Wednesday, September 28, 2011

एक दिवस पंक्चरलेला

एक दिवस पंक्चरलेला
गेलेल्या रविवारच्या दिवसाची ही सत्यकथा आहे. रविवार म्हणजे सुट्टी वैगेरे काही नाही. कारण मला साप्ताहीक सुटी शनिवारची असते. सध्या रात्रपाळी असल्याने रविवारी रात्री कामाला ११ वाजता जायचे होते. कालची सुटी असल्याने आदल्या रात्री झोप झालेली होती. त्यामुळे रविवारच्या सकाळी लवकर उठलो. रुग्णालयात भरती झालेले एक जवळच्या नातेवाईकांना दुपारी रजा देणार असल्याने त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी जायचे होते.

कालपासून मुलगा 'सायकलमध्ये हवा भरून आणा' 'सायकलमध्ये हवा भरून आणा' अशी भुणभुण करत होता. सुटीच्या दिवशी कॉलनीत सायकल फिरवीणे हा त्याच्या मित्रमंडळींचा आवडता उद्योग असतो. मनात म्हटले त्याचे काम पहिल्यांदा करावे. त्याची छोटी सायकल घेतली व गॅरेजमध्ये आलो. मुलाला गॅरेजच्या कामाची माहीती व्हावी ह्या उद्देशाने त्यालाही बरोबर घेतले. गॅरेजमध्ये जातांना त्याला विचारले की 'सायकल पंक्चर कशी झाली?' त्याने 'पंक्चर होते म्हणजे नक्की काय होते?' असा प्रतिप्रश्न केला. त्याचे शंकासमाधान केले. आपली त्वचा काही खरचटल्याने कशी फाटते तसे सायकची ट्युबपण त्वचा समज अन तिला एखादा खिळा टोचल्याने हवा गेली की पंक्चर होते असे समजावले. त्याला मुळप्रश्न पुन्हा विचारला - 'सायकल पंक्चर कशी झाली?' माझ्या प्रश्नाचा उद्देश त्याच्या सायकलची हवा कोणी मुद्दाम काढली की खरोखर चाक पंक्चर झाले हे माहीत करण्याचा होता. मग त्याने सांगीतले की 'त्या मागच्या चाकाची हवा गेली'. आता त्यात त्याने नवीन काय सांगीतले? असो. शंकासमाधान करत असतांना गॅरेज आले. आता चाकात नुसती हवा भरता आली असती. पण मी अंदाज केला की हवा नुसती गेली असती तर थोडीफार हवा चाकात राहीली असती. पण त्यावेळी चाकाची स्थिती तशी नव्हती. चाक पुर्णपणे सपाट झालेले होते. गॅरेजमध्ये परत न यावे लागावे म्हणून मी बाळासाहेबांना (गॅरेजमालक) चाकाचे सरळ पंक्चरच काढण्यास सांगीतले. त्यांनी लगेच पंक्चर काढून दिले. मग आमचे बाळासाहेब सायकल चालवत अन मी त्याच्या मागे थोडाफार दिडकी चाल करत घरी आलो.

घरी नाष्टापाणी आटोपल्यावर बर्‍याच दिवसांपासून जमा झालेली रद्दी आवरली. सध्या आमच्याकडे तिन तिन वृत्तपत्रे येतात. मी तर जास्त वाचत नाही पण दोन वृत्तपत्रांच्या स्किम्स चालू असल्याने ते लावले गेलेले आहेत! थोडेफार इकडेतिकडे केले अन माझी नजर मुलाच्या सायकलकडे गेली. त्याच्या सायकलीचे मागचेच चाक पुन्हा बसलेले दिसले. त्याची भुणभुण व सायकल फिरवण्याची गैरसोय नको म्हणून सायकल पुन्हा गॅरेजमध्ये नेली. तेच चाक पुन्हा पंक्चर झालेले असल्याने सकाळी काढलेल्या पंक्चरविषयीची शंका बाळासाहेबांना बोलून दाखवली. त्यांनी सांगीतले की 'साहेब वॉलशीटवर पंक्चर असेल. एकदम शुअर. कारण वॉलशीटवर आधीच पंक्चर काढलेले मी पाहिलेले आहे.' खरोखरच वॉलशीटच्या जवळच पंक्चर झालेले होते. पुन्हा वॉलशीटवरचे दुसर्‍यांदा पंक्चर काढणे तेवढे खात्रीचे नसते. मग मी नवीन ट्युबच टाकण्यास सांगीतले. नवीन ट्युबची किंमत त्यांनी ऐंशी रुपये सांगीतली. ट्युब बसवत असतांना सहज म्हणून नवीन ट्युबचे रॅपर बघीतले तर त्यावर एमआरपी सत्तेचाळीस रुपये छापलेली! मग त्यावरून बाळासाहेबांशी थोडी वादावादी झाली व नंतर बाळासाहेबांनीच माझे बौधीक घेतले. बोलणे चायना आयटम्सवर छापलेली कमी किंमत (ट्युब ईंडीयनच होता), व्हॅट, ईलेक्ट्रीकल सामान जास्त एमआरपी असूनही कमी किंमतीत कसे मिळते अशा अंगाने होत गेले. अर्थातच त्यांचा विजय झाला व मला नवीन ट्युबचे रुपये ऐंशीच द्यावे लागले.

नंतर हॉस्पिटलात दुपारी बाराच्या सुमारास डबा दिला व तेथेच थांबलो. चारसाडेचारला रुग्णाला अ‍ॅम्बूलन्सने गावी रवाना केले अन एका नातेवाईकाला चहापाण्यासाठी घरी घेवून आलो. त्यांचे चहापाणी झाल्यानंतर त्यांना बसस्टॉपपर्यंत सोडण्यासाठी मोटरसायकल बाहेर काढली तर तिचे पुढचे चाक पंक्चर झालेले! मग पाहुण्यांना बसस्टॉपपर्यंत पायी सोडून आलो.

आल्यानंतर मोटरसायकलच्या पुढल्या चाकात काही खिळा वैगेरे आहे का ते बघीतले. खिळा काही दिसला नाही. मग ट्युबचा वॉलनट ढिल्ला केला अन मोटरसायकल ढकलत गॅरेजपर्यंत नेली. नशीब गॅरेज घराच्या जवळच आहे. नाहीतर बंद अवस्थेतली मोटरसायकल ढकलत नेणे म्हणजे किती कष्टाचे असते ते आपल्याला माहीत आहेच. गॅरेजवाल्याने पंक्चर काढून दिले अन सरळ घरी आलो.

आता रात्रपाळीला जायचे असल्याने व दिवसभर झोप झाली नसल्याने वरच्या खोलीत आडवा झालो. एखाद्या तासाचीही झोप माणसाला ताजेतवाने करते. जाग आली तर जवळपास सात वाजत आले होते. आता जेवण करायचे नंतर परत झोप घेवून मग कामावर जायचे होते. रात्रपाळी असेल अन मला आठवण असेल तर मी मोटरसायकलच्या चाकांची हवा तरी कमीत कमी पाहून घेतो. तेवढीच खबरदारी. मी
मोटरसायकलच्या दोन्ही चाकांवर थापटी मारून पाहिल्या. दोन्ही चाके एकदम टणाटण होती. थोडेफार जेवण केले. घरचा टिव्ही आमच्या घरच्या बाळासाहेबांच्या टिव्ही बघण्याच्या कर्तृत्वामुळे बंद केलेला असल्याने टिव्ही न बघता सकाळचे (दै. सकाळ नव्हे. तो तर 'राहूल गांधी यांनी संसदेतल्या कॅन्टीनमध्ये ईडली-डोसा खाल्ला' अशा आशयाची बातमी आली त्याच्या दुसर्‍याच दिवशी बंद केलेला आहे. तसेही दै. सकाळने मागे एकदा 'लालूप्रसादला की नितीशकुमारला खायला काहीतरी (चारा??) आवडते' अशा आशयाची बातमी दिली तेव्हा बंद करायचे ठरवत होतो.) पेपर वाचले. पुन्हा झोपलो.

रात्री पावणेअकराला मोबाईलचा अलार्म झाला अन 'कामावर जायला उशीर नको व्हायला' म्हणून लगेच उठलो. कारण माझी वाट बघत कोणी रिक्षावाला थांबलेला नव्हता. मोटरसायकलच मला कामावर सोडणार होती. मी कपडे घातले. आताशा थोडीसी शित हवा वाहत असते म्हणून अस्मादिकांनी जॅकेटरूपी चिलखत अंगावर व हेल्मेटरूपी शिरस्त्राण डोईस चढविले व कामाच्या कचेरीरूपी युद्धभुमीकडे कुच करण्यासाठी मोटरसायकलरूपी घोडीवर टांग मारीली. बघतो तर काय! मोटरसायकरूपी घोडीचे मागचे पायरूपी चाक भुईसपाट झालेले! कुण्या शत्रूने खिळ्यारूपी भाला अस्मादिकांच्या मोटरसायकलरूपी घोडीच्या मागच्या पायरूपी चाकात खुपसला कोण जाणे. आता ऐन वक्ताला रातीच्या समयी कामरूपी युद्धावर जावयाची खोटी झालेली. पुन्हा घररूपी किल्याचे किल्लीने कुलूप उघडीले. मोटरसायकलरूपी घोडी पोर्चरूपी पागेत ठेवून दिली अन दिवाणखाण्यारूपी हॉलमध्ये अंगावरचे चिलखत व शिरस्त्राण काढून ठेवीले.

घरी माझी एक सायकल आहे. बरेचदा मी तिचा उपयोग करतो. मग आता वेळ निभावून नेण्यासाठी मला तिच कामात येणार होती. मग मी पहिल्यांदा तिच्या चाकातली हवा तपासली तर तिच्या पुढच्या चाकात हवा नव्हती. एवढ्या रात्री कोणते गॅरेज उघडे असेल? म्हणजे हा पण मार्ग बंद झालेला होता. (तसे आमच्याकडे रात्रंदिवस फक्त पंक्चर काढणारे हायवेच्या रस्त्याला काही केरळी आण्णा आहेत पण तेथेपर्यंत सायकल किंवा मोटरसायकल ढकलत कोण नेणार?) आता बसस्टॉपपर्यंत चालत जावून अ‍ॅटोरिक्षा दोन ठिकाणी बदलून आता कामावर जाणे भाग होते. आज रविवार असल्याने कामाच्या ठिकाणी माझी जागा घेणारा बदली सहकारीही नव्हता. मी लगेच ऑफीसात डिपार्टमेंटमध्ये मोबाईल केला व 'मला येण्यासाठी वेळ लागेल व तुला घरी जायचे असेल तर जा', असे तेथे हजर असलेल्या सहकार्‍याला कळवीले. रिक्षाने व थोडी पायपीट करून कामावर उशीराने हजर झालो. रात्रपाळीचे काम केले व सकाळी तशीच थोडीफार पायपीट करून घरी सकाळी साडेआठच्या सुमारास पोहोचलो.

घरी आल्यानंतर लगेच काही झोप येत नाही म्हणून मग मोटरसायकलच्या मागच्या चाकाची तब्बेत पाहण्याचे ठरवले. मागचे चाक निट बघीतले असता एक खिळा त्यात गेल्याचे दिसले. मग स्क्रूड्रायव्हर अन पकडीने तो खिळा उपसून काढला. पाहतो तर खिळ्याचे डोके गायब होते. बहूतेक तो सुताराकडचा खिळा असावा कारण सुतारलोकं दोन फळ्या जोडण्यासाठी असल्या बिगरडोक्याच्या खिळ्याचा वापर करतात हे मी पाहीलेले आहे. मग ट्युबचा वॉलशीट नट ढिला केला व मोटरसायकलच्या मागच्या चाकाचे पंक्चर काढण्यासाठी परत गॅरेजमध्ये मोटरसायकल ढकलत नेली. काही लोकं मोटरसायकचे चाकच काढून गॅरेजपर्यंत नेतात व पंक्चर काढून परत घरी चाक लावतात. मोटरसायकलचे मागचे चाक काढून लावणे तसे अवघड आहेच अन ते मला काही येतही नाही. यावेळी मोटरसायकल सुरू करून व गिअरमध्ये टाकून गॅरेजपर्यंत नेली. बाळासाहेब गॅरेज लवकरच उघडतात हे बरे आहे. मागच्या चाकाचे पंक्चर काढले व घरी आलो.

दिवसभर झोप अन थोडीफार कामं केली. संध्याकाळी एकाकडून हातउसने दिलेले पैसे घ्यायचे होते म्हणून मोटरसायकल सुरू केली अन तिच्यावर बसलो तर यावेळी मोटरसायकलचे पुढचे चाक पुन्हा सपाट झालेले! पुन्हा बाळासाहेबांची भेट ठरलेली. पुन्हा ढकलाढकली करत बाळासाहेबांच्या दरबारी हजर झालो. पैसे देण्यार्‍या माणसाने दिलेला चेक दोन वेळा बाउन्स केलेला होता व यावेळी तो रोख पैसे देण्यासाठी बोलवत असल्याने त्याची भेट घेणे महत्वाचे होते. मग बाळासाहेबांची एक घोडी (सायकल) उसनी घेतली व टांगा मारत पैसे घेण्यासाठी गेलो. नशीब! यावेळी त्याने मला पैसे परत केले. सायकल मारत पुन्हा गॅरेजमध्ये आलो तर बाळासाहेबांनी मोटरसायकलीच्या पुढच्या चाकाचे पंक्चर काढलेले होते. त्यांना त्याविषयी विचारले असता ट्युबच्या जॉईंटवर हे दोन्ही वेळचे पंक्चर होते असे समजले. गेल्या चोवीस तासात दोन वेळा पुढचे चाक पंक्चर झालेले असल्याने अजून धोका नको म्हणून मग मी ट्युब बदलण्याचा निर्णय त्वरीत घेतला. सायकलच्या ट्युबच्या किंमतीचा अनुभव असल्याने या मोटरसायकलच्या नवीन ट्युबवरची एमआरपी मी बघण्याचे धाडस केले नाही व त्यांनी जी रक्कम सांगीतली ती मी देवून टाकली. ती रक्कम दोनशे रुपये अशी होती.

हा लेख लिहून होईपर्यंत चोवीस तास झालेले होते. तोपर्यंततरी मोटरसायकल व लहान सायकल यांचे पंक्चर झालेले नव्हते. दोन्ही वाहनांची तब्बेत चांगली आहे. पण अजून माझ्या मोठ्या सायकलीच्या पुढच्या चाकाची हाल'हवा'ल पहायची बाकी आहे. आज वेळ मिळाला की मोठ्या सायकलीला बाळासाहेबांच्या दवाखान्यात नेण्याचे ठरवले आहे. तेथे गेल्यानंतरच तिच्या चाकात कोणता आजार दडलेला आहे ते समजेल. तशी खुशाली मी आपणाला कळवेनच.

Saturday, September 24, 2011

अशी कशी ही म्हागाई

अशी कशी ही म्हागाई

अशी कशी ही म्हागाई वाढ वाढ वाढली
माझ्या खर्चाची झोळी हिनं फाडली ||धृ||

नका डाळ तुम्ही म्हणू; नका तांदूळ तुम्ही म्हणू
गहू जोंधळं झालं आहे सोनं जणू;
पाहून बाजरीचे भाव मी पिशवी खुंटीला टांगली ||१||

दह्या दुधाचे भाव कसे वाढता वाढं; शेरभर ताकालाबी धा रूपये लागं
पोरं झालीत वाळून बारीक रोड;
पामतेल डालातुपाविना देवू कशी भाजीला फोडणी? ||२||

राकेल गॅस प्रेटोल डिझल; याबीगर चाक कसं चालंल?
ऐश्टी गाडीबी पैशाविना हालंना;
पेशल रिक्षा कशी करावी? साध्या प्रवासाची सोय नाय आता राह्यली ||३||

संसाराचा कसा ओढावा गाडा; घरखर्च रोज घाली राडा
पगारात मालक घाली खोडा;
अवशीधपान्याविना तब्बेत चांगली नाही राह्यली ||४||

कुनी यावर उपाय सांगा राव; या तेजीचा कमी करा कुनी भाव
आमी गरीब आहो नाही कुनी साव;
रोज सस्ताईची किंमत कमी होत चालली ||५||

तर्‍हा येगळीच बघा शिक्शनाची; शाळा झेडपीची बरी हाय पोरांची
आस तिथं खिचडी मिळण्याची;
चांगली विंग्रजी शाळा पोरांनी नाय कधी पाह्यली ||६||

{{ सांगा कसं जगावं आमी ऐटीत; आडवं केलं म्हागाईनं एका फायटीत
यंदा पोराचं लगीन करावं म्हनतो; दोन इंजीनानं गाडी वढावी म्हनतो
सांगा एखांद्या स्थळी
आय.टी.वाली पोरगी आसल तर चांगली ||७|| }}

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०९/२०११

राधा गौळण

राधा गौळण

आळवणी करते कृष्णाची; राधा गौळण मी मथूरेची ||धृ||

दुध दही करण्यासाठी; बाजारी मथुरेच्या नेण्यासाठी
पहाटेच उठूनी धारा काढीते गायींची ||१||

गोपींकांना सवेत घेवूनी; यमूना तिरावर रास खेळूनी
वाट पाहते नंदलालच्या मुरलीची ||२||

मायेच्या पाशात न शिरण्या; मोहांपासूनी विलोभी होण्या
आस लागली तुझ्या न माझ्या मिलनाची ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०९/२०११

Thursday, September 22, 2011

रंगपंचमीच्या सनाला

रंगपंचमीच्या सनाला

This Lavani is dedicated to parag p divekar.

नका भिजवू शालू वेल बुट्टेदार नऊवारी
रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||धृ||

नेम तुमचा कधी का चुकतो!
अंगाला बाई असा झोंबतो
पाण्याचा तो मारा; नका करू मजवरी
रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||१||

रंग हवेत* कितीक उडवीले *(हवे ते)
फुगे फोडीले हिरवे पिवळे
रंगात येवूनी का गुलाल फेकीला अंगावरी?
रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||२||

लाज मला हो आली भारी
सर्व सख्यांनी मस्करी केली
उगीच तुम्ही जवळ येवूनी केली बळजोरी
रंगपंचमीच्या सनाला नका मारू पिचकारी ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०९/२०११

लावणी: लग्नाचं वय माझं झालं

लावणी: लग्नाचं वय माझं झालं

नक्षीदार कुयरी पदरावरची.........
हळद कुंकवानं भरलेली
सोळा सिनगाराचा साज लेवूनी...
ऐन्यापुढे उभी मी राहीली

पुढ्यात तुमच्या जवळ आले माळून मी मरवा
लग्नाचं वय माझं झालं; आता तारीख ती ठरवा ||धृ||

मुसमुसलेली ज्वानी माझी कळीदार ती काया
हाताला हात लावा अन पारखून घ्या तिला राया
अंग माझं सोन्यावानी तिस हजारी की हो झालं!
चांदीवानी चमचम करूनी उजळून ते आलं
तुमच्या मुठीत घ्या या रुप्याच्या रुपाला
लग्नाचं वय माझं झालं; आता तारीख ती ठरवा ||१||

पावसाळ्यामदी मोरलांडोरी पान्यामधी भिजती
झाडावरती राघू मैना घरट्यामधी लपती
आणि किती गोष्टी सांगू; गोड गोष्टीत रंगत आणाया
थंडी वाजूनी आले जवळी अंगी उबारा घ्यायला
जावू नका दुर आसं; गोड घासानं तोंड माझं भरवा
लग्नाचं वय माझं झालं; आता तारीख ती ठरवा ||२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०९/२०११

विडंबन: (मालकीणोपदेश)

(मालकीणोपदेश)

संदर्भ

"लिहावे की न लिहावे, उडेल की न उडेल, रुचेल की न रुचेल, संपादेल की नसंपादेल हाच मोठा प्रश्न आहे"
- पाषाण भेद-फियर (करू नको)

(वरील जगप्रसिद्ध वक्तव्य असणारा गहन प्रश्न आमच्याही मनात आला पण गावातील आजकालचे नवनवीन Items पाहून ती भीती कमी झाली.)

काही वर्षापूर्वीची गोष्ट... मी बृ-स्पतीवारात माझ्या क्लायंट्सना भेटण्यासाठी गेलो होतो. मला जेव्हा जेव्हा ऊर्जा कमी पडते तेव्हा तेव्हा मला बृ-स्पतीवार परिसराची एक चक्कर पुरेशी असते. त्या खेपेला मी, मला दिलेला शब्द पाळणा-या आणि मी दुखावला गेलो तेव्हा मला आनंद देण्याचा मोठेपणा दाखवणा-या प्रोप्रा. सवितांनापण पण भेटलो. त्यांना कामाला जायचे असल्याने आमच्यात संक्षिप्त-मुक संवाद झाला. तो एखाद्या झेड कॅटेगरीतील मालकीण ग्राहक संवादासारखा होता. तो असा...

"पाष्या, क्या कर रैला रे आजकल" - प्रोप्रा. सविता

"अरी, मै तो प्रायव्हेट फॅमेली मे बिवी का हजबंड हूं" - मी

"कित्ती बडी है रे तेरी फेमेली?" - प्रोप्रा. सविता

"होगा कोई ३०-४०" - मी

"कित्ते दिन से चला रहा है?" - प्रोप्रा. सविता

"लगभग तिन साल से जादा होने कू आयेले है" - मी

"तेरे उप्पर कौन रहेता है" - प्रोप्रा. सविता

'मेरी औरत' - मी

"तेरी फेमेलीमें कितनी बिबीयां है?" - प्रोप्रा. सविता

"क्या बात करती है? एकही बिवी है मेरी" - मी

"पाष्या, तूने अब तेरी बिवी बदलना गंभीरतासे सोचना चाहीए "- प्रोप्रा. सविता

मला झेड कॅटेगीरी ग्राहकाप्रमाणे तत्काळ निर्वाण प्राप्त झाले!

या धाग्याचे प्रायोजक आहेतः हौटूटेकबॅकअप.कॉम - जींदगी सवाँरदे

पाहटंची शेती

पहाटंचीची शेती

सक्काळच्या धुक्यात रं
चुलीचा धुर गेला रं
भाकरी थापल्याचा आवाज
त्याच्यात मिसळला रं

पान्ह्यासाठी सोडली रं
कालवड ल्हान तान्ही रं
कासंडी धुवूनशान
दूध काढलं म्हशीचं रं

उठावं थंडीगारठ्याचं रं
काम करावं कष्टाचं रं
शेणमुत काढावं
जनावरं आपलीच रं

सर्जा राजा उठला रं
पाचट खाऊन तयार रं
औत वढाया, जुपाया
खांद्यावर जू ठेवलं रं

रामपारी देवाचं रं
नाव घ्याव तोंडांनं रं
न्यारी करून शेताला
चालू लागावं पाहटंला रं

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२१/०९/२०११

Wednesday, September 21, 2011

चुकीचे मोबाईल रिचार्ज

चुकीचे मोबाईल रिचार्ज

गट्टू अन गिट्टी जात होते एकाच कॉलेजात
तेथेच जुळले त्यांचे; गुंतले दोघे एकमेकात

गट्टू स्वभावाने वांड होता गावात सोडलेला सांड होता
याच्याशी भांड त्याच्याशी भांड असले उद्योग करत होता

गिट्टीला तो खुपच सोज्वळ भासे
कच्च्या लिंबाप्रमाणे कोवळा वाटे

कॉपी केल्याने कॉलेजमधून रस्टीकेट झाला
अपेक्षेप्रमाणे गट्टू एस.वाय.ला फेल झाला

मनापासून प्रेम होते त्याचे गिट्टीवर
ती न भेटली तर जीव होई खालीवर

इकडे गट्टूच्या बापाने त्याला घराबाहेर काढला
काहीतरी कामधंदा कर तरच घरी ये म्हणाला

काय करावे काय करावे प्रश्न मोठा पडला
उत्तर त्याचे माहीत नव्हते तेथेच गट्टू अडला

गरीब बापाला दया येवून थोडे भांडवल त्याला दिले
गट्टूने कमी मेहनतीचे मोबाईल रिचार्जचे दुकान सुरू केले

नजरानजर होण्यासाठी एका गल्लीत त्याने टाकले दुकान
आता कसे सोईस्कर झाले; समोरच त्याच्या गिट्टीचे मकान

दुकान आता थोडे बरे चालत होते
कुणी दहा तर कुणी वीसचे रिचार्ज मारत होते

मात्र दिवसातून एखादे नवीनच गिर्‍हाईक २०० चे रिचार्ज मारून जाई
पुन्हा तेच गिर्‍हाईक रिचार्ज मारण्यासाठी त्याच्या दुकानी न येई

हळूहळू त्या २०० च्या रिचार्जचा एकच नंबर त्याला पाठ झाला होता
नवनवीन गिर्‍हाईक जो नंबर रिचार्ज करी तोच नंबर गिट्टीच्या मोबाईलचा होता

- पाभे
२१/०९/२०११

हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार

हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार

हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार
सदाचार नाही हा तर आहे
भ्रष्ट आचार भ्रष्ट आचार

काम करण्यासाठी कुणी ऑफीसात येतो,
ऑफिसर कारकुनाची विनवणी करतो
आज ये उद्या ये म्हणून वेळ फुक्कट जातो,
पैसे घेवूनच मग कामं तो करतो
असल्या कामासाठी लाच खाणं झाला शिष्टाचार शिष्टाचार
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार

गोरगरीबाचे कामं तुम्ही लवकर कराना,
चिल्यापिल्यांचे तुम्ही आशिर्वाद घ्याना
माणसातली माणूसकी आता जागवाना
पैसे मागण्याचा खेळ आता संपवाना
सदाचार, सुनीती, निष्ठा यांचा करा प्रचार, करा प्रचार
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार

स्विस बँकेमध्ये पहा कितीतरी पैसा तो सडतो
इकडे भारताचा विकास पैश्याविना अडतो
चारा, शस्त्र, स्पेक्ट्रम घोटाळ्यात पैसा हा जातो
लाच देवून संसदेत मते पुढारी मागतो
लाच देवू नका घेवू नका होवू नका लाचार लाचार
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार

देवालाही तुम्ही सांगा नारळ का फोडता?
परिक्षेला जाण्याआधी हात का जोडता?
स्व:तावरील विश्वास कमी का करता?
मठ मंदीराची तुम्ही तिजोरी का भरता?
हा तर आहे लाच देण्याचाच प्रकार प्रकार
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२१/०९/२०११

वेळ लावू नका

वेळ लावू नका

रात नवेली आली चालून
विडा ठेवला चुना लावून
तुमच्या येण्याचा नाही भरवसा
वेळ लावू नका बेगीनं या राजसा ||धृ||

वाट तरी पहावी कितीक बाई
दिस गेला हि रात सरत जाई
ऐन मोक्याला धोका कसला?
जीव झाला येडापीसा
वेळ लावू नका बेगीनं या राजसा ||१||

लाडीगोडीचं तुमचं बोलणं
गोडगुलाबी कोडं घालणं
आधारासाठी हात उशाला
पांघराया अंग द्या न विसरता
वेळ लावू नका बेगीनं या राजसा ||२||

शिनगाराचा असल्या येळी
आठव तुमची डोळा आली
दोन्ही पापण्या न्हाती पाणी
विरह सहन होईना जरासा
वेळ लावू नका बेगीनं या राजसा ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२०/०९/२०११

माझं गाव

माझं गाव

याहो याहो पाव्हने तुम्ही; या हो माझ्या गावाला
वाहता ओढा ओलांडा; तेव्हा गाडी लागेल शिवेला

वेशीवरती आहे मारूतीचे मंदिर
दर्शन घ्या त्याचे; मुर्ती पुरातन सुंदर

थोडं पुढं या; तुम्हाला लागेल बावडी
वेशीतून शिरा आत; तिच्यावर आहे चावडी

डाव्या हाताला ईमारत नवी कौलारू
ग्रंथालय अभ्यासिका तेथे सुरू; तुम्ही बोला हळू

बँक अन व्यायामशाळा ती बघा समोर
पोरं खेळतात कब्बडी; ते गावाचे मैदान

या की जरा पुढे; पहा दवाखाना सरकारी
पंचक्रोशीचे रुग्ण इथं येती होण्यासाठी बरी

इथून पुढं लागेल माळी गल्ली, शिंपी आळी
फाल्गूनात पेटे इथं गावाची मधली होळी

ब्राम्हणवाडा पाटीलगल्ली आहे त्या अंगाला
बैठ्या ईमारतीत आहे जिल्हा परिषदेची शाळा

वरच्या बाजूला आहे मामलेदार कचेरी
बाजूलाच पोलीसचौकी अन कोर्ट तेथेच भरी

आजूबाजूला वस्ती आहे कुंभारवाडा राजवाडा
बाजूला त्याच्या पिरगल्ली कोळीवाडा भोईवाडा

शनी चौक, पिंपळपार, दगडी बुरूज
ओळख करून घ्या सार्‍यांची;
गाव आहे शिवकालीन ऐतिहासीक

बाजूबाजूची वस्ती सारी अलूत्या-बलूत्यांची
भांडणतंटा नाही कसला गुण्यागोविंदानं नांदती

तालूक्याचं गाव माझं, भरे आठवडे बाजार
मिठ मिरची कपडे धान्य भाजीपाला;
विकायला येई; वार असे शनिवार

आसं गुणाचं माझं गाव; स्वप्नातलं आहे खरं
दृष्ट न लागो कुणाची; त्याला तुम्ही पहा एकदा तर

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१८/०९/२०११

माझी म्हैस

माझी म्हैस

एका डोळ्यानं आहे जरी थोडी तिरळी
माझी म्हैस गुणाची आहे काळी काळी ||धृ||

कात्रिना नाव तिचे फार शोभून दिसते
हाय बेबे! म्हटलं तर शेपूट हलवते
मला डाऊट हाय ती पार्लरला न्या म्हणते
जसं नटून सजून होईल ती गोरी गोरी ||१||

शिंगे तिची वाकडी घाटदार छान
दुरून बघीतले तर बदामाचे सिम्बॉल
प्रत्येक रेड्याला वाटते ते आव्हान
तिच्यासाठी गोठ्याबाहेर लावतात लाईन
योग्य वर तिला आता शोधा हो कुणीतरी ||२||

पाण्यात बसण्याची भारी तिला आवड
नदीवर जाते नेहमी ती काढून सवड
तिला रोज मी धुतो तरी रंग नाही जाणार
माहीत आहे मला पण तिला कोण सांगणार
यंदाच्या मिस इंडीयाची करा म्हणते तयारी ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/०९/२०११

माझी फुलबाग

माझी फुलबाग
किती हौसेने फुलझाडे लाविली
पाणी देवून वाढवली जपली
काही कळ्या आल्या मुक्या
तर काही रंगीत फुले उमलली ||

परीसरात माझी फुलबाग एकटी
नव्हती तसली दुसर्‍या कुणाची
शोभेचे लावली तरूवर तेथे
काही झाडांना लपेटल्या वेली ||

अपेक्षीले न मी जरी काही
निसर्गाने तिला साथ दिली
कोंब तरारून आले वरती
अनेक कुसूमे भरभरून आली ||

येता जाता सारे बघती
कष्टाचे कुणी कौतूक करती
आनंदाचा ठेवा हा अनमोल
परी नव्हता तयांच्यासाठी ||

अशीच एकदा वेळ ती आली
नजर फुलांवर पडली काळी
दृष्ट काढली त्याच फुलांची
पण हाय! पुष्पांची गेली झळाळी ||

जीवन म्हणजे येणे जाणे
येवूनी आयुष्याची बाग करणे
जरी ही एखादी फुलबाग उखडली
नविन फुलबागा करील मी माळी ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१७/०९/२०११

प्रवास

प्रवास
दुर पुढे जातांना सरलेली मागची
वाट नजरेच्या आवाक्यात येते.
किती चालायचे अजून बाकी
याची आठवण होते.

पायात रूतलेले काटे, दगड
लागणारा पाऊस वारा उन
प्रवासातला होणारा त्रास
निब्बर करतं त्वचा अन मन

तसल्या बेभरवशाच्या त्रासदायक प्रवासातही
एखादी वार्‍याची झुळूक,
एखादी गवती हिरवा जमीन
मनाला सुखावते.

तेथे थांबावस वाटतं
पण थांबता येत नाही
कारण
वाट संपलेली नसते
त्यामुळे चालावंच लागत.

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१७/०९/२०११

Monday, September 12, 2011

युगलगीत: रंग हिरवा ओला ओला

युगलगीत: रंग हिरवा ओला ओला
तो: रंग हिरवा ओला ओला आला निसर्गाला
ती: प्रित तुझी माझी यावी अशीच बहराला ||धृ||

तो: थेंब नभातून खाली झरती
तो: पडता त्यांना ओठांवरती
ती: चुंबून घ्यावे थोडे प्यावे
ती: एक होवूनी वेडे व्हावे ||१||

तो: कधी प्रकाशात दिसते
तो: इंद्रधनू ते सात रंगांचे
ती: हवेत तसले रंग धनूचे
ती: हाती भरल्या लग्नचुड्याचे ||२||

तो: मोहरलेला श्वास श्वासात
तो: हात गुंतले तुझ्या हातात
ती: निसर्गात या वेडे झाले
ती: दोन जीवांचे नाते जडले ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/०९/२०११

माझी म्हैस

माझी म्हैस

एका डोळ्यानं आहे जरी थोडी तिरळी
माझी म्हैस गुणाची आहे काळी काळी ||धृ||

कात्रिना नाव तिचे फार शोभून दिसते
हाय बेबे! म्हटलं तर शेपूट हलवते
मला डाऊट हाय ती पार्लरला न्या म्हणते
जसं नटून सजून होईल ती गोरी गोरी ||१||

शिंगे तिची वाकडी घाटदार छान
दुरून बघीतले तर बदामाचे सिम्बॉल
प्रत्येक रेड्याला वाटते ते आव्हान
तिच्यासाठी गोठ्याबाहेर लावतात लाईन
योग्य वर तिला आता शोधा हो कुणीतरी ||२||

पाण्यात बसण्याची भारी तिला आवड
नदीवर जाते नेहमी ती काढून सवड
तिला रोज मी धुतो तरी रंग नाही जाणार
माहीत आहे मला पण तिला कोण सांगणार
यंदाच्या मिस इंडीयाची करा म्हणते तयारी ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/०९/२०११

माहेरी जायची मला झाली आता घाई

माहेरी जायची मला झाली आता घाई
डायवर दादा रं
डायवर दादा जोरात गाडी चालीव की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

गेले व्हते मी बाई मागल्या दिवाळीला
पुरं व्हत आलं आता वरीस त्या सणाला
आखाजी संपून आता दसरा आला की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

बा माझा कसा आसलं शेतात राबूनी
थकला आसंल घाम कष्टाचं गाळूनी
यिचारपुसं त्याची समक्ष करू दे की रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

आयी माझी हाये जनू बाभळीचं लाकूड
सौंसाराच्या आगीसाठी जळतीया भुरभुर
कधी मिठी मारतीया तिला आसं मला झालं रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

मोटा भाव आन ल्हान बी माझा भाव रं
राम क्रिश्नाची जोडी त्यांची शोभते रं
मधली हाय मी भन त्यांची एकुलती लाडकी रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

सासरं माझं झालं जरी आता घरं
म्हायेराची सय कधी येती येळवारी रं
दोन्ही घरं जोडायाची सवय आता झाली रं
माहेरी जायची मला झाली आता घाई रं

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१०/०९/२०११

ज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्र्यलढा

ज्वलंत सामाजीक एकांकी नाट्य-प्रवेश: दुसरा स्वातंत्र्यलढा

(ढिसक्लेमर: या नाट्यप्रवेशातील सर्व पात्रे, घटना काल्पनीक आहेत. त्या पात्रांचा व घटनांचा कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तींशी संबंध नाही. तत्राप असा संबंध आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.)

(भुमिका: अर्जून, माया, श्रेया, रिषी, कविता, प्रणव)

अर्जून: काय करावे बरे? हि अजून माया कशी आली नाही ते? छे! कित्ती उशीर? आता १० वाजून गेले अन प्रभात फेरीला सुरूवातही नाही. तिकडे आप्पांच्या उपोषणाला मग पाठिंबा कसा मिळणार? अन सरकार कसे हादरणार?

(अर्जून रंगमंचावर येरझर्‍या घालतो.)

माया: अर्जून, मी आले बघ. मी आताच श्रेया, रिषी, कविता, प्रणव यांना कॉलेजला न जाता या मैदानावर येण्याचा एसएमएस केला आहे.

अर्जून: अग, कित्ती हा उशीर? (लाडात येवून) अन काय ग, कालच्या रात्रीच एसएमएस वाचला का?

माया: चल चाव्वट कुठला! अरे आपण देशाच्या दुसर्‍या स्वातंत्र्य लढ्यात लढतोय ना? मग असले एसएमएस का पाठवतोस आता? ते नंतर पाठव आपला विजय झाल्यावर. मी पण मग नविन एसएमएस पॅक टाकते माझ्या मोबाईलमध्ये. त्यात सुरवातीचा एसएमएस फक्त एक रुपया अन नंतरचे १०० एसएमएसेस एकदम फ्री आहेत. आहे की नाही मज्जा.

अर्जून: अन मायाबाई, तूम्ही तुमच्या मोबाईलमध्ये GPRS ईंटरनेट कनेक्षनपण अ‍ॅक्टीव्हेट करून घ्या हं बाई.
तू फेसबूक वर नसतेस तर आपल्या आंदोलनात कित्ती कित्ती घोळ होतो बघ.

माया: ए! बाई काय म्हणतोस? अज्जू, अरे मागल्या वेळी डॅडींनी डि-अ‍ॅक्टीव्हेट करायला लावले रे ते GPRS. प्लिज तू अ‍ॅक्टीव्ह कर अन बॅलन्सपण टाक ना! तुझ्या मायासाठी एवढेही करणार नाहीस तू?

अर्जून: बरं बाई, आता आपला मोर्चा- आपलं ही प्रभातफेरी आटोपली की (तिला जवळ ओढतो) करतो सगळ. मग तर झालं.

माया: अर्जून, आत्ता नको रे. कुणीतरी पाहील. (दुर जाते)
(तेव्हढ्यात तेथे श्रेया, रिषी, कविता, प्रणव येतात.)

कविता: हाय, आम्ही आलोत अन आहोत येथे म्हटलं.

अर्जून: अरे या ना या. तुमचीच वाट पाहतोय प्रभातफेरीसाठी. अन काय रे रिषी, त्या टोप्या आणल्यात ना.

रिषी: हो तर. या काय आहेत ना या श्रेयाकडे. काय ग श्रेया आहेत ना टोप्या तुझ्याकडे घालायला. म्हणजे डोक्यात घालायला!

श्रेया: (लाजत) रिषी, तु अस्सा आहेस ना अगदी. अरे, टोप्या तर आहेतच पण एवढ्या सकाळी मॅकडोनाल्ड मध्ये जावून बर्गर आणि पिझ्झाज पण आणले आहेत पार्सल.

कविता: बरं झालं बाई, कालच्या मोर्चाच्या वेळी कित्ती भुक लागली होती माहित्ये?

प्रणव: बरं बरं आत्ता तुमचं राहू द्या आता. चला निघूया प्रभातफेरीसाठी. आधीच वेळ झालाय.

(सगळे जण डोक्यात टोप्या घालतात. हातात बॅनर घेतात.)

सगळे जण ओरडत जातात: आप्पा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!!
आप्पा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!!

(पडदा पडतो)

Thursday, September 8, 2011

हे घरी असतात

हे घरी असतात

हे घरी असतात तर किती बरे असते
मला कसली कसली काळजी नसते

मुलांचा सकाळचा डबा
त्यांच्या शाळेची तयारी
रिक्षावाल्याची वाट पाहणे
पेपरवाल्याची उधारी
झालेच तर नळाचे पाणी
ते तर तेव्हाच येत असते
हे घरी असतात तर किती बरे असते
मला कसली कसली काळजी नसते

त्यानंतरचा आमचा नाष्टा
कधी होतो रवा, पराठा
कधी उतप्पा, ईडली डोसा
ह्यांच्या हाताला मस्त चव असते
हे घरी असतात तर किती बरे असते
मला कसली कसली काळजी नसते

कामवाल्या मावशी धुणी भांडी करून जातात
साबण, सर्फ, पितांबरी ह्यांचा हिशेब हेच पाहतात
वाळलेल्या कपड्यांना इस्त्री कशी छान करतात
धोबी परीटही त्याच्यापुढे झक मारतात
मी ही घरी असते तर कदाचीत केले असते
पण...
हे घरी असतात तर किती बरे असते
मला कसली कसली काळजी नसते

दुपारी जेवण बनवल्यानंतर
बिचारे एकटेच खातात
घरी कुणीच नसते
घरातले सारे कामावर जातात
दुपारी जेवल्यानंतर मात्र
हे टिव्ही बघतात
तीनच्या सुमारास वामकुक्षी घेतात
मी मरमर ऑफीसात प्रोग्रामींगची कामं करते
हे घरी असतात तर किती बरे असते
मला कसली कसली काळजी नसते

आठवडाभर हे घरी कित्ती कित्ती कामं करतात
घर सारे निटनिटके आवरून सावरून ठेवतात
मात्र कधीतरी त्यांनाही एक दिवस सुटी द्यावीशी वाटते
हे घरी असतात तर किती बरे असते
मला कसली कसली काळजी नसते

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०९/२०११

ह्या पावसानं

ह्या पावसानं

ह्या पावसानं
ह्या ह्या पावसानं असा कसा हा खेळ केला
माझा भरला संसार त्यानं पाण्यात सांडला ||धृ||

रोहीणी आल्यात तेव्हा तो पडलाच नाही
मृग लागला तेव्हा थोडाफार येवून जाई
पहीली पेरणी खरीपाची कोरडी करून गेला
ह्या ह्या पावसानं असा कसा हा खेळ केला ||१||

आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य; कोरडी गेली सारी नक्षत्र
इथे पडला तिथे पडला, पडला नाही सर्वत्र
भरणी, आश्लेषात मग पडून काय कामाचा
तो तर दुबार पेरणी करण्याच्या लायकीचा
पुन्हा कुठून आणायचं पैसा बी बियाण्याला
ह्या ह्या पावसानं असा कसा हा खेळ केला ||२||

राजा काय करील जर आभाळच फाटलं
होतं नव्हतं ते सारं पाण्यानं ओढून नेलं
उत्तरा, हस्तामध्ये तो जोरदार आला
सगळ शेत घरदार बरोबर घेवून गेला
ह्या ह्या पावसानं असा कसा हा खेळ केला ||३||

पुढची आशा करू रब्बी हंगामाची
शिकस्त करूया मेहनत करण्याची
रात्र संपून दिवस आता उजाडला
ह्या पावसानं असा कसा हा खेळ केला ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०९/२०११

Wednesday, September 7, 2011

मी एक पांथस्थ

मी एक पांथस्थ

पांघरूनी शाल हिरवाळीची
डोंगर गातो गाणे
ढग आडवा येतो तेथे
दरीत सावली कोसळते ||

हळूवार शिळ हवेची
पक्षी देई रवाने साद
टेकडीवरील एकांतात
बसलेला पांथस्थ मंदीरात ||

दुरवर कोठेतरी वरती
उगम एका झर्‍याचा होई
जरा थांबून रेंगाळून येथे
नदी होण्यास पुढे जाई ||

क्षितीजावरचे उभे चित्र
कुणीतरी रेखाटलेले
आवाका क्षुद्र नजरेचा
मन भारून साठलेले ||

मंदीरातल्या देवापुढे नच
निसर्गापुढे लीन होतसे
मी एक पांथस्थ
मी एक पांथस्थ ||- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०९/२०११

Tuesday, September 6, 2011

मामा तुमची मुलगी

मामा तुमची मुलगी

मामा तुमची मुलगी आहे फार फार देखणी
मला शोभुन दिसेल
जसं ब्रेड वर मऊ मऊ लोणी ||धॄ||

काय तिचे आहेत हो गोरे गोरे गाल
खाली हनूवटी आहे टोकदार दिसते छान
कपाळी टिकली न फुलं केसांत खोवली
पण केसांची का घालते ती जुनाट वेणी?
मामा तुमची मुलगी आहे फार फार देखणी ||१||

कॉलेजला जाते, स्कुटी उडवते
पोरासोरांच्या घोळक्यात राहते
हॉटेलात खाते, पिक्चरला जाते
डब्बलसीटही बसवते तिला कुणी
मामा तुमची मुलगी आहे फार फार देखणी ||२||

मामा सांगतो तिच्या वागण्याचा नमुना
निट ऐकून घ्या, कान इकडे करा ना
त्या सच्च्या बरोबर ती रोज रोज फिरते
मॉलमधून जिन्स टि शर्ट ती घेते
मी बघीतल्यावर ती नुसतेच हसते
मला भाऊ रे भाऊ हाक ती मारते
बातमी ही खरी, नाही कागाळी
सहजच टाकली ती तुमच्या कानी
मामा तुमची मुलगी आहे फार फार देखणी ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०९/२०११

Monday, September 5, 2011

कव्वाली: बहूतोने कहा है के प्यार न कर

कव्वाली: बहूतोने कहा है के प्यार न कर प्यार न कर

बहूतोने कहा है के प्यार न कर प्यार न कर
खाली हो जाता है दिल, तू सिसकियां न भर
बहूतोने कहा है के प्यार न कर प्यार न कर

इस दुनिया में हसीनाऐ रहेती है
नुर एक हुस्न की दौलत बनती है
कुदरत ने उन्हे बनवाया बडी नजाकत से
जैसे की फुल बनते है नाजूक कलीयोसें
इत्र जैसे सुगंध पिरोता है
हसीन चेहेरे भी वैसे घुमते है
मगर पथ्थर दिलवालें उन्हे देखतेही जाते है मर
इसलीए बहूतोने कहा है के प्यार न कर प्यार न कर

उनकी जुल्फ जरा भी तूम देखें एकबार
खुदा न करें वो लिपट लें तुम्हें आखरीबार
वो हसीन हसीं बो मोती लिए मुस्कूराना
क्या मजाल है किसीकी देखके आपेमें रहेना
दुनीया की किसी भी हसीना को आप जो देखें
इतराती हुऐ वो नजर न आयीं तो आप क्या देखें?
अपना खुदका दिल चोरी हो जाने का तब लगता है डर
बहूतोने कहा है के प्यार न कर प्यार न कर

कितनेही शौक है इनके निगाहो मै पलते
सज-सवंरके मर्द को मारने तैयार रहेते
आदमी एकाध बार खंजर से भी बच जाऐ
मगर इनकी तेज निगाह से खडे खडे ही मर जाऐं
ऐसा बर्ताव इनका रहेता है तूम जानो अभी
इनके बहकावें में ना आना मेरे ए दोस्त कभी
सच्चा प्यार नसीब होने का हमेशा रहेता है डर
इसलीए बहूतोने कहा है के प्यार न कर प्यार न कर

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०९/२०११

गोड गुन्हा

सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा

माझ्या पुढे बसूनी, थोडं गाली हसूनी
काय करतेस ग तू खाणाखूणा
सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा ||धृ||

समोरासमोर आहेत आपली दोघांची घरे
बाल्कनीत उभे राहणे इतरांना दिसते सारे
हातवारे नको करू, नजरेने नको काही बोलू
शंका येईल तूझ्या बॉडीबिल्डर मोठ्या भावाला ||१||

काल क्लासला का ग नाही आलीस?
लेक्चर इन्फरमेटीव्ह मीस केलेस
आयएमपी क्वेश्शन मार्क मी केले ते;
नोटबूक घेण्याचा करते तू बहाणा
सांग किती झेलू तूझा हा गोड गुन्हा ||२||

कितीतरी वेळा झालं हे तूला सांगून
बरे दिसत नाही चारचौघात असलं वागणं
नको बोलू गर्दीत, जावू एका बागेत
थोडी तरी कळ काढ, बोलतो मी पुन्हा पुन्हा ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०९/२०११

काय गुण सांगू माझ्या सालीचे

काय गुण सांगू माझ्या सालीचे

माझ्या सालीचे काय गुण सांगू माझ्या सालीचे
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||धृ||

ती घरात येते तर एकदम जसे चक्रीवादळ येते
भाऊजी भाऊजी म्हणत ती माझ्या मागे फिरत असते
नटते थटते लाजत मुरडते
मी जरा बोललो तर लाजून आखडते

भरल्या घरात शोभतात का तिला हे असले धंदे?
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||१||

एकदा मी ऑफीसातून घरी लवकर गेलो
ती एकटीच घरी असल्याने चिंतेत पडलो
तेव्हढ्यात तिने विचारले भाऊजी इकडे जरा येणार का?
कॉलेजच्या नाटकातला प्रेमाचा सीन समजून देणार का?

तुम्हीच सांगा ती नाकाने सोलत असते का कांदे
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||२||

खर्चाच्या बाबतीत तिचा हात कोणी नाही धरणार
माझा खिसा खाली करण्यात तिचा असतो हातभार
लाडीगोडीनं ती नेहमी हॉटेलात जायचे म्हणणार
सिनेमा पाहण्यात तर ती पहिला नंबर घेणार

बायकोला म्हणते "मला वाढदिवसाला पैठणी घेवून दे"
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||३||

कुणालातरी ती प्रेमपत्र लिहीते
मायन्यात मात्र प्रिय मलाच म्हणते
बायकोसमोरच हे सारे घडते
म्हणूनच माझ्या संसाराची काळजी वाटते

विचारल्यावर 'त्याचे' नाव सच्याच आहे हे ती सांगे
वांधे केले वांधे जगायचे सालीने केले माझे वांधे ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०१/०९/२०११

वाळू

वाळू
समुद्रकाठावरची वाळू अन वाळवंटातली वाळू.
दोन्ही वाळूचेच प्रकार
पण दोन्हीतले स्वभाव किती भिन्न...

एक थंड तर एक उष्ण
एक पाण्याशी जवळीक साधणारी तर
दुसरी पाण्याशिवाय राहणारी
एकीवर थंडवारे वाहतात तर दुसरीवर उष्ण
एकीवर सुंदर सुंदर दृष्य असणारी झाडे, वने, निसर्ग
तर दुसरी रुक्ष, तापलेली, वैराण जागा
.
.
.
.
कधी कधी वाटते की,
तुझ्या अन माझ्या स्वभावातही इतकेच अंतर आहे काय?

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०२/०९/२०११

पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी

पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी

चल ग राणी जोडीला ये ग
गावूया गावरान गाणी
पाटापाटानं ग
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||धृ||

विहिर दगडी रहाट लाकडी
विजमोटरीनं भरतूया पाणी
पाटापाटानं ग
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||धृ||

कोरस (फक्त मुलींचा आवाज) :
पाटापाटानं ग
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||धृ||

पानकळा ह्यो आला, सारं शिवार फुलवून गेला
वाटाणा चवळी भुईमुंग गाजर, रताळी अन मुळा
पिकं पोटरीला आली आता किटनाशक चला फवारा
हातपंप देवून दांडा हातात घे ग, जवळ नाही कुणी
पाटापाटानं ग
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||१||

दुभती म्हैस गाभण गाय, शेरडू हाय गोठ्यात
घास खात्याती पेंढींसंग, हिरवागार लुसलुशीत
कालवड ती सोड, दुध जरा काढ
आता कशाला करतीस वेणी न फणी
पाटापाटानं ग
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||२||

सण दसर्‍याचा आता जवळ की ग आला
जत्रंला जावू, खणनारळ वाहू देवी आईला
फुगं ते फोडू पाळण्यात चढू, गुडीशेव खावू यंदाच्याला
फोटू जवा काढू तवा जवळ रहा आक्षी राजाच्या राणीवानी
पाटापाटानं ग
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||३||

न्याहारी करून वावराला निघतो मी सकाळच्याला
झुणका भाकर अन चटणी आन तू दुपारच्याला
भेंडी गवार कारली तोंडली तू खुड, लागंल रातच्याला
फळभाज्या केल्याय घरच्याला, नाही काही विकायला
काळजी नको ग पैका मिळलं पिकं विकूनी मार्केटाला
पाटल्या न ठुशी घेईन मी तुला ग दोन्हीच्या दोन्ही ||४||
पाटापाटानं ग
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी

कोरस (फक्त मुलींचा आवाज) :
पाटापाटानं ग
पाटापाटानं ग वाहतंय झुळझुळ पाणी ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३१/०८/२०११

आला आला रे आला महिना भादवा

आला आला रे आला महिना भादवा

आला आला रे आला महिना भादवा
वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ ||धृ||

श्रावणात घडले फार उपास,
हड्डी नळीसाठी केले नवस खास
पुर्ण जेवणाने उपास आता रे सोडवा
आला आला रे आला महिना भादवा ||१||

गल्ली गल्लीत आपण आता फिरू
टोळी टोळीने एकत्र खेळ खेळू
मोत्या, टिप्याला
कुणीतरी राणी, डॉली भेटवा
आला आला रे आला महिना भादवा ||२||

सरला आता सारा पावसाळा
सुरू झालाय गुलाबी हिवाळा
मस्त थंडीतच वाढतो गोडवा
आला आला रे आला महिना भादवा ||३||

लाज बाळगू नका दिवसा उजेडाची
सुरू व्हा रे सारे वेळ आहे रात्रीची
नव्या उमेदवारांनो डोळे तुमचे मिटवा
आला आला रे आला महिना भादवा
वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ वॉ ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२९/०८/२०११

पावसाचा दरोडा

पावसाचा दरोडा

आला सोसाट्याचा वारा
उठलं धुळीचं रिंगण
झाडझाडोरे हालता
गेल सारं रान पिंजून ||

बांधावर आम्ही उभे
आधार एकमेकांना दोघे
तवाच ढग आले दाटून
गेलं आभाळ फाटून ||

थेंब पावसाचे मोठे द्वाड
अंगावर बसे वादीचा चाबूक
जवा पाहिजे तवा नाही
जवा नको तवा यायची खोड ||

विजा चमकून भिती घालती
काही आगाव भुईला टेकती
वंगाळ भिती मनाला खायी
जिवासाठी आसरा शोधू पाही ||

उघडा सारा रानमाळ
नव्हतं कुणाचं छप्पर
ठिपक्यावानी झाड लिंबांच
सावली देत उभं र्‍हातं ||

तेवढा तोच आधार
तेचा आडोसा घेतला
त्याखाली वल्ले होतो
थेंब जोराचे चुकवत ||

एकाएकी आक्रीत झालं
सन्नकन आला जाळं
डरकाळीच्या आवाजानं
सारं रान हादरलं ||

मघापासून जणू चाटीत होती
जिभल्या तू तुझ्या विजबाई
माझ्यावर आभाळ कोसळलं
कुणाकडे मी पाहू बाई ||

मोठी उलथापालथ झाली
नजरंसमोर घरधनी पडला
एकाएकी प्राण त्याचे गेले
कोळशावानी काळाठिक्कर झाला ||

कारे आवचिंदी पावसा
तू ग भवाने विजबाई
दोघं आले दरोड्याला
नशीब माझं लुटून जाई ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३१/०८/२०११

मोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज)

मोटरसायकलः बजाज बॉक्सर मॉडेल २००० चे, १०० cc
बर्‍याच दिवसापासून माझ्या मोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज) काढायची होती. काल वेळ मिळाला म्हणून गॅरेजमध्ये गेलो. पेट्रोलचे कंटेनर घेतले अन गॅरेजवाल्याला सांगितले की मीच गाडी घेवून अ‍ॅव्हरेज तपासून बघतो. पहिल्यांदा कार्बोरेटरमधले पेट्रोल संपवण्यासाठी पेट्रोल कॉक बंद केला अन एखाद्या कि.मी. पर्यंत गाडी बंद झाली. आयटीआय सिग्नलच्या समोरच काही ट्रॅफीक हवालदार गाड्या अडवत होते. सरळ त्यांच्यासमोरच गाडी बंद झाली. मी गाडी स्टँडला लावली. कंटेनरची नळी इनलेट ला जोडली. पेट्रोल टँक मधून १०० ml पेट्रोल कंटेनर मध्ये काढले मिटरचे रिडींग ५२६.१ घेतले. मोटरसायकल एमाडीसीतून गाडी त्रंबकेश्वराच्या दिशेने चालवायला सुरूवात केली. साधारण ४० कि.मी. स्पिड ठेवायचा असे मनात होते. सातपुरला काही ट्रॅफीक लागले. गियर खाली आणावे लागले. एकदा पाय टेकवून गाडी दोन सेकंदाकरता उभी करावी लागली. त्रंबकविद्यामंदीराच्या ३००/ ३५० मिटर पुढे गाडी बंद झाली. त्यावेळचे ओडोमिटरचे रिडींग ५३५ होते. हे झाले ९ कि.मी. १०० ml साठी. म्हणजे एका लिटरला ९० कि.मी.

एका लिटरला ९० कि.मी. म्हणजे फारच चांगले अ‍ॅव्हरेज आले. मला वेळ होताच. म्हणून अजून पुढे जावून अ‍ॅव्हरेज बघण्याचे ठरविले. पाऊस पडत नव्हताच. म्हणजे पडून गेलेला होता. कारण पावसाळा असून त्रंबकेश्वराला पाऊस नाही असे सहसा होत नाही. सगळीकडे हिरवळ होती. त्रंबकेश्वरचा रस्ता तसा शांत असतो. भाविक लोकांच्या गाड्यांची वर्दळ चालू होती. त्रंबकेश्वराला श्रावणात जाण्याचा हिरवळ, पाऊस हा मोठा फायदा असतो.

परत कंटेनर उघडले अन त्यात टँकमधून १००ml पेट्रोल काढले. गाडी चालवायला सुरूवात केली. महिरावणीच्या थोडे पुढे कंटेनरमधले पेट्रोल संपले म्हणून गाडी बंद झाली. या वेळचे ओडोमिटरचे रिडींग ५४३ होते. म्हणजे ५३५-५४३=८ कि.मी. १०० ml साठी. म्हणजे एका लिटरला ८० कि.मी. यावेळी रस्ता थोडा चढावाचा होता म्हणून मला गाडी थोडी रेस करावी लागली. यावेळी थोडा स्पिड ४० ते ५५ कि.मीच्या दरम्यान होता.

आता मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला घेतली. पुन्हा टँकमधून १००ml पेट्रोल कंटेनरमध्ये काढले अन नाशिकच्या दिशेने माघारी वळालो. आता रस्ता उताराचा होता. त्याचा फायदा घेत मी उतारावर इंजीन बंद करून चालवत असे. यामुळे नक्कीच अ‍ॅव्हरेज वाढ होणार होती. अ‍ॅव्हरेज काढतांना इंजीन तर चालूच पाहीजे. पण नक्की किती अ‍ॅव्हरेज वाढतो ते काढण्यासाठी मी हा प्रयोग करून पाहीला. तसेच या तिसर्‍या वेळी स्पिड सतत ४० वरच ठेवला.
त्रंबकविद्यामंदिराच्या थोडे पुढे मोटरसायकल बंद झाली. रिडींग आले: ५५३.३. म्हणजे ५४३-५५३=१०. म्हणजेच १ लिटरला १०० कि.मी.

लागोपाठ तिन वेळा अ‍ॅव्हरेज काढला त्याचा मध्ये (mean) ९० कि.मी. येतो. (९०+८०+१००/३=९०)

प्रत्येक १००ml पेट्रोल घेण्यात काही त्रूटी लक्षात घेवून, काही तांत्रीक बाबी, हवेचा वेग, मोटरसायकल चालवण्याची पद्धत आदी गोष्टी लक्षात घेवून आपण मिळालेला अ‍ॅव्हरेज आणखी कमी करू. ८५ किमी करू. ८० करू किंवा डोक्यावर पाणी गेले ७५ करू. म्हणजे एकुणच आताच्या घडीला मला चांगला अ‍ॅव्हरेज मिळाला होता.

मुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम

नुकतेच मी अमेरीकेला गेले होते. विमानात काय खावे अन काय नको असला विचार करत मी न लाजता डब्यातल्या दशम्याच खाल्या. विमानात मोठ्या शिस्तीचे कौतूक वाटले. एअरहोस्टेस अगदी लगबग करत होत्या. आमच्या ह्यांनी त्यांच्याकडचेच अन्न खाल्ले. नंतर यांनी त्यांच्याकडे जावून त्यांच्याकडून विमानाची माहिती घेतली.

आमचा मुक्काम माझ्या लेकीकडे इलिनॉय येथे होता. तेथे लेक जावयाचे मोठे प्रशस्त घर आहे. घरात सर्व सोईसुविधा आहेत. अगदी वॉशींग मशीन पासून ते डिशवॉशरपासून ते अगदी ईलेक्ट्रॉनीक टूथब्रशपर्यंत सार्‍या सुविधा घरात आहेत. लेक व जावई दोघेही आयटी कंपनीत आहेत. त्यामुळे मागील महीन्यात मी नातवाला पहायला जोडीने तेथे गेलो होतो. वेळ होताच त्यामुळे पहिल्यांदा न्युयॉर्क शहर बघायला घेतले. क्विन्स डोमेस्टीक ऐअर पोर्टवर आमची सामानाची बॅग सापडत नव्हती. म्हणून आम्ही तेथील काउंटरवर उभे असतांना एक मुलगी आमचे नाव पुकारत आली. तिने इंग्रजीत सांगीतले की आमचे सामान 'Lost & Found' मधल्या केबीन मध्ये आहे. आमच्या जावयांना ते लगेच समजले. ते फार हुशार आहेत. येथे येण्याच्या आधी ते भारतात बंगळूरू येथे कामाला होते. मुलगीही तेथेच कामाला होती. तेथेच त्यांनी एकमेकांचे लग्न जुळवले. असो.

तर थोडक्यात आमचे सामान आम्हाला परत विनासायास मिळाले. आम्ही न्युयॉर्क शहर भटकण्यासाठी काही ठिकाणी टॅक्सी केली तर बर्‍याचदा शहर बससेवा वापरली. शहरबसमधले (City Bus) दरवाजे ड्रायव्हर अ‍ॅटोमॅटीक पद्धतीने उघडतो. येथे तिकीट आधीच काढावे लागते. पुण्यातल्या सिटीबससारखे येथे कंडक्टर नसतात. बस लागली तर ड्रायव्हर प्लॅस्टिकची पिशवी देतो.

M9 या क्रमांकाच्या बसने आम्ही ब्रॉडवे येथे फिरत होते. तेथे एका स्टॉपवर आम्ही उतरून पायी पायी उंच इमारती पाहत चाललो असतांना समोरून एक माणसांचा घोळका येत होता. त्यांच्या डोक्यावर गांधी टोप्या होत्या. हातात तिरंगी ध्वज आणि बॅनर्स होते. आमच्या जावयांना तो ध्वज भारताचा वाटला. त्यांनी तसे मला बोलून दाखवले. आमचे 'हे' म्हणाले की कदाचीत तो नायजर या देशाचा ध्वज असावा. (पण नंतर तो भारताचाच ध्वज होता हे समजले. आमच्या जावयांना दुरूनही ध्वज ओळखता आला त्यामुळे मला त्यांचा अभिमान वाटला. असो.) तो जमाव जवळ आला तर त्यांच्या गांधी टोप्यांवर 'मी आण्णा आहे' असे लिहीलेले होते. म्हणजे ते इंग्रजीत "I am Aana" असेच होते पण वाचकांना समजावे म्हणून मी तसे लिहीले. त्यातील बरेचसे चेहेरे भारतीय होते. आमच्या जावयांनी चौकशी त्यातील लोकांशी चर्चा केली. त्यातून समजले की भारतात त्यावेळी आण्णा हजारेंचे दिल्लीत भ्रष्टाचार, लोकपाल याबाबत उपोषण चालू आहे व येथील भारतीय लोकांनी त्याला पाठींबा म्हणून हा मोर्चा काढला होता. हळूहळू तो मोर्चा पुढे निघून गेला. मलाही त्या मोर्चात जावेसे वाटले पण आम्हाला शहर बघायचे असल्याने तो मोह टाळला.

तो मोर्चा पुढे निघून गेल्यानंतर तेथे एक छोटा ध्वज खाली पडलेला दिसला. तेव्हड्यात आमच्या शेजारी मोर्चा बघत उभा असलेला एक गोरापान अमेरिकन युवक तेथे गेला अन त्याने तो ध्वज उचलला. त्यानंतर तो ध्वज त्याने माझ्या हातात दिला. त्याने मी भारतीय आहे हे माझ्या नेसलेल्या साडीवरून ओळखले असावे असा माझा अंदाज आहे. आम्ही तो ध्वज हातात घेतला व नंतर तो व्यवस्थित घडी घालून आमच्या बॅगेत ठेवला.

एका अमेरिकन युवकाने दुसर्‍या देशाच्या ध्वजालादेखील योग्य सन्मान दिल्याचे पाहून मला त्याचा अभिमान वाटला.

नंतर आम्ही बरीच अमेरीका पाहिली. त्यांच्यावरचे लेख नंतर कधीतरी.

हातामधी घे तू जरा

हातामधी घे तू जरा

हातामधी घे तू जरा गरमागरम तेल
खालून वरून अंगाला माझ्या चोळ ||धृ||

कामाला मी निघतो डबा घेवून सकाळी
तवाच सुरू होते ग माझी पहीली पाळी
उभं राहून लेथमशीन मी चालवतो
हातोड्यानं लोखंडावर दणके मी देतो
कष्टाचं काम आहे हे सारं
नाही काही खायची भेळ ||१||

दुसर्‍या पाळीनं ग माझी लयी व्हती दैना
उन्हातान्हाचा दिस हा जाता जाईना
कामगाराचं जीनं हाय लयी बेकार
राब राब राबवूनी घेई सुपरवायझर
त्याच्यासंग चाले आमचा उंदरामांजराचा खेळ ||२||

तिसरी पाळी तर लयीच महाग आसती
मी तिकडे कामात अन तू झोपून र्‍हाती
तळमळ तळमळ करी नुसता जीव हा माझा
रात्रपाळी विचका करी माझ्या झोपेचा
अंग दाबाया तू जरासाक काढ आता वेळ ||३||

सगळे म्हणती जय जवान जय किसान
कोणी लावती त्याला शेपूट जय विज्ञान
कामगारांकडे पहायला सवड आहे कुणाला
विश्वनिर्माता मोताद झाला भाकरीला
आपलेच आपण निस्तरावे आपले प्रश्न
महागायीच्या दिवसांत साधावा हातातोंडाचा मेळ ||४||

- कामगार पाषाणभेद (दगडफोड्या)
२९/०७/२०११

कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली

कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली

अरे कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली
निट जपून वाढ माझी फाटकी रे झोळी ||धृ||

सकाळीच उठले मी अजाणतेपणी
काय घडेल दिसभर नव्हते ध्यानी
पोट नाही भरले जरी न्याहरी केली
कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||१||

पंचपक्वांन्न आहे सोबतीला शिरापुरी
भरलेलं ताट आले समोर दुपारी
किती खावे किती नको झाले त्यावेळी
कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||२||

कधीतरी आराम मिळो ह्या पोटाला
संध्यासमय जवळ हा आला
पाषाणगवळण तुझ्या चरणी लीन झाली
कान्हा माझ्या भुकेची वेळ आता झाली ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०७/२०११

श्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी

श्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी


आटपाट संकेतस्थळ होतं. आंतरजालावरती त्याचं नाव होतं. तेथे येणारा प्रत्येक सदस्य त्याचप्रमाणे सहज म्हणून येणारा पाहूणा तेथे देहभान विसरत होता. तेथील सुविधांना भुलत होता. देशोदेशातील व्यक्तींना तेथे मुक्त प्रवेश होता. म्हणूनच तेथे अनेक व्यक्तीस्वभावांचे प्रदर्शन भरले होते. असल्याच अनेक व्यक्तींपैकी राजा रवी हा एक तेथील सदस्य होता. तो मोठा पराक्रमी, मानी होता. त्याचा स्वभाव दिलदार होता. पण तो तत्वाला जागणारा होता. आपल्या तत्वाच्या बाहेर काही करण्यास त्याचा नकार असे. साहित्याच्या अनेक प्रांतात त्याचा दबदबा होता. कथा, कविता, कादंबरी, लेख, कलाकुसर आदींमध्ये त्याचा हातखंडा होता. कथा कविता तर तो लिलया रचत असे. कवितांच्या अनेक प्रकारांत सशक्त रचना केल्या होत्या.

राजा रवीची भार्या - राणी रूपमती देखील त्याच संकेतस्थळाची एक सदस्या होती. ती स्वःता रूपगर्वीता तर होतीच पण प्रेमगीते, सौंदर्यशास्त्र त्याचप्रमाणे पाककृतींचे लेख लिहीण्यात तीचा हात धरणारा कुणीही नव्हते. विविध पाककृती बनवणे व त्याचे छायाचित्रासकट वर्णन प्रकाशीत करण्यात ती निपूण होती.

संकेतस्थळांच्या अलिखीत नियमानुसार राजा रवी व त्याची भार्या रुपमती या दोहोंनी अनुक्रमे "राजा भिकारी" व "गणीका" ही खोटी नावे धारण केली होती. दोघेही विवाहकरण्याच्या आधीपासून त्या संकेतस्थळावर येत असल्याने अर्थातच त्यांना संकेतस्थळावरील आपल्या खोट्या नावाची कल्पना नव्हती. असली विचित्र नावे आपण का धारणे केली असे काही प्रश्न अनेक सदस्यांनी त्यांस पुसले असता दोहोंचे उत्तर योगायोगाने, "आमची मर्जी" असेच उमटे.

राजा रवी आणि राणी रुपमती हे दोघे "राजा भिकारी" व "गणीका" या नावांनिशी आपआपल्या साहित्यकृती संकेतस्थळावर प्रकाशीत करीत. एकमेकांच्या परंतु हे करतांना आपण एकमेकांचे पतिपत्नी आहोत याचा त्यांना जराही संशय आला नव्हता. दोघेही एकमेकांना संस्थळावर असतांना अजाणतेपणी इतर सदस्य आहोत असेच समजत.

संकेतस्थळावर इतरांच्या प्रकाशीत झालेल्या व आवडणार्‍या साहित्यकृतींना राजा रवी मनापासून दाद देत असे. त्याच्याही कलाकृतींना इतर सदस्यांकडून प्रतिसाद मिळत असे. भराभर तो लोकप्रिय झाला. थोड्याच कालावधीत "राजा भिकारी" हे नाव संकेतस्थळाच्या प्रत्येक सभासदाच्या लेखी येवू लागले. त्याच्या तत्वाला जागून मात्र एखादी साहित्यकृती न आवडल्यास तो सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त करीत असे.

एकाएकी त्याच्या वैभवाला तडा गेला. तो संकेतस्थळावर सर्वात अप्रिय सदस्य ओळखू जावू लागला. त्याचा स्वभाव तत्वाला चिकटून असण्याचा असल्याने संकेतस्थळावर तो फारसे मित्र जमा करू शकला नव्हता. संकेतस्थळावर तत्वाबाहेरच्या प्रकाशीत झालेल्या लेखाला तो कधीही प्रतिसाद देत नसे. त्याचमुळे संकेतस्थळावर तो दुर्लक्षीत झाल्यासारखा होता. इतर कस नसणार्‍या साहित्याला शंभराच्या वर मिळणारे प्रतिसाद पाहून त्याचे अंत:करण विदीर्ण होत असे. काही काही व्यक्तींच्या किंमत नसलेल्या प्रतिसादालाही त्याच व्यक्तीच्या मित्रांनी दिलेला प्रतिसाद, तसेच न आवडणार्‍या साहित्यालाही मिळणारा उठाव पाहून त्याचे मन खंतावून जात असे. इतर सर्व मित्र सदस्यांनी कोंडाळे करून 'राजा भिकारी' या सदस्यनामाला वाळीत टाकले.

अगदी त्याच वेळी 'गणीका' हे नाव सर्व सदस्यांच्या तोंडी झाले. गणीकेच्या लेखाला पैशाला पासरी असल्या मापात प्रतिसाद मिळू लागले. गणीकेची लोकप्रियता पाहून व आपल्या नावाचे पुर्वीचे वैभव लयाला गेलेले पाहून प्रत्यक्षातला राजा रवी दु:खी राहू लागला. इतर सर्व सदस्यांनी केलेले कोंडाळे कसे फोडावे असा प्रश्न त्याच्या मनी दिवसारात्री येवू लागला. दिवसेंदिवस तोच तोच विचार करून राजा रवीची प्रकृती खंगू लागली. प्रत्यक्ष घरातही त्याची वागणूक बदलली. राणी रूपमतीस तो दुरूत्तरे देवून बोलू लागला. घरात आदळआपट करू लागला.

प्रत्यक्षात असणार्‍या राणी रुपमतीनेही पती राजा रवीस त्याच्या वागणूकीबद्दल, प्रकृतीबद्दल खोदून खोदून विचारले तरीही त्याने आपले मन तिजपाशी मोकळे केले नाही.

एके दिवशी सदनातील एका खोलीत राजा रवीने हातसंगणक घेवून संस्थळावर प्रवेश केला. त्याच सुमारास दुसर्‍या खोलीत राणी रुपमतीदेखील मेजसंगणकाद्वारे संस्थळावर प्रवेशकर्ती झाली होती. दोघेही एकमेकांना संकेतस्थळाच्या माध्यमातून न्हाहाळीतून न्हाहळत होते. त्याच वेळी राजा भिकारीस गणीकेच्या प्रसिद्धीबाबतचा विचार मनात आला. त्याने तडक गणीकेस विचारले 'हे गणीके तुला संकेतस्थळावर मिळणार्‍या उदंड प्रसिद्धीचे काय रहस्य आहे? असे कोणते कारण आहे की ज्या योगे तूला एवढी मोठी प्रसिद्धी मिळते? तुझ्या लेखाला एवढे भरभरून प्रतिसाद कसे मिळतात? प्रसिद्धीस्तव तू जे काही करते त्याबाबत तू मला सांगीतले तर मी धन्य होईन.'

गणीकेने राजा भिकारीची मनस्थीती ओळखली. लेखनाच्या माध्यमात ती त्यास चांगल्याप्रकारे ओळखत होती. ती म्हणाली, 'हे राजन, मी जरी गणीका नाम धारण केले असले तरी मी फार मानाची स्री आहे. मी एक "वर्षभर प्रसिद्ध नारायणाचे" व्रत करते. त्या योगे मी संकेतस्थळावर एक प्रसिद्ध गणीका म्हणून नावारूपाला आले आहे.'

राजा भिकारीसही त्या व्रताची माहीती घेवूशी वाटली. तो पुसता झाला, 'हे गणीके, हे "वर्षभर प्रसिद्ध नारायणाचे" व्रत काय आहे? ते कसे करतात? ते केल्याने काय फल मिळते? या सर्वाची माहीती तू मजप्रत कथीत करावी.'

गणीका उत्तरती झाली की, 'हे राजा भिकारी, हे व्रत फार कठीण आहे. या व्रतात आपली तत्वे बाजूस ठेवून अतीसामान्य मानवयोनीच्या मानवाप्रमाणे वागावे लागते. यात आपल्या तत्वांना मुरड बसल्याने आपण कदाचित दु:खी कष्टी होवू शकतो. '

राजा भिकारी पुर्वीचे वैभव प्राप्त करण्यास उताविळ झाला असल्याने त्याने सांगितले की, 'गणीके, तू सांगशील त्या प्रमाणे मी हे "वर्षभर प्रसिद्ध नारायणाचे" व्रत करण्यास तयार आहे. तस्मात तू ह्या व्रताची माहीती द्यावी.'

गणीकेने राजा रवीची "वर्षभर प्रसिद्ध नारायण" व्रताची माहीती घेण्याची व्याकूळता जाणीली. तिने त्यास सांगितले की, 'ह्या व्रताची सुरूवात श्रावण महिन्याच्या आधी येणार्‍या दिप आवसेच्या दिवसापासून करावी. या आवसेस काही जण गटारी आमावस्या असेही संबोधतात. या दिवशी प्रात:काळापासून आपले संस्थळावरील मित्र गोळा करावे. त्यास निरोप धाडावे. सर्व मित्र गोळा झाले की त्यांचे कोंडाळे तयार करावे. आपल्या या कोंडाळ्याने मग सुरूवातीस उलीशीक मदिरा घ्यावी. तिचे सामुदायिक मदिरापान करावे. त्या सामुदायिक मदिरापानाचे प्रकाशचित्रासहीत वर्णन संकेतस्थळावर प्रकाशित करावे. त्यानंतर येणार्‍या श्रावण मासात पाउस थोडा कमी होत असल्याने वातावरण तयार झालेले असते. त्याच समयाला एखाद्या पावसाळी जागी सर्व कोंडाळ्याने जमावे. तेथे जास्त मदिरापानाची व्यवस्था करावी. एकमेकांची खिल्ली उडवून मौज करावी. त्याचेही वर्णन साग्रसंगीत प्रकाशित करावे. हे सर्व करतांना इतर सदस्यांच्या बिनमौलीक लेखालाही भरभरून प्रतिसाद द्यावा. दोन प्रतिसाद आपण द्यावे, चार प्रतिसाद इतरांचे घ्यावे. एकाच ओळीचा धागा असेल तरीही त्यास शंभरी प्रतिसाद देण्यासाठी अडेलतट्टू प्रतिसाद द्यावा. वेगवेगळे सदस्यनाम धारण करून आपल्याच धाग्यास विरोधी सुर लावुन प्रतिसाद द्यावा जेणेकरून धाग्यावर खळबळ माजेल. सुरूवातीस उलीशीक असलेली मदिरेचे प्रमाण आता जास्त करावे. मित्र परिवार जमवून कोंडाळे करावे. नविन साहित्य लिहील्यास त्याचा खाजगी निरोप प्रत्येक सदस्याला पाठवून प्रतिसाद देण्यास सांगावे. त्यायोगे तुझ्या साहित्यकृतीस उठाव मिळेल. पुढील वर्षी येणार्‍या दिप आवसेच्या दिवशी या "वर्षभर प्रसिद्ध नारायण" व्रताची सांगता मदिरेचे आचमने करून करावी.'

गणीकेचे हे सर्व कथन ऐकून राजा भिकारी भारीत झाला. लगोलग येणार्‍या श्रावणमासाच्या आधीच्या आवसेस त्याने संकेतस्थळ सदस्यांचे कोंडाळे करण्याची पुर्वतयारी केली. मदिरापानाबरोबरच त्याने समिष खाण्याचीही व्यवस्था केली. सर्व सदस्यांनी चांगलाच आनंद मिळविला. त्या आनंदामुळे राजा भिकारी हे सदस्यनाम ज्याच्या त्याच्या तोंडी झाले. त्याच्या भरताड, सुमार लेखांनाही भरभरून पन्नासी - शंभरी प्रतिसाद मिळू लागले. नंतर श्रावणमासात पावसाचा आनंद मिळविण्यासाठी सर्व सदस्यांना राजा भिकारीने लोणागोळा येथे सहलीचे आयोजन केले. असे आचरण राजा भिकारीने वर्षभर केले.

राजा रवीने मनापासून "वर्षभर प्रसिद्ध नारायण" व्रत केल्याने त्यास प्रसिद्ध नारायण प्रसन्न झाला. राजा भिकारी म्हणजेच प्रत्यक्षात असणार्‍या राजा रवीही प्रत्यक्षात आनंदी राहू लागला. पुर्वीच्याच प्रसिद्धीचे वैभव आता त्यास पुन:प्राप्त झाले होते. घरातील वागणूक व राजा रवीची प्रकृतीही सुधारली होती. हा सर्व बदल पाहून राणी रुपमतीही आनंदी झाली होती. राजा भिकारी नामक असणारा सदस्य म्हणजेच आपला पति राजा रवीच आहे याची तिला खात्री झाली होती. पण खरी गोम तिने राजा रवीला सांगितली नव्हती.

असे करता करता वर्ष सरत आले. राजा भिकारीच्या "वर्षभर प्रसिद्ध नारायणाच्या" व्रताच्या उद्यापनाची वेळ आली. त्यावेळेच्या उद्यापनाच्या अंतिम कोंडाळा मेळाव्याच्या लोणागोळा येथील आयोजनासाठी राजा भिकारीने संकेतस्थळाच्या सर्व सदस्यांना आमंत्रीत केले. त्यात गणीकेसही आवर्जून येण्याची विनंती केली.

प्रत्यक्षात राजा रवीने राणी रुपमतीसही लोणागोळा येथे येण्यास विनवीले. त्याच मेळाव्यात गणीकेने आपणच राजा भिकारीची पत्नी असल्याचे जाहिर केले. आता खोटे नाम धारण करण्यात काही हशील नाही असा विचार करून राणी रुपमतीने आपले संकेतस्थळावरील 'गणीका' हे सदस्यनाम व राजा रवीने 'राजा भिकारी' हे सदस्यनाम खोडून टाकले व आपापली खरी नावे धारण केली व ते सुखी झाले.

प्रसिद्ध नारायण जसा राजा भिकारीस पावला तसा तुम्हा आम्हा सर्वांना पावो हि प्रार्थना. हि साठाउत्तराची कहाणी पाचाउत्तरी सुफळ संपुर्ण.

शुभं भवतू:

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०७/२०११

किती सजवू मी माझं मला

किती सजवू मी माझं मला

किती सजवू मी माझं मला
मन रिंगण घाली तूला ||धृ||

आरसा समोर उभी राहून
वेणी घातली गजरा माळून
फुले सुगंधी डोई शोभती
भुलली मी त्या गंधाला ||१||

गळा रत्नमाळा हलती डुलती
हाती कांकणे किणकिणती
कर्णभुषणे शोभती कानी
कपाळी खुलतो टिळा ||२||

सुवर्णकांचन सुगंधदर्वळ
आनंदाचे फुलले परिमळ
उंची वस्त्रे रेशीम स्पर्शी
पांघरले शुभ्र शरीरा ||३||

शृंगारूनी शरीरा मन प्रसन्न झाले
मजसमीप हर्षाचे वारे वाहीले
लवकरी येवूनी मिठीत घेवून
साजरे कर धुंद क्षणांना ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२१/०७/२०११

मरणाची अवस्था

विषय तसा बोजड, सर्वसामान्यांना न आवडणारा आहे.

या पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक सजीव कधीना कधी मरतोच. त्याच्या मरण्याच्या तर्‍हा, कारणे वेगवेगळी असू शकतात. पण होणारा मृत्यू एक शाश्वत घटना असते.

एकांतात मनात मृत्यूविषयी विचार कधीकधी येतात. रातीच्या वेळी अर्धवट झोपेत कधीकधी मरतांनाची स्थितीची कल्पना येवू शकते. माझा झोपेत श्वास अडकतो. झोपेत चुकून छातीवर झोपल्या गेले तर हमखास असे होते. मोठ्याने ओरडून जागे व्हावे लागते. नेटवर पाहिले असता जीभ मागे जावून श्वासमार्गात अडथळा आणते असे काहीतरी आजाराचे स्वरूप आहे. अर्थात मला त्यावर उपाय काय असले काही येथे विचारायचे नाही.

तर येणारा मृत्यू, त्यावेळची मनाची अवस्था काही मृत्यूबाबतीत फारच भयानक असू शकते. एकतर मानवाला बुद्धी अन स्मृती यांची देणगी आहे. त्यामुळे आपण मर्त्य लोक त्याचा विचार करू शकतो. पशू पक्षी यांना मरणाच्यावेळी वेदना होत असतीलच पण संवेदना फारशा येत नसाव्यात किंवा बुद्धी अन स्मृती त्याच्या आड येत नसाव्यात.

म्हातारपणी आजारपणातून येणारा मृत्यू फारच वेदना देत असतो. खंगत खंगत मरणे, मरणाची वाट पाहत झिजून मरणे या अवस्था भयानक असतात. कायद्याने इच्छामरण नाही. तसे ते नसावेही या मताची मी आहे. एखाद्याला म्हातारपणी मृत्यूला कवटाळायचेच असेल पण शरीराचे शक्यते हाल न व्हावे, संवेदना न व्हाव्यात अन शांतपणे मृत्यूच्या अधीन व्हावे यासाठी काही उपाय निश्चीतच मानव संस्कृतीत आहेत. जैन लोकांमध्ये ती उपवासांची पद्धत आहे (नाव आठवत नाही). आपल्याकडेही संजीवन समाधी आहेच.

याबाबत अधीक माहीती काय आहे?

साडीखरेदीला येताय नं?

कालच मी साडी खरेदीसाठी गेले होते. आताशा पावसाळा चालू आहे. पावसाळ्यात कपडे, साड्या, चपला, कुकर आदींवर फ्लॅट डिस्कांउंट सेल निरनिराळ्या दुकांनात चालू होतात. कधी ५० टक्यांपर्यंत तर कधीकधी काही ठिकाणी पुर्ण ५०% डिस्कांउंट सेल लागतात. रस्त्याने जातांना मला तसल्या दुकानांवरील पाट्या पाहून ड्रायव्हरला 'गाडी तेथल्यातेथे उभी कर', असे सांगावे लागते. नाहीतरी आमच्या ह्यांना माझे 'सेल खरेदीचे' वेड माहीतच आहे. नविनच लग्न झाले त्यावेळी सुरूवातीला ते माझ्या बरोबर खरेदीला येत. पण नंतर नंतर त्यांचे माझ्याबरोबर येणे कमी झाले अन आमच्या भिशी क्लबातल्या एखाद्या मेंबरचे येणे माझ्याबरोबर वाढले. कधीकधी मीही आमच्या क्लबाच्या मैत्रीणींबरोबर उगाचच खरेदीला जाते. मला खरेदी करायची नसते पण त्यांच्याबरोबर असतांना एखादी साडी, एखादा ड्रेसमटेरीयल, एखादी कुकींग रेंज, बोनचायना सेट, एखादी चप्पल, एखादे बेडशीट आवडून जाते अन मग हात मागे घेववत. नाही. आता आपल्याला आवडलेली वस्तू खरेदी केली तर त्यात काय वावगं आहे का? घरचे मात्र कधीकधी उगाचच 'हे का आणलंस, ते का आणलंस' असं करत बसतात. मला बाई असलं काही बोललेलं आवडत नाही. मग राग घालवण्यासाठी पुन्हा एखाद्या साडीखरेदीसाठी मी बाहेर पडते.

आजकाला बाजारात कितीतरी नवनविन साड्या आल्यात नाही? बाई बाई बाई! माझे तर डोळेच आ वासतात असल्या साड्या पाहून! अहो तुम्हाला सांगते प्युअर जॉर्जेट, प्युअर शिफॉन, प्युअर क्रेप, प्युअर सिल्क, फ्लॉ जॉर्जेट, फ्लॉ शिफॉन, फ्लॉ क्रेप, फ्लॉ सिल्क, आर्ट सिल्क असले काय काय प्रकार पाहून मला आनंदाचे भरते येते. काय घेवू अन काय नको असे होवून जाते. त्यात पुन्हा कॉटन, ज्यूट, ब्रासो, सॅटीन, ब्रोकेड, टसर, लायका, शिमर, विस्कस सिल्क कॉटन, खादी, वेल्हेट, लिनेने आदी प्रकार तर आहेतच. आणि तुम्हाला म्हणून सांगते कुणाला सांगू नका. त्या सिरीयल्स मधल्या साड्याही जाम भारी असतात. अशा डिझायनर साड्या तर मला जाम आवडतात. गेल्याच आठवड्यात मी एक मेहेंदी साडी घेतली होती. आता मला वेडींग साडी, एखादी ब्रायडल साडी, टेंपल विअर, किटी पार्टी विअर, नवरात्री साडी असल्या प्रत्येकी एक अशा साड्या खरेदी करायच्या आहेत.

मागे मी जोधा अकबर साडी घेतली होती. मला तिचा रंग काही पसंत पडला नव्हता तरी आपल्याकडे असावी म्हणून घेतली होती. मला त्यातल्या त्यात देवदास व सावरीयां साडी आवडली होती. लव्ह आजकल चे मटेरीयल चांगले नव्हते तर रावण फारच गुळगुळीत होती. आजची नेसलेली साडी 'आय हेट लव्ह स्टोरीज' मात्र सुळसुळीत आहे. बघाना बाहेर इतका पाऊस पडतोय पण इच्यावर थोडेही शिंतोडे उडालेले नाहीत. मला असल्याच बॉलीवुड साड्या जास्त पसंत आहेत.

ड्रेस मटेरीयल म्हणाल तर मला डिझायनर सलवार कमीज जास्त आवडतात. कॉटन तसेच शिफॉन मटेरीयल मधल्या कुर्तीज मस्त असतात. कालच मी एक रेडीमेड अनारकली सुट घेतलाय. आता त्यावर दुपट्टा बदलायचा विचार करतेय.

चला, मी काय बोलत बसलेय तुमच्याबरोबर. नाहीतर असं करा ना, माझी मैत्रीण आज माझ्याबरोबर येत नाहीये. मग तुम्हीच चला ना माझ्याबरोबर साडी खरेदीसाठी. आपल्या गप्पाही होतील अन खरेदीही! काय?

देशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा

देशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा

तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू ||धृ||

कित्येक लढले याच्यासाठी
कितीकांनी दिधले प्राण
याच्याचसाठी कितीकांनी
फासात घातली मान
देवासमान हा आम्हास
त्याचा मान आम्ही राखू ||१||

क्रांतीकारी अन समाजसेवक
हाती घेवून जातसे चालत
शत्रूच्याही उरात बसती
उंच पाहून याला धडकी
न राहू मागे आपण
चला बळ तिरंग्याचे आपण दावू ||२||

युद्ध जरी हो आज नसले
भय देशावरी रोजच कसले
दहशत घालती दहशतवादी
फुकाची करती वादावादी
झाला तिरंगा निमीत्त केवळ
वाद सारे आता बाजू सारून देवू ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१५/०६/२०११

हायकू १

हायकू १

एक फुलपाखरू दगडावर बसलं
मनात म्हणालं
कसं फसवलं

मातीमधली ढेकळं काळी
पिवून पावसाचं पानी
व्हत्यात मातीवानी

कुकुचकु कुकुचकु
कोंबडा ओरडतोय कुकुचकु
तेच आहे का त्याचे हायकू?

दरीच्याच काठावर
घसा खरडून ओरडतोय
माझाच आवाज परत येतोय

सांजचा सुर्य
क्षितीजावर बुडला
किनार्‍यावर दगड रडला

हिरवे रान हिरवेगार
पाउस नव्हता तर
पिवळेशार पिवळेशार

समाधी लागावी म्हणून
डोंगरावरचे देवूळ
अंधारात जाते बुडून

पाखरांचा थवा पोटासाठी
सकाळी घरट्यातून उडतो
सायंकाळी परत येतो

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/०६/२०११

जय जय लंबोदरा

जय जय लंबोदरा

जय जय लंबोदरा
आदीदेव तू विद्यासागरा
लवकरी ये संकटहरा
जय जय लंबोदरा ||धृ||

विनंती आमची तुझीया ठायी
करीतो आर्जव नमीतो पायी
सकल कार्य नेई सिद्धीस
आशिर्वाद देण्या त्वरा करा ||१||

रूप अन गुण तुझे कितीक वर्णू
मुढ बालके आम्ही, तू कृपासिंधू
फळ द्यावया कष्टास आमच्या
करीतो आम्ही तुझा पुकारा ||२||

जय जय लंबोदरा
आदीदेव तू विद्यासागरा
लवकरी ये संकटहरा
जय जय लंबोदरा ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१३/०६/२०११

दिसभर उन्हातान्हात

दिसभर उन्हातान्हात

दिसभर उन्हातान्हात
तोड केली जंगलाची
बाभळीचा काटा रुतला
धार काढली रक्ताची

जीव जगवला खावून
कोरडी भाकरी चटणी
तहान भागवाया
आहे ओढ्याचे पाणी

साता महिन्यांची
घरधनीन पोटूशी
तिला कसं आनू संगती?
ती तर पोटाने उपाशी

मोळी वाळल्या लाकडांची
जाईल का विकून?
तेल मिठ मिरची आणायाला
पैसं मिळलं का त्यातून?

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०६/०६/२०११

Sunday, September 4, 2011

जो तो येतो मारून जातो

जो तो येतो मारून जातो

जो तो येतो मारून जातो,
जो तो येतो त्याला खेळून जातो,
बोलत नाही गरीब बिचारा मुका
तो तर तेव्हा करतो काय?
जेव्हा बॉलला बॉलर लावतात थुका ||धृ||

तो हातात धरून जोरात चोळतात
त्याला वरती फेकून खाली झेलतात
पायी घासून घासून
पायी घासून घासून
रंग त्याचा जाईल बरका! ||१||

त्याला पकडाया सगळे पुढेच पळती
हाती घ्यायला सारेच जोरात धावती
सोडू नका हो कुणीही त्याला
बोलती होणार्‍या धावा रोका ||२||

तो पहा बॉलरने बॉल आता बघा की हो टाकला
बघा बॅट्समनने अस्सा फटका त्याला हो मारला
जोरात फटका लागला त्याला
जोरात फटका लागला हो त्याला
पण सीमेपार जावू देवू नका ||३||

या मैदानी गवत किती किती तयार झाले
त्यावर पाणी मारून मारून ताजे ताजे केले
बॉल हळूवार आता हातळा
बॉल हळूवार आता हो हातळा
शेवटी रूप रंग त्याचे राखा ||४||

किती गुणाचा मानाचा गोल बॉल हा असतो
त्याच्यावाचून क्रिकेट खेळ सुरू होतच नसतो
विसरू नका कधीही त्याला
विसरू नका हो कधीही त्याला
त्याच्यासमोर तुम्ही एकदा झुका ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०५/२०११

मी बत्तासा गोल गोल

मी बत्तासा गोल गोल

तो:
नको भांडण तंटा नको त्या बारा भानगडी
नको झगडा करू अन नको कोणती लफडी
गुण्यागोविंदानं राहू आपण दोघे
मी बत्तासा गोल गोल अन तू माझी गोड रेवडी ||धृ||

तो:
लक्ष्मी आहे तू ग माझी अन नारायण मी ग तूझा
शोभणारा जोडा आपला नाही संशय कसला त्याचा
सारं गाव बोलेल ही फार गुणी आहे जोडी
गुण्यागोविंदानं राहू आपण दोघे
मी बत्तासा गोल गोल अन तू माझी गोड रेवडी ||१||

ती:
राग हो कसला प्रेम हे आहे माझे तुमच्यावर
तुमची मी अन माझे तुम्ही झाले लग्न झाल्यावर
उगाच नका राग कसला धरू आता तुम्ही मनी
गुण्यागोविंदानं राहू आपण दोघे
तुम्ही बत्तासा गोल गोल अन मी तुमची गोड रेवडी ||२||

तो:
वागू नको आता बेगडी; ये ग थोडं लाडीगोडी
करू थोड्या तडजोडी; लग्नाची पडली बेडी
नवरा बायको दोघं ओढू या संसाराची गाडी
गुण्यागोविंदानं राहू आपण दोघे
मी बत्तासा गोल गोल अन तू माझी गोड रेवडी ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२९/०५/२०११

मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?


मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?

मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
खाता नही पिता नही
बंद पडलीय त्याची वाचा ||धृ||

अब मै क्या करू उसको?
नही डाक्टर दिखानेको
तेरे आंगनमे वो जाताय
कुकुचकु कुकुचकु वो वरडताय
मेरा दानापानी नही उसको भाता
अरे मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा? ||१||

देख हळुहळु तो कसा भागताय
लई उदास उदास दिखताय
चोच उघडी रखके तो बसतोय
नही फडफड फडफड करताय
अब्बी तुच हैरे बाबा उसका दाता
मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा? ||२||

मै क्या बोलतोय अब तू ध्यानसे सुन चाचा
ये मुर्गा और तेरी मुर्गीपे प्रसंग आयेलाय बाका
अरे दोनो का भिड गया आपसमें टाका
अंधेरेमे जाके घेती एकमेकका मुका
ये प्रेमीयोंके बीचमे आता कोनी येवू नका
अबी दोनोके शादीका टैम आयेला है बरका
मेरे मुर्गे को प्यार हुवा है रे चाचा ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०५/२०११

लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी

लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी

किती दिस झालं, आठवंना सालं
गोष्ट सांगतो मी खरीखुरी;
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||धृ||

हि असली कसली चढती महागाई
वाढत्या भावानं जीव निघून जाई
पहिल्या आठवड्यात पगार संपतो
बँक खाते अन खिसा रिकामा होतो
पैसा जावून मी जणू होतो भिकारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||१||

ह्या भाववाढीनं डोकं वर काढलं
महागाईनं आगीत तेल टाकलं
पेट्रोल सत्तर रूपये लिटर झालं
गरीबीत दिवस काढणं आलं
उसनवारी करावी लागती दारोदारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||२||

चांगलचुंगलं पोटात आता जाईना
पोरासोरांची हौस करता येईना
बायकोला सांगावं तरी काय?
गेला माझाच फाटक्यात पाय
अशीच स्थिती आहे शेजारीपाजारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||३||

महिन्याला पडतं कोनी आजारी
आठवड्याला येती पैपाव्हनं घरी
कमाईला माझे दोन हातं राहती
खायला रावनाचे दहा तोंडं असती
रिकाम्या खिशानं कसा जावू बाजारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||४||

करता येत नाही वरकमाई मला
नाही कसला जोडधंदा करायला
कामगाराची नोकरी करतो मी आता
नाही सहावा वेतन आयोग, महागाई भत्ता
रातंदिस करावी लागे कंपनीत रोजंदारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||५||

आसं वाटतं व्हावं आपन पुढारी
नाहीतर व्हावं गुंड अन मवाली
त्यांची जात असते लई माजोरी
जनतेचं पैसं खावून करती शिरजोरी
पर गरीबाला नाही कोणी वाली
त्याचं होत नाही कोणी कैवारी
म्हनून मी रोज अंथरून पाहून पाय पसरी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||६||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०५/२०११

डाल ग कोंबडी डाल

डाल ग कोंबडी डाल

डाल ग कोंबडी डाल, तू लवकर कोंबडी डाल ग
अंड खायाला मिळना म्हणून व्हत्यात लई हाल ग ||धृ||

चोच बारीक लाल लाल पिसं
पळतीया कुठं, पकड निट
हाती धरून आण तिला इथं
नको करू तिच्या जिवाचे हालं ग
डाल ग कोंबडी डाल तू लवकर कोंबडी डाल ग
अंड खायाला मिळना म्हणून व्हत्यात लई हाल ग ||१||

तुरेवाल्या कोंबड्याला कोंबडी लई ग प्यारी
दानं घाल दोघांना, झाली आपली न्याहारी
पानी प्यायाला निर्मळ घाल पारातीत
पोरासोरांना खेळू नको देवू तिथं
एकांत मिळू दे दोघांना आता
कुत्रं मांजर तू लांब हाकलं ग
डाल ग कोंबडी डाल तू लवकर कोंबडी डाल ग ||२||

अंडी, चिकन, आक्खी कोंबडी
बाजारात विकाया मी जाई
त्याच्या मधूनच होई कमाई
किराणामाल घरी घेवून येई
तयार रहा, वाजलेका सहा
ताट वाढून ठेव, मला लई भुक लागलं ग
डाल ग कोंबडी डाल तू लवकर कोंबडी डाल ग ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२१/०५/२०११

नखरा नाही इतका बरा

नखरा नाही इतका बरा

वेडं होईल कुणीही तुझ्या डोईचा गजरा पाहून
नखरा नाही इतका बरा ठेव हातचं थोडं राखून ||धृ||

अगदी सकाळी इतकी सजली
नाही कसर तू ठेवली कसली
मोगर्‍याची फुले वेणीत माळली
सुगंधी मन माझे कसे ठेवू मी झाकून ||१||

कुणी रंभा म्हणू की अप्सरा स्वर्गाची
तूला बघताच होई तगमग जीवाची
दागदागीने घालून रस्त्याने चालली
मागे नको ग पाहू अशी मान वळवून ||२||

तुझ्या नजरेला माझी नजर भिडली
पिवळ्या केवडी रंगानं जादू केली
प्रित दोन जीवांची जुळू लागली
नको झुरवू आता दुर उभी राहून ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२०/०५/२०११

क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य

क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य

क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य
माझे काळीज मोडून

खडकावरल्या फेसाळ लाटा
पाय धुवूनी जात होत्या
त्याही मागे सरल्या आता
आली ओहोटी म्हणून

शुभ्र पांढरी मऊ रेती
पायाखाली येत होती
ढिगारा त्या रेतीचा
आताच गेला कोसळून

कोण, कोणाचा,कुठला, मी, तो?
कशास धरूनी चालत होतो?
समोर आता तांबड काळसर
आकाश नुरले सारे व्यापून

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/०४/२०११

नाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली

नाट्यगीत: अशी कशी ही पिढी नेटावली

अशी कशी ही पिढी नेटावली हो.....
अशी कशी ही पिढी नेटावली
इंटरनेटी जाळ्यात अडकली
अशी कशी ही पिढी नेटावली ||धृ||

पुरत नाही दिवस काही
रात्रीही तीच कथा होई
डोके राहूनी स्क्रिन समोरी
किबोर्ड सतत बडवती ||१||

खाणे नाही नाही पिणे नाही
आईबापा संगे बोलणे नाही
बंधूभगीनी संगे बोलणे नाही
हेडफोन लावूनी कानी
आ आ आ आ आ आ आ
हेडफोन लावूनी कानी
गाणे कसले गुणगुणती ||२||

फेसबुक नका म्हणू तुम्ही
अहो ट्विटर नका म्हणू तुम्ही
या सार्‍या सोशल मेडीया सायटी
मिळोनी सारे मित्र येथे
हो..... मिळोनी सारे मित्र येथे
एकमेकासंगे चॅटती ||३||

त्यातच तो स्मार्टफोन आला
इंटरनेटला कनेक्ट झाला
हातामध्ये नवे शत्र जणू
वापरीत रस्त्याने चालती ||४||

एसेमेस ठरले लघूलीपी बोलणे
हसण्या, रूसण्या स्मायली पाठवणे
एमेन्सी, आयटीत नोकरी करणे
ऑनलाईनी सामान मागवणे
काय तर्‍हा एकेके सांगू
पाषाणाची मती गुंगली ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१०/०५/२०११

Friday, September 2, 2011

Two Friends

Two Friends

Little John was thin and boney;
His fat friend had a name Tony ||1||

Once both were gone in the woods;
They had school bags without any food ||2||

Tony feels hungry in the after noon;
John said I'll get the food very soon ||3||

John climbs on a Mango tree as he saw;
a watchman came while plucking up mangoes raw ||4||

John jumped down and ran away fast;
Watchman caught Tony at the last ||5||

- Pashanbhed (Stone breaker)
07/05/2011
4:15AM


"अर्रर्रर्रर्र... हे काय मराठी संस्थळावर चक्क विंग्रजी कविता. संपादक महोदय, काय चाललेय हे! लगेच उडवा तिला अन त्या मुर्ख पाषाणभेदाला समज द्या जरा."

अरे हो... हो... जरा माझे काही ऐकाल काय?
अहो, सहज म्हणून मी Two Friends लिहीली. पण मला ती येथे टाकता आली नाही. म्हणून मी खालील प्रमाणे तीचा मराठी अनूवाद केला अन ती कविताही खाली देत आहे. आता झाले ना समाधान!

दोन मित्र

छोटा जॉन बारीक अन हाडकूळा होता;
त्याचा मित्र मात्र टोनी जाडजूड होता ||१||

एकदा ते दोघे जंगलात गेले;
शाळेच्या पिशवीत रिकामे डबे नेले ! ||२||

खुप भुक लागली दुपारी टोनीला;
जॉन म्हणाला मी शोधतो काहीतरी खायला ||३||

जॉन एका आंब्याच्या झाडावर चढला;
कैर्‍या तोडत असतांना रखवालदार आला ||४||

जॉनने मारली खाली उडी अन पळून गेला;
रखवालदारच्या ताब्यात मात्र बिचारा टोनी आला ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०५/२०११
सकाळी ५:२७

वाडा

वाडा

जुन्या जाणत्या भल्या थोरल्या गोष्टी सार्‍या सरल्या
खोबणीतले डोळे पांढरे झाले, जाणीवा जणू मेल्या ||१||

काळोखाच्या गर्दीमध्ये हरवले त्याचे दिसणे
कुठे कसे पहावे अन काय वर्णन वदावे मुखाने ||२||

डोळ्यांत घातले अंजन जरी, न दिसे जमीन खाली
कुरकुरणार्‍या दरवाजांवर कड्याकुलूपांनी नक्षी केली ||३||

ओट्यावरचे दगड कालचे, चालले पायात खाली
खांबांवरची कोरीवकामे अजगरासम सरपटली ||४||

ओलावलेल्या भिंती ल्याल्या रंगाचे उडालेले पोपडे
कंदील नाही उजेडाला म्हणून काळवंडले कोनाडे ||६||

डुगडुगणार्‍या जिर्ण पायर्‍या जिना वर घेवून चालला
निखळलेले लाकूड कधीचे आता न देई आधार हाताला ||७||

हादर्‍याने पडते खाली पाटाईतून भुरभुर माती
तिलाही आता घाई झाली मातीतच जाण्याची ||८||

खोल्या असतील अनेक जरी, लागून एकमेकांना
सख्या बहीणी शोभत होत्या, भिंत भिंतीच्या पाठीला ||९||

कित्येक कुटूंबे येथे आली, वेलीवर फुले फुलवून गेली
आधारवड आता कोसळू पाहते, बांडगूळांची चैन झाली ||१०||

कधीकाळाचे असलेले वैभव, गेले आज लयाला
विरपुरूष जणू सैन्यातला, शर्थ केली लढायला ||११||

आता लगेच पाडतील जुन्यापान्या विस्तीर्ण वाड्याला
मढ्यावरचे लोणी आयतेच मिळे इमारत बांधणार्‍याला ||१२||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०४/०५/२०११

आले आले आमचे स्वामी बाबा आले

आले आले आमचे स्वामी बाबा आले

जय महाराष्ट्र!
कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!

llपुण्याचे पेशवेll यांनी या प्रतिसादात (http://www.misalpav.com/node/17833#comment-310480) बाबा-महाराज लोकांच्या प्रवृत्तीवर काहीतरी जागृती होण्यासाठी काहीतरी लिहीण्याचे सांगितले होते. त्यांची आज्ञा आम्हास मान्य असल्याने खालील काव्य लिहीण्यात आले. असलेच एक काव्य आधीही लिहीले आहे. (फसू नका तुम्ही फसू नका: https://mimarathi.net/~mimarath/node/3678).

हे काव्य llपुण्याचे पेशवेll यांना डेडीकेट केले आहे.


आले आले आले आले आले आले
आले आले आमचे महाराज आले
आले आले आमचे स्वामी बाबा आले
विवेक, श्रद्धा, बुद्धी पळोनीया गेले
आले आले आमचे महाराज आले ||धृ||
ह्हो!

झिलकरी:
इतके सारे महाराज असतांना आत्ता हे नवीन महाराज कोण आले?

अरे मुर्खा, हे महाराज म्हणजे साक्षात परमेश्वर ओळखले जातात बरं. त्यांचे चमत्कार तर पहा किती आहेत ते-

चुटकीतूनी ते भस्म काढती
हात फिरवूनी अंगठी मिळवीती
अंगारा देवूनी रोग करती बरा
धुपारा घेवूनी रोगी जाय घरा
दरबारी यांच्या काळजी नाही जरा
समस्या सोडवीण्याच्या नाना तर्‍हा
असल्या बाबांमुळे डॉक्टरांचे धंदे बसले
आले आले आमचे महाराज आले
आले आले आमचे स्वामी बाबा आले ||१||

झिलकरी:
आरं तिच्या, लईच पावरबाज हाय की ह्ये म्हाराज!

तूला काय झालं आहे काय?
परिक्षेत पास होत नाहीस काय?
की तूझे लग्न होत नाही काय?
की तुझा धंदा तोट्यात जाय?
की तु मंत्री होत नाहीस काय?
की निकाल तूझ्या बाजूने नाही काय?
की तू एखाद्या घोटाळ्यात अडकलायस काय?
असले सारे प्रश्न सोडवण्या ते अवतारी पुरूष झाले

कोरस:
आले आले आमचे महाराज आले
आले आले आमचे स्वामी बाबा आले ||२||

झिलकरी:
आसं काय, म्हंजे ह्ये बाबा समश्या निवारण केंद्रच हाय म्हना की!

काय अफलातून या बाबांचं वागणं
कुणी हात फिरवूनी काढीतो सोनं
कुणी फरशी डोक्यावर ठेवतो
कुणी फकीर मोरपीस फिरवीतो
कुणी डोळे उघडे ठेवून विसावतो
कुणी गूळ-शेंगदाण्याचा लाडू खातो
कुणी फक्त फळेच खाऊनी जगतो
कुणी आयुर्वेदीक औषधी विकतो
कुणी पुस्तके प्रकाशीत करतो
कुणी स्व:ताला देवच समजतो
हे सगळे पोटापाण्याचे धंदे की हो झाले!

कोरस:
आले आले आमचे महाराज आले
आले आले आमचे स्वामी बाबा आले ||३||


चिंता काळज्या कोणाला नाही
जन्माला आला त्याचा तोच भार वाही
उगा कशाला महाराजांचा आधार तू पाही?
तूझ्या नशीबाला तूच आकार देत राही
बाबा महाराजांचे खोटं लचांड असे ठाई ठाई
आपली श्रद्धा अंधश्रद्धेत रूपांतरीत होई
अशा लुच्या ढोंगी लबाड महाराजांना
सच्च्या पाषाणाभेदाने खोटे ठरविले

झिलकरी:
म्हंजी आपलं हातच आपलं नशीब घडवीतं की!

कोरस:
आले आले आले आले आले आले
आले आले आमचे महाराज आले
आले आले आमचे स्वामी बाबा आले
विवेक, श्रद्धा, बुद्धी पळोनीया गेले ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०१/०५/२०११ (महाराष्ट्र दिन/ कामगार दिन)

तुम्ही गोळी बघितलीय गोळी?

तुम्ही गोळी बघितलीय गोळी?


तुम्ही गोळी बघितलीय गोळी?
साधी सुधी खाऊची, लिमलेटची गोळी नाही हो!
किंवा औषधाची कडू गोळीही नाही.
बंदूकीची गोळी? बॅरल मधून सुटलेली?

ती कधी असते तांब्याची, अ‍ॅल्यूमिनीअम किंवा मिश्र धातूची.
झाडल्यावर वेगात जाते अन वेध घेते एखाद्या मस्तकाची.
किंवा आरपार शरीतात घुसते
किंवा कधीकधी शरीरातच मुरते
अन मग चालू होतात रक्ताचे पाट
लाल लाल रक्ताचे पाट.

ती घुसवली जाते सामान्यांच्या शरीतात,
किंवा सहज मजा म्हणून शिकारी प्राण्यांच्या शरीरात.

मरणार्‍या या दोघांची जातकुळी एकच.
निष्पाप, कुणाच्याही अध्यात नसलेले.
दोघेही प्राण सोडण्याच्या वेळी भेदरलेले.
डोळे सताड उघडे ठेवून गोळी झाडणार्‍याकडे बघणारे.
किंवा क्वचितच उघड्या डोळ्याने आपल्याच शरीरात परकीय असणारी;
पण आता शरीराचाच भाग झालेल्या गोळीकडे बघत बघत मरणारे.

आता मी सहजच विचारतो तुम्हाला,
तुम्ही बंदूकीची झाडलेली गोळी बघितलीय का?
शरीरात शिरणारी गरमागरम गोळी?

मी बरीच माणसं मारली या बंदूकीनं.
लवंगी फटाक्यांसारख्या गोळ्या उडवल्या या, या बंदूकीनं
चिक्कार माणसं मारली मी होवून सैतान.
ते ही कुणाच्यातरी सांगण्यामुळं.

पण... पण...
मी आता भानावर आलोय....
शेगडीवरच्या गरम भांड्याला चुकून हात जेव्हा लागतो;
तेव्हा आपण भानावर येतो.
तसाच मी ही आता भानावर आलोय.

अरे, ओरडून सांगतोय ना आता मी तुम्हाला;
की मी आता भानावर आलोय म्हणून!!

वेदना काय असतात ते मला आता कळालेय.
असे काय बघताय तूम्ही?......

अहो, आत्ता इतक्यातच अशाच एका बंदूकीच्या गोळीने माझ्याच शरीराचा वेध घेतलाय!!

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०४/२०११

बस स्टँड

परवाच खुप कधीचा गावाकडे गेलो.
तशी आठवण यायची पण सवड नव्हती होत.
म्हणून वेळात वेळ काढून गेलो.
आठवणीतल्या आठवणी आठवीत गेलो.

तो बसस्टँड, तेथील पत्र्याच्या खाली सावलीत उभे राहणारे लोक,
ते शाळा कॉलेजला जाणारे पोरं पोरी,
माहेराला, सासरला जाणार्‍या नवर्‍या मुली,
ते फलाटावरच पाया पडणं, अन नवर्‍या मुलाचं अवघडून जाणं,
जागा सांभाळण्यासाठी झालेली गर्दीची लढाई,
त्या गर्दीकडे शांत प्रवृत्तीने बघत तंबाखू मळणारे कंडक्टर,
"भाऊ कुठे जाते रे गाडी", विचारणारी आजीबाई,
"ईकडे लक्ष द्या" म्हणत बसमध्ये पेनं, एखादे पुस्तक विकणारा,
लिमलेट, आवळासुपारी, पेपर विकणारा,
कंन्ट्रोलरची अनांउन्समेंट अन रिपोर्टवर सह्या घेण्याची ड्रायव्हर लोकांची अर्जवी धावपळ.

मन त्याच्याही मागे गेले,
लायनीत आधी तिकीट घ्यायचे अन मगच बसमध्ये बसायचे,
नजरेतील ती लाल पिवळी बस,
बरं पुर्वी आतासारख्या अ‍ॅल्यूमिनीयम बॉडी असणार्‍या बस नव्हत्या,
होत्या त्या पत्र्याच्या, खुप आवाज होणार्‍या,
हं.... अर्थात आजही आवाज होतोच आहे म्हणा.

मला आठवते... आमच्या गावाच्या बसस्टँडमध्ये एक दोन पंखेही होते प्रवाशांच्या डोक्यावर,
अन ते गोल गोल फिरायचेसुद्धा.
सारा गोंगाट, पळापळ,
पोर्टरची बसची पाटी घासत घेवून जाण्याची मुजोरवृत्ती,
अन बसच्या छतावरचे सामान उतरवण्यासाठीची धावपळ,
सारे काही होते तेथे.

पण काही बदल लक्षणीय होते,
सामान नेण्यासाठी चाके असणार्‍या बॅगा,
ग्रामीण भागातल्या नटव्या मुली अन मिथून मुले.
कंडक्टर च्या खांद्यावर तिकीटांचे मशीन,
अन पाणी पिण्यासाठी प्लाश्टीकच्या बाटल्या,
स्टँडवरचे पत्र्याचे शेड आता नव्हते,
अन कंट्रोलरचे ते गिचमीड बोलणेही नव्हते.
बसमध्ये जेवणाचे डबे पाठवणे अन तो घ्यायला येणारे विद्यार्थीही नव्हते.

पुर्वीच्या अन आताच्या स्टँडमध्ये बरेच बदल झाले होते तर!

भेट घ्यायची ओढ लागली

भेट घ्यायची ओढ लागली


नकोच आता दुर जराही
भेट घ्यायची ओढ लागली ||१||

हिरव्या वाटा उंच तरूवर
प्रकाशाचे किरण त्यावर ||२||

ओळखीच्या त्या झाडे वेली
नेहमीची त्यांनी जादू केली ||३||

वायू परिचीत पानांस लागला
थरथर त्यांना देवूनी गेला ||४||

नजरेच्या टापूत आले समोर
शांत नितळ शितल सरोवर ||५||

हृदयाच्या कप्यात हुरहुर झाली
जुन्या स्मृतींची आठवण आली ||६||

विरह कसला असला नसता
नकोच ते दुर असणे आता ||७||

श्रम पुरले वेळही सरली
भेट घ्यायची ओढ लागली ||८||


- पाषाणभेद (दगडफोड्या)
२०/०४/२०११

शेतकरी गीत: शेतात आंतरपीक आपण करू

शेतकरी गीत: शेतात आंतरपीक आपण करू


अगं ए पारू; होवूया आपण आता सुरू
हाती येईल आपल्या पैका
चल शेतात आंतरपीक आपण करू ||धृ||

पावरबाज मंतार आंतरपिकाचा
अनुभव आहे मोठ्या लोकांचा
तोंडं बोलती त्यांची वाचा
काय सांगू, कसं सांगू
मी आता कसा ग धिर धरू
चल शेतात आंतरपीक आपण करू ||१||

आसं नको बघू खाली वाकून
पिक नको उघडं करू, ठेव झाकून
पक्षी अन किडे, वारं-वावधान
पिक ठेव त्यापासून राखून
नायतर म्हनायची टोळधाड कशी मी आवरू
चल शेतात आंतरपीक आपण करू ||२||

लावू उस मका केळी अन ज्वारी
झालंच तर आहे द्राक्षे गहू बाजरी
फळाफुलासोबत करू आपण लावणी
आगं मुख्य पिकासोबत
सार्‍या दाळी अन कडधान्य दाळी पेरू
चल शेतात आंतरपीक आपण करू ||३||

पिकाचं पिढीजात वैरी हाय हे तण
जा म्हटलं तरी जात नाही हे बेणं
आंतरपिकानं जमीन जाती झाकून
सुर्यप्रकाश तणाला मिळत नाही त्यानं
अशानं बंदोबस्त होतो तणाचा
आन तण लागतं मरू
चल शेतात आंतरपीक आपण करू ||४||

पालापाचोळा त्या तिथंच खाली पडं
जमीनीत खत होवून तो मग मुरं
उत्पन्नात वाढ भरघोस होईल ग सुरू
चल शेतात आंतरपीक आपण करू ||५||

आता मी राजा ग शेताचा गुणी
नटशील कशी तू आक्षी राणीवाणी
घालीन दहा तोळ्याची माळ तुझ्या गळी
आखाजीला रास धान्याची तू ओवाळी
लाजू नको बुजू नको तू
नको तू आता बावरू
चल शेतात आंतरपीक आपण करू ||६||

- पिकांची लावणी करणारा प्रगतीशील शेतकरी - पाषाणभेद (दगडफोड्या)
१९/०४/२०११

पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips)

पाणीपुरी व तत्सम पदार्थ सेवनार्थ काही युक्त्या (Tips)

संदर्भ:

http://www.esakal.com/esakal/20110415/5193351932521427606.htm
http://www.youtube.com/watch?v=mDtN-4Bqbl0
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7995952.cms

१. पाणीपुरी हि विक्रेतीकडची असली पाहिजे. (विक्रेत्याकडची नको.)
२. पाणीपुरी विक्रेती मराठी असेल तर जास्त काळजी करण्याचे कारण नाही.
२. आधीचे गिर्‍हाईक तेथेच असले पाहीजे व त्याची पाणीपुरी (व तत्सम पदार्थ - {यापुढे फक्त पाणीपुरी असा उल्लेख राहील.}) खाल्लेली असली पाहीजे व फक्त पाणी पिणे बाकी असले पाहिजे. त्याने पाणी पिल्यानंतर सर्व काही ठिकठाक वाटल्यासच आपण ऑर्डर द्यावी.
३. जेथे जास्त गर्दी असते तेथेच जावे जेणेकरून जे काही दुष्परीणाम होईल ते जास्त प्रमाणातल्या लोकांत विभागून झाल्याने त्याची त्रीव्रता कमी होवू शकते.
४. पाणीपुरी खाण्यास जाण्याचेवेळी जमल्यास PH पेपर घेवून जावा जेणेकरून तेथील पाण्याची PH व्हॅल्यू पहाता येईल. "०" (शुन्य) PH युक्त पाणी असलेल्या पाणीपुरीला प्राधान्य द्यावे. (इतर व्हॅल्यू आल्याच तर आपापल्या मनाचा निर्णय घ्यावा.)
५. आपल्या घरचे पाणी व भांडे घेवून जावे.
६. सर्वात धोकेदायक नसलेला प्रकार म्हणजे घरच्या घरीच पाणीपुरी बनवाव्यात. आपण घरीच पाणीपुरी बनवली तर शेजार्‍यांनाही निमंत्रीत करावे म्हणजे 'शेजार्‍यांवर प्रेम करणे' हि उक्ती साध्य होईल.
७. तसेही पाणीपुरी, भेळपुरी, पॅटीस, शेवपुरी आदी पदार्थ परराज्यातील आहे. तसेच तेथील विक्रेत्यांची मानसीक स्थिती आपल्याला माहीत नसू शकते. तेथील (परराज्यातील) राहणीमान, वागणूक, परस्पर सामंजस्य, समाजाप्रती असलेले विचार व आपल्या राज्यातील परिस्थीती यात प्रचंड तफावत आहे. असले विक्रेते आर्थिक द्रुष्ट्या (व मानसिकही) मागासलेले असतात. (जगातल्या प्रत्येक परिस्थितीला अपवाद असतोच असतो.) त्यामुळे ते असले पदार्थ, (खाण्याव्यतिरीक्त इतर वस्तू सुद्धा) कमी प्रतीच्या वापरतात. त्यामुळे असले परराज्यीय पदार्थ शक्यतो न खाल्लेलेच बरे. (येथे प्रांतवाद हा प्रत्यय लावू नये.)
त्याचप्रमाणे (पोटाची) गरज असल्यास आपल्या महाराष्ट्रातील नाष्ट्याचे पदार्थ खावेत.

जाता जाता एक सांगावे वाटते:
हॉटेल मध्ये व हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्स मध्येही पंजाबी, साउथ ईंडीयन, नॉर्थ ईंडीयन, जैन- गुजराथी आदी पदार्थ अनुक्रमे मिळतात व शिकविले जातात.
महाराष्ट्राचे खाद्यपदार्थ असलेल्या 'महाराष्ट्रीय डीश' केव्हा (सगळ्याच) हॉटेलात मिळतील व हे आपले पदार्थ हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात अखिल भारतीय पातळीवर केव्हा शिकवीले जातील?

राज ठाकरेंना याविषयी आंदोलन करता येण्यासारखे आहे.

आपले काय मत आहे?

गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं

गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रंया गारूड्याचा नागूबा मस्ती करतोय रं
उंच फना काढून पुंगीवर डोलतोय रं ||धृ||

मी बाई भित्री नाजूक माझी काया
डसला तर जाईल जीव माझा वाया
त्येला बघून मला भ्येव वाटतंय रं ||१||

त्याला नागपंचमीला दुध मी देते
त्याला लांबून नमस्कार करते
त्याला देवासमान मी मानते रं ||२||

त्याचा खेळ लई मजेदार असतो
पुंगी वाजवूनी नागोबा डोलतो
खेळ झाला की पैकं गोळा तू करतोय रं ||३||

बघ एक सांगते मी आता तुला
मुका प्राणी हा जर का मेला
मनेकाबाई तुला पकडतेय रं ||४||

मुक्या प्राण्याला असं छळनं नाही बरं
त्याच्यावर प्रेम करणं हेच आहे खरं
दाट झाडीत त्याला सोडतोस काय रं ||५||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१७/०४/२०११

व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना

व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना


मामा अहो मामा,
तुमच्या पोरीला काय समजवाना
फोन केला तर म्हनती,
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||धृ||

कालच आणला मोबाईल नवा
मार्केटमधी लई त्याची हवा
वाटतंय तिनं एकदा तो पहावा
पण तिची भेटच होत नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||१||

आता सगळं कसं सांगू तुमाला
मोबाईलचा हायटेक जमाना आला
तिला सारं काही समजते
रोजरोज एसऐमएस पाठवते
पर व्हायब्रेटर ही काही रिंगटोन नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||२||

मी म्हनलं आपण एकदा भेटूका?
मोबाईलचं टेकनीक समजून देवूका?
तुझ्या हातात माझा मोबाईल देतो
एकएक मेनूचा डेमो देतो
पन असली चेष्टा बरी नाहीना!
फोन केला तर म्हनती
व्हायब्रेटर रिंगटोन पाठवाना ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०४/२०११

रस्त्यानं रेतीवाला तो आला

रस्त्यानं रेतीवाला तो आलारस्त्यावर उभी मी उन्हातान्हाची
टमटम येत नाही कधीची
येईल का कोनी गाडीवाला
नेईल का मला कोनी घरला
प्रश्न मला पडला, पडला, पडला
तो बघा, तो बघा,
रस्त्यानं रेतीवाला तो आला ||धृ||

मी गोरी पोरी कोल्याची
हाय देखणी लई सुंदर
रंगानं काळी मी पडल
उन्हात उभी राहील्यावर
वेळेवर मदतीला धावला
तो बघा, तो बघा,
रस्त्यानं रेतीवाला तो आला ||१||

गाडी रेतीनं हाय भरलेली
लाल रंगानं हाय सजवलेली
मला भुरळ तीची पडली
सार्‍या गाड्यांमधून आवडली
तिच्यामधे घेवून जायला
तो बघा, तो बघा,
रस्त्यानं रेतीवाला तो आला ||२||

रेवदांड्याचा मैतर तो
आज आला माझ्या भेटीला
लई दिसानं ह्यो दिसला
नाही सोडणार मी त्याला
जावू लवकर कोलीगीतावर नाचायला
तो बघा, तो बघा,
रस्त्यानं रेतीवाला तो आला ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०४/२०११

नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू

नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू

चला लवकर यारे सारे
मराठीची गुढी उंच उभारू
नववर्षाचा सण हा पहिला
आनंदाने साजरा करू ||धृ||

चला एक मोठी काठी आणू
शालू बांधून तिला आपण सजवू
हारकडे अन फुलमाळा
हारकडे अन फुलमाळा बांधून
वर एखादा लोटा घट्ट बसवू
नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू ||१||

पाडव्याच्या शुभमुहुर्ती
मंगल कार्य सुरू हो करती
दारी तोरण अंब्याचे
दारी तोरण अंब्याचे लावून
अंगणी मंगल सडा चला शिंपडू
नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू ||२||

उत्साहाचा वारा आता वाहू लागला
फाल्गून गेला चैत्र महिना सुरू झाला
पानाफुलांनी
पानाफुलांनी सजली धरती
निसर्गाला वंदन चला करू
नववर्षाचा सण हा पहिला आनंदाने साजरा करू ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०४/०४/२०११ (गुढीपाडवा)

गण: देव गौरीनंदन आधी वंदुया

गण: देव गौरीनंदन आधी वंदुया
(चाल पारंपरीक)

देव गौरीनंदन आधी वंदुया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ||

रसीक जमले आम्हांसमोरी
तुझेच रूप जणू शेंदरी
उशीर नका लावू देवा
झडकरी या या
शुभ कार्याची सुरूवात करूया ||१||

रिद्धी सिद्धीचा तु रे स्वामी
तुज पुजीतो कलावंत आम्ही
मंगल कार्याआधी
गणाला गावूया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||२||

देव गौरीनंदन आधी वंदुया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०३/२०११

आंतरजालावरील प्रथमच असलेले धमाल वगनाट्य - वैरी भेदला वाटेवरचा अर्थात प्रेमाला देशाची सीमा नाही


आंतरजालावरील प्रथमच असलेले धमाल वगनाट्य - वैरी भेदला वाटेवरचा अर्थात प्रेमाला देशाची सीमा नाही

प्रमुख भुमीका: राजा, राणी, राजपुत्र, प्रधान, हवालदार, शिपाई, राजपुत्री, कोतवाल, दिवाणजी, हुजर्‍या, हवालदार, भालदार, चोपदार, दासी, नर्तीका, विदुषक, सोंगाड्या आदी.

लेखक, कवी: शाहीर पाषाणभेद

(पडदा उघडतो तेव्हा शाहीर गण सुरू करतात.)
-------------------------
गण
(चाल पारंपरीक)

देव गौरीनंदन आधी वंदुया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ||

रसीक जमले आम्हांसमोरी
तुझेच रूप जणू शेंदरी
उशीर नका लावू देवा
झडकरी या या
शुभ कार्याची सुरूवात करूया ||१||

रिद्धी सिद्धीचा तु रे स्वामी
तुज पुजीतो कलावंत आम्ही
मंगल कार्याआधी
गणाला गावूया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||२||

देव गौरीनंदन आधी वंदुया
शुभ कार्याची सुरूवात करूया ||धृ||
------------------------
सोबती: वा वा शाहीर, गण तर लई फसकलास झाला. आक्षी आदर्श झाला बघा. मन लई परसन्न झालं. आता परंपरेनुसार गणानंतर गौळण बी झ्याक होवूंद्या. पब्लीक कसं खुष व्हाया पायजेल. आसं खुष, आसं खुष की त्येंनी सगळे घोटाळे, महागाई, प्रेटोल दरवाढ, भारनियमन, मुख्यमंत्री बदलाबदली समदं विसरायला पायजे, काय?

शाहीरः आसं म्हनता. मंग होवून जावूदे!

(बतावणी सुरू होते)

(ढोलकीचा ताल सुरू होतो अन त्या ठेक्यावर डोक्यावर माठ घेतल्याच्या आव आणत मावशी येते.)

मावशी: राधे आगं राधे चल निघ ना बाहेर. आतमधी काय करूं र्‍हायलीय. तिकडं मुन्नी बदनाम व्हईल ना. चल लवकर मथुरेच्या बाजाराला.

राधा: मावशे आगं तुझ्या जिभंला काही हाड हाय का न्हाई. आगं मुन्नी बदनाम कशी गं व्हईल?

मावशी: आगं राधे, तुझ्या आसं उशीर करण्यामुळं मुन्नी गवळणीचं दुध बाजारात विकाया नेण्याच्या आधीच नासलं तर ती बदनाम व्हईल आसं म्हनायचं व्हतं मला. चल आता लवकर. तो दह्याचा माठ घे डोक्यावर आन निघ. म्होरल्या चौकात मुन्नी आन शीला गवळणी वाट बघत असत्याल. तू चल म्होरं मी शब्बो शहाबादीलाबी आनती संगती.
(रंगमंचाच्या एका कोपर्‍यात दोन गवळणी उभ्या आहेत.)

एक गवळण: या बया, मावशी आन राधा काय येईना बया. किती येळ झाला आता.

दुसरी गवळणः मला तर वाटतं मावशीला कुणीतरी भेटल आसल वाटतं अन मावशी बसली आसल. तिला जिथं तिथं बसायची लई वाईट खोड हाय बघ.

मावशी: हे पुरींनो, आले बघा मी. म्या काय शेंट्रल रेल्वे हाय का उशीरा यायला? हि काय राधा बी आलीच. जमल्या ना सगळ्या? मुन्नी, शीला, शब्बो तुमीबी हायेत ना. मला वाटलं तुमी कुठं आयटम डॅन्सलाच गेल्या का काय?

राधा: मावशे आमी सगळ्यांनी दही, दुध, लोणी डोक्यावर घेतलंय. तु ग काय घेतलंस बाजारात विकाया?

मावशी: मला काय विकाया लागत नाही. मलाच कोनी विकत घेतयं का ते पहायला म्या बाजारात चालले. (तोंड वेंगाडून) म्हनं, तु ग काय घेतलंस बाजारात विकाया? कलमाडीची चौकशी करतात तसं तु विचारू राह्यलीस जनूं. चला गं बिगीबिगी.

गवळणः मावशे, जरा हात लाव गं?
(मावशी गवळणीलाच हात लावालया निघते.)

गवळणः ए मावशे आगं म्या माठाला हात लावाया सांगितला, मला नव्हं.

मावशी: मंग त्वा कुठं तसं सांगिटलं. आता लावते माठाला हात. ए बाकीच्या साळकायांनो, तुमी का त्यांड बघून र्‍हायल्यात? चला लवकर. न्हायतर बाजार सापडायचा न्हाई. चला माझ्या मागं, मी व्हती तुमच्याम्होरं.
(सर्व जणी डोक्यावर दह्या दुधाचे माठ घेतल्याचा अभिनय करत रंगमंचावर गोल गोल फिरतात. तेवढ्यात पेंद्या येतो.)

पेंद्या: इश्टाप! इश्टाप!! इश्टाप!!!

मावशी: ए मुडद्या काय "इश्टाप इश्टाप इश्टाप" करतूया? इथं काय लपाछपीचा खेळ चालू हाय का?

पेंद्या: इश्टाप इश्टाप इश्टाप म्हंजे विंग्रजीत "Do not Start" आपनबी आता 'हासुरे' विंग्रजीचा क्लास लावलाय सध्या.

गवळणः ये बाबा जरा मराठीत समजल आसं बोल. नायतर मनसे बोलाया लावीन बघ.

पेंद्या: आगं बायांना मराठीत बोलतू "थांबा! थांबा!! थांबा!!"

मावशी: पाळणा "लांबवा लांबवा लांबवा"

राधा: बरं आमी थांबलो. तुझं म्हननं तरी काय ते तर सांगशील? का तुला आमचं दही दुध विकत घ्यायचंय?

पेंद्या: बरूबर. मला तुमच्यावालं दहि दुधच पाह्यजेल. पन विकत नाय काय.

मावशी: आमच्यावालं दहि दुध? येतोस का कोपच्यात? मंग देते तुला माझ्यावालं दहि दुध.

पेंद्या: ये बाबो. (घाबरतो). आगं तुमच्यावालं म्हनजे तुमच्या डोक्यावरल्या माठातलं दहि दुध म्हनायचं व्हतं ग मला.

मावशी: मंग, सरळ बोल की मेल्या. आनं काय रे तू कोन? आन आमाला का अडवितो?

पेंद्या: म्या पेंद्या हाय. आन किसनदेवाचा. म्या सरकारी शेवक हाय. माझ्या ह्या खाकी डेरेसवरनं तुमी वळखलं नाय? आहो खाकी म्हंजे खा की. नाशिकच्या मुन्शिपाल्टीत सरकारी मान्सं येईल ते खात्यात म्हनून आमचा डेरेस चा रंग बी खा की असलाच ठेवलाय. किसनद्येवानं सांगितलय की ह्या वाटनं कोनबी बाईम्हना मानूसम्हना आपाआपलं सामानसुमान घेवून जाईल त्यांना कर भरावा लागलं. म्हजी मराठीत हप्ता भरावा लागलं.

मावशी: आरं तु म्हणतुयास "कोनबी बाईमानूस सामानसुमान घेवून जाईल त्यांना कर भरावा लागलं". माझ्याकडं कायबी सामान न्हाई तर मी जावू का?

गवळणः मावशे तुझ्याकडं कायबी सामानसुमान नसनाका. पन आमाला मथुरेच्या बाजाराला नेयाची जबाबदारी तुझ्याकडं हाय हे विसरली का काय?

मावशी: आग माझे बाई, मी हा पेंद्या किती पान्यात हाय ते पाहन्यासाठी त्याची परीक्षा घेत व्हते.

पेंद्या: तर थोडक्यात तुमी बायांनी इथं टॅक्सच्या रुपात कायतरी द्यायला पाहिजे. आपला टॅक्स वेळेवर भरा व राष्ट्राच्या विकासात सहभागी व्हा. हि सुचना जनहितार्थ इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून प्रसारीत. सुचना समाप्त.

राधा: अरे बाबा हा टोल फ्री रस्ता आहे. आताच तर आण्णांनी हजारदा उपोषण करून हा रस्ता टोल फ्री केला होता ना?

पेंद्या: मला बाबा म्हणू नका, आबा म्हणू नका, दादाही म्हणू नका. मी काही पुढारी नाही. मी सरकारी माणूस आहे. अन हा रस्ता मुंबई-पुणे सारखा अजूनही टोलवालाच आहे. याचा वापर करणार्‍यांना टॅक्स द्यावाच लागतो.
(तेव्हढ्यात किसनदेव तेथे येतात.)

पेंद्या: देवा किसनदेवा, या गवळणी ह्या मावशीसंगट सामानासुमानासहीत या रस्त्यानं जात आहेत आन टॅक्सही भरत नाहीत.

किसनदेवः काय ग मावशे, हा काय म्हनतो आहे? अन तुमालातर टॅक्स द्यावाच लागेल. ते माठ खाली ठिवा आधी. किती येळ समईसारख्या उभ्या राहाल. उगाच मानेला आकडन यायची आन मानमोडी व्हायची.

राधा: पन आमी टॅक्स दिलाच न्हाई तर? सोड आम्हाला. येळ व्हतोय बाजाराला.

किसनदेवः तरीबी तुमाला टॅक्स द्यावाच लागल.

मावशी: आग ह्यो आसं नाय ऐकायचा. तु हो मागं. म्याच बघते तो काय म्हनते ते. कारं बाबा, आधीच बाजाराला जायाची येळ निघून गेली. आजकाल पब्लीक मॉलमधीच जातयं दहिदुध घ्यायला. मंग बाजारात कुत्रतरी सापडल का दहि विकाया? आन त्ये परराज्यातले भैये लोकंबी आधीच येतात माल विकाया. सोड आम्हास्नी.

किसनदेवः बरं बरं, तुमची इच्छा दहि दुध द्येयाची नसंल तरीबी ठिक हाय. तुमी मंग एखादं गाणं नाचून दाखवा. मंग आमाला आमचा कर मिळाला आसं आमी समजू. आन कराची रक्कम आमच्या खिशातून सरकारी खजिन्यात जमा करू.

राधा: ठिक आहे. आम्ही नाचतो. पण आम्हाला लवकर सोड.
(राधा अन गवळणी 'वगातली गौळण' सुरू करतात.)

का रे वाट अडवितो नंदाच्या कान्हा
आम्हा जावू दे ना, जावू दे ना, जावू दे ना ||धृ||

दुध दही लोणी घेवून डोई
भार आता मला सहवेना
आम्हा दे ना, जावू दे ना, जावू दे ना ||१||

राहीले गोकूळ दुर, जवळ नाही बाजार
उगाच छेडाछेडी करू नको ना
आम्हा दे ना, जावू दे ना, जावू दे ना ||२||

ठावूक आहे मला, लोणी निमीत्त तूला
आम्हा पासून दुर राहवेना
हे खरे ना, खरे ना, खरे ना ||३||

का रे वाट अडवितो नंदाच्या कान्हा
आम्हा जावू दे ना, जावू दे ना, जावू दे ना ||धृ||
(गौळण संपते.)

मावशी: चला ग बायांनो. आधीच उशीर झाला. ते माठ उचला अन चला बिगी बिगी बाजारला.

(सर्व गवळणी माठ उचलतात अन बाजाराला निघतात.)
(सगळे जण विंगेत जातात)
==========================

शाहीर रंगमंचावर येतात व गातात:

भावर्ता देश होता एक नगर त्यात अवंतिपुर
नगर मोठे सुंदर तेथे उंच उंच गोपुर
सोन्याचे कळस मंदिरांना, तोरणं दारोदार
नक्षीदार दिव्यांची झुंबरं हालती घरोघर ||

अवंतिपुर नगरीचा राजा होता चतूरसेन
दिलदार होता राजा उदार त्याचं मन
पसरली होती जगी किर्ती त्याची महान
कहाणी त्याची ऐका आता देवून तुमचे कान || जी जी जी

सेनापती चतुरांगण होता सैन्याचा प्रमुख
युद्धामध्ये जिंकण्याचा चढता होता आलेख
त्याच्या पदरी होते सांडणीस्वार, हत्ती अन घोडे
तसेच होते हवालदार हातमोडे अन शिपाई पायमोडे || जी जी जी
(शाहीर रंगमंचावरून विंगेत जातात)
=======================

(रंगमंचावर दरबाराचा देखावा उभा केलेला आहे. राजा इकडून तिकडे फेर्‍या मारत आहे.)

महाराज: अजून कसं कोनी दरबारात आलेलं नाही? (हातावर हात मारतो.) श्या.. घड्याळात दहा वाजून दहा मिन्ट झालीत पन आजून एकबी दरबारी दरबारात नाही? थांबा. मला आता दरबारात पंच कार्ड मशीन न्हायतर अंगठा दाबून हजेरी घेनारं मशीनच लावावं लागलं.

(मोठ्याने आवाज देतो.) परधानजी...ओ परधानजी...

प्रधानजी: मुजरा असावा.

महाराज: असो असो. प्रधानजी, ही काय दरबारात येन्याची वेळ झाली का? आता दहा वाजून गेलं तरीबी दरबारात कोनीच कसं नाही. आन तुमीसुदीक लेट झालात? आता दोन झाडू आणा. एक तुमी घ्या अन एक माझ्या हातात द्या. अन करू सुरूवात आपण दोघं दरबाराच्या साफसफाईला.

प्रधानजी: हो महाराज.

महाराज: अरे परधान हाय का बारदान? मी बोलतो अन तुमी खुशाल हो म्हनताय. काय लाज? काय शरम वाटती का न्हाय?

प्रधानजी: अहो महाराज तुम्ही मला लेट झाल्याचे विचारल त्याला हो म्हटलो. खरं का नाय?

(तेवढ्यात तेथे हवालदार हातमोडे अन शिपाई पायमोडे येतात. ते विनोदाने केवळ हाताचा पंजा खालीवर करून मुजरा करतात.)

हवालदार हातमोडे अन शिपाई पायमोडे: मुजरा म्हाराज. म्हाराजांचा ईजय असो.

महाराजः असो असो.

महाराज: काय परधानजी, राज्याची हालहवाल कशी काय हाय?

प्रधाजनी: काय रे, राज्याची हालहवाल कशी काय हाय?

हवालदार हातमोडे: शिपाई पायमोडे, राज्याची हालहवाल कशी काय हाय?

शिपाई पायमोडे: ठिक हाय हवालदार साहेब.

हवालदार हातमोडे: ठिक हाय परधानजी.

प्रधाजनी (महाराजांकडे पाहून): ठिक हाय म्हाराज.

महाराज: बरं काय चोरी मारी, खुन दरोडे?

प्रधाजनी: काय रे हातमोडे, काय चोरी मारी, खुन दरोडे?

हवालदार हातमोडे: काय रे पायमोडे, काय चोरी मारी, खुन दरोडे?

शिपाई पायमोडे: आजाबात नाय हवालदारसाहेब

हवालदार हातमोडे: आजाबात नाय परधानजी

प्रधाजनी (महाराजांकडे पाहून): नाय महाराज, आजीबात नाय.

महाराज: आवं मंग काय बलात्कार, विनयभंग तरी आसलं की?

प्रधाजनी: हवालदार काय बलात्कार, विनयभंग?

हवालदार हातमोडे: शिपाई पायमोडे काय बलात्कार, विनयभंग?

शिपाई पायमोडे: नाय अजाबात नाय साहेब

हवालदार हातमोडे: नाय अजाबात नाय प्रधानजी

प्रधाजनी (महाराजांकडे पाहून): अजीबात नाय महाराज.

महाराज: अरे हे काय चाललं आहे? मी प्रधानजींना विचारतो आन माझी आरडर लगेच खाली खाली जाते. मग शिपायालाच मी विचारतो डायरेक. तुमच्या मधल्यांचं काय काम रे?

प्रधाजनी: अहो महाराज यालाच तर संसदिय लोकशाही म्हनतात. फार आदर्श राज्यप्रणाली आहे ती. वरपासून फकस्त आरडरीच द्यायच्या. काम काहीच नाही.

महाराज: काय म्हणालात?

प्रधाजनी: काय नाय म्हटलं गुन्हे काहीच नाही महाराज आपल्या राज्यात.

महाराज: असोअसो. म्हणजे राज्यात हालहवाल एकदम ठिक आहे तर.

हवालदार हातमोडे: हो महाराज. एकदम ठिक आहे. सगळीकडे आबादी आबाद आहे. पाउसपाणी अमाप आहे. ४० पाण्याचे टँकर भाड्याने लावले आहेत. चोरी दरोडे खुन काहीच नाही. आणखी १० तुरूंगांना मंजूरी दिली आहे. रोगराई, आजारपण नावालाही नाही. आणखी ३० सरकारी दवाखाने ग्रामीण भागात काढायचे आहेत. गावात मारामार्‍या दंगली अजाबात नाही. तंटामुक्ती अभियान जोरात चालू आहे. लोकसंख्या नियंत्रणात आहे. नसबंदीसाठी माणसं गोळा करायला डॉक्टर लोकं गावोगाव वणवण फिरत आहेत. शिक्षण व्यवस्थीत चालू आहे. शिक्षक लोकं जनगणनेच्या कामात बिजी हायेत, आसलं समदं ठिक चालू आहे, महाराज.

महाराज: असो असो. एकुणच सगळीकडे आबादीआबाद आहे तर मग आमचा विचार आहे की आम्ही आता शिकारीला निघावं.

शिपाई पायमोडे: चला महाराज. आमी तर एकदम रेडी आहोत.

प्रधानजी: अवश्य महाराज. आपण आता शिकारीला गेलंच पाहीजे.

हवालदार: महाराज राज्यात वाघांची पैदास बी लय वाढली हाय. त्यासाठी मी तर कवाच बंदूक तयार ठिवलीय. शिकारी कुत्रे, हाकारे एकदम तयारीत आहे. झाडाला एक वाघबी बाधूंन ठिवेल आहे. तुमी फकस्त जायाचं आन वाघावर गोळी झाडायची की बास. फटू काढायसाठी प्रेस फटूग्राफर बी रेडी हाय. बातमीचा मसूदाबी रेडी हाय. तर कवा निघायचं महाराज?

महाराज: आम्ही आता राणीसाहेबांकडे जातो. थोडी विश्रांती घेतो. अन मग परवा तेरवा निघूना शिकारीला. काय घाई आहे.

हवालदार: महाराज मी बी येवू का तुमच्या संगती रंगमहालात. नाय जरा शेवा करावी म्हनतो मी राणीसाहेबांची...

महाराज (रागाने): हवालदार, काय बडबडत आहात तुम्ही?

हवालदार: अहो राणीसाहेबांची अन तुमची शेवा आसं म्हननार व्हतो मी. आमी तुमचे नोकर हाय ना मग? तुमी पुर्ण बोलूच देत नाई बगा.

महाराज: असो असो.

हवालदार: असो तर असो महाराज.

महाराज: चला तर तुम्ही व्हा पुढे अन शिकारीची तयारी करा. आम्हीही निघतो आता. दरबार बरखास्त झाला आहे.

(सगळेजण महाराजांना मुजरा करतात.)

(हवालदार, शिपाई एका विंगेतून जातात तर दुसर्‍या विंगेतून महाराज जातात.)

(प्रधानजी रंगमंचावर स्वगत बोलत आहेत.)

प्रधानजी (स्वगत): जा जा महाराज तुम्ही शिकारीला जा, राणीसाहेबांकडे जा. तेवढाच वेळ आम्हाला आमच्या चाली खेळण्यात मिळतो आहे. आत्ताच उग्रसेन राजाला निरोप पाठवतो अन त्याला सांगतो की अवंतिपुरावर आक्रमण करण्याला हिच संधी योग्य आहे.

(पंतप्रधान रंगमंचावरून जातो.)
===================================

शाहिर रंगमंचावर येतात व गातात:

चतूरसेनाची पत्नी होती निताराणी सुंदर
अप्सराच जणू स्वर्गीची आली पृथ्वीवर
नाकीडोळी निट तिचे, केस मोठे भरदार
साडीचोळी नेसून ती चाले डौलदार
चतुरसेन, निताराणी राहती नेहमी बरोबर
जीव लावी एकमेकां, प्रेम दोघांचे एकमेकांवर ||

दोघांनाही होता पुत्र नाव त्याचे शुरसेन
राजपुत्र देखणा होता नावाप्रमाणेच शुर
लढाई, घोडेस्वारी, भालाफेक, तलवार
सार्‍या विद्या अवगत, होता त्यात माहिर
होता तो युवक वय त्याचं वीस
हजर राही दरबारी बघे कामकाज || जी जी जी
(शाहीर रंगमंचावरून विंगेत जातात)
===================================

( हवालदार व शिपाई फिरत फिरत रंगमंचावर येतात.)

शिपाई: हवालदार साहेब आसं आपन कुठं फिरून राहीलो भटक्या कुत्रावानी? महानगरपालीकेवाले लोकं आले तर नसबंदीसाठी उगाच पकडून घेवून जातील तुमाला. अन मंग माझ्यावरच सगळी जाबाबदारी येईल ना?

हवालदार: आरे शिपाया काय मुर्खासारखं बोलतोया? आरं आपलं महाराज गेलं विश्रांतीला. मंग आपली डूटी नाय का चालू होत? आरं आपन सरकारी मान्स. त्ये बी राजाच्या दरबारची. आरं आपन गस्त घालत आहोत. उगाचच्या उगाच काय फिरत नाय काय आपन.

शिपाई: मी काय म्हनतो आसं फिरून फिरून माझ्या पायाचं पार मोडलंय बघा. आन मला लय भुका बी लागल्यात. मी त्या समोरच्या हाटेलीत जातो आन 'काय शिळंपाकं आसंल तर वाढ रे बाबा' वराडतो.

हवालदार: आरे पायमोड्या, आरं तू सरकारी मानूस आसूनही भिक मागतो पोटासाठी? (पाय वर करत) हानुका तुझ्या गा...

शिपाई (हात पाठीमागे धरून सावरतो): ए बाब्बो!

हवालदार (शिपायाच्या पार्श्वभागावर मारण्याचा अभिनय करत): हानुका तुझ्या गालावर एक चापट? आँ?

शिपाई (हात पाठीमागे नेत 'नको नको' चा अभिनय करत): आहो सायेब, मागल्या सहा महिन्यापासून तुमी आमचा नाष्ट्याचा अलाउंस पास करेल नाय आन मंग आमी कसा नशापानी आपलं नाष्टापानी करावा?

हवालदार: अरे ते काय आपल्या हातात हाय का? आपलं परधानजी कसं हायेत ते तुला चांगलंच ठाऊक नाय काय? तरी बरं, माझ्या शिफारसीवरून येळेवर पगार तरी व्हतेत. बरं मी काय म्हनतो, मला बी लय भुका लागल्यात. मी समोरच्या हाटेलीत जातो आन शिववडा खातो तु बाजूच्या हाटेलीत जा आन कांदेपोहे खावून लगेच ये.

शिपाई: आसं कसं? तुमी येगळी डीश आन मी येगळी डीश कशी खानार? म्या काय म्हनतो त्या समोरच्या हाटेलीत पिझ्झा बर्गर लय भारी मिळतो म्हनं चला तिथंच जावू आपन दोघंबी!

हवालदार: पायमोड्या, आरं आरं बाबा पिझ्झा बर्गर खावून आपल्या ढेर्‍या सुटतील ना? मंग डूटी कशी करता येईल? शुशिलसायेब म्हणत्यात की पोलीसांच्या ढेर्‍या सुटल्यात व्येयाम करा म्हून. त्यापेक्षा त्या झाडाखालच्या हातगाडीवर झुनकाभाकर लय झ्याक मिळती बघ. आपल्या पगारात तेच बसतंय. चल बाबा चल लवकर.

(रंगमंचावर गोल गोल फिरतात. नाष्टा करून परत येतात.)

शिपाई: मी काय म्हनतो हातमोडे साहेब, नाष्टापानी करून पोट थोडं जड झालंया. म्या घरला जातो आन इश्रांती घेतो जरा. काये की बायकोबी परवाच माहेराहून आली ना? कटकट करत होती ती की तुमी काय घरला थांबतच नाही म्हनून.

हवालदार: आसं म्हनतो? ठिक हाय तर मग. मी पण मैनावती कडे जावून थोडा श्रमपरीहार करतो. (विंगेत जातो)

शिपाई: ठिक हाय तुमी मोठे लोकं. तुमी श्रमपरीहार करा मी घरी फकस्त श्रम करतो.

(रंगमंचावरून शिपाई एका विंगेत जातो.)
=======================

(हवालदार हातमोडे मैनावती कडे येतो.)

मैनावती: आता ग बया, लय दिसांनी येळ मिळाला हवालदार सायबांनां?

हवालदार: आगं मी सरकारी मानूस.आमची डूटी चोवीस तास आसती. कवा कधी महालातून बोलावणं यायचं त्याचा भरवसा नाही. म्हणून येळ मिळतो तसं येतो आमी.

मैनावती: तुमी बसा. काय च्या पानी घेनार काय? नाश्टाबिश्टा?

हवालदार: च्या पानी, नाश्टाबीश्टा काय नको आमाला. आमी जेवनच करून जानार आज. लय भुक लागली आमाला.

मैनावती: आसं का? तुमी बाहेर येगयेगळ्या हाटेलीत खानारी मान्सं. निरनिराळ्या चवीची लय आवड हाय तुमाला.

हवालदार: हा ते बी खरं हाय मैनावती. पन म्या काय म्हनतो, तुझ्या हाताची चव लय निराळी हाय. म्हनून तर आमी तुझ्याकडं येतो.

मैनावती: मंग म्या आज तुमाला माज्या हातानं ताट करून भरवीन.

हवालदारः ते ठिक हाय. पन म्या काय म्हनतो, त्ये जेवायच्या आधी एक फर्मास नाचगाणं होवून जावू दे की?

मैनावती: आसं म्हनता? ठिक हाय! ऐका तर मग.

(मैनावती लावणी सुरू करते.)

सांगून सांगून थकले हट्ट माझा पुरवा झणी
आजच आणा मला येवल्याची पैठणी
आजच आणा मला पैठणची पैठणी ||धृ||

जरतारी आसलं काठ तिचा बारीकसर
नक्षी आसलं तिच्यावर बुट्टेदार
लई दिसांची ईच्छा आहे मनी
आजच आणा मला पैठणची पैठणी ||१||

आमसूली नाहीतर रंग आणा निळा जांभळा
कसा दिसलं कुणा ठावं चालंल हिरवा पिवळा
आत्ताच घाई करा अन लगेच जावा धनी
आजच आणा मला येवल्याची पैठणी ||२||

नितळ काया माझी वर तुमची माया
जीव लावायचं शिकावं तुमच्याकडून राया
आहे गरज झाकायची ज्वानी आरसपानी
आजच आणा मला येवल्याची पैठणी ||३||

सांगून सांगून थकले हट्ट माझा पुरवा झणी
आजच आणा मला येवल्याची पैठणी
आजच आणा मला पैठणची पैठणी ||धृ||

(लावणी संपते. माडीच्या खाली गडबड गोंधळ ऐकू येतो.)

हवालदार: मैने, खाली काय गोंधळ चालू आहे गं? आन्नांचं उपोषण सुटलं का मायाबाईंनी राजीनामा दिला का आयपीएलचा धुरळा अजून बसला नाही खाली?

मैनावती: या बया? थांबा मी मावशीलाच पाठवते काय खाली काय झालं ते पहायला.

(मैनाबाई मावशीला हाक मारत विंगेत जाते. शिपाई रंगमंचावर फिरत असतो. तेवढ्यात मावशी पळत पळत येते अन हवालदारावर आदळते.)

हवालदार: ये बाबो! काय मावशे, केवढ्यानं आदळलीस तू माझ्यावर! मला वाटलं की इमान बिमान पडलं की काय?

मावशी: अहो बातमीच येवढी भयानक आहे की मला तर काहीच सुचेनासं झालंय. (हवालदाराच्या छातीवर डोकं टेकवते.)

हवालदार (घाबरून दुर होत): बरं, बरं नक्की काय झालं ते तर सांग.

मावशी: अहो व्हायंच काय? आपल्या राज्यावर शेजारच्या राज्याचा राजा उग्रसेन याचं सैन्य युद्धासाठी चाल करून येतोय अशी खबर हाय . म्हणून सगळे लोकं खाली चौकात घाबरून एकत्र झालेत.

हवालदार: अरे बाब्बो, हि तर लईच भयानक बातमी हाय ना. मग हे आधी नाही का सांगायच? चला आता आमाला युद्धाला निघावं लागलं.

(तेवढ्यात मैनावती तेथे येते.)

हवालदारः मैनावती आम्ही युद्धाला निघालो. चल आम्हाला धीरानं निरोप दे.

मैनावती: हवालदार साहेब, तुमी विजय मिळवून परत या. तवर मी तुमची वाट पाहीन.

(हवालदार एका विंगेत तर मैनावती, मावशी दुसर्‍या विंगेत जातात.)
=============================

(दरबार. दरबारात महाराज, पंतप्रधान, हवालदार शिपाई, राणी, राजपुत्र, चतुरांगण आदी चिंतीत मुद्रेने एकत्र बसलेले असतात.)

महाराज: आपल्या राज्याच्या शेजारचा राजा उग्रसेन अवंतिपुरावर चाल करून येतो आहे. आपण त्याच्याशी प्राणपणानं युद्ध केले पाहिजे. उग्रसेन अशा प्रकारे दगा देणार याची आम्हाला शंका कशी आली नाही याचेच आम्हाला नवल वाटते आहे. सेनापती चतुरांगण तुम्ही हवालदार, शिपाई व इतर सैन्याला घेवून राज्याच्या सीमेवर लढाईला निघा. आम्हीही जातीनं युद्धाला येण्याची तयारी करतो.

पंतप्रधान (मनातल्या मनात): आता कशी तयारी करतात तेच बघतो. म्हणे युद्धाला येण्याची तयारी करतो. हॅ.

राजपुत्र शुरसेन: बाबा, आम्हीही युद्धावर येणार अन त्या उग्रसेनाचा कायमचा बंदोबस्त करणार. आम्हालाही आपल्याबरोबर रणांगणावर येण्याची आज्ञा असावी.

निताराणी: बाळ शुरसेन, अरे तू अजून लहान आहेस युद्धावर जाण्यासाठी.

राजपुत्र शुरसेन: नाही आई. आम्ही आज वीस वर्षांचे आहोत म्हणजे काही लहान नाही. माझ्याही हातात बळ आहे ते उग्रसेनाला दाखवतोच.

महाराज: शुरसेन, अरे तुझी आई बरोबर बोलत आहे. तु तुझ्या राणीसरकारांबरोबर इथंच थांबावं. तुमच्या दोघांबरोबर प्रधानजी आहेत. अन बरं का प्रधानजी आमच्या माघारी आमच्या राज्याची निट काळजी घ्या.

पंतप्रधान: महाराज तुमी युद्धाला निवांत मनानं निघा. तुमच्या माघारी आमी राज्याची, राणीसरकारांची अन राजपुत्राची निट काळजी घेवू. तुमी काहीही काळजी करू नका.

महाराज: तर मग आजच युद्धभुमीवर निघण्याची तयारी करा.

निताराणी: काळजी, चिंता, युद्ध देवादिकांनाही चुकले नाही. आपण तर मानवप्राणी आहोत. महाराज आम्हाला फार काळजी वाटते. आपल्या राज्यावर शत्रूने आक्रमण केले आहे त्यामुळे तुम्ही युद्धावर जावू नका असे मी म्हणणार नाही. तुम्ही शत्रूवर विजय मिळवून लवकरात लवकर परत या. विजयानंतर मी तुमची पंचारतीने ओवाळण्याची वाट पाहीन.

प्रधानजी: राणीसरकार तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत ना. महाराज तुम्ही नक्कीच विजयी होवून परत याल, हो ना महाराज?

महाराज: हो हो, नक्कीच. चला तर आम्ही निघतो. आमच्या माघारी राज्याची निट काळजी घ्या. चला.

(सर्व जण महाराजांना मुजरा करतात अन युद्धभुमिवर निघतात.)


(प्रथम प्रवेशानंतरचा पडदा पडतो. मध्यंतर........ )

=========================

(दुसरा प्रवेश सुरू होतो.)

शाहिर रंगमंचावर येतात व गातात:

हा होता क्रौंधनिती, अवंतिपुरचा पंतप्रधान
खल कपट कृरकर्मा असले त्याचे गुण
राजा किर्तीमान पण दुष:किर्ती होती पंतप्रधानाची
अनीतीने तो वागे लुबाडणूक करी प्रजेची ||

उग्रसेन राजा होता उग्रनगरीचा
शेजार होता त्याला अवंतीपुराचा
कमालीचा उग्र राजा त्याची लई मोठी हाव
जमीनजुमला राज्यवाढवणे हेच त्याला ठाव ||

आता त्याने रचला अवंतिपुरावर हल्याचा डाव
सैन्याने तयारी केली अन सुरू केला सराव
हातमिळवणी केली त्यांने कपटी क्रौंधनितीशी
भ्रष्ट पंतप्रधान पाडेल का चतुरसेनाला तोंडघशी?
ऐका सज्जन नरनारी तुम्ही बसले सामोरी
वगनाट्य पाषाणभेद शाहीराचे
सादर करतो रंगमंदिरी || जी जी जी

(शाहीर रंगमंचावरून विंगेत जातात)
=====================

(बॅकग्राउंडला तलवारींचा खणखणाट. आरोळ्या, मारा, तोडा असले आवाज. तोफा बंदूकांचे आवाज होत असतात.)
(एखाद्या मिनीटाच्या अंतराने रंगमंचावर राजा चतूरसेन आणि चतुरांगण, हातमोडे, पायमोडे, अंगरक्षक आदी शत्रूच्या सैन्याच्या गराड्यात आहे असे दिसते. शत्रूसैन्याचा सेनापती त्याला दोरखंडाने बांधतो.)

हवालदार हातमोडे: अरे मुर्दाडांनो, हिंमत आसल तर मला मोकळं सोडा अन मग दावतो माजा हिसका. (शत्रूसैन्याकडून सुटण्याचा असफल प्रयत्न करतो.)

शिपाई पायमोडे: हवालदार साहेब बोलतात ते बरोबर हाय. वाघाला जाळ्यात पकडल्यावानी आमची अवस्था केलीया जनू तुमी लोकांनी.

शत्रूसैन्याचा सेनापती: ए! गप बसा रे सारे. महाराज चतुरसेन, आमचा विजय झालेला आहे. आम्ही तुमाला युद्धकैदी केलं आहे.

चतुसेन महाराज: अरं हॅट, म्हणे विजय झालेला आहे. अजून आमच्या राजधानीत प्रधानजी अन माझा मुलगा शुरसेन बाकी आहेत म्हटल. ते नक्कीच याचा बदला घेतील अन आम्हाला सोडवून विजय मिळवतील.

(तेथेच उग्रसेन राजा टाळ्या वाजवत येतो. )

उग्रसेन राजा: वा वा वा. सेनापती, तुम्ही महाराज चतुरसेनांना कैद करून चांगलीच कामगिरी केली आहे. आता बाकीची कामगिरी आमचे मांडलीक झालेले अवंतिपुरचे प्रधानजी क्रौंधनिती करतील.

महाराज चतुरसेन: काहीही काय बोलत आहेत उग्रसेन तुम्ही? बाकीची कामगिरी काय? मांडलीक झालेले अवंतिपुरचे परधानजी क्रौंधनिती काय?

उग्रसेन राजा: आम्ही बरोबर बोलत आहोत महाराज चतुरसेन. अहो तुम्हाला शिकारी करण्याचा लय छंद होता. त्यामुळं तुमाला तुमच्या राज्याकडं लक्ष देता आलं नाही. म्हणूनच तुमचे प्रधान क्रोंधनिती आम्हाला येवून मिळाले. आता आम्ही त्यांना आमचं मांडलीक केलेलं आहे. गुमान आता तुम्ही आमच्या तुरूंगाचा पाहूणचार करावा. तिकडं तुमच्या राणीसरकार अन राजपुत्राची काळजी प्रधानजी घेतीलच. चला. तुरूंगात डांबारे सगळ्यांना.

(महाराज चतुरसेनांना कैद करून सगळे जण रंगमंचावरून विंगेत जातात.)
==========================

(अवंतिपुरचा महाल. निताराणी खिडकीपाशी काळजीने उभी आहे. राजपुत्र शुरसेन तेथे येतो.)

शुरसेन: आई, तू काय काळजी करते. बाबा युद्धावरून लवकरच जिंकून परत येतील.

(प्रधान क्रौंधनिती मोठ्यानं हसत हसत तेथे येतो.)

प्रधानजी: हा हा हा हा हा... शुरसेना, अरे तुझे बाबा युद्ध हरले आहेत. त्यांना उग्रसेनाने कैदी केलं आहे. अवंतिपुरावर आता माझा ताबा आहे अन तुम्ही दोघंही माझे कैदी झालात. अवंतिपुरावर आमचीच सत्ता राहील.

निताराणी: अरे निचा. तुझा हा डाव माझ्या कसा लक्षात आला नाही.

प्रधानजी: म्हणूनच आता तुम्ही आमचे कैदी झालात. चला आम्ही तुमची तुरूंगात निट काळजी घेवू.

शुरसेन: प्रधानजी, खाल्या मिठाला तूम्ही जागला नाही. आम्ही तुमचा बदला जरूर घेवू.

प्रधानजी: अरे जा जा. अजून तुझे दुधाचे दातही पडलेले नाहीत अन म्हणे बदला घेवू. कोण आहे रे तिकडे? राणीसाहेबांना अन राजपुत्रांना कैद करून तुरंगात डांबा.

(दोन शिपाई राणीसाहेबांना अन राजपुत्रांना कैद करून घेवून जातात.)

राजपुत्र शुरसेन: हे बरोबर नाही परधानजी. आम्ही तुमचा बद्ला जरूर घेवू हे लक्षात ठेवा.

(शिपाई राजपुत्राला कैद करून घेवून जातात. राजपुत्र ओरड्त विंगेत जातो. प्रधानजी मोठ्यानं हसत दुसर्‍या विंगेत जातात.)
================================

(राजपुत्र तुरूंगात आहे. राणीसरकारही दुसर्‍या तुरूंगात आहेत.)

(दृष्यः तुरूंगातला राजपुत्र रात्री झोपेत असलेल्या तुरूंग रक्षकाकडच्या किल्या पळवतो व तुरूंगाचा दरवाजा उघडून पळतो. फाटलेले कपडे, वाढलेली दाढी अशा अवस्थेत राजपुत्र शुरसेन उग्रनगरीत प्रवेश करतो.)

राजपुत्र शुरसेन (स्वगत): चला एकदाची सुटका करून आपण उग्रनगरीत प्रवेश तर केला आहे. काहीतरी अक्क्लहुशारीने आता उग्रसेनाच्या महालात प्रवेश मिळवून वडिलांची सुटका करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. सर्वात पहिल्यांदा माझा अवतार बदलून चांगले कपडे घातले पाहिजे.

(उग्रसेनाचा दरबार. दरबारात मंत्री तसेच उग्रसेनाची मुलगी सुनयना उपस्थीत आहेत. राजपुत्र शुरसेन एक शत्रविक्रेता बनून आलेला आहे.)

राजपुत्र शुरसेन: मुजरा महाराज. मी शारंगधर एक शत्रविक्रेता आहे. देशोदेशी मी चांगल्या दर्जाची, आधुनिक शत्रे विकत असतो. आपणही माझ्या गोदामातील धारदार तलवारी, ढाली व बंदूका बघाव्यात.

राजा उग्रसेन: वा वा, आम्हाला शत्रास्त्रांचा मोठा शौक आहे. बरं झालं तुम्ही आलात ते. आता आलाच आहात तर आजच्या दिवस मुक्कामाला थांबा आमच्या राजमहालात. उद्या सकाळी आपण तुमच्या शत्रास्त्रांच्या कोठारावर जावू अन खरेदी करू. बरं, ही आमची राजकन्या सुनयना. बाळ तू आज यांची व्यवस्था बघ बरं.

राजकन्या सुनयना: हो बाबा. मी यांची व्यवस्था बघते. चला शारंगधर, तुमच्या विश्रांतीची सोय करून देते.
============================

(सगळे जण विंगेत जातात. दुसर्‍या विंगेतून शारंगधर (राजपुत्र शुरसेन) व राजकन्या सुनयना येतात.)

सुनयना: शारंगधर, ही तुमची खोली.

शारंगधर: वा वा. छानच आहे ही खोली. पण मी शिपायाकडून असे ऐकलेय की या खोलीपासून जवळच राजकैद्यांना ठेवण्याचा तुरूंग आहे म्हणे?

सुनयना: काही काळजी करू नका तुम्ही शारंगधर. घाबरू नका (हसत) अहो ते तुरूंगातले कैदी काही तुरूंग फोडून तुमच्याकडे येणार नाहीत.

शारंगधर: हो ते पण खरं आहे म्हणा. पण मी कैद्यांना थोडा घाबरतो, म्हणून विचारतो आहे.

सुनयना: एक शस्त्र विकणारा अन तुरूंगातल्या कैद्यांना घाबरतो! मला खरं वाटत नाही. आणखी एक, तुम्हाला दरबारात बघितल्यापासून मला सारखी शंका येते आहे. राग येणार नसेल तर विचारू का?

शारंगधरः अहो तुमचा कसला राग. बिनधास्त विचारा जे काय विचारायचे ते.

सुनयना: तुमच्या बोलण्यावरून अन दिसण्यावरून तुम्ही काही शत्रांस्त्रांचे व्यापारी दिसत नाही. तुम्ही खरंच कोण आहात?

शारंगधर: सुनयना, तुला खरं सांगण्यात आता काही हरकत नाही. मी तुमच्या शेजारच्या राज्याचा, अवंतिनगरीचा राजपुत्र शुरसेन आहे. तुझ्या वडिलांनी आमच्या राज्याव्रर हल्ला केला अन माझ्या वडिलांना त्यांच्या अंगरक्षकांसहित कैद केले. तिकडे आमचे प्रधानजी तुमचे मांडलीक झाले अन त्यांनी मला व माझ्या आईला कैद करून तुरूंगात टाकले. एके दिवशी मी तुरंगातून माझी सुटका केली अन येथे आलो. आता माझे एकच लक्ष आहे. माझ्या वडिलांची सुटका करायची. त्यानंतर आईची सुटका करून आमचे राज्य मला परत मिळवायचे आहे.

सुनयना: शुरसेन, दरबारात पाहिल्यापासून तु मला आवडला आहे. माझ्या वडिलांना संपत्तीचा, जमीनजुमल्याचा फार हव्यास आहे. शेजारच्या राजाची संपत्ती मिळवण्यासाठी त्यांनी माझा विवाह शेजारच्या वृद्ध राजाशी करून देण्याचा हट्ट धरला आहे. मी पण तुझ्याबरोबर आहे शारंगधर. तुझ्या वडिलांची सुटका करण्यात मी तुला मदत करते. आजच रात्री मी तुरूंगाच्या किल्या मिळवते व तुझ्या वडिलांची, अंगरक्षकांची सुटका करते.

शुरसेन: सुनयना, माणसाचा हेतू चांगला असला की परमेश्वर त्याला मदत करतो असे म्हणतात. तुझा मला मिळालेला पाठिंबा पाहून मलाही तसेच वाटत आहे. मी मध्यरात्री मुख्यद्वाराजवळ थांबतो. तेथेच तुम्ही सगळेजण या. आणखी एक, मलासुद्धा तुझा उमदा स्वभाव आवडला आहे. तु आमच्याबरोबर अवंतिपुरला आलीस तर मला आनंद होईल. आपले लग्न तेथेच करावे अशी माझी ईच्छा आहे. तुझी काही हरकत तर नाही ना?

सुनयना: नाही माझी कसलीच हरकत नाही. अरे तुझ्यासारखा शुरविर राजपुत्र मला मिळतो आहे हा खुप मोठा आनंद आहे. नंतर मी माझ्या वडिलांची समजूत घालीनच. ठिक आहे तर मग आज रात्री ठिक बारा वाजता मी तुझ्या वडिल व इतरांना घेवून मुख्यद्वाराजवळ येते. तु पण तेथेच थांब. आता तू आराम कर. येते मी.

(सुनयना, शुरसेन वेगवेगळ्या विंगेत जातात.)
=========================

(इकडे रात्री सुनयना राजा चतूरसेनाची त्याच्या अंगरक्षकांसहीत सुटका करते व ते सगळे मुख्यद्वाराजवळ येतात.)

सुनयना: शुरसेना, ठरल्याप्रमाणे मी तुझ्या वडिलांची सुटका केली आहे.

शुरसेन: बाबा!! (आनंदानं त्याच्या वडिलांना मिठी मारतो.) चला बाबा, आता तुमची सुटका झाली आहे. लवकरात लवकर आपण सगळे वेशांतर करून अवंतिपुरला निघूया. तिकडे भ्रष्ट प्रधानाने आईला तुरूंगात डांबलेले आहे. तिची सुटका केली पाहीजे.

महाराजः काय, क्रोंधनितीने राणीसरकारांना तुरूंगात डांबलेले आहे? हा अस्तनीतला निखारा आपलाच वैरी झाला. निच, पाजी हरामखोर पंतप्रधानाचा चांगलाच बदला घेतला पाहिजे.

हातमोडे हवालदार: चला चला महाराज. मलाही त्या प्रधानाचा बदला घेतला पाहिजे. त्याच्यामुळेच हे सगळं झालंय.

पायमोडे शिपाई: चला महाराज, मलाही माझा टिए, डीए, जेवणाचा भत्ता मंजूर न केल्याचा बदला घ्यायचा आहे. लयी सळवलं व्हतं त्या परधानानं.

(सर्वजण विंगेत जातात.)
==========================

(दृष्य: वेशांतर केलेले सारे जण- महाराज, राजपुत्र शुरसेन, राजपुत्री सुनयना व चतूरसेनासहीत अंगरक्षक, हातमोडे हवालदार, पायमोडे शिपाई अवंतिपुरला येतात. राजमहालात प्रवेश करतात.)

प्रधानजी: हे काय! महाराज तुम्ही कैदेतून सुटून आलेले दिसतात! (तलवार काढतो)

महाराज: (तलवार काढत चवताळून) कपटी प्रधाना, आता तुझा खेळच संपवतो.

शुरसेनः महाराज, याचा वध माझ्याच हातून लिहीलेला आहे. तुम्ही बाजूला व्हा बाबा.

(शुरसेनाची परधानाशी लढाई होते. त्या लढाईत शुरसेन प्रधानाला ठार करतो.)

शुरसेनः बाबा, आता कपटी प्रधान क्रौंधनितीचा वध झालेला आहे. लगेच चला. आपण तुरूंगात असलेल्या आईची सुटका करण्यास जावू.

(सगळे जण विंगेत जातात.)
================================

(महाराजांचा दरबार. महाराज चतुरसेनासहित सारे जण राजवेशात.)

चतुरसेन: चला सगळे आता एकत्र आलेत. आपलं राज्यही पुन्हा आपल्याला मिळलं आहे. राजपुत्र शुरसेन, हे सगळे तुझ्या शुरपणामुळे झालेले आहे.

निताराणी: हो हे खरेच आहे. माझा मुलगा शुर आहे, हुशार आहे. अक्कलहुशारीने त्याने सगळे जमवून आणलेले आहे. अन ही मुलगी कोण आहे रे बाबा ते तर सांगशिल की नाही?

शुरसेन: आई मी काही सगळे जमवलेले नाही. हे सगळं या मुलीने जमवून आणलं आहे. ही शेजारच्या राजाची म्हणजे आपल्या शत्रूची मुलगी सुनयना.

निताराणी:(आश्चर्याने) काय उग्रसेनाची मुलगी? अन ती येथे कशी?

चतूरसेन: मी सांगतो राणीसरकार. अग ह्या सुनयनाने अन शुरसेनाने सुत जमवले. अन मग दोघांनी माझी सुटका केली. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी येथे येवून शुरसेनाने भ्रष्ट प्रधानाचा वध करून तुझी सुटका केली. अन बरं का राणीसरकार, आता ते दोघंही लग्न करणार आहेत.

हातमोडे: मंग राणीसरकार, आहे की नाही हुशार तुमचा मुलगा अन सुन!

निताराणी: हो तर आहेच आपला मुलगा अन सुन हुशार. हो की नाही महाराज? चला एखादा चांगला मुहूर्त पाहून लग्न उरकून टाकू दोघांचं.

चतूरसेन: हो तर. आणि त्याच दिवशी राजपुत्र शुरसेनाचा राज्याभिषेक करून आम्ही राजा करणार आहोत.

शिपाई पायमोडे: काय महाराज, म्हणजे लग्नाचे लाडू अन राज्याभिषेकाची मिठाई एकाच दिवशी का? नाय म्हणजे येगयेगळ्या दिवशी हे समारंभ ठेवले असते तर दोन दिवसांची जेवायची सोय झाली असती. काय?

(सगळे जण हसत हसत असतांना पडदा पडतो.)
===============================

(उग्रसेनाचा दरबार. एक शिपाई सुनयनाच्या लग्नाची बातमी आणतो.)

शिपाई (मुजरा करत): महाराज महाराज, राजपुत्री सुनयना अवंतिपुरचा राजपुत्र शुरसेनाशी लग्न करणार आहे अशी बातमी आहे.

उग्रसेन: काय! सुनयना अन शुरसेनाचं लग्न! आमचा तर विश्वासच बसत नाही. सुनयना पळून गेली हे एकवेळ ठिक होतं पण आता शुरसेनाशीच लग्न! नाही.....(उद्विग्न होतो.).....
....हं.... (पश्चातापाने) तिचंच बरोबर आहे म्हणा. मी मुर्खपणामुळे अन संपत्तीच्या हव्यासामुळे तिचं लग्न शेजारच्या वृद्ध राजाशी लावून देत होतो. मला माझ्या मुर्खपणाची लाज वाटते आहे. ते काही असो, माणसाच्या संपत्तीच्या हावेला सीमा नसते तसेच प्रेम करण्यासाठीही देशाच्या सीमा त्यावर बंधन आणू शकत नाही. प्रमाला देशाची सीमा नाही हेच खरे. चला सुनयना चांगल्या राजघराण्यात पडली हाच आनंद आहे....
......(हाक मारतो) दिवाणजी....अहो दिवाणजी....

दिवाणजी: जी महाराज....

उग्रसेन: आताच्या आता अवंतिनगरीला निरोप पाठवा की आम्हाला आमच्या वागणूकीचा पश्चाताप झालेला आहे. आमचे राज्य आम्ही अवंतिपुरात विलीन करत आहोत अन राजपुत्र शुरसेनाचा जावई म्हणून स्विकार करत आहोत. अन त्यांना असाही निरोप पाठवा की, हा शानदार लग्नसमारंभ उग्रनगरीतच होईल म्हणून.

(दरबारातील सगळेजण आनंदाने अन आश्चर्याने महारांजकडे पहातात.)

दिवाणजी: जशी आपली आज्ञा महाराज.

उग्रसेन: चला सगळेजण झाडून लग्नाच्या तयारीला लागा. इतर सगळ्या राज्यांना विवाहाचे निमंत्रण पाठवा. अन आपल्या राज्यातली सगळी प्रजा लग्नाला हजर पाहिजे. काय हवे नको ते जातीने पहा दिवाणजी. चला लागा कामाला.

दरबरातील सगळे जण: महाराजांचा विजय असो.

(मुजरा करतात अन विंगेत जातात.)
=========================
(विंगेतून सगळे कलाकार रंगमंचावर येतात. त्यात राजपुत्र शुरसेन व सुनयना वधुवराच्या वेशात आहेत. गळ्यात फुलांच्या माळा आहेत. सर्व कलाकार भैरवी होत असतांना हात जोडून उभे राहतात.)

भैरवी:

गणेशा, नमन करतो,
आशीर्वाद द्या द्या ||
कलावंत आम्ही,
कला सादर केली
गोड मानूनी घ्या घ्या ||
(भैरवी होत असतांना पडदा पडतो)

समाप्त.
{{ सदर वगनाट्य रंगमंचावर सादर करतांना फार मोठेमोठे सेट, सजावट असण्याची आवश्यकता नाही. प्रस्तूत वगनाट्यात लावणी, गण गौळण आहे. प्रयोग करतांना मुळ नाट्याचे भान ठेवून इतर अ‍ॅडिशन्स टाकल्या तरी चालतील.

प्रस्तूत वगनाट्यात प्रसंगानुरूप अजून काही लावण्या टाकता येतील. त्या परिशिष्ठात आहेत. }}

- पाषाणभेद
०८/०४/२०११