एक दिवस पंक्चरलेला
गेलेल्या रविवारच्या दिवसाची ही सत्यकथा आहे. रविवार म्हणजे सुट्टी वैगेरे काही नाही. कारण मला साप्ताहीक सुटी शनिवारची असते. सध्या रात्रपाळी असल्याने रविवारी रात्री कामाला ११ वाजता जायचे होते. कालची सुटी असल्याने आदल्या रात्री झोप झालेली होती. त्यामुळे रविवारच्या सकाळी लवकर उठलो. रुग्णालयात भरती झालेले एक जवळच्या नातेवाईकांना दुपारी रजा देणार असल्याने त्यांना जेवणाचा डबा देण्यासाठी जायचे होते. कालपासून मुलगा 'सायकलमध्ये हवा भरून आणा' 'सायकलमध्ये हवा भरून आणा' अशी भुणभुण करत होता. सुटीच्या दिवशी कॉलनीत सायकल फिरवीणे हा त्याच्या मित्रमंडळींचा आवडता उद्योग असतो. मनात म्हटले त्याचे काम पहिल्यांदा करावे. त्याची छोटी सायकल घेतली व गॅरेजमध्ये आलो. मुलाला गॅरेजच्या कामाची माहीती व्हावी ह्या उद्देशाने त्यालाही बरोबर घेतले. गॅरेजमध्ये जातांना त्याला विचारले की 'सायकल पंक्चर कशी झाली?' त्याने 'पंक्चर होते म्हणजे नक्की काय होते?' असा प्रतिप्रश्न केला. त्याचे शंकासमाधान केले. आपली त्वचा काही खरचटल्याने कशी फाटते तसे सायकची ट्युबपण त्वचा समज अन तिला एखादा खिळा टोचल्याने हवा गेली की पंक्चर होते असे समजावले. त्याला मुळप्रश्न पुन्हा विचारला - 'सायकल पंक्चर कशी झाली?' माझ्या प्रश्नाचा उद्देश त्याच्या सायकलची हवा कोणी मुद्दाम काढली की खरोखर चाक पंक्चर झाले हे माहीत करण्याचा होता. मग त्याने सांगीतले की 'त्या मागच्या चाकाची हवा गेली'. आता त्यात त्याने नवीन काय सांगीतले? असो. शंकासमाधान करत असतांना गॅरेज आले. आता चाकात नुसती हवा भरता आली असती. पण मी अंदाज केला की हवा नुसती गेली असती तर थोडीफार हवा चाकात राहीली असती. पण त्यावेळी चाकाची स्थिती तशी नव्हती. चाक पुर्णपणे सपाट झालेले होते. गॅरेजमध्ये परत न यावे लागावे म्हणून मी बाळासाहेबांना (गॅरेजमालक) चाकाचे सरळ पंक्चरच काढण्यास सांगीतले. त्यांनी लगेच पंक्चर काढून दिले. मग आमचे बाळासाहेब सायकल चालवत अन मी त्याच्या मागे थोडाफार दिडकी चाल करत घरी आलो.
घरी नाष्टापाणी आटोपल्यावर बर्याच दिवसांपासून जमा झालेली रद्दी आवरली. सध्या आमच्याकडे तिन तिन वृत्तपत्रे येतात. मी तर जास्त वाचत नाही पण दोन वृत्तपत्रांच्या स्किम्स चालू असल्याने ते लावले गेलेले आहेत! थोडेफार इकडेतिकडे केले अन माझी नजर मुलाच्या सायकलकडे गेली. त्याच्या सायकलीचे मागचेच चाक पुन्हा बसलेले दिसले. त्याची भुणभुण व सायकल फिरवण्याची गैरसोय नको म्हणून सायकल पुन्हा गॅरेजमध्ये नेली. तेच चाक पुन्हा पंक्चर झालेले असल्याने सकाळी काढलेल्या पंक्चरविषयीची शंका बाळासाहेबांना बोलून दाखवली. त्यांनी सांगीतले की 'साहेब वॉलशीटवर पंक्चर असेल. एकदम शुअर. कारण वॉलशीटवर आधीच पंक्चर काढलेले मी पाहिलेले आहे.' खरोखरच वॉलशीटच्या जवळच पंक्चर झालेले होते. पुन्हा वॉलशीटवरचे दुसर्यांदा पंक्चर काढणे तेवढे खात्रीचे नसते. मग मी नवीन ट्युबच टाकण्यास सांगीतले. नवीन ट्युबची किंमत त्यांनी ऐंशी रुपये सांगीतली. ट्युब बसवत असतांना सहज म्हणून नवीन ट्युबचे रॅपर बघीतले तर त्यावर एमआरपी सत्तेचाळीस रुपये छापलेली! मग त्यावरून बाळासाहेबांशी थोडी वादावादी झाली व नंतर बाळासाहेबांनीच माझे बौधीक घेतले. बोलणे चायना आयटम्सवर छापलेली कमी किंमत (ट्युब ईंडीयनच होता), व्हॅट, ईलेक्ट्रीकल सामान जास्त एमआरपी असूनही कमी किंमतीत कसे मिळते अशा अंगाने होत गेले. अर्थातच त्यांचा विजय झाला व मला नवीन ट्युबचे रुपये ऐंशीच द्यावे लागले.
नंतर हॉस्पिटलात दुपारी बाराच्या सुमारास डबा दिला व तेथेच थांबलो. चारसाडेचारला रुग्णाला अॅम्बूलन्सने गावी रवाना केले अन एका नातेवाईकाला चहापाण्यासाठी घरी घेवून आलो. त्यांचे चहापाणी झाल्यानंतर त्यांना बसस्टॉपपर्यंत सोडण्यासाठी मोटरसायकल बाहेर काढली तर तिचे पुढचे चाक पंक्चर झालेले! मग पाहुण्यांना बसस्टॉपपर्यंत पायी सोडून आलो.
आल्यानंतर मोटरसायकलच्या पुढल्या चाकात काही खिळा वैगेरे आहे का ते बघीतले. खिळा काही दिसला नाही. मग ट्युबचा वॉलनट ढिल्ला केला अन मोटरसायकल ढकलत गॅरेजपर्यंत नेली. नशीब गॅरेज घराच्या जवळच आहे. नाहीतर बंद अवस्थेतली मोटरसायकल ढकलत नेणे म्हणजे किती कष्टाचे असते ते आपल्याला माहीत आहेच. गॅरेजवाल्याने पंक्चर काढून दिले अन सरळ घरी आलो.
आता रात्रपाळीला जायचे असल्याने व दिवसभर झोप झाली नसल्याने वरच्या खोलीत आडवा झालो. एखाद्या तासाचीही झोप माणसाला ताजेतवाने करते. जाग आली तर जवळपास सात वाजत आले होते. आता जेवण करायचे नंतर परत झोप घेवून मग कामावर जायचे होते. रात्रपाळी असेल अन मला आठवण असेल तर मी मोटरसायकलच्या चाकांची हवा तरी कमीत कमी पाहून घेतो. तेवढीच खबरदारी. मी
मोटरसायकलच्या दोन्ही चाकांवर थापटी मारून पाहिल्या. दोन्ही चाके एकदम टणाटण होती. थोडेफार जेवण केले. घरचा टिव्ही आमच्या घरच्या बाळासाहेबांच्या टिव्ही बघण्याच्या कर्तृत्वामुळे बंद केलेला असल्याने टिव्ही न बघता सकाळचे (दै. सकाळ नव्हे. तो तर 'राहूल गांधी यांनी संसदेतल्या कॅन्टीनमध्ये ईडली-डोसा खाल्ला' अशा आशयाची बातमी आली त्याच्या दुसर्याच दिवशी बंद केलेला आहे. तसेही दै. सकाळने मागे एकदा 'लालूप्रसादला की नितीशकुमारला खायला काहीतरी (चारा??) आवडते' अशा आशयाची बातमी दिली तेव्हा बंद करायचे ठरवत होतो.) पेपर वाचले. पुन्हा झोपलो.
रात्री पावणेअकराला मोबाईलचा अलार्म झाला अन 'कामावर जायला उशीर नको व्हायला' म्हणून लगेच उठलो. कारण माझी वाट बघत कोणी रिक्षावाला थांबलेला नव्हता. मोटरसायकलच मला कामावर सोडणार होती. मी कपडे घातले. आताशा थोडीसी शित हवा वाहत असते म्हणून अस्मादिकांनी जॅकेटरूपी चिलखत अंगावर व हेल्मेटरूपी शिरस्त्राण डोईस चढविले व कामाच्या कचेरीरूपी युद्धभुमीकडे कुच करण्यासाठी मोटरसायकलरूपी घोडीवर टांग मारीली. बघतो तर काय! मोटरसायकरूपी घोडीचे मागचे पायरूपी चाक भुईसपाट झालेले! कुण्या शत्रूने खिळ्यारूपी भाला अस्मादिकांच्या मोटरसायकलरूपी घोडीच्या मागच्या पायरूपी चाकात खुपसला कोण जाणे. आता ऐन वक्ताला रातीच्या समयी कामरूपी युद्धावर जावयाची खोटी झालेली. पुन्हा घररूपी किल्याचे किल्लीने कुलूप उघडीले. मोटरसायकलरूपी घोडी पोर्चरूपी पागेत ठेवून दिली अन दिवाणखाण्यारूपी हॉलमध्ये अंगावरचे चिलखत व शिरस्त्राण काढून ठेवीले.
