Showing posts with label Nashik. Show all posts
Showing posts with label Nashik. Show all posts

Tuesday, January 18, 2011

वाट बघतोय रिक्षावाला

शालिमारे का भौ?

चला सिबीएस, शालिमार...

लगेच निघेल...

"शालिमार?"

चला बसा...

शालिमार... शालिमार...

ए संत्या आवाज दे ना भाडखावू? लायनीत उगाच गप उभा का राहतो? सालं पट्टा मारतो अन धंदा ओरडायची लाज वाटते का मग?

ओ भाई, आवाज कमी. हे काय सकाळपासून ३ ट्रिपा मारल्या पट्यावर. एक नाशिकरोडचं भाडं होतं म्हणून गेलो अन आपली आज दिवसभराची लेवल झाली. आजचं भाडं सुटलं म्हणून निवांत आहे. तुमी मारा पट्टे. मी पुडी घेवून येतो. सकाळपासून खाल्ली नाही. तुमाला कोणती आणू? विमल?

विमल नको बाबा. हिरा आण. लई लागतो डेंजर. हे घे पैसे. आख्खी १० ची माळ आन.

आणतो. तुमी भाडं गोळा करा तवर. आजून दोन पायजे तुमाला हालायला.

चला सिबीएस, शालिमार...शालिमार ए का?

"हो, शालिमार."

किती दोन का?

"हो. किती पैसे?"

बसा. ९ रुपये एकाचे. लगेच निघतो. केव्हाचा दोन शिटची वाट पाहत होतो.
ओ जरा मागेपुढे व्हाना. ओ ताई तुमी पुढे व्हा. काका तुमी मागे व्हा जरासे. हं बसा आता दोघं.
संत्या, पळत येना. दे लवकर. निघतो लगेच. संध्याकाळी माझी लेवल झाली का मग चौकात येतो. शाम्या फिटर ला पैसे द्यायचे आहे अन हुडचे काम पण करायचे आहे.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

सिबीएस?

"अहो आता कुठे बसवता? चार तर बसवले. किती अडचण."

पुढे बसेल तो. चल रे भाऊ लवकर. ती बॅग पायाशी ठेव तिरपी. बस.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

एक दोन तीन चार पाच छे सात आठ नौ दस ग्यारा बारा तेरा

"ओ आवाज जरा हळू करा ओ. डोकं दुखतंय."

बंदच करतो. ठिक?.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

सुट्टे नाही का? ओ ताई, पाच चे दोन डॉलर द्या. हे घ्या. आले?

"हो. मिळाले"

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

"शालिमार आलं का? "

हे काय हेच शालिमार. कुठे नाशिकरोडला जायचे का? तो समोरचा स्टॉप आहे बघा नाशिकरोडचा.

चला त्रिमुर्ती चौक, पवननगर, नविन सिडको...
चला नविन सिडको...पवननगर....
ओ भाऊ पवननगर का?

"हो."

बसा.

"पवननगर म्हणजे सिडको ना? "

हो. तुमाला कुठे जायचे आहे?

"पवननगरलाच. त्रिमुर्ती चौकात."

त्रिमुर्ती आधीचा स्टॉप आहे. बसा.

"कधी निघणार."

हे काय लगेच. शिट तर भरू द्या.

"हा स्टॉप शेअर रिक्षांचा आहे ना?"

हो. सगळे पट्यावाले आहेत इथे.

"पट्टा म्हणजे?"

नविन आहे का तुम्ही.

"हो"

पट्टा मारणारे सगळे रिक्षावाले एकाच भागात ट्रिप मारतात. हा स्टॉप शालिमार ते नविन सिडकोचा आहे.

"दररोज किती पट्टे मारतात?"

सकाळी सकाळी आलो अन मुड असला तर ८/९ ट्रिपा मारतो. कधी उशीरा आलो धंद्यावर तर कमी मारतो. दुसर्‍या दिवशी लेवल करावी लागते.

"किती कमाई होते दिवसभरात?"

कमाई कसली? सगळी गमाई. भाड्याच्या रिक्षात काय सुटते? मिळते पोटापान्याचे. कधी कधी पेट्रोल सुटले तरी भरपूर. त्यात हवालदार लई त्रास देवूं र्‍हायलेत सध्या. पकडलेत पन्नास रुपयाशिवाय ऐकत नाही.

पवननगर, त्रिमुर्ती....पवननगर, त्रिमुर्ती....

"चला लवकर. किती वेळ?"

अहो गाडी भरली तरच निघणार ना? टेप लावू का?

"नको. गाडी भरेपर्यंत गप्पा मारू. स्पेशल ट्रिप मारता का?"

नाही. दिवसभर थांबून इतकीच कमाई होते. स्व:ताची रिक्षा असेल तर परवडते तसे करणे. शाळेची ही ट्रिप मारता काही जण. काही जण कंपनी सुटल्यानंतर रिक्षा चालवतात. तेव्हा परवडते. माझी तर भाड्याची रिक्षा असल्याने मी पट्टेच मारतो.

चला पवननगर, त्रिमुर्ती....पवननगर, त्रिमुर्ती....

"पुडी देवू का? हिराये  माज्याकडे"

"नाही मला नाही लागत. तुम्ही किती खाता? "

जास्त नाही दिवसभरात दोनेक माळी लागतात.

"माळी म्हणजे?"

१० पुड्यांची एक माळ. असल्या दोन माळी लागतात दिवसभरात.

"अरे बापरे एवढ्या पुड्या!"

अहो हे काहीच नाही. आधी ४ माळी संपायच्या. आता कमी केल्यात.

पवननगर, त्रिमुर्ती चौक आहे का?....पवननगर, त्रिमुर्ती....

"गाडीत टेप लागतो का?"

हो तर त्याच्या शिवाय जमत नाही. झंकार सर्कीट टाकलंय. एकदम टकारा. स्पिकर बनवून घेतले. आवाज ऐका. घुंगरांचा आवाज काय मस्त येतो बघा.

चला आता गिर्‍हाईक आलं. लगेच निघतो बघा.

पवननगर का?

"हो"

चला बसा.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०६/०८/२०१०

शालिमार चौक, नाशिक

Saturday, July 31, 2010

शिक्षणसंस्थांची पैसे कमविण्याची पद्धत

मागच्या आठवड्यातील स्थानिक दैनिक. त्यातील जाहिरात. एका खाजगी डी.एड. कॉलेजला शिक्षक पाहिजे म्हणून.
जाहिरातीत त्याच्यांकडलाच छापील अर्ज करावा अशी सुचना. त्या जाहिरातीत अर्जाची किंमत कोठेही उल्लेखलेली नाही.

माझा जवळचा मित्र एम.ए. बी.एड. झालेला. त्याने आज मला-शनिवारी सुटी-असल्याने मुलाखतीस बरोबर येण्याची विनंती केलेली. सकाळी १० वाजता नाशिकरोडला निघालो. कॉलेजच्या स्थळी ह्ह्ह्ह्ह्ही गर्दी. ५००-६०० जण/ जणी.

मित्राला अर्जासाठी रांगेत उभे केले अन आस्मादीक रिकामपणाची कामगीरी करण्यासाठी मोकळी झाली. एका खिडकीत अर्ज देणे चालू होती. रांगेच्या तोंडाशी गेलो. कुण्ण्णीच 'ओ मागे व्हा, आम्हीपण लायनीत आहोत' असे ओरडले नाही. आश्चर्य वाटले. रांगेच्या तोंडाशी असलेल्या एका मुलाला विचारले, "काय रे बाबा, अर्ज फुकट आहे का?" त्याने उत्तर दिले, "नाही हो, रु. १०० ला अर्ज मिळतो आहे". टाळकेच सटकले.

पुन्हा मित्राकडून जाहिरात घेतली अन काळजीपुर्वक बघीतली. त्यात अर्जासाठी कुठेही किंमत लागेल असा उल्लेख नव्हता. एका जणाकडून अर्जाचा नमूना बघीतला तर ती एक झेरॉक्स होती. अन त्यात कोठेही "अर्जाची किंमत: रु. १००/-" असा उल्लेख नव्हता. रांगेच्या तोंडाशी बराच वेळ उभा राहिलो. मित्राचा अर्ज मीच विकत घेवू शकत होतो पण मित्राचा नंबर जवळच आलेला होता अन नक्की काय चालले आहे याचा मला तपास करायचा होता. आतील कारकून अर्ज रू. १००/- घेवून देत होता अन तसा त्याच्या रजिस्टरमध्ये नावाची नोंद करत होता.

माझा असलाच मागचा अनुभव जिव्हारी लागलेला होता. आज नडायचेच ठरवले.

निट बघीतले की, अर्ज विक्री करून तो कारकून अर्जाच्या किंमतीची स्थळपावती देत नव्हता. तसेच भरलेला अर्ज स्विकारून त्याची स्विकृती पावतीही देत नव्हता. अन वर सांगितल्याप्रमाणे त्या जाहिरातीत अर्जाची किंमत कोठेही उल्लेखलेली नव्हती.

मित्राने अर्ज घेतला अन मी त्याला 'तू अर्ज तर भर तोपर्यंत आलोच' म्हणून मी तडक प्रिंसीपलच्या कॅबीन कडे गेलो. एक शाळकरी मुलगी आत जावू नका म्हणत होती. टाळलं तिला.

प्रिंसीपलांना विचारले की 'सर अर्जाची किंमत कोठेही नाही, रिसीट नाही, अ‍ॅक्नॉलेजमेंट नाही' काय करायचे? इंटरव्हूनेच भरती होईल ना? की इतर संस्थांसारखी नावाला जाहिरात अन नावाला मुलाखत. प्रिंसीपल बोलले, "तुम्हाला अर्ज घ्यायचा असेल तर घ्या. इंटरव्ह्यू होईल मगच निवड. अर्ज घेण्याचा आग्रह नाही". पुन्हा टाळके सरकले.

पत्रकार मेव्हण्यांना फोन लावला. बोलणे झाले. दोनच पर्याय. माहीतीचा अधिकार- एक दिड महिना थांबणे किंवा पोलीसात तक्रार- लगेच अ‍ॅक्शन. कोरा कागद घेतला. पोलीसांना अर्ज रखडला-बेकायदेशीर रित्या अर्ज विक्री चालू आहे. अर्ज लिहीतांना मित्राचे ४ मोबाईल आले. त्याला 'गाडीचे इंजीन ऑयल बदलतो आहे' असे सांगितले. तेव्हढ्यात तिन जण डोकावले. त्यांचाही संताप होत होता. आग वाढलेली होती.

इकडे माझे फोनवर फोन चालू होते. मनसेच्या श्री. प्रमोद वझरेंना ला फोन लावला. त्यांनी "५ मिनीटात परत तुला फोन करतो सांगितले".

ईकडे आम्ही चौघे तयार झालो अन पोलीस स्टेशनात आलो. पोलीस स्टेशनात ठाणे अंमलदाराकडे जा, सब इन्सेक्टरसाहेबांकडे जा सुरू झाले. एकाने त्याच्या ओळखीच्या पोलीसाला फोन लावला. एक इन्सेक्टरांनी अर्ज वाचायला घेतला. तक्रार अर्जाची डुप्लीकेट साठी झेरॉक्स आणायला सांगितली. मी लगेच झेरॉक्ससाठी पळालो. भारनियमन. दोन दुकानांचे झेरॉक्स मशीन बंद. नविन भाग. माहीत नाही. पळतच चालू झेरॉक्स शोधले.

तेव्हढ्यात वझरेंचा फोन: "अरे नाशिकरोड चे मनसेचे विभागीय अध्यक्ष संजय गायकवाड साहेबांना फोन करून सांगितलेले आहे. हा हा त्यांचा नंबर घे. त्यांना फोन कर." लगेच फोन केला. ते म्हटले की "मी निघालोच आहे. तू कोठे आहे. लगेच ये."

मी अन एक जण पोलीस स्टेशनातून निघालो अन कॉलेजवर आलो. ते अन त्यांचे सहकारी श्री. सुदाम ताजनपुरे, श्री. राजेश पंडित आदी वाटच पाहत होते. त्यांनी अर्ज, जाहिरात बघीतली. बॉल आपल्या कोर्टात होता. सगळे सरळ इंटरव्ह्यु चालू असलेल्या रूम मध्ये गेलो. प्रिंसीपल साहेब, शाळकरी मुलगी, आणखी एक नन चा ड्रेस घातलेली मुलगी अन एक जण इंटरव्ह्यू घेत होते. काय मुलाखत होते ते आपल्याला माहितच आहे. फालतूगिरी सगळी.

संजय गायकवाड साहेबांनी सरळ मुद्यालाच हात घातला. 'सर अर्जाची किंमत कोठे आहे? अर्जाची रिसीट कोठे आहे? आदी.' सर गोलमाल उत्तर देत होते. 'जाहिरातीत अर्जाची किंमत छापायचे राहून गेले, संस्थेचा रजिस्ट्रेशन क्रमांक टाकायचा विसरलो' आदी. बोलाचाली वाढली होती. माझा संताप झाला होता. प्रिंसीपलांना मी सगळी परिस्थीती समजावून सांगितली. इतरांनी मला शांत राहण्याचा सल्ला दिला.

सरांना त्यांची चुक समजलेली होती तरीही आपलाच मुद्दा लावून धरत होते. 'अर्ज तर फुकट देणे चालू आहे' असेही ते बोलले. माझ्या बरोबरीचे तिघे उमेदवार बोलले की सर आम्ही तर अर्जासाठी शंभर रुपये दिलेत. सर खोटे पडले. सर म्हणाले काय करायचे मग आता? तुम्ही सांगाल तसे करू. संजय गायकवाडांनी तोडगा काढला. सर, अर्जाची घेतलेली किंमत तुम्ही सगळ्या मुलांना परत करा. अन त्यांच्याही मुलाखती घ्या. शाळकरी मुलगी बोलली की मागे इतरही संस्थांनी अशा जाहिराती दिल्या होत्या. तिला तिथल्यातिथे गप्प केल. शेवटी सरांनी कारकूनाला बोलावले. त्याला अर्ज फुकट देण्यास व पैसे परत करण्यास सांगितले.

माझ्या मित्राला आता तेथे मुलाखतीस रस उरला नाही. त्याने लगेच पैसे परत घेतले. अन आम्ही निघालो. इतक्यात पोलीस स्टेशनातून इतर दोघे तक्रार अर्ज परत घेवून आले.

श्री. संजय गायकवाड लगेचच मला अन मित्राला 'शिक्षक उपसंचालकांकडे' घेवून गेले. त्यांना गायकवाड साहेबांनी परिस्थीती समजावून सांगितली. त्यांनी लगेचच संस्थेची मान्यता आहे की नाही याचे तपासणीचे आदेश दिले तसेच असले पैसे घेण्याचे काहीही अधिकार संस्थांना नसल्याचे स्पष्ट केले.

श्री. संजय गायकवाड यांनी मग लगेच तक्रार अर्ज घेतला अन "मी पोलीसांकडे जातो" असे सांगितले. त्यांनी तक्रार अर्ज पोलीस निरीक्षक श्री. सपकाळ साहेबांकडे दिला आहे. पोलीसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. आता पुढील कार्यवाही चालू आहे.

एका संस्थेत तर टक्कर दिली. पैसे परत मिळवून अर्धी लढाईच जिंकल्यासारखे वाटते. जेव्हा असले प्रकार पुर्णपणे बंद होत नाही तेव्हा पुर्ण लढाई जिंकली असे होईल.

ज्या विद्यार्थ्यांना नोकरी नाही त्यांच्या कडून मग्रूर संस्थाचालक साध्या अर्जाचीही किंमत घेता अन एक प्रकारे विद्यार्थ्यांना लुबाडतात. मागच्याच महिन्यात नाशकातल्या एका मोठ्या संस्थेने हजारो अर्ज विक्री करून लाखोंची माया जमवीलेली होती.

आता या सगळ्या कारभारात काही प्रश्न उद्भवतात.

१. सामाजीक शिक्षणसंस्थांचे असले 'छापील अर्जांचे' प्रकार म्हणजे धंदेवाईक प्रकार आहेत हे आपण म्हणू शकतो काय?

२. मी तो अर्ज बघीतला तर त्यात काही जगावेगळी माहीती विचारलेली नव्हती. तेच ते रकाने जे सर्वसामान्य अर्ज भरायला लागतात तेच होते. तो अर्ज छापायला केवळ १ ते १.५० रु खर्च आला असता. त्याच अर्जाची किंमत रु. १००/- होवू शकते काय? त्यात 'मला आपल्या संस्थेच्या सगळ्या अटी मान्य आहेत' असा उल्लेख होता अन मुख्य म्हणजे अटीच दिलेल्या नव्हत्या. हे म्हणजे कोर्‍या कागदावर सही करण्यासारखे होते.

त्याचबरोबर अर्जासोबत सगळ्या कागदपत्रांच्या ३ प्रतीलीपी आणि उमेदवाराचे ३ छायाचित्र जोडायचा खर्च पण ध्यानात घ्या.

५. माझ्या माहीतीप्रमाणे बि.एड, डि.एड. पदवी धारक बेरोजगारांची संख्या ध्यानात घेवून व असलेल्या जागा बघून कमीतकमी ५०० अर्ज जरी पकडले तरी 'विद्यामंदिरास' रू. ५००००/- ची घसघशीत कमाई होणार होती.

६. बी.एड, डि.एड. पदवी धारक हा काही निरीक्षर नसतो. त्यास कमीतकमी अर्ज तर 'लिहीता' येतच असणार. असे असतांना 'छापील अर्जाची' गरज काय? त्यांना अर्जाचे छापील स्वरूपच हवे होते तर पेपरध्येच तशा अर्जाचे स्वरूप देवून व ते बेरोजगारांनी टाईप करून घेवून - बेरोजगारांच्या पालकांचे पैसे वाचवता आले नसते काय?

मान्य आहे की, एवढे अर्ज स्वि़कारणे, प्रोसेस करणे, नोकरी देणे हे 'शिक्षणसंस्थेचे' 'काम' आहे. पण ते काही फुकट काम करणार नाहीत. नोकरी लागलेल्या (किमानपक्षी जाहीरात येण्याआधीच लागलेल्या) उमेदवारांकडून काही लाख घेतलेच असतील ना?

अशा प्रकारे एका मोठ्या एक नोकरीसाठी अर्ज विक्रीचा पायंडा पाडला जातोय त्याचे काय? अगदी सरकारी अर्ज देखील आजकाल रूपये २५०/- च्या ड्राफ्ट सोबत जोडले जातात.

सरकार बेरोजगारांची दखल घेईल काय?

- सचिन बोरसे (पाषाणभेद उर्फ दगडफोड्या)
३१/०७/२०१०

Monday, April 13, 2009

नाशिक जवळची पांडवलेणी

नाशिक जवळ असलेली पांडवलेण्यांचे छायाचित्रण.Photographs of Pandavleni - Pandav Caves at Nashik, Maharashtra, India

छा.१ लेण्याच्या पायथ्याशी असणारी पाटी. Pic. 1. Board at the foot of Pandav Caves.

छा. २ पांडवलेण्यांची माहिती असणारी पाटी. Pic. 2. Information Bord at the Pandav caves.

छा. ३ मुख्य लेणी. या लेण्यात खुप मोठी सपाट लादी आहे. याचा वापर प्रार्थनेसाठी होत असावा. Pic. 3. This cave has large floor to sit and to pray.

छा. ४ लेणी क्र. ४. Pic. 4. Cave No. 4

छा. ५ लेणी क्र. ४ च्या स्तंभावरील कोरीव काम. Pic. 5. Carvings on the column of 4th caves at Pandav Caves, Nashik.

छा. ६ लेणी क्र. ४ च्या स्तंभावरील कोरीव काम. Pic. 6. Carvings on the column of 4th caves at Pandav Caves, Nashik.

छा. ७ मोठे स्तंभ असलेली लेणी. खांब सपाट असल्याचा अचुक उपयोग काही महाभागांनी केलेला दिसतोय. Pic. 8. Caves of large column. Some naughty used bad mind on it.

छा. ८ Pic.8

छा. ९ Pic. 9

छा. १० Pic. 10

छा. ११ लेण्यांवर फुललेला चाफा. Pic.11 Chapha Tree

छा. १२ लेण्यांवरून दिसणारे 'दादासाहेब फाळके' स्मारकातील संगीत कारंजे. हे रात्री प्रकाशमान होते. Pic. 12 Music Fountain seen in 'Dadasaheb Phalke Memorial', from Pandav Caves. This fountain starts at evening. You can see movie songs on the screen on the wall.

छा. १३ लेण्यांवरून दिसणारे नाशिक शहर. Pic. 13 Nashik city from Pandav Caves.

छा. १४ लेण्यांवरून दिसणारी अंबड MIDC ची वसाहत. Pic 14. MIDC Ambad, Nashik. One of the Industrial Area of Nashik.