Tuesday, November 27, 2018

मी घेतली यॉट

मी घेतली यॉट

ढिसक्लेमरः केवळ हलके घेण्यासाठी. कुणाही व्यक्ती, शक्ती, राजकीय पक्ष-पुढारी, मुळशी पॅटर्न, वाढदिवस बॅनरवाले यांचा उपमर्द करण्याचा हेतू नाही.

मी तर घेतली बाबा यॉट
फेरारी पेक्षा फार मोठ्ठा तिचा थाट
मी तर घेतली ब्वॉ यॉट || धृ ||

नकोच कसले रस्ते आता धुळभरी ट्रॅफीकचे
अन नकोच ते लफडे आता पार्कींगसाठीचे
मध्यमवर्गीयाला सांगतो त्याला आहे माझ्याशी गाठ ||१||
इंग्लीश मेडीअम मधला मी कॉन्व्हेंट एज्यूकेटेड
मराठी हिंदी धेडगुजरी भाषा म्हणजे कटकट

मराठी शाळेची मुले म्हणजे आहेत नुसतीच माठ ||२||
आय.आय.टी., आय.आय.एम. शिकलोय
मोठ्या कंपनीत मध्ये मॅनेजर झालोय
मल्टीनॅशलांचे दररोज कॉल येती सत्राशेसाठ ||३||

नकोच ते मुलूंड ठाणे माहीम बोरीवली चेंबूर घणसोली कोपर येथे राहणे
किंवा नकोच ते सदाशिवपेठीय वागणे
कुलाबा पाली हिल किंवा पाषाण कर्वेनगरातील घेतलाय मोठा ब्लॉक ||४||

मी तर घेतली ब्वॉ यॉट
मी तर घेतली ब्वॉ यॉट

- यॉटकरी यॉ - पाषा भेदकर

प्रश्न:

१) यॉट कशाचे प्रतीक आहे?
२) मुलूंड ठाणे माहीम, बोरीवली, चेंबूर, घणसोली, कोपर येथे कोण राहते? (उपेक्षीत व्यक्तीसमुहाचे नाव अपेक्षीत)
३) वर प्रश्न क्रमांक २ मधे राहण्यार्‍या ठिकाणांव्यतिरीक्त इतर ठिकाणी कोण राहते? (अपेक्षीत व्यक्तींचे उल्लेख अपेक्षीत.)
४) आय.आय.टी., आय.आय.एम. मध्ये कोण शिकू शकतात?
५) चार महाग असलेल्या चारचाकी वाहनांची नावे सांगा.

(मिळून मिसळून【ツ】या व्हाटसअ‍ॅप गृपवर पुर्वप्रकाशीत. (येथे केवळ मिपावासीयांना प्रवेश आहे. सामील होण्यासाठी "उपयोजक" या सदस्यांशी संपर्क साधावा.)

वरील झैरातीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही हे बोलून मी माझे भाषण संपवतो.

आर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे

वीस एक वर्षांपुर्वी नाशकातल्या त्रिमुर्ती चौकात दक्षिण भारतीय लोकांनी एक बंगला भाड्याने घेतला होता. तेथे त्यांनी संसारोपयोगी वस्तू विकण्याचा धंदा सुरू केला होता. म्हणजे लोखंडी खुर्च्या, पातेले, जग, कढई, चटया, कूकर, फॅन, पलंग अगदी पाण्याचा पेला देखील. तर या सार्या वस्तू ते कमी किमतीत विकत. काही दिवसांत त्यांचा जम बसला. त्यावेळी लोकवस्ती नवीनच होती. लोकं वस्तू विकत घेत आणि इतर वस्तूंची आगावू मागणी करत. आगावू मागणीच्या वस्तूसाठी ते लोक आधीच पैसे मागत. गिर्हाईकही स्वस्तात वस्तू मिळते म्हणून पैसे जमा करत. असे सहा सात महीने झाले. एके दिवशी ते दक्षिण भारतीय लोक फरार झाले आणि लोकांचे आगावू घेतलेले पैसे बुडाले.
काही खाजगी गुंतवणूक संस्था जसे की केबीसी, पॅन कार्ड क्लब, ईमू पालन, समृद्ध आदी अशा अनेक खाजगी गुंतवणूक संस्था होत्या की त्यांचे आर्थिक घोटाळे उघडकीस येवून गुंतवणूकदारांचे पैसे बुडतात अशा बातम्या आपण नेहमी वाचतो. सहारा इंडीया किंवा डी. एस. के. यांच्यासारख्या नावाजलेल्या संस्थानीही गुंतवणूकदारांची फसवणूक केलेली आहे. एवढेच नव्हे तर काही सहकारी बँका आणि पतसंस्था आदींनीदेखील गुंतवणूकदारांना फसवल्याची उदाहरणे आहेत. काही प्लॉटमध्ये गुंतवणूक करणार्या, शेळीपालन करणार्या, झाडे लावणार्या संस्था, मल्टी लेव्हल मार्केटींग करणार्या संस्थादेखील अशाच प्रकारे फसवणूक करतात.
असल्या ठेवी स्विकारणार्या संस्था बिगर बँकींग वित्तीय संस्था म्हणजेच नॉन बँकींग फायनांशीअल इन्स्टीट्यूशन म्हणून गणल्या जातात. संस्था या सेबी आणि/ किंवा (आरबीआय) यांच्या मान्यता असणार्या असाव्या लागतात. सेबी, आरबीआय अशा संस्थांवर लक्ष ठेवून असतात. तरीही काही संस्थांनी घोटाळा केलाच तर या नियामक संस्था कायदेशीर हस्तक्षेप करु शकतात. वर उल्लेखलेल्या किती संस्था मान्यताप्राप्त होत्या हा संशोधनाचा विषय आहे.
वरील उदाहरणातील वस्तू विक्रेते किंवा इतर उदाहरणातील वित्तीय संस्था, बँका आदींनी अती लोभ - जसे कमी किंमत, जास्त व्याजदर आदी अमीष दाखवल्याने अनेक मध्यमवर्गीय अशा दुकान किंवा संस्थांकडे आकर्षित झालेले होते. या आर्थिक गुंतवणूकीत शहर, ग्रामीण असा काही भेद नाही. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांपासून ग्रामीण भागातही असे गुंतवणूकदार सापडतात. अनेक वेळा लोक घरे, शेती, दागीने गहाण टाकतात अन पैसे गुंतवतात. या अशा गुंतवणूकीत एक समान धागा आढळतो. सुरूवातीला अशी संस्था गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदर नियमीत देण्याचा वायदा केला जातो. तोंडी प्रसिद्धीमुळे एकमेकांचे नातेवाईक, शेजारीपाजारी असे गुंतवणूकदार वाढत जातात. हा एकप्रकारचा कल्टच असतो. सुरूवातीच्या गुंतवणूकीदारांना नंतर येणार्या गुंतवणूकीदारांच्या पैशातून व्याज दिले जाते. काही संस्था हा पैसा शेअरमार्केट मध्ये, वायदेबाजारात लावतात व त्यावर येणार्या नफ्यातून व्याज दिले जाते. कोठेतरी हि साखळी तुटते आणि मग अशा संस्थांचा डोलारा कोसळतो. सुरूवातीचे पैसे सोडवून घेणारे सोडले तर इतर सर्व जण या आर्थिक घोटाळ्यात अडकतात. न्यायालयात जरी असे खटले गेले तरी त्यांचा निकाल वेळेवर कधीच लागत नाही हे सत्य आहे. पै पै जमवून केलेली गुंतवणूक परत मिळत नाही. म्हातारपणी, रिटायरमेंटनंतर लागणारे पैसे, लग्नकार्य, आजारपण आदींच्या खर्चाची तरतूद वाया जाते. कित्येक जणांनी याची हाय खावून आत्महत्या केल्याचीही उदाहरणे आहेत.
या सर्वांवर उपाय काय? खाली काही मार्गदर्शक टिपा दिल्या आहेत जेणेकरून गुंतवणूक अशा आर्थिक घोटाळ्यांमध्ये न जाता चांगल्या ठिकाणी करता येवू शकते.
१) अती लोभ सर्वात वाईट. तो कसल्याही गोष्टीचा का असेना. जास्त व्याजदर मिळावा हि अपेक्षा सर्वांचीच असते. पण अती लोभापायी गुंतवणूक योग्य ठिकाणी करत नाही. गुंतवणूक करतांना अती लोभ ठेवू नका.
२) जास्त व्याजदराचे आकर्षण. बाजारभावापेक्षा जास्त व्याजदर म्हणजे धोका अधिक. अधीक व्याजदराची, दुप्पट, तिप्पट असा उल्लेख असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करु नका.
३) मान्यताप्राप्त संस्था नसणे. बर्याच वेळी अशा संस्था सेबी किंवा/ वा आरबीआय मान्यताप्राप्त नसतात. असल्याच तर त्यांच्या गुंतवणूकदारासाठी अशा संस्था नामसाध्यर्म असणार्या योजना आखतात व त्यामध्ये गुंतवणूक घेतात.
४) संस्था किती विश्वासू आहे याचा तपास न करता केलेली गुंतवणूक वाया जावू शकते.
५) अर्थात विश्वासू संस्थांनीदेखील गुंतवणूकदारांना दगा दिलेला आहे. म्हणजेच आपल्या गुंतवणूकीचे शेवटी जबाबदारी आपलीच (गुंतवणूकदारांचीच) ठरते.
६) आपल्या नातेवाईकाने, शेजार्याने गुंतवणूक केली म्हणजे आपण तेथेच केली पाहीजे असे नाही. सारासार विचार करून निर्णय घ्या.
सुरक्षित गुंतवणूकीचे प्रकार/ योजना:
वर दिलेल्या गुंतवणूकीच्या प्रकारात भान ठेवून गुंतवणूक करावी व त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची तयारी असावी. उरला प्रश्न महागाईपेक्षा (inflation) आपल्या गुंतवणूकीतून थोडा जास्त (अगदीच भरमसाठ नाही) परतावा, व्याज कुठे मिळेल किंवा अशा काही योजना आहेत का?
१) पोस्ट, राष्ट्रीयकृत बँकांच्या मुदत ठेवी, क्रिसील, इकरा, केअर अशा क्रेडीट रेटींग्ज देणार्या संस्थांनी दिलेल्या आणि ए+ किंवा ए मानंकनाच्या मुदत ठेवी योजना ( यात बाँडस येवू शकतात) तुलनेने योग्य व्याजदर देवून सुरक्षीततेत वरचढ ठरतात.
२) सारेच म्युच्यूअल फंड शेअर मार्केटमध्ये पैसे लावत नाहीत. डेट फंड हे कंपनी डिपॉझीट, बॉन्ड अशा सुरक्षीत ठिकाणी पैसे गुंतवतात. याचे व्यवस्थापन असेट मॅनेजमेंट कंपनी व्यावसायीकरीत्या करत असते. मुद्दा क्रमांक मधील गुंतवणूकीच्या पद्धतीपेक्षा थोडा जास्त परतावा मिळू शकतो.
३) एखादे म्युच्यूअल फंड बंद जरी झाले तरी नियामक संस्था अशा बंद पडलेल्या अशा फंडाला दुसर्या एखाद्या फंडात एकत्र करते. उदा. आयएनजी वैश्य यांचे फंड बिर्ला सनलाईफ म्युच्यूअल फंडात मर्ज झाले आहे.
आणखी एक दुराव्याचे उदाहरण देता येईल. सहारा या कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली त्यामुळे सेबीने त्यांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. पण त्याच कंपनीने स्पॉन्सर केलेला सहारा म्युच्यूअल फंड अजून चालू आहे.
४) ईक्वीटी म्युच्यूअल फंड हे शेअरबाजारात पैसे लावतात. त्यातही किती टक्के पैसे लावतात यावर उपप्रकार पडतात. त्यात मार्केटप्रमाणे परतावा मिळतो. जास्त मुदतीसाठी पैसे ठेवायचे असल्यास हा प्रकार योग्य आहे. अर्थातच म्युच्यूअल फंडातली गुंतवणूक मार्केटवर अवलंबून असते हे लक्षात ठेवावे.
५) शेअर बाजारात तुलनेने जास्त परतावा मिळतो. पण त्यामध्ये गुंतवणूक करतांना कंपनी तोट्यात जावू शकते हे लक्षात ठेवावे.
६) प्लॅट, प्लॉट, शेतजमीन, पोस्ट असो वा म्युच्यूअल फंड असो वा शेअर बाजार, यात गुंतवणूक करतांना योग्य आणि मान्यताप्राप्त आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. आर्थिक व्यवहारात सारे काही आपणच केले पाहीजे हा ध्यास टाळा. असे आर्थिक सल्लागार जरी थोडीफार फी आकारत असतील तरी त्याबदल्यात योग्य सल्ला देत असतात. गुंतवणूकीच्या सार्‍या आतील गोष्टी आपणाला ठावूक असतीलच असे नाही. मार्केटमध्ये काय चालू आहे याबाबतही आपण अनभिज्ञ असू शकतो. सल्लागार त्याच क्षेत्रात काम करत असल्याने माहीतीत तो मार्गदर्शक ठरतो.
७) आयुर्विमायोजना हि गुंतवणूक ठरू शकत नाही. आयुर्विम्याव्यतिरिक्त इतर योजनांमध्ये गुंतवणूक केलीच पाहीजे.

- पाभे

कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी?

कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी? एटीएम स्वीच काय असते? आपला नेहमीचा पण आडव्हान्स नेटवर्क स्विच की एन्क्रीप्शन डिव्हाईस? की ती एक सिस्टीम असते ज्यात पेमेंट हे एटीएम मशीन मधून अथोराईज करण्यापासून ते पैसे हातात येण्यापर्यंत त्याची सर्व प्रोसेस केली जाते?
की हॅकर्सनी डमी पेमेंट गेटवे स्थापन केला होता?
की हॅकर्सनी वीसा कार्डाला समांतर व्यवस्था स्थापन केली होती?
बँक अधीकार्‍याच्या मते लुट ही कमी रकमेच्या अनेक व्यवहारांनी केली गेली जसे १०० डॉलर ते २००० डॉलर वैगेरे. आणि ते ही पेट्रॉल पंप , एटीएम मधून.
संदर्भः https://www.youtube.com/watch?v=Cijv1GVlGqw (श्री. मिलींद काळे, चेअरमन, कॉसमॉस बँक)
(२ तास १३ मिनीटात १२ हजार व्यवहार झालेत.)
आता निरनिराळ्या २५/३० देशांतून अशा कमी रकमेच्या व्यवहारांनी ९५ कोटी लुटणे अशक्य वाटते. तेवढे प्रशिक्षीत मनुष्यबळ कोणत्याही दरोडेखोरांच्या / हॅकर्सच्या टोळीला इतक्या विविध देशांत रात्री/दिवसा ७/८ तास ठेवणे अशक्यप्राय गोष्ट आहे.
डार्क नेट, डीप वेब चा हा प्रकार नसावा? कारण यात एका ठिकाणी बसून निरनिराळ्या देशांचे आयपी अ‍ॅड्रेस घेता येवू शकतात.
एवढी मोठी लुट होते म्हणजेच यंत्रणेत काहीतरी तृटी होती. मानवी हस्तक्षेप सोडला तर तांत्रीक बाबीत काय तॄट होती , असावी? बँकेचे एटीएम हे व्यवहार करणार्‍या सर्व्हरबरोबर शक्यतो (किंवा नेहमीच) व्हीपीएन कनेक्षन ने कनेक्टेड असतात. आणि हे कनेक्षन फायरवॉलमधून होत असते.
काही वेळा असे व्हीपीएन कनेक्षन (एटीएम किंवा ब्रांच कनेक्टीव्हीटी साठी) पॉईंट टू पॉईंट लिंकने किंवा एमपीएलएस लिंकने (एक प्रकारची एनक्रिप्टेड पी टू पी लिंकच) सुरक्षीत केले गेलेले असतात. मग असे काय झाले की हे सेक्यूअर्ड व्हीपीएन टनेल फोडल्या गेले?
की पासवर्ड लिक झाला होता काय? हि व्यवस्था पाहणार्‍या अ‍ॅडमीन, किंवा त्या डिपार्टमेंटच्या एखाद्याचा सहभाग असू शकतो काय?
नॅशनल पेमेंट गेटवे/ एनीएफटी/ आरटीजीएस पेमेंट प्रोसेसमध्ये तॄटी होती काय?
असल्यास अशा तॄटींवर मात करता येईल काय? काय सुधारणा अपेक्षीत आहेत?
आपण आयटीत जरी अव्वल स्थानावर असलो तरी आपल्याकडे तांत्रीक रिपीटेटीव्ह कामेच (आय टि हमाल) जास्त केली जातात. ( हे खरे सॉप्टवेअर नाही, आदी आदी चर्चा येथे अनाठाई आहे.) असे असतांना पैशाच्या व्यवहारांसाठी ऑनलाईन, इंटरनेट आदीवर किती भिस्त ठेवली पाहीजे? आणि आपण जरी ऑनलाईन व्यवहार केले नाहीत तरी इतर कुणी आपले बँकेतले पैसे परस्पर ऑनलाईन व्यवहाराने लुटू शकतो. यामुळे बँकेच्या संगणकीय व्यवहारांवर किती भिस्त ठेवली पाहीजे?
छोट्या बँकांच्य आयटी प्रणाली अजून विकसीत झालेल्या नाहीत. माझाच अनुभव सांगतो. एनकेजीएसबी को ऑफ. बँकेच्या माझ्या पासबुकमध्ये जमा / खर्चाच्या रकमेच्या रकान्यात रकमेचा आकडा रू. 894:40 असा न छापता तो रू. 894,40 असा छापला जात होता. मी याबाबत तक्रार केली असता चलता है छाप उत्तर आले.
एटीएमचा पीन विसरलो असता आठ दिवसांनी तो पीन हेडऑफीसमधून छापलेल्या कार्बन कागदावर बँकेत आला. मी स्वतः चौकशी केली असता तो मला घेण्यास बँकेत जावे लागले. यात दिवसांचा अपव्यय झाला.
तेथेच माझ्या खात्यात सिस्टीम रू. ५००००/- जास्त दाखवत होती. मी ती रक्कम काढूही शकत होतो. पण मी याबाबत अगदी मॅनेजरला सांगूनही ती दुरूस्ती पाच महीने होवूनही झालेली नव्हती.
पुन्हा तेथेच माझे एक मोठे एनईएफटी पेमेंट समोरच्या पार्टीला त्याच दिवशी सकाळी केले असता संध्याकाळपर्यंत मिळालेले नव्हते. ते दुसर्या दिवशीही मला रिव्हर्ट झाले नव्हते. चौकशी केली असता बँकेच्या डेटा सेंटरच्या युपीएसला आग लागल्याचे सांगितले गेले. मला ते पटले नाही पण मग तोपर्यंत माझ्या पैशांची स्थिती कोठे आहे हे देखील समजले नव्हते. नंतर मी ज्या बँकेतून पैसे ट्रान्सफर केले त्या येस बँकेत चौकशी केली असता तुमचे पेमेंट क्लिअर झाले असे समजले.
मोठ्या बँकाही काही मागे नसाव्यात. मला आयसीआयसीआय बँकेच्या माझ्याच नावाने असलेल्या दुसर्या खातेधारकाचे व्यवहारांचे ईमेल्स कालपरवापर्यंत येत होते. मी तक्रार केल्यानंतर ते थांबले.
आयडीबीआय बँकेचे दररोजचे बँकमॅनेजर आणि त्याच्या सहकार्‍यांचे ऑफीशीअल आकडेवारी, दररोजचे व्यवहार, रकमा असलेले ईमेल्स देखील मागे मला येत होते.
सेंट्रल बँकेचा अधीकारी माझा रजीस्टर्ड फोन नंबर बदलायला घाबरत होता.
थोडक्यात काही बँकांच्या आयटी रिसोर्समध्ये व्यवस्था, देखभाल यथातथा असते.
कशा प्रकारे हि लूट केली असावी? काही तर्क?

(टिपः काही तांत्रीक शब्दांना मराठीत प्रतिशब्द तयार नसल्याने इंग्रजी शब्द वापरले आहेत.)