Showing posts with label साहित्यिक. Show all posts
Showing posts with label साहित्यिक. Show all posts

Tuesday, August 04, 2026

तुमचा मोबाईल फोन कोणता आहे?

मगृर, ॲरोगंट, इगो असलेले, खुनशी, स्वमग्न लोकं आयफोन घेतात.

मनमोकळे, मनमिळावू, कुटुंबवत्सल असलेले ॲंन्ड्रॉईड फोन घेतात.

तुमचा मोबाईल फोन कोणता आहे?

Sunday, February 20, 2022

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय


पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय


सर्व सदस्यांना कळविण्यात आनंद होतो आहे की, "ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय" हे पुस्तक छापून आले आहे. व्यस्ततेमुळे ( व पुस्तक कोण वाचतो हल्ली??) प्रकाशन सोहोळा केला नाही.

ध्वनी प्रदूषण या घातक प्रदूषणाचे उगम काय? आरोग्याच्या नेमक्या कोणत्या समस्या याने निर्माण होतात? त्यावर उपाययोजना काय असाव्यात? यावरचे विवेचन या पुस्तकात केले आहे.

वातावरणातील जल, वायू इत्यादी प्रदूषणाबाबत अनेकदा बोलले जाते, परंतु आपण ध्वनी प्रदूषण, आवाज याला फार हलक्यात घेत असतो. ध्वनी निर्माण करण्यास फारसे श्रम लागत नाहीत. मोबाइलवरील स्पिकरवर गाण्याचा आवाज वाढवला आणि दुसर्‍याने त्यावर आक्षेप घेतला तर आवाज वाढवणार्‍याला त्याचे काहीच वाटत नाही. आवाजाबद्दल बेफिकीरीची प्रवृत्ती समाजात वाढत आहे. आवाज हे माध्यम हवेसारखे दिसत नसल्याने त्याची घनता, तीव्रता लगेचच जाणवत नाही. आपले कानही आपण बंद करू शकत नाही. काही आवाज आपली इच्छा नसली तरी बळजबरी आपल्याला ऐकावेच लागतात. त्या आवाजाने आपल्या कानांवर, शरीरावर व मनावर परिणाम केल्यानंतरच त्या आवाजाबद्दल चांगले किंवा वाईट मत आपण बनवतो. कित्येक व्यक्तींना आवाजाचेही (ध्वनी) प्रदूषण असते हेच माहीत नसते. हे दुर्दैवी आहे.

अवाजवी आवाजाचा ध्वनी जेव्हा हानिकारक पातळीवर पोहोचतो तेव्हा सजीवांवर न दिसणारे नुकसान त्याने केलेले असते. ध्वनी प्रदूषणाने मानव प्राणी तसेच इतर सजीवांत अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात.

आवाजाचा त्रास आपणापैकी अनेकांना होत असेल यात शंका नाही. या अनुभवाला आपल्यासमोर मांडतांना आपणही समाजात या अवाजवी आवाजाबद्दल इतरांना सांगावे व त्याच्या परिणामाबाब लिहावे असे वाटल्याने त्या लेखनाचे रुपांतर पुस्तकात झाले आहे. यातील काही मुद्दे मिसळपाव.कॉम व मायबोली.कॉम या मराठी संकेतस्थळावर लिहीले. तेथे अनेकांनी आवाजाबाबत आपली मते व्यक्त केली. मग आवाजाचा त्रास होणे हा सार्वत्रीक अनुभव आहे फक्त त्याला जाहीर वाचा कोणी फोडायला धजावत नाही हे लक्षात आले. म्हणूनच सदर पुस्तकात कायद्याने ध्वनी प्रदूषण कमी करायला काय मदत होवू शकते याचा उहापोह केला आहे. त्याचप्रमाणे या प्रदूषणामुळे सजीव तसेच प्राणी, पक्षी, जलचर यांवर काय परिणाम होतो व त्यावर उपाययोजना काय असावी याबद्दल लिहीले आहे. वाहनांच्या आवाजावर तसेच आपल्याला शांत झोप लागावी यासाठीही स्वतंत्र्य प्रकरणे लिहीली आहेत त्याचा तुम्हाला लाभ होईल अशी आशा आहे. 

या आधीच्या 'वगनाट्य: वैरी भेदला' पुस्तकात सर्व काम - अगदी टायपींगपासून ते कव्हर डिजाईन, पेज लेआऊट, इंडेक्सींग इत्यादी स्वत:च  करतांना जो त्रास झाला तो अनुभव असल्याने या पुस्तकाच्या निर्मीतीत तो त्रास झाला नाही.     

ध्वनी प्रदूषणाबद्दल इतरांचे प्रबोधन करणे आपले कर्तव्य आहे. लहान मुलांमध्ये याबाबत जागरूकता लहान वयातच आणली असता ते मोठे झाल्यानंतर सभ्य नागरीक बनू शकतील. ध्वनी प्रदूषणाबद्दल आपल्याला जागरूक करणे या हेतूने हे पुस्तक लिहीले आहे. हे लिखाण मुक्त स्रोत परवान्यासारखे (Open Source) लिहीले आहे असे समजून आपण त्यात भर टाकाल व हे लिखाण जास्तीत जास्त व्यक्ती, संस्थांपर्यंत पोहोचण्याकामी आपण सहकार्य कराल ही मला आशा आहे. येत्या काळात आवाजाचा भस्मासूर आपल्या कानांना गिळंकृत करण्याच्या आधी आपण सजग राहून त्याचा नायनाट करूया. 

वाहनांमुळे होणार्‍या ध्वनी प्रदूषणावर स्वतंत्र प्रकरण लिहिले असल्याने वाचकांना ते सुद्धा मार्गदर्शक ठरावे.
एकूणच ध्वनी प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करणारे हे पुस्तक वाचकांना पर्यावरणाबाबतच्या एका दुर्लक्षिलेल्या समस्येविषयी ओळख करून देते हे नक्की.

येथील सर्व सदस्यांचे आभार.

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय
ISBN: 978-93-5578-807-8
लेखक: सचिन सुधाकर बोरसे (पाषाणभेद)
प्रकाशन: अमीगो बूक पब्लिशर, नाशिक.
किंमत: रू. ११५/-
वितरण: ऑनलाईन - अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट व इतर

Monday, May 24, 2010

पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे

पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे
लेखक: प्रा: डॉ. प्रल्हाद नरहर देशपांडे, विद्यावर्धीनी महाविद्यालय, धुळे.
प्रकाशक: सुषमा प्रकाशन, धुळे.
मुद्रक: स्वस्तीक मुद्रणालय, पुणे.
प्रकाशित: १९८३
मुल्य: रू. ६५/-

छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे म्हणजे त्यांनी लिहीलेली पत्रे नव्हेत. त्या काळी शिवाजी महाराजांच्या वतीने त्यांच्या कारकुनांनी, अधिकार्‍यांनी लिहीलेली पत्रे जी त्यांच्या त्यांच्या कचेरीतून पाठवली जात ती.
या पुस्तकात विविध २०० च्या वर पत्रे संपादित केलेली आहेत. लेखकाने विविध संदर्भ घेवून हि पत्रे शोधली आहेत. त्यात इतिहासाचार्य राजवाडे यांचा उल्लेख आहे.
दिर्घ प्रस्तावनेत लेखकाने त्या पत्रांचा समावेश का केला, पत्रे लिहीण्याची पध्दती, मुसलमान कालगणना, फारसी शब्द, अधिकार्‍यांचा हुद्दा, शक गणना, महाराजांची दुरदृष्टी, मुद्रा, शिक्का, मोर्तब आदींचा उहापोह केलेला आहे. बरीचशी मुळ पत्र ही मोडी भाषेत होती. लेखकाने ती मराठी लिपीत लिहीली आहे. परंतू भाषा तत्कालीन आहे.

बरीचशी पत्रे ही वतनदारांच्या वतनदारीतील झगडा मिटवण्यासाठी, समझोता करण्यासाठी, जरब बसवण्यासाठी, शिक्षा फर्मावण्यासाठी, लढाईत मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटूंबाच्या सांत्वनेसाठी, देव देवळे तसेच मशीदी/ दर्गे (होय मशीदी/ दर्गे सुद्धा!) यांचे अनुष्ठान चालू राखण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहारांपैकी आहेत. त्यात राजाराम, समर्थ रामदास, मिर्झा राजे, औंरंगजेब, बाजीप्रभू देशपांडे आदिंसाठी लिहीलेली देखील पत्रे आहेत. त्यात चिंचवडच्या देवस्थानाचे भट, पर्वती देवस्थानाचे भट, पिंपरी येथील पत्रव्यवहार आदी उल्लेख आहेत. याच पत्रात दादोजी कोंडदेव यांच्याकडून शिवाजी महाराजांना शिक्षण द्यावे हा उल्लेख पुराव्यानीशी सापडतो हे महत्वाचे.

एका पत्रात शिवाजी महाराजांनी शत्रू चालून आल्यावर काय करायचे, रयतेस घाटाखाली कसे आधीच हलवायचे, गनिमाने चढाई केल्यास कसे पळायचे या सुचना आहेत, तर एक किल्ला बांधतांना पावसाळ्यात हाल होवू नये म्हणून घरांची कशी काळजी घ्यावी ते लिहीलेले आहे. दोन एक पत्रव्यवहार इंग्रजांशी केलेले देखील सापडतात.

शिवाजीराजेंचे विचार धर्मातीत होते तरीही आपले स्व: ताचे स्वराज्य उभे रहावे या मागची त्यांची तळमळ, सहिष्णू वृत्ती पत्रांमधून पुराव्यानिशी दिसून येते.

एक ऐतिहासीक ठेवा म्हणून पुस्तकाचे मुल्य अमुल्य आहे.

देवपुरूष शिवाजी राजांना वंदन!
जय शिवराय!

Wednesday, March 17, 2010

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?)

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?)

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47335:2010-02-12-06-02-16&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47334:2010-02-12-05-53-22&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117

(या असल्या धोरणाबाबतच्या बातम्या आम्हाला वर्तनामपत्रातूनच का वाचायला भेटतात? शासनाला सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्याची गरज वाटत नाही काय? असो.)

प्रा. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी एक समिती विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यावेळचे सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आली होती.

समितीच्या शिफारशींची सविस्तर माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मिळू शकेल. प्रस्तुतचे लेख व प्रत्यक्ष शिफारशी वाचून वाचकांनी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत प्रतिक्रिया नोंदवणे अपेक्षित आहे. त्यानंतरच या समितीच्या शिफारशींवर साधकबाधक चर्चा होऊन त्याचे प्रत्यक्ष धोरणात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू होईल. महाराष्ट्र शासनाचा या प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न असून तज्ज्ञांची मते आणि लोकांच्या सूचना यांतून समितीच्या शिफारशींची योग्यायोग्यता, आवश्यकता, उपयुक्तता पडताळून पाहिली जाणे गरजेचे आहे!

www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सदर माहिती जरी उपलब्ध असली तरी त्यावरील प्रतिक्रिया कोठे द्याव्यात यात कोठेही उल्लेख नाही. 'संपर्क करा' हा इमेल आयडी पण सापडत नाही. अशा वेळी कोणी या धोरणावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी कोठे संपर्क कराव? नाही म्हणायला एक अर्ज आहे. पण तेथे कशा प्रकारे प्रतिक्रिया चढवावी अन त्याची पोचपावती मिळेल याची खात्री काय?

थोडक्यात शासकिय संकेतस्थळाने आपली दिवाळखोरी परत एकदा जाहिर केलेली आहे.

असो. तत्राप आपल्यामध्ये कोणास या प्रतिक्रिया देण्याच्या (पक्षी लश्कराच्या भाकर्‍या भाजणे हा शब्दप्रयोग योग्य होईल काय?) मोह झाल्यास आपण जरूर करावा अन राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरविण्यासाठी सहभागी व्हावे.

लेखन व लेखकाचे बाह्यरुप

लेखन व लेखकाचे बाह्यरुप

हा धागा केवळ मौजमजेखातर आहे. तत्राप यात काही वैज्ञानीक तथ्य असेल तर आपण सांगू शकतात.

असे म्हणतात की आपण जे लिहीतो तसे आपले मन असते. आपल्या मनातले आहे ते कागदावर उमटते. थोडक्यात आपले लिखाण आपला स्वभाव, वागणूक दाखवते. या लेखनात कार्यालयात केले जाणारे लेखन, अनौपचारीक पत्रे येत नाहीत. जे ललीत आहे, जे लेखकाला आनंद देते व जे खरे आहे ते लेखन येथे अभिप्रेत आहे.
थोडक्यात केले जाणारे लेखन लेखकाच्या मनाचा आरसा असते. अशाच प्रकारच्या मनाच्या आरशातून त्या लेखकाचे बाह्यरुप देखील आजमावता येईल का? बाह्यरुप म्हणजे तो लेखक/ लेखिका कसा / कशी आहे? त्याला कोणत्या आवडीनिवडी आहेत? पुरूष लेखक असेल तर त्याला मिशा ठेवण्याची आवड आहे का? त्याला कोणते कपडे आवडत असतील? लांब बाह्यांचे सदरे की अर्धी बाही? त्याला कसले व्यसन आहे? नाही? डोळ्यांचा रंग / केसांची ठेवण कशी आहे? असे काही जाणता येते का?
लक्षात घ्या की येथे स्वभाव कसा आहे याची पडताळणी घ्यायची नाही. केवळ बाह्यरूप कसे असेल याचा धांडोळा घ्यायचा आहे. येथे असणार्‍या लेखकांच्या मनात काही प्रतीमा तयार झाल्यात. आपल्याही मनात असल्या काही प्रतीमा तयार झाल्या आहेत काय?

येथे कोणतेही भविष्य वर्तवण्याचा हेतू नाही. किंवा 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' वर्तवण्याचा हेतू नाही. कारण भविष्य व 'सहीवरून स्वभाव, अक्षरावरून स्वभाव' असे काही असते यावर माझा विश्वास नाही.

माझे वरील लिखाण थोडे विस्कळीत वाटेल पण जे जाणकार आहेत त्यापर्यंत माझ्या मनाच्या भावना पोचल्या असतील. कोणी माझ्या मतांची त्यांच्याबद्दल खाजगीरीत्या मागणी केली तर मी माझे मत त्या पर्यंत पोचवू शकतो.

अवांतर : (आज हा लेख लिहून मिपावरच्या माझ्या लेखांची शंभरी भरली आहे. शंभरी गाठल्याबद्दल मी माझेच अभिनंदन करतो व तुम्ही मला सहन केले त्याबद्दल तुम्हाला आधीच धन्यवाद देतो. माझ्या लेखनाने तुम्हाला थोडाजरी आनंद मिळाला असेल तर मी धन्य आहे. )

मराठीचा मुद्दा व साहित्यिकांची भुमीका

मराठीचा मुद्दा व साहित्यिकांची भुमीका
(लेखाचा हेतू केवळ मराठी अस्मितेचाच आहे. परप्रांतीय, नोकर्‍या, राजकारण असली गल्लत न करता वाचावा)

मराठी अस्मितेच्या मुद्याला आत्ता राज ठाकरेंनी हातात घेतल्याने उभारी आली आहे. त्या आधी शिवसेनेने हे काम केले होते. नंतरच्या काळात शिवसेना आपल्या मुळ मुद्यांपासून भरकटली. त्यानंतर कोणीही मराठीचा मुद्दा हातात घेतलेला नव्हता. राजकारणी लोक केवळ वारा आला तशी पाठ फिरवणारे व सत्तेत येण्याची वाट पाहणारे असतात ही आताशा काळ्या दगडावरची रेख झालीय. त्यात मराठी अस्मितेचा अगदीच नेभळट होता. विदर्भात मराठीच बोलली जाते. असे असतांनादेखील ते वेगळे राज्य व्हावे हा राजकारणाचा मुद्दा राजकारण्यांनी आपल्या सोईसाठी केला. ( वेड्यांनो, वेगळा विदर्भ झाला तर तुम्ही जो भ्रष्टाचार कराल तो पण कमी किंमतीचा राहील, कारण विदर्भ हे महाराष्ट्रापेक्षा छोटे राज्य होईल व त्याला उत्पन्न कमी असेल, केंद्रातून कमी आर्थीक मदत येईल हे तुम्हाला कसे समजत नाही. त्या राज्याचा मुख्यमंत्री तर एकच होईल ना? बाकी आमदार खासदार होणे म्हणजे महाराष्ट्राचे आमदार खासदार होण्यासारखेच आहे.) वेगळा विदर्भ मागणे म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठी जे लढले त्यांच्या स्वप्नाचा अपमानच आहे. (अर्थात मान अपमान ही नैतीक बाब सामान्य जनांसाठी (वेगळ्या अर्थाने OBC)राखीव आहे.) असो.

तर मुद्दा असा की, मराठी अस्मितेच्या मुद्याला धरून वेळोवेळी होणार्‍या वेगवेगळ्या प्रश्नांबाबतीत मराठी साहित्यिक नेहमी मलूल, बोटचेपी भुमीका का घेतात? किंबहूना काहीतरी (आर या पार) एकाच मुद्द्याची भुमीका का घेत नाही? महाराष्ट्रातच मराठी बोलणारे जास्त आढळतात. (हे काही नविन संशोधन नाही.) पर्यायाने मराठी वाचक महाराष्ट्रातच सापडतात. म्हणजेच मराठी साहित्य महाराष्ट्रातच जास्त तयार होते (व खपते). महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांतली जनता मराठी साहित्य जे काही वाचत असेल त्यांना त्यांची आवड, अभ्यास म्हणून मराठी साहित्य वापरत लागत असेल. असे असतांना मराठीतुन लिहीणारे साहित्यिक राजकारणाचा आखाडा सोडल्यास एखाद्या वेगळ्या व्यासपिठावरून (आपले मिसळपाव.कॉम व इतर माध्यमांतले काही अपवाद सोडून. मिपाचा जन्मच केवळा मराठी अभिव्यक्तीसाठी झाला आहे. वेगळे व्यासपिठ म्हणजे केवळ संकेतस्थळे नव्हेत, तर विचार व्यक्त करण्याचे माध्यम; जसे- वर्तमानपत्रे, संसदिय प्रणाली, दुरदर्शन आदी. ) मराठी साहित्य संमेलने देखील आपली भुमीका व्यवस्थीत मांडत नाही. आपल्या मराठीचा मुद्दा का मांडत नाही? की हे साहित्यिक कोणी बडा लेखक, कवी काय मुद्दा मांडतो आहे त्याची वाट पाहत आहे? की ते मराठी अस्मितेच्या मुद्याला केवळ राजकीयच मुद्दा आहे असे समजतात? की त्यांना मिळणारे केंद्रीय पुरस्कार, आर्थीक अनुदान यांची लालूच मधे येते? की राजकारण्यांचा त्यांवर वरदहस्त आहे? की 'आम्ही आपले वेगळे' आहोत असे त्यांना दाखवायचे आहे?

असे म्हणतात की साहित्यिक हे खरे बुद्धीवादी असतात. समाजाला ते वैचारीक विचारांची चालना देतात. बहुतेक प्राध्यापक, शिक्षक हे साहित्यिक असतात. भले ते फिजीक्स, केमीस्ट्री, बायोलॉजी या इंग्रजी विषयात शिकवत असले तरी त्यांनी एखादा ग्रंथ, कादंबरी , कवीता लिहीली तरी ते लेखकच असतात व पर्यायाने साहित्यिकच असतात. मराठी अस्मितेच्या मुद्याला धरून एकाही शिक्षक प्राध्यापकांनी मराठीसाठी आपली भुमिका उघड केली नाही, जाहिर केली नाही. (असे असेल का की, बहूतेक कॉलेजेस, शाळा या राजकारण्यांच्या हातात असतात व आपण नोकरी करतो त्या संस्थेच्या राजकारण्यांना कसे दुखवायचे असा विचार त्यांच्या मनात येत असेल? )

असे असतांना सर्व मराठी साहित्यिकांनी मराठी अस्मितेच्या मुद्याला उचलूनच धरले पाहिजे.

Friday, March 20, 2009

पॅपिलॉन - काही अनुत्तरीत प्रश्न

पॅपिलॉन - हे हेनरी शॅरीयर (Henri Charrière नोव्हें. १६, १९०६ ते जुलै २९, १९७३) याचे टोपण नाव.
पॅपिलॉन हे त्याने लिहीलेली आत्मकथा आहे. तो फ्रान्स मध्ये गुन्हेगारांचा 'डॉन' होता. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला न केलेल्या खुनाबद्द्ल जन्मठेपेची शिक्षेसाठी त्याला फ्रेंन्च न्यू गियाना ला हलवीण्यात आले. त्याला आपल्या प्रेमळ बायको आणि वडीलांना सोडावे लागले.
तो भक्कम शरीर असलेला आणि प्रबळ ईचछाशक्ती असणारा होता. ऊगियाना ला त्याने सुटकेसाठी पळुन जाण्याचा प्रयत्न केले. काही दिवसांनी तो पकडला गेला. या सुटकेसाठी तो अनेक मैल समुद्र प्रवास केला. अनेक हाल सोसले.त्यास एके वेळी रेड-ईंन्डीयन टोळी ने आपलेसे केले होते. दोन रेड-ईंन्डीयन भगीनी त्यास नवरा मानू लागल्या. त्या त्यापासून गर्भवती झाल्या. तो काही आता कैदी नव्हता. तो तेथे आरामात राहीला असता. पण केवळ सुड घेण्यासाठी तो ती प्रेमळ टोळी सोडतो.
पुन्हा तो पोलीसांना सापडतो. असे त्याने एकूण ९ प्रयत्न केले. अखेर तो आपली सुटका करतो आणि तो व्हेनेझुएला येथे स्थिर होतो. त्याच्या दुसर्‍या आत्मकथेत तो असे सांगतो की (बनकॉ -Banco)- तो तेथे अनेक व्यवसाय करतो. पण शेवटी भूकंपात ते सर्व जाते.
जुलै २९, १९७३ मध्ये तो घश्याच्या कर्करोगाने तो मरतो. त्यास फ्रान्स मध्ये दफन केले जाते।
----------------------------------------------------------------------------------------
वरील लेखन हे काही माझे पुस्तक परीक्षण नाही. ते मला पडलेल्या प्रश्नांची पार्‍श्वभूमी आहे.
१) सर्वात प्रथम तो सुटतो तेव्हा त्यास दोन रेड-ईंन्डीयन भगीनी बायको म्हणुन मिळतात. त्यास अगदी निस्वाथ्री प्रेम मिळ्ते. तो अगदी स्वतंत्र झालेला असतो. तो सुध्दा त्यात मानसीक रित्या गुंततो. असे असतांना तो ते सगळे का सोडतो? केवळ सुड घेण्यासाठी ? आणि बाहेर पकडले जाण्याचे चान्स खूप असतांना ? (हे त्यालाही समजते.)
२) पुढे त्रिनीनाद मधे सुध्धा तो स्थिर होतो. एका भारतीय मुलीच्या तो खुप जवळ जातो. तीच्या बापाची पण त्यांनी लग्न करावे ही ईच्छा असते. तो तेथे सुध्दा स्थिरस्थावर होवु शकला असता. पण तो तेथे टिकत नाही.
३) तो त्याच्या बापाला / प्रिय बायको ला काहीच निरोप/ पत्र का लिहीत नाही ?
४) तो फ्रान्स ला सेट्ल होण्यासाठी का प्रयत्न का करत नाही?
५) एवढे करुन त्यास व्हेनेझुएला काही मानवलेले नाही.
६) त्यास त्याच्या आत्मकथेबद्द्ल आणि निघालेल्या चित्रपटाबद्द्ल (Papillon (1973) Directed by - Franklin J. Schaffner) खुप पैसा मिळाला. पण तो पैसा काही त्याचा उद्देश नव्हता.
७) तो ज्या कारणासाठी वारंवार पळुन जायचा, (वकील, न्यायाधीश, पोलिस यांचा सुड घेण्यासाठी ) ते त्याने खरे केले का?
८) तो ज्या हालाखीतून गेला त्यास तोड नाही. पण नंतरचे शांत जिवन तो आधीच (रेड-ईंन्डीयन टोळीत)जगू शकला असता असे मला वाटते.
९) तो नंतर कधीतरी रेड-ईंन्डीयन टोळीस , त्याच्या प्रेमळ बायका /त्याना त्यापासून झालेली मूले , त्याचा फ्रान्स मधील बाप आणि प्रेमळ बायको आणि (त्याचीमूलगी ??) यांना कधीतरी भेटतो का?
१०) तो खूप भाऊक असतो. तो ईतरांच्या भावनांचा आदर करीत असे. असे असतांना त्याने त्याच्यावर प्रेम करणार्‍या बाप, प्रेमळ बायको, प्रेमळ रेड-ईंन्डीयन बायका, त्यांची मूले, मित्र, (किंवा at worst भारतीय मुलगी) यांवर अन्याय करत नाही का? हे सर्व आपणावर प्रेम करतात हे माहीत असूनसुध्धा?
जाणकार यावर प्रकाश टाकतील तर त्यांना आधीच धन्यवाद!