Showing posts with label वीररस. Show all posts
Showing posts with label वीररस. Show all posts

Wednesday, June 10, 2020

बालकथा: रामूची हुशारी

बालकथा: रामूची हुशारी

एक छोटे गाव होते. त्या गावात रामू नावाचा पोरका मुलगा राहत होता. जवळचे कुणीच नसल्याने तो एकटा राहत होता. बारा तेरा वर्षांचा रामू कोण कुठला कुणालाच माहीत नव्हता. तो सार्‍या गावाचाच मुलगा झाला होता. गावात मिळेल ती कामे तो करायचा. कुणाची गुरे चारून आण, बांधावरचे गवत कापून दे, कुणाचे धान्य पोहचवून दे तर कुणाच्या घरची इतर कामे करून दे असले वरकाम करून तो पोट भरे. गावकरीही त्याच्या एकटेपणाची जाणीव ठेवून होते. त्याचा स्वभावही मनमिळावू आणि पोटात राहून जगण्याचा होता.

असेच एकदा त्याला एका आजीने जळणासाठी लाकडे तोडून आणण्यास सांगितले. तिने एका फडक्यात चटणी भाकरी बांधून दिली अन रामू आपली कुर्‍हाड घेवून जंगलात निघाला. एखादे वठलेले, वाळलेले झाड दिसते का ते पाहत तो  निबीड जंगलात पोहोचला. एका जागी दोन तीन झाडे फांद्या छाटण्याजोगी असलेली होती. एका आठवड्याचा लाकूडफाटा होईल अशा रितीने लाकडे तोडून मोळी बांधू त्यानंतर घरी परतू असा विचार त्याने केला अन तो त्यातील एका झाडावर चढला. तो फांद्यांवर घाव घालणार तोच तेथे एक साधू अवतिर्ण झाला. 

"काय करतो आहेस तू मुला", साधूने रामूला प्रश्न विचारला.

रामूने साधूला नमस्कार केला आणि, "आजीबाईसाठी जळणाचा लाकूडफाटा घेतो आहे" असे उत्तर दिले.

"अरे बाबा, ही येथली झाडे नको तोडू. माझा वावर नेहमीच येथे असतो. तू दुसरीकडे का जात नाही? अन तुझे नाव गाव काय आहे?" साधूबाबांनी रामूला प्रश्न विचारले.

"महाराज, मी रामू, जवळच्याच गावात राहतो. मी काही हिरवीगार झाडे तोडत नसतो. अन हे पहा महाराज, या झाडाच्या बारक्या फांद्याच तोडतो आहे. त्यामुळे झाला तर झाडाच्या वाढीसाठी त्याचा फायदाच होईल."

"रामू, तू आधी झाडावरून खाली उतर कसा. उगाच ही झाडे तोडू नको. तू आपला दुसरीकडे झाडे शोध."

"साधू महाराज, आता एवढ्या वर आलो आहे तर घेतो चार पाच फांद्या अन मग दुसरीकडे जातो."

"नको, नको. तू येथले एक पानही तोडू नको. तू आधी खाली उतर मग मी तुला एक गोष्ट देतो. त्याने तुला कामे करण्यास मदत होईल."

आता साधू बाबा एवढी विनवणी करत आहेत तेव्हा आपण खाली उतरू अन ते काय गोष्ट देतात ते पाहूया असा विचार करून रामू झाडावरून खाली उतरला.

साधूमहाराजांनी रामूला आपल्याकडील एक रुमाल दिला.

"मुला, हा जादूचा रुमाल घे. हा असा हलवला की तुझ्या मनात जे विचार आहे त्यानुसार तुला तो मदत करेल. एखादे तोडण्याजोगे झाड आहे का असा विचार तुझ्या मनात आला अन तू रुमाल हलवला की तो तुला झाडाची दिशा दाखवेल"

"अरे वा! फारच उपयोगी आहे हा रुमाल." 

"अरे, एक सांगायचे राहीलेच बघ. हा रुमाल तू येथून अर्धा फर्लांग गेला की मगच फडकव, बरं का रामू."

"बरं साधूमहाराज", असे म्हणूत रामूने तो रुमाल घेतला. साधूबाबांचे आभार मानून शिदोरी कुर्‍हाडीला बांधली अन तो तेथून निघाला. 

थोडे दुरवर आल्यावर आता आपण तोडण्यासाठीचे झाड शोधूया असा विचार करून त्याने रुमाल हातात घेतला अन उघडून हवेमध्ये फडकावला. रुमालाकडून काहीच हालचाल झाली नाही अन काही नाही. रामूने पुन्हा प्रयत्न केला. नंतर त्याने वेगवेगळ्या प्रकारे रुमाल हलवला. वर फेकला. हाताने गोल गोल फिरवला. हातात उघडून ठेवला. परंतु रुमालाने झाडासाठी कोणतीच दिशा दाखवली नाही. 

नाराज रामू पुन्हा साधू महाराजांकडे जाण्यास निघाला.

थोड्या दुरवरून त्याला साधूमहाराज चपळाईने एक मोठे गाठोडे घेवून त्या झाडाकडून दुसर्‍या झाडाकडे जातांना दिसले. 

"अहो महाराज, हा रुमाल तर काहीच कामाचा नाही. याने तर मला कोणतीच दिशा किंवा झाड दाखवले नाही." घामाघूम झालेल्या साधूला रामूने सांगितले.

"अरे असे कसे होईल. आहेच तो रुमाल जादूचा. दाखव बघू तो इकडे." साधू महाराज उत्तरले.

रामूकडून साधू महाराजांनी रुमाल घेतला अन त्याला ते म्हणाले, "हे बघ रामू, एखादे फांद्या तोडण्याजोगे झाड आसपास आहे का याचा विचार मी आता मनात करतो आहे."

मग तो रुमाल त्यांनी उघडून हवेत फडकावला. रामू ज्या झाडावर आधी चढला होता त्याकडे त्यांचा रुमाल असलेला हात वळला अन ते म्हणाले, "अरे बेटा, हे बघ समोरच झाड आहे. त्याच्या फांद्या तू तोडू शकतोस."

"अहो बाबा, काय चेष्टा करता माझी? अहो, तुम्हीच हात झाडाकडे वळवला अन मी आधी ज्या झाडावर चढलो तेच तर झाड दाखवत आहात तुम्ही. हा रुमाल काही कामाचा नाही. तुम्ही तुमचा रुमाल तुमच्याकडेच ठेवा. मला नको हा असला रुमाल. मी आता इतक्या लांब आलो आहे तर याच झाडाच्या फांद्या तोडतो अन जातो." रामूने शिदोरी खाली ठेवली अन कुर्‍हाड घेत झाडावर चढत तो बोलला. 

साधूमहाराज शांतपणे रामू काय करतो आहे ते पहात बसले. रामू आपला सरसर झाडावर चढला अन शेंड्याकडील फांद्या छाटायला सुरूवात केली. एक मोळी होईल इतपत त्याने फांद्या तोडल्या अन तो खाली उतरायला लागला. झाडावरून उतरतांना त्याला दोन फांद्यांच्या बेचक्यात एक सोन्याची माळ अन एक दोन सोन्याची नाणी दिसली. रामूच्या डोक्यात काहीतरी वेगळे पाहिल्याचा विचार आला. 

'लांबून पाहतांना मला साधूमहाराज धावपळ करत त्यांचे बोचके या झाडाकडूनच घेवून जातांना दिसले होते. एक तर ते मला या झाडावर चढूच नको असे सांगत होते. दुसरे म्हणजे जादूचा रुमाल देतो असे सांगून माझी फसवणूकही केली. तिसरे म्हणजे मला पुन्हा हेच झाड दाखवून फांद्या तोडायलाही मनाई केली नाही. नक्कीच साधूमहाराज खोटे वागत आहेत.'    
       
साधूमहाराजांविषयी रामूला शंका आली परंतु ती व्यक्त केली नाही. आपण काही वावगे पाहीले हे त्याने भासवले नाही. न बोलता त्याने खाली पडलेल्या फांद्यांची मोळी बनवली अन साधूबाबांचा निरोप घेवून तेथून तो गावात परतला. 

साधूविषयी कुणाला सांगावे की नको या द्विधा मनस्थितीत त्याने दुपार काढली. जेवतांना शिदोरीतली भाकरीदेखील गोड लागली नाही. संध्याकाळ झाली अन तो पुन्हा एकदा त्या झाडाजवळ जाण्यास तो निघाला. पूर्ण खात्री झाली की मगच साधूविषयी इतरांना सांगावे असा विचार त्याने केला. अंधारात तो त्या जागेपासून दुर एका उंचवट्यावर लपून बसला. तेथून त्याला ते झाड अन आजूबाजूची जागा चांगली दिसत होती. 

रात्र जशी चढली तसे चांदण्याच्या प्रकाशात त्या जागी त्याला मशालींच्या उजेडात चार व्यक्ती येतांना दिसल्या. त्या चारही व्यक्तींनी डोईवरच्या फेट्याच्या सोग्याने तोंड झाकलेले होते. सकाळचा साधूही त्यात होताच. आल्यानंतर त्यातील एकाने समोरील झाडावर लपवलेल्या तलवारी काढल्या आणि आपसात वाटल्या. मशालींच्या उजेडात तळपत्या तलवारी चकाकत होत्या. नक्कीच चोरी-दरोड्याच्या उद्देशाने ते एकत्र आले होते. 

'अरे बापरे! सकाळचा साधू म्हणजे अट्टल दरोडेखोर आहे तर! मला आता सावधगिरी बाळगली पाहीजे. या दरोडेखोरांना अद्दल घडवलीच पाहीजे. मला झाड तोडू नको असे सांगतो अन स्वत: त्याच झाडावर चोरीचा माल अन शस्त्रे लपवतो काय! थांबा! तुम्हाला तुमच्या चोरीची शिक्षा कशी मिळेल तेच बघतो.'

रामूने गावातल्या राजाच्या अंमलदाराला ही हकीकत सांगण्याचा विचार केला. सावकाश, लपतछपत रामू कसलीही घाई न करता गावात परतला. दिवसभराचे श्रम, मनातले विचार अन दोन वेळा जंगलात जाण्यामुळे खरे तर रामू दमला होता. रात्रीच्या जेवणाचाही विचार न करता रामू गावातल्या अंमलदाराच्या घरी तडक पोहोचला. अंमलदार जेवण करून आराम करत होते. रामूने त्यांना भेटून सकाळपासून आतापर्यंत जे जे घडले ते ते कथन केले. एका मुलावर विश्वास कसा ठेवायचा असा अंमलदारांच्या मनात विचार आला परंतु गेल्या महिन्यापासून दर दोन एक दिवसात आसपास चोरीची घटना घडल्याची वर्दी त्यांच्यापर्यंत येतच होती. रामूच्या माहितीची झाली तर त्यांना मदतच होणार होती.
 
अंमलदारांनी तातडीने हालचाल केली आणि आपल्या शिपायाला हवालदार तसेच सात आठ सैनीकांना बोलावणे धाडले. दरम्यान त्यांनी रामूच्या प्रकृतीची अन जेवणाची चौकशी केली. रामूने जेवण न केल्याचे समजताच त्यांनी त्याला घरात जेवायला बसवले. 

हवालदार, सैनीक आल्यानंतर स्वत: अंमलदार आणि रामू अशी फौज जंगलाच्या दिशेने त्वरीत निघाली. रामूने ज्या ठिकाणापासून साधूची वर्दळ पाहिली तेथपर्यंत ते आले. अजूनही मशालींचा उजेड तेथे होताच. म्हणजेच ते चारही दरोडेखोर तेथे होते. हवालदारांच्या इशार्‍यानिशी दबक्या पावलांनी सैनीकांनी तेथील झाडांभोवती वेढा टाकला. दरोडेखोरांनी त्यांना पाहून पळण्याचा प्रयत्न केला परंतु सैनीकांनी चपळाई करून चारही जणांना पकडले. झाडावर लपवलेले दागीन्यांचे गाठोडे सैनीकांनी हस्तगत केले व चारही जणांना बांधून गावात आणले.

रामूच्या हुशारीने अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला पकडण्यात अंमलदारांना यश मिळाले होते. रामूचे वय, हुशारी अन त्याच्या एकटेपणाची परिस्थिती पाहून अंमलदारांनी रामूच्या शिक्षणाची सोय राजाकडे केली अन मोठा झाल्यानंतर राजदरबारात नोकरी लावून देण्याचे त्याला आश्वासन दिले. 

Monday, November 25, 2019

यशाचे आता गा मंगल गान

यशाचे आता गा मंगल गान

विजय मिळाला, आनंद झाला,
यशाचे आता गा मंगल गान
बिगूल वाजला, रणभेरी वाजल्या,
समरगीत गावूनी घ्या तानेवरती तान     ||धृ||

बलाढ्य असा तो शत्रू होता,
तोफा बंदूका शस्त्रसज्जता
फंद फितूरी किती करविली,
अंती आपणच ठरलो विजेता
विजयाचे गीत म्हणा आता, अन नर्तन करा बेभान ||१||

युद्धखोरपणा उगा नका दाखवू,
शत्रृ रणांगणी पाहून घेवू
युद्धभुमी प्रिय आम्हा वीरांस,
लढता लढता मरण पत्करू
शरणागती नसे कदापी,  ध्वजासवे उंच करू आमची मान ||२||

- पाषाणभेद
२५/११/२०१९

Tuesday, November 12, 2019

देशभक्ति समुहगीत: भारतभूचे सुपुत्र आम्ही

देशभक्ति समुहगीत: भारतभूचे सुपुत्र आम्ही

भारतभूचे सुपुत्र आम्ही तिचीच आम्ही पूजा करू
अन तिचेच गावू गान
वंदन करुनी भारतभूला त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम || धृ||

देशासाठी कितीक झटले
कितीक हुतात्मे अमर जाहले
स्मृती तयांची आज येतसे
स्वात्रंत्र्यासाठी लढले अन तयांनी त्यागले प्राण
त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||१||

हातामध्ये घेवूनी तिरंगी झेंडा
गर्जले सैनीक पुढे चला लढा
शस्त्रे चालवूनी शत्रू मारीले
ध्वज फडकवती अन त्यापुढती तुकवती मान
त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||२||

भारतभूचे सुपुत्र आम्ही तिचीच आम्ही पूजा करू
अन तिचेच गावू गान
वंदन करुनी भारतभूला त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||धृ||

- पाषाणभेद
१२/११/२०१९

Saturday, November 2, 2019

आमचं ठरलयं, संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय

आमचं ठरलयं, संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय


चल उठ मराठी गड्या पुन्हा एकदा लढ लढा
बोल की आता आमचं ठरलयं
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||धृ||

नको कानडी सोन्याचा घास
लावील तो आम्हाला फास
किती मार आता सहन करायचा?
मुकाट अन्याय किती सोसायचा?
सरकारनं अपमानाचं जीणं केलंय
म्हणूनचं आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||१||

आमचंच आहे कारवार निपाणी
बिदर खानापूर भालकी
कोणाची टाप नाय म्हणण्याची
बेळगावसगट हे पण घेवूच की
सहीशिक्कामोर्तब आम्ही केलंय
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||२||

आमच्या आजानं खाल्ली काठी
आमच्या बापानं खाल्ली लाठी
नाही घाबरत आम्ही त्याला
जरी पडली ती आमच्या पाठी
तिन पिढ्यांनी संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पाहिलंय
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||३||

कानडी गड्या घे आता ऐकून
सीमाभाग हा माझाच सांगतो ठासून
शस्त्राविना हि लढाई मी लढणार
मराठीभाषीक शेवटी एक होणार
जय महाराष्ट्र कधी बोलतोय असं मला झालंय
आमचं ठरलयं अन
संयुक्त महाराष्ट्रात बेळगाव उरलंय ||४||

- पाषाणभेद
एक नोव्हेंबर (सीमाभागासाठीचा काळा दिवस) २०१९ 

Friday, April 5, 2019

पोवाडा केदारनानांचा

पोवाडा केदारनानांचा


(प्रस्तूत पोवाडा खाजगी असून त्याचा कुणाही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसेच सोशल मेडीयावर तेथे नावे आलेल्या व्यक्ती असतीलच असे नाही. तसेच हा पोवाडा सोशल मेडीयावरील, तसेच प्रत्यक्षात अस्तित्वात असणार्‍या कुणाही व्यक्ती, समूह तसेच गटावर आधारीत नाही. केदार नाना ही काल्पनीक नाव असलेली व्यक्ती आहे. वरद कुलकर्णी ०७ या आयडी ने एक गीत लिहीण्यास आम्हास सांगीतले असता हा पोवाडा पुर्ण केला असे. यात उल्लेख आलेल्या कुणाही व्यक्तीची अन पाषाणभेद यांची भेट झालेली नाही.

शुद्धलेखन तपासले नाही त्याबद्दल क्षमस्व. वाचकांनी दुरूस्त्या सुचवाव्यात. तसेच वेळ कमी असल्याने अन आज रात्री शिप्ट १२ ला संपत आली असल्याने एकटाकी लिहीले आणि परिक्षण करण्यास वाव किंवा वेळ भेटला नाही, पुन्हा क्षमस्व.)
================================
पोवाडा केदारनानांचा


घेवूनी की-बोर्ड हाताला
पहिले स्मरून मिसळपाव.कॉमला
नंतर स्मरून सोशल मेडीयाला
फेसबुक इन्स्टाग्राम ट्विटर लिंक्डईनला
तसेच आठवून टेलीग्रामला आठवू व्हाट्सअ‍ॅपला
शाहीर पाषाणभेद करतो पोवाड्याला
जी जी जी जी जी जी...

२०१९ च्या सालाला
मार्च महिन्याच्या तिसर्‍या आठवड्याला
२१ तारीख फाल्गुन मासाच्या पौर्णिमेला
अशा या शुभ मुहूर्ताला
कोल्हापूरचे केदार नाना निघाले ममुलूखगीरीला
शाहीर गातो कवन पोवाड्याला
जी जी जी जी जी जी...

शिवछत्रपतींच्या सैन्यात अनेक गुप्तहेर होते. त्या गुप्तहेर खात्याचे प्रमूख होते बहिर्जी नाईक.

(चाल बदलूनः)
राजा शिवछत्रपती असे थोर
तयांकडे होता एक गुप्तहेर
नाव तयाचे हो बहिर्जी नाईक
वेशभुषा बदलण्याचा पाईक
न ओळखू येण्याचा हातखंडा
स्वराज्यात गाजवला त्यांनी झेंडा
जी जी जी जी जी जी...

तर असे हे बहिर्जी नाईक. शत्रूच्या गोटात ते वेषभुषा बदलवून सहज मिळून मिसळून मिसळून जात अन आपली कामगीरी फत्ते करत.

(चाल बदलून:)
अश्या या बहिर्जी नाईकांचे
होते वंशज कोल्हापूरचे
केदारनाना नाव तयांना साचे
मोठे रुपगूणसंपन्न व्यक्तिमत्व
त्यांना न पाहिले कुणी 
काढीला न फोटो कुणी 
न भेटले कुणी परी दावीती ते अस्तित्व

(चाल बदलून:)
सोशल मेडीया साईट्सवर ते असती
व्हाटस अप टेलीग्राम ते हाताळती
अ‍ॅडमीन पदी ते काम करती
कित्येक गृप ते चालवीती
भविष्याप्रती त्यांची प्रिती
पण कुणालाच न ते भेटती
जी जी जी जी जी जी...

हे केदार नाना या भुतलावर अस्तित्वात असून देखील कुणालाच भेटले किंवा दिसले नव्हते.

व्हाटसअप वर कित्येकांनी पाठपुरावा केला 
कित्येकांनी लावले फोन केदारनानांना बोलाया
परी उत्तर न देती केदारनाना तयांना
केवळ लिखीत संदेश धाडूनी 
सांगती मीच तो केदार नाना सगळ्यांना
जी जी जी जी जी जी...

(चाल बदलूनः)
होता होता किर्ती तयांची पसरली....
होता होता किर्ती तयांची पसरली.
सर्व दिशांना ती गेली
सार्‍या मुलखाला गुप्त बातमी समजली
अवघ्या महाराष्ट्री गहजब जहाला  
पश्चिम महाराष्ट्र चालूनी गेला
उत्तर महाराष्ट्र हादरला
जेव्हा केदारनानांनी नाशिक शहरावर मोहीमेचा बार उडवला 
जी जी जी जी जी जी...

तर मंडळी, केदार नानांनी आपली गुप्त मोहीम नाशिक शहरावर स्वारी करण्याची आखली. पण कानोकान खबर फुटली अन ती बातमी सार्‍या महाराष्ट्राला समजली. जनतेत खळबळ माजली. आता या मोहीमेत कुणाची फत्ते होते याची उत्सूकता त्यांना लागली. कारण शत्रू कोण याची कुणालाच खात्री देता येत नव्हती. जो तो आपणच केदारनानांचे शत्रू असू अशी भिती बाळगून होते.

(चाल बदलून: )
ऐका ऐका श्रोते तुम्ही सज्जन
बसा सत्वरी कान देवून
शाहीर पाषाणभेदाचे कवन
श्रवण करा मन प्रसन्न ठेवून
केदारनानांचा पराक्रम
पुढल्या पिढीसाठी लक्षात ठेवा सारे जण
जी जी जी जी जी जी...

२०१९ च्या सालातली
मार्च महिन्यातली
तिसर्‍या आठवड्यातली
२१ तारीख फाल्गुन मासातली
नानांनी हाती धरली
मोहीम सुरू केली
नाशकावर स्वारी केली 
मजल दलमजल करूनी
निघाले कोल्हापूरवरूनी
वेषभुषा बदलूनी
न ओळखू ये ते जनतेला
असा हा खंदा नाना लाभला महाराष्ट्राला
जी जी जी जी जी जी...

या मोहीमेचे सारस्थ्य स्वतः केदार नाना वेष बदलून करत होते. कधी सेल्समनच्या वेषात, कधी बिजनेसमन तर कधी उसउत्पादक शेतकरी अशा या बदलत्या वेषात ते नाशिक नगरीकडे आगेकूच करत होते.

कोल्हापूरहून नाना निघाले
नाना आले कराडला
कराडहून नाना निघाले 
नाना आले सातार्‍याला
सातार्‍याहून नाना निघाले
नाना आले पुण्याला

दलमजल करत, एक एक गावाचे सोशल मेडीयावरील तरूण, जीओ नेटवर्कवरील मावळे, नोकर्‍या शोधाणारे बेरोजगार यांना नाना हे आपल्या निरनिराळ्या व्हाटस अप गृपमध्ये घेवून मांडलीक बनवत निघाले होते. केदार नानांची गृप बनवण्याची भूक आता बकासूराप्रमाणे वाढली होती. नाशिकमधल्या मोहीमेमध्ये जो जो येईल त्याला आपल्या गृपमध्ये नाना घेत निघाले.

नानांचे गृप ते कितीक
मिळून मिसळून हा एक
तंत्रजगत हा एक
विनोद विज्ञानातले असे एक
अजून असतील कितीक
न माहीत कित्येक जणांस
टेलीग्रामवर तर गृप अगणीत
जी जी जी जी जी जी...

नानांच्या सैन्यातील टोळ्यांमधल्या सरदारांची नावे तर चकीत करणारी होती. त्यांची जंत्री तर पहा:

एक होते अबीर कुलकर्णी
दुसरे नादखुळा कुलकर्णी
ईश्वरदार आणीक होते 
आणीक खेडूत होते
अरिंजय होते चंदात्रे 
मंचरचे होते डॉ. दाते
पाषाणभेद त्यात होता
त्यात शंकासूरही होता
होता तयांच्या सैन्यामध्ये गामा पैलवान
तसाच होता युएईचा होता कुंदन
जीर हा जी र हा जी जी जी जी जी

लई भारी होता पुण्याचा
बाबा हर्षल होता मुंबईचा
सानपाड्याचे वाघेकाका
अन दुर्गविहारी कराडचा
कुलदादा आले होते नागपूरवरून
तयांना मिळाले गॅरी ट्रूमन
गोविंद पाटील होते एक फोटोवाले
श्रीगुरूजी अन आप्पा पुण्याहून आले 
जीर हा जी र हा जी जी जी जी जी

तर मंडळी अशी अनेक ज्ञात अज्ञात मंडली केदार नानांना मिळत होती. या सर्वांची व्यवस्था केदारनाना जातीने पाहत असत. सैन्यात त्यांची शिस्त होती. कुणीही अवांतर बोललेले, लिहीलेले त्यांना चालत नसे. म्हणून केदारनानांनी त्यांचे नाव "उपयोजक" असे करवून घेतले. त्यासाठी श्रीगुरूजी यांना उपाख्य करवून त्यांचेकडून पुजा करवून घेतली.

पुण्यापुढे मंचरला केदारनानांनी वेश बदलला
डॉ. दातेंना समोर त्यांनी काळा बुरखा घातला
डॉ. दातेंनी मग त्या बुरख्याला भोक पाडले
अन त्या भोकातूनी नानांना निरा पेय पाजले
जीर हा जी र हा जी जी जी जी जी

का असे डॉक्टरांनी केले कुणा नच ठावे
केदारनानांनीही मग ते कुणास का सांगावे?
जीर हा जी र हा जी जी जी जी जी

संगमनेर सिन्नर करून नाना पोहोचले नाशिक मध्ये
नाशिकमध्ये येवूनी ते फिरती गल्ल्यांमध्ये
वाडे पाहती पाट्या पाहती पाहती गोदावरीला
फोटो काढती मंदीरांचे अन वाजवीती घंटांना
असे हे नाना का आले नाशिकला कुणा नच ठावे
परी आम्हास कळले की ते वधू परिक्षेला आले
जीर हा जी र हा जी जी जी जी जी

(चाल बदलूनः)
असे हे केदार नाना
आ आ आ आ आ आ आ आआआ.......
असे हे केदार नाना
आता तुम्हीच पहाना
निघाले कोल्हापुरवरूनी
न दिसता कुणा
गेले नाशकात वधू परूक्षूनी 
जीर हा जी र हा जी जी जी जी जी

विरांचा पोवाडा
विरांनी लिहावा
विरांनी बोलावा
विरांनी ऐकावा
विरांनी मनात साठवावा
अन पुढच्या विरांना ऐकवावा

असा हा पोवाडा केदारनाना या विराचा
रात्रीचे समयी बारा वाजतांना
एप्रिल मासाच्या चार तारखेला
२०१९ सालाला
नाशिक मुक्कामाला
शाहीर पाषाणभेद पुर्ण करी पोवाड्याला
जीर हा जी र हा जी जी जी जी जी

जयस्तू ||

- शाहीर पाषाणभेद
०४/०४/२०१९

Friday, October 13, 2017

जय महाराष्ट्र बोला

जय महाराष्ट्र बोला
अरे बोला बोला जय महाराष्ट्र बोला
कुणाच्या बापाची भीती नाय
बोला दणकूण बोला
तुम्ही जय महाराष्ट्र बोला
अरे बोला बोला जय महाराष्ट्र तुम्ही बोला
आता नाही तर कधीच नाही हे ठेवा ध्यानी
सीमाभाग आमच्यात घेवू लक्षात घ्या तुम्ही
उगा पिरपिर करू नका नाहीतर
एकच ठेवून देवू टोला
बोला बोला जय महाराष्ट्र बोला
बापजादे खपले आमचे सीमालढा देवून
लाठ्या काठ्या खाल्या लई हाल सोसून
खोटे गुन्हे नका दाखल करू
कन्नडीगांनो, झाले मराठी आता गोळा
बोला बोला जय महाराष्ट्र बोला
मराठी शाळा तुम्ही संपवल्या की हो
कानडीची सक्ती तुम्ही राबवली हो
सोईचे नियम केले हो केले
दमनशास्त्र तुम्ही राबवले हो राबवले
खेळी केली अन गावं खिशात घातले
एक पिढीच संपवली बंद करूनी मराठी शाळा
आतातरी बोला बोला जय महाराष्ट्र बोला
बेळगाव कारवार भालकी बीदर
आळंगा हल्याळ निपाणी घातले घशात
आतल्या गाठीचे तुम्ही
खोटे आयोग लावले कितीक वेळा
म्हणून बोला बोला जय महाराष्ट्र बोला
मागच्या पिढ्या संपवल्या मुस्कटदाबी करून
बळजबरी केली कानडीची मार मारून
सांगा कितीदा सोसायच्या मराठीसाठी कळा
म्हणून बोला बोला जय महाराष्ट्र बोला
नका आता भाषेचे राजकारण करू
नका आणखी सीमाभागाचे लचके तोडू
मराठीला नका लागू देवू कानडी सक्तीच्या झळा
बोला बोला जय महाराष्ट्र बोला
- पाषाणभेद

Monday, October 15, 2012

ह्या कन्नडीगांना आलाय माज

ह्या कन्नडीगांना आलाय माज

ह्या कन्नडीगांना आलाय माज
तो माज आता काढू मोडून
अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ||

लई तुरूंगवास करवला रे तुम्ही
काय सहन नाही केलं आम्ही
मराठीसाठी किती रक्त वाहवलं
ह्या कन्नडीगांना आम्हां डिवचलं
लई झालं आता
उठला मराठी माणूस पेटून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||१||

अरे गल्या-बोळांना नावं आमची
सार्‍या दुकानांना नावं आमची
सार्‍या शाळा रे आमच्या आमच्या
सारी आडनावं आमची आमची
बेळगाव महानगरपालीका आमची
एका ठरावानं होईल का तुमची?
आता चाला तोडू कर्नाटक विधान भवन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||२||

आहे जसं कन्नडी शासन मुजोर
त्याला सामील केंद्रशासन कमजोर
खेळी दोघांनी केली विधानभवनाची
साक्ष आहे जशी उंदराला मांजराची
बास झालं लई झालं
बंद करा तुमचं दडपशाहीचं संमेलन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||३||

या सीमेपाई एक पिढी गेली की रं आमची
ही सारी जमीन आमच्या बापजाद्याची
जमवून सारी फौज मराठी माणसाची
ईच्छा पुरी करू महाराष्ट्री जाण्याची
सांगून ठेवतो मुस्कटदाबी करू नका
उगा आमच्यावर वार करू नका
महाराष्ट्रात जाण्यासाठी
आमची तर फोडूच पण तुमचीबी डोकी फोडू
सांगून ठेवतो मिशीला पिळ देवून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||४||

-(अपुर्ण - योग आलाच तर पुर्ण करेन)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण सार्‍या 'ऑनलाईन मराठी कम्युनिटीजनी' मुजोर कर्नाटक, मरगळलेले मराठी नेते अन नाकर्ते केंद्रशासन यांचा ऑनलाईन निषेध करायला हवा.

- आंतरजालावर आधीच पुर्वप्रकाशीत

-पाषाणभेद

Monday, January 2, 2012

लष्करी हुकूम अर्थात आर्मी कमांड्स

आर्मी कमांड्स

(एनसीसी त असतांना या कमांड्स ऐकायची सवय होती. आता सहज आठवल्या. गेयता येण्यासाठी काही शब्द अ‍ॅडावलेले आहेत. या हुकूमांना कोठेतरी लय असते म्हणून काव्यविभाग निवडला आहे. रोष नसावा. )

परेडss सावधानss
शत्रूला पळून जावू द्यायचं नाय

परेडss विश्रामs
शत्रूकडे लक्ष ठेवण्याचं करा काम

हिलो मत मतलब हिलो मत
एकदम ताठ उभे रहा सख्त

परेडss लाईन बनs
नाहीतर देईन दणादण

परेडss तेज चलs
हात हलवत पाऊल उचल

परेडss आराम से चल
गडबड गोंधळ कर कम

हरकत नही....हरकत नही
बुटात बोटे हलवायचे नाही

परेडsss दहिने / बायें/ पिछे मुड
व्हेरी गुड व्हेरी गुड

परेडsss दहिने / बायें/ सामने देख
तेज नजर फेक

परेडss कदम ताल
एक सुर में पैर लगाव

परेडss सलामी शस्त्र
रायफल सिधी पकड

परेडss बगल शस्त्र
ट्रीगर गार्ड मधे उंगली दबोच

परेडss परेड थाम
सांगतो ते ऐकायचे करा काम

परेडss लाईन तोड
जवान आपापल्या जागा सोड

Monday, September 5, 2011

देशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा

देशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा

तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू ||धृ||

कित्येक लढले याच्यासाठी
कितीकांनी दिधले प्राण
याच्याचसाठी कितीकांनी
फासात घातली मान
देवासमान हा आम्हास
त्याचा मान आम्ही राखू ||१||

क्रांतीकारी अन समाजसेवक
हाती घेवून जातसे चालत
शत्रूच्याही उरात बसती
उंच पाहून याला धडकी
न राहू मागे आपण
चला बळ तिरंग्याचे आपण दावू ||२||

युद्ध जरी हो आज नसले
भय देशावरी रोजच कसले
दहशत घालती दहशतवादी
फुकाची करती वादावादी
झाला तिरंगा निमीत्त केवळ
वाद सारे आता बाजू सारून देवू ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१५/०६/२०११

Friday, September 2, 2011

पोवाडा मराठी भाषेचा

पोवाडा मराठी भाषेचा

मराठी भाषा असे धन्य धन्य
बोलती जयांचे भाळी असे पुण्य
कानी पडती असे हे बोल
तो महाराष्ट्र प्रांत असे थोर जी जी जी जी

जगामध्ये भारत देश महान
अनेक भाषांची असे तो खाण
कितीक बोलींना तेथे मान
त्यात मराठी असे वरताण जी जी जी जी

अशा या भारत देशातल्या महाराष्ट्र प्रांती मराठी भाषा बोलली जाते.

अहो ही भाषा असे कुणाकुणाची?

ही भाषा कुणाची म्हणून काय प्रश्न विचारता? ऐका तर मग...

ही भाषा असे कुणाकुणाची?
अहो ही भाषा असे कुणाकुणाची?

अहो ही भाषा असे चक्रधरांची
ही भाषा असे झानदेवांची
ही भाषा असे तुकोबांची
नामदेव, सोपान, मुक्ताबाईची
गोरा कुंभार, सेना न्हावी, नरहरी सोनाराची
हि भाषा असे रामदासांची
ही भाषा असे जीजाउंची
ही भाषा असे दादोजी कोंडदेवांची
हि भाषा असे मर्द मावळ्यांची
हि भाषा असे शुर शिवाजी राजांची
ही भाषा असे बेधडक मुरारबाजीची
ही भाषा असे विर तानाजीची, बाजीप्रभुंची
ही भाषा असे कान्होजी आंग्र्यांची
ही भाषा असे पेशव्यांची
ही भाषा असे विश्वासरावांची
हि भाषा असे आहिल्यादेवींची
ही भाषा असे शाहुमहाराजांची
ही भाषा असे टिळकांची
ही भाषा असे सावरकरांची
ही भाषा असे फुले, आंबेडकरांची
हि भाषा असे बाळासाहेबांची
हि भाषा असे राजठाकरेंची
हि भाषा असे तळागाळातल्या लोकांची
सह्याद्रीच्या मुलांची
सागराच्या लेकरांची
विदर्भातल्या लेकीसुनांची
मराठवाड्यातल्या पोरांची
खानदेशातल्या वडिलधार्‍यांची
हि भाषा असे सगळ्या मराठी प्रेमींची

अशी ही भाषा कित्येक मर्दांची
ज्यांनी तळी उचलली मराठीची जी जी जी

लेखक, कवी, खेळाडू, साहित्यीक,
नाटककार, संगीतकार, गायक,
डॉक्टर, वकिल, कामगार, संशोधक,
राजकारणी, शिक्षक, प्राध्यापक, व्यापारी,
रणरागिणी, महिला, लढवय्या, सैनिक, अन शेतकरी,
किती येथील महान व्यक्ती, असली नावे तरी घ्यावी किती!

कवी कुसूमाग्रज, आचार्य अत्रे, पुल देशपांडे, विभावरी शिरूरकर, हमिद दलवाई, आण्णा भाऊ साठे, शाहिर अमर शेख, बा भ बोरकर, यु म पठाण, सरोजीनी बाबर, विद्या बाळ, चिं त्र खानोलकर, जी ए कुलकर्णी, भा रा तांबे, गोविंद बल्लाळ देवल, लक्ष्मण गायकवाड, लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, सचिन तेंडूलकर, लक्ष्मण माने, दादासाहेब फाळके, प्रतिभाताई पाटिल, तुकडोजी महाराज, साने गुरूजी, गाडगे महाराज, गोंदवले महाराज, संत चोखामेळा, फा. फ्रान्सिस दिब्रिटो, यशवंतराव चव्हाण, प्रमोद महाजन, राजा ढाले, दत्ता सामंत, उद्धव ठाकरे, वसंतदादा पाटिल, शरद पवार, चिंतामणराव देशमुख, गोळवलकर गुरूजी, नामदेव ढसाळ, आण्णा हजारे, शांताबाई कांबळे, बाबा आमटे, डॉ. अभय बंग, राणी बंग, नरेंद्र दाभोळकर, विनोबा भावे, श्रीपाद डांगे, रामदास आठवले, पंडीता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, भिमसेन जोशी, धोंडो केशव कर्वे, पांडूरंग शात्री आठवले, डॉ. विजय भाटकर, अनिल काकोडकर, डॉ. नारळीकर, डॉ. गोवारीकर, कृष्णा कांबळे, डॉ. श्रीराम लागू, दादा कोंडके, अमोल पालेकर, नाना पाटेकर, माधुरी दिक्षीत, रजनीकांत, सचिन, महेश कोठारे, अशोक सराफ, सुलोचना, अरूण दाते, अजीत कडकडे, सुरेश भट, अनुराधा पौडवाल, बाबूराव बागुल, अवधुत गुप्ते, अजय अतूल, वैशाली सामंत, सुरेखा पुणेकर, दिलीप सरदेसाई, वेंगसरकर, अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, गंगाधर पानतावणे, भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, बा सी मर्ढेकर, बालकवी, गुरू ठाकुर......
कितीतरी नावे घेतली तर त्यास दिवसही पुरायचा नाही*. या दैधिप्यमान रत्नांनी मराठी भाषेचे वैभव वाढवले आहे.

सारे जण महाराष्ट्री जन्मती
अन सारे जण मराठी बोलती
किती वाटे अभिमान, किती वाढतो आमचा मान
भारत देशाचा वाढविती शान
असे मराठी नरनारी आहे जगती जी जी जी

१९१२, फेब्रूवारी २७,
जन्मले कवी कुसुमाग्रज
साजरा करती हाच मराठी भाषा दिवस
करा प्रतिज्ञा याच दिनी
मराठीच बोलायाचे ठेवा ध्यानी
मागे नाही कधी हटायाचे
सारे काही मराठीसाठी करायचे जी जी जी

खानदेशी, माणदेशी
आहिराणी, कोकणी
वर्‍हाडी, मालवणी
या सार्‍या बोलीभाषा
बहिणी बहिणी
सार्‍यांमुखी नांदती
सुखाने संसार करती
वंश त्यांचा बहरत राहे भुवरी जी जी जी

कित्येक पुस्तके मराठीत प्रकाशीत होती
कित्येक वर्तमानपत्रे मराठीत वाचली जाती
आंतरजालावरही मराठीचा झेंडा फडकतो जोरदार
रोजरोज नवे लेख येती, धुमाकुळ घालती फार जी जी जी

मराठी भाषा असे जगन्मान्य
तिच्या पोटी जन्मलो हेच आमचे पुण्य
तिच्या बोलण्याने हारले सारे दैन्य
त्या मराठीस त्रिवार मुजरा करून
मराठी भाषिकांना
शाहिर सचिन करतो प्रणाम जी जी जी

* वरती काही मान्यवर मराठी भाषिकांची नावे आली आहेत. त्या व्यतिरिक्तही अनेक महनिय व्यक्ती मराठी भाषिक आहेत. त्यांचीही नावे मराठीच्या इतिहासात आदराने घेतली जातात

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०२/२०११

Monday, February 28, 2011

पोवाडा मराठी भाषेचा


पोवाडा मराठी भाषेचा


मराठी भाषा असे धन्य धन्य
बोलती जयांचे भाळी असे पुण्य
कानी पडती असे हे बोल
तो महाराष्ट्र प्रांत असे थोर जी जी जी जी

जगामध्ये भारत देश महान
अनेक भाषांची असे तो खाण
कितीक बोलींना तेथे मान
त्यात मराठी असे वरताण जी जी जी जी

अशा या भारत देशातल्या महाराष्ट्र प्रांती मराठी भाषा बोलली जाते.

अहो ही भाषा असे कुणाकुणाची?

ही भाषा कुणाची म्हणून काय प्रश्न विचारता? ऐका तर मग...

ही भाषा असे कुणाकुणाची?
अहो ही भाषा असे कुणाकुणाची?

अहो ही भाषा असे चक्रधरांची
ही भाषा असे झानदेवांची
ही भाषा असे तुकोबांची
नामदेव, सोपान, मुक्ताबाईची
गोरा कुंभार, सेना न्हावी, नरहरी सोनाराची
हि भाषा असे रामदासांची
ही भाषा असे जीजाउंची
ही भाषा असे दादोजी कोंडदेवांची
हि भाषा असे मर्द मावळ्यांची
हि भाषा असे शुर शिवाजी राजांची
ही भाषा असे बेधडक मुरारबाजीची
ही भाषा असे विर तानाजीची, बाजीप्रभुंची
ही भाषा असे कान्होजी आंग्र्यांची
ही भाषा असे पेशव्यांची
ही भाषा असे विश्वासरावांची
हि भाषा असे आहिल्यादेवींची
ही भाषा असे शाहुमहाराजांची
ही भाषा असे टिळकांची
ही भाषा असे सावरकरांची
ही भाषा असे फुले, आंबेडकरांची
हि भाषा असे बाळासाहेबांची
हि भाषा असे राजठाकरेंची
हि भाषा असे तळागाळातल्या लोकांची
सह्याद्रीच्या मुलांची
सागराच्या लेकरांची
विदर्भातल्या लेकीसुनांची
मराठवाड्यातल्या पोरांची
खानदेशातल्या वडिलधार्‍यांची
हि भाषा असे सगळ्या मराठी प्रेमींची

अशी ही भाषा कित्येक मर्दांची
ज्यांनी तळी उचलली मराठीची जी जी जी

लेखक, कवी, खेळाडू, साहित्यीक,
नाटककार, संगीतकार, गायक,
डॉक्टर, वकिल, कामगार, संशोधक,
राजकारणी, शिक्षक, प्राध्यापक, व्यापारी,
रणरागिणी, महिला, लढवय्या, सैनिक, अन शेतकरी,
किती येथील महान व्यक्ती, असली नावे तरी घ्यावी किती!

कवी कुसूमाग्रज, आचार्य अत्रे, पुल देशपांडे, विभावरी शिरूरकर, हमिद दलवाई, आण्णा भाऊ साठे, शाहिर अमर शेख,  बा भ बोरकर, यु म पठाण, सरोजीनी बाबर, विद्या बाळ, चिं त्र खानोलकर, जी ए कुलकर्णी, भा रा तांबे, गोविंद बल्लाळ देवल, लक्ष्मण गायकवाड, लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, सचिन तेंडूलकर, लक्ष्मण माने, दादासाहेब फाळके, प्रतिभाताई पाटिल, तुकडोजी महाराज, साने गुरूजी, गाडगे महाराज, गोंदवले महाराज, संत चोखामेळा, फा. फ्रान्सिस दिब्रिटो, यशवंतराव चव्हाण, प्रमोद महाजन, राजा ढाले,  दत्ता सामंत, उद्धव ठाकरे, वसंतदादा पाटिल, शरद पवार, चिंतामणराव देशमुख, गोळवलकर गुरूजी, नामदेव ढसाळ, आण्णा हजारे, शांताबाई कांबळे, बाबा आमटे, डॉ. अभय बंग, राणी बंग, नरेंद्र दाभोळकर, विनोबा भावे, श्रीपाद डांगे, रामदास आठवले, पंडीता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, भिमसेन जोशी, धोंडो केशव कर्वे, पांडूरंग शात्री आठवले, डॉ. विजय भाटकर, अनिल काकोडकर, डॉ. नारळीकर, डॉ. गोवारीकर, कृष्णा कांबळे,  डॉ. श्रीराम लागू, दादा कोंडके, अमोल पालेकर, नाना पाटेकर, माधुरी दिक्षीत, रजनीकांत, सचिन, महेश कोठारे, अशोक सराफ, सुलोचना, अरूण दाते, अजीत कडकडे, सुरेश भट, अनुराधा पौडवाल, बाबूराव बागुल, अवधुत गुप्ते, अजय अतूल, वैशाली सामंत, सुरेखा पुणेकर, दिलीप सरदेसाई, वेंगसरकर, अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, गंगाधर पानतावणे, भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, बा सी मर्ढेकर, बालकवी, गुरू ठाकुर......
कितीतरी नावे घेतली तर त्यास दिवसही पुरायचा नाही*. या दैधिप्यमान रत्नांनी मराठी भाषेचे वैभव वाढवले आहे.

सारे जण महाराष्ट्री जन्मती
अन सारे जण मराठी बोलती
किती वाटे अभिमान, किती वाढतो आमचा मान
भारत देशाचा वाढविती शान
असे मराठी नरनारी आहे जगती जी जी जी

१९१२, फेब्रूवारी २७,
जन्मले कवी कुसुमाग्रज
साजरा करती हाच मराठी भाषा दिवस
करा प्रतिज्ञा याच दिनी
मराठीच बोलायाचे ठेवा ध्यानी
मागे नाही कधी हटायाचे
सारे काही मराठीसाठी करायचे जी जी जी

खानदेशी, माणदेशी
आहिराणी, कोकणी
वर्‍हाडी, मालवणी
या सार्‍या बोलीभाषा
बहिणी बहिणी
सार्‍यांमुखी नांदती
सुखाने संसार करती
वंश त्यांचा बहरत राहे भुवरी जी जी जी

कित्येक पुस्तके मराठीत प्रकाशीत होती
कित्येक वर्तमानपत्रे मराठीत वाचली जाती
आंतरजालावरही मराठीचा झेंडा फडकतो जोरदार
रोजरोज नवे लेख येती, धुमाकुळ घालती फार जी जी जी

मराठी भाषा असे जगन्मान्य
तिच्या पोटी जन्मलो हेच आमचे पुण्य
तिच्या बोलण्याने हारले सारे दैन्य
त्या मराठीस त्रिवार मुजरा करून
मराठी भाषिकांना
शाहिर सचिन करतो प्रणाम जी जी जी

* वरती काही मान्यवर मराठी भाषिकांची नावे आली आहेत. त्या व्यतिरिक्तही अनेक महनिय व्यक्ती मराठी भाषिक आहेत. त्यांचीही नावे मराठीच्या इतिहासात आदराने घेतली जातात

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०२/२०११

Saturday, October 16, 2010

सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना

सीमालढागीतः भिऊ नको मराठी जना
भिऊ नको मराठी जना, काय तूझा गुन्हा
राहीला सीमाभागी
वेळ काढ जराशी जरा, येशील महाराष्ट्री पुन्हा
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||धृ||

दिलेत भरपूर लढे, रक्ताचे पडले सडे
विचार नको करू, नको मनामधे झुरू
समजू नको अभागी
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||१||

आम्ही जोर जुलूम तोडू, कन्नडीगांची कंबर मोडू
अन्यायाला वाचा फोडू, सीमाभाग महाराष्ट्रा जोडू
जरी लाठ्या डोक्यास लागी
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||२||

जय महाराष्ट्र बोलू बोल, मराठीचे उपकार अनमोल
झालो मोठे त्याच धरतीवर, पांग फेडू झेलू गोळ्या छातीवर
चाल पुढे मागे नको फिरू
पाऊल टाक वेगी
चाल कर मोर्च्यात अग्रभागी ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१३/०७/२०१०

Saturday, July 10, 2010

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील गीत : उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर

उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर

उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उचल मराठी झेंडा जावूदे वर वर ||धृ||

उचल तुझे हात नको भिऊ आता
आपूलाच जय होईल सीमेत शिरता
झेंडा मराठीचा फडके बेळगाव मनपावर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||१||

राज्य आपले एक व्हावे मराठी भाषकांचे
वेगळे न राहू आता एक घर करू बांधवांचे
सुपीक प्रदेश ताब्यात आणू निप्पाणी कारवार
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||२||

पुर्वज आपले खपले तेथे विसरतो कशाला
महाराष्ट्र एकीकरण समिती आहे तुझ्या पाठीला
सामिल करू हलियाल,भालकी, अरूड अन बिदर*
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||३||

* महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्तीय मराठी शहरे (BCC's 2005 resolution हा परिच्छेद पहा.) (कृपया शहरांच्या नावांचे उच्चार योग्य आहेत का ते सांगा जेणेकरून बदल करता येईल.)

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०७/२०१०

Thursday, May 27, 2010

पोवाडा मर्द मावळ्याचा

पोवाडा मर्द मावळ्याचा

खण खण खणाण खण खण खण
खण खण खणाण खणाणखण वाजे तलवार
शिवाजीचा अवतरला अवतार
शत्रूंना दिले उत्तर बाणेदार
साथ दिली मावळ्यांनी भरपूर
अशा राजा शिवाजीस करूनी नमन
शाहिर सचिन बोरसे करतो पोवाडा
मर्द मावळ्याचा
जीर हा जी जी जी जी जी
...
अनेक युद्धे शिवाजी राजांनी खेळीले
अनेक किल्ले राजांनी जिंकीले
अनेक शत्रू त्यांनी मारीले
मराठी राज्य त्यांनी स्थापिले
शिवाजीमहाराज छत्रपती जाहले
याकारणे साथ दिली अनेकांनी
तानाजी, येसाजी, बाजी, सुर्याजी अशा शुरांनी

अहा
...
{ गद्य : यवनी सत्येच्या विरूद्ध लढाया करून शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात मराठी राज्य स्थापन केले. यात त्यांना तानाजी, येसाजी, बाजी, सुर्याजी अशा अनेक ज्ञात लढावू मर्दांची साथ लाभली. परंतु सैन्यात असणार्‍या अनेक सैनिकांपैकी एक असणार्‍या एका मर्द मावळ्याची कहाणी या पोवाड्यात ऐका....}

असे एक मावळा महाराजांच्या सैन्यात
तयार होता लढाईत
पाठवूनी त्यास रणांगणात
केली शर्थ त्याने हातघाईत
कहाणी ऐका त्याची पोवाड्यात
जीर हा जी जी जी जी जी
...

अशाच एके संकटाचे वेळी
महाराजांनी आज्ञा ती केली
तयार करावे सैन्य तुम्ही
रहावे हुशार युद्धास जाण्यावरी
सरनोबत घ्या लढाईचे सुत्र
व्युव्ह रचा तुम्ही दुरूस्त
हत्ती, घोडे ठेवा चुस्त
शत्र्रूस करण्या परास्त
पाजळा सगळी आपापली शत्र
चढवा आता रणांगची वस्त्र.....जीर हा जी जी जी जी जी

अशा या समर प्रसंगी तयार मावळा हा
घरा दाराला सोडुनी आला आला किल्याला
घरधनी निरोप देई अशृ डोळ्याला
कवटाळी चिल्लेपिल्ले आपल्या उराला
धिर देवून मावळा निघे लढाईला.....जीर हा जी जी जी जी जी

नाईकास भेटूनी सांगे तयार लढाईला
जुमलेदारास सांगूनी जाई आपल्या मोक्याला
हवालदार अन बाकी मावळे असती संगतीला.....जीर हा जी जी जी जी जी

{गद्य: असा हा मावळा लढाईस तयार होवून आपल्या मोक्याला चालला गेला. अशा या वेळी किल्यावर काय वातावरण होते ते पहा...} अहा....


रात्रीचे समयी रातकिडे किरकिरती
अंधार दाटूनी आला घुबडे हुंकारती
भयवाटावे असले लक्षण आहे सगळीकडे
मेघ दाटूनी आले सहस्त्रधारा वर्षावे
त्याच समयाला शत्रू हल्ला ते करती
या अल्ला तोबा करूनी किल्यावर धडकती
हुश्शार मावळा जागा होता ढाला चढवून
हाता सुर्‍या, आडहत्यारे, धनुष्य, बरची अन पट्टा घेवून
गोलंदाजही तयार होते त्याच समयाला
गोळे घेवुनी दारूचे ते फिरवीती तोफेला.....जीर हा जी जी जी जी जी

रक्षण करण्या मावळा दक्ष असे
मुख्य गणेश दरवाजाचे
लक्ष असे त्याचे शत्रूच्या येण्याचे
ठावूक असे त्याजला काम मोर्चाचे
शिकारी शिकार ठिपण्या सावध असे.....जीर हा जी जी जी जी जी

{गद्य: शत्रू असल्या पावसात चालून आला. किल्याच्या मुख्यदरवाजाला त्याने धडक दिली अन }

चाहूल लागली गनिमाची चालून येण्याची
पावसातल्या आवाजात अल्ला अल्ला ते गर्जीती
धडक बसली गणेश दरवाजाला मत्त हत्तीची
भक्कम दरवाजा त्यास काय फिकीर करण्याची
शेवटला उपाय म्हणूनी तयारी सुरूंग लावण्याची
अशा पावसात काम करीना दारू सुंरूगाची
मग तयारी झाली तोफगोळे बरसविण्याची.....जीर हा जी जी जी जी जी

एकाएकी मग हल्ला की हो झाला
कुलूपी गोळा दरवाजावर की हो आदळला
त्या गोळ्याने मग आपले काम फत्ते केले
भक्कम सागवानी लाकूड काम की हो तोडीले
लगबग करूनी सात वैरी मग चालूनी आले.....जीर हा जी जी जी जी जी

मुख्य दरवाजापाशी होते पाच शुरवीर दारवान
हातघाईची लढाई केली त्यांनी ताकदवान
अन मारीले सातही मुजोर हैवान.....जीर हा जी जी जी जी जी

दरवजापाशी आता आली आणीक कुमक
आपला मावळा होता त्यात एक
मागाहून शंभर पठाण आले ते अल्ला खुदा गर्जीत
दोन्ही फौजा मग तेथेच भिडल्या एकमेकांस.....जीर हा जी जी जी जी जी

हरहर महादेव, शिव हर शंभो, मारा, कापा गजर तो झाला
कोणी पट्टा चालवी, कोणी कांडा चालवी कोणी चालवी जांबीयाला
मावळ्याने आपल्या घेतली हाती ढाल तलवारीला
त्वेशाने तुटून पडे तो गेला सामोरीला
दातओठ खावूनी गरगर फिरवी हत्याराला
तलवारीची धार तेज असे पाजली कालच्याला
घाबरूनी शत्रू मागे फिरी लांब होई पल्याला
अशा तर्‍हेचे युद्ध करीती दोन्ही त्या समयाला
वरतून पाऊस झोडी खाली मावळा झोडी गनिमाला
खंड नव्हता पडला काही त्याच्या मेहनतीला
शर्थ नव्हती पडली त्याच्या पराक्रमाला
एकट्याने बारा मोगल कापीयला
होते हत्यार बल्लम लटकाविलेले कमरेला
तलवार लावली म्यानाला अन हाती घेतले बल्लमाला
आता तिन अरबांनी कोंडाळले त्याला
तयारी केली त्यांनी खाली पाडण्या मावळ्याला
दिन दिन खुदा खुदा करूनी घेरती पिंजर्‍यातला वाघाला.....जीर हा जी जी जी जी जी

रणमर्द तो मावळा एकटा झुंजला
वार झेलून झेलून रक्ताने तो माखला
रक्त पाहून त्वेशाने तो हल्ला परतवू लागला
सरसर सरसर तो फिरवी बल्लमाला
डोक्यात मारी वार करी, एक अरब पाडला
राहीले दोन आता खुन डोळ्यात चढला.....जीर हा जी जी जी जी जी

एक छाती पुढे येई अन एक राही पाठीला
हवालदार तो बाजूस होता पाही लढाईला
पराक्रम बघूनी मावळ्याचा तो घाली बोटे तोंडाला
"ध्यान देवूनी लढ आता" त्याने आवाज की दिला
अन बाकी मोगलांचा समाचार घेण्या तो चालता झाला.....जीर हा जी जी जी जी जी

विज चकाकली, आवाज झाला, हरहर महादेव मावळा बोलला
विजेसारखा चमकूनी त्याने जोरदार मारा केला
दोन्ही अरबांना चार वारात लोळवी धरणीला
एक बोलतसे खुदा खुदा एक बोली या अल्ला
तडफड तडफड करूनी सोडी ते प्राणांना
वेदनेने चमकूनी पाही मावळा आपल्या तुटल्या हाताला
असा हा एकटा मावळा रणात झुंजला
गनीम पंधरा लोळवीले पाठविले स्वर्गाला.....जीर हा जी जी जी जी जी

हुषार व्हा सारे! सार्‍या मोगलांचा नाश झाला
ओरडूनी सांगे सरहवालदार सगळ्यांना
आपलीही आपली तेरा डोकी फुटली गमावीले विसांना
तुम्ही बाकी सारे आता बसा पहार्‍याला
येवू नका देवू आता कोणी शत्रू दरवाज्याला
आणखी कुमक घेवोनी येतो मी तुमच्या मदतीला
"भले बहाद्दर लढाई गाजवली", शाब्बासी देती ते मावळ्याला
किल्लेदार धावत येती त्याच समयाला
सोन्याचे कडे देवूनी गौरवीती त्याला
गौरवूनी निघती ते अधिकारी, मावळा संगती उपचाराला.....जीर हा जी जी जी जी जी

अशी लढाई अशी मर्दूमकी गाजवली त्या कारणाला
मारूनी शंभर शत्रू मावळ्यांनी वाचवीले किल्याला.....जीर हा जी जी जी जी जी

शुरमर्दाचा फोवाडा शुरमर्दांनी सांगावा
शुरमर्दांनी ऐकावा शुरमर्दांनी आचरणावा
असा हा पोवाडा शुरमर्द मावळ्याचा
महाराजांच्या पुराणकालीन काळाचा.....जीर हा जी जी जी जी जी

प्रस्तूत शाहिर असे नाशिक वस्तीला
सचिन बोरसे नाव ल्यालेला
लेखणी घेवून पहाटेच्या मंगल समयाला
पोवाडा पुढल्या पिढीसाठी रचिला
सत्ताविस मे २०१० सालाच्या गुरूवाराला
वेळ झाली पोवाडा पुर्ण करण्याला.....जीर हा जी जी जी जी जी

वंदन करतो ज्ञात अज्ञात मावळ्यांना
जांच्यामुळे आज आपण या वेळेला
धर्माची भाकरी खातो पोटाला
वंदन करतो शिवाजी राजांना
सत्य युगाच्या योगी पुरूषाला
भजतो महाराष्ट्र देशी पुन्हा येण्याला ssss जीर हा जी जी जी जी जी

-पाषाणभेद (दगडफोड्या)
२७/०५/२०१०