Thursday, September 1, 2011

जागरण गोंधळः आई देवी अंबेचा जागर

जागरण गोंधळः आई देवी अंबेचा जागर मी करीतो

आई देवी अंबेचा जागर मी करीतो
जागर करीतो
देवी अंबेचा गोंधळ मी घालीतो ||धृ||

आई तू ग माझी गुणी
नउवारी पातळ नेसूनी
कपाळी मळवट लाल लेवूनी
आई बसली सिंहावरी
देवी अंबेमातेला वंदन करीतो
वंदन करीतो
तुळजाभवानीच्या पायी नमीतो
पायी नमीतो
आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||१||

सुरू होई अश्विन महिना
मनी आनंद काही मावेना
नवरात्राच्या ग सोहळी
नऊ दिवस आरती ओवाळी
नऊ दिवसांचे उपास मी करीतो
उपास करीतो
सप्तश्रूंगीची मी ओटी भरीतो
ओटी भरीतो
आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||२||

साडीचोळी खणा नारळाची
ओटी भरली मी अंबिकेची
दिवा रातंदिस तेवतो
घट मातीचा मी पुजीतो
पंचपक्वांनाचा नैव्येद्य दावितो
नैव्येद्य दावितो
रेणूका मातेला तांबूल मी देतो
तांबूल देतो
आई देवी अंबेचा जागर मी करीतो ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०४/११/२०१०

No comments: