Friday, September 2, 2011

पोवाडा मराठी भाषेचा

पोवाडा मराठी भाषेचा

मराठी भाषा असे धन्य धन्य
बोलती जयांचे भाळी असे पुण्य
कानी पडती असे हे बोल
तो महाराष्ट्र प्रांत असे थोर जी जी जी जी

जगामध्ये भारत देश महान
अनेक भाषांची असे तो खाण
कितीक बोलींना तेथे मान
त्यात मराठी असे वरताण जी जी जी जी

अशा या भारत देशातल्या महाराष्ट्र प्रांती मराठी भाषा बोलली जाते.

अहो ही भाषा असे कुणाकुणाची?

ही भाषा कुणाची म्हणून काय प्रश्न विचारता? ऐका तर मग...

ही भाषा असे कुणाकुणाची?
अहो ही भाषा असे कुणाकुणाची?

अहो ही भाषा असे चक्रधरांची
ही भाषा असे झानदेवांची
ही भाषा असे तुकोबांची
नामदेव, सोपान, मुक्ताबाईची
गोरा कुंभार, सेना न्हावी, नरहरी सोनाराची
हि भाषा असे रामदासांची
ही भाषा असे जीजाउंची
ही भाषा असे दादोजी कोंडदेवांची
हि भाषा असे मर्द मावळ्यांची
हि भाषा असे शुर शिवाजी राजांची
ही भाषा असे बेधडक मुरारबाजीची
ही भाषा असे विर तानाजीची, बाजीप्रभुंची
ही भाषा असे कान्होजी आंग्र्यांची
ही भाषा असे पेशव्यांची
ही भाषा असे विश्वासरावांची
हि भाषा असे आहिल्यादेवींची
ही भाषा असे शाहुमहाराजांची
ही भाषा असे टिळकांची
ही भाषा असे सावरकरांची
ही भाषा असे फुले, आंबेडकरांची
हि भाषा असे बाळासाहेबांची
हि भाषा असे राजठाकरेंची
हि भाषा असे तळागाळातल्या लोकांची
सह्याद्रीच्या मुलांची
सागराच्या लेकरांची
विदर्भातल्या लेकीसुनांची
मराठवाड्यातल्या पोरांची
खानदेशातल्या वडिलधार्‍यांची
हि भाषा असे सगळ्या मराठी प्रेमींची

अशी ही भाषा कित्येक मर्दांची
ज्यांनी तळी उचलली मराठीची जी जी जी

लेखक, कवी, खेळाडू, साहित्यीक,
नाटककार, संगीतकार, गायक,
डॉक्टर, वकिल, कामगार, संशोधक,
राजकारणी, शिक्षक, प्राध्यापक, व्यापारी,
रणरागिणी, महिला, लढवय्या, सैनिक, अन शेतकरी,
किती येथील महान व्यक्ती, असली नावे तरी घ्यावी किती!

कवी कुसूमाग्रज, आचार्य अत्रे, पुल देशपांडे, विभावरी शिरूरकर, हमिद दलवाई, आण्णा भाऊ साठे, शाहिर अमर शेख, बा भ बोरकर, यु म पठाण, सरोजीनी बाबर, विद्या बाळ, चिं त्र खानोलकर, जी ए कुलकर्णी, भा रा तांबे, गोविंद बल्लाळ देवल, लक्ष्मण गायकवाड, लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, सचिन तेंडूलकर, लक्ष्मण माने, दादासाहेब फाळके, प्रतिभाताई पाटिल, तुकडोजी महाराज, साने गुरूजी, गाडगे महाराज, गोंदवले महाराज, संत चोखामेळा, फा. फ्रान्सिस दिब्रिटो, यशवंतराव चव्हाण, प्रमोद महाजन, राजा ढाले, दत्ता सामंत, उद्धव ठाकरे, वसंतदादा पाटिल, शरद पवार, चिंतामणराव देशमुख, गोळवलकर गुरूजी, नामदेव ढसाळ, आण्णा हजारे, शांताबाई कांबळे, बाबा आमटे, डॉ. अभय बंग, राणी बंग, नरेंद्र दाभोळकर, विनोबा भावे, श्रीपाद डांगे, रामदास आठवले, पंडीता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, भिमसेन जोशी, धोंडो केशव कर्वे, पांडूरंग शात्री आठवले, डॉ. विजय भाटकर, अनिल काकोडकर, डॉ. नारळीकर, डॉ. गोवारीकर, कृष्णा कांबळे, डॉ. श्रीराम लागू, दादा कोंडके, अमोल पालेकर, नाना पाटेकर, माधुरी दिक्षीत, रजनीकांत, सचिन, महेश कोठारे, अशोक सराफ, सुलोचना, अरूण दाते, अजीत कडकडे, सुरेश भट, अनुराधा पौडवाल, बाबूराव बागुल, अवधुत गुप्ते, अजय अतूल, वैशाली सामंत, सुरेखा पुणेकर, दिलीप सरदेसाई, वेंगसरकर, अंजली भागवत, तेजस्विनी सावंत, गंगाधर पानतावणे, भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, बा सी मर्ढेकर, बालकवी, गुरू ठाकुर......
कितीतरी नावे घेतली तर त्यास दिवसही पुरायचा नाही*. या दैधिप्यमान रत्नांनी मराठी भाषेचे वैभव वाढवले आहे.

सारे जण महाराष्ट्री जन्मती
अन सारे जण मराठी बोलती
किती वाटे अभिमान, किती वाढतो आमचा मान
भारत देशाचा वाढविती शान
असे मराठी नरनारी आहे जगती जी जी जी

१९१२, फेब्रूवारी २७,
जन्मले कवी कुसुमाग्रज
साजरा करती हाच मराठी भाषा दिवस
करा प्रतिज्ञा याच दिनी
मराठीच बोलायाचे ठेवा ध्यानी
मागे नाही कधी हटायाचे
सारे काही मराठीसाठी करायचे जी जी जी

खानदेशी, माणदेशी
आहिराणी, कोकणी
वर्‍हाडी, मालवणी
या सार्‍या बोलीभाषा
बहिणी बहिणी
सार्‍यांमुखी नांदती
सुखाने संसार करती
वंश त्यांचा बहरत राहे भुवरी जी जी जी

कित्येक पुस्तके मराठीत प्रकाशीत होती
कित्येक वर्तमानपत्रे मराठीत वाचली जाती
आंतरजालावरही मराठीचा झेंडा फडकतो जोरदार
रोजरोज नवे लेख येती, धुमाकुळ घालती फार जी जी जी

मराठी भाषा असे जगन्मान्य
तिच्या पोटी जन्मलो हेच आमचे पुण्य
तिच्या बोलण्याने हारले सारे दैन्य
त्या मराठीस त्रिवार मुजरा करून
मराठी भाषिकांना
शाहिर सचिन करतो प्रणाम जी जी जी

* वरती काही मान्यवर मराठी भाषिकांची नावे आली आहेत. त्या व्यतिरिक्तही अनेक महनिय व्यक्ती मराठी भाषिक आहेत. त्यांचीही नावे मराठीच्या इतिहासात आदराने घेतली जातात

- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०२/२०११

No comments: