रामराम हो पाव्हणं! वाईच जरा बसा ईथं.
Thursday, March 5, 2020
ढासळला वाडा
Sunday, April 7, 2019
कोळीगीत: शिडाशिडात भरारे वारा
होड्या निघाल्या किनारा || धृ ||
Thursday, September 8, 2011
ह्या पावसानं
ह्या ह्या पावसानं असा कसा हा खेळ केला
माझा भरला संसार त्यानं पाण्यात सांडला ||धृ||
रोहीणी आल्यात तेव्हा तो पडलाच नाही
मृग लागला तेव्हा थोडाफार येवून जाई
पहीली पेरणी खरीपाची कोरडी करून गेला
ह्या ह्या पावसानं असा कसा हा खेळ केला ||१||
आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य; कोरडी गेली सारी नक्षत्र
इथे पडला तिथे पडला, पडला नाही सर्वत्र
भरणी, आश्लेषात मग पडून काय कामाचा
तो तर दुबार पेरणी करण्याच्या लायकीचा
पुन्हा कुठून आणायचं पैसा बी बियाण्याला
ह्या ह्या पावसानं असा कसा हा खेळ केला ||२||
राजा काय करील जर आभाळच फाटलं
होतं नव्हतं ते सारं पाण्यानं ओढून नेलं
उत्तरा, हस्तामध्ये तो जोरदार आला
सगळ शेत घरदार बरोबर घेवून गेला
ह्या ह्या पावसानं असा कसा हा खेळ केला ||३||
पुढची आशा करू रब्बी हंगामाची
शिकस्त करूया मेहनत करण्याची
रात्र संपून दिवस आता उजाडला
ह्या पावसानं असा कसा हा खेळ केला ||४||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०९/२०११
Monday, September 5, 2011
पावसाचा दरोडा
आला सोसाट्याचा वारा
उठलं धुळीचं रिंगण
झाडझाडोरे हालता
गेल सारं रान पिंजून ||
बांधावर आम्ही उभे
आधार एकमेकांना दोघे
तवाच ढग आले दाटून
गेलं आभाळ फाटून ||
थेंब पावसाचे मोठे द्वाड
अंगावर बसे वादीचा चाबूक
जवा पाहिजे तवा नाही
जवा नको तवा यायची खोड ||
विजा चमकून भिती घालती
काही आगाव भुईला टेकती
वंगाळ भिती मनाला खायी
जिवासाठी आसरा शोधू पाही ||
उघडा सारा रानमाळ
नव्हतं कुणाचं छप्पर
ठिपक्यावानी झाड लिंबांच
सावली देत उभं र्हातं ||
तेवढा तोच आधार
तेचा आडोसा घेतला
त्याखाली वल्ले होतो
थेंब जोराचे चुकवत ||
एकाएकी आक्रीत झालं
सन्नकन आला जाळं
डरकाळीच्या आवाजानं
सारं रान हादरलं ||
मघापासून जणू चाटीत होती
जिभल्या तू तुझ्या विजबाई
माझ्यावर आभाळ कोसळलं
कुणाकडे मी पाहू बाई ||
मोठी उलथापालथ झाली
नजरंसमोर घरधनी पडला
एकाएकी प्राण त्याचे गेले
कोळशावानी काळाठिक्कर झाला ||
कारे आवचिंदी पावसा
तू ग भवाने विजबाई
दोघं आले दरोड्याला
नशीब माझं लुटून जाई ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
३१/०८/२०११
मरणाची अवस्था
या पृथ्वीतलावर येणारा प्रत्येक सजीव कधीना कधी मरतोच. त्याच्या मरण्याच्या तर्हा, कारणे वेगवेगळी असू शकतात. पण होणारा मृत्यू एक शाश्वत घटना असते.
एकांतात मनात मृत्यूविषयी विचार कधीकधी येतात. रातीच्या वेळी अर्धवट झोपेत कधीकधी मरतांनाची स्थितीची कल्पना येवू शकते. माझा झोपेत श्वास अडकतो. झोपेत चुकून छातीवर झोपल्या गेले तर हमखास असे होते. मोठ्याने ओरडून जागे व्हावे लागते. नेटवर पाहिले असता जीभ मागे जावून श्वासमार्गात अडथळा आणते असे काहीतरी आजाराचे स्वरूप आहे. अर्थात मला त्यावर उपाय काय असले काही येथे विचारायचे नाही.
तर येणारा मृत्यू, त्यावेळची मनाची अवस्था काही मृत्यूबाबतीत फारच भयानक असू शकते. एकतर मानवाला बुद्धी अन स्मृती यांची देणगी आहे. त्यामुळे आपण मर्त्य लोक त्याचा विचार करू शकतो. पशू पक्षी यांना मरणाच्यावेळी वेदना होत असतीलच पण संवेदना फारशा येत नसाव्यात किंवा बुद्धी अन स्मृती त्याच्या आड येत नसाव्यात.
म्हातारपणी आजारपणातून येणारा मृत्यू फारच वेदना देत असतो. खंगत खंगत मरणे, मरणाची वाट पाहत झिजून मरणे या अवस्था भयानक असतात. कायद्याने इच्छामरण नाही. तसे ते नसावेही या मताची मी आहे. एखाद्याला म्हातारपणी मृत्यूला कवटाळायचेच असेल पण शरीराचे शक्यते हाल न व्हावे, संवेदना न व्हाव्यात अन शांतपणे मृत्यूच्या अधीन व्हावे यासाठी काही उपाय निश्चीतच मानव संस्कृतीत आहेत. जैन लोकांमध्ये ती उपवासांची पद्धत आहे (नाव आठवत नाही). आपल्याकडेही संजीवन समाधी आहेच.
याबाबत अधीक माहीती काय आहे?
दिसभर उन्हातान्हात
तोड केली जंगलाची
बाभळीचा काटा रुतला
धार काढली रक्ताची
जीव जगवला खावून
कोरडी भाकरी चटणी
तहान भागवाया
आहे ओढ्याचे पाणी
साता महिन्यांची
घरधनीन पोटूशी
तिला कसं आनू संगती?
ती तर पोटाने उपाशी
मोळी वाळल्या लाकडांची
जाईल का विकून?
तेल मिठ मिरची आणायाला
पैसं मिळलं का त्यातून?
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०६/०६/२०११
Friday, September 2, 2011
वाडा
खोबणीतले डोळे पांढरे झाले, जाणीवा जणू मेल्या ||१||
काळोखाच्या गर्दीमध्ये हरवले त्याचे दिसणे
कुठे कसे पहावे अन काय वर्णन वदावे मुखाने ||२||
डोळ्यांत घातले अंजन जरी, न दिसे जमीन खाली
कुरकुरणार्या दरवाजांवर कड्याकुलूपांनी नक्षी केली ||३||
ओट्यावरचे दगड कालचे, चालले पायात खाली
खांबांवरची कोरीवकामे अजगरासम सरपटली ||४||
ओलावलेल्या भिंती ल्याल्या रंगाचे उडालेले पोपडे
कंदील नाही उजेडाला म्हणून काळवंडले कोनाडे ||६||
डुगडुगणार्या जिर्ण पायर्या जिना वर घेवून चालला
निखळलेले लाकूड कधीचे आता न देई आधार हाताला ||७||
हादर्याने पडते खाली पाटाईतून भुरभुर माती
तिलाही आता घाई झाली मातीतच जाण्याची ||८||
खोल्या असतील अनेक जरी, लागून एकमेकांना
सख्या बहीणी शोभत होत्या, भिंत भिंतीच्या पाठीला ||९||
कित्येक कुटूंबे येथे आली, वेलीवर फुले फुलवून गेली
आधारवड आता कोसळू पाहते, बांडगूळांची चैन झाली ||१०||
कधीकाळाचे असलेले वैभव, गेले आज लयाला
विरपुरूष जणू सैन्यातला, शर्थ केली लढायला ||११||
आता लगेच पाडतील जुन्यापान्या विस्तीर्ण वाड्याला
मढ्यावरचे लोणी आयतेच मिळे इमारत बांधणार्याला ||१२||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०४/०५/२०११
चल बाळा आपण पतंग घेवू
बघ कितीतरी पतंग आहेत येथे
कितीतरी आकाराचे
पांढरे, निळे, पिवळे, हिरवे
काही दुरंगी आहेत तर काही तिरंगी पट्याचे
बरेचसे कागदी अन काही प्लास्टीकचे
काही पतंगांवर सचिन तेंडूलकर आहे तर काहींवर दबंग सलमान
काहींवर हिरॉयनी आहेत
तू कोणताही पतंग निवड बाळा
घोबी घे, कन्नी घे, डायमंड घे
अन मांजाही घे, बरेली आहे, साधा आहे, नायलॉनही आहे.
चल लवकर आटप. घे चांगले दोन डझन पतंग घे.
भरपूर पेच लावू आपण.
किंमतीची काळजी करू नकोस
किंमत महत्वाची नाही तूझा आनंद महत्वाचा आहे.
अरे गेल्या वर्षीच्या अपघातामुळे तूझे दोन्ही हात जायबंदी झालेत
म्हणून काय तू पतंग उडवायचा नाही?
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/०१/२०११
शेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी
मेहनत मजूरी करणारे कामकरी ||धृ||
आम्ही चालवतो गाडी बैलांची
तिला गरज नाही इंधनाची
धान्याची पोती आणतो घरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||१||
पोळा साजरा करतो दरवर्षी
दुधासाठी पाळतो गाईम्हशी
भुमातेची करतो चाकरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||२||
रात संपून उजाडती पहाटं
भल्या सकाळी कारभारीन उठं
घेवून परातीत जवारी बाजरीचं पिठं
न्याहारीसाठी करती झुनका भाकरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||३||
उन्हातान्हात कामं सारी करतो
रातंदिस राबराब राबतो
कर्ज काढूनी खत पिकाला देतो
तरीबी पोटाला नाही पोटभर भाकरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||४||
कुनी म्हनंल उसाची साखर व्हती
तुमचे द्राक्ष विदेशात जाती
काही द्राक्षांची वाईन व्हती
कुनी म्हनंल भाजीपाला महाग झाला
त्याचा भाव गगनाला गेला
पर बाबांहो माझे बोल खरं काय ते सांगती
हि सारी कमाई व्यापारी-आडते खाती
मधल्या दलालीने गब्बर ते व्हती
अन गरीबीतच राही शेतकरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||५||
आमच्यापैकी कोनी पुडारी झालं
कोनी शिकून हाफिसर झालं
आमची आठवण विसरून गेलं
पैश्याअडक्यानं तो त्याची तुंबडी भरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||६||
पोरं आमची शाळंला जाती
शाळेतून लगेच शेतात राबती
अभ्यास करून कामधाम पाहती
हाय का कुनी त्यांना वाली?
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||७||
कधी पिक लई जोमदार येतं
पाउसपानीबी लई झ्याक पडतो
नशिबानं खत बियानंबी मिळतं
डोळ्यापुढं हिरवं सपान फुलतं
पन बाजारी भाव पाडतो व्यापारी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||८||
कधी पाउस पडतच न्हाई
डोळ्यांच्या कडा रडून ओल्या होई
पोटाला खायाची चिंता पडती लई
पुडारी फाडारी इचारत न्हाई
काय मदतबी मिळत न्हाई सरकारी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||९||
आम्ही शेतात खपून राहतो
येळवारी पेरणी करतो
खुरपून तण सारं काढतो
ईळ्या-पांभरानं कुळवणी करतो
मजूरावानी शेतात राबतो
पिक वार्यावर डुलाया लागतं
नेमका तवाच पाउस येई अवकाळी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||१०||
आरं कुनीतरी कायतरी कराना
शेतीसाठी पानी आणाना
सेझसाठी शेती पडीक करू नकाना
बळीराजाला त्याचा न्याय द्याना
अनुदान, कर्जाचा सापळा टाळाना
हुंडा देवू घेवू नकाना
लग्नासाठी कर्ज काढू नकाना
रोजगार हमीची थांबवा मजूरी
यंत्रतंत्र शेतीत आणा इस्त्रायली
मग कोन कशाला आत्महत्या करी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||११||
गाय बकरं बैलं खिल्लारी
दुभती जनावरं राहती आमच्या दारी
घर आनंदतं गोकूळावानी
कारभारीन घेई पोरगं कडेवरी
धनदौलत हिच आमची खरी
शेतीच हटवील देशाची बेकारी
कशाला दाखवायची आपली लाचारी
सच्या पाषाण कवनात करी शाहिरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||१२||
आम्ही शेतात कसणारे शेतकरी
मेहनत मजूरी करणारे कामकरी ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/१२/२०१०
तुझी माझी प्रित होती
जिवनात आले वादळ कधी, विसरूनी जा ||धृ||
हातांना ना कधी, गुंफण आता मिळायची
पावलांना सवय होवूदे, एकटेच चालायची
भेटलो तो किनारा, विसरूनी जा
तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||१||
त्या आर्त नजरा, ते नजरेतले बोलणे
न बोलताच कळणारे मनातील हुरहुरणे
आठवणींना सांग, स्मरणातूनी निघूनी जा
तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||२||
आठवते मला दिलेले मोरपीस निळेगार
तूही वहीत ठेवले होते पिंपळपान जाळीदार
भेट दिली घेतली, परत घेवूनी जा
तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||३||
'तुझी माझी प्रित नव्हती', सवय होईल ऐकायची
नित्य सराव करतो वाट एकट्यानेच चालायची
ऐकण्या मनाचे सारे माझ्या, एकदा भेटूनी जा
तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा ||४||
तुझी माझी प्रित होती, विसरूनी जा
जिवनात आले वादळ कधी, विसरूनी जा ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/१२/२०१०
Monday, May 23, 2011
जोवरी आहे जीव, तोवरी घ्या रामराम
(आज नाशिकचे आमदार डॉक्टर वसंत पवार यांची अंत्ययात्रा बघीतली. त्यांच्या नविन पंडीत कॉलनीच्या हॉस्पीटलाच्या शेजारच्या बिल्डींगमध्येच माझ्या कंपनीचे ऑफीस आहे. मी नाईट शिफ्ट करत होतो. ऑफीसमधल्या काचेमधून त्यांच्या अंत्ययात्रेचा सोहळा पाहत होतो. त्याचवेळी खालील कवीता सुचली. डॉ. पवारांना श्रद्धांजली. )
जेव्हा जातो जीव, तेव्हा बोला रामनाम ||धृ||
जिवंत असता पुण्य कमवावे
पाप दुराचारा सोडूनी द्यावे
आठवेल जग केवळ तुमचे काम ||१||
काळ आला असता नसे जवळी कोणी
उचलोनी नेती सारे, सरे सारी घेणी
पुढे चालती सारे, मागे उरे सामसूम ||२||
जगामध्ये माणूस एकटाच येतो
माणसात जगूनी एकटाच जातो
कमवतो काय येथे? जातो सारे ठेवून ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
०९/१०/२०१०
Friday, May 20, 2011
कव्वाली : आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||धृ||
अवखळ नजरेला नजर भेटे वरचेवरी
गाली हसतांना पडे त्यावर खळी
होतसे काय काळजात कुणाला ठावे
लक्कन हाले ते एवढेच मला जाणवे
नकळत तुझ्या पाशात का गेलो ओढलो
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||१||
तू बरोबर चालतांना मी चाले जसा स्वर्गात
स्मित नेहमी फेके माझ्याकडे तू हर्षात
कधीकधी हातामध्ये हात तू घेतला
त्याच हातातला रोमांच मला जणवला
तुझ्या प्रेमात मी का इतका वेडा झालो?
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||२||
आठवते का गेलो होतो सहलीला आपण
तुझ्याबरोबर मी होतो माझ्याबरोबर तू पण
इतर सारे जण बरोबर होते आपल्या
वाटा त्यांच्या अन आपल्या वेगळ्या झाल्या
आठव जरा तेथे कितीतरी आनंदलो
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||३||
कितीतरी स्वप्ने जोडीने पाहीली होती
अर्थ एकच होता त्यांची शंकाच नव्हती
तू अन मी राहू जोडीने, होती इच्छा दोघांची
काय घडले असे की वेळ आली वेगळे होण्याची
न भेटल्यासारखे आपण वेगळे का झालो
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||४||
नको आता आशा पुन्हा भेटण्याची
भिती वाटते जखमेची खपली निघण्याची
भळभळती जखम घेवूनी मी मिरवीतो आहे
दु:ख काव्यातूनी सारे वदतो आहे
शेवटी तुझ्या प्रेमाला पोरका झालो
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||५||
"भेटूया पुन्हा कधीतरी", का बोलूनी गेलो?
आता कोठे, मी कोठे तू? दुर निघुनी गेलो ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०९/२०१०
शेत माझं सारं वाहून गेलं
शेत माझं सारं वाहून गेलं ||धृ||
पानी घेवूनीया आलं
माझ्या डोळा पानी
साचून राहीलं सारं रानी
वाहून गेलं डोळ्यातूनी
हातातलं पीक सारं
त्यात बुडून गेलं ||१||
कशी फुलल आता शेती?
कशी पिकलं आता माती?
नाही चूल आता पेटणार
भुक पोटाची कशी मारणार?
रातंदिस बसतो
पोटाला फडकं बांधून ||२||
कशासाठी देवा तू रे
पाउस इतका पाडतो?
नशीबाने दिले पिक
तु आता का बुडवीतो?
वेळेवर न येवून
अवेळी आभाळं फाटलं ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२७/०९/२०१०
Saturday, October 16, 2010
कव्वाली : अशी ग कशी सोडूनी जाते तू मला
वाटे जीवन आता हे सारे आले संपुष्टात | नश्वर शरीर हे आत्मा कसा राहील त्यात
सांभाळू काय कसे मला न समजेना | शेवटचे भेट मला हे ही बोलवेना ||१||
कधी काळी आठवण जरी माझी आली | नकोस भेटू कसे म्हणू मी त्या वेळी
हुरहुर लागे नेहमी माझ्या जीवा | आठवणी जुन्या साधती कावा ||२||
पावसाचे थेंब जेव्हा सोडतात मेघांना | हुरहुर लागते तेव्हा त्यांना
तशीच हुरहुर लागली मला तेव्हा | सोडून गेलीस जेव्हा तू मला ||३||
जरी थेंब साथ ढगांची सोडती | ढगांचे सुख एकच की थेंब पिकवतील शेती
तसाच मी ही आहे ढगांसारखा | सुखी होशील तू फुलव संसार दुसर्याचा ||४||
तुझे ते हसणे अन लाघवी बोलणे | आठवते ते तुझे खिडकीतले उभे रहाणे
जेव्हा आता मी जातो घरावरून तुझ्या | खिंडार पडे काळजातल्या घरात माझ्या ||५||
का करित होती चाळे केसांच्या बटांशी | का कवटाळी दिलेला गुलाब उराशी
का केला होता तू खुणेचा इशारा | का केला होता माझ्या नावाचा पुकारा ||६||
असेल जेथे तू तेथे सुखी रहा | माझ्या मनाला समजावीतो पहा
म्हणून सांगतो मी तुम्हाला| प्रेम केले तर न्या ते शेवटाला ||६||
अशी ग कशी सोडूनी जाते तू मला | करू मी काय विचारू कसे मी तूला ||धृ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१५/०७/२०१०
Sunday, May 23, 2010
नकोस माझी आठवण काढू
नकोस मजला मोही पाडू
भोगले क्षण ते ओले
नकोच त्यांना आता कुरवाळू ||
ओठांवरी ओठ घट्ट मिटी ते
शब्दही त्यातून नच फुटी ते
कढ दु:खाचे बाहेर काढण्या
हुंदकाही नकोच सांडू ||
उष्ण उमाळा अंतरी गाभ्यात
लाव्ह्यापरी जाळे तो मनास
काय राहीली शेवटली बाकी
गणितही त्याचे नकोच करू ||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२३/०५/२०१०