Friday, September 2, 2011

शेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी

शेतकरी गीतः आम्ही शेतात कसणारे शेतकरी

आम्ही शेतात कसणारे शेतकरी
मेहनत मजूरी करणारे कामकरी ||धृ||

आम्ही चालवतो गाडी बैलांची
तिला गरज नाही इंधनाची
धान्याची पोती आणतो घरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||१||

पोळा साजरा करतो दरवर्षी
दुधासाठी पाळतो गाईम्हशी
भुमातेची करतो चाकरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||२||


रात संपून उजाडती पहाटं
भल्या सकाळी कारभारीन उठं
घेवून परातीत जवारी बाजरीचं पिठं
न्याहारीसाठी करती झुनका भाकरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||३||


उन्हातान्हात कामं सारी करतो
रातंदिस राबराब राबतो
कर्ज काढूनी खत पिकाला देतो
तरीबी पोटाला नाही पोटभर भाकरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||४||


कुनी म्हनंल उसाची साखर व्हती
तुमचे द्राक्ष विदेशात जाती
काही द्राक्षांची वाईन व्हती
कुनी म्हनंल भाजीपाला महाग झाला
त्याचा भाव गगनाला गेला


पर बाबांहो माझे बोल खरं काय ते सांगती


हि सारी कमाई व्यापारी-आडते खाती
मधल्या दलालीने गब्बर ते व्हती
अन गरीबीतच राही शेतकरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||५||


आमच्यापैकी कोनी पुडारी झालं
कोनी शिकून हाफिसर झालं
आमची आठवण विसरून गेलं
पैश्याअडक्यानं तो त्याची तुंबडी भरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||६||


पोरं आमची शाळंला जाती
शाळेतून लगेच शेतात राबती
अभ्यास करून कामधाम पाहती
हाय का कुनी त्यांना वाली?
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||७||


कधी पिक लई जोमदार येतं
पाउसपानीबी लई झ्याक पडतो
नशिबानं खत बियानंबी मिळतं
डोळ्यापुढं हिरवं सपान फुलतं
पन बाजारी भाव पाडतो व्यापारी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||८||


कधी पाउस पडतच न्हाई
डोळ्यांच्या कडा रडून ओल्या होई
पोटाला खायाची चिंता पडती लई
पुडारी फाडारी इचारत न्हाई
काय मदतबी मिळत न्हाई सरकारी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||९||

आम्ही शेतात खपून राहतो
येळवारी पेरणी करतो
खुरपून तण सारं काढतो
ईळ्या-पांभरानं कुळवणी करतो
मजूरावानी शेतात राबतो
पिक वार्‍यावर डुलाया लागतं
नेमका तवाच पाउस येई अवकाळी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||१०||


आरं कुनीतरी कायतरी कराना
शेतीसाठी पानी आणाना
सेझसाठी शेती पडीक करू नकाना
बळीराजाला त्याचा न्याय द्याना
अनुदान, कर्जाचा सापळा टाळाना
हुंडा देवू घेवू नकाना
लग्नासाठी कर्ज काढू नकाना
रोजगार हमीची थांबवा मजूरी
यंत्रतंत्र शेतीत आणा इस्त्रायली
मग कोन कशाला आत्महत्या करी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||११||


गाय बकरं बैलं खिल्लारी
दुभती जनावरं राहती आमच्या दारी
घर आनंदतं गोकूळावानी
कारभारीन घेई पोरगं कडेवरी
धनदौलत हिच आमची खरी
शेतीच हटवील देशाची बेकारी
कशाला दाखवायची आपली लाचारी
सच्या पाषाण कवनात करी शाहिरी
आम्ही शेतात कसणारे शेतकरी ||१२||


आम्ही शेतात कसणारे शेतकरी
मेहनत मजूरी करणारे कामकरी ||धृ||


- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/१२/२०१०

No comments: