Monday, May 23, 2011

गौळण: अरे कान्हा तू मजला असा छेडू नको

गौळण: अरे कान्हा तू मजला असा छेडू नको


अरे कान्हा तू मजला असा छेडू नको
हात धरूनी वाट माझी तू अडवू नको ||धृ||

नेहमीची मी गवळणबाई, जाते आपल्या वाटंनं
डोक्यावरती ओझं आहे, लोणी आलंय दाटून
बाजारात मला जावूदे, वाट माझी अडवू नको
अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||१||

लांबून मी आले बाई, जायचे अजून कितीक लांब
चालून चालून थकून गेले, करू किती मी काम
इथे थांबले थोडा वेळ, दम माझा तोडू नको
अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||२||

सासू माझी कशी आहे तूला नाही ठावं
समोर मी रे गरीब गाय उभी बांधून दावं
छळेल मजला सासू माझी, लोणी तू मागू नको
अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||३||

इतर सार्‍या गवळणी गेल्या का रे माझ्या पुढे?
का मीच आली पुढे त्यांच्या, सांग तू आता गडे
घाई करूदे मला जायची, वेळ माझा दवडू नको
अरे कान्हा तू मजला असा छेडू नको ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०९/१०/२०१०

No comments: