Monday, May 23, 2011

कशी दिसते दिसते लाडाची लाडी तुमची

कशी दिसते दिसते लाडाची लाडी तुमची

मी नेसली नेसली, साडी अंजीरी ग रंगाची
कशी दिसते दिसते, लाडाची लाडी तुमची ||धृ||

गजरा माळला माळला, शेवंती फुलांचा
डोई घेतला घेतला, पदर लाल बुट्टीचा
भांगी भरलं भरलं, कुंकू सवाष्णीचं
आहे मौलीक मौलीक, माझं कपाळीचं लेणं
नको नजर लागो या वैभवाला कुणाची
कशी दिसते सांगा लाडाची लाडी तुमची ||१||

गळा घातला घातला, चंद्रहार सोन्याचा
मंगळसुत्र मिरवीते मिरवीते, ऐवज धन्याचा
कानात घातले घातले, कर्णफुले झोकाची
नाकात घातली घातली, नथ आकडी मोत्याची
डोरले गाठले ल्याले माझ्या आवडीची
कशी दिसते सांगा लाडाची लाडी तुमची ||२||

गोर्‍या दंडी शोभते शोभते, वाक घट्टसर
माझ्या आवडीचा आवडीचा, गोफ जाडसर
हातात आहेत आहेत, पाटल्या दहा तोळी
नवीनच घडवली घडवली, वजनी पाटली
नक्षी केली त्यावर बारीक नजरेची ||३||
कशी दिसते सांगा लाडाची लाडी तुमची

बोटात घातली घातली, अंगठी नक्षीदार
कमरपट्टा बांधला बांधला, आवळून झुबकेदार
पायी वाजती वाजती, छुमछुम पैंजण
जोडवी घातली घातली, वेढेदार दोन
आहे जोडीला जोडीला विरोदी चांदीची
कशी दिसते सांगा लाडाची लाडी तुमची ||४||

मोठा दागीना दागीना, आहेत तुम्ही माझे पती
लाभो आयुष्य आयुष्य, करते प्रार्थना दिनराती
हाती शोभतो शोभतो, हात तुमचा माझ्याच हाती
कशी दिसते सांगा लाडाची लाडी तुमची ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/१०/२०१०

No comments: