Tuesday, September 14, 2010

गाणे : असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती

मी मराठी वरच्या "गाण्याच्या-यशामधले-संगीत-संयोजकाचे-योगदान" या धाग्यावरून मला खालील गाणे करता आले. या गाण्यातले दुसरे कडवे त्या धाग्याला लागू होते. (मी माझीच स्तूती करत नाही पण हे गाणे अर्ध्या तासात स्पुरले गेले. सगळे श्रेय त्या मुळ धागालेखकाला आहे.)

असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती


असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती
पावसाचे थेंब काही गटारात जाती, काही थेंब मोती होती
जगात कोणी प्रसिद्ध होती, कोणास कोणी ना ओळखती ||धृ||

जगाची रित ही न्यारी चांगलीच असती सकळा प्यारी
बाह्यरूप जरी केवळ देखणे, अंतर्मनास कोणी ना विचारी
पथ्थरास एका भजती पुजती, एका पथ्थरास पायात चिरती
असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती ||१||

कोण कवने करी गाण्यात, कोण ते लावी चालीत
कोण सुस्वर देई संगीत, कोण तयाला गाई लयीत
असते का कोणा ठावूक? मागे कोण कोरस गाती?
असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती ||२||

कृष्णसख्याचे प्रेम पाहूनी, राधा मीरा रूक्मिणी आठवती
सार्‍यांनाच प्रेम मिळाले, तरी गोपीकांचे नावे न ओठी येती
श्रीमंतांनाच सारे विचारती, गरीबास न कोणी पुसती
असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती ||३||

कितीक धागे संस्थळी निघती, कितीक धागे वाचले जाती
कितीक लेखक अन कवी सार्‍या अंतरजालावरी येती
काहिंच्याच धाग्यावरती प्रतिसादावर प्रतिसाद पडती
(जे कंपूत न राहती त्यांचे धागे गंडती
फारच थोडे धागे दुर्लक्षीतांचे प्रतिसादाने राहती वरती)
असेच असते जीवन कुणाचे नच तयाला कोणी गणती ||४||

असेच असते जीवन कुणाचे, नच तयाला कोणी गणती
पावसाचे थेंब काही गटारात जाती, काही थेंब मोती होती
जगात कोणी प्रसिद्ध होती, कोणास कोणी ना ओळखती ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०७/२०१०

एकदा होवोनी पक्षी

एकदा होवोनी पक्षी

वाटे एकदा होवोनी पक्षी
पहावी शेते डोंगर नद्यांची नक्षी
उंचच उंच जावे वरती वरती
अलगद उतरावे धरणीवरती

हळूच आपले पंख पसरूनी
घास शोधावा हिरव्या रानी
शोधावा पाणवठा निर्मळ शितल
प्यावे पाणी थंडगार नितळ

मध्येच एखाद्या झाडावर थांबावे
विश्रांती घ्यावी पंख झाडावे
चोचीने फळ एखादे तोडावे
मनात येईल तेव्हा उडावे

दिवसभर असेच फिरावे
सायंकाळी पुन्हा माघारी यावे
घरचे सारे पुन्हा भेटावे
काय घडले दिवसभरात ते सांगावे

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०५/०७/२०१०

अभंग: पायी चालतोया पंढरीची वारी

अभंग: पायी चालतोया पंढरीची वारी

चाल: एखाद्या अभंगाची (येथे ऐका: http://www.youtube.com/watch?v=9wwsu4VyoPM )

पायी चालतोया पंढरीची वारी
वारी...वारी....
पायी चालतोया पंढरीची वारी
मुखी बोलतोया पांडूरंग हरी
पांडूरंग हरी हरी...पांडूरंग हरी
पायी चालतोया पंढरीची वारी ||धृ||

संत सज्जन सगळे, नाचती गाती
मेळा भरवीती सारखे चालती
कुणी छेडूनी विणा, टाळ हाती धरी
पायी चालतोया पंढरीची वारी ||१||

तुळशीचे घेतले रोप डोई माऊलीने
अनवाणी पायात केले घर काट्याने
व्यर्थ नाही चिंता मन नाही संसारी
पायी चालतोया पंढरीची वारी ||२||

टाळ मृदूंगाचा मेळ साधूनीया
पावलांचा त्याला ठेका मिळोनीया
विसरले जगा सारे नरनारी
पायी चालतोया पंढरीची वारी ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०१/०७/२०१०

हाती माझ्या शुन्यच उरले

हाती माझ्या शुन्यच उरले

हाती माझ्या शुन्यच उरले
खिसा फाटकाच, हाती न काही लागले ||धृ||
कोणास माझा म्हणू मी, कोण कोणाचा होतो मी
दैवगतीने सारे मी पण जळले, रक्ताचेही नाते तुटले
हाती माझ्या शुन्यच उरले ||१||

कोठूनी आणावा पैसा आता, कशा बांधू इमले माड्या
काळाबरोबरी काळच आला, जवळचे सारे काही नुरले
हाती माझ्या शुन्यच उरले ||२||

ओळख आता विसरती सारे, मी त्यांना का ओळखावे?
असल्याच प्रसंगातून ओळख पटते, खरे कोण ते मी ओळखले
हाती माझ्या शुन्यच उरले ||३||

कधी सुखात पोहलो, कधी दु:खात अंतरलो
हेच असते शिकणे येथे जीवन जगणे असले
हाती माझ्या शुन्यच उरले ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०६/२०१०

Wednesday, September 8, 2010

शेतकरी गीत: आज सण हाय बैलपोळा

शेतकरी गीत: आज सण हाय बैलपोळा

शिंगे घासली
बाशींगे लावली
माढूळी बांधली
म्होरकी आवळली
तोडे चढविले
कासरा ओढला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||१||


गोंडे बांधले
वेसनी घातल्या
छमच्या गाठल्या
चवर ढाळली
शिक्के उठविले
गेरू फासला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||२||


नाव लिहीले
झेंडूहार घातला
झुली चढविल्या
पैंजण घातले
पट्टा आवळला
फुगे बांधले
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||३||

घुंगरू वाजविले
बेगड चिकटवली
माठोठ्या बांधल्या
गाववेस फिरवीले
गोडधोड केले
सासुसुनाने ओवाळले
नैवेद्य दावला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०९/२०१०