Wednesday, October 26, 2011

चला छतावर

चला छतावर
पुनवची रात आज आली तुमी आला
चला राया चला छतावरती झोपायला ||धृ||

चांदणं पडलंय ह्या रातीचं पाहू
लुकलुक तार्‍यांनी शेज ती सजवू
वरतीच राहू दोघं तिसरं न्हायी कुनी पहायला
चला राया चला छतावरती झोपायला ||१||

हातामधी सरळ धरा अत्तरदानी
हळूच खाली सोडा मच्छरदानी
इश्काच्या मैदानी उडवा तुमच्या जोरदार तोफेला
चला राया चला छतावरती झोपायला ||२||

पाटंला थोडी थंडी गुलाबी पडल
अंगावर पांघरून म्हणून तुमाला ओढल
तुमीबी जवळ ओढा मला, होईल उबार्‍याला
चला राया चला छतावरती झोपायला ||३||

गाठ चोळीची आत्ताच तटली
साडी अंगाची का हो फिटली?
थोडं सबूरीनं घ्यावं वेळ द्या मला सजायला
चला राया चला छतावरती झोपायला ||४||

- पाषाणभेद

तयार करा हिरवं पान

तयार करा हिरवं पान

पाच पकवान खावून केलं जेवन
काथ लावून तयार करा हिरवं पान ||धृ||

हिरव्या पानाच्या
होsss
हिरव्या पानाच्या
शिरा हळूहळू खरडा
देठ शेवटाला लागल तो पण खुडा
तोंडानं म्हणा आपलं खुशीतलं गानं
राया तुमी माजबी लावा की हो पान ||१||

पुढं ओढा जरा
होsss
पुढं ओढा
डबा पानाचा तुम्हां जवळी
त्यातच ठेवली पहा सुपारी चिकनी
अडकित्यामधी फोडा तिला हाती धरून
पानावर मग पसरा बारीक कतरून ||२||

प्रेमाचा गुलकंद लावा तुम्ही पानाला
तयार झाल्यावर हातामधी द्या त्याला
जवळी या आता खावून पान
थांबून जा थोडं मन रिझवून ||३||

- पाषाणभेद
युगलगीतः आज पाहणार आहे
(सदर युगलगीत एकाच व्यक्तीने गायले आहे अशीही कल्पना करता येवू शकते.)

तो: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही
ती: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ||

तो: दोन दिवसांची भेट आपली; ह्रदयात खोलवर रूतून राहीली
ती: वरवर भासे शांत सागर; आतील त्सुनामी दिसणार नाही ||१||

ती: आनंदाचे गवत पसरले; दु:खाचे डोंगर झाकले
तो: खडकातला विटला पाझर; पाणी आता वाहणार नाही ||२||

तो: आलो, भेटलो, बोल बोललो; रमलो, हसलो, कधीतरी रडलो
ती: मोरपीसी शब्द गोडवे; कंठातून कधी पुटणार नाही ||३||

ती: हेच असे का जीवन जगणे?; शांत, शीतल, उष्णाव्याने धगणे!
तो: आठवणी कुपीतल्या कुलूपबंद; यापुढे कधी उघडणार नाही ||४||

ती: कितीक जन्मे जगली असली; कितीक मरणां मरून जन्मली
तो: नकोच आता जन्ममरण ते; चक्राकार ती गती शमावी ||५||

ती: आज पाहणार आहे उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे उद्या राहणार नाही
तो: आज पाहणार आहे उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे उद्या राहणार नाही ||धृ||

- पाषाणभेद
२४/०९/२०११

गण

गण

करू या वंदन गणरायाला
गण वगाचा सुरू कराया ||धृ||

हाती धरूनी पंचारती
रिद्धीसिद्धी तुज ओवाळीती
जाणूनीया तुझीया किर्ती
आलो आम्ही तुझ्या पुजेला ||१||

कार्यारंभी तुजला वंदीती
भय नच आता नच दुश्किर्ती
रसीक समोरी मोदे बसती
झडकरी या या शुभलाभाया ||२||

करू या वंदन गणरायाला
गण वगाचा सुरू कराया ||धृ||

पुर्वप्रकाशीतः दीपज्योती दिवाळी अंक २०११
- पाभे

Sunday, October 23, 2011

दोन बडबडगीते

दोन बडबडगीते


१) ढग वाजले ढम ढम ढम
ढग वाजले ढम ढम ढम
विज चमकली चम चम चम
पाऊस पडला छम छम छम
नाच नाचूनी भिजले कोण?
भिजले कोण?

२) चिमणे चिमणे

चिमणे चिमणे हे दाणे घे हे दाणे घे
आमच्या बाळाला खेळायला ने खेळायला ने

काऊदादा काऊदादा भुर्रकन ये भुर्रकन ये
आमच्या बाळाला युक्ती दे युक्ती दे

ईकडे ये रे भु भु
बाळाशी खेळतोस का तू?

हम्मा हम्मा शेपूट हलव
आमच्या बाळाला पाळण्यात झुलव

- पाषाणभेद

अंगणात एकदा हत्ती आला

अंगणात एकदा हत्ती आला


अंगणात एकदा हत्ती आला
पाठीवरती बस मला तो म्हणाला
ऐटीत बसलो पाठीवर त्याच्या
मग झाली माझी मज्जाच मज्जा

गल्लीतली मुले बघत राहीली खुप
सगळी दिसत होती ठेंगणी ठूस
ईकडून तिकडे फिर फिर फिरलो
इतका की कंटाळ्याने मी थकलो

तेव्हढ्यात काही माणसे आली
हत्तीला सर्कशीत घेवून गेली

- पाषाणभेद
१२/१०/२०११

आला पाऊस

आला पाऊस

गर्जत वर्षत आला पाऊस
हर्षत नाचत आला पाऊस
कुंद नभ मोकळे करूनी
धरेवरती कोसळला पाऊस

विद्यूल्लता तेजाने चमके
कडकड करूनी झळके
सवेत येवूनी थेंब जलाच्या
आक्रंदून पडला पाऊस

अतीवेगाने तुफान वाहते
तरूवेलींचे पर्ण हालते
भांग शाखीय शिस्तीचा
विस्कटून गेला पाऊस

झरे नद्या तलाव सागर
जलाशयांची रुपे अगाध
एकात दुसरे दुसरे एकात
मिसळूनी गेला पाऊस

कोठे पडला छतावरी
कोठे आला माळरानी
कोठे पडूनी शेतामध्ये
धान्य पिकवूनी गेला पाऊस

उष्णउसासे देवूनी अंगी
शहार्‍यांची टोचूनी नांगी
अमृतमय जीवन
देवूनी गेला पाऊस

- पाषाणभेद
१६/१०/२०११

Sunday, October 16, 2011

आज मी जरी का नसलो येथे

जरी का नसलो येथे

आज मी जरी का नसलो येथे
आठवणीत मी असणार आहे
लिखाणात मी नसेना कोठे
काव्यात मी असणार आहे ||धृ||

कोठून आलो कोठे निघालो?
कोठे थांबून कोठे गेलो?
थांग या सार्‍याचा कधी
मला लागलाच नाही ||१||

अवचीत न जाणो का कधी
भेट आपली झाली होती
ओळखीचे वाटेन जेव्हा
लकेर एक येईल कानी ||२||

मला न उरली काही
आसक्ती आज कसली
तोडूनी बांध सारे
सागरा मिळाले सरितेचे पाणी ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/१०/२०११

मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या

मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या
काळजी घ्या काळजी घ्या मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या
काळजी घ्या काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या
चौकीदार नाही त्या रेल्वेफाटकावर काळजी घ्या ||धृ||

नका भानात वाहन चालवू
नका जरा तेथे कधी थांबू
दिसली नाही आगगाडी जरी
जरा वेगात चलावं रुळावरी
सांगतो तुम्हा काळजीनं पुन्हा
दोन्ही बाजूला डोळे उघडून पहा ||१||

लाल सिग्नल तुम्हा नाही दिसला
जरी हिरवा दिवा लागलेला नसला
नका घालू तुम्ही तेथे तुमची गाडी
घातली तर होतील बारा भानगडी
अपघात होईल जीव तुमचा जाईल
कशाला मध्यरेल्वेला धडकता? ||२||

दोन्ही बाजूला तुम्ही पहा
आजूबाजूचा कानोसा घ्या
रेल्वेगाडीची शिट्टी ऐका
त्याशिवाय पुढे जावू नका
सुरक्षेचा हा मंत्र ध्यानी ठेवूनी
मध्यरेल्वेचा नियम तुम्ही पाळा ||३||

काळजी घ्या काळजी घ्या मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या
काळजी घ्या काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या
चौकीदार नाही त्या रेल्वेफाटकावर काळजी घ्या ||धृ||

मध्यरेल्वेसाठी जनहितार्थ प्रकाशीत

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०९/१०/२०११

भारतातील वाढत्या आजारपणास भारतीय अन्नपुर्णा/ पदार्थ कारणीभुत आहेत काय?

भारतीय उपखंडात निरनिराळ्या आजारपणांचे प्रमाण वाढते आहे. त्यात मधुमेह, हॄदयरोग, स्थुलपणा आदी गृहीत धरा. वेगवेगळ्या संस्था याबाबत वेळोवेळी आकडेवारी प्रसृत करत असतात. जरी ती आकडेवारी आहे तितकी खरी मानली नाही तरीही वरील आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहेच. हे आजारपण वाढण्यामागे अनेक कारणे असतीलही - जसे बदलती जीवनशैली, आर्थीक स्थिती उंचावणे, अन्नघटकाचे पोषणमुल्ये, सुपोषण आदी. परंतु या सर्व कारणांमध्ये भारतीय अन्नाची चव व ते अन्न रूचीदार बनवणार्‍या गृहीणी किती कारणीभुत आहेत?

या गृहीतकामागे बर्‍याच घरांमध्ये भारतीय अन्नपुर्णा घरी अन्न बनवतात असे गृहीत धरलेले आहे. भारतीय पदार्थ चविष्ट असण्यामागे या अन्नपुर्णांचा हात स्पष्टपणे असतो. सढळ हाताने चमचमीत अन्नपदार्थ, मिठाया बनवण्यात सर्व जगात पहिल्या क्रमांकासाठी भारतीय उपखंडातल्या स्त्रीयांचा समावेश करावा लागेल. आपल्या उपखंडात मसाल्याचे पदार्थांचा मुबलक वापर केला जातो. हे फार पुर्वीपासून चालत आलेले आहे. त्याकाळातही असल्या आजारांचे प्रमाण येथल्या उपखंडात जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात याबाबतीत त्याकाळी शास्त्रशुद्ध अभ्यास नसल्यामुळे ती आकडेवारी मिळणार नाही.

भारतीय नारी ही घरातल्या व्यक्तीच्या खाण्याच्या आवडीनिवडीबाबत फारच जागरूक असते. पतीला ही भाजी आवडत नाही - नको डब्यात द्यायला, मुलाला डब्यात निरनिराळे पदार्थ देणे जेणेकरून तो शाळेत डबा संपवेल, असे तीचे चालू असते. अर्थात या सर्वांत त्या स्त्रीचे कुटूंबाप्रती असलेले प्रेमच निर्देशीत होत असते. असल्या कुटूंबवस्तल वृत्तीचा मला आदर आहेच, त्यात वाद नाही. एखादा पदार्थ जर चांगला झाला अन तो आग्रहपुर्वक वाढण्यात आला तर त्यास सहसा नकार न देता दोन घास जास्तीचे खाल्ले जातात हा अनुभव आपणास एकदातरी आलेला असेलच.

आणखी एक उपमुद्दा येथे येवू शकतो तो म्हणजे आपल्याकडचे सण-समारंभ आणि उत्सव. यांचेही प्रमाण इतर समाजात व भारतीय समाजात व्यस्त आहे. महिन्याकाठी एकतरी सण समारंभ आपल्या संस्कृतीत करण्याचे प्रमाण आहे. त्यावेळी काहीतरी गोडधोड, चमचमीत पदार्थ घरी केले जातात.

भारतीय समाजात वाढणारे आजारपणाची सामाजीक व्याप्तीला नवीन दिशा मिळण्याच्या हेतूने वरील सर्व मुद्दे लक्षात घेवून चर्चा अपेक्षीत आहे. (या चर्चेत अमेरीकन्स पण जाड होतायेत, पिझ्झा बर्गर यांची भारतातही चंगळ होते आहे हे टाळावे. संशोधन करणार्‍या बर्‍याचशा संस्था ह्या अमेरीकन (अभारतीय) असल्याने बहूतेक शारीरीक स्केल्स ह्या अमेरीकन/ ब्रिटीश लोकांनाच गृहीत धरून असतात. उदा. BMI, उंची/ वजन/ रक्तदाब यांचा रेशो आदी.

Saturday, October 1, 2011

दगडाची गोष्ट

दगडाची गोष्ट
(सदरची कविता शिक्षकांनी अंगविक्षेपासहीत विद्यार्थ्यांच्या पुढे सादर केली तर परिणामकारक होते.)

प्रास्ताविक:
निट बसा सगळे लक्ष द्या इकडे
एक गोष्ट सांगतो लक्ष द्या तिकडे

आरंभ:
एक खेडेगाव असते
तिथे एक नदी वाहते

विषयविवेचन:
त्या नदीत असतो एक दगड
मोठ्या दगडांसारखाच छोटा दगड
इतर दगड खुष असत
हा मात्र असतो सतत रडत

नायकाचे आत्मकथन:
"मी काही कामाचा नाही
कोणाच्या उपयोगाचा नाही
देव करण्याइतका मोठा नाही
वाळूत मावण्यासारखा छोटाही नाही
कुणाच्याही पायात मी येतो
पावसाळ्यात चांगला धुतला जातो
उन्हाळ्यात नदी जेव्हा कोरडी होते
तेव्हा माझ्या अंगाची लाही लाही होते
मला कोणी विचारत नाही
मी कोणाच्या कामाचा नाही"

नायकाचे चिंतन:*
दिवसेंदिवस तो दगड निराश होत गेला
वाळून वाळून बारीक होत चालला

निसर्गवर्णन:
असेच उन्हाळ्याचे दिवस होते
नदीत पाणी काहिच नव्हते

कथेत दुसर्‍या व्यक्तीचा प्रवेश:
एका माणसाला दुसर्‍या गावी जायचे होते
त्यासाठी त्याला हि नदी ओलांडणे भाग होते

माणसाचे निसर्गाकडे गेले पाहिजे - पर्यावरणाचे भान:
नदीवर आल्यानंतर त्या माणसाला जोराचा कार्यभाग आला
आता कसे अन कोठे कार्यभाग उरकावा प्रश्न त्याला पडला

कर्म करण्याबद्दल आस्था:
एक आडोसा बघून त्याने आपला कार्यभाग उरकला
नदी कोरडी आहे म्हणून त्याने नेमका तोच दगड वापरला

कर्तव्यपुर्तता:
दगड मनात म्हणाला, 'सालं, मी नेहमी कोणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून रडत बसलो
शेवटी अशा तर्‍हेनेका होईना मी कुणाच्यातरी उपयोगी तर पडलो'

गोष्टीतला बोध:
तर मित्रांनो गोष्ट तर संपली पण या गोष्टीतून काय बोध मिळतो?
नसेल सांगत तर ऐका, 'ऐनवेळी बिगरकामाचा दगडही कामी पडतो'

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०९/२०११

कठीण शब्द:
बोध = मोरल ऑफ द स्टोरी

सुविचार: *जास्त चिंतन चिंतेत रूपांतरीत होते व आपणाला ती चिंता चितेकडे नेते

प्रश्नोत्तरे:

दिर्घोत्तरी प्रश्न
खालील प्रश्नांची आठ-दहा वाक्यांत उत्तरे द्या.

१) वरील कवीतेत कोणकोणते संदेश आपणाला मिळतात? (मार्च २००२, नुमवि अपेक्षीत प्रश्नसंच २०१०, बालविकास प्रशाला अपेक्षीत प्रश्नसंच २००९)
२) 'दगडाची गोष्ट' ह्या कवितेत मानवाचे कोणकोणते स्वभाववैशिष्ठ्ये कविने चितारले आहेत.
३) सदरची कविता ही कविता असूनही 'दगडाची गोष्ट' अशा नावाने प्रसिद्ध केली आहे. का? आपाआपसात चर्चा करा.
४) वरील कविता वाचून आपणा काय वाटते यावर आठ वाक्यात टिप्पणी करा.(ऑक्टोबर २००७)

एका वाक्यात उत्तरे लिहा
१) अंगाची लाही लाही होणे या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.(मार्च २००५)
२) या गोष्टीतील दगड कशाचे प्रतिक आहे? (ऑक्टोबर २००९)

उपक्रम:
(शिक्षकांनी या उत्तरांचे कागद एखाद्या फाईलमध्ये लावणे. वार्षीक परिक्षेत उपक्रमासाठी १० गुण आहेत.)
१) या कवितेचे गद्यात रुपांतर करा.
२) या कवितेवर वार्षीक स्नेहसंमेलनात एक छोटी नाटूकली सादर करा.

(धिस पार्ट ऑफ द प्रोग्राम स्पॉन्सर्ड बाय - डेलीऑनलाईनबॅकअप.कॉम - जिंदगी सवार दे!)

हळूच तू मला पाहीलेले

हळूच तू मला पाहीलेले


हळूच तू मला पाहीलेले मी तुला पाहीले
नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||धृ||

कधीतरी ओळखीचे हासू पाहीले तुझ्या ओठी
नकळत स्मित माझे आले त्याच्या उत्तररासाठी
कळले का रे तेव्हा हृदयात काही झाले?
नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||१||

पुस्तके देता घेता थरथरती भेट झाली
अलवार स्पर्श होता काटा फुले शरीरी
प्रित पुष्पे अशी कितीतरी मी मनी माळले
नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||२||

ठेवले वहीत मी पिंपळपान आठवांचे
बघ ते आता झाले बदलून जाळीचे
तेवढेच जून झाले प्रेम पहीले आपले
नजरेला मिळता नजरा, मी न माझी राहीले ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२८/०९/२०११

मै पिच्चर में जावू के नको

मै पिच्चर में जावू के नको

ये करू नको, वो करू नको सदा ऐसेच बोलतेय आप तो
मै पिच्चर में जावू के नको ये अब्बीच बोल दो मेरे को ||धृ||

देखने में मै हूं बडी देखनी; सब बोलतेय मेरकू चिकनी
नही कोई मुझमे कमी; मेरे बगैर पडती गली सूनी
कैसी हिरोईन एक नंबर बनती तुम अभी देखो
मै पिच्चर में जावू के नको ये अब्बीच बोल दो मेरेको ||१||

मुंबई शहर है बडा मोटा; नाही पैसेका उधर तोटा
मत करो मेरेको बेटा बेटा; नाही होंगा अपनेको घाटा
अब्बी मेरी अम्मीभी राजी हो गयी देखो
मै पिच्चर में जावू के नको ये अब्बीच बोल दो मेरेको ||२||

तुम खाली हातमाग चालवतय; रातदिन मेहनत मजूरी करतय
हातपाय फुकटमधी चालवतय; बुढा होनेपर कोन तेरेकू देखतय?
अब्बा तूम भी मान जाव मालेगांव छोडनेको
मै पिच्चर में जावू के नको ये अब्बीच बोल दो मेरेको ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२७/०९/२०११

पाव्हण्यानं डोळा मारला

पाव्हण्यानं डोळा मारला
ह्या पाव्हण्यानं डोळा मारला ग
मला जवळ ये आसं म्हनला ग

बाजारात बसले मी ग भाजी विकायला
समोर आला अन लागला भाव पुसायला
हातात घेवून पाही खालीवर
जुडी मेथीची दे आसं म्हनला ग
मला जवळ ये आसं म्हनला ग

आजूबाजूला जमली गर्दी
मला ग त्याची नव्हती वर्दी
शुक शुक करतोय, हात हालवतोय
समोर उभा तो राह्यला ग
मला जवळ ये आसं म्हनला ग

नजर माझी गिर्‍हाईकांवर
नव्हती काही त्याच्यावर
हात घालूनी खिशातमधी
नोटा त्यानं काढल्या ग
मला जवळ ये आसं म्हनला ग

वागणं त्याचं वंगाळ नव्हतं
समजलं मला काय खरं ते व्हतं
चष्मा नाही डोळ्याला
म्हनला आज घरी तो राहीला ग
मला जवळ ये आसं म्हनला ग

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२६/०९/२०११

दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा

दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा

ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक (बॅकग्राउंड हातोडीनं ठोकल्याचा आवाज)
ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक
माझा दादला हातोडीनं ठोकतो खुट्टा
लाकूड तासून, रंधा मारून काढतो भुस्सा ||धृ||

कामं त्याचं हाय सुताराचं
आणतो लाकूडं सागाचं
करवतीनं कापत बसतो
रातीबी तसंच करतो
काय करावं समजना झालं
कामासाठी नुसता झालाय वेडापीसा
लाकूड तासतोय रंधा मारून काढतो भुस्सा ||१||

एकदा पलंग करायला लागला
मोजमाप करीत तो बसला
मी घरकामात गुंतलेली
मला बोलावलं त्यांनं तरीबी
जवळ ओढूनं चावट बोलला असातसा
लाकूड तासतोय रंधा मारून काढतो भुस्सा ||२||

होतं वंगाळ त्याचं कधीकधी वागणं
खोड त्याची छन्नी मारीत राहणं
पटाशीनं खिळे उपटीत बसणं
ड्रिल मारून होल खोल पाडणं
पॉलीश करायला व्हर्नीश वापरे भसभसा
लाकूड तासतोय रंधा मारून काढतो भुस्सा ||३||

लई दया मला त्याची येते
दुकानी डबा मी घेवून जाते
कानाची पेन्सील काढून ठेवते
करवत खाली ठेव त्याला म्हणते
तरीबी म्हणतो "तेवढी पाचर मारतो आता"
लाकूड तासतोय रंधा मारून काढतो भुस्सा ||४||

त्या सच्च्याच्या नादाला तो लागलाय
कामं करायसाठी नुसता हापापलाय
इथंतिथं घरीदारी, कामं करून पडल आजारी
मी एकटीच बाई घरी, नाही कुणी शेजारी
बाहेर काढा त्याला यातनं, माझा तुमच्यावर भरवसा ||५||

ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक (बॅकग्राउंड हातोडीनं ठोकल्याचा आवाज)
ठोक ठोक ठोक ठोक ठोक ठोक......................


- पाषाणभेद (दगडफोड्या)
२६/०९/२०११