Showing posts with label सल्ला. Show all posts
Showing posts with label सल्ला. Show all posts

Wednesday, June 26, 2019

व्हाईट नॉईज काय आहे भाऊ? रात्रपाळी आणि झोप यासाठी उपयोगी.

मित्रांनो,

आपणापैकी बरेच जण नाईट शिप्ट करत असतील. नाईट शिप्टमुळे दिवसा आपल्याला झोपणे क्रमपाप्त, आवश्यक आहे. परंतु घरातील व्यक्ती, आजूबाजूचे लोकं हे सुद्धा आपल्याबरोबर नाईट शिप्ट करतात का? तर नाही.

जेव्हा जेव्हा आपण नाईट शिप्ट करुन आल्यानंतर दिवसा झोपतो त्या वेळी घरातील व्यक्ती, लहान मुले, आजूबाजूच्या घरी राहणारे व्यक्ती, कुटूंब हे त्यांचे दिवसाचे दिनक्रम व्यतीत करत असतात. जेव्हा आपण झोपतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला इतर सारे आवाज येत असतात. कुणी टिव्ही पाहत असतो, वाहने जात असतात, लहान मुले खेळत असतात इत्यादीमुळे आपली झोप विस्कळीत होत असते. अशावेळी हा व्हाईट नॉईज आपल्या कामी येतो.

काय आहे व्हाईट नॉईज?
व्हाईट नॉईज हा असा कमी वारंवारतेचा (लो फ्रिक्वेन्सी) आवाज असतो जो इतर आवाजांना रोखतो (शिल्ड) करतो. तुम्ही हा लेख किंवा ईमेल वाचण्याआधीही तुमच्या घरात व्हाईट नॉईज वापरतच होते. पण त्यालाच व्हाईट नॉईज म्हणतात हे तुम्हाला कदाचित माहीत नसावे. घरातील पंख्याचा आवाज हा व्हाईट नॉईजचे उदाहरण आहे. कमी वारंवारतेचा हमींग साऊंड (लो फ्रिक्वेन्सी) जो सतत येत असतो तो व्हाईट नॉईज असतो.

व्हाईट नॉईजचा उपयोग कसा करायचा?
या फाईल्स जास्त मोठ्या असल्याने ईमेलमध्ये न देता इंटरनेटवर शेअर केल्या आहेत. या लिंकमधील झीप फाईलमध्ये व्हाईट नॉईजच्या फाईल्स आहेत. या फाईल्स डाऊनलोड करून एक्ट्राक्ट करा आणि तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा. जेव्हा तुम्हाला झोपायचे आहे तेव्हा या फाईल्सपैकी कोणतीही एक ऑडीओ फाईल प्ले करा. तुमच्या कानांना सोसवेल इतपत मोबाईलचा आवाज वाढवा. सुरूवातीला एक दोन दिवस थोडेसे वेगळे वाटेल पण नंतर हळूहळू याची सवय होईल. यातील कोणत्याही आवाजाच्या फाईल्स साधारण दहा मिनीटे प्ले होतात. मोबाईलच्या ऑडीओ प्लेअरमध्ये केवळ एकच आवाज सतत प्ले (कन्टिन्यू प्ले) मोडमध्ये प्ले करा. या ऑडीओ फाईल्समध्ये अनेक आवाजांच्या फाईल्स आहेत, जसे - मुळचा व्हाईट नॉईज, फॅनचा आवाज, मोटर, पाऊस इत्यादी. व्यक्तीश: मला तरी 01WhiteNoise.mp3 या फाईलचा आवाज सुट झालेला आहे. व्यक्तीपरत्वे आवड निराळी असू शकते.

लक्षात ठेवा:
व्हाईट नॉईज तुम्ही तुमच्या खाजगी कामासाठी वापरत आहात. घरातील इतर कुणी व्यक्ती तुमच्यासोबत झोपत असतील तर कदाचीत त्यांना हा आवाज आवडणारदेखील नाही. त्यांनी या आवाजाबद्दल नावड दाखवली तर त्यांच्या इच्छेचा सन्मान करा आणि हा आवाज तात्पुरता बंद करा हि नम्र विनंती.

आणखी एक, या आवाजाच्याही खुप आहारी जावू नका. अति तेथे माती हि म्हण लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला झोप घेणे अति आवश्यक आहे तेव्हा किंवा लाईट गेल्यावर पंखे बंद झाले तर या आवाजाचा उपयोग करा.

आपल्याला या माहितीचा कितपत उपयोग झाला ते आवर्जून कळवा.

आपला,
पाषाणभेद

Wednesday, September 21, 2011

हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार

हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार

हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार
सदाचार नाही हा तर आहे
भ्रष्ट आचार भ्रष्ट आचार

काम करण्यासाठी कुणी ऑफीसात येतो,
ऑफिसर कारकुनाची विनवणी करतो
आज ये उद्या ये म्हणून वेळ फुक्कट जातो,
पैसे घेवूनच मग कामं तो करतो
असल्या कामासाठी लाच खाणं झाला शिष्टाचार शिष्टाचार
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार

गोरगरीबाचे कामं तुम्ही लवकर कराना,
चिल्यापिल्यांचे तुम्ही आशिर्वाद घ्याना
माणसातली माणूसकी आता जागवाना
पैसे मागण्याचा खेळ आता संपवाना
सदाचार, सुनीती, निष्ठा यांचा करा प्रचार, करा प्रचार
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार

स्विस बँकेमध्ये पहा कितीतरी पैसा तो सडतो
इकडे भारताचा विकास पैश्याविना अडतो
चारा, शस्त्र, स्पेक्ट्रम घोटाळ्यात पैसा हा जातो
लाच देवून संसदेत मते पुढारी मागतो
लाच देवू नका घेवू नका होवू नका लाचार लाचार
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार

देवालाही तुम्ही सांगा नारळ का फोडता?
परिक्षेला जाण्याआधी हात का जोडता?
स्व:तावरील विश्वास कमी का करता?
मठ मंदीराची तुम्ही तिजोरी का भरता?
हा तर आहे लाच देण्याचाच प्रकार प्रकार
हटवा आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२१/०९/२०११

Monday, September 05, 2011

मोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज)

मोटरसायकलः बजाज बॉक्सर मॉडेल २००० चे, १०० cc
बर्‍याच दिवसापासून माझ्या मोटरसायकलची सरासरी धाव (अ‍ॅव्हरेज) काढायची होती. काल वेळ मिळाला म्हणून गॅरेजमध्ये गेलो. पेट्रोलचे कंटेनर घेतले अन गॅरेजवाल्याला सांगितले की मीच गाडी घेवून अ‍ॅव्हरेज तपासून बघतो. पहिल्यांदा कार्बोरेटरमधले पेट्रोल संपवण्यासाठी पेट्रोल कॉक बंद केला अन एखाद्या कि.मी. पर्यंत गाडी बंद झाली. आयटीआय सिग्नलच्या समोरच काही ट्रॅफीक हवालदार गाड्या अडवत होते. सरळ त्यांच्यासमोरच गाडी बंद झाली. मी गाडी स्टँडला लावली. कंटेनरची नळी इनलेट ला जोडली. पेट्रोल टँक मधून १०० ml पेट्रोल कंटेनर मध्ये काढले मिटरचे रिडींग ५२६.१ घेतले. मोटरसायकल एमाडीसीतून गाडी त्रंबकेश्वराच्या दिशेने चालवायला सुरूवात केली. साधारण ४० कि.मी. स्पिड ठेवायचा असे मनात होते. सातपुरला काही ट्रॅफीक लागले. गियर खाली आणावे लागले. एकदा पाय टेकवून गाडी दोन सेकंदाकरता उभी करावी लागली. त्रंबकविद्यामंदीराच्या ३००/ ३५० मिटर पुढे गाडी बंद झाली. त्यावेळचे ओडोमिटरचे रिडींग ५३५ होते. हे झाले ९ कि.मी. १०० ml साठी. म्हणजे एका लिटरला ९० कि.मी.

एका लिटरला ९० कि.मी. म्हणजे फारच चांगले अ‍ॅव्हरेज आले. मला वेळ होताच. म्हणून अजून पुढे जावून अ‍ॅव्हरेज बघण्याचे ठरविले. पाऊस पडत नव्हताच. म्हणजे पडून गेलेला होता. कारण पावसाळा असून त्रंबकेश्वराला पाऊस नाही असे सहसा होत नाही. सगळीकडे हिरवळ होती. त्रंबकेश्वरचा रस्ता तसा शांत असतो. भाविक लोकांच्या गाड्यांची वर्दळ चालू होती. त्रंबकेश्वराला श्रावणात जाण्याचा हिरवळ, पाऊस हा मोठा फायदा असतो.

परत कंटेनर उघडले अन त्यात टँकमधून १००ml पेट्रोल काढले. गाडी चालवायला सुरूवात केली. महिरावणीच्या थोडे पुढे कंटेनरमधले पेट्रोल संपले म्हणून गाडी बंद झाली. या वेळचे ओडोमिटरचे रिडींग ५४३ होते. म्हणजे ५३५-५४३=८ कि.मी. १०० ml साठी. म्हणजे एका लिटरला ८० कि.मी. यावेळी रस्ता थोडा चढावाचा होता म्हणून मला गाडी थोडी रेस करावी लागली. यावेळी थोडा स्पिड ४० ते ५५ कि.मीच्या दरम्यान होता.

आता मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला घेतली. पुन्हा टँकमधून १००ml पेट्रोल कंटेनरमध्ये काढले अन नाशिकच्या दिशेने माघारी वळालो. आता रस्ता उताराचा होता. त्याचा फायदा घेत मी उतारावर इंजीन बंद करून चालवत असे. यामुळे नक्कीच अ‍ॅव्हरेज वाढ होणार होती. अ‍ॅव्हरेज काढतांना इंजीन तर चालूच पाहीजे. पण नक्की किती अ‍ॅव्हरेज वाढतो ते काढण्यासाठी मी हा प्रयोग करून पाहीला. तसेच या तिसर्‍या वेळी स्पिड सतत ४० वरच ठेवला.
त्रंबकविद्यामंदिराच्या थोडे पुढे मोटरसायकल बंद झाली. रिडींग आले: ५५३.३. म्हणजे ५४३-५५३=१०. म्हणजेच १ लिटरला १०० कि.मी.

लागोपाठ तिन वेळा अ‍ॅव्हरेज काढला त्याचा मध्ये (mean) ९० कि.मी. येतो. (९०+८०+१००/३=९०)

प्रत्येक १००ml पेट्रोल घेण्यात काही त्रूटी लक्षात घेवून, काही तांत्रीक बाबी, हवेचा वेग, मोटरसायकल चालवण्याची पद्धत आदी गोष्टी लक्षात घेवून आपण मिळालेला अ‍ॅव्हरेज आणखी कमी करू. ८५ किमी करू. ८० करू किंवा डोक्यावर पाणी गेले ७५ करू. म्हणजे एकुणच आताच्या घडीला मला चांगला अ‍ॅव्हरेज मिळाला होता.

Friday, September 02, 2011

अंतर्वस्त्रे परिधान करण्याची योग्य रीत

आता केवळ 'अंतर्वस्त्रे' (अंडरविअर) हा शब्द या धाग्यात आहे म्हणून नाक मुरडू नका. 'अंतर्वस्त्रे' म्हणजे जे बाहेरील कपड्यांच्या आतच घालतो तशीच वस्त्र हे लक्षात घ्या अन पुढे वाचा.

आता ही अंतर्वस्त्रे' किंवा अंडरविअर (उदा. बनियन) आपण शर्ट किंवा पँटच्या आत आपण घालतो. त्या अंतर्वस्त्रांवर (बनियनवर) एक लेबल त्या त्या कंपनीने लावलेले असते. ती त्यांची जाहीरात असते अन त्यावर त्या बनियन च्या मापाचा एक नंबर लिहीलेला असतो. तो साधारणता: इंचात असतो. म्हणजे ज्याची छाती २८ इंचाची असते त्याला २८ नंबरचा बनियन फिट होतो. (फिट्ट नाही तर फिट म्हणजे योग्य मापात बसतो).
तर आपले लेबल. हे लेबल आजकाल सिन्थेटीक धाग्यातले येते किंवा बनीयनच्याच कापडाचे ते नसते. तुम्ही जर ते लेबलचे अंडरविअर (बनियन) अंगात घातले तर ते सेन्सीटीव्ह त्वचा असणार्‍याला रूतते. हे कधी कोणाच्या लक्षात आले नसेल पण आता त्याकडे निट लक्ष द्या म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. उन्हाळ्यात घामाची पहीली धार मानेच्या त्याच भागातून खाली जात असल्याचे तुमच्या लक्षात येईल.




काही शर्टच्या कॉलरच्या आतल्या बाजूलाही टेलरचे नाव असलेले लेबल असते. ते सुद्धा असेच रुतते किंवा त्या भागात खाजवावे लागते. नविन शर्ट किंवा अंडरविअर असल्यास तेथे जास्तच लागते.
हा झाला मुद्दा क्रमांक १.


आता मुद्दा क्रमांक २. बनियन जर सँन्डो असेल तर त्याचे वरचे दोन निमूळते भाग गळ्याजवळील भागाजवळ जुळलेले असतात. अन बाहीचे असेल तर त्याचा गळा शिलाईने शिवलेला असतो. तेथे शिलाई मारलेली असल्याने तेथील भाग जास्त फुगीर असतो. आता तो कुणाला रुतत वैगेरे नाही. अंतर्वस्त्रांचे (बनियनचे) काम शरीराला आलेला घाम शोषून घेणे हा असतो. अन ते शर्ट-पँटच्या आत असते. त्यामुळे ते सुलट घातले काय किंवा उलट घातले काय काही फरक पडत नाही.
पण त्यावर असलेले लेबल मानेला रूतू नये म्हणून व बाह्यांचे बनियन असेल तर गळ्याला अन काखांना त्याची शिलाई रूतू नये म्हणून ते अंतर्वस्त्र (किंवा बनियन) हे उलटे (म्हणजे शिलाई किंवा ते लेबल बाहेर असलेले ) घातले पाहीजे असे माझे मत आहे.

