Showing posts with label आस्वाद. Show all posts
Showing posts with label आस्वाद. Show all posts

Sunday, February 20, 2022

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय


पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय


सर्व सदस्यांना कळविण्यात आनंद होतो आहे की, "ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय" हे पुस्तक छापून आले आहे. व्यस्ततेमुळे ( व पुस्तक कोण वाचतो हल्ली??) प्रकाशन सोहोळा केला नाही.

ध्वनी प्रदूषण या घातक प्रदूषणाचे उगम काय? आरोग्याच्या नेमक्या कोणत्या समस्या याने निर्माण होतात? त्यावर उपाययोजना काय असाव्यात? यावरचे विवेचन या पुस्तकात केले आहे.

वातावरणातील जल, वायू इत्यादी प्रदूषणाबाबत अनेकदा बोलले जाते, परंतु आपण ध्वनी प्रदूषण, आवाज याला फार हलक्यात घेत असतो. ध्वनी निर्माण करण्यास फारसे श्रम लागत नाहीत. मोबाइलवरील स्पिकरवर गाण्याचा आवाज वाढवला आणि दुसर्‍याने त्यावर आक्षेप घेतला तर आवाज वाढवणार्‍याला त्याचे काहीच वाटत नाही. आवाजाबद्दल बेफिकीरीची प्रवृत्ती समाजात वाढत आहे. आवाज हे माध्यम हवेसारखे दिसत नसल्याने त्याची घनता, तीव्रता लगेचच जाणवत नाही. आपले कानही आपण बंद करू शकत नाही. काही आवाज आपली इच्छा नसली तरी बळजबरी आपल्याला ऐकावेच लागतात. त्या आवाजाने आपल्या कानांवर, शरीरावर व मनावर परिणाम केल्यानंतरच त्या आवाजाबद्दल चांगले किंवा वाईट मत आपण बनवतो. कित्येक व्यक्तींना आवाजाचेही (ध्वनी) प्रदूषण असते हेच माहीत नसते. हे दुर्दैवी आहे.

अवाजवी आवाजाचा ध्वनी जेव्हा हानिकारक पातळीवर पोहोचतो तेव्हा सजीवांवर न दिसणारे नुकसान त्याने केलेले असते. ध्वनी प्रदूषणाने मानव प्राणी तसेच इतर सजीवांत अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात.

आवाजाचा त्रास आपणापैकी अनेकांना होत असेल यात शंका नाही. या अनुभवाला आपल्यासमोर मांडतांना आपणही समाजात या अवाजवी आवाजाबद्दल इतरांना सांगावे व त्याच्या परिणामाबाब लिहावे असे वाटल्याने त्या लेखनाचे रुपांतर पुस्तकात झाले आहे. यातील काही मुद्दे मिसळपाव.कॉम व मायबोली.कॉम या मराठी संकेतस्थळावर लिहीले. तेथे अनेकांनी आवाजाबाबत आपली मते व्यक्त केली. मग आवाजाचा त्रास होणे हा सार्वत्रीक अनुभव आहे फक्त त्याला जाहीर वाचा कोणी फोडायला धजावत नाही हे लक्षात आले. म्हणूनच सदर पुस्तकात कायद्याने ध्वनी प्रदूषण कमी करायला काय मदत होवू शकते याचा उहापोह केला आहे. त्याचप्रमाणे या प्रदूषणामुळे सजीव तसेच प्राणी, पक्षी, जलचर यांवर काय परिणाम होतो व त्यावर उपाययोजना काय असावी याबद्दल लिहीले आहे. वाहनांच्या आवाजावर तसेच आपल्याला शांत झोप लागावी यासाठीही स्वतंत्र्य प्रकरणे लिहीली आहेत त्याचा तुम्हाला लाभ होईल अशी आशा आहे. 

या आधीच्या 'वगनाट्य: वैरी भेदला' पुस्तकात सर्व काम - अगदी टायपींगपासून ते कव्हर डिजाईन, पेज लेआऊट, इंडेक्सींग इत्यादी स्वत:च  करतांना जो त्रास झाला तो अनुभव असल्याने या पुस्तकाच्या निर्मीतीत तो त्रास झाला नाही.     

ध्वनी प्रदूषणाबद्दल इतरांचे प्रबोधन करणे आपले कर्तव्य आहे. लहान मुलांमध्ये याबाबत जागरूकता लहान वयातच आणली असता ते मोठे झाल्यानंतर सभ्य नागरीक बनू शकतील. ध्वनी प्रदूषणाबद्दल आपल्याला जागरूक करणे या हेतूने हे पुस्तक लिहीले आहे. हे लिखाण मुक्त स्रोत परवान्यासारखे (Open Source) लिहीले आहे असे समजून आपण त्यात भर टाकाल व हे लिखाण जास्तीत जास्त व्यक्ती, संस्थांपर्यंत पोहोचण्याकामी आपण सहकार्य कराल ही मला आशा आहे. येत्या काळात आवाजाचा भस्मासूर आपल्या कानांना गिळंकृत करण्याच्या आधी आपण सजग राहून त्याचा नायनाट करूया. 

वाहनांमुळे होणार्‍या ध्वनी प्रदूषणावर स्वतंत्र प्रकरण लिहिले असल्याने वाचकांना ते सुद्धा मार्गदर्शक ठरावे.
एकूणच ध्वनी प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण करणारे हे पुस्तक वाचकांना पर्यावरणाबाबतच्या एका दुर्लक्षिलेल्या समस्येविषयी ओळख करून देते हे नक्की.

येथील सर्व सदस्यांचे आभार.

पुस्तक - ध्वनी प्रदूषण : समस्या व उपाय
ISBN: 978-93-5578-807-8
लेखक: सचिन सुधाकर बोरसे (पाषाणभेद)
प्रकाशन: अमीगो बूक पब्लिशर, नाशिक.
किंमत: रू. ११५/-
वितरण: ऑनलाईन - अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट व इतर

Sunday, July 19, 2020

कथा: अधांतरी त्रिकोण

विषय मराठी युवकभारती (प्रथम भाषा), इयत्ता: बारावी
महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अवलोकन व टिप्पणी संशोधीत खाजगी मंडळ, पुणे-१२
अशासन निर्णय क्रमांक - नअभ्यास-१२१३/ (प्रअ ८६२) एएसडीएफ/४ दिनांक ३१/०४/२० अन्वये विस्थापन करण्यात आलेल्या समितीच्या दिनांक ३०/०२/२० रोजीच्या बैठकीत हा पाठ या अशैक्षणीक (कोरोना काळ) वर्षापासून निर्धारीत करण्यात येत आहे.
विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी सुचना: सदर पाठ आपल्या स्मार्ट फोनमधील दक्षशिक्ष या अ‍ॅपद्वारे पाठावरील क्यू. आर. स्कॅनरद्वारे स्कॅन केल्यास अध्यापनास उपलब्ध आहे.
पाठ क्रमांक: ५ - कथा: अधांतरी त्रिकोण ले. पाषाणभेद (जन्मतिथी उपलब्ध नाही ते मृ. शके १६६१ किंवा ६२)
=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*
अप्रसिद्ध समिक्षक, विनोदी लेखक, कवी, टिकाकार, प्रतिसाद लेखक. लहाणपणापासूनच ते आंतरजालावर लेखन करत असत. तेथील टिका वाचून टिकाकार झाले. विविध वाडःमयप्रकार हाताळले. इतर टिकाकारांना तोंड दिले. पाभेचा चहा, युगलगीतः बाई इथंच ठोकू का हा खिळा?, मुक्त'पिठीय' लेख: अमेरीकेचे राष्ट्रप्रेम आदी असंख्य लेख आंतरजालावर प्रसिद्ध. द्वितीय आंतरआकाशगंगा मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.
प्रस्तूत पाठात लेखकाने बालपण ते तरुणपणाचे चित्र रेखाटले आहे. कथानायक आपल्या अभ्यासाकडे लक्ष देवून इतर सर्व गुण आपल्या अंगी कसे बाणवत होता याचे विवेचन केले आहे. मैत्री, कष्ट, चांगला स्वभाव, खिलाडू वृत्ती, गरीबांविषयी- सर्व धर्मांविषयी कणव आदी गुण कथानायकात विषद होतात. आजच्या युवकांमध्ये हे गुण अंगी बाणावेत ह्या उद्दात्त हेतूने प्रस्तूत पाठ लिहीला आहे असे लेखकाने आम्हास खाजगी बैठकीत सांगितलेले आहे.
=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*

कथा: अधांतरी त्रिकोण

माझे नाव अमृत. आमचा मालेगावला कापडाचा कारखाना होता. निरनिराळ्या प्रकारचे कापड त्यात तयार होत असे. गावाच्या बाहेर मोठी जागा असल्याने आमचा कारखाना तेथे होता. गावात राहण्यापेक्षा आम्ही कारखान्याच्या आवारातच राहत असू. तेथे आमचा बंगला होता. बंगल्यातल्या वरच्या मजल्यावर माझी खोली होती. तेथेच मी अभ्यास करत असे. एखाद्या वेळी तेथे अभ्यासाला रहिम येत असे. अभ्यास करण्याऐवजी आम्ही मस्तीच जास्त करत असू. बंगल्याच्या बाजूची चिंच आणि जांभळाचे झाड टेरेसच्या उंचीची असल्याने आम्ही ती फळे पाडण्याचा प्रयत्न करत असू. आम्हाला ते जमत नसे. मग आमचे माळी काका लांब बांबूला आकडा लावून आम्हाला चिंच आणि जांभळे काढून देत. 

एका बाजूला असलेल्या कारखान्याच्या मोठ्या पटांगणाच्या बाजूला काही कामगारांची घरे होती. त्या घरांत मोजके, जे गरजू कामगार होते त्यांचीच राहण्याची सोय वडीलांनी केलेली होती. इतर कामगार आसपासच्या वस्त्यांमधून येत. कामगार आणत असलेल्या सायकलीपैकी लहान सायकल घेवून मी ती चालवायला तेथेच शिकलो.  मैदानात मी आणि कामगारांची मुले खेळत असू. आताच्यासारखा अभ्यास तेवढा काही नव्हता. तेव्हा मी काय असेल सहावी सातवीत. दुपारी बारापर्यंत शाळा सुटली की पूर्ण संध्याकाळपर्यंत आम्ही निरनिराळे खेळ खेळत असू. पकडापकडी, चोर पोलीस आदी खेळण्यासाठी किंवा लपण्यासाठी कारखाना आणि आमचा बंगला तेथील विस्तीर्ण पटांगण अगदी योग्य जागा होती. त्यात करीमचाचा यांचा मुलगा असलेला रहिम आणि वडीलांविना पोरकी झालेली देवीका हमखास असे. तसे आम्ही तिघेही एकाच वयाचे होतो. देवीकाला आम्ही सारे देवू म्हणत असू. तिची आई आणि मावशी आमच्याच कारखान्यात रंगकाम करणार्‍या विभागात काम करत असत.

मधूनच आम्हाला आठवण झाली की आम्ही कारखान्यात चक्कर मारत असू. आम्हाला तेथे पाहून वडील रागवत. कारखाना म्हटला की तेथे रांगेने यंत्रमाग, कापडाची रिळे, दोर्‍यांच्या बॉबीन्स आदी सामान पसरलेले असायचे. एकदा एक नवे मशीन कारखान्यात आणले आणि ते बसवतांना अपघात होवून करीमचाचा जायबंदी झाले. त्यांचा डावा पाय अधू झाला. त्या अपघातानंतर  ते कुबडी घेवून कारखान्यात हलके काम करायचे किंवा मेन गेटवर आल्या गेल्या मालाची नोंद ठेवायचे. कारखान्यातल्या वजन काट्यावर आम्ही वजन करणे, त्यात बसून झोका खेळणे आदी करत असू. मी मालकाचा मुलगा असल्याने कुणी हरकत घेत नसे. पण आता ते सारे आठवले की हसू येते. आम्हा लहान मुलांबरोबर नशीबाने कोणताही अपघात झाला नाही.

आमचा कारखाना एक प्रकारचे मोठे कुटूंबच होते. दिवाळीच्या दिवसांत फटाक्यांची रेलचेल असे. वडील हौसेने फटाके आणत आणि आम्ही लहान वयाची मुले फटाके फोडण्यास संध्याकाळपासून सुरूवात करत असू. रहिम तसा धिट होता. तो लहान फटाके हातामध्ये वात पेटवून फेकत असे. देवू तशी भित्री अन भोळी असल्याने तो नेमका तिच्या बाजूलाच फटाके फोडत असे. ते पाहून देवूची आई त्याला रागवे. मग मात्र तो पण शांतपणे इतर ठिकाणी फटाके फोडत असे.

ईदच्या दिवशी रहिमची आई, अमीनाबी, आम्हाला घरी खिरखुर्मा पाठवत असे. मला मात्र त्यांच्या घरीच तो खायला आवडत असे. ईदच्या दिवशी त्यांच्या चाळीतील अनेक कुटूंबे तेथे आलेली असत. तेव्हा खिरखुर्मा सगळ्यांना देतांना तिची बिचारीची धांदल उडत असे. एकतर खिरखुर्मासाठी काचेच्या वाट्या कमी पडत आणि त्यात लोकांची गर्दी. मग माझी आई स्वत:च कपाटातून काचेच्या वाट्या घेवून येई आणि रहिमच्या आईला मदत करत असे. आज मी मोठा झालो असलो आणि इतर ठिकाणी खिरखुर्मा खाल्लेला असला तरी त्या वेळच्या खिरखुर्म्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. तशी चव त्यानंतर कधीही चाखायला मिळालेली नाही. 
 
गणपतीच्या दिवसात रहिमचाचा मातीचा गणपती तयार करत असत. त्यांच्या हातात कला होती. दरवर्षी ते नव्या पद्धतीचा गणपती बनवत. मला आठवते, मी नववीत असतांना माझ्या आग्रहामुळे त्यांनी त्या वर्षी झुल्यावरचा गणपती केला होता. त्यांनी कारखान्यातले सामान वापरून तो झुला हलता केला होता. तो इतका आकर्षक झाला होता की तो देखावा पहायला अगदी सोयगाववरूनही लोक आले होते.

या दरम्यान आम्ही लहान मुले मोठी झाले होतो. दहावीला मला चांगले गुण मिळाले. आई तर अगदी आनंदून गेली होती. देवूला तर माझ्यापेक्षा कितीतरी अधीक गुण मिळाले होते. हुशारच होती ती. रहिम मात्र कमी गुण मिळाले म्हणून नाराज झाला होता. तसे त्याचे गुणही काही कमी नव्हते. चांगले ६२% होते ते. आणि गणितात तर त्याला दिडशे पैकी थोडेथोडके नव्हे तर १३५ गुण मिळाले होते. बिचार्‍याने इंग्रजीत मार खाल्ला होता.

माझा मोठा भाऊ अरिहंत हा वडीलांबरोबर कारखान्याचे काम बघत असल्याने मी सुद्धा कारखाना सांभाळण्याच्या कामाला आईचा तिव्र विरोध होता. मी शिकून काहीतरी वेगळे करावे अशी तिची इच्छा होती. तिच्या माहेरी, माझा मामाचा मुलगा पारस हा सीए झालेला होता. मी पण सीए च करावे असे त्याने आईला भरवलेले होते. सीए केले तर पुढे मी मोठा झाल्यावर कारखान्याच्या व्यापाला उपयोगात येईल असे त्याने वडीलांना सांगितले होतेच. आता आमचे अजून दोन कारखाने गावाच्या जवळ असणार्‍या एमआयडीसीत झाल्याने कामाचा ताणही वाढलेला होता. झालाच तर फायदाच होणार असल्याने माझी सीए होण्यास वडीलांची काहीच हरकत नव्हती. आईला देखील मी काहीतरी वेगळे करण्याचे समाधान लाभत होते.

या सर्व कारणांमुळे टीएनजे कॉलेजमध्ये मी कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. माझ्याच वर्गात देवीकाही होती. रहिमने सायन्सला प्रवेश घेतला. त्याचा माझा वर्ग आता वेगळा झालेला होता.

लहाणपणापासून देवीका माझ्या सोबत असल्याने तिच्याकडे मी काहीसा आकर्षित झालेलो होतो. रहिमलादेखील ती आणि तिलाही रहिम आवडत असावा असे मला वाटायचे. एक दोन वेळा मी त्यांना एकत्र बघून रहिमचा मला राग आलेला होता. देवू मात्र माझ्या वर्गात असल्याने मला तिच्याबरोबर जास्त वेळ राहता येत असे. आम्ही दोघेही माझ्या स्कुटरवरून कॉलेजला जात असू. तिचा आणि माझा खाजगी क्लास एकच होता. देवू आणि मी जास्तीत जास्त वेळ एकत्रच राहत असू. कॉलेजमध्ये वर्गमित्र आम्हाला एकमेकांच्या नावाने बोलवून चेष्टादेखील करत असत. तिच्या मनात काय आहे याचा मला पत्ता नव्हता. बरे, ती मला आवडते म्हणजे ते प्रेमच आहे असे मला वाटत नव्हते. मुख्य म्हणजे ती अभ्यासू होती. गरीबी जवळून पाहिली असल्याने तिला अभ्यासाचे महत्व पहिल्यापासुन पटलेले होते. त्यात बारावीचे वर्ष म्हणजे मोठा अभ्यास होता. शिकून तिला प्राध्यापक व्हावेसे वाटते असे तिने मला कित्येकदा सांगितलेले होते.

रहिम त्याच्या प्रॅक्टीकल्स आणि कॉलेज, क्लासमधून जेव्हा वेळ मिळे तेव्हा आमच्या मिसळे. जेव्हा जेव्हा ती रहिमशी बोले तेव्हा माझ्या मनात आक्रंदन सुरू होई. त्यांची घरेही आजूबाजूलाच असल्याने ते दोघेही माझ्या व्यतिरीक्त एकत्र असत. रहिम जरी माझा मित्र होता तरी देवीकेच्या बाबतीत त्याची मला असूया वाटत असे. देवीकाने केवळ माझ्याशीच बोलावे असे मला वाटे. मी मोठ्या घरातला आणि ती एका सामान्य घरातली असल्याने ती मला आपल्या प्रेमाबद्दल हो म्हणणार नाही असेही मला मनात वाटे. या लहान मोठेपणाच्या समजानेच ती रहिमशी मैत्री राखून असावी असेही एक मन म्हणत असे.

बारावीची परीक्षा संपली. आम्हा दोघांना चांगलेच गुण मिळाले होते. आम्ही दोघांनी रितसर त्याच कॉलेजध्ये पदवीसाठी प्रवेश घेतला. रहिमला इंजिनीअरींगच्या सीईटी परिक्षेत उत्तम गुण मिळाल्याने पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेजला प्रवेश मिळाला. करीमचाचा तर एकदम आनंदून गेले होते. त्याला होस्टेलवर सोडायला मी त्याच्याबरोबर पुण्याला गेलो असतांना रहिमने त्याचे मन मोकळे केले. देवीकाबद्दल माझे जसे प्रेम होते तसेच त्याचेही देवीकावर प्रेम होते. मी जसे तिला माझ्या प्रेमाबद्दल विचारू शकलो नाही तसे त्यानेही तिला कधी विचारले नव्हते की तसे भासू दिले नव्हते. देवू त्याच्याबद्दल किंवा माझ्याबद्दल असलाच विचार करत असेल याची त्यालाही खात्री नव्हती. मी त्याला होस्टेलवर सोडून निघालो तेव्हा तो हमसून हमसून रडला. देवू बद्दल तो जास्तच भावनाशील होता. मी देखील माझे देवूबद्दलचे मत त्याला सांगितले. प्रेमात गरीब श्रीमंत असला प्रकार नसतो याबद्दल तो मला अन मी त्याला खात्री देत होतो.

रहिमला सोडून मी गावी परतलो. माझे आणि देवूचे कॉलेज सुरू झाले. ती आता माझ्याबरोबर कॉलेजला येत नसे. परंतु आमचे नेहमीसारखे सरळ आयुष्य चालू झाले. रहिम जरी तेथे नव्हता तरी देवू काही त्याच्याबद्दल बोलत नव्हती. त्यांचा संपर्क आता होत नव्हता. त्याच्याबद्दल ती माझ्याकडे चौकशी करत नव्हती. माझ्याशी ती हसून खेळून राहत असे. कॉलेजमधल्या अभ्यासाविषयी गप्पा मारत असे. मैत्रीच्या पलिकडे बोलायला ती चुकूनही तयार नसे.

त्यावर्षी बाहेर पाऊस पडत होता. देवू अन तिची आई पावसात भिजत आमच्या घरी आल्या. देवूच्या आईने देवूचे लग्न ठरल्याची बातमी दिली. नवरा मुलगा त्यांच्याच समाजातला, सरकारी नोकरीत, पीडब्ल्यूडीत वरिष्ठ इंजिनीअर या पदावर होता. मुख्य म्हणजे तो देवूला पुढे शिकायला मदतही करणार होता. तिच्या एकंदरीत वर्तवणूकीवरून ती अगदी आनंदी भासत होती. माझ्या आईने साखर भरवून तिचे तोंड गोड केले. मला तर तो एक धक्काच होता.

त्या वर्षीच्या दिवाळीनंतर लगेचच देवूचे लग्न मुलाच्या गावीच लागणार होते.

फटाक्यांविना त्या वर्षीची माझी दिवाळी मात्र सुन्न होती.

- पाषाणभेद
१९/०७/२०२०

+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=
स्वाध्याय कृती
+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=+=
१) कृती करा.
(१) कथानायकाने सांगितलेल्या लहाणपणाच्या गमती: अ) ________________ आ) ______________
(२) कथेतील मुलगा खेळत असलेले खेळ: अ) ________________ आ) ______________
(३) कथेतील तिन पात्रे: अ) ________________ आ) ______________इ)______________
२) खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
(१) माळी काका लांब बांबूला आकडा लावून पैसे काढून देत असत.
(२) त्या वेळच्या खिरखुर्म्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.
(३) गणपतीच्या दिवसात करिमचाचा मातीचा गणपती तयार करत असत. त्यांच्या हातात कला होती.
(४) देवूच्या आईने देवूचे लग्न ठरल्याची बातमी दिली.
३) थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) अमृत रहिमला होस्टेलमध्ये सोडायला का गेला होता?
(२) देवीका आनंदात का होती?
(३) देवीका अन तिची आई लग्नाची बातमी सांगायला अमृतच्या घरी का गेल्या?
४) दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा पुन्हा भरा.
(१) देवीकाबद्दल माझे जसे ______ होते तसेच त्याचेही देवीकावर _______ होते. (अभ्यास, प्रेम, मन)
(२) आम्ही दोघेही माझ्या _________ कॉलेजला जात असू. (सायकल, स्कूटर, कार)
(३) देवू तशी भित्री अन _______ असल्याने तो नेमका तिच्या बाजूलाच फटाके फोडत असे. (अभ्यासू, कष्टाळू, भोळी)
५) व्याकरण
(अ) खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
(१) कारखाना म्हटला की तेथे रांगेने यंत्रमाग, कापडाची रिळे, दोर्‍यांच्या बॉबीन्स आदी सामान पसरलेले असायचे.
(२) मला तर तो एक धक्काच होता.
(आ) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.
(१) भोळीभाबडी
(२) पटांगण
६) स्वमत
(अ) "फटाक्यांविना त्या वर्षीची माझी दिवाळी मात्र सुन्न होती", या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
(आ) "तिच्या एकंदरीत वर्तवणूकीवरून ती अगदी आनंदी भासत होती.", या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
७) उपक्रम
पस्तुत पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांची यादी करा. त्यासाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहा.
८) तोंडी परीक्षा
'माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण' या विषयावर पाच मिनीटांचे भाषण सादर करा.

Monday, November 11, 2019

आंघोळ : एक कंटाळवाणी क्रिया

सदर लेख मिसळपाव.कॉम या संकेतस्थळाच्या दिपावळी २०१९ च्या दिवाळी अंकात छापला (हार्डकॉपी तसेच सॉप्टकॉपीत) गेला आहे.

(खालील लेख प्रचंड कंटाळवाण्या लेखकाचा अतिप्रचंड कंटाळवाणा आहे अन तो त्याने अगदी आळसात लिहिला आहे. लेख पूर्ण करण्यासही कित्येक दिवस - नव्हे, महिने लागलेले असल्याने तो आपणस कितपत रुचेल हे माहीत नसल्याने आपआपल्या जबाबदारीवर तो वाचावा. झोप येण्यासाठी वाचावयास उत्तम आहे. तरीही धीर करून वाचताना आळस आल्यास जिथल्या तिथेच थांबून एक आंघोळ करून यावी. किमानपक्षी तोंड धुऊन पुन्हा वाचनास बसावे. झालेच तर एक पाभेचा चहा मारावा. त्याही पुढे जाऊन वाचल्यास लेखाखाली प्रतिक्रिया देऊन आपण फारच सक्रिय आहोत असे सिद्ध करायच्या भानगडीत पडून नये. मस्तपैकी आळस करून लेखाला कचर्‍याची कुंडी दाखवावी किंवा ऑनलाइनच्या जमान्यातल्यासारखे 'इग्नोर' मारावे. लेख वाचून प्रचंड कंटाळा आल्यास याच लेखकाचा आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया हा लेख वाचून आंघोळ करून ताजेतवाने व्हावे.)
आंघोळीचा मला फार तिटकारा आहे. अगदी आळसच म्हणा ना! फार म्हणजे फारच. लहानपणी मला बळजबरीने आंघोळ घालायचे. ते अगदीच लहानपणी असावे. शालेय वयात कित्येकदा मी आंघोळीची गोळी घेऊन शाळेत गेलो आहे. तसाही प्रत्येक बाबतीत आळस हा माझ्या अंगाअंगात मुरलेला आहे. आंघोळीचेच पाहा ना! ती पाणी गरम करायची प्रक्रिया करा.. इलेक्ट्रिक हीटरचे बटण दाबा.. मग गरम पाणी येईल याची वाट पाहा. गॅस हीटरची तीच तर्‍हा. पूर्वी तांब्याचे बंब असायचे गरम पाण्यासाठी. आता तांब्याचे म्हणजे पाणी पिण्यासाठी तांब्या असतो तो नाही, तर तांबा हा धातू असतो. तुमच्यापैकी कुणी ते पाहिले नसतील. खेडेगावात अजूनही दिसतील. आताशा ते बंब गॅल्वनाइज पत्र्याचे असतात. पूर्वी ते तांब्याच्या धातूचे असायचे. एक दोन-अडीच फुटी उंचीचा अन दीड-पावणेदोन फुटी व्यासाचा तांब्याच्या पत्र्याचा दंडगोल असायचा अन मध्ये एक नळकांडे असायचे. खाली जाळी अन वरती झाकण असायचे. हा संच एका तिवईवर ठेवलेला असायचा. त्यात वरतून थंड पाणी घालण्याची सोय असायची अन खाली नळातून गरम पाणी बाहेर काढता यायचे. मधल्या पोकळ नळकांड्यात वरतून लाकडे टाकायची अन खालून ते पेटवायची, असा प्रकार असायचा.
हे बंब प्रकरण प्रचंड म्हणजे प्रचंड कंटाळवाणे काम असायचे. नळकांड्याच्या आत जाणारी लाकडे फोडून ठेवा.. ती लाकडे ज्याला बंबफोड म्हणत ते महिन्याच्या हिशोबाने वखारीतून आणा.. त्याचा साठा करा.. सकाळी उठून बंब पेटवा.. सगळ्यांच्या आंघोळी होईतो त्यात वेळोवेळी लाकडे अन थंड पाणी टाकत बसा.. गरम पाणी काढा.. राख काढा.. नसते उपद्व्याप. त्यापेक्षा मस्तपैकी आंघोळ न करता राहिलेले किती उत्तम! नको ती गरम पाण्यासाठी एवढी मरमर अन नको ती आंघोळ. मी तर कित्येक सकाळी अशा न-अंघोळीच्या घातलेल्या आहेत.* (*वाचकहो, हे वाक्य तीन-चार प्रकारे लिहिले होते. पण पुरोगामी टच असल्याचे हे योग्य वाटले आणि हेच कायम ठेवले.)
.
हे झाले बंबाच्या बाबतीत. बंब नसल्यास एका भांड्यात पाणी घेऊन ते पाणी गॅसवर तापवावे लागते.. बादलीतून बाहेरून गार पाणी प्रथम आणायचे.. ते त्या भांड्यात ओतायचे.. मग तापलेले पाणी परत बादलीत घेऊन ती बादली मोरीत नेऊन अंघोळ करायची.. किती ते उपद्व्याप! त्यातल्या त्यात सोलर असेल तर ठीक असते. पण गॅस हीटर असो, सोलर हीटर असो किंवा इलेक्ट्रिकल हीटर असो, त्रास हा असतोच. एक नळ चालू करून ते गरम केलेले पाणी बादलीत काढा अन दुसरा थंड पाण्याचा नळ चालू करून आधीचे गरम पाणी कोमट करण्यासाठी त्यात थंड पाणी मिसळा. त्यासाठी गरम अन थंड पाण्याचे कॉक चालू करावे लागतात. असे दोन दोन नळ - एक गरम पाण्यासाठी अन एक थंड पाण्यासाठी सुरू करावे लागतात. कित्ती कित्ती कंटाळवाणे काम आहे की हा नळ गरम पाण्याचा अन हा थंड पाण्याचा हे लक्षात ठेवणे?* (*मटा - गूगल ट्रान्सलेशन मेथड.) अन त्यातही एक नळ घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने अन दुसरा नळ घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवावा लागतो. म्हणजे ते कंटाळवाणे कामही लक्षात ठेवा. परत गरम पाणी खूपच गरम असेल तर त्यात हात घालून किती गरम आहे ते पाहावे लागते. पुन्हा त्यात उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या ऋतूप्रमाणे गरमपणाचे प्रमाण कमी जास्त असते. त्या पाण्यात आपल्याला सोसवेल असे थंड पाणी योग्य प्रमाणात मिसळणे खूपच कंटाळवाणे काम आहे.
हे झाले बादलीत पाणी काढण्याबद्दल. शॉवरसाठी हीच क्रिया जास्त कंटाळवाणी होते. न भिजता शॉवरच्या बाहेर राहून दोन्ही नळ योग्य त्या प्रमाणात फिरवायचे. नंतर योग्य तापमानाचे गरम अथवा गार-कोमट पाणी येईपर्यंत वाट पाहायची. सकाळी सकाळी खरोखर कंटाळवाणे काम आहे हे. एवढे केल्यानंतर आपल्याला आंघोळीसाठी कामगारांच्या भाषेतल्यासारखी 'चाल' भेटते. तुम्ही म्हणाल की आता बाजारात पाण्याचे तापमान दाखवणारे नळ आले आहेत ते. अहो, पण त्याचे तापमान आधी सेट करावेच लागेल ना? अन निरनिराळ्या ऋतूसाठी निरनिराळे तापमान कसे लक्षात ठेवायचे? आजकाल हवामान इतके बेभरवशाचे झाले आहे की एका दिवशी थंडी, दुसर्‍या दिवशी पाऊस अन तिसर्‍या दिवशी कडकडीत उनही पडते. एवढे कष्ट आंघोळीसाठीच्या पाण्यासाठी घ्यायचे फारच कंटाळवाणे काम आहे.
आता तुमचे (म्हणजे माझ्यासाठीचेच. शास्त्र असते ते म्हणण्याचे.) योग्य तापमानाचे पाणी काढून झाले तर मग प्रत्यक्ष आंघोळीला बसावे लागते. हे आंघोळीला बसणे फारच कंटाळवाणे काम आहे. त्यापेक्षा शॉवरखाली उभे राहणे हे एकदम सोपे आहे. पण शॉवरखाली उभे राहिले अन अंघोळीदरम्यान साबण हातातून सटकला, तर तो उचलायला खाली वाकणे खूपच कंटाळवाणे काम असते. साबण जर लांब घरंगळत गेलेला असला, तर तेथपर्यंत जाणे हे फरशीवरून सटकण्यालाही कारणीभूत ठरत असते. त्यामुळे मनात ती धाकधूक असते. जरी डोके धुवायचे नसेल तरी पंचवीस टक्के डोके या शॉवरमुळे भिजतेच भिजते. मग ते आणखी जास्त टक्के डोके भिजणार नाही याची काळजी घेत आंघोळ करावी लागते. त्यापेक्षा पाटावर बसून व बादलीत पाणी घेऊन केलेली आंघोळ परवडते. शॉवरखाली आंघोळ ही जास्त जागरूक राहून करावी लागते अन पाटावर बसून केलेली आंघोळ जास्त आळशीपणात होते, हे माझे निरीक्षण आहे. बसून आंघोळ करण्यात साबण सटकला तर जास्त लांबवर घरंगळत नाही. आपल्या शरीराच्या परीघातच तो पडतो अन त्यामुळे चेहर्‍याला साबण फासला असतानाही अंदाजाने चाचपडत हाताने शोधता येतो. बसून केलेल्या आंघोळीमध्ये डोके ओले करायचे नसल्यास शंभर टक्के आपण त्यात यशस्वी होतो, हा मोठा फायदा आहे. डोके ओले न केल्याने पुढे आंघोळ संपल्यानंतर ते पुसण्याचा प्रश्नच येत नाही. वाचलेला वेळ इतर आळशीपणात घालवता येतो. तसेही डोके धुवायचे असल्यास शॅम्पू, कंडीशनर वगैरेच्या पुड्या ओल्या हातांनी कशा फाडायच्या? हा मोठाच प्रश्न असतो. कारण आंघोळीच्या सुरूवातीला आळशीपणा होत असल्याने त्या पुड्या कातरीने न कापण्याचा आळशीपणा या वेळेपर्यंत नडतो. मग दातांनी त्या पुड्या फाडाव्या लागतात. बसून आंघोळ केल्यास त्या पुड्या वेळेवर हाताशी, किमानपक्षी पायाशी येतात हा मोठा फायदाच आहे. आंघोळीचा आणखी एक प्रकार म्हणजे टब बाथ. सर्वसामान्यांना याचा लाभ होत नाही, पण मग एखाद्या हॉटेलातल्या मुक्कामी याची चव बर्‍याच जणांनी चाखलेली असते. हा स्नानाचा एकदम शाही अन एकदम आळशी प्रकार आहे. पूर्ण टब पाण्याने भरून घ्यायचा. मग त्या पाण्यात शिरायचे. गुलाबाच्या पाकळ्या, साबणाचा फेस, जोडीने आंघोळ आदी सिनेमातल्यासारखे प्रकार तुमच्या डोळ्यासमोर आलेही असतील.
.
आंघोळ एकदाची संपल्यास पाटावरून उठावे लागते किंवा शॉवरच्या बाहेर यावे लागते. मग टॉवेल शोधणे, अंग, डोके पुसणे इत्यादी क्रिया कराव्या लागतात. परदेशात ( म्हणजे अमेरिका हं) आतापर्यंत वॉशिंग मशीनमध्ये कपडे सुकवण्यासाठी जसा ड्रायर असतो, तसा माणूस सुकवण्याचा ड्रायर वापरातही आला असावा. मला हे परदेश म्हणजे अमेरिका, नॉर्वे, स्वीडन, कॅनडा, इंग्लंड आदी उत्तर गोलार्धातील देश फार आवडतात. तेथील थंड हवामानामुळे आंघोळीची गरज नसणे अन आंघोळ न करता आठवडेच्या आठवडे तसेच राहणे किती आनंददायक असू शकते, हे तेथे राहिल्यावरच समजेल.
अशी आंघोळ एकदाची पार पडल्यावर कोरडी अंतर्वस्त्रे परिधान करणे हा एक उपद्व्यापच असतो. अंडरपँटमध्ये पाय घालण्यासाठी एक पाय ओल्या फरशीवर - लादीवर असतो अन एक पाय आधांतरी हवेत असतो. दोन हातातली उघडी अंडरपँट तोंडाचा आ करून पायाचा घास घेण्याच्या तयारीत असते. या वेळी हटकून ओला पाय त्या पँटच्या कापडावर घासला जातो अन ती पँट ओली होते. त्यामुळे पाय लवकर त्यात जात नाही. बाथरूमध्ये शेकडा ६७.८९%* घसरून पडण्याचे प्रकार याच वेळेस होतात. (*अशी आकडेवारी लिहिल्यास अन त्यातही शेकडा, टक्केवारी आकडे वापरल्यास लेखक किती शास्त्रीय विचारसरणीचा आहे यावर वाचकांचा विश्वास बसतो. हे रहस्य मी तुम्हाला आपले जवळचे संबंध आहेत म्हणून सांगितले आहे. इतर कुणाला सांगू नका.)
आंघोळ झाल्यानंतर बाहेर येऊन इतर कपडे घालणे हे एक काम असते. ते आटोपल्यानंतर केस सुकवणे बाकी असते. आळस हा माझा मित्र असल्याने मी जास्त केस ओलेच करत नाही. मग ते कोरडे करणे आठवड्याच्या हिशोबाच्या मानाने कमी होते. तरीही आंघोळ केल्यानंतर किमान केस विंचरावे तर लागतातच. तेल लावणे होत असल्यास हात तेलकट होतात अन मग ते तेलकट हात हँडवॉशने किंवा साबणाने पुन्हा धुवावे लागतात. ते झाल्यानंतर पावडर लावणे, बॉडी डिओ मारणे करावे लागते. ते एक वाढीव काम असते. महिलांच्या बाबतीत नटणे, सजणे आदी प्रकार असल्याने त्याला वेळेचे बंधन नसते.
आपल्याला (की दुसर्‍याला?) कोणता सुवास आवडतो त्या सुवासाची पावडर, डिओ दुकानात जाऊन निवडणे हे आंघोळीच्या अनुषंगाने येणारे कंटाळवाणे काम आहे. साबण निवडतानाही तसेच होते. किती ते साबण, त्याचे प्रकार अन सुगंध! माणूस वेडाच होईल निवडताना. उत्तर कोरियातल्या किम जाँग सरकारने तेथल्या सर्वसामान्य नागरिकांना एकाच रंगाचे - शक्यतो राखाडी रंगाचे अन एकाच प्रकाराचे शर्ट-पँट शिवायची परवानगी दिली आहे. मोदी सरकारनेही या साबण, पावडर अन डिओ-सुगंध तयार करणार्‍या कंपन्यांवर असले निर्बंध येथे लादायला हवे. एकाच आकार, प्रकार अन सुगंधातील साबण, पावडर, शॅम्पू, डिओ तयार करण्याची परवानगी सरकारने द्यायला हवी. त्यातून कितीतरी माणसांचे अन स्त्रियांचे मानवी तास/ वेळ या उत्पादनाच्या निवडण्याच्या वेळेतून वाचतील. नागरिक स्वच्छ भारत अभियानात या वाचलेल्या वेळेचा सदुपयोग करतील. तसेही आंघोळ करणे हे ही स्वच्छ भारतमध्येच गणले गेले पाहिजे. म्हणजे मोदी सरकारच्या अशा आकडेवारीत आणखी भर पडेल अन सरकार या उपक्रमाचे फुगवलेले आकडे ते आणखी फुगवू शकतील.
हे असले आंघोळीदरम्यानचे वेळखाऊ, कंटाळवाणे प्रकार करण्यापेक्षा आंघोळ न करता दिवसच्या दिवस आळशीपणात घालवणे हा एक उत्तम उपाय आहे, असे माझे ठाम मत आहे. आंघोळ न करण्यामुळे पाणी वाचवले जाऊन पर्यावरणाच्या संवर्धनास आपण एक प्रकारे मदतच करत असतो.

Tuesday, September 24, 2019

पाभेचा चहा

चहा पिणे अन पाजणे हे काही आपल्याकडे पुर्वी नव्हते. पुर्वी चहा नव्हताच. लोक गुळपाणी देवून स्वागत करायचे. नंतर कधीतरी बोस्टन टी पार्टी झाली. अमेरीका स्वातंत्र्य झाली. ब्रिटीश भारतात आले. चीन मधल्या चहाला शह देण्यासाठी त्यांनी चहाची भारतात लागवड केली अन त्यानंतर चहा भारतात उत्पादीत होत गेला. चीन नंतर भारत चहा उत्पादनात दोन क्रमांकावर गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रेल्वेस्थानकांवर चहा विकला जावू लागला. चहाची विक्री जाहीरात करून केली गेली. चहा पिणे कसे चांगले हे जाहिरात करून सांगितले जायचे. नंतर लोक चहाचे चाहते झाले. मला आठवते ब्रूक ब्राँडचा चहा एका लाल रंगाच्या तिन चाकी हातगाडीवर आठवडे बाजारात विकायला यायचा. तो घ्यायला गर्दी व्हायची.
बरे चहाचे प्रकार तरी किती? साधा चहा, स्पेशल चहा, सुंठ घातलेला चहा, मसाला चहा पत्ती चहा, भरपुर दूधाचा चहा, काढा, तुळशी अन गवत टाकलेला गवती चहा, आयुर्वेदीक चहा, ब्लॅक टी, लेमन टी, ग्रीन टी, हर्बल टी, पिवळा चहा, बॉबी, कट, टक्कर, मारामारी, अगदी मनमाडी चहा देखील आहे.
तुम्हाला आण्णाचा चहा अन नानाचा चहा माहीत आहे काय? आपल्या दुकानात गिर्‍हाईक आले तर त्याला खरोखर चहा पाजायचा असेल तर नोकराला आण्णाचा चहा आणायला सांगायचे. अन तेच फुटकळ टाईमपास करणारे गिर्‍हाईक असेल तर नानाचा चहा मागवीत अन तो येत नसे, किंवा उशीरा येत असे अन गिर्‍हाईक तो पर्यंत कंटाळून निघून जात असे.
अनेक देशोदेशी चहा तयार करण्याचे अन तो पिण्याचे तंत्र निरनिराळे असते. चिनी चहा, कोरीयातला चहा, जपानमधला चहा, अमेरीकेतला चहा.
चहाची बहीण कॉफी अगदी निराळी. तिने तर मोठमोठ्या कॉफीशॉपच्या कंपन्या काढल्या ज्या शेअर मार्केटमध्ये लिस्टेड झाल्या. पण कॉफी हा लेखाचा विषय नाहीये.
चहा हा ताजा केलेला असेल तरच चांगला. उकळून कडक झालेला चहा हा अ‍ॅसीडीटीला आमंत्रण ठरतो. काही जण चहा अजिबात पित नाही. अर्थात असे लोकं विरळेच. मग ते दूध तरी घेतात. हातावरचे पोट असणारे कित्येक जण भूक मारण्यासाठी चहा पितात. काही जण चहाबरोबर पाव, टोस्ट, बटर, खारी, नानकटाई, स्लाईस आदी खावून भूक भागवतात. चहासाठी लोकं फिरायला जातात. लोक निमित्त काढून चहा पितात. काही जण दिवसाला दहा बारा कप चहा पितात. चहा प्यायला बोलावणे हा आदरसत्काराचा भाग मानल्या जावू लागला. एखाद्याला भेटायला घरी गेलो अन चहा दिला नाही तरी लोक नाराज होतात. चहाचे पाणीदेखील पाजले नाही असा उल्लेख करतात.
जुनी गोष्ट आहे. खरी आहे. माझ्या पाहण्यात एक चहा विक्रेता आहे. नव्वदच्या दशकातली. तो सायकलवर चहा खेड्यापाड्यात विकत असे. आमच्या गावाजवळ रेल्वे जाते अन तेथल्या नदीवर रेल्वेपुलआहे. एकदा रेल्वे पुलावरून तो सायकल ढकलत चालला होता. तिकडून रेल्वे आली अन हवेच्या झोतामुळे तो उंच पुलावरून खाली कोसळला. नदीत पाणी वगैरे होते की नाही ते माहीत नाही. पण तो जबर जखमी झाला. नंतर हॉस्पीटलात राहीला. त्यानंतर त्याला कोणतेही अन्न पचेनासे झाले. काहीही खाल्ले तर ते बाहेर पडत असे. नंतर त्याच्या घरच्यांनी वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा त्याचेवर प्रयोग केला. काहीच पचेनासे झाले. नंतर शेवटी ते अशा निष्कर्षापर्यंत आले की त्याला चहा पचतो! मग सुरूवातीला चहाचे पाणी अन नंतर काही दिवसांनी थोड्या जास्त दूधाचा चहा हाच त्याचा आहार झाला. बरे एवढाच आहार असूनही ती व्यक्ती शारीरिक कष्ट करत असे. किराणा दुकान चालवत असे. सायकल चालवत असे. तर चहा विकतांना अपघात झाला अन शेवटी चहाच त्याचा आहार बनला. जवळपास दहा एक वर्षे ती व्यक्ती चहावरच होती. तुम्हाला खोटे वाटेल हे. नंतर आम्ही गाव बदलले. त्या व्यक्तीनेही गाव अन व्यवसाय बदलला. मध्ये काही काळ गेला अन ती व्यक्ती शहरातल्या एमआयडीसीत एका कंपनीत सायकलवर जेवणाचे डबे पुरवतांना दिसली. शारीरिक ठेवण तशीच शिडशीडीत राहीली होती. असो.
खेडेगावात दूधाची कमतरता असते. जे दूध निघते ते सकाळीच शहरात विकायला पाठवले जाते. मग एखाद्या लहानग्याला हातात पेलाभर किंवा पाच दहा रूपयाचे दूध घ्यायला ज्याचे घरी दूभते असते त्याकडे पाठवतात. तर एकदा एका ठिकाणी मी पाहूणा गेलो होतो. खेडेगावच ते. दूध मिळालेच नाही. साखर नव्हती, गूळ होता. मग त्या माऊलीने गुळाचाच काळा चहा मला पाजला. मला तर त्याचे काही वाईट वाटले नाही कारण तसली परिस्थीती मला माहीत होती. पण त्या माऊलीच्या डोळ्यात पाणी दिसले. अशासाठी की आलेल्या पाहूण्याला बिन दूधाचा, बिन साखरेचा चहा पाजला. त्याच्याच जवळपासचा अनुभव असा की एका माऊलीने चहा बनवला. तेथेही दूध नव्हते. साखरेचे नाही आठवत पण त्या माऊलीने पावडरचे दूध बनवले अन मग मला चहा पाजला.
चांदवडला आम्ही लहान असतांना देवीच्या दर्शनाला गावातून पायी गेलो. येतांना ढग भरून आले. अन जोरात पाऊस चालू झाला. आम्ही पूर्ण भिजलो. गाव तर लांब होते. आडोशाला काहीच नाही. रस्त्यात एका झोपडीत आम्ही गेलो. तेथे विस्तवाचा उबारा भेटला. तेथे त्या मालकाने चहा करून दिला. पण तेव्हढ्यात जोराचा वारा आला अन त्या वार्‍याने झोपडीचे एका बाजूचे कूड उघडे पाडले. आम्हाला वीजच कोसळली की काय असे वाटले पण तसे काही झाले नव्हते. असा प्रसंग लक्षात ठेवणारा चहा अन असे चहाचे अनुभव.
आताशा अनेक चहाचे ब्रांड तयार झालेले आहेत. अमूक चहा, अमृततुल्य इत्यादींची फ्रांचायजीचा धंदा झाला आहे. (म्हणूनच या लेखाला मी "पाभेचा चहा" असे नाव दिले आहे हे चतुर वाचकांच्या लक्षात आलेच असेल. तर आपण आता आपला लेखक पुढे काय म्हणतो आहे ते पाहूया.)
तर अशा ब्रांडांच्या किंवा फ्रांचायजींच्या चहाच्या दुकानात पु.ल. म्हणतात तसे आपले खायचे पान घेवून पानाच्या दुकानासारखे पान तयार करण्यासारखे वाटते. तेथे आपूलकी नसते. विक्रेता केवळ किती कप धंदा झाला याचा विचार करतो. एका कपात दोन जण चहा पिवू शकत नाही. उभे राहून चहा पिणे अन तेथून निघून जाणे एवढेच साध्य होते. चहा बरोबर गप्पा होत नाहीत. किंबहूना गप्पांसाठी चहाच्या दुकानात गेले तर त्याची लज्जत काही औरच असते. या नव्या कार्पोरेट चहाच्या दुकांनात हे साध्य होत नाही. उकळीचा चहा तेथे भेटत नाही. आधीच उकळलेला अन थर्मासमधला रेसेपीदार, त्यांचा प्रोप्रायटरी फॉर्मुला असणारा चहा तेथे भेटतो. त्यामुळे तसला फ्रांचायजीचा चहा पिवून खरा चहा पिण्याचे समाधान होत नाही. आणि तो चहा तुलनेने थंडदेखील असतो हा माझा अनुभव आहे. उकळीच्या चहातली मजा नाही त्यात. तो चहा फक्त पोटात जातो. त्याने पोट भरत नाही. ते चहाचे दुकान म्हणजे त्या दुकान मालकाची अधिकची आर्थिक गुंतवणूक असते. अन टपरीवरचा चहा म्हणजे त्या दुकानदाराचा संसार असतो.
असो. चहात पाणी टाकतात किंवा पाण्याचा फुळकट चहा असतो तसे लेखात अनेक संदर्भ येवून हा चहावरचा लेख मोठा होवू शकतो. चहा पोहे अन त्या बरोबरचे किस्से, चहा बरोबर खायचे पदार्थ घेवून केलेला लेख, चहा कशात घेतात त्या वस्तू, त्यांची ठेवण. असे केले तर हा लेख म्हणजे चहाचा मळाच होईल. म्हणून असो.
चहा हा फक्त चहाच नसतो तर तो एक आपूलकीचा धागा असतो. आणि असेच धागे काढत काढत अन ते विणून विणून त्याचे असले लेखवस्त्र होते.
अन हो, तुम्ही प्रतिक्रीया देवूनही हा चहालेख वाढवू शकतात ना!
( हा चहाचा लेख मागच्या आठवड्यात लेखनाच्या आधनावर ठेवला होता. मग एक एक अनुभवाच्या, प्रसंगांची सामग्री यात टाकत गेलो. अन आज हा चहा लेख उकळी पावला अन तो तुम्हाला गाळून (मुद्रीतशोधन करून) देतो आहे. त्याचे प्राशन करा अन कसा झाला आहे तेही सांगा.)
- पाषाणभेद
२४/०९/२०१९

Sunday, June 23, 2019

दे दे दे दे दे दे दे

दे दे दे दे दे दे दे
अगं दे दे दे दे दे दे
जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे
जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे
किती वेळ झाला सारखा हातात घेते
तु जशी मालकीण मी पण मालक आहे
माझ्याच घरात मला चोरी झाली
मालकपणाची शान थोडी तरी दाखवू दे
दे दे दे दे दे दे दे
सारखं सारखं नवर्याला घालून पाडून बोलते
(चाल सोडून:-
भाजी आणा, दळण आणा, इस्त्री करा, डबा भरा)
महत्वाचे ते काम सोडून इतर कामे करवते
वैतागलो मी आता मला विरंगुळा हवा थोडा
सारखा रिमोट हातात ठेवते थोडा मला पण दे
सगळी क्रिकेट मॅच नाही पण हायलाईट्स तरी पाहूदे
दे दे दे दे दे दे दे
अगं दे दे दे दे दे दे
जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे
जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे
अगं दे ना गं
- पाषाणभेद
१८/०६/२०१९

Thursday, September 1, 2011

दिवाळीकथा: चंद्या सख्याची सहल

दिवाळीकथा: चंद्या सख्याची सहल

चंद्या आन सखाराम दोघं जिगरी दोस्त हुते. शाळंत जायचं बरूबर. इटीदांडू खेळायचं बरूबर. त्याल, साकर, बा ची तमाखू, इडी आनाया गावात बरूबर जात. सकाळची शाळा सुटली म्हंजे संगच दोघांच्या बकर्‍या बरूबर चरायला रानात न्येत आसत. चंद्याच्या ५ आन सख्याच्या ८ बकर्‍या व्हत्या. रानात जातांनाबी त्ये मजा करत जात. कुनाच्या बांधावरच्या बोरी झोडपाया थांबत तर कधी कुनाच्या उसात शिरून मनगटाएवढा जाड उस तोडून खायाला सुरुवात करत.

शेळ्या घेवून तसं त्ये मदुनच माळावरनं जात. तिथं थोड्या येड्या बाभळी व्हत्या. चंद्यापाशी इळा बांधेल लांब बांबू व्हता. दररोज तिथं एखांदी बाभूळ त्ये खरवडत आन शेळ्यांना त्यो पाला खाऊ घालत. नंतर पुढं हत्ती नदी लागे. तिथं सगनभाऊचा मळा व्हता. त्याच्या बांधावर एक डेरेदार आंब्याचं झाड व्हतं. एकजन बकर्‍यांच्या मागं थांबून उरल्याला एकजन बरूबर आनल्याली भाकरी खाउन घेई आन मंग दुसर्‍याची जेवायची पाळी व्हई. त्येंला जेवाया आल्याचं पाहून मळ्यातला सालदार त्येंला पानी पेयाला हिरीची मोटार चालू करी. शेळ्याबकर्‍या नदीचं पानी पिवून आल्या की मंग त्ये दोघं बी पुढं तवलीच्या टेकाडावर जात आन बकर्‍यांनी प्वाटभर चारा खाल्ला का ते समदे माघारी फिरतं. दिवेलागन व्हईपत्तूर त्ये घरी येत. आल्यानंतर बकर्‍यांना बांधून तेंची आय बकर्‍यांचं दुध काढी. गावातले काहीजनं मंग रुपाया दोन रुपायाचं दुधं ध्येवून जाई. तशी काय जास्त कमाई नाही पन घराला त्येवढाच आधार व्हई.

चंद्याला उसाचं लई याड व्हतं. शेळ्या चारायला जातांना त्यो कोनाच्यातरी उसात शिरं आन एखांदा उस तोडून खायला लागं. सख्याला उसाचं त्याच्याएवढं याड नव्हत. तरीबी चंद्यासंगती राहून कधीमधी उस खाई. आता उस तोडनं न्हेमीचंच झालं म्हंजी कायकाय मळेवाले त्यांच्यावर वरडत. मंग चंद्या त्या मळ्यात जात नसं.

एकडाव चंद्या आन सख्या गांधीबाबाच्या सुटीचं घरीच व्हते. सख्याच्या बा ला तीन शेरडं विकाया शेरात न्यायचं व्हतं. त्यामुळं त्यो काय बकर्‍या चारायला नेनार नव्हता. आता सख्या बकर्‍या चाराया येत नाय हे पाहूनशान चंद्यानं घरी कांगावा क्येला आन त्यो बी घरीच र्‍हायला. त्याच्या म्हतारीनं मातर त्येला बकर्‍यांसाठी झाडाचा पाला आन थोडा घास आनाया सांगितला तवा चंद्यानं सख्याला हाक मारून बोलावून घेतलं. दोघांनी समोरच्या बाभळीचा पाला खरडला, दोनचार फांट्या तोडल्या अन त्यांच्या बकर्‍यांसाठी घरी आनून टाकला.

आता त्ये दोघंबी मोकळेच व्हते. बाभूळ झोडपतांना चंद्यानं सख्याला एक गोष्ट सांगितली. आजच्या सुट्टीच्या दिशी साकरकारखान्यावर उस खायला जायचं चंद्याच्या मनात व्हतं. त्ये त्यांनं सख्याला बोलून दावलं. सख्या तर सुट्टी कशी घालवायची याचा विचारच करत व्हता. नायतरी गोट्या इकत घेवून खेळाया त्याच्यापाशी पैकं नव्हतं अन जरी गोट्या घेतल्याबी तरी त्यो चंद्याबिगर थोडीच खेळणार व्हता? आन इटीदांडू खेळाया बाकीचे गल्लीतले प्वारं तयार नव्हते. मंग दोघांनीबी साकरकारखान्यावर जायाचं ठरीवलं.

त्यांच्या वाडीपास्नं ४ मैलावर भाऊसाहेबनगरचा आण्णाभाव सहकारी साकर कारखाना व्हता. चंद्या मागल्यावर्षीच तिथं त्याच्या बा बरूबर सायकलवर ग्येला व्हता. तिथं त्यांच्यावाली सायकल पंचर झाली व्हती आन त्याचा बा चंद्यावर इनाकारन डाफरला व्हता. त्यायेळी सायकल दुकानीत पंचर काढायच्या येळी त्यानं एका टरक मधून उस खाल्यालं त्याला आठवलं. आन म्हनूनच आजच्या सुट्टीच्या दिशी त्यानं कारखान्यावर जायाचं ठरीवलं व्हतं.

घरी दोघंबी त्यांच्या आयांना 'आमी सांजच्याला येवू गं' सांगून निघाले. चंद्याच्या आयला वाटलं आज त्ये सुटीचं हत्ती नदीत मासं मारायाला जात आसतील. आज काय दोघा सौगड्यांकडं शेरडं नव्हती अन भाकरतुकडाबी नव्हता. दोघंबी मोकळेच चालत व्हते. त्येंच्या गावापास्न साकरकारखान्यात जायाला दोन रस्तं व्हत. म्हंजी तसं पक्का रस्ता एकच व्हता अन दुसरा रस्ता आगीनगाडीचा व्हता.

आगीनगाडीचा साकरकारखान्यापासून आगदी जवळून जात आसूनबी साकरकारखान्याला रेल्वे टेसन नव्हतं. तिथंली सम्दी साकरेची पोती चंद्या-सख्याच्या गावच्या टेसनावर यायची. तिथं मोठं गोडावन बी व्हतं. सख्याचा बा कधीमधी तिथं पोतं उचलाया जायचा. त्या गोडावन च्या फर्लांगभर आंतरावरून डांबरी रस्ता सरळ म्होरं कारखान्यावरच जायचा. आन गोडावन च्या जवळूनच दोन रेल्वेचे रूळ सरळ कारखान्याच्या मागच्या अंगावरून पुढं जायचे. त्ये रुळ भाऊसाहेबनगरच्या साकरकारखान्याच्या गाडीतळाजवळून म्होरं जायचे. गाडीतळावर उसं भरलेल्या बैलगाड्या, टरका, टॅकटरं रांगंनं उभं रहायचं. हंगामाच्या येळीतर कदी कदी संबंर टरकाबी लायन लावून थांबत. लय मोठं मैदान व्हतं. आख्या पंचक्रोशीत भाऊसाहेबनगरचा आण्णाभाव सहकारी साकर कारखाना मोटा व्हता. एकायेळी दोन दोन गव्हानी चालत. गळीत हंगामात चार लाख साकरंची पोती उतारा मिळत व्हता. पुढारीबी मन लावून एकीची कामं करायची. त्यामुळं त्या कारखान्याचा कामगार आन त्या कारखान्याला उसं देनारे शेतकरीबी सुखाचे दोन घास जास खायाचे. टरका थांबत त्या मैदानाच्यासमूरच आण्णाभावचा ऐन जवानीतला आसनारा पुतळा व्हता. त्याच्या म्होरं आता नवीनच झाल्याली दुकानांची रांग व्हती. त्या दुकानांमदी चार पाच हाटेली, एकदोन न्हाव्याची दुकानं, एखांदं कापडं शिवायचं शिंप्याचं दुकान, दोन मोटरगॅरज, दोन पंचरवाल्याची दुकानं हारीनं लागलेली व्हती. मैदानाच्या दुसर्‍या टोकाला बैलगाड्या उभ्या राहत. तिथं साताठ टपर्‍या हुत्या. एकदोन बिडीकाडी चा पान्याचं दुकानं व्हती. मदीच कदी कदी एखांदा गडी हातगाडीवर केळं बिळं इकत बसल्याला आसं.

चंद्याला त्ये सम्दं आटवलं. मागं एकडाव त्याचा बा सायकल पंचर झाली तवा तिथंच तर डाफरला व्हता. उसाच्या नादानं त्याच्या तोंडाला पानी सुटलं. त्यानं लगोलग सख्याला रेल्वे रूळावरनंच थेट गाडीतळावर जायाचं का त्ये इचारलं. तसं गेलं म्हंजी ते थोडं लवकर पोचनार व्हते. सख्यालाबी मजा वाटत व्हती. त्यामुळं दोघं रुळावरूनच चालाया निघालं.

वरून उन आग टाकीत व्हतं आन हे दोघं रुळावरून चालत व्हतं. उनाची सवय आसल्यामुळं त्येंला उनाची कायबी फिकीर नवती. दोघांच्या बी पायात शिलीपर व्हत्या. चटकपटक चटकपटक आवाज करून दोघंबी मधल्या शिमेटच्या फरश्यांवरून माकडागत उड्या मारत, पळत चालत व्हते. त्ये चालत आसनारं रूळ सायडींग चे व्हते. त्यामुळं तिथंनं कोनतीच रेल्वेगाडी जात नसं. मदीच त्ये एका लहान पुलावर थांबले. मागून एका मालगाडीचा आवाज त्यांनी ऐकला. रुळाच्या खाली आसनारी एकदोन खडी चंद्यानं रूळावर ठेवली. सख्यानंबी चंद्यासारखंच केलं. धाडधाड करत मालगाडी त्या दगडांवरून गेली. दगडांचा चक्काचूर झाला.

चंद्या-सख्या आता रूळांवरून थोडं पुढं गेले. आता कारखान्याची हद्द सुरू झाली व्हती. एका टेकाडाच्या मागून गेलं की मंग गाडीतळ लागनार व्हता. त्या टेकाडाच्या खालीच कारखान्यानं उसाची मळी साठवायचे पाच सहा तळी केलेली व्हती. चंद्या-सख्या जसे जसे त्या उसाच्या मळीच्या तळ्यांच्या जवळ आले तसतसा त्या मळीचा आंबूस वास जास्तच यायला लागला. चंद्या-सख्यानी त्यांच्या नाकावर हात ठिवलं. पन किती येळ हात ठिवनार? त्ये दोघं हासाया लागले. आन आता त्यांच्या नाकपुड्या त्या वासाला सरावल्या व्हत्या. त्ये पुढं निगाले. थोडं पुढं गेल्यावर त्यांला उसं भरलेल्या बैलगाड्या लागल्या. लायनीत बैलगाड्या उसं भरून उभ्या व्हत्या. बैलांच्या मानंचं जू उतरलेलं व्हतं. कारखान्यानं केलेल्या निलगीरीच्या झाडांच्या सावलीत गाडीवानांनी बैलं बांधली व्हती.

एका हापशावर जावून चंद्या-सख्यानं पानी पिलं. हातपाय तोंड धुतलं. चंद्याला उस खायची घाई झाली व्हती. चंद्या एखांद्या मळ्यातला उस तोडायला जायी तवा एखांदा शेतकरी त्याच्या अंगावर धावून जाई. 'उस तोडू नको' म्हने. त्ये आटवून चंद्या एका बैलगाडीजवळ गेला. मागून एक उस त्यांनं मागं वढला. पुरा उस हातात आला. मंग चंद्यानं मांडीवर त्या उसाचे दोन तुकडे केले आन एक भाग सख्याला दिला. उस खात खात त्ये पुढं निघाले.

पुढं आल्यावर मोटं मैदान लागलं. तिथं पन्नास टरका तरी उस घेवून उभ्या व्हत्या. चंद्याला उसाचा मोटा खजीनाच गावला. त्येनं हातातला उस टाकून दिला आन त्यो एका टरकेजवळ आला. टरकंजवळ कोन न्हाय ह्ये पाहून तो मागच्या चाकावर पाय ठेवून टरकंवर चढला. डाव्या हातात त्यानं उसाची मोळी बांधलेला लोखंडी दोर धरला आन उजव्या हातानं एक उस मागं वढला. उस त्यानं खाली सख्याकडं फेकला. नंतर आनखी एक उस चंद्यानं खाली फेकला. सख्यानं लगोलग दोनी उस उचलले. चंद्यानं चाकावरून खाली उडी मारली.

दोनी दोस्त उस खायला लागले. एका कट्यावर त्ये आले. मनसोक्त उस खायला सुरवात केली. निम्मा उस खाल्यावर सख्यानं खालची बांडी फेकून दिली. चंद्या आता दुसर्‍या टरकंजवळ आला आन मघासारकाच वर चढला.

'आरं कोन हाय टरक वर?' एक मोठा आवाज आला. चंद्यांनं तिथून लगेच उडी खाली मारली. तिथंच एक मानूस उभा व्हता.

'कारं उस खायाचा हाय काय? मंग ह्या माझ्यावाल्या गाडीचा काहून खाता?', तो टरक डायवर बोल्ला.

'न्हाय.. म्हंजी...न्हाय', सख्या बोलाया लागला.

'आरं घाबरता काम्हून? उसंच खायाचा आसलं तर माझ्या टरकीचा नका खावू. त्यो फुले-२६५ हाय. त्या उसाला लवकर तुरं आल्याती. त्यो नका खाऊ. त्याच्यात साकर बी उतरलेली न्हाय. त्या समुरच्या टरक मंदी २१८९ जातीचा उस हाय. न्हाय तर ह्या शेजारच्या टरकमधला ६७१ खावा. उतार्‍याला लय भारी जात हाय ती. आन आगदीच ग्वाड खायाचा आसंल तर चला बरूबर. म्या ८६०३२ न्हायतर ९४०१२ खावू घालतो तुम्हास्नी.'

त्या डायवरनं निरनिराळ्या उसाच्या जाती सांगून दोघांना यडं करून सोडलं. आता त्यांच्यात बर्‍यापैकी मनमोकळं बोलनं व्हया लागल व्हत.

डायवरनं इचारलं, 'कोन्या गावचं रं तुमी दोघं? आन घरून पळून बिळून आलात काय?'

चंद्या बोलला, 'न्हाय न्हाय. आमी काय पळून नाय आल्यालो. आमी कसबे वनीहून सकाळीच निघालो उस खायाला.'

'बरं बरं. प्वाटाला काय भाकरतुकडा खाल्ला का न्हाय? का निसतं उसचं खाताय सकाळधरून?'

'न्हाय आमी कायबी खाल्लं नाय. आता घरी जावून जेवूच की', सख्या बोलला.

'व्वा रं प्वारा. आरं आता दुपारचं २ वाजाया आलं आन तुमी आजून काय खाल्लं न्हाय? चला माज्यासंगती हाटेलीत. आरं मलाबी तुमच्यावानी एक पोरगा हाय.'

ते तिघेही मग एका हाटेलीत गेलं. तिथं त्यांनी मिसळ खाल्ली. डायवरदादा लयच दयाळू व्हता जनू.

नंतर डायवरदादानं एका टरकवर जावून चांगले काळेभोर दोन उस घेवून आला. चंद्या सख्यानं त्ये उस हातात घेतले. त्येच्यानंतर डायवरदादा त्येच्या गाडीचा नंबर येईल म्हनून निघून ग्येला. चंद्या अन सख्या आता घरला परत जायचं म्हनून तिथनं बाहीर पडले. रस्त्यानं उस खानं चालूच व्हतं. आता त्यांनी पक्या रस्त्यानं जायाचं ठरीवलं. दोघंबी चालत निघाले. कारखान्याची वस्ती सरल्यावर त्यांना मळे लागले. कुनाच्या मळ्यात कांदे पेरेल व्हते. कुनाचा द्राक्षेचा बाग व्हता. आजून द्राक्षेच्या वेली मांडवावर चढेल नव्हत्या. रस्त्यामधी कायबाय वडाचे झाडं, कडूलिंब, बाभूळ आसले झाडं व्हती. एका मळ्यात पीकाला पानी देन्यासाठी मोटर चालू व्हती. चंद्या सख्यानं तिथं जावून हातपाय धुवून पानी पिले. पुढं चंद्याला एका वढ्याच्या ठिकानी बोरीचं झाड दिसलं. जवळच्या गुलमोहराची काठी तोडून त्यानं ती बोर झोडपली. खाली पडलेले बोरं दोघांनी खिशात टाकले आन खात खात पुढं निघाले. त्यांचं गाव एखादं कोस राहीलं आसंल तवा संध्याकाळ व्हत आली व्हती.

आजचा सुटीचा दिवस त्या दोघा मित्रांनी मजेत घालवला व्हता. उद्याच्याला पुन्ना शाळेत जायाचं आन नंतर शेळ्या राखायला जायचं ठरवून चंद्या आन सख्या ज्याच्यात्याच्या घरी गेले.

सुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत

(खुप दिवसांपासून माझे वरिष्ठ संपादक मला सुप्रसिद्ध अभिनेत्री करूणा कर्पूर यांची मुलाखत घेण्यास सांगत होते. गेल्या पंधरवड्यात एके दिवशी तिच्या सेक्रेटरी आहूजाशी फोनाफोनी करून तिची वेळ ठरवून घेतली. गेल्या आठवड्यात गोरेगावात फिल्मीस्तानमध्ये तिच्या आगामी पिच्चर 'तेरी आंखे काली काली - The Black End' याची शुटींग चालू होती. आम्हाला तिने तेथेच बोलावले. गेटवर आमचे नाव सांगीतले. स्टूडीओत अजून इतर चार पिच्चरचे शुटींग असल्याने बर्‍यापैकी गर्दी होती. आम्हास आतमध्ये सोडण्यात आले. स्पॉटवर गेलो तर करूणा कर्पूर अन वहिद कर्पूर यांच्या 'तेरे हाथमें अंगूठी हिरेकी' या गाण्याचे टेक चालू होते. एका कडव्याचे शुटींग झाल्यावर करूणाजी कपडे बदलायला मेकअप व्हॅन मध्ये आल्या तेव्हा त्यांच्याशी आम्ही बातचीत केली.)

मी: नमस्कार करूणाजी!

करूणा: नमस्ते.

मी: आठवते का? आपण 'जब वी हेट' च्या सेटवर मेटलो- आपलं- भेटलो होतो?

करूणाजी: अं...तशी मी फार विसराळू आहे. जर्दाळूही मी काजू समजून खाते कधी कधी. मग माझी आईच डायरीत पाहून सांगते की 'अगं निट चाव. आज तुला जर्दाळू दिलेत मुखशुद्धीसाठी' म्हणून. अं..... आता आठवलं... तुम्ही दै. रातकली मधून आलात ना? सेक्रेटरी आहूजा सांगत होता आज एक इंटरव्ह्यू आहे एका प्रेसवाल्याशी म्हणून.

मी: नाही हो करूणाजी. मी पा. भे. दगडफोडे 'रंगत आणि रंग' कडून आलोय.

करूणाजी: ओह सॉरी. मी विसराळू आहे सांगितलं ना! अस्सं होतं कधी कधी.

मी: काही हरकत नाही. अहो मी म्हणजे काय तुम्ही आहात काय सगळ्या लोकांनी नजरेत ठेवायला. मुलाखत सुरू करायची?

करूणाजी: ओ..येस...ऑफ कोर्स... माझ्या पुढच्या टेकमधला ड्रेसही अजून टाईट करायचा आहे. टेलरकडेच आहे तो. तोपर्यंत होवून जाईल आपले बोलणे.

मी: अच्छा. मला सांगा- 'तेरे हाथमें अंगूठी हिरेकी' या गाण्यात असे काय आहे वेगळे?

करूणाजी: 'तेरी आंखे काली काली - The Black End' या पिक्चरमध्ये वहिद अन मी शाळेपासून एकमेकांचे मित्र असतो. तो मला दहावीत असतांना मागणी घालतो फ्रेंडशीपची. त्यावेळी तो हिरेकी अंगूठी मला पहनवतो. अन मग आम्ही 'तेरे हाथमें अंगूठी हिरेकी' हे गाणं म्हणतो.

मी: अरे वा. शाळेत असतांनाच तुम्हाला हिरेकी अंगुठी मिळते तर.

करूणाजी: हो. यापुढे तर गाणं झाल्यावर आम्ही दोघं उटीला जातो. शालेय सहलीला. मजा करतो तेथे. एकुणच शाळा अन कॉलेजजिवनावर हा पिक्चर आहे.

मी: तुम्ही एका हॉलीवूड पिक्चरमध्येही काम करताय म्हणे?

करूणाजी: हो. तो एक नायजेरीय ड्रगस्मगलींवरचा पिक्चर आहे. थोडा सस्पेंस आहे. मी तेथील विमानतळावरची पोलीस ऑफिसर आहे. अन एका नायजेरीयन ड्रगसप्लाय टोळीचा मी पर्दाफाश करते असे कथानक आहे. बघाच तुम्ही. माझी भुमीका छोटीशीच आहे. मी टोळीतल्या एका सदस्याची कपडे काढून अंगझडती घेते अशी हटके भुमीका आहे.

मी: तुम्ही काही अ‍ॅडही करत आहात सध्या?

करूणाजी: मध्यंतरी मी बंद केले होते अ‍ॅड करणे. माझ्या हातात तेव्हा एकावेळी ८ पिक्चर होते. आता दोन पिक्चर आहेत मोठ्या बॅनरचे. वेळ नाही मिळत म्हणून अ‍ॅड न करणे चांगले दिसत नाही. मी एका शँपूची अन एका टुथब्रशची अ‍ॅड करते आहे.

मी: तुमची अ‍ॅड 'घरमेंही कपडे सिलाओ' या टॅगलाईनची शिलाईमशीनची अ‍ॅड खुपच गाजते आहे.

करूणाजी: खरे आहे. त्याची तर खुपच गंमत झाली. त्या शिलाईमशीनच्या अ‍ॅडच्यावेळी मला कपडेच नव्हते. म्हणजे तयार नव्हते. मग मीच शुटींगच्या वेळचे शिलाईमशीन वापरून माझ्या स्कर्टचा मॅक्रो स्कर्ट करून घेतला. म्हणजे स्कर्टवर टिपा टेलरनेच टाकल्या पण आयडीया माझीच होती.

मी: वा वा. छानच. म्हणजे तुम्ही ड्रेस डिझायनरपण झाल्यात तर.

करूणाजी: गंमतच आहे ती सगळी.

मी: तुम्ही एका पिक्चरसाठी वजनही वाढवता आहेत म्हणे?

करूणाजी: अहो, राज श्रीचे एक पिक्चर येते आहे- 'मेरे साथ सनम है - The True Love'. त्यात मी डबल रोल करते आहे. त्यात जुळ्या बहीणी दाखवल्या आहोत. एका रोलसाठी वजन कमी तर एकासाठी वजन जास्त अशी रिक्वायर्मेंट होती. वजन कमी असलेल्या बहीणीचं शुटींग संपलेले आहे. आता मी म्हणूनच वजन वाढवते आहे. त्यात मला माझे वजन ५० किलो करायचे आहे. कमी वजन असलेल्या बहिणीसाठी माझे एकुण वजन मी ३० किलो केले होते.

मी: त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागत असणार ना?

करूणाजी: हो तर. कमी वजनासाठी मी दोन दिवसांत १ चपाती खायचे. थोडा भात सकाळी. रात्री फक्त एक सफरचंद खायचे. माझी आई तर म्हणायची की, 'अग बाई दिड सफरचंद तरी खा'. त्या वेळी मी रोज दोन तास सकाळी व दोन तास सायंकाळी अ‍ॅरोबिक्स करायचे, सायकलींग करायचे.
आता वजन वाढवण्यासाठी मी जास्त खाते. रोज सकाळी एक चपाती व सायंकाळी थोडा भात हे माझे जेवण आहे.

मी: तुमची एखादी शुटींगमधली कडू आठवण सांगा ना.

करूणाजी: एकदा आम्ही नॉर्वेला शुटींग करत होतो. अचानक बर्फ पडू लागले. मग मी अन वहिद दोघेच एका हॉटेलमध्ये एका रुममध्ये राहीलो. माझ्या रूममध्ये कोणीतरी असण्याचा पहीलाच प्रसंग होता. हॉटेलमध्ये खायलाही काहीच नव्हते. मलातर चिकन अन सुप अन चायनीज कॉन्टींनेंटल व ईटालीयनच खावे लागले. अन एकच बेड शेअर करावा लागला. वहिद होता म्हणून मला खुप चांगले वाटले. तो खुपच जोक करतो. एकदम मजाकीया स्वभाव आहे त्याचा. तो नसता तर काय झाले असते असे वाटून मला रडू येते.

मी: तुम्हाला मुंबईत रहायला आवडते का? तुम्ही सध्या राहता कोठे?

करूणाजी: मुंबईत रहायला खुपच आवडते. पाली हिलवर माझा ५००० स्क्वेअरचा ब्लॉक घेतला आहे
नविन. तसा छोटाच आहे. पण आवडतो.

मी: तुमची आवडती कार कोणती?

करूणाजी: बिएम्डब्लू- नॅनो ही माझी आवडती कार आहे. मला वेगात पळणार्‍या गाड्या आवडतात.

मी: तुमची आवडती डीश कोणती?

करूणाजी: मला फ्राँझ खुप म्हणजे खुपच आवडतात.

मी: तुमचा ड्रेसचा आवडता रंग कोणता?

करूणाजी: मला लाल रंगाचा ड्रेस आवडतो.

मी: शुटींगमधली अविस्मरणीय आठवण सांगा ना.

करूणाजी: मागे एका पिक्चरमध्ये मी मेकअप न करता शुटींग केले होते.सतत एक तास, तीन मिनीटे मी मेकअप विना होते. तसेच एका पिक्चरमध्ये मी पुर्ण जेवण करण्याचा सीन खराखूरा केला होता. डमी न वापरता मी जेवणाची पुर्ण थाळी संपवली होती. तसे मी कधीच १ चपाती खात नाही. पण त्यावेळी मात्र मी पुर्ण २ चपात्या अन थोडा भात संपवला होता.

मी: तुमचा देवावर विश्वास आहे का?

करूणाजी: ऑफ कोर्स आहे. तसे मी शिवजींना मानते. झालंच तर पार्वतीदेवींनाही पुजते.

(तेवढ्यात स्पॉट बॉय शॉट रेडी आहे हे सांगायला आला)

मी: जाता जाता तुम्ही आमच्या वाचकांना काय सांगाल?

करूणाजी: मी काय सांगणार? अहो माझे पिक्चर बघा हेच की! तरीही सांगते की कुल वागा.

मी: एक विनंती करतो. दोन एक फोटो मिळाले तर घेवू का?

करूणाजी: ओह! एवढेच ना? घ्या की.
(मी मग तिनचार फोटो घेतो.)

मी: चला पुन्हा भेटू या! नमस्ते.

करूणाजी: नमस्ते!

करूणाजींची आवडः
जेवणात: ग्रीन पीज सुप
आवडता प्राणी: कुत्रा
आवडता पक्षी: मोर
आवडते शहरः दिल्ली

Wednesday, January 19, 2011

एसटी पुराण

एसटी पुराण

एस. टी. बस मध्ये बसला नाही असा माणूस विरळा. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत, सरपंचापासून आमदार खासदारांपर्यंत, जुन्या काळातील राजापासून आजच्या राष्ट्रपतींपर्यंत, भिकार्‍यांपासून चोरांपर्यंत समाजातल्या सगळ्या लोकांनी एस. टी. बस मध्ये बसण्याचा अनुभव आयुष्यात एकदातरी घेतलेला असतोच. एसटी बस म्हणजे स्टेट ट्रांसपोर्ट बस. आपली महाराष्ट् राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस. जुन्या काळी म्हणजे स्वातंत्र मिळाल्यानंतर १९४८ साली सगळे खाजगी बस चालवणारे जावून सोनेरी छत व निळ्या रंगाची एसटी अहमदनगर ते पुणे येथे पहिल्यांदा धावली. आपल्यातल्या जुन्या लोकांपैकी बर्‍याच जणांनी असल्या जुन्या बस बघीतल्या असतील. त्यानंतर बर्‍याच बसेस आल्या अन गेल्या. त्यांचे अंतर्बाह्य स्वरूप बदलले. सार्वजनिक प्रवासासाठी महामंडळ अस्तित्वात आले. प्रवासास अनेक सुखसोई असणार्‍या बसेस आल्यात.

६० ते ८० च्या दशकाच्या शतकात एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे हाच एक पर्याय होता. त्यानंतरच्या काळात खाजगी लक्झरी बस प्रवासासाठी उपलब्धझाल्यामुळे प्रवास बराचसा सुखकर झाला अशी प्रवाशांची समजूत झाली.

एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे आताशा काही प्रमाणात कमी प्रतीचे मानले जावू लागले. शहरी भागातल्या प्रवाशांमध्ये एसटी महामंडळाबद्दल उणे बोलणे फॅशन झाल्यासारखे वाटते. काही प्रमाणात शहरी भागात तसेच संपुर्ण महाराष्ट्रात ग्रामिण भागात प्रवासासाठी एसटी बस शिवाय पर्याय नाही. 'गाव तेथे रस्ता अन रस्ता तेथे एसटी' हे ब्रीद वाक्य महामंडळाने ९९% खरे केले आहे. महामंडळ अनेक सामाजिक बंधने पाळून प्रवाशांकरता सोई पुरवते, भाड्यामध्ये सवलत देते. ती सवलत नाकारली तर महामंडळाचा नफा बर्‍याच प्रमाणात वाढू शकतो. तरीही केवळ सामाजिक दृष्टीनेच महामंडळ याकडे पाहत आलेले आहे. सरकार काही वेळा कर सवलत अन इतर नियमांमध्ये महामंडळालाही सुट देत नाही. सरकारने महामंडळाप्रती आपली दृष्टी बदलली पाहीजे. बर्‍याचदा खाजगी वाहतूकदार करणारे हे राजकारणी अन मोठे लोक असतात. ते सुद्धा महामंडळाची अडवणूक करतात. त्या त्या रुट वर कमी प्रमाणात गाड्या चालविल्या जातात. हे सार्वजनिक प्रवासास अहितकारक आहे.

भारतातल्या प्रत्येक राज्यात अशी एसटी धावते. तुम्ही त्या त्या राज्यात जर अशा एसटी बसने प्रवास केला तर तुम्हास आपल्या राज्यातील बससेवाच कशी चांगली आहे हे पटेल. काही प्रमाणात गैरसोई असतील तरीही सामायीक विचार केला असल्यास वरचे विधान आपणास पटेल.

आता बसबद्दल. माझ्या लहाणपणापासून मी लालपिवळी बस बघत आलेलो आहे. st busa ordinary
त्यातून प्रवासही केला आहे. नंतरच्या आशियन गेम च्या काळात आशियाड बस सुरू झाल्या.
asiad bus
त्यांचा रंग हिरवा पांढरा होता.
आता जनता बस चा रंग लाल असतो.

shivaneri AC bus
शिवनेरी एसी बसचा रंग निळा आहे.

बसेसचे सिटस, अंतर्गत व्यवस्था आरामदायी झालेली आहे. तरीही त्यातल्या त्यात मला आपली लालपिवळी जुन्या बॉडीची बसच आवडते. जुन्या बसचे सीट सलग आहे. त्यात आशियाड बस सारखी तुटक सीटस असलेली आसनव्यवस्था नाही. ३+२ अशी आसन व्यवस्था जुन्या लाल पिवळ्या बसेस मध्ये असते. सीटस च्या पुढे (अन पुढल्या सीट च्या मागे) एक मोठी आडवी दांडी सलग असते. तिच्यावर डोके टेकून मस्त झोप लागते.
आशियाड अन आताच्या नविन जनता बस मध्ये अशी सोय नाही.
asiad bus without handle
आशियाडमध्ये पुढला आडवा दांडा नसतो. एक छोटे हँडल आहे. सीटही तुटक तुटक असतात. त्यामध्येही हात ठेवण्याचे हँडल बसण्याच्या आड येते. सीटला पायबर मोल्डींग मध्ये बनवत असल्याने घमेल्यासारखा आकार आपल्या सीटच्या सोईसाठी दिलेला असतो. त्यात काही सीट 'मावतात' तर काही बाहेर 'सांडतात'. आशियाड बसमधले प्रवासी शक्यतो शेजार्‍यांशी बोलत नाही. केवळ नाईलाज म्हणून आम्ही आशियाड 'बस' मध्ये बसतो अन्यथा लक्झरी बस आम्हास परवडते/ आवडते अशी त्यांची गोड तक्रार असते. खरे म्हणजे त्या प्रवाशांनी खाजगी लक्झरी बसची 'गोडी' कधीतरी चाखलेली असते. खाजगी बसच्या प्रवास करण्याच्या वेळेचा भोंगळपणा, वेळकाढूपणा, त्यांचे टेक ऑफ पॉईंट्सवर थांबणे, सक्तीचे 'शहर दर्शन' हे त्यांनी घेतलेले असते. एसटी बस ही त्यातल्या 'दगडापेक्षा मऊ' वृत्तीने अन गॅरंटीड वेळेवर सुटणे-पोहचणे, सुरक्षीत असणे या गुणांवर ते आशियाड मध्ये बसलेले असतात.
एकूणच ज्याने प्रवास केलेला आहे त्याला आशियाड बस पेक्षा लालपिवळी बस चांगली वाटू शकते. लाल पिवळ्या बसमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण जास्त आहे पण ते ग्रामिण भागातल्या बसमध्येच. शहरी भागात लालपिवळी बस सुद्धा (तुलनेने) स्वच्छ असते.

गावाकडच्या बसने प्रवास करण हा एक अनुभव असतो. कंडक्टर ड्रायव्हरला त्यांचे नेहमीचे प्रवासी ओळखीचे झालेले असतात. गावात शेवटची बस असेल तर ते अशा प्रवाशासाठी थांबतात. तो आल्यानंतरच बस निघते. बाजाराची बस म्हणजे एक जत्राच असते. भाजीपाला, घरगुती सामानसुमान, फावडे, पहारी, विळे, कुदळ, खताची पोती, चादरी विक्री करणार्‍यांच्या थैल्या आदी आसनांवर आसनांखाली विराजमान होतात. वरच्या टपावर भाज्यांची मोठी पोती, सायकली, एखादा पलंग ठेवलेला असतो. कंडक्टर त्या सगळ्यांची लगेजची तिकीटे विचारून काढत असतो. त्याचा या गर्दीत हिशेब जुळतो हे पाहून मला तर तो एखाद्या चार्टड अकाउंटपेक्षा मोठा वाटायला लागतो.

तर असे हे एसटी पुराण. यातल्या छोट्या छोट्या एककांबद्दल (units) नंतर कधीतरी लिहू. तुर्तास विस्तारभयास्तव येथेच थांबणे योग्य.
(लेखातील छायाचित्रे त्या त्या संकेतस्थळाच्या सौजन्याने)

- पाषाणभेद
०६/०८/२०१०

Tuesday, January 18, 2011

वाट बघतोय रिक्षावाला

शालिमारे का भौ?

चला सिबीएस, शालिमार...

लगेच निघेल...

"शालिमार?"

चला बसा...

शालिमार... शालिमार...

ए संत्या आवाज दे ना भाडखावू? लायनीत उगाच गप उभा का राहतो? सालं पट्टा मारतो अन धंदा ओरडायची लाज वाटते का मग?

ओ भाई, आवाज कमी. हे काय सकाळपासून ३ ट्रिपा मारल्या पट्यावर. एक नाशिकरोडचं भाडं होतं म्हणून गेलो अन आपली आज दिवसभराची लेवल झाली. आजचं भाडं सुटलं म्हणून निवांत आहे. तुमी मारा पट्टे. मी पुडी घेवून येतो. सकाळपासून खाल्ली नाही. तुमाला कोणती आणू? विमल?

विमल नको बाबा. हिरा आण. लई लागतो डेंजर. हे घे पैसे. आख्खी १० ची माळ आन.

आणतो. तुमी भाडं गोळा करा तवर. आजून दोन पायजे तुमाला हालायला.

चला सिबीएस, शालिमार...शालिमार ए का?

"हो, शालिमार."

किती दोन का?

"हो. किती पैसे?"

बसा. ९ रुपये एकाचे. लगेच निघतो. केव्हाचा दोन शिटची वाट पाहत होतो.
ओ जरा मागेपुढे व्हाना. ओ ताई तुमी पुढे व्हा. काका तुमी मागे व्हा जरासे. हं बसा आता दोघं.
संत्या, पळत येना. दे लवकर. निघतो लगेच. संध्याकाळी माझी लेवल झाली का मग चौकात येतो. शाम्या फिटर ला पैसे द्यायचे आहे अन हुडचे काम पण करायचे आहे.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

सिबीएस?

"अहो आता कुठे बसवता? चार तर बसवले. किती अडचण."

पुढे बसेल तो. चल रे भाऊ लवकर. ती बॅग पायाशी ठेव तिरपी. बस.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

एक दोन तीन चार पाच छे सात आठ नौ दस ग्यारा बारा तेरा

"ओ आवाज जरा हळू करा ओ. डोकं दुखतंय."

बंदच करतो. ठिक?.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

सुट्टे नाही का? ओ ताई, पाच चे दोन डॉलर द्या. हे घ्या. आले?

"हो. मिळाले"

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

"शालिमार आलं का? "

हे काय हेच शालिमार. कुठे नाशिकरोडला जायचे का? तो समोरचा स्टॉप आहे बघा नाशिकरोडचा.

चला त्रिमुर्ती चौक, पवननगर, नविन सिडको...
चला नविन सिडको...पवननगर....
ओ भाऊ पवननगर का?

"हो."

बसा.

"पवननगर म्हणजे सिडको ना? "

हो. तुमाला कुठे जायचे आहे?

"पवननगरलाच. त्रिमुर्ती चौकात."

त्रिमुर्ती आधीचा स्टॉप आहे. बसा.

"कधी निघणार."

हे काय लगेच. शिट तर भरू द्या.

"हा स्टॉप शेअर रिक्षांचा आहे ना?"

हो. सगळे पट्यावाले आहेत इथे.

"पट्टा म्हणजे?"

नविन आहे का तुम्ही.

"हो"

पट्टा मारणारे सगळे रिक्षावाले एकाच भागात ट्रिप मारतात. हा स्टॉप शालिमार ते नविन सिडकोचा आहे.

"दररोज किती पट्टे मारतात?"

सकाळी सकाळी आलो अन मुड असला तर ८/९ ट्रिपा मारतो. कधी उशीरा आलो धंद्यावर तर कमी मारतो. दुसर्‍या दिवशी लेवल करावी लागते.

"किती कमाई होते दिवसभरात?"

कमाई कसली? सगळी गमाई. भाड्याच्या रिक्षात काय सुटते? मिळते पोटापान्याचे. कधी कधी पेट्रोल सुटले तरी भरपूर. त्यात हवालदार लई त्रास देवूं र्‍हायलेत सध्या. पकडलेत पन्नास रुपयाशिवाय ऐकत नाही.

पवननगर, त्रिमुर्ती....पवननगर, त्रिमुर्ती....

"चला लवकर. किती वेळ?"

अहो गाडी भरली तरच निघणार ना? टेप लावू का?

"नको. गाडी भरेपर्यंत गप्पा मारू. स्पेशल ट्रिप मारता का?"

नाही. दिवसभर थांबून इतकीच कमाई होते. स्व:ताची रिक्षा असेल तर परवडते तसे करणे. शाळेची ही ट्रिप मारता काही जण. काही जण कंपनी सुटल्यानंतर रिक्षा चालवतात. तेव्हा परवडते. माझी तर भाड्याची रिक्षा असल्याने मी पट्टेच मारतो.

चला पवननगर, त्रिमुर्ती....पवननगर, त्रिमुर्ती....

"पुडी देवू का? हिराये  माज्याकडे"

"नाही मला नाही लागत. तुम्ही किती खाता? "

जास्त नाही दिवसभरात दोनेक माळी लागतात.

"माळी म्हणजे?"

१० पुड्यांची एक माळ. असल्या दोन माळी लागतात दिवसभरात.

"अरे बापरे एवढ्या पुड्या!"

अहो हे काहीच नाही. आधी ४ माळी संपायच्या. आता कमी केल्यात.

पवननगर, त्रिमुर्ती चौक आहे का?....पवननगर, त्रिमुर्ती....

"गाडीत टेप लागतो का?"

हो तर त्याच्या शिवाय जमत नाही. झंकार सर्कीट टाकलंय. एकदम टकारा. स्पिकर बनवून घेतले. आवाज ऐका. घुंगरांचा आवाज काय मस्त येतो बघा.

चला आता गिर्‍हाईक आलं. लगेच निघतो बघा.

पवननगर का?

"हो"

चला बसा.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०६/०८/२०१०

शालिमार चौक, नाशिक

Monday, December 6, 2010

रखमा

रखमा


--------------------------------------------------------------------------------------------
सक्काळचे ६
काय मेला बघूं र्‍हायलाय निसता. सक्काळी सक्काळी बोलीवलं मला त्या भाड्या शेटनं अन म्हनतू कसा की 'ए रखमे पानी मारलं का नाही त्या कालच्या भिंतींवर ते?'. आता मी सांगते तुमाला. माला काय ह्ये नविन हाय का ह्ये. दहा वर्स झाली या लायनीत राहून. तुमाला सांगते बिगार्‍याच आयुक्श लई खराब. त्यात माझ्यासारक्या बायामान्सांच्या हालाचं तर ईचारूच नका. आता तुमीच बगाना त्या भाड्या बिल्डर शेटच यवढ्या सक्काळी सक्काळी इथं पालात येवूनशान भिताडावर पानी मारायला सांगायच काय काम व्हतं का? आन त्ये बी माझं मालक पालात नसतांना? बरं मी काय त्या भाड्याला वळखीत नाय का त्ये? लुभ्रा मेला. त्याची नजर काय बरूबर नाय. मागला शेट लई चांगला व्हता. त्याच्याबरूबर आमी सात आट बिल्डींगी केल्या नव्ह का? मग. व्हताच तसा त्यो. लय दयाळू. दोन वर्साच्या ऐन दिवाळीच्या दिशी माझं तान्ह लेकरू आजारी पल्डं तवा त्यानं त्याच्या गाडीत घालूनशान दवाकान्यात डागदरकडं घ्येवून गेला. आन माझ्या हातावर २०० रुपयं द्येवून 'काय लागलं तर सांग रखमे. दोन दिस रोजी नगं करू. आन तुझ्या नवर्‍याला पन सांग की दोन दिस ताडी न प्येता काम कर आन त्या पैशानं आवशीद आन पोराला.' त्याची नजर काय या शेटसारकी वाईट नवती. मालाच नाय तर बाकीच्या रोजंदारीच्या बायांनाबी त्यो लय दयाळू लागायचा. त्याला दोन मोट्या पोरी आसल्यानं जगात काय चालतं त्ये समजत आसल. आसत्यात आशी मान्स. आन हा भाड्या. सदाअनकदा घिरट्या घालतू माझ्या पालात. मागल्या येळंला यांना म्हनतो कसा ' रमेश, आता नव्या बिल्डींगचा तिसरा स्लॅब पडतोया तवा तू तुज्यावालं बिर्‍हाड आता पयल्या मजल्याच्या यका फिल्याटमदी टाक. माझं मालकं बी लय भोळसट येडं. लागलीच फशी पडाया लागलं. म्या शेटला म्हनलं की, 'आमी गरीब मान्सं. आमी हायेत तितंच ठिक हायेत. आमी ही बिलडींग व्हयीपत्तूर पालातच राहू. आन खाली राहूनशान बिलडींग ची राकनदारीपन व्हती. त्येवढ्येच दोन पैसं तुमी त्यामूळं आमाला त्याचे द्येत्यात नव्हं का.'
बिलडींग ची राकनदारीचा इशय निगाला तवा त्या मेल्या शेटनं आपला नाद टाकला. आन आत्ता सक्काळी सक्काळी इथं हजर कामं सांगाया.

आन आत्ता पंदरा मिन्टांत लाईट जातील. तवा म्या कशी मोटार सुरू करू आन कशी पानी मारू त्या भिताडावर सांगा तुमी. हा नवा शेट माझ्या मालकाला दुसरं कायबी काम सांगतो आन मी एकली आसतांना न्येमका हतं येत्यो. मागल्या येळंला माझा नवरा गावाकडं यवतमाळला ग्येला व्हता तवा तर माज्या जिवात जिव नव्हता. मालाच आता पुढं व्हवूनशान दुसरीकडं काम पाहायला लागल.

मी तुमच्याशी काय बोलूनं राह्यले इथं. तिकड माझा चाहा वोतू जाईल.

"काय रं सुंदर्‍या, कवापासून त्वांड घासतो? चाहाच्या आधनाला उकळी आली का बघ की जरा. आन तुला साळा हाय ना आत्ता साडेसातला? आन तुज्या बाला बलीव चाहा प्यायला. सक्काळी सक्काळी ग्येला दुसर्‍या सायटीवर."
-------------------------------------------------------------------------------------
सक्काळचे ८

चला आता दुसर्‍या मजल्यावरच्या सल्याबवर ईटा पोचवायच्या हायेत. तुमाला सांगते या बिलडींगच्या पायर्‍या जास्तीच हायेत. आन त्याच्यात दुसरा सल्याब म्हंजी पायात गोळं यायचंच काम. डोक्यावर बारा बारा ईटांचं वझं घ्येवूनशान चढायच म्हंजे मरवणूकच हाय जनू. नाय आता एखांद्या तासात बाकीच्या रोजंदारीच्या बाया येतील हात लावायला तवा थोडी मदत व्ह्यईल कामाला पन म्या इथंच राहातू राखनदार म्हनून तर जास्तीचं काम करावा लागतं. आन दोन पैसं जास्तीचे मिळून सौंसारालाबी हातभार लागतू.

-------------------------------------------------------------------------------------
सक्काळचे ९

आज ज्येवायला पिठलं भाकरी करत्ये. त्योच आता न्याहारीला व्ह्यईल. आमी आताच कायबायी आसल त्ये आताच्या येळला न्याहारीला खावून घ्येतो. दुपारच्या १ वाजंपर्यंत बुड ट्येकायलाबी सवड राहात नायी मग. कामाच्या रगाड्यात आंग पिळून निघतं. घ्या ! त्येलाला आत्ताच संपाया पायजे व्हतं का? कोपर्‍यावरच्या शेटच्या दुकानीत जाया पायजे. कालच संद्याकाळी त्येल संपल्याच माज्या घ्यानात व्हतं पन रातीला ईसरून ग्येले आन आता घाईच्या वक्ताला आशी फजिता व्हती.

'शेट, १० रुपायाचं त्येल आन ५ रुपायाचं डाळीचं पिठ द्या.'

'काल संध्याकाळी तुज्या नवर्‍यानं २ रुपायाच्या इड्या आन १ रुपायाचं फुटानं न्येलं. त्ये घरून आता उधारी ७३ रुपये झाली बघ. कवा देशील?'

'शेट आता ह्ये सामान द्या आन म्होरल्या बुधवारी रोजी भरली का द्येतो की पैसं.'

'बरं बरं. लक्षात ठिव म्हंजे झालं'
-------------------------------------------------------------------------------------
सक्काळचे ११

आता त्या मिस्तरीच्या हाताखाली कामं करावी लागतील बया. आज त्यो वरच्या मजल्यातल्या भिती चढवलं. बाकीच्या बाया काय काम करीत नाय बघा. नुसत्या कुजुकुचु करत टायम खोटी करतात. त्या रानीला तर काय कामच कराया नगो. आता माला सांगा, मिस्तरीला वर माल कालवाया वाळू लागल का नायी? पन या रानीला खाली वाळू गाळाया ठ्येवलं तर तिच आपलं बोलनं चालूच हाय बाकीच्या बिगार्‍यांशी. मेली. हा शेट आंगाखाली घ्येईल तवा समजलं तिला काय आसतं त्ये. मरो आपल्याला काय करायचं दुसर्‍यांचं. आपन आपलं काम करावं ह्येच बरं.

--------------------------------------------------------------------------------------
दुपारचं १
आरं ए सुंदर, तुजं ज्येवन झालं आसंल तर तुज्या बा ला बलीव ज्येवन करायला. त्येंला काय कामामधी सुद नसती बग. तरी म्या सांगत आसत्ये की ह्ये बिगार्‍याच काम सोडून मिस्तरीचं काम शिकून घ्या. पन नायी. आपन काय परगती करायची नाय आन आपली गाडी अधोगतीकडं न्यायची. आन तू पन मुडदा म्येला त्येच्याच लायनीला जानार. शाळंतून आल्यापास्न बगत्ये हाये मी निसता मातीतच उंडारू र्‍हायलाय तू. जा तुज्या बा ला हाक मार ज्येवायला.
--------------------------------------------------------------------------------------
दुपारचं ५
आज काम करूंनशान लय थकाया झालं. मगाशी चा पिवून थोडं बरं वाटलं. आता त्या मुकडदमला हातचं काम सोडून माला पलास्टर च्या कामाला लावायचं काय काम व्हतं का? तुमाला सांगत्ये हा मानूस लई डांबीस हाय बगा. काम करून घ्येतो आन पैसं पन येळवारी देत नाय. आता सा वाजल्यानंतर सुट्टी करून माला उद्याच्यासाटी एखांदी भाजी आनाया बाजारात जायाच हाय तवा हातात धा ईस रुपयं नगो का? आपन आप्लं येळवारी पैसं मागून घ्यायला पायजे त्याच्याकडून.
------------------------------------------------------------------------------------------
रातीचं ७

'आव म्या काय म्हंते, तुमी एका दिसाचं औशीद नका प्येवू पन रेडीवोच्या बॅटरीक संपल्यात. त्या आनायच्या हायीत. झालंच तर सुंदरचे आंगांवरचे कापडं बी आनायचे हायीत. ढुंगनावर सगळ्या चड्या ग्येल्या त्येच्या. या बुधवारच्या सुट्टीत आपन बाजाराला जावू आन सगळं सामान घ्येवून येवू.'

'बरं बरं जावू आपन या बुधवारला. पन म्या काय म्हंतो ज्येवान झालं का? माला भुक लागलीया.'

'ह्ये काय ज्येवन तयार हाय. सुंदर्‍याचं झालं का तुमी बसा, म्या गरमागरम भाकरी थापती.'
--------------------------------------------------------------------------
राती १०

'आगं ए रकमे सुंदर लई लवकर झोपला आज.'

'तर वो. निस्ता वाळू आन मातीत खेळतो. मग दमूनशान लवकर झोपनार नायी तर काय?'

'आता तू काय करती तिकडं. ईकडं ये झोपाया. दिसभर लांब आस्तो आपन. ह्या बुधवारला तुलापन एक पातळ घ्येवून टाकू. कधीचं फाटकंच पातळ शिवून घालू राहीली. माला दिसत नाय का व्हय?'

'आत्ता आटवली का रकमा, माझ्या भोळ्या सांबाला.'

Tuesday, June 22, 2010

उन्हेरे - गरम पाण्याचे झरे

उन्हेरे - गरम पाण्याचे झरे

"सुखोदकाने होई न्हाणे, दिले उन्हेरे देवाने"


सर्व ऋतुंमध्ये सर्वकाळ स्नानासाठी गरम पाण्याची योजना नियतीने उन्हेरे या गावी केली आहे. उन्हेरे हे गाव पाली (अष्टविनायक बल्लाळेश्वर- ता. सुघागड, जि. रायगड) येथून उत्तरेस २ किमी अंतरावर आहे.
Unhere , Tal- Pali-Sidhagad-Raigad-Maharashtra
छायाचित्र १: उन्हेरे येथे जाण्यासाठी मार्गदर्शन
Sarasghad Fort- Pali-Tal Sudhagad- Raigad-Maharashtra
छायाचित्र २: पाली येथील सरसगड

श्रीरामाने बाण मारून सितामाईस स्नानासाठी हे स्थान तयार केले अशी पुराणात अख्याईका आहे.

उन्हेरे या गावाजवळील या गंधकमिश्रीत कुंडात स्नान केल्यास त्वचेचे विकार व वाताचे विकार बरे होतात. येथे गरम पाण्याच्या झर्‍यांचे कुंड बांधण्यात आलेले आहेते.
एकुण तीन कुंडे आहेत. त्यापैकी एक स्रीयांसाठी, एक पुरूषांसाठी आहे.
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ३: उन्हेरे येथील गरम पाण्याची कुंडे

या दोन्ही कुंडातील पाण्याचे तापमान आपल्या त्वचेला सुसह्य इतके आहे. तिसर्‍या कुंडाचे तापमान मात्र जास्त आहे. कुंडाच्या तळाशी आशानी लाकडाच्या फळ्या टाकल्या आहेत. त्यावर उभे राहून स्नान करता येते.
Unhere , Tal- Pali-Sidhagad-Raigad-Maharashtra
छायाचित्र ४: उन्हेरे येथील गरम पाण्याची कुंडे

Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ५: उन्हेरे येथील गरम पाण्याची कुंडे

स्नान करतांना साबण लावणे, चुळ भरणे, कपडे धुणे, पोहणे आदी प्रकार टाळावेत. हे पाणी पिऊ नये.
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ६:

या पाण्यात जास्त वेळ थांबल्यास चक्कर येवू शकते. भुगर्भातील लाव्हारसामुळे खडक तापतात. त्याच्या संपर्कामुळे पाणीही तापते. त्यात गंधक आदी क्षार मिसळतात व ते पाणी खडकांच्या फटीतून बाहेर पडते. हेच गरम पाण्याचे झरे असतात.

उन्हेरे कुंडाचा परीसर अनेक सामाजीक राजकिय चळवळींचा साक्षीदार आहे. स्वातंत्रपुर्व काळात मो. कृ. देवधर यांचे अध्यक्षतेखाली हरिजन परिषद झाली होती. अनेक परिषदा, सभा या स्थानी झाल्या होत्या. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटीशांना मदत करू नये अशा अर्थाचे भाषण बापूसाहेब लिमये यांनी याठिकाणाहून केल्याने त्यांना शिक्षा झाली होती. ताकई येथील विठोबाची यात्रा संपली की येथे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला येथे यात्रा भरते. सुकी मासळी व घोंगड्या हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे.

सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने कुंडात आंघोळ करणार्‍यांना एक भावनिक आवाहन: -

उन्हेरे गरम पाण्याची कुंडे,
ही धारोष्ण गंगा आहे!
साबण लावून, कपडे धुवून,
या गंगेला मलीन करू नका!!


(संदर्भ: पाली तालुक्याचा इतिहास : लेखक: सुरेश पोतदार)

बाकी आमची कलाकारी:
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ७
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ८
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ९
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र १०
Hot water spring - Unhere- Pali-Raigad-Maharashtra
छायाचित्र ११:
वरील छायाचित्रे (क्र. ७ ते ११) कुंडातल्या पाण्यातून घेतलेली आहेत.

Monday, May 24, 2010

पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे

पुस्तक परिचय: छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे
लेखक: प्रा: डॉ. प्रल्हाद नरहर देशपांडे, विद्यावर्धीनी महाविद्यालय, धुळे.
प्रकाशक: सुषमा प्रकाशन, धुळे.
मुद्रक: स्वस्तीक मुद्रणालय, पुणे.
प्रकाशित: १९८३
मुल्य: रू. ६५/-

छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे म्हणजे त्यांनी लिहीलेली पत्रे नव्हेत. त्या काळी शिवाजी महाराजांच्या वतीने त्यांच्या कारकुनांनी, अधिकार्‍यांनी लिहीलेली पत्रे जी त्यांच्या त्यांच्या कचेरीतून पाठवली जात ती.
या पुस्तकात विविध २०० च्या वर पत्रे संपादित केलेली आहेत. लेखकाने विविध संदर्भ घेवून हि पत्रे शोधली आहेत. त्यात इतिहासाचार्य राजवाडे यांचा उल्लेख आहे.
दिर्घ प्रस्तावनेत लेखकाने त्या पत्रांचा समावेश का केला, पत्रे लिहीण्याची पध्दती, मुसलमान कालगणना, फारसी शब्द, अधिकार्‍यांचा हुद्दा, शक गणना, महाराजांची दुरदृष्टी, मुद्रा, शिक्का, मोर्तब आदींचा उहापोह केलेला आहे. बरीचशी मुळ पत्र ही मोडी भाषेत होती. लेखकाने ती मराठी लिपीत लिहीली आहे. परंतू भाषा तत्कालीन आहे.

बरीचशी पत्रे ही वतनदारांच्या वतनदारीतील झगडा मिटवण्यासाठी, समझोता करण्यासाठी, जरब बसवण्यासाठी, शिक्षा फर्मावण्यासाठी, लढाईत मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटूंबाच्या सांत्वनेसाठी, देव देवळे तसेच मशीदी/ दर्गे (होय मशीदी/ दर्गे सुद्धा!) यांचे अनुष्ठान चालू राखण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहारांपैकी आहेत. त्यात राजाराम, समर्थ रामदास, मिर्झा राजे, औंरंगजेब, बाजीप्रभू देशपांडे आदिंसाठी लिहीलेली देखील पत्रे आहेत. त्यात चिंचवडच्या देवस्थानाचे भट, पर्वती देवस्थानाचे भट, पिंपरी येथील पत्रव्यवहार आदी उल्लेख आहेत. याच पत्रात दादोजी कोंडदेव यांच्याकडून शिवाजी महाराजांना शिक्षण द्यावे हा उल्लेख पुराव्यानीशी सापडतो हे महत्वाचे.

एका पत्रात शिवाजी महाराजांनी शत्रू चालून आल्यावर काय करायचे, रयतेस घाटाखाली कसे आधीच हलवायचे, गनिमाने चढाई केल्यास कसे पळायचे या सुचना आहेत, तर एक किल्ला बांधतांना पावसाळ्यात हाल होवू नये म्हणून घरांची कशी काळजी घ्यावी ते लिहीलेले आहे. दोन एक पत्रव्यवहार इंग्रजांशी केलेले देखील सापडतात.

शिवाजीराजेंचे विचार धर्मातीत होते तरीही आपले स्व: ताचे स्वराज्य उभे रहावे या मागची त्यांची तळमळ, सहिष्णू वृत्ती पत्रांमधून पुराव्यानिशी दिसून येते.

एक ऐतिहासीक ठेवा म्हणून पुस्तकाचे मुल्य अमुल्य आहे.

देवपुरूष शिवाजी राजांना वंदन!
जय शिवराय!

Wednesday, April 14, 2010

मोबाईल चार्ज करा तुमचा

मोबाईल चार्ज करा तुमचा

मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा
काम करायचं ना तुमाला तर मग नुसता मिस कॉल का हो देता
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||धृ||

कोरस:
हातात काय धरता त्ये डबडं निसतं बटन बिटन तुमी दाबा
ओ आम्दार उगा मिशीवर मारू नगा
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ दाजी मोबाईल चार्ज करा तुमचा


कालच्याच दिशी आली वाड्यावर
इस्कोट झाला तुमी असल्यावर
पैकं द्या म्हनलं तर निसतं एटीएम कार्ड काय दावता
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||१||

गुलूगुलू बोलायच आसंल
फोटू बिटू काढायाचा आसलं
तर लांबून हात काय हालवता
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||२||


आत्ता ग बाई काय करू तरी काही
गोड गुलाबी पत्र न देता
नुसता ऐशेमेस काय पाठवता
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ पाव्हणं मोबाईल चार्ज करा तुमचा ||३||

कोरस:
हातात काय धरता त्ये डबडं निसतं बटन बिटन तुमी दाबा
ओ खास्दार उगा मिशीवर मारू नगा
ओ टोपीवाले उगा मिशीवर मारू नगा
मोबाईल चार्ज करा तुमचा ओ दाजी मोबाईल चार्ज करा तुमचा

Monday, March 29, 2010

विहीर: खोल अन गुढ अंधारी, काळीकुट्ट, सगळ्यांना कवेत घेणारी

नुकतीच विहीर (थेटरात) 'पाहीली'.

'वळू' चीच बरीचशी टिम यात आहे. कथा दोन मावस भावांमधील आहे. पुण्याचा समिर (मदन देवधर) अन गावाकडचा नचिकेत (आलोक राजवाडे). सम्या आपल्या नचादादावर फार प्रेम करतो. प्रत्रांमधूनही संवाद साधत असतो. दोघेही संवेदनशील आहेत. सम्या त्याच्या आई, बहिणीबरोबर त्याच्या मावशीच्या लग्नासाठी नच्याच्या घरी, गावी येतात. वाड्यात खेळतात. विहीरीत पोहतात. सम्या पट्टीचा पोहणारा असतो तर नचादादा सांगड लावून पोहोतो.

नचादादा गुढ बोलतो. त्याचा जीव नेहमीच्या वातावरणात गुदमरतो. त्याला त्याच्या पलीकडे कोठेतरी दुर निघून जायचे असते. गायब, अद्रूष्य व्हायचे असते. तसे तो सम्याला बोलूनही दाखवतो. समिरला नचादादाला पुण्याला शिकायला आणायचे असते. तो त्याच्या आईला तसे सांगतो. नचादादालाही आग्रह करतो. नचादादा प्रतिसाद देत नाही. सम्याला त्याचा फार राग येतो. तो त्याच्याशी संवाद साधत नाही. पण मनातून त्याच्याशी नचादादाच बोलेल अन नचादादाला सम्याच त्याच्याशी बोलेल असे वाटते. सम्या पोहोण्याच्या स्पर्धेसाठी शहरात येतो. सम्या स्पर्धेहून परत येतेवेळी नचादादाचा विहीरीत मृत्यू झालेला असतो. त्याच्या मामाला त्याने (मामाने) नचादादाला सांगड ढिली बांधल्याची खंत जाणवते. सम्याला नचादादा गेल्याचे काही पटत नाही. तशातच त्याच्या मावशीचे लग्न लागते. तो कुटूंबासह पुण्यास येतो. तरीही वारंवार सम्या नचादादाचा विचार करतो. त्याचे अस्तित्व त्याला नेहमी जाणवत राहते. कुटूंबातील इतर जण कुणी गेल्यानंतर आपले नेहमीचे व्यवहार कसे करू शकतात याचे त्याला कोडे पडते.
नचादादाच्या परिक्षेचा निकाल लागल्यानंतर तो पेढे वाटून आनंदही व्यक्त करतो.
शेवटी एक दिवस तो नचादादाला शोधण्यासाठी घराबाहेर पडतो. त्याला नचादादाला केवळ एकदाका होईना भेटायचे असते. एकदोन दिवस भटकल्यानंतर त्याला एक मेंढपाळ (विठ्ठ्ल उमप) भेटतो. तो त्याला जीवनाचे तत्वज्ञान सांगतो. त्यानंतर सम्या पुन्हा गावी जातो. तो मनापासून नचादादाला हाक मारतो. त्याच वेळी नचादादा त्याला विहीरीच्या काठावर दिसतो. शेवटी हा सगळा भास असतो. सम्या पुन्हा नेहमीचे जगणे जगतो का हे त्याने प्रेक्षकांवर सोडलेले आहे.

बाकी चित्रपटातील तंत्राबद्दल, दिग्दर्शनाबद्दल, कलाकारांबद्दल बोलावे तितके थोडेच आहे.

असा हा चित्रपट पाहिल्यानंतर सम्याबद्दल खुपच कणव निर्माण झाली. एकीकडे त्याच्या भावनांशी आपण एकरूप होवू पाहतो तर त्याच वेळी अनेक अनुत्तरीत प्रश्न तो सोडून जातो.

मला चित्रपटातील काही बाबी समजल्या नाहीत. मेंढपाळ अन सम्यातले संवाद फारच कमी आहेत.
१) मेंढपाळाचं जीव असलेलं व हरवलेलं कोकरू त्याला कोणत्या शक्तीने परत मिळते? तिच शक्ती तो सम्याला कशी काय देतो? (या ठिकाणी मी जेथे चित्रपट पाहीला तेथे तो कापलेला वाटला. आत्ताच्या डिजीटल चित्रपट दाखविण्याच्या तंत्रात चित्रपट कापता येतो का?)
२)सम्याला विहीरीवर नचादादा परत भेटतो, ते दोघे परत फोहोतात. सम्याला तसा भास का होतो?
३)नचादादा पुर्ण चित्रपटभर हातात दांडकं घेवून का वावरतो?
४)पुर्ण चित्रपट समिर नचादादाचा असतांना गावातील घरातील काही दृष्यांमध्ये खुपच बारकाई का दाखविली? (जसे सम्याची आई दळण कांडतांनाचे संवाद) जे न दाखवले असते तरी चित्रपटात काही अडथळा नसता आला. मान्य आहे की बारकाईच्या द्रूष्यांत दिग्दर्शनाचे अंग आहे पण त्याचा कथेशी काही संबंध नसल्यासारखा वाटतो.
५) सम्या नच्याला शोधण्यासाठी २/३ दिवस फिरल्यानंतरही त्याच्या अंगावरची बंडी एकदम कोरी करकरीत कडक इस्त्रीची दिसते. नचादादाच्याही शर्टाची इस्त्री बर्‍याच द्रूष्यांत नजरेला टोचते.
६) विहीर च्या ऑफिशीयल संस्थळावर हे लिहीले आहे:
"Samir’s search leads him towards the experience of oneness where he can unite with Nachiket again!"
समिर एकटा पडूनही तो नचिकेत शी (किंवा त्याच्या भासमान अस्तित्वाशी) कसा एकरूप होतो? तो पुढील आयुष्य सरळ जगतो का?

काहीही असो. चित्रपट पाहून बाहेर आल्यावर हातात काही लागलं नाही तरीही जे हातात आलं नाही ते शोधण्यासाठी मेंदूने विचार जरूर केला. यातच हा चित्रपट करणार्‍यांचं यश आहे.(माझा पुण्यातील एक लांबचा भाऊ अगदी समिरसारखा दिसतो. न कळत त्याच्याशी रिलेट होत गेलो. गावी जाण्याची हुरहूर, बरोबरीचे भाऊ भेटण्याची ओढ अनुभवलेली असल्याने हा आपलाच चित्रपट आहे असे जाणवले.)

समिरच्या मनातील द्वंद, प्रश्न, संभ्रम आपले होवून जातात.

चित्रपट संपल्यानंतर बर्‍याच जणांच्या तोंडून "च्यायला, काय समजलं नाय बुवा" असे उद्गार एकण्यात आले. तशीच परिस्थीती माझीही होती. पण ते न कबूल करायची मध्यमवर्गीय मनस्थिती माझीच होती. एवढा अंतराष्ट्रीय स्तरावरचा गाजलेला हा चित्रपट आपल्याला समजला नाही आपला कमीपणा की हेच त्या चित्रपटाचे यश? खरेच विहीर फारच खोल अन गुढ आहे, अंधारी, काळीकुट्ट, खोल खोल, सगळ्यांना कवेत घेणारी.

विहीर:
दिग्दर्शक - उमेश कुलकर्णी, कथा-पटकथा - गिरीश कुलकर्णी, सती भावे
छायालेखन - सुधीर पलसाने, संकलन - नीरज वोरालिया, संगीत - मंगेश धाकडे
कलावंत - मदन देवधर, आलोक राजवाडे, रेणुका दप्तरदार, डॉ. मोहन आगाशे, ज्योती सुभाष, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, सुलभा देशपांडे आणि अन्य.

अवांतर: एबी कॉर्प निर्मित जरी ही विहीर असली तरी सगळी छाप ही मराठीच आहे. अमीताभ ने काही ढवळाढवळ केलेली दिसत नाही. (की केवळ मराठीच्या तथाकथित प्रेमापोटी झाले? काहीही असो. एक चांगली कलाकृतीची निर्मीती झाली हे नक्की. मराठीचा झेंडा असाच उत्तरोउत्तर उंच जावो अन विहीर सारखे विचार करायला लावणारे चित्रपट निर्माण होवो याच अपेक्षा.)

कुणास हा चित्रपट पुर्ण समजला असेल, किंवा काही वेगळा अर्थ जाणवत असेल तर सांगा.

Wednesday, March 17, 2010

जेवण

या. आज उशीरा आलात मास्तर. तिकडे नको इकडे बसा की पलंगावर. पंख्याचा वाराही येतो तिथं.

लवकर काय अन उशीरा काय? घरी एकट्या असणार्‍याला वेळेचे काय?

आसं कसं वेळेवर जेवण झालं ठिक असते प्रकृतीला. सगळ्या गोष्टी वेळेवर व्हायला पाहिजे.

तुमचे बरोबर आहे हो. पण वेळेआधी जेवले म्हणजे सगळाच प्रॉब्लेम. अन बाकीचे मेंबरं पण काय म्हणतील?

बाकीचे मेंबरं काय हो, गप जेवतात अन जातात. तुमचे कसे सगळे वेगळेच आहे. म्हणून तर मी तुम्हाला निरनिराळे पदार्थ देते, खावू घालते. इतरांना देत नाही असले काही.

अहो, तुमच्याकडे आम्ही काय जेवायला येतो का नुसते? पोट पुर्ण भरले तरच जेवणाची मजा आहे. आम्ही जेवणावर प्रेम करणारे आहोत.

मास्तर, तुमच्यासारख्यांच्या प्रेमानेच तर सगळे मिळते आम्हाला. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. नाहीतर आमच्यासारख्या खानावळी उघडणारे भरपूर आहेत. पण तुम्हाला काय हवं काय नको ते आज मी बघणार आहे.

वा वा आज चांगलाच योग आहे.

हो तर. आज पुर्ण जेवण करणार की नाश्ता भरवू फक्त?

तुम्ही काय देणार?

तुम्ही म्हणाल ते.

आज आम्ही पुर्णच जेवण करणार बघा.

तुम्ही काय जेवणार पुर्ण? तुम्ही तर सत्रा ठिकाणी जेवण करणारे. आधीच नाश्ता जेवण करून आलेले दिसतात. गेला असाल हाटेलात .

असं म्हणू नका. पुर्ण जेवणाच्या आशेनेच आम्ही येथे आलो नं? मग?

बरं, ठिक आहे. काय काय वाढू तुम्हाला?

तुम्ही म्हणाल तसं. काहीपण वाढा. पण सगळं साग्रसंगीत झालं पाहीजे. अगदी पाण्यापासून ते शेवटी तोंड गोडही झालं पाहीजे.

आता हे तुम्ही आम्हाला सांगता? तुम्हाला काय हवं काय नको हे सगळं आम्हाला तोंडपाठ आहे. नेहमीचं मेंबर तुम्ही आमचे. बरं कोठे बसता जेवायला? आत वाढू की येथेच बाहेर करणार जेवण?

बाहेर नको, आतच बसतो. बाहेर इतर मेंबरचाही त्रास होतो. म्हणजे पैसे ही द्यायचे अन जेवणाचे समाधानही नाही. शांतपणे जेवण करण्यातच मजा आहे. म्हणुनच तर आम्ही येथे येतो. हो की नाही?

ते तर खरेच हो. तुम्हाला आत जातीने वाढते. बघते कोण उपाशी राहते ते.

अहो आजच्या जेवणाने काय होईल? एकतर आम्ही एकटे माणूस. लग्नानंतर आम्ही घरीच जेवू. तरीही तुमची आठवण येतच राहील हो.

बरं बरं मास्तर. जास्त हरभर्‍याच्या झाडावर चढवू नका. बोलतांना तुमचे तोंड कोणी घरू शकत नाही. चला तर मग लवकर बसा.

हो हो आलो लगेचच. तुम्ही तयारी करा तर मग.

Monday, March 1, 2010

अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास

अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास
पुर्वप्रकाशीत : हा भाग

२००३ साली मी एका मोठया कॉम्पूटरच्या कंपनीत नोकरीला असतांनाची ही गोष्ट आहे. गोष्ट म्हणण्यापेक्षा मी मोटरसायकलवर जो काही २००० ते २५०० किमी प्रवास केला त्याचा हा अनूभव आहे. एखाद्या अलिखीत रोजनिशीतील पाने असे म्हटले तरी चालेल.

पगारपाणी चांगले होते. पण काम मनासारखे नव्हते. काम काही जास्त नसायचे. वेगवेगळ्या सरकारी ऑफीसात भेटून निघणारे टेंडरांवर लक्ष ठेवणे व रिलेशन्स सांभाळणे हे काम होते. कामानिमीत्त फिरणे फार व्हायचे. बरे फक्त पुणे नाही तर मुंबई, नाशिक, नगर, औरंगावाद असलाही चक्कर व्हायचा. त्यातच कधीकधी कॉम्पूटरच्या पार्टस् ची डिलीव्हरी शेड्यूल पाहणे वैगेरे नियमबाह्य कामे पण बघावी लागायची.

२००३ च्या १० व्या महिन्यात (ऑक्टोबर २००३) साली कंपनीला एका मोठ्या राज्यपातळीवरील सरकारी कार्यालयातून कॉम्पूटर्स सप्लाय करण्याची ऑर्डर 'भेटणार' होती. 'भेटणार' म्हणजे अजून टेंडर निघालेले पण नव्हते पण सगळी 'सेटींग' झालेली होती. ते कॉम्पूटर्स विवीध सरकारी कार्यालये, आयटीआय, आमदार निधीसाठी, निरनिराळ्या शाळा, काही एनजीओ व मुख्य म्हणजे ठिकठिकाणच्या आदिवासी शाळांना सप्लाय करायचे होते. कंपनीने व सरकारी अधिकार्‍यांनी त्या त्या ठिकाणांची यादी आधीच तयार केलेली होती.

या कामाला मला जुंपण्यात आले. सुरवातीला मला पुणे विभाग देण्यात आला होता पण नंतर नाशिक महसूल विभाग देण्यात आला. तेथील विभागातल्या ठिकठिकाणच्या आश्रमशाळांमध्ये जावून 'आमच्या आश्रमशाळेमध्ये कॉम्पूटर फिट करण्यासाठी योग्य जागा व विज आहे. आम्हाला कॉम्पूटर ची आवश्यकता आहे' असल्या अर्थाचा एक अर्ज त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून सहीशिक्यानिशी आणायचा होता. अर्ज तयारच होता. मला जावून फक्त सहिशिक्का आणायचा होता.

मी कंपनीतून पैसे अ‍ॅडव्हान्स उचलले. माझी भेट देणार्‍या आश्रम शाळांची नाशिक विभागातील यादी पण घेतली. नाशिक जिल्हा हा नाशिकमधला अधिकारी सांभाळणार असल्याने त्या शाळा सोडून माझ्या वाट्याला एकूण २०/२१ आश्रमशाळा आल्या. माझ्या वाटेच्या शाळांमध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा व जळ्गाव जिल्हयातल्या शाळा होत्या.

थोडे आश्रमशाळांबद्दल: आश्रमशाळा ह्या महाराष्ट्र शासनाने चालवलेल्या निवासी शाळा असतात. त्या बहूतेक करून आदिवासी भागातच आहेत. मुले मुली या शाळांत राहतात व शिकतात. काही शाळा फक्त मुलांसाठी किंवा फक्त मुलींसाठी असतात तर बहूतेक शाळा एकत्र आहेत. अगदी गरीब परिस्थीती असणारी लहान लहान मुले या शाळात शिकायला असतात. त्यांच्याकडे बघीतले तर अगदी कणव येते. फक्त दिवाळी व मे च्या सुट्यांत त्यांना घरी जाता येते. सर्व शिक्षकांना त्या त्या शाळांमध्येच असणार्‍या क्वार्टर्स मध्ये रहावे लागते. मुलांना लागणारे जेवण शाळेतच तयार केले जाते. शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई, कामाठी आदी असतात. मुलांना सकाळी १२ वाजता तर संध्याकाळी ६ वाजता जेवण दिले जाते. (फक्त खिचडी! दोन जेवणात किती कमी अंतर आहे. नंतर सकाळच्या जेवणात किती जास्त अंतर आहे तुम्हीच बघा. कुपोषण होणार नाही तर काय होईल हो त्या गरीब मुलांचे?)
(आश्रमशाळांमध्ये अनेक गैरप्रकार घडतात. ते आपण पेपरात वाचतोच. व्यवस्थापन कसे ढिसाळ असते, मुलांचे काय हाल होतात, शिक्षणाचा दर्जा काय, हा या लेखाचा विषय नाही तरीही लेखनाच्या ओघात तसे उल्लेख येवू शकतात.)

घरी आल्यानंतर आता पुढची वाटचाल कशी करावी या विचारात गुंतलो. एकतर अनोळखी प्रदेशात जायचे होते, आणि मी आश्रमशाळांबाबतच्या दुष्किर्तीबद्दल ऐकून होतो. मला केवळ एका अर्जावर मुख्याध्यापकांचा सहीशिक्का आणायचा होता. माझे काम जरी पाच-दहा मिनीटांचे असले तरी ते त्या त्या आश्रशाळांमध्ये जावून करायचे होते. बरे कंपनीत कोणीही या माझ्या जाण्याच्या ठिकाणांना भेट देवून आलेले नव्हते. सगळे अधिकारी, ईंजीनीयर्स हे ऑफीसात बसणारे होते. माझ्या हातात केवळ आश्रमशाळांची यादी व पैसे होते. यादीत केवळ आश्रमशाळा (यापुढे शाळा) असलेली गावे व त्यांच्या तालूक्यांचा उल्लेख होता. त्या ठिकाणी कसे जावे याबाबत काहीच मार्गदर्शन नव्हते. एकूणच माझी परिस्थीती गंभीर होती.

सगळ्यात पहिल्यांदा मी बाजारात जावून महाराष्ट्राच्या नकाशाचे पुस्तक आणले. बाजारात अनेक नकाशे उपलब्ध होते. मला साधारण जिल्हा लेव्हलचा नकाशा हवा होता. त्या नकाशापुस्तकांत औरंगाबादच्या समर्थ उद्योग प्रकाशनाचा 'रोड अ‍ॅटलास महाराष्ट्र' हे पुस्तक मला चांगले वाटले.त्यात नवीन तालूके व नवीन रोड यांसहीत गावांची नावे प्रकाशीत केलेली होती.
मी सगळ्या आश्रमशाळाची यादी परत एकदा बघीतली. त्या त्या ठिकाणच्या आश्रमशाळांची (यापुढे शाळा) गावे त्या नकाशात आहेत काय हे बघीतले. नशीबाने बर्‍याचशा गावांची नावे नकाशात होती. त्या गावांच्या नावावर मी पेनाने सर्कल केले.

एकूणच परिस्थीतीचा विचार करून यादीतील वीसएक शाळांचे साधारण मी दोन गट केले. ऑफीसात मी एकाचवेळी या सगळ्या शाळांत न जाता दोन वेळात जाणार असे सांगीतले. त्यानंतर मी प्रवासाची तयारी केली. जरूरीपुरते कपडे, पैसे, शाळांची यादी, नकाशा पुस्तक, मोबाईल इ. वस्तू घेतल्या. त्याकाळी माझ्याकडे बीएसएनएल चे पोस्टपेड कनेक्शन होते. मोबाईल ग्रामीण भागात एवढा फोफावला नव्हता, तरी पण केवळ बीएसएनएल आहे म्हणून रेंज मिळेल असे मनात गृहीत धरून चालत होतो.

प्रवासाला निघण्याच्या अदल्या दिवशी मी जसे काही वनवासाला निघालो अशी माझी परिस्थीती होती. अनोळखी भाग, अपुरी माहिती, किती दिवस लागतील याची माहिती नाही. वनवासाला जाणार्‍या रामाप्रमाणे मी घरच्यांचा निरोप घेतला.

नकाशाचा अभ्यास करून मी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर तालूक्यातील 'सुकापूर' या गावापासून प्रवासला सुरूवात करण्याचे निश्चीत केले. त्यानंतरच्या दिवशी म्हणजे शनिवार ११/१०/०३ ला सकाळी १० ला मी नाशिक-नंदुरबार ही बस पकडली. नकाशात सुकापूर हे गाव पिंपळनेरच्या अलीकडे दिसत होते. बसमध्ये बसल्यानंतर मी एकदोन जणांना सुकापूरला कसे जाणार याविषयी विचारले असता पिंपळनेर पर्यंत न जाता पिंपळनेरच्या अलिकडे सुकापूरला जाण्यार्‍या रस्त्यावर उतरण्याचा सल्ला मिळाला. कंडक्टरने तिकीट पिंपळनेरचे काढण्यास सांगीतले. बस देवळा, सटाणा, तहाराबाद करत पिंपळनेरच्या २ /१ किमी अलीकडे असलेल्या एका फाट्याजवळ थांबली. मला तेथेच उतरावे लागले.

खाली उतरल्यानंतर रस्त्याच्या एका बाजूला पेट्रोल पंप होता व दुसर्‍या बाजूला एक हॉटेल होते. दुपारचा १ वाजला असल्याने मला भुक लागली होती. आता पुढील ४/५ दिवस मिळेल ते खावे लागणार ह्या हिशोबाने तयारी ठेवलेली असल्याने त्या हॉटेलात मी काहीतरकाहीतरीखाल्ले. आता आठवत नाही पण बहूतेक मिसळच असणार. (शक्यतो मी पाव टाळतो.) गल्यावर असणार्‍या माणसाला मी सुकापूर ला कसे जाणार या विषयी विचारले. त्याने मला फाट्यावर उभे रहा व एखादी जीप मिळते का ते पहाण्याविषयी सांगीतले. आश्रमशाळांत जातांना प्रत्येक ठिकाणी बस मिळेलच अशी खात्री नसल्याने मिळेल त्या वाहनाने प्रवास करण्याचे मी ठरवले होते. मी हातात बॅग घेवून फाट्यावर उभा राहीलो.

एकदोन गाड्यांना हात दिला. त्यानंतर एक खच्चून भरलेली प्रवासी जीप आली. एकहीजण खाली उतरला नाही. ड्रायव्हर अर्धा बाहेर राहून जीप चालवत होता. काही लोकं मागच्या फाळक्यावर बसलेले होते. तिनचार जण मागच्या पाय ठेवायच्या जागी उभे होते. त्या परिस्थीतीत आता मी जीपमध्ये कसा चढणार हा प्रश्न मला पडला होता. गाडीत तर माझी बॅगही ठेवायला जागा नव्हती. जीपमधल्या लोकांनी मी तेथील स्थानिक नाही हे ओळखले. एकदोन जणांनी मागे उभे राहायला सांगीतले. मला ते सगळे नवीनच होते. त्या प्रवासातील धोका ओळखून नकार देण्याची माझी तयारी होती पण पुढची सगळी कामे बघून मी बॅग जीपवरील कॅरीयरवर ठेवली व मागच्या पाय ठेवण्याच्या पायरीवर उभा राहीलो. गाडी तर ड्रायव्हर हाणत होता. रस्ता हा ग्रामीण भागातला असल्याने सिंगल असून उखडलेला होता. मला जीपचे कॅरीयर घट्ट पकडून ठेवणे भाग होते. वीसेक मिनीटात सुकापूर आले.

जीप'वरून' उतरल्यावर पाहीले तर सुकापूर अगदी छोटे खडेगाव दिसले. जवळच एका पाझर तलावाचे पाणीही दिसले. एका जणाला आश्रमशाळा कोठे आहे ते विचारले. त्याने जवळच असल्याचा हात दाखवून उल्लेख केला. मी चालत चालत शाळेत पोहोचलो. शनिवार असल्याने मुले आवारात खेळत होती. मी मुख्याध्यापकांची रुम कोणती ते विचारल्यावर त्यांनी ती सांगीतली. मी तेथे गेल्यावर माझी ओळख मी तेथील शिक्षकांना करून दिली. माझे येण्याचे प्रयोजन सांगीतले. त्यांनी मला बसायला सांगून मुख्याध्यापकांना येण्याविषयी निरोप एका मुलाकडे दिला. मी पुण्याहून आलो असे सांगताच कोणीतरी आपल्या डिपार्टमेंटचा माणुस आहे असे समजून ते बोलत होते.

मला वेळ नाही व मला फक्त सही हवी असे त्यांना सांगीतले. तुमच्या शाळेला काही दिवसांनी नवीन कॉम्पुटर मिळतील असे त्यांना सागीतले. त्यानंतर त्यांनी मला एका रुममध्ये नेले. रुमची चावी एका शिक्षकांकडून मागून घेतली. एक धूळ भरलेली रुम उघडल्यावर आत बरेचशे खोके दिसले. ते सगळे कॉम्पुटरचे खोके होते. त्या सगळ्या खोक्यांत ७ कॉम्पुटर होते. मॉनीटर व सिपीयू, प्रिंटर, युपीएस चे जवळपास वीस एक खोके अगदी सिलपॅक होते. एकही खोका फोडलेला नव्हता. त्यांनी मला सांगीतले की हे सगळे कॉम्पुटर मागच्याच वर्षी आलेली आहेत व अजूनपर्यंत इंन्टॉलही झालेले नसतांना अजून तुम्ही कॉम्पुटर्स का देता आहात! मी त्यांना सांगीतले की तो माझा प्रश्न नाही. हे आधीच ठरलेले असते. आपण नोकर माणूस. मला फक्त या या अर्जावर सहीशिक्का द्या, मला लगेचच निघावे लागेल. तेवढ्यात मुख्याध्यापक आले. त्यांना माझे प्रयोजन सांगीतले. त्यांनी काही खळखळ न करता सही शिक्का दिला. मी लगोलग त्यांचा निरोप घेतला.

परत जीपने गावात जेथे सोडले तेथे आलो. चौकशी केल्यानंतर आता अर्ध्या तासाने वरून एक बस येईल किंवा एखादे जीपडे भेटेल तर त्याने जा असे सांगीतले. गाव तर अगदी खेडे होते. मी तेथे एका टपरीवजा जागेत बसलो. जवळपास ५ वाजत आले होते. शेजारच्या एका टपरीतून टाईमपाससाठी चॉकलेटं घेतली, बसलो चघळत. तेवढ्यात तेथे एक मुस्लीम माणूस आला. त्याने एक बकरी पण आणली होती. सराईतपणे तो मी बसलेल्या टपरीत बकरी बांधून तो तयारी करू लागला. मला लगेच कल्पना आली की ती टपरी त्याची असून तो आता बकरीला कापणार. मी शाकाहारी असल्याने मला थोडी किळस आली पण हे जीवन आहे ते जगलेच पाहीजे असा विचार करून मी तेथून उठलो. आता त्या बकरीला कापतांना आपल्याला बघू न लागावे म्हणून थोडा लांब जावून उभा राहीलो. तो पर्यंत तेथे त्याचे गिर्‍हाईके येवू लागली. माझ्या नशिबाने लगेचच एक बस आल्याने पुढचा प्रसंग मला पाहता आला नाही. मी लगेचच बस मध्ये बसलो व बस पिंपळनेरच्या दिशेने निघाली.

सुकापूरहून निघून पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) पर्यंत पोहोचेपर्यंत सायंकाळचे ६ वाजायला आले. पिंपळनेर हे एक मोठे व्यापारी गाव आहे. माझ्या बायकोचे हे मामाचे गाव. त्या गावात मी एक दोन वेळा यापुर्वी राहीलोही होतो. आजूबाजूला पुर्णपणे आदिवासी भाग, डोंगर असलेला हे गाव. गावातील लोकं एकूणच प्रेमळ. जेवणानंतर 'गोटीसोडा' पिण्याचा फार आग्रह करतात. अर्थात हे उल्लेख मी मागे राहीलो त्यासंदर्भात आलेले आहेत.
पण आता मला तेथे राहता येणार नव्हते. अंधार पडायला सुरूवात झालेली होती. घरापासून लांब आलेलो असल्याने घरची जास्तच ओढ लागलेली होती. त्यातच अनोळखी भागात जाण्याची अनामिक भिती, पुढील प्रवासाच्या तजविजीची काळजी लागलेली होती. पिंपळनेरपासून निघून नवापूर या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. नवापूर हे माझ्या सासूरवाडीचे गाव. या गावाचा उल्लेख यापुर्वी मी येथे 'दोन राज्यांचे रेल्वे स्टेशन' असा लेख लिहून केलेलाच आहे, तो आपल्या लक्षात असेलच. मी माझ्या प्रवासाचे नियोजन नकाशात पाहून केलेले होते. त्यातल्या बर्‍याचशा आश्रमशाळा ह्या नंदुरबारच्या आसपास होत्या. त्यामुळे मला नवापुरला मुक्कामाला सोईचे जाणार होते.

मला पिंपळनेरहून नवापुरला (चरणमाळ घाटामार्गे) जाणारी बस मिळाली. पिंपळनेरहून नवापुर (म्हणजेच पुढे सुरत कडे) ला जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे चरणमाळ घाटामार्गे व दुसरा म्हणजे कोंडाईबारी ह्या घाटामार्गे. (कोंडाईबारी मार्गे जाणारा मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग एन.एच. ६ आहे.) दोन्ही मार्गादरम्यान सदर घाट/ बारी लागतात. निसर्गाने या भागात त्याच्या संप्पत्तीची भरभरून उधळण केलेली आहे. आपण शहरी लोक ज्या 'अनटच्ड- व्हर्जीन' असा निसर्ग शोधतो, तो येथे आहे. कोकणात असा निसर्ग आहे पण तेथेही व्यापाराचा शिरकाव झालेला आहे. ज्यांना खरोखरच
निसर्गापुढे लिन व्ह्यायचे आहे ते पर्यटक वृत्तीचे लोक या भागात भेट देवून आपली भुक भागवू शकतात. (या दोन्ही रस्त्यांवरून मी बर्‍याचदा प्रवास केलेला असल्याने हे मी अधिकाराने सांगतो आहे.)
भरपुर सागाने हरित असलेली वने, पाण्याने भरलेले ओढे, नाले व नद्या. मध्येच दिसणारे डोंगर. उत्तम शेती. त्याचबरोबर प्रेमळ आदिवासी समाज, त्यांच्या वैशिठ्यपूर्ण शैलीने चित्रांकीत केलेल्या झोपड्या असले या भागात असणारे दृष्य आपल्या नजरेला तर सुखावतेच पण प्रवासाचा त्रास पण घालवते. फक्त त्या कडे त्या नजरेने पहाण्याची वृत्ती हवी. अर्थात हे मी दिवसा केलेल्या प्रवासाबद्दल बोलतो आहे.

माझा सध्याचा प्रवास हा संध्याकाळी घडत होता. साधारणत: ८ वाजेच्या दरम्यान मी नवापुरला पोहचलो. जेवण केल्यानंतर मी माझ्या येण्याचे प्रयोजन माझ्या सासरेबुवांना सांगीतले. माझे सासरे हे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये रेंजर होते. पुर्वी त्यांनी नोकरीच्या काळात घोड्यावरून हा सगळा भाग पालथा घातलेला होता. त्यामुळे या भागात कसे फिरायचे याबद्दल ते अधीक चांगले सांगू शकत होते. माझ्याकडील आश्रमशाळांच्या गावांची यादी बघीतल्यानंतर त्यांनी मला होणार्‍या प्रवासाची कल्पना दिली. बसने प्रवास केल्यास प्रत्येक ठिकाणी बस जात नसल्याने मला जवळपासच्या गावाच्या फाट्यावर उतरून शाळेत जावे लागणार होते. बर्‍याचशा शाळा नव्याने तयार झाल्याने त्यांनाही माहीत नव्हत्या. बरे त्या शाळा काही एकाच मार्गावरील गावातल्या नव्हत्या. थोडक्यात बसने प्रवास केल्यास एका दिवसात एकच शाळेत जाणे शक्य होते. मला तर जास्त दिवस यात वाया घालवण्याची इच्छा नव्हती. मी त्यांना मोटरसायकलवरून हा प्रवास करण्याबद्दल त्यांना सांगितले. काळजीपोटी त्यांनी त्यास नकार दिला. एकतर या भागात मी अनोळखी, रस्ते माहित नाही, त्यातच मोटरसायकल प्रवास. सासूबाई तर जाण्यास नकार देत पुण्याला कंपनीत फोन करून हे काम न करण्याबद्दल आग्रही होत्या. पण मी स्विकारलेले काम पुर्ण करणे मला भाग होते. हा काही माझा पहिलाच मोटरसायकलवरून लांबचा प्रवास नव्हता. आधीच्या कंपनीत असतांना मी हायवेने मैलोगणती एकट्याने प्रवास केलेला होता. अगदी पावसात मोटरसायकलवरचा कित्येक किमी चा प्रवासाचा अनूभव माझ्या पाठीशी होता. त्यामूळे ठाम निर्णय घेवून त्यांना मी मोटरसाकल घेवूनच पुढिल प्रवास करण्याबद्दल सांगितल्यावर त्यांचा नाईलाज झाला. त्यानंतर त्यांनी मला प्रवासास होकार दिला.

दुसर्‍या दिवशी सकाळी आन्हीके आवरून मेहूण्यांची मोटरसायकल (TVS Suzuki AX 100 R) माझ्या ताब्यात घेतली. गाडीचे मेंटेनन्स नुकतेच केलेले होते. मी हवा चेक करून पेट्रोल भरून घेतले. मला हेल्मेट असल्याशिवाय मोटरसायकल चालवणे आवडत नसल्याने त्यांच्याकडचे हेल्मेट घेतले. त्याची काच तुटलेली असल्याने पुढे मला माझा गॉगल कामाला आला. (मला हेल्मेट ची ईतकी सवय लागलेली आहे की मला कोणी मला 'हेल्मेट घालून झोप' असे सांगीतले तरी मी झोपू शकेन. कंपनीत बर्‍याचशा लोकांना मी हेल्मेट घालण्याची सवय लावून दिली आहे. असो.) गाडीच्या डिक्कीत ताईंनी केलेला जेवणाचा डबा, नकाशाचे पुस्तक आदी ठेवले. गाडीचे मेंटेनन्स किट टुल बॉक्स मध्ये ठेवले व गाडीला किक मारली. माझी पुढील शाळा 'नवापाडा' या गावाची होती.

नवापाडा हे ता. साक्री, जि. धुळे यात येते. नवापुर जवळ देखील एक नवापाडा होते. एकाच तालूक्यात किंवा जिल्ह्यात एकसारखी नावे असल्याचे आढळते. नवापुरहून मी निघाल्यानंतर एन. एच. ६ (सुरत-नागपूर) चिंचपाडा, विसरवाडी कोंडाईबारी मार्गे दहिवेल या गावापर्यंत आलो. दहिवेल हे गाव थोडक्यात आपण 'जंक्शन' समजू, कारण या ठिकाणी एन. एच. ६ ला नाशिकहून येणारा राज्यमहामार्ग मिळतो. पुणे तसेच दक्षिण भारतातील मालवाहतूक करणार्‍या ट्रक्स याच रस्त्याने जातात. साउथ इंडीयातील ट्रक्स साधारण चॉकलेटी रंगाने रंगविलेल्या असतात. यातील बहूतेक ड्रायव्हर आपले जेवण स्वत:च रस्त्याच्या कडेला ट्रक उभे करून बनवतात. चिंचपाड्यात रेल्वे क्रॉसींवर रेल्वे जाणार असल्याने थांबावे लागले. एक मालगाडी गेली. तरीही रेल्वे गेट काही उघडले नाही. नंतर मात्र मी मोटरसायकल गेटखाली तिरपी करून काढून घेतली.

चिंचपाड्यात ख्रिस्ती मिशनरींचा मोठे हॉस्पिटल आहे. बर्‍याचशा आदिवासी लोकांनी ख्रिस्ती धर्म स्विकारलेला असल्याने छोटे छोटे कुडाच्या झोपड्यांतदेखील चर्चेस आहेत. ख्रिस्ती आदिवासी स्त्रिया इतर (हिंदू) आदिवासी स्त्रियांसारखाच पेहेराव करतात मात्र कपाळावर टिकली किंवा कुंकू लावत नाहीत. मला तर ते फार विचीत्र वाटले. आदिवासी समाजातली नावेही आपल्याला नविन असणारी अशीच असतात. उदा. गामण्या, सुका, हिर्‍या आदी. हिंदु आदिवासींची 'देवमोगरा माता' ही देवी आहे.

तर मी दहिवेल पर्यंत आलो. नकाशात नवापाड्याच्या जवळील तेच गाव दिसत होते. हायवेलाच कोणालातरी मी नवापाड्याचा रस्ता विचारला. त्याने डाव्या हाताचा मार्ग दाखवला. तो मार्ग एका टेकडीवरून जात होता व तोच जवळचा मार्ग असल्याचे त्याने सांगितले. मी त्या रस्त्याला लागलो. ड्रायव्हर लाईन मध्ये रस्ता किती खराब आहे ते सांकेतीक भाषेत बोलले जाते. म्हणजे अमूक अमूक रस्ता हा '१० चा १२' आहे, हा रस्ता '१० चा १५' आहे, तमूक रस्ता '१० चा १८' किंवा २० आहे वैगेरे वैगेरे. '१० चा १२' म्हणजे १० किमी जायचे व १२ किमी चा वेळ व इंधन नासवायचे. मी आता ज्या रस्त्याने गाडी चालवत होतो तो रस्ता या सांकेतीक भाषेत '१० चा २०' होता. एकतर पावसाळा नुकताच संपलेला. हा रस्ता म्हणजे एक टेकडीच्या बाजूने जो दरीसारखा खोलगट भाग असतो त्यातून दोन टेकड्यांच्या एक चंद्रकोरीसारखा भाग दिसत होता त्यातून जात होता. छोटा घाटच म्हणजेच बारी म्हणाना. रस्त्याच्या आजूबाजूला मोठी खडी येवून पडलेली होती. म्हणजेच 'अजून' रस्त्याचे काम झालेले नव्हते. डोंगरउतार असल्याने मधूनच छोटे छोटे ओहोळ रस्ता पार करत होते व त्यांना रस्त्याने जाणार्‍यांची अडचण होत होती! असला रस्ता अंदाजे १० किमी चा असावा. ताशी १० च्या 'वेगाने' मी दोन टेकड्यांच्या बारीत पोहोचलो. तेथे दोन रस्ते एकत्र आल्याने परत एका झाडाखाली काहीतरी धार्मीक कार्यक्रम करणार्‍या समूदायाला मी नवापाड्याचा मार्ग विचारला. परत मी योग्य रस्त्याने जावू लागलो. त्यानंतर एका छोट्या गावातून परत फाटे फुटल्याने योग्य मार्ग विचारावा लागला. नंतर थोडी चढण लागली व मला एक दोन पवनचक्या दिसल्या. (या ठिकाणीच आता शेकड्याने विंन्ड फार्म तयार झालेले आहे ज्यात प्रिती झिंटा, सलमान, सचिन तेंडूलकर यांच्या पवनचक्यांच्या 'विजनिर्मीती कंपन्या' आहेत. आताशा मोठ्या लोकांनी बळजबरी शेतजमीनी बळकावल्याने कायम वाद होत असतात. एकदोन खुनही झाले आहेत. ) तिथेच नवापाडा आश्रमशाळा होती.

दोन डोंगरांच्या उतारावर ह्या आश्रमशाळांच्या तीनचार एकमजली बिल्डींग दिसू लागल्या. मी तडक गाडी गेटजवळ थांबवली व मुख्याध्यापकांची रूम विचारली. तो दिवस रविवार (१२/१०/२००३) असल्याने मला माहिती सांगणार्‍याने जवळच मुख्याध्यापक राहत असणार्‍या घराकडे नेले. (आश्रमशाळेतील अध्यापकांना तेथेच राहणे बंधनकारक आहे.) मुख्याध्यापक काही घरी नव्हते. पण त्यांच्या पत्नीने त्यांच्या छोट्या मुलीस बोलवायला धाडले तोपर्यंत मी तेथेच थांबलो. मुख्याध्यापक लगेचच आले. त्यांनी घरात चहा टाकायला सांगीतले. आपण कोण, कोठून आलात, काय काम वैगेरे चौकशी केली. ते जवळच असलेल्या नवापाडा ह्या गावचेच होते. (आश्रमशाळा साधारणत: गावाजवळ असते.) त्यांचे गाव मी आलेल्या रस्त्याच्या दिशेच्या त्याच त्या छोट्या बारीजवळील एका पठारावर दिसले. त्यांच्या घरातून त्यांनी ते दाखवले. त्यांची तेथे शेतीवाडी होती. आज रविवार असल्याने ते तेथेच जाणार होते. मी थोडा उशीरा गेलो असतो तर त्यांची भेट झाली नसती, (व माझे कामही रखडले असते.) असे त्यांनी सांगीतले. चहा घेवून आम्ही पायी त्यांच्या ऑफिसाकडे- शाळेकडे निघालो. रस्त्यात त्यांनी त्यांच्याकडील असणार्‍या संगणकांच्या तक्रारी केल्या. काही चालत नाही, काही मॉनीटर बंद पडले, युपीएस लवकर बंद होतो, प्रिंटरमधली शाई संपली आदी. मी काही ते काम करण्यासाठी आलो नव्हतो पण नकार देवून आपले काम का लांबवा ? असा विचार करून मी 'काम माझे झाल्यावर बघतो' असे त्यांना सांगीतले. लगोलग आम्ही त्यांची सहीशिक्के घेतले. तेथेचे ३ /४ शिक्षक नव्याने भरती झालेले आले. त्यांनी मला त्यांची प्रयोगशाळा दाखवली. मला तर घाई होती व ते पाहणे परवडणारे नव्हते. तरीही त्यांना टाळता आले नाही. नंतर आमची वरात त्यांच्या संगणकाच्या लॅब असणार्‍या इमारतीकडे वळली. आता शाळेचे आवार बरेच मोठे होते. त्यामूळे मी येथे मोटरसायकल आणली असती तर बरे झाले असते असे वाटू लागले. लॅबकडे जातांना मागे मोठे डोंगरउतार होते. जवळच्याच नाल्यात शाळेचे विद्यार्थी आपले कपडे धुण्यासाठी आलेले होते. ते वातावरण बघून मला ते सगळे एखाद्या पुराणकालीन आश्रमाचे विद्यार्थीच वाटू लागले. पण ते आधूनिक विद्यार्थी होते व त्यांचे अध्यापकही आताच्या काळातले होते. लॅबमधील बंद असणारे संगणक मी वरवर बघितल्यासारखे केले. मी त्यांना थोडीच दुरूस्त करू शकत होतो? मी त्यांचे सिरीयल नंबर्स घेतले व मी माझ्या वरीष्ठांना सांगतो असे त्यांना सांगीतले. तो सगळा सप्लाय आमच्याकडून झालेलाच नसल्याने आम्ही त्याला खरे तर बांधील नव्हतो पण त्यांचे माझ्या वागण्याने समाधान झाले व मी त्यांना पुढील आश्रमशाळेचा पत्ता विचारला. मला 'लोय' किंवा 'कोठली' (दोन्ही जि. नंदुरबारमध्ये) या कोणत्याही जवळ असणार्‍या गावी पुढील आश्रमशाळेत जायचे होते. त्यांनी मला 'लोय' या गावाहून नंतर कोठली या गावी जाण्याचा सल्ला दिला. नकाशात तर लोय हे गाव काही दिसत नव्हते व ते कोठे आहे हे त्यांनाही सांगता येईना पण कोठली या गावाजवळ असण्याबद्दल ते ठाम होते. मी त्यांना धन्यवाद देवून त्यांचा निरोप घेतला.

परत मी आलेल्या रस्त्याने गाडी हाकू लागलो. ब्राम्हणवेल या गावामार्गे मी छडवेल (कोर्डे) या गावी आलो. गावातल्या रस्त्यांच्या बाबतीत तर बोलायचे कामच नव्हते. पण या गावांना जोडणारे रस्ते चांगले १० चा १२ किंवा १३ च्या टाईपचे होते. मी जेवण केले नाही पण दुपारचे २ वाजून गेले होते. वातावरण एकदम मस्त होते. मोटरसायकल जर आपण वेगात चालवत नसू तर मोटरसायकल चालवण्याचा आनंद घेता येवू शकतो आणि या रस्त्यांवर मी ठरवूनही वाहन जोरात चालवू शकत नव्हतो. हा आनंद बर्‍याचदा मी अनूभवला आहे. छडवेल च्या पलीकडे एक बर्‍यापैकी जंगल असलेला पाचएक किमीचा एक घाट लागला. तो रस्ता आता मला नंदूरबार या जिल्ह्याच्या ठिकाणाकडे नेत होता. घाटात रस्त्याचे काम चालू होते. त्यानंतर लागलेल्या एका गावात मी योग्य मार्गाला आहे का याची खात्री एका शेतकर्‍याकडून करून घेतली. तो शेतकरी धान्याचे कणसं वार्‍यावर उफणत होता. धान्याची मोठी रास पडलेली होती. तेथून एक रस्ता कोठली कडे जात होता तर एक नंदुरबारकडे. पण कोठलीकडे जाणार्‍या रस्त्यावरच्या फरशीवरून बर्‍याच उंचीवरून पाणी वेगाने वाहत होते. न जाणो मोटरसायकलच्या सायलेन्सर मध्ये पाणी जावून ती बंद पडायची व माझा दिवस फुकट जायचा असा विचार माझ्या मनात आला. माझी काही तेथून जाण्याची धडगत झाली नाही. त्याने सांगीतले की 'मग तुम्ही नंदुरबारच्या अलिकडून आधी लोय करा नंतर कोठली करा'. मी पुढच्या रस्त्याला लागलो. आता रस्ता फारच चांगला व मोठा होता. त्यानंतर मी लोय या गावी जाणार्‍या रस्त्याला लागलो. साधारणत: कोठेही दोन रस्ते एकत्र आले तर जवळपास माणूस बघून मी त्याला पुढील मार्ग विचारत असे. उगीच आपले डेअरींग करायचे व पुढे चुकीच्या ठिकाणी जायचे मला परवडणारे नव्हते. थोडक्यात मला आता ग्रामीण भागातून प्रवास कसा करायचा याचा अंदाज येत चालला होता. पुढील गावाची दिशा विचारायची व त्या दिशेला वाहन टाकायचे. रस्ता असेलच ही अपेक्षा केली नाही तर बहूतेक गावे एकमेकांना जोडलेली असतात. पायवाट, बैलगाडीवाट, पडीक शेत, पांधी (कोरडा नाला) असल्या रस्त्यांतून वाहन चालवायची डेअरींग केली की पुढचा मार्ग सुकर होतो हेही मी शिकलो. फक्त मोटरसायकलीत काही बिघाड नको किमानपक्षी पंक्चर तरी नको ही अपेक्षा ठेवली पाहीजे.

गाव संपले किंवा सुरू झाले की एखाद दोन किमी रस्ता चांगला असे नंतर मात्र तो खडीचा असे. लोय गावात (गाव खरे तर आश्रमशाळेपासून लांबच असते.) आलो तर आश्रमशाळा एका दाट झाडीत होती. सैनिंकांच्या बर्‍याक कशा असतात तशा या आश्रमशाळा बांधलेल्या असतात. सरकारी डिपार्टमेंट बहूदा एकच डिझाईन पास करत असल्याने सगळ्या आश्रमशाळा मला एकाच मुशीतून काढलेल्या आढलल्या. अगदी बाहेरचा दिलेला रंगही एकसारखा. दाट झाडीमुळे मला शाळा निट दिसली नाही त्यामुळे एकदोन ठिकाणी विचारावे लागले. तोपर्यंत ४.३० वाजले. तेथे असलेल्या मुलांना मी मुख्याध्यापकांबद्दल विचारले. मला बघण्यासाठी शिक्षकांच्या घरांतील काही व्यक्ती आल्या. ते बहूतेक शिक्षकच असावेत. त्यांनी सांगीतले की दिवाळीच्या सुटीत घरी गेलेली मुले अजून शाळेत आली नाही. आज रविवार असल्याने मुख्याध्यापक येथे नाहीत. मी माझे काम फक्त सहीकरण्यापूरते असल्याचे सांगीतल्यानंतर त्यांनी शिक्यांसाठी मुख्याध्यापकांची शाळेतील रूम उघडण्यासाठी चाव्या शोधायला सुरूवात केली. मुख्याध्यापकांच्या पत्नीने चाव्या त्यांच्याकडेच असल्याचे सांगीतले. आता माझी पंचाईत झाली. तात्काळ निर्णय घेवून मी तेथे नंतर येण्याचे ठरवून व चाव्या त्यांच्याकडेच घरी ठेवण्याची विनंती करून मी गाडीला किक मारली.

पुढचे कोठली हे गाव परत आलेल्या रस्त्याने मागे येवून मुख्य रस्त्याच्या आतमध्ये होते. आता अंधार पडायला सुरूवात होणार होती. मला घाई केली पाहीजे. मी मो.सा. दामटली. अगदी १५/१० मिनीटात मी गावात पोहोचलो. कोठली हे गाव आधी लागले. गावातली वस्ती ही काही वेगळ्याच लोकांची दिसली. आपल्याकडे कसे घुंघट ओढणार्‍या बाया असतात तसल्या बाया दिसल्या. कोणत्यातरी वेगळ्या समाजाची त्या गावात वस्ती होती. गावाबाहेर आश्रमशाळा होती. मोठे मैदान होते. तेथे गेल्यानंतर ऑफीससमोरच गाडी लावली. ही शाळा जरा वेगळी असल्याचे दिसले. बहूतेक शिक्षक उपस्थीत होते. शाळेचा प्युन, सुपरवायझर, क्लार्क झाडून हजर होते. मला पटापट सह्या दिल्या. नंतर मला संगणकाचे कामकाज बघणार्‍या बाईंनी मला संगणक असणार्‍या रुम मध्ये नेले. तेथे संगणक शिकवीतही असावेत कारण बहूतेक संगणक चालू होते. भिंती वर कसलेकसले तक्ते लावलेले होते. त्या बाईंची तक्रार होती की तेथे विज वारंवार जाते. लवकर येतही नाही. (भारनियमन तेव्हापण होते महाराजा.) तुमचा युपीएस लवकर संपतो. मी परत सगळे सिरीयल नंबर घेतले व वर कळवेन असे सांगीतले. बाहेर आलो तर सहा वाजलेले होते. बाहेर मुले रांगेत उभी होती. त्यांच्या हातात जेवणाची ताटे होती. बाईंनी सांगीतले की मुलांची आता जेवणाची वेळ झाली आहे. त्यांना खिचडी घेण्यासाठी एकत्र बोलावले आहे. माझे काम झालेले होते. मी तेथून निघालो व त्यांनी त्यांचे खिचडी वाटपाचे काम सुरू केले.

मी पुढे कसे जायचे हे विचारलेलेच होते. आता सहा वाजून गेलेले होते. अंधार पडायला सुरूवात झालेली होती. जवळपास मुक्कामाची सोय नव्हती. मी नवापुरला जायचे ठरवले होते. कोठलीला आलेल्या रस्त्याच्या विरूद्ध म्हणजे उत्तरेकडच्या रस्त्याने मला जायचे होते. नंतर मी धानोरा गावाहून येणार्‍या व पुढे खांडबारा या गावाच्या रस्त्याला लागायचे होते. शाळा सोडली व मी रस्त्याला लागलो. रस्ता अतिशय खराब होता. मी लवकर गाडी हाकू शकत नव्हतो. तोच एक छोटा ओहोळ व त्यावरची फरशी लागली. फरशी म्हणजे छोटा पुल किंवा स्लॅब की ज्याची उंची कमी असते. (ज्यांनी ही फरशी पाहीली नाही त्यांचा 'फरशी' नावाने गोंधळ उडू शकतो.) ती नावालाच फरशी होती. नाला पुर्णपणे तेथून वाहत होता. मी अलिकडील काठावर थांबलो असता एक अपंग माणूस व एक धडधाकट माणूस तेथे उभे होते. त्यांनी मला लिप्ट मागीतली. (म्हणजे हायवेला अंगठा दाखवतात तशी नाही तर विचारून). मी केवळ अपंगालाच बसवू इच्छीत होतो पण ते काहीतरी वेगळे समजले व ते दोघेही मागे बसले. तशातच मी ती फरशी पार केली. नंतर पुढच्या २ किमी पर्यंतच्या मुख्यरस्त्याला मी त्यांना सोडले. आता चांगलाच अंधार पडलेला होता. आजूबाजूला तर दाट जंगल लागलेले दिसत होते. झाडांची मोठी मोठी पाने ते सागाची वने असल्याचे सांगत होती. मी मोटरसायकलचा हेडलाईट चालू केला. रस्त्याने कोणीच नाही. तो काही हायवे नव्हता ट्राफीक असायला व आपल्या मुंबई पुण्याकडच्यासारखा रस्ता वाहता असायला. मुख्यरस्त्याला लागताच एक उतार व चढावाचा घाट लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गच्च झाली. काळोख साचायला लागलेला. मोबाईलमध्ये बघितले तर रेंज नव्हती. अर्थात त्या काळी मोबाईलच्या रेंजची या भागात अपेक्षाच करणे चुकीचे होते. अनोळखी भाग. अनोळखी घाटरस्ता. मला थोडी भिती वाटू लागली. असल्या जंगलात मी एकटाच असतांना काय होईल किंवा कोणते जनावर आडवे आले तर काय असले विचार मनात येवू लागले. कोठली येथल्या आश्रमशाळेतच मुक्काम केला असता तर बरे झाले असते असे वाटू लागले. तेथे जेवणाची व झोपायचीदेखील सोय झाली असती. आताशा दुपारचे जेवणदेखील नसल्याने मला भुकेची जाणीव झाली होती. पण आता माघारी जाणे शक्य नव्हते. मी तशीच गाडी पुढे दामटली. घाट जवळपास संपला तेवढ्यातच गाडीच्या हेडलाईटने दगा दिला. रस्त्याने काहीच दिसू नये इतका अंधार अंगावर येत होता. जवळपास काही वस्तीच सोडा पण झोपडी सुद्धा नव्हती. पुर्ण जंगलच होते ते. बरे कोणती मोठी गाडी किंवा टॅक्टर असले वाहन तेथून जात नव्हते की त्याच्या प्रकाशात मी गाडी चालवू शकेन. (अगदी विसरवाडी पर्यंत एकाही वाहनाने मला ओव्हरटेक केले नव्हते. विसरवाडीपासून पुढे नवापुरपर्यंत एन.एच ६ आहे. तो तर कायम वाहता असतो.) थोडक्यात मी थांबू शकत नव्हतो. मी अगदी सावधगीरीने गाडी चालवू लागलो. शहराच्या रस्त्यांचे बरे असते. रेडीयम चे पट्टे किंवा ट्राफिक साईन्स तरी असतात की ज्यांना धरून वाहन चालवता येते. हा तर ग्रामिण भागातला रस्ता होती. आकाशात चंद्रही नव्हता की तो प्रकाश देईल. आता जे गाव, वस्ती किंवा झोपडी लागेल तेथेच मी थांबायचे ठरवले. पण ती वस्ती तर लागली पाहिजे ना तरच मी थांबू शकलो असतो. जवळपास मी पाच एक किमी गाडी चालवली. त्यानंतर एक बैलगाड्यांचा तांडा लागला. त्यांना जवळच्या गावाबद्दल विचारले असता खांडबारा हे गाव जवळच असल्याचे त्यांनी सांगीतले. मी तशीच गाडी चालवू लागलो. पुन्हा पाच एक किमी गेल्यानंतर एका गावाचे लाईट्स दिसू लागले. माझ्या मनाला थोडा धिर आला.

पुढे गेल्यानंतर वस्ती सुरू झाली. आता मी पहिल्यांदा कोणते गॅरेज आहे का ते विचारायचे ठरवले नंतर मुक्कामाची सोय असेल तर घरी फोन करून त्यांना माझी स्थिती सांगायचे ठरवले. एकाने गावातले गॅरेज बंद झाली असल्याचे सांगीतले. तरीही एक मुस्लीम विक्रेता तुम्हाला हेडलाईट देईल असा दिलासा दिला. मी विचारत विचारत त्याच्या घरी गेलो. मी काही विचारायच्या आतच तो बोलला, "पेट्रोल खतम हुवा है. अबी नई मिलेगा. रातकोबी लोग परेशान करते है. पुलीस का डर रहेता है. " अमुक ढमूक. मला फक्त हेडलाईट लागतो आहे हे समजल्यावर त्याने मला हेडलाईट दिला. मी त्याला म्हटले की आता बसवूनच दे ना. त्याने नकार विकतो.'मी फक्त स्पेर पार्ट विकतो' असे त्याने सांगीतले. मी प्रयत्न करायचे ठरवले. टुलबॉक्स मधून स्क्रूड्रायव्हर काढला व हेडलाईटचे नट खोलायला जोर लावला. दोन्ही नट जाम झालेले होते. मी तुटफूट होवू नये म्हणून जोर लावत नव्हतो. हेडलाईटची कॅबीनेट प्लास्टीकच असल्याने जोराने तुटण्याची भिती होती. त्याने सांगीतले की गावात एक न्हाव्याचे दुकान आहे, तो गॅरेजचे काम करतो. मी तडक तिकडे निघालो. उगीच वेळ झाला तर काय घ्या? नशिबाने तो हजर होता. त्याने झटपट कारागीरी केली व हेडलाईट बदलवून दिला. तेथूनच मी कोठे आहे, कसा आहे, याबद्दल काळजी नसावी म्हणून घरी तसेच नवापुरला फोन केला. मी परत निघालो. खांडबारा येथे रेल्वे स्टेशन आहे. गाव सोडतांना मला रेल्वे रूळांवरचा क्रॉसींग पुल लागला. तो ओलांडत असतांना परत हेडलाईटने दगा दिला. परत मी माघारी येवून हेडलाईट खरेदी केला व तेथेच बदलला. आता स्क्रू ढिले असल्याने मला काही जड गेले नाही. माझा प्रवास सुरू झाला. तेथून पुढचे मुख्य हायवेवरचे गाव विसरवाडी हे होते. तीसएक किमी नंतर मी विसरवाडी येथे पोहचलो. रस्ताही चांगला होता. बाकी विसरवाडीहून नवापुरपर्यंत हायवेच असल्याने मला जास्त काही त्रास झाला नाही. रात्रीच्या वेळी मोटरसायकलस्वाराला ट्रक ड्रायव्हर कुत्र्याप्रमाणे वागवतात. आपण आपली लायकी पाहून वाहन चालवले तर बरे, नाहीतर कुत्रांसारखे कधी उडवले जावू याची खात्री नसते. मोठ्या वाहनांचे हेडलाईटस तर ईतके भगभगीत असतात की त्याने डोळे दिपतात. मी सावधगीरीने वाहन चालवत साडेनऊच्या दरम्यान नवापुरला पोहोचलो.

घरी आल्यानंतर सासरेबुवांनी सांगीतले की,' तुम्ही आलात त्या रस्त्याला रात्री रापी लावून वाहने पंक्चर करतात व कायम लुटमार केली जाते. तुम्ही कोठेतरी मुक्कामच केला पाहीजे होता'. आता मी सुखरूप परत आलो होतो त्यामूळे मी जास्त विचार न करता जेवण केले व पुढच्या प्रवासाबद्दल विचार करत झोपी गेलो.

दुसर्‍या दिवशी चतुर्थी होती. सकाळी सकाळी घरातून निघालो. आता माझे प्रयाण ढोंगसागळी या गावाकडे होते. माझा मार्ग विसरवाडीपर्यंत कालच्या रात्रीच्याच रस्त्याचा होता. मस्त सुर्यप्रकाश, थंड हवा, आजुबाजूची हिरवीगार शेते, चांगला हायवे असलेला रस्ता आणि हातात मोटरसायकल. मी मोटरसायकल चालविण्याचा आनंद पुर्णपणे घेत होतो. मला फोर स्ट्रोक मोटरसायकल पेक्षा टू स्टोक मोटरसायकलच जास्त आवडते. टू स्टोक मोटरसायकलमध्ये इंजीनाचे दोन स्टोक्स अगदी कानात ऐकू येतात. त्यामुळे आपली दोन स्ट्रोक गाडी ही केवळ वाहन न राहता एक जिवंत माणूसच आहे असे फिलींग येते. हेच फोर स्टोक मोटरसायकलमध्ये आपल्याला ऐकू येत नाही.

सासर्‍यांनी कालच सांगितले होते की ढोंगसागळी हे रस्त्यावरचे गाव आहे. विसरवाडीच्या अलीकडून एक रस्ता नंदुरबार कडे जातो त्या रस्त्याला मी लागलो. दहा एक किमी गेल्यानंतर गाव जसे जवळ आले तसे काही मुले आश्रमशाळेचा गणवेश घालून शाळेत जातांना दिसली. उजव्या हाताला आश्रमशाळांच्या इमारती दिसू लागल्या. हमरस्त्यावरून गावात जाण्यासाठी एक फाटा होता. गावाच्या जवळूनच आश्रमशाळेचा रस्त्याला एक नदी वाहत होती. शाळेच्या बाजूलाच एक छोटा बंधारा होता. शाळेचे आवार मोठे होते. इमारतीही व्यवस्था राखलेल्या, रंगवलेल्या होत्या. बाजूलाच एका इमारतीचे बांघकाम चालू होते. आधीचे संगणकांसाठी स्वतंत्र बैठी इमारत होती. एकूणच येथील वातावरण प्रसन्न होते. तेथील अध्यापकांना माझे काम सांगीतल्यानंतर जास्त काही विचारपूस न होता काम झाले व मी तेथून निघालो.

मला कालच ऑफीसातून नंदुरबारला कलेक्टर ऑफीसात जाण्याचे सांगण्यात आले होते. तेथे लँड रेकॉर्ड विभागातील संगणकाची यादी पुढील संदर्भासाठी लागत होती. तेथे आमचाच सप्लाय झालेला होता. नंदुरबार याच रस्त्याला साधारण ४०-४५ किमी होते. माझ्या नियोजीत मार्गातच ते येत असल्याने तेथे जाण्यासाठी नंतर लागणारा एक दिवस वाचल्याचे समाधान झाले. रस्ता थोडा खडखडीत होता पण आताशा मला अशा रस्त्यांची सवय झालेली होती. रस्त्याने तर एकही वाहन माझ्या पुढे गेलेले आठवत नाही. एकदोन ठिकाणी वन विभागाचे मोठे डेपो दिसले. तेथे सागवान व इतर लाकूड रचून ठेवलेले होते. काही गावे लागली. पन्नास एक किमी पुढे गेल्यानंतर नंदुरबारच्या जवळ तीन रस्ते एकत्र आलेले होते. बर्‍याचशा सरकारी इमारती होत्या. नंदुरबार हा जिल्हा १९९८ ला तयार करण्यात आला. त्यामुळे सरकारी इमारती 'सरकारी' छापाच्या नव्हत्या. त्यातीलच एका इमारतीत माझे काम होते. मी माझे काम सराईतपणे केले. तेथून लगोलग निरोप घेतला.

आताशा दुपारचा १ वाजलेले होते. सकाळचा चहा सोडला तर पोटात काहीच नव्हते. तशातच आज माझा चतुर्थीचा उपवास होता. नाही म्हणायला बरोबरच्या डब्यात खिचडी होती पण मी कोठेही वेळ वाया घालवायच्या विचारात नव्हतो त्यामुळे डबा नंतरच खावू हा विचार केला. आता मला लोभानी ता. तळोदा या गावी जायचे होते. तेथे जाण्यासाठी मला नंदुरबार गावातून जावे लागले. नंदुरबार शहर बाल हुतात्मा शिरिषकुमार याचे आहे. ब्रिटीशांनी तो आणि त्याचा सवंगड्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मला काही त्याच्या स्मृती स्थळाच्या रस्त्याने जाता आले नाही. रेल्वे गेट ओलांडून मी माझ्या शहादा रस्त्याला लागलो. रस्त्याने मला पुष्पदंतेश्वर सहकारी साखरकारखाना लागला. अजून तो चालू झालेला नव्हता. एका मेंढपाळाला मी लोभानी गावाबद्दल विचारले. त्याला काही सांगता येईना. बरे हे गाव नकाशातही दिसत नव्हते. मला फक्त लोभानी गावाचा तालूका तळोदा आहे हे सांगण्यात आलेले होते. म्हणजेच मला ते गाव शोधण्यासाठी जास्तीत जास्त तळोदा या तालूक्याच्या ठिकाणी जावे लागेल असा मी विचार केला. पण मी दोन चार जणांना विचारून जवळचा एखादा मार्ग आहे का हे विचारण्याचे ठरवले. एका मोटरसायकल स्वाराला थांबवून मी त्याला त्याबद्दल विचारले. त्याने मला तळोद्याला जाण्याची काहीच आवश्यकता नसल्याचे सांगितले. आता आपण जेथे आहोत त्याच्या पुढे चार एक किमी गेले तर उजव्या हाताला जाणार्‍या रत्याने तुम्ही निझर या गावाहून पुढे सरळ तळोद्याच्या पुढे निघाल व त्याच्याच पुढे लोभानी हे गाव आहे असे त्याने सांगितले. त्याला त्याची माहीती भक्कम व ठाम असल्याची मला खात्री झाली व मी थोडा निश्चिंत झालो. मी त्याप्रमाणे पुढे निघालो. निझर हे गाव गुजरात मध्ये आहे. मी महाराष्ट्र ओलांडून निझर रस्त्याला लागलो. आजुबाजूला बाभळीची भरपूर झाडे होती. बरेच किमी पुढे गेल्यानंतर मला गाव काही लागले नाही. एक दोन जणांना आश्रमशाळेबद्दल विचारावे लागले. त्यांनी शाळा ही अगदी रस्त्यावरच असल्याचे सांगितले. शेवटी मला शाळेच्या पाच सहा इमारती दिसल्या. गाडी झाडाखाली मोटरसायकल उभी केली. तडक मी शाळेच्या ऑफिसात गेलो. शाळेच्या मैदानातूनच एक ओढा जात होता. त्याला पाणी नव्हते पण पावसाळ्यात एकूणच वातावरण मस्त करत असावा असा देखावा होता. मी शहरातल्या आपल्या शाळांचे आजूबाजूचे वातावरण आठवले. आपल्याकडील शाळांना तर खेळाचे मैदानही नसते. शाळा म्हणजे नुसते कोंडवाडे असतात आपले. येथे तर निसर्गात एकरुप होवूनच शाळा उभी असते. हां, त्यातील शाळेच्या गुणवत्तेबाबत चर्चा होवू शकते. एकूणच गावाकडच्या शाळा मुलांना प्रॅक्टिकल बनवतात. त्या शाळांमधूनही शिकण्याची ईच्छा असणारे शिकतातच.

माझे काम ठरवल्याप्रमाणे लवकर झाले. तेथील शिक्षकांनाच मी पुढच्या म्हणजे शिर्वे या गावाच्या शाळेबद्दल विचारले. ते गाव येथून फार काही लांब नव्हते. असेल ६/७ किमी. हा जो रस्ता होता तो अंकलेश्वर (गुजरात) कडे जात होता. याच रत्याला पुढे शिर्वे गावाचा फाटा होता. तेथून ३ किमी आत आश्रमशाळा होती. पुढे निघाल्यानंतर मला काही विचारण्याची गरज पडली नाही. बाहेर रस्त्याला पाटी होतीच. पण आत जाण्यासाठी रस्ता नव्हता, एक बैलगाडी जाण्याईतपत बैलगाडीच्या चाकांनीच तयार झालेला रस्ता होता. मला थोडी कसतत करावी लागली पण मी शाळेजवळ पोहोचलो. शाळा तर अगदी भकास वाटत होती. तेथे कोणीही विद्यार्थी दिसत नव्हते. मी शाळेच्या आवारात काही शिक्षक भेटतात का ते पाहीले. एक जण मला शाळेच्या मुख्याध्यापकांच्या घरी घेवून गेले. मुख्याध्यापक नुकतेच त्यांच्या घरून म्हणजे धुळ्याहून आलेले होते. आमचा परिचय झाला. त्यांनी मला चहा घेण्याचा आग्रह केला. तीन साडेतीन होत आलेले होते. त्यांनी शेजारून दुध आणून चहा केला. ते एकटेच येथे राहत होते. कुटूंबीय धुळ्याला होते. नंतर आम्ही ऑफीसात गेलो. कागदपत्रांवर सही शिक्के घेतले. नंतर मी तेथून त्यांना लोय या माझ्या कालच्या राहीलेल्या आश्रमशाळेत कसे जायचे ते विचारले. त्यांना काही माहीत नव्हते. नकाशात शिर्वे या गावातून गुजरात ओलांडून परत लोयकडे जावे लागेल असे दिसत होते. मी त्यांचा निरोप घेतला.

आता मी थोडा पुढे अंकलेश्वर रस्त्याला लागलो. वाटेत एक गुजराती आदिवासी जोडपे दिसले. त्यांना मी महाराष्ट्राकडे जाणार्‍यारस्त्याबद्दल विचारले. मी हिंदीत विचारले असता त्यांना हिंदी येत नव्हते. तरीही त्यांनी मला हावभावावरून पुढे असलेल्या कुकूरमुंडा या गावी जाण्यास सांगीतले. मुख्य रस्त्यापासून २ किमी पुढे जावून मी डाव्या हाताला वळालो. थोड्या अंतरावर कुकूरमुंडा हे गाव लागले. कुकूरमुंडा हे गाव महाराष्ट्रातल्या हद्दीतले पहिले गाव आहे. ते गाव लागेपर्यंत गुजरातमधील रस्ता १० चा १२ होता व महाराष्ट्रात जसा प्रवेश केला तसा हा रस्ता १० चा १६/१७ झाला. सगळीकडे धुळीचाच रस्ता होता. गाव सोडल्यानंतर तापी नदीवरील एक मोठा पुल लागला. नदीचे पात्रही भरपूर मोठे होते. नंतर मी चाररस्ता या ठिकाणी आलो. तेथे चार रस्ते एकत्र येत होते. तेथे एका पानटपरीवर मी लोय कडे जाण्याचा रस्ता विचारला. त्याने त्याच्या टपरीच्या मागे हात दाखवून मागेच लोय गाव आहे असे सांगितले. बहूतेक लोकं दिशा दाखवतांना भलतीकडेच हात दाखवतात. म्हणजे आपण जेथे उभे आहोत तेथून आपले गंतव्य ठिकाण जर डावीकडे असेल तर ते अगदी विरूद्ध दिशेला हात दाखवून सांगतात की, 'ते काय सरळ जा इकडे'. मला त्याच्या सांगण्याची शंका वाटली म्हणून कन्फर्म करण्यासाठी त्याच्या पानटपरीच्या मागे बघीतले तर मला फक्त एक शेत दिसले. त्यातून उस नुकताच काढलेला होता. उस काढतांना बैलगाडीने केलेला रस्ता होता. बाकी डांबरी सडक तर सोडाच पण साधी खडीही तेथे नव्हती. मी त्याला त्याबाबत विचारले तर तो आपल्या मतावर ठाम होता. मी पण जास्त काही विचारले नाही. कदाचित पुढून चांगला रस्ताही असायला हरकत नव्हती. नकाशातही लोय गाव या ठिकाणाच्या जवळच दिसत होते. तसे कालच मी लोय गावी विरूद्ध दिशेने आलेलोच होते. त्या शेतातून एकदोन मोटरसायकलवाले पण गेलेले दिसले. मी तेथूनच जाण्याचे ठरवले. शेतातील रस्तातून / बांधावरून मी 'डर्ट ट्रॅक रेस' प्रमाणे २ किमी गाडी चालवली. थोडे पुढे गेल्यानंतर एक गाव लागले. ते लोय हेच गाव होते. मागे वळून बघीतले असता माझे बरेच अंतर वाचल्याचे नजरेस आले. गावाच्या दुसर्‍या टोकाला आश्रमशाळा होती. शाळेत गेल्यानंतर कालचे न भेटलेले मुख्याध्यापक भेटले. त्यांनी पटापट मला सह्या दिल्या. आता जवळपास साडेसहा वाजले होते. मी त्यांना माझा पुढील नवापुरपर्यंत प्रवास कसा करावा याबाबत विचारले. त्यांनी लोयपासून सरळ पुढे जावून धानोरा - वेलदा टाकी - उच्छल मार्गे नवापूरला जाता येईल असे सांगितले. रस्त्याने ट्राफीकही असते असेही सांगीतले. साधारण ते ६० ते ७० किमी अंतर असेल असे ते म्हटले. मला तो मार्ग नविनच होता. एकतर आता रात्र झालेली होती. कालसारखी फजीती नको होती. मी नकाशात बघीतले असता मला नंदूरबार मार्गे नवापूर किंवा कालचा रस्ता - खांडबारा मार्गे जंगलातून किंवा आता सांगीतलेला धानोरा - वेलदा टाकी - उच्छल मार्गे नवापूर ला जाण्याचा रस्ता आदी तिन मार्ग उपलब्ध होते. अगदीच शेवटी न जाण्याचे ठरवले तर मुक्काम करण्यासाठी नंदुरबार होतेच. मला मोटरसायकलवरील प्रवासाची आवड आहे. रात्र जरी असेल तर थोडी रिस्क घेवून मी नविन मार्गाने म्हणजेच धानोरा - वेलदा टाकी - उच्छल मार्गे नवापूर ला जाण्याचा निर्णय घेतला तो केवळ मुख्याध्यापकांनी चांगला मार्ग आहे व ट्राफीक असेल असे सांगितल्यामुळेच. कालच्या प्रवासात मला कोणीच रस्त्याने दिसले नव्हते. मी या नविन रस्त्याने जाण्याने कोणीतरी सोबत मला (मुख्याध्यापकांच्या सांगण्यानुसार) भेटणार होती किंवा मला रस्त्याने वाहने तरी दिसणार होती.

आता सुर्य बुडाला होता. जवळपास साडे सात वाजायला आले होते. संधीप्रकाश जाऊन अंधार पडला होता. मी तडक धनोरा रस्त्याला लागलो. कालच मी बाजूच्या कोठली या गावाला गेलो होतो. तो रस्ता व गाव काही किमीच आत असेल. ३ किमी पुढे गेल्यानंतर मला खांडबारा कडे जाण्यार्‍या रस्त्याची चौफुली लागली. तेथूनच शिवाजी की संभाजी बिडी चा ट्रक खांडबार्‍याकडे पास झाला. तेवढीच काय ती वर्दळ. तसेच पुढे आलो. आता मी कालचा अनुभव घेवून खांडबारा रस्त्याने जायचे नव्हते तर लोयच्या मुख्याध्यापकांनी सांगितलेल्या 'वर्दळीच्या' रस्त्याने उच्छलमार्गे जायचे ठरवले होते. पुढे तीन एक किमी आल्यानंतर रस्त्यात एक जीप थांबलेली दिसली व त्यातले प्रवासी खाली उतरलेले दिसले. मी काही बरे वाईट झाले का ते पहायला थांबलो. जीपमध्ये काहीतरी बिघाड झालेला होता. ती प्रवासी जीप होती. त्यातील एका माणसाने मला वेलदा टाकी पर्यंत मला लिप्ट विचारली. मला तर सोबत हवीच होती. तो माणूस माझ्या मागे बसला. त्याच्या हातात काहीतरी सामान व प्लॅश्टीकच्या बादल्या होत्या. तो माणूस स्थानिक होता. पुढेच त्याचे गाव होते. मी त्याला पुढील मार्गाबाबत विचारले. त्याने सांगितले की, 'पुढे नवापुरला जाण्यासाठी साधारणता: सत्तर ऐंशी किमी जावे लागेल. मी काही या रस्त्याने कधी गेलो नाही रस्ता चांगला आहे. आता उसतोड करण्यासाठी या भागातून मजूर व त्यांचे तांडे पुढे गुजरात मध्ये याच मार्गाने जातात. तुम्हाला बरीच ट्रॅफीकही लागेल. मी तुम्हाला एकाद्या ट्रक च्या मागे लावून देतो म्हणजे तुम्हाला सोबतही होईल. काही घाबरायचे कारण नाही. रस्त्याने चोरी, लुटमार काही होत नाही. तरीही थोडे सांभाळून जा. थोडे जंगल आहे.'

तो माणूस चांगला बोलत होता. उच्च्चार पण चांगले होते. त्या बद्दल विचारले असता तो म्हणाला की 'मी बरेच वर्ष नाशिकमध्ये नोटप्रेस मध्ये कामाला होतो. आता मी व्हिआरएस घेतली व गावाकडे शेती बघतो.' बोलत असतांना त्याला थांबण्याचे 'वेलदाटाकी' हे ठिकाण आले. आता मी गुजरात राज्याच्या हद्दीत आलो होतो. रस्त्याच्या बाजूलाच एक मोठी पाण्याची टाकी होती. त्यावरूनच त्या भागाला वेलदाटाकी म्हणत असावे. आजूबाजूला परिसरात तापी नदीच्या पात्राचे पाणी व उकई धरणाचे बॅकवॉटर आलेले आहे. रात्रीच्या अंधारात मला दिसले नाही. तो माणूस उतरला. बाजूलाच एक टपरी होती. त्यात काही आदिवासी लोकं बसलेली होती. त्या माणसाने मला चहा पिण्याची विनंती केली. मी पण थोडावेळ आजूबाजूची परिस्थिती पाहण्यासाठी उतरलो. चहा घेताघेता तो इतर आदिवासींशी त्यांच्या भाषेत बोलला. त्याने सांगितले की आत मजुर घेवून ट्रक जातील. काहीवेळाने एक ट्रक मजुरांना घेवून आला. त्या माणसाने त्यातील ड्रायव्हरशी मसलत केली व मला त्या ट्रकच्या मागेपुढे राहायला सांगितले. मी त्याचा निरोप घेतला. ट्रक मधील मजुर आता चहा बिडीसाठी खाली उतरले.

मी पुढे रस्त्याने वर्दळ आहेच असे समजून पुढे निघालो. नाहितरी आता मला एकट्यानेच प्रवास करायचा होता. रस्ता हा काही फार उत्तम होता असे नाही. म्हणजे १० चा १५ च्या लायकीचा होता. रस्त्याने छोटे छोटे खड्डे खुपच होते. त्यामुळे सरळ गाडी चालवणे शक्य नव्हते. पण बाजूला अंधार असल्याने पुरेशा उजेडाअभावी मोटरसायकलच्या हेडलाईट मध्ये त्या खड्ड्यांना टाळणेही अशक्य होते. गाडी खड्य्यांतूनच चालवणे भाग होते. रस्त्याने काहीच ट्रॅफीक साइन्स नव्हते. ना रेडीयम चे पट्टे ना कसली खुण. मोटरसायकलचाच काय तो उजेड. तो मागचा ट्रक तर अजूनही मला क्रॉस झालेला नव्हता. (संपुर्ण प्रवासात मला एकही वाहन पुढे क्रॉस करून गेलेले नव्हते.) मी तशीच गाडी दामटत होतो. कुठले गाव दिसत नव्हते की काही जिवंतपणाची खुण दिसत नव्हती. एक दोन बस स्टॉप दिसले. बाकी कसलाही उजेड नाही. आपल्याकडील रात्रीच्या प्रवासात खेडेगावातील शेतातील घरांमधील /विहीरींवरील लाईट तरी दिसतो. येथे तसल्या काहीच खाणाखूणा दिसत नव्हत्या. मी एका मोठ्या डोंगराच्या सपाट माथ्यावरून चालण्याचा मला भास होत होता. अन डोंगरमाथ्यावर थोडीच शेती वस्ती असते? आजूबाजूला नजर टाकली तर फक्त मोठ्या मोठ्या वृक्षांच्या काळ्या कभीन्न आकृत्याच दिसत होत्या. मध्येच रस्त्याला उतार लागत होता. त्या कडे बघीतले की मनात धडकी बसायची. मी देवाला एकच प्रार्थना करत होतो की गाडीला काही होवू देवू नको. पंक्चर तर नकोच नको. मला ते परवडणारे नव्हते. तसे काही झाले असते तर मी कोठे आसरा घेतला असता? अजूनपर्यंत एकही वाहन येथून गेले नव्हते. फारफार तर आठएक वाजले असतील. तरीही एकही माणूस मला दिसला नव्हता. या रस्त्याने येण्यापेक्षा नंदुरबारला मुक्काम केला असता तर परवडले असते असा विचार मनात येत होता. मी तर आता निम्मा रस्ता पार केला होता. माघारी जाणे वेडेपणाचे होते. मी तसाच पुढे जाण्याचा विचार पक्का केला. काही किमी पुढे गेल्यानंतर मला एक गाव लागले. त्या गावाच्या आसपास भरपुर पाणी होते. ते उकाई धरणाचेच पाणी होते. बांधावरून गेल्यानंतर एक दोन तरूण मुले रस्त्याने येत होती. मी त्यांना उच्छल / नवापुर बद्दल विचारले असता त्यांनी दिशानिर्देश करून मला पुढे जाण्यास सांगितले. आता रस्ता चांगला होता. माझ्या मनात धिर आला. पुढे उच्छल गाव लागले असावे कारण मी फक्त मोटर सायकल चालवत होतो. आजुबाजूला काय आहे त्याचे मला भान नव्हते. तशातच मी नवापुरच्या रेल्वे स्टेशनच्या मागच्या भागात पोहोचलो. माझ्या मनावरचा ताण फटक्यात नाहिसा झालेला होता. एका छोट्या रस्त्याने मी नवापुरात पोहोचलो. तेथील भाग मला अपरीचीत होता. प्रवासामुळे माझी थोडी दिशाभूल झालेली होती. तेथेच काही दुकानाबाहेर युवक बसलेले होते. त्यांना मी दत्तमंदिर कोठे असल्याबद्दल विचारले. त्यांनी मला रस्ता सांगितला. मी योग्यरीतीने मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो होतो.

घड्याळात बघीतले तर रात्रीचे साडेनऊ झालेले होते. जेवण तयारच होते. मी सकाळपासून काहीच खाल्लेले नव्हते. चतुर्थीच्या उपासाची खिचडी तशीच गाडीच्या डिक्कीत होती. रस्त्यात जो काही चहा झाला तोच माझ्या पोटात होता. एकुणच मला कडकडीत उपास घडलेला होता. जेवताजेवता सासरेबुवांनी मला आजचा येण्याचा मार्ग विचारला. मी उच्छलमार्गे आल्याचे समजताच त्यांनी मला कोठेतरी मुक्काम करायला पाहिजे होता असे सांगितले. त्या भागातील जंगलात अस्वले व इतर जनावरे असल्याचे सांगितले. मी सुखरूप परतलो याचेच मला अप्रूप वाटले. त्यांनी मला उद्या कोठे कोठे जायचे ते विचारले. उद्याचा माझा दौरा थेट सातपुडा पर्वतात होता. त्यासाठी त्यांनी एकटे न जाता बरोबर मला माझ्या मेहूण्यांना घेवूण जाण्याची सुचना केली. सातपुड्यातील जंगलाबद्दल मी पण ऐकून होतो. मी काही माझे मत न मांडता त्यांची सुचना मान्य केली.

आज मला अक्कलकुवा तसेच धडगाव तालूक्यातील अनुक्रमे भांग्रापाणी व मांडवी या दोन आश्रमशाळांत जायचे होते. नवापुरहून अक्कलकुव्याला जाण्यासाठी उच्छलमार्गेच रस्ता जवळचा होता. म्हणजेच काल रात्री मी ज्या मार्गाने आलो होतो त्याच जंगली रस्त्यातून आज आम्हाला जायचे होते. मला त्या मार्गाने परत दिवसा जायची उत्सूकता होती. काल रात्रीचा प्रवास व आजचा दिवसाचा प्रवास यात दिवस रात्रीचे अंतर होते. सुनिलही या रस्त्यावरून स्थानिक असुनही कधी गेले नव्हते. त्याचप्रमाणे सातपुड्यातल्या गावांमध्येही त्यांचा पहिलाच चक्कर होता. एक नविन एक्सपीडीशन म्हणून आम्हाला दोघांना उत्सूकता होती. आम्ही कालच्याच रस्त्याने निघालो. काल रात्रीचा रस्ता व आज दिवसा बघीतलेला रस्ता यात खुपच फरक होता. रस्त्याने चार पाच छोटी गावे लागली. काल रात्री दिसणारे भेसूर जंगल आज लोभसवाणे दिसत होते. रस्ता एकूणच जंगली तसेच एका डोंगर चढउताराचा होता. काल रात्री जरा 'जाणवणारा' रस्ता होता तसलाच १० चा १५ चा रस्ता होता. काल रात्री वेलदा टाकी पर्यंत आम्ही आलो. तेथून आम्ही अक्कलकुव्याकडे जाण्यासाठी वळालो. रत्यात एकदोन ठिकाणी सुनिलभाउंना सिग्रेटची तलफ भागवण्यासाठी थांबावे लागले. आम्ही मोटरसायकल आलटून पालटून चालवत होतो. मी मागेही हेल्मेट घालूनच बसायचो. भाऊ मात्र आपले बागाईतदार (उपरणे) घालून होते. होता होता आम्ही अक्कलकुवा येथे पोहोचलो. गावाच्या मागेच सातपुड्याचा मोठा पर्वत दिसत होता. सातपुडा हा पर्वत गुजरात पासून महाराष्ट्र-मध्यप्रदेशात आडवा पसरलेला आहे. महाराष्ट्राची व मध्यप्रदेशाची सीमा याच भागातून जाते. अक्कलकुवा हे गाव डोंगराच्या अगदी पायथ्याशी आहे. आम्ही तेथे चहा घेतला. येथून पुढे घाट चालू झाला. मोटरसायकल बर्‍याच वेळा पहिल्याच गियरमध्ये चालवावी लागत होती. समोरून काही जिप मधून लोकं थेट टपावरून प्रवास करत होते. एका बाजूला भली मोठी दरी व एका बाजूला पर्वत कडा असा देखावा होता. गाडी गरम होवू नये म्हणून घाटातल्या दोन पर्वतांच्या खिंडीत जावून थांबलो. तेथून अनेक मोटरसायकलस्वार पार होतांना दिसले. थोडावेळ थांबून आम्ही तेथून निघालो. आता आम