बँकेत गहान हाय
जळला उस तुझा अन द्राक्ष गोडच न्हाय
तुझी तोंडपाटीलकी लई बास झाली
तुझ्या रानात न्हाय एकाबी झाडाचं पान पान पान
रानात न्हाय एकाबी झाडाचं पान ||६||

हिरो:
तुझ्या बापाचा जावई मी ग होईन
मिरवत येवून तुला घेवून मी जाईन
प्रिती तुझी माझ्यावर, मला माहीत हाय
हो माझी रानी, ऐक देवून कान कान कान
रानी ऐक देवून कान ||७||

(इथे हिरो हिरोईनच्या कानाजवळ जातो अन कानात बोलून तो त्याच्या चेहर्‍याच्या नकली दाढी मिशा काढून टाकतो. नंतर पुढे.........)

हिरोईन:
आत्ता ग बया, तुमी हाय काहो
जवळ नका येवू आसं, कुनी बघल नाहो
लग्नामधी घ्या माझं नावं
मी जशी तुमची सिता अन तुमी माझं राम राम राम
मी सिता अन तुमी माझं राम ||८||

हिरो:
है है...तू सिता अन मी राम...
है है...तू सिता अन मी राम...
है है...तू सिता अन मी राम...
ढिंग च्याक......ढिंग च्याक.......ढिंग च्याक......ढिंग...

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०२/१०/२०१०

मनसे गीत

मनसे गीत


मनसेचे सैनीक आम्ही....हो हो हो
आम्ही मराठीसाठी लढणार
हिंदूस्थानी राहूनहीहो
आम्ही मराठीपण जपणार ||धृ||

कितीक नडले त्यांना भरडू
कितीक चिडले त्यांना चिरडू
आडवे आले त्यांना कापून काढू
आम्ही शरण कुणा न जाणार ||१||

महाराष्ट्र नवनिर्मीण्या पुढे सरसावू
समृद्धी अन विकास पाहू
महाराष्ट्र अन मराठी असे ध्येय आमुचे
आम्ही मराठी भाषा वैभवासी नेणार ||२||

विविध जाती, पंथ निराळे
धर्म वेगळा, वर्ग निराळे
मनसेच्या ध्वजाखाली एकत्र करणार
आम्ही महाराष्ट्र नवनिर्मीणार ||३||

असो कुणी हिंदू वा असो कुणी मुस्लीम
राहो कुणी बौद्ध वा राहो कुणी ख्रिश्चन
जात न मानू आम्ही धर्म न कोणता मानू
आम्ही सारे मराठीचे मुले होणार ||४||

समस्या असोत कितीही आम्ही सोडवू
मराठी आड कोण येई त्यांना फोडू
नवरचना करण्या, संघर्ष करण्या
आम्ही हाती हात धरून कामे करणार ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
मनसे सैनीक
२९/०९/२०१०

कव्वाली : आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो

कव्वाली : आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो

"भेटूया पुन्हा कधीतरी", का बोलूनी गेलो?
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||धृ||

अवखळ नजरेला नजर भेटे वरचेवरी
गाली हसतांना पडे त्यावर खळी
होतसे काय काळजात कुणाला ठावे
लक्कन हाले ते एवढेच मला जाणवे
नकळत तुझ्या पाशात का गेलो ओढलो
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||१||

तू बरोबर चालतांना मी चाले जसा स्वर्गात
स्मित नेहमी फेके माझ्याकडे तू हर्षात
कधीकधी हातामध्ये हात तू घेतला
त्याच हातातला रोमांच मला जणवला
तुझ्या प्रेमात मी का इतका वेडा झालो?
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||२||

आठवते का गेलो होतो सहलीला आपण
तुझ्याबरोबर मी होतो माझ्याबरोबर तू पण
इतर सारे जण बरोबर होते आपल्या
वाटा त्यांच्या अन आपल्या वेगळ्या झाल्या
आठव जरा तेथे कितीतरी आनंदलो
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||३||

कितीतरी स्वप्ने जोडीने पाहीली होती
अर्थ एकच होता त्यांची शंकाच नव्हती
तू अन मी राहू जोडीने, होती इच्छा दोघांची
काय घडले असे की वेळ आली वेगळे होण्याची
न भेटल्यासारखे आपण वेगळे का झालो
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||४||

नको आता आशा पुन्हा भेटण्याची
भिती वाटते जखमेची खपली निघण्याची
भळभळती जखम घेवूनी मी मिरवीतो आहे
दु:ख काव्यातूनी सारे वदतो आहे
शेवटी तुझ्या प्रेमाला पोरका झालो
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||५||

"भेटूया पुन्हा कधीतरी", का बोलूनी गेलो?
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०९/२०१०

शेतकरी गीतः हाती नांगर आडवा धरा

शेतकरी गीतः हाती नांगर आडवा धरा

हिरवीनः
धनी ऐका माझं बी जरा
हाती नांगर आडवा धरा
आपली जमीन हळूच उकरा ||धृ||


हिरो:
पाउस पानी काही नाही
पेरणीचीबी तयारी नाही
हातावर हात ठेवून निसती उभी
कशाला कामाचा करते पुकारा? ||१||

हिरवीनः
आत्ता ग बया!
हाती नांगर आडवा धरा
आपली जमीन हळूच उकरा


हिरो:
तण सारं माजलय लई
त्याला काढाया करावी घाई
नट्टापट्टा करूनी उभी
उगाच करते तू नखरा ||२||

हिरवीनः
आत्ता ग बया!
हाती नांगर आडवा धरा
आपली जमीन हळूच उकरा


हिरो:
घाई कर धर वर उचल काठी मोठी
तोंड घालतया जनावर मार त्याच्या पाठी
हातातलं काम बाजूला सारून जरा
लवकर इकडे ये तू भरभरा ||३||

हिरवीनः
आत्ता ग बया!
हाती नांगर आडवा धरा
आपली जमीन हळूच उकरा


हिरो:
बी बियाण्याची पेरणी आली
खोडव्या उसाची तयारी झाली
हातात धर पांभर बी पेराया
ठिबक हे चालू करतो जरा ||४||

हिरवीनः
आत्ता ग बया!
हाती नांगर आडवा धरा
आपली जमीन हळूच उकरा


हिरो:
हाती नांगर आडवा धरला
कामामधी येळ सारा सरला
आता जावू आपन घरला
जरा इचार करू म्होरला ||५||

इश्श....
ढिंच्याग ढिंच्याग ढिंच्याग ढिंग...

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०९/२०१०

शेत माझं सारं वाहून गेलं

शेत माझं सारं वाहून गेलं


औंदाच्याला पानी आसं पडलं पडलं
शेत माझं सारं वाहून गेलं ||धृ||

पानी घेवूनीया आलं
माझ्या डोळा पानी
साचून राहीलं सारं रानी
वाहून गेलं डोळ्यातूनी
हातातलं पीक सारं
त्यात बुडून गेलं ||१||


कशी फुलल आता शेती?
कशी पिकलं आता माती?
नाही चूल आता पेटणार
भुक पोटाची कशी मारणार?
रातंदिस बसतो
पोटाला फडकं बांधून ||२||

कशासाठी देवा तू रे
पाउस इतका पाडतो?
नशीबाने दिले पिक
तु आता का बुडवीतो?
वेळेवर न येवून
अवेळी आभाळं फाटलं ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२७/०९/२०१०

Saturday, May 7, 2011

दोन मित्र

दोन मित्र

छोटा जॉन बारीक अन हाडकूळा होता;
त्याचा मित्र मात्र टोनी जाडजूड होता ||१||

एकदा ते दोघे जंगलात गेले;
शाळेच्या पिशवीत रिकामे डबे नेले ! ||२||

खुप भुक लागली दुपारी टोनीला;
जॉन म्हणाला मी शोधतो काहीतरी खायला ||३||

जॉन एका आंब्याच्या झाडावर चढला;
कैर्‍या तोडत असतांना रखवालदार आला ||४||

जॉनने मारली खाली उडी अन पळून गेला;
रखवालदारच्या ताब्यात मात्र बिचारा टोनी आला ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०५/२०११
सकाळी ५:२७

Two Friends

Two Friends

Little John was thin and boney;
His fat friend had a name Tony ||1||

Once both were gone in the woods;
They had school bags without any food ||2||

Tony feels hungry in the after noon;
John said I'll get the food very soon ||3||

John climbs on a Mango tree as he saw;
a watchman came while plucking up mangoes raw ||4||

John jumped down and ran away fast;
Watchman caught poor Tony at the last ||5||

- Pashanbhed (Sachin)
07/05/2011