घरी माझी एक सायकल आहे. बरेचदा मी तिचा उपयोग करतो. मग आता वेळ निभावून नेण्यासाठी मला तिच कामात येणार होती. मग मी पहिल्यांदा तिच्या चाकातली हवा तपासली तर तिच्या पुढच्या चाकात हवा नव्हती. एवढ्या रात्री कोणते गॅरेज उघडे असेल? म्हणजे हा पण मार्ग बंद झालेला होता. (तसे आमच्याकडे रात्रंदिवस फक्त पंक्चर काढणारे हायवेच्या रस्त्याला काही केरळी आण्णा आहेत पण तेथेपर्यंत सायकल किंवा मोटरसायकल ढकलत कोण नेणार?) आता बसस्टॉपपर्यंत चालत जावून अॅटोरिक्षा दोन ठिकाणी बदलून आता कामावर जाणे भाग होते. आज रविवार असल्याने कामाच्या ठिकाणी माझी जागा घेणारा बदली सहकारीही नव्हता. मी लगेच ऑफीसात डिपार्टमेंटमध्ये मोबाईल केला व 'मला येण्यासाठी वेळ लागेल व तुला घरी जायचे असेल तर जा', असे तेथे हजर असलेल्या सहकार्याला कळवीले. रिक्षाने व थोडी पायपीट करून कामावर उशीराने हजर झालो. रात्रपाळीचे काम केले व सकाळी तशीच थोडीफार पायपीट करून घरी सकाळी साडेआठच्या सुमारास पोहोचलो.
घरी आल्यानंतर लगेच काही झोप येत नाही म्हणून मग मोटरसायकलच्या मागच्या चाकाची तब्बेत पाहण्याचे ठरवले. मागचे चाक निट बघीतले असता एक खिळा त्यात गेल्याचे दिसले. मग स्क्रूड्रायव्हर अन पकडीने तो खिळा उपसून काढला. पाहतो तर खिळ्याचे डोके गायब होते. बहूतेक तो सुताराकडचा खिळा असावा कारण सुतारलोकं दोन फळ्या जोडण्यासाठी असल्या बिगरडोक्याच्या खिळ्याचा वापर करतात हे मी पाहीलेले आहे. मग ट्युबचा वॉलशीट नट ढिला केला व मोटरसायकलच्या मागच्या चाकाचे पंक्चर काढण्यासाठी परत गॅरेजमध्ये मोटरसायकल ढकलत नेली. काही लोकं मोटरसायकचे चाकच काढून गॅरेजपर्यंत नेतात व पंक्चर काढून परत घरी चाक लावतात. मोटरसायकलचे मागचे चाक काढून लावणे तसे अवघड आहेच अन ते मला काही येतही नाही. यावेळी मोटरसायकल सुरू करून व गिअरमध्ये टाकून गॅरेजपर्यंत नेली. बाळासाहेब गॅरेज लवकरच उघडतात हे बरे आहे. मागच्या चाकाचे पंक्चर काढले व घरी आलो.
दिवसभर झोप अन थोडीफार कामं केली. संध्याकाळी एकाकडून हातउसने दिलेले पैसे घ्यायचे होते म्हणून मोटरसायकल सुरू केली अन तिच्यावर बसलो तर यावेळी मोटरसायकलचे पुढचे चाक पुन्हा सपाट झालेले! पुन्हा बाळासाहेबांची भेट ठरलेली. पुन्हा ढकलाढकली करत बाळासाहेबांच्या दरबारी हजर झालो. पैसे देण्यार्या माणसाने दिलेला चेक दोन वेळा बाउन्स केलेला होता व यावेळी तो रोख पैसे देण्यासाठी बोलवत असल्याने त्याची भेट घेणे महत्वाचे होते. मग बाळासाहेबांची एक घोडी (सायकल) उसनी घेतली व टांगा मारत पैसे घेण्यासाठी गेलो. नशीब! यावेळी त्याने मला पैसे परत केले. सायकल मारत पुन्हा गॅरेजमध्ये आलो तर बाळासाहेबांनी मोटरसायकलीच्या पुढच्या चाकाचे पंक्चर काढलेले होते. त्यांना त्याविषयी विचारले असता ट्युबच्या जॉईंटवर हे दोन्ही वेळचे पंक्चर होते असे समजले. गेल्या चोवीस तासात दोन वेळा पुढचे चाक पंक्चर झालेले असल्याने अजून धोका नको म्हणून मग मी ट्युब बदलण्याचा निर्णय त्वरीत घेतला. सायकलच्या ट्युबच्या किंमतीचा अनुभव असल्याने या मोटरसायकलच्या नवीन ट्युबवरची एमआरपी मी बघण्याचे धाडस केले नाही व त्यांनी जी रक्कम सांगीतली ती मी देवून टाकली. ती रक्कम दोनशे रुपये अशी होती.
हा लेख लिहून होईपर्यंत चोवीस तास झालेले होते. तोपर्यंततरी मोटरसायकल व लहान सायकल यांचे पंक्चर झालेले नव्हते. दोन्ही वाहनांची तब्बेत चांगली आहे. पण अजून माझ्या मोठ्या सायकलीच्या पुढच्या चाकाची हाल'हवा'ल पहायची बाकी आहे. आज वेळ मिळाला की मोठ्या सायकलीला बाळासाहेबांच्या दवाखान्यात नेण्याचे ठरवले आहे. तेथे गेल्यानंतरच तिच्या चाकात कोणता आजार दडलेला आहे ते समजेल. तशी खुशाली मी आपणाला कळवेनच.
No comments:
Post a Comment