आता शर्टतर उलटा घालू शकत नाही, म्हणून त्याचे कॉलरचे लेबल अन बनियनचे लेबल आपण नक्कीच फाडू शकतो.

तर मित्रांनो, घ्या कात्री अन फाडून टाका अंडरविअर अन कॉलरचे लेबल, अन बघा तो किती 'आराम का मामला' होतो ते.

Saturday, April 09, 2011

फसू नका तुम्ही फसू नका

फसू नका तुम्ही फसू नका

विज्ञानाची कास धरा तुम्ही
ज्योतिषांच्या नादी लागू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||धृ||

लांब दाढी कपाळी टिळा
बोटात अंगठ्या गळ्यात माळा
समोर पोपट चिठ्ठी काढतो
त्यावरचे भविष्य ज्योतिषी वाचतो

गद्य: जो दुसर्‍यांचे भविष्य वाचतो त्याला त्याचे भविष्यतरी ठावूक असते काय?

अशा ज्योतिषासमोर बसू नका, बसू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||१||

देई गंडा ताईत दोरा
अंगार्‍या धुपार्‍यांचा करी उतारा
राशी ग्रह नक्षत्र कामाला लावी
पोट भरण्या तुम्हाला फसवी

गद्य: अशा भोंदूला त्याच्या जीवनात समस्या नसतात का?

अशा भोंदूकडे तुम्ही जावू नका, जावू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||२||

कुणी तळहात भविष्यासाठी पाहतो
कुणी तळपायाकडे त्यासाठी जातो
कुणी चेहेरा पाहून भविष्य सांगे
कुणी त्यासाठी कुंडली मांडे

गद्य: अहो ज्योतिष पाहण्याच्या कितीतरी अजब ह्या तर्‍हा?

अशा लफग्यांच्या नादी तुम्ही लागू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||३||

कुणी घरी येवून भविष्य सांगे
कुणी आजारपणावर उपाय सांगे
कुणी हॉटेलात ऑफीस उघडी
कुणी आंतरजाळावरी संस्थळ काढी

गद्य: ज्योतिष हा 'धंदा' आहे अन 'धंद्यात' फसवणूक चालते, ग्राहकराजा जागा हो!

अशा व्यापार्‍यांच्या दुकानी तुम्ही जावू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||४||

विज्ञानाची कास धरा तुम्ही
ज्योतिषांच्या नादी लागू नका
फसू नका तुम्ही फसू नका ||धृ||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१६/०९/२०१०

Tuesday, April 13, 2010

लावणी: टाकून द्या ह्या वंगाळ सवयी

लावणी: टाकून द्या ह्या वंगाळ सवयी


(सरकारी झैरातीत असल्या कविता असतात का?)

दारू पिवून शरीराचा नाश तुमी का करता मला समजत नाही
टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी ||धृ||

दारूमुळं सौंसाराची धुळधाण होई,
तिला सोडाया नका करू पण परंतू
उगा आजार लावून घ्याल,
सांगा माझं म्हनन खरं आहे का नाही?
टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी ||१||

असलीच सवय हाये पान तंबाकूची,
अन त्ये खावून जागीच थुंकायची
दुसरं कायतरी काम करा,
उगा म्हनं तंबाकूबिगर येळ माजा जात नाही
टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी ||२||

पाहून राहिली मी तुमी खोकताय मघापासनं,
का सिग्रेटी पिता निसतं मग तुम्ही ओ पाव्हनं
काळजी वाटतीया म्हनून सांगतीया,
करू नका इस्पितळात जायची घाई
टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी ||३||

{{ ह्ये आताच पहा मोबाईल वाजला तुमचा किती मोठ्यानं,
झोपलेली दचकून जागी व्हतील त्याच्या रिंगटोनीनं
रिंगटोन बदला नायतर आवाज शांत ठेवा
ऐकताय का माझं तुमी काही
टाकून द्या हि वंगाळ सवय, लावून घेता कशापायी }} ||४||

कवन ऐकवीते रसिक जनांना करूनी वंदन,
तुम्हास सांगते द्या मज अनुमोदन,
जीवनमान सुधराया,
चांगल्या सवयी अंगी बाणवा बाई
टाकून द्या ह्या वंगाळ सवयी, लावून घेता कशापायी ||५||


- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/०४/२०१०