परवाच खुप कधीचा गावाकडे गेलो.
तशी आठवण यायची पण सवड नव्हती होत.
म्हणून वेळात वेळ काढून गेलो.
आठवणीतल्या आठवणी आठवीत गेलो.
तो बसस्टँड, तेथील पत्र्याच्या खाली सावलीत उभे राहणारे लोक,
ते शाळा कॉलेजला जाणारे पोरं पोरी,
माहेराला, सासरला जाणार्या नवर्या मुली,
ते फलाटावरच पाया पडणं, अन नवर्या मुलाचं अवघडून जाणं,
जागा सांभाळण्यासाठी झालेली गर्दीची लढाई,
त्या गर्दीकडे शांत प्रवृत्तीने बघत तंबाखू मळणारे कंडक्टर,
"भाऊ कुठे जाते रे गाडी", विचारणारी आजीबाई,
"ईकडे लक्ष द्या" म्हणत बसमध्ये पेनं, एखादे पुस्तक विकणारा,
लिमलेट, आवळासुपारी, पेपर विकणारा,
कंन्ट्रोलरची अनांउन्समेंट अन रिपोर्टवर सह्या घेण्याची ड्रायव्हर लोकांची अर्जवी धावपळ.
मन त्याच्याही मागे गेले,
लायनीत आधी तिकीट घ्यायचे अन मगच बसमध्ये बसायचे,
नजरेतील ती लाल पिवळी बस,
बरं पुर्वी आतासारख्या अॅल्यूमिनीयम बॉडी असणार्या बस नव्हत्या,
होत्या त्या पत्र्याच्या, खुप आवाज होणार्या,
हं.... अर्थात आजही आवाज होतोच आहे म्हणा.
मला आठवते... आमच्या गावाच्या बसस्टँडमध्ये एक दोन पंखेही होते प्रवाशांच्या डोक्यावर,
अन ते गोल गोल फिरायचेसुद्धा.
सारा गोंगाट, पळापळ,
पोर्टरची बसची पाटी घासत घेवून जाण्याची मुजोरवृत्ती,
अन बसच्या छतावरचे सामान उतरवण्यासाठीची धावपळ,
सारे काही होते तेथे.
पण काही बदल लक्षणीय होते,
सामान नेण्यासाठी चाके असणार्या बॅगा,
ग्रामीण भागातल्या नटव्या मुली अन मिथून मुले.
कंडक्टर च्या खांद्यावर तिकीटांचे मशीन,
अन पाणी पिण्यासाठी प्लाश्टीकच्या बाटल्या,
स्टँडवरचे पत्र्याचे शेड आता नव्हते,
अन कंट्रोलरचे ते गिचमीड बोलणेही नव्हते.
बसमध्ये जेवणाचे डबे पाठवणे अन तो घ्यायला येणारे विद्यार्थीही नव्हते.
पुर्वीच्या अन आताच्या स्टँडमध्ये बरेच बदल झाले होते तर!
No comments:
Post a Comment