Showing posts with label शांतरस. Show all posts
Showing posts with label शांतरस. Show all posts

Monday, March 02, 2020

२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...

२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...

मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे ज्या व्यक्ती महाराष्ट्रात दिर्घकाळ राहत आहेत त्यांना देखील मराठी भाषा येणे अपेक्षीत आहे. इतर राज्यांत किंवा इतर देशांत तेथील स्थानिक भाषेलाच जास्त महत्व असते. सामान्य व्यवहार भले मग ते टॅक्सीचालक, मॉलमधील विक्रेते किंवा इतर सेवा देणारे असोत किंवा अगदी कार्पोरेट असोत, एकमेकांशी बोलणे हे स्थानिक भाषेतच होते. स्थानिक भाषा आपसूक बोलण्यातून येते. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न तेथील लोकांना करावे लागत नाहीत. अगदी पर्यटक जरी परदेशातून आलेले असले तरी त्यांचे स्वागत आणि इतर आदरातिथ्य स्थानिक भाषेत केले जाते. जेथे जरूर असते तेथे भाषा अनुवादक उपस्थित असतो.

आपल्या मराठी प्रांतात असे होते का याचा विचार प्रत्येक मराठी भाषीकाने मराठी दिनानिमित्त करायला हवा.  मी येथे "मराठी प्रांत"  हा शब्द वापरला आहे तो अशासाठी की मराठी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादीत राहू नये. मराठीसाठी महाराष्ट्र हा केवळ एक पेटीसारखा साचेबद्ध आकार नाही. त्याच्या बाहेरही मराठी गेली पाहिजे. तिचा विकास झाला पाहिजे.

लिखाणाच्या बाबतीतही मराठीचा संकोच होतो आहे असे लक्षात येते. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला तर भरपूर पुस्तके छापलेली दिसत आहेत. नव-नविन प्रकाशने पुस्तके छापत आहेत. वर्तमानपत्रे लाखो वाचक असल्याचा निर्वाळा देत आहेत आणि तुम्ही असे उलट का म्हणत आहात असाही प्रश्न विचाराल. एक लक्षात घ्या, की सर्वच ठिकाणी (म्हणजे सर्व भागात) लोकसंख्या वाढत आहे. त्या लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्हाला पुस्तकांचा, वाचकांचा खप वाढलेला दिसेल, पण हेच प्रमाण शेकडा किती टक्के असावे त्याचाही विचार करायला हरकत नाही. यात वाचकांचा आकडा सोडला तर मराठीत लिहीणार्‍यांची संख्या अतिशय रोडावलेली दिसेल. मला सांगा किंवा तुमच्या मनालाच सांगा की तुम्ही शेवटचे मराठीतले पत्र म्हणा, मराठीतली चिठ्ठी म्हणा किंवा नातेवाईकांना आताच्या जमानातले मराठीतले ईमेल कधी पाठवले? मला वाटते ते तुम्हाला आठवणारच नाही. गेल्या सहा महिन्यांत किती जणांनी वेबसाईटवर लिखाण केले? किंवा ब्लॉग लिहीला? किती जणांनी मराठीत आपले विचार शब्दबद्ध केलेत? किती जाणांनी कवितेचे पुस्तक विकत किंवा ग्रंथालयातून आणून मनापासून त्याचा आस्वाद घेतला? मला वाटते शेकडा प्रमाण चिंताजन असेल.

थोडक्यात मराठी वाचकांची आणि मराठी भाषेत लिहीणार्‍यांच्या आकड्यांबाबत अचूक संशोधन झाले पाहिजे. केवळ व्हाटसअ‍ॅप किंवा फेसबूकवर एक दोन प्रतिक्रीया लिहील्या किंवा मराठीतील दिवसाच्या शुभेच्छा असलेले निरोप दुसर्‍यांना पाठवले म्हणजे माझी मराठीप्रती असलेली जबाबदारी पूर्ण झाली असे नाही. मराठी बोलण्यासाठी, मराठी लिहीण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजे. आणि ते प्रयत्न मनापासून झाले पाहिजे. केवळ आज मराठी दिन आहे, आज एक मे, महाराष्ट्र दिन आहे म्हणून मराठी एका दिवसापुरती मर्यादित ठेवू नये.

आणखी एक विचार मनात आला. मराठीतले लिखाण हे शुद्धलेखनानुसारच व्हायला पाहिजे हा दंडक म्हणा किंवा भिती आपल्याला शालेय वयापासून घातली गेली आहे. पहिला उकार, दुसरा उकार, पहिली मात्रा दुसरी मात्रा यातच आपण अडकून पडलो आहोत. याबाबतीत श्री.शुभानन गांगल यांनी भरपुर संशोधन केले आहे. त्यांच्या मते मराठी भाषा संस्कृतोद्भव नाही. तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि मराठी शुद्धलेखनाचे व्याकरण हे इंग्रजांनी त्यांच्या सोईने मराठी भाषीकांवर लादलेले आहे. त्यामुळे दुसरी वेलांटी, दुसरा उकार वापरणे योग्य आहे. मराठी भाषेच्या लिखाणासाठी, शुद्धलेखनाचा न्युनगंड मनातून काढून टाकण्यासाठी शिक्षणाच्या सुरूवातीच्या का होईना काळात या लिखाणाचा प्रयोग करायला हरकत नाही.

तर या लेखाच्या शिर्षकानुसार केवळ "२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...मी मराठी लिहीण्याचा प्रयत्न करेन" असे न होता "दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे", या समर्थांच्या ओवीनुसात मराठीच्या वृद्धीसाठी दररोज काहीतरी लिहायला आणि वाचायला हवे.

- पूर्वप्रकाशित

Thursday, February 06, 2020

एका उदास संध्याकाळी

एका उदास संध्याकाळी


एका उदास संध्याकाळी
कोणी गात होती विराणी ||

शब्दांत अशी आस नव्हती
चाल नव्हती अशी कोणती
धारही नव्हती त्या शब्दांना
तरी काळीज जाय चिरूनी ||

संधीप्रकाश निळा जांभळा
खालून गेला वर आभाळा
कुंद हवा अन वारा पडला
हवेत सूर राही भरूनी ||

धिरगंभीर सूर कवळूनी
गीत हृदयीचे आळवूनी
उलगडे आर्त सरगम
भरूनी राहिली कानी ||

- पाषाणभेद
०५/०२/२०२०

Monday, January 27, 2020

एकदा तरी माती व्हावे

एकदा तरी माती व्हावे

कधीतरी इतरांच्या पायी जावे
एकदा तरी माती व्हावे

नको राग लोभ कशाचा
मी माझाच नाही आहे सर्वांचा
नको व्यर्थ माझे माझे करावे
एकदा तरी माती व्हावे

दैन्य इतरांचे पाहून
मग कळते मी किती सुखी ते
आपलेच सुख आपल्याला टोचावे
एकदा तरी माती व्हावे

चारी ठाव घरी खातसे
ताटात गरम पक्वाने
कागदावर अन्न केव्हातरी चाखावे
एकदा तरी माती व्हावे

वापरसी अंघोळीस पाणी मुबलक
फासशी साबण अंगास सुवासीक
शरीर सार्वजनीक स्नानास अनुकूल असावे
एकदा तरी माती व्हावे

सेवा करवून घेई स्वत:ची
हातात सार्‍या वस्तू येती
कधीतरी झाडू मारूनी उष्टे उचलावे
एकदा तरी माती व्हावे

आत्मकेंद्री स्वभाव होई
मलाच हवे सारे काही
वागणे असे टाकून द्यावे
एकदा तरी माती व्हावे

स्वार्थी जग असले तरी
कुणी एखादा भेटतो वेगळा
त्याच्या अंगचे निस्वार्थीपण घ्यावे
एकदा तरी माती व्हावे

- पाषाणभेद
२७/०१८/२०२०

Sunday, July 28, 2019

इंद्रधनू

इंद्रधनू

(आकाशात इंद्रधनुष्य पाहील्याने माझी मुलगी हरखली आहे अन ती मला बोलावते आहे.)

आकाशी ते इंद्रधनू आले 
अहा!
चला बाबा बघा 
ते पहा! ते पहा!!

कितीक मनोहर मोदभरे
आकाशीचे रंग खरे
कमान तयाची वाकली
माझ्यासवे पहा बरे

दवबिंदूवर प्रकाश पडूनी
आले ते वर उसळूनी
उल्हासीत झाले मी
चटकन या तुम्ही

वर्ण वरी घेई तांबडा
तदनंतर ये नारंगी पिवळा
चमके तो रंग हिरवा निळा
घेवूनी पारवा जांभळा 
आकाशी व्यापली प्रकाशमाला

पर्जन्याचा अधिपती नरेश
भेट जलाचे देई धरेस
त्याच समयी ये सामोरी भास्कर
किरणांस भिडता थेंब नीर
गोफ इंद्राचा घेई आकार

मज न ठावूक; 
राहील न राहील ते काळ किती
ये वायू मग जाय क्षिती
साठवूनी घ्या लोचनी
त्वरा करा तुम्ही; बाबा या लवकरी

- पाषाणभेद
२८/०७/२०१९

Tuesday, July 16, 2019

निर्झर

निर्झर

निर्झर होता एक बारीकसा; हिरव्या डोंगरातून वाहतसा
असुनी तो लहान छोटा; ठावूक नव्हत्या पुढल्या वाटा ||

धरतीवरच्या वर्षावाने; जीवन त्याचे सुरू जहाले
धरणी जाहली माता ती; अल्लड खट्याळ उदकाची ||

नित नवीन भरून जलाने; ठावूक त्याला भरभरून वाहणे
चंचल उत्कट उल्हासीत पाणी; घेवूनी जायी दो काठांनी ||

पुढेच मिळाली सरिता त्याला; सवे वाहण्या पुसे खळाळा
विचारही न करता तो मिळाला; निर्मळ नदीत एकरूप जाहला ||


- पाषाणभेद
१५/०७/२०१९

Saturday, June 08, 2019

आभाळ पक्षी

आभाळानं द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी

धरतीनं जागा द्यावी
झाडांची आई व्हावी

झाडांनी सावली द्यावी
पक्षांची घरटी ल्यावी

पक्षांनी पंख पसरावे
आभाळात विहरावे

आभाळाने द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी

पाषाणभेद ( त्रंबकेश्वर मुक्काम)
२५/०५/२०१९

मी मोठ्ठा की लहान?

मला कुणी मोठ्ठं समजतच नाही
मी लहानाचा मोठ्ठा जसा झालोच नाही ||धृ||
अभ्यास कर अभ्यास कर सतत सांगता
निट लक्ष दे बोलतात उठता बसता
अभ्यास तर तो होतच असतो
त्याशिवाय का मी पास होतो?
तरी बोलतात तुला काही समजतच नाही ||१||
अभ्यासाच्या ताणातुन सुटकेसाठी
खेळ खेळणे चांगले आरोग्यासाठी
बोलणे हे खोटे आहे तुमचे सारे
कारण खेळ कोणते खेळावे ते तुम्हीच ठरवावे
अशाने ताण कधी कमी होतच नाही ||२||
शाळा म्हणजे काय शाळा आहे!?
पुस्तके कित्ती तरी! सोबत वर्कबुक्स आहे
ओझे दप्तराचे घेवून सकाळीस निघे
टाय, ब्लेझर गणवेशातले काय कामाचे?
मला जे समजते ते शाळेतल्या शिक्षकांना समजत का नाही? ||३||
लहान बहिण नेहमीच असते लहान
मी इतर वेळचा छोट्टा आता होतो महान
तिच्याशी भांडू नको तिला सांभाळ
बोलतात तुम्ही, मग ती खोडी का काढते खुशाल?
मी मोठ्ठा की छोट्टा मला काही कळतच नाही ||४||
टिव्ही बघणे ते तरी ठरवू द्या ना मला
कोणता चॅनल लावावा प्रश्न पडे मनाला
कार्टून, सिरीअल्स किती किती खोटे असतात
रिॲलीटी शोज पेक्षा मुव्हीज, साँग्ज भारी राहतात
टिव्ही पेक्षा मोबाईल गेम्स काय सॉलीड असतात नाही!! ||५||
लहान-मोठा भेद - पाषाणभेद
१०/०५/२०१९

माझे मन पाही विठ्ठल मुर्ती

माझे मन पाही विठ्ठल मुर्ती
सावळां विठ्ठल उभा पंढरीसी ||१||
नाही मज वेळ जाण्या राऊळा
नच पूजा केली कधी काळां ||२||
रमलो संसारी विना विचार
भाव भक्तीचा केवळ उपचार ||३||
नमस्कार केला दोन्ही कर जोडूनी
पाषाण भेटला उराउरी दुरूनी ||४||
०९/०५/२०१९

Wednesday, January 16, 2019

मरण धाड देवा | कधीचा केला धावा ||

मरण धाड देवा | कधीचा केला धावा ||
कितीक वाट पाही | जिवाची चिंता नाही ||
जगणे जगले | तृप्त होवोनिया गेले ||
सच्या पाषाणाचे वाची | सत्य कळो सकळांसी ||
कितीक वाट पाही | जिवाची चिंता नाही ||
जगणे जगले | तृप्त होवोनिया गेले ||
सच्या पाषाणाचे वाची | सत्य कळो सकळांसी ||

Friday, January 02, 2015

जमला मेळा संतसज्जनांचा

जमला मेळा संतसज्जनांचा

जमला मेळा संतसज्जनांचा
पांडुरंगाच्या भक्तांचा ||ध्रू||

हाती घेवूनीया विणा आणि टाळ
भजनात विसरती काळवेळ
हरपली तहानभुक हरपले देहभान
जमला मेळा...||1||

नको भेटी आणिक तिर्थक्षेत्री
आम्हा वैष्णवांची पंढरीच काशी
माऊलीच्या घरी आलो माहेराला
जमला मेळा... ||2||

विठूरायाचे सावळे मुख
पाहूनिया झाले सर्वसुख
ओलांडला पर्वत यातनांचा
जमला मेळा...||3||

- पाषाणभेद

Sunday, October 07, 2012

जंगलातले चालणे


(c) pashanbhed
जंगलातले चालणे


दुर रानात रानात
शीळ घुमली कानात
पाखरांची किलबील
पानात पानात

उभा बाजूला डोंगर
झरा वाहतो समोर
पाणी पिण्यासाठी त्यात
सोडले कुणी जनावर

शिवालय शांत भग्न
गुंतले त्यात मन
थेंब थेंब पाण्याचा
होई अभिषेक अर्पण

होती बरोबर शिदोरी
झाली तीची न्याहरी
दुपारी होईल काहीबाही
त्यालाच काळजी सारी

एकटेच चालायाचे
स्वत:शीच बोलायाचे
जंगल मोठे निबिड
निघून एकटेच जायचे

आला सुर्य माथ्यावर
थेंब घामाचे अंगावर
पायवाट संपता संपेना
चालायाचे खूप अजून

- पाषाणभेद

Thursday, March 08, 2012

का? का? का?

का? का? का?

पानांनाही कधी का येतो गंध
फुलासारखे हुंगून होण्या धुंद

पाण्याला कधी चढते निळाई
जंगलात का असते हिरवाई

रंग फुलांचे इतके का आगळे
पाहून असे का होते ते नकळे

डोंगरावर ते वृक्ष उभे का
सावली देण्या ते तेथे का

आकाशात ढग का जमून येती
आता येथे मग कोठे जाती

वारा भणाण उगा का वाहतो
"की, मी येथे आहे" असे सांगतो

{{हा मी येथे आलो का कधीचा
येथे रहायचा बेत का फुकाचा}}

हा मी एकटाच का कधीचा आलो
येथला नसूनही का येथलाच झालो

- पाभे

Saturday, December 31, 2011

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची

(श्री. म्हाळसादेवी देवस्थान, म्हाळसाकोरे, ता. निफाड, जि. नाशिक, महाराष्ट्र, भारत)

म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन
माथा झुकतोया तिच्या पायी भक्तीनं ||धृ||

या हो तुम्ही दर्शन घ्याया म्हाळसाकोर्‍याला
पावन भुमी आहे ही निफाड तालूक्याला
बागाईत मुलूख शेतीवाडी बिनघोर
अंतरी दिपमाळ जळूद्या तुम्हां देवीची आन
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||१||

नांदूरमधमेश्वर धरण जवळ दोन मैलावर
उस द्राक्ष पिकवी शेतकरी कष्टाने फार
नाशिकजिल्ह्यातले हे पक्षी अभयारण्य
गोदावरी पुढं वाहते पिकवीत रानं
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||२||

गणपती सरस्वती देवीच्या आजूबाजूला
होमकुंड मंदिरात दाखवीते ज्वाला
वाहन देवीचे वाघ समोर दर्शनाला
मन प्रसन्न होई आईला भेटून
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||३||

निळकंठेश्वर महादेव मंदिर हेमाडपंथी
हरहर शंभो शंकराची समोर वसती
एका गावात दोन देव नांदती
अख्यायीका प्रसिध्द पुरानकालापासून
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||४||

म्हाळसादेवी कुळदेवी भक्त कुळांची
भक्त तिचे सारे देशातून येती
आशिर्वाद दर्शन घेवून जाती
पाषाणभेद बुध्दीहीन करी आईचे कवन
म्हाळसादेवी म्हाळसाकोर्‍याची आहे लई पावन ||५||

- पाषाणभेद

Wednesday, December 28, 2011

दत्त दत्त बोलत गेलो

दत्त दत्त बोलत गेलो

दत्त दत्त बोलत गेलो
गेलो गेलो दत्त दत्त बोलत गेलो
दत्ताला भजूनी धन्य झालो
झालो झालो दत्ताला भजूनी धन्य झालो ||

दत्तनाम सदा राहे माझ्या मुखी
जगामधे मीच आहे सर्व सुखी
नकळे मला मी कोण होतो
दत्ता समोर प्रत्यक्ष शरण आलो ||

गुरूदत्तावरी माझा राही विश्वास
दत्त दत्त सदा घेई अंतरी श्वास
विस्मये आश्चर्ये असे दत्त किर्ती
वेळीअवेळी दत्ताला आठवित गेलो ||

चिंता क्लेश उणीवा असती माझ्यात
प्रयत्न करणे केवळ असे हातात
मागणे माझे काही नसता
दत्तगुरू प्रसाद नित्य मुखी मिळो ||

- पाभे

Wednesday, September 21, 2011

प्रवास

प्रवास
दुर पुढे जातांना सरलेली मागची
वाट नजरेच्या आवाक्यात येते.
किती चालायचे अजून बाकी
याची आठवण होते.

पायात रूतलेले काटे, दगड
लागणारा पाऊस वारा उन
प्रवासातला होणारा त्रास
निब्बर करतं त्वचा अन मन

तसल्या बेभरवशाच्या त्रासदायक प्रवासातही
एखादी वार्‍याची झुळूक,
एखादी गवती हिरवा जमीन
मनाला सुखावते.

तेथे थांबावस वाटतं
पण थांबता येत नाही
कारण
वाट संपलेली नसते
त्यामुळे चालावंच लागत.

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१७/०९/२०११

Friday, September 02, 2011

आरती गुरूदत्ताची

मंडळी, शब्दगारवा २०१० मध्ये गुरूदत्ताची आरती गेल्या दत्तजयंतीला प्रकाशीत झालीय. ती येथे देतोय. शब्दगारवा २०१० त आणखीही लेख अन कविता आहेत. त्या आपण नजरेखालून घालाव्यात. (कवितेत सार्थ बदल प्रमोद देव काकांनी केले आहेत. त्यांना धन्यवाद.)

आरती गुरूदत्ताची

आर्त विनवणी करू गुरूदत्ताची
ब्रम्हा विष्णू महेशाची
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||ध्रू||

ब्रह्मदेव सृष्टी रचितो
श्रीविष्णू पालन करितो
महेश संहार करी, पुनर्निर्मितीसाठी
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||१||

शंख चक्र कमंडलू धरीले हाती
खांद्यावरी झोळी, भस्म असे माथी
देवा दत्ता भिक्षा घ्या गरीबाघरची
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||२||

जटाजूट घन केशसंभार
रुद्राक्षमाळा गळाभरोनी
गोश्वानासह त्रैमुर्ती अवतरली
आर्त विनवणी करू गुरूदत्ताची ||३||

(पुर्वप्रकाशीत : शब्दगारवा २०१०)

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२०/१२/२०१०

हळूच द्या मज झोका कान्हा

हळूच द्या मज झोका कान्हा

हळूच द्या मज झोका कान्हा
चित्त नाही माझे थारा
हळूच द्या मज झोका कान्हा ||धृ||

मन विचलीत झाले वासनांनी भरले
घुसळोनी लोणी काढूनी घेती
तयाप्रमाणे वासना काढाना ||१||

संसारी राहून पाही जगजेठी
पापपुण्या लावी गाठी
कितीक करावी तुमची आरती
जन्ममरणाचा पाळणा हलवा ना ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०४/११/२०१०

आम्ही काय म्हणूं धार्मीक

आम्ही काय म्हणूं धार्मीक |
आम्ही जगाचे नास्तिक ||१||

आम्ही जप नाही केले कधी |
रामनाम नाही आमच्या ओठी ||२||

नाही कधी घडला संतसंग |
पाण्यावीण दुष्काळी मेघ ||३||

देवाचीये न लागू चरणा |
धुळीच्याच पडलो प्रेमा ||४||

नाही कधी गेलो पंढरीसी |
कधी नाही बोललो सावळ्याशी ||५||

कधी नाही लिन झालो |
कधी नाही पायी पडलो ||६||

जपजाप्य कधी केले |
आठवणीतून निघून गेले ||७||

पंढरीच्या पांडूरंगा |
आलो तुझीया संगा ||८||

पापपुण्य निघुनी गेले |
माझे स्वरूप तुझे झाले ||९||

सच्च्या म्हणे कोण नास्तिक? |
अधार्मीकही होई धार्मीक ||१०||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०४/११/२०१०

आपण सारे शिर्डीला जावूया

आपण सारे शिर्डीला जावूया

या संसारातूनी....या या संसारातूनी
थोडा वेळ काढूया....हो हो थोडातरी वेळ काढूया...
चला रे चला आपण सारे शिर्डीला जावूया
शिर्डीला जावूया ||धृ||

शिर्डीला लागले साईबाबांचे पाय हो....
साईनाथांचे पाय हो
शिर्डीवाचूनी मग दुसरा स्वर्ग असेल काय हो?
एकदातरी...
एकदातरी आपण तो स्वर्ग पाहूया
चला रे चला आपण सारे शिर्डीला जावूया
शिर्डीला जावूया ||१||

साईबाबांनी कितीतरी चमत्कार हो केले....
हो हो चमत्कार हो केले
गोरगरीबांचे कष्ट पळवून नेले
बाबांच्या दर्शनाने...
बाबांच्या दर्शनाने आपले दु:ख दुर करूया
चला रे चला आपण सारे शिर्डीला जावूया
शिर्डीला जावूया ||२||

बाबांच्या धुनीतला जाळ आजही जळतो
हो हो आजही जळतो
पारावरचा लिंब आजही बहरतो
साईबाबांची अनुभूती...
साईबाबांची अनुभूती आपणही घेवूया
चला रे चला आपण सारे शिर्डीला जावूया
शिर्डीला जावूया ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०४/११/२०१०

निम्मा रस्ता चालला

निम्मा रस्ता चालला

पार्‍श्वभुमी:हिरो मोठ्या संकटात आहे. तो मनाला प्रश्न विचारतो. कोरस म्हणजे त्याचे +ve मनच आहे.
(एक दुसराही विचार असा करता येईल:-
रस्ता=जिवन, चालणे=जिवन जगणे, थांबणे= मृत्यू )


कोरसः
निम्मा रस्ता चालला
मागं वळतो कशाला?
म्होरं जायाचं जायाचं
आता थांबतो कशाला? ||धृ||
.
.
.
.
हिरो:
वाट अवघड, मधी दगड
बाजू करू कसा? ||१||

नाही माहित कुठं जायाचं
कुना पुसू कसा? ||२||

प्वाट उपाशी, भेट नाही भाकरीशी
पेयाला पानी शोधू कसा? ||३||

आंग दमल, पाय थकलं
पाऊल टाकू कसा? ||४||

दाट जंगल, उभं ठाकलं
पार करू कसा? ||५||

उभी चढण, खाली पडनं
आता रोखू कसा? ||६||

नाही शेवट, मोठी वाट
पाऊल उचलू कसा? ||७||

लई दिवसांचा चालतो
धिर राखू कसा? ||८||

कोरसः
निम्मा रस्ता चालला
मागं वळतो कशाला?
म्होरं जायाचं जायाचं
आता थांबतो कशाला? ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/१०/२०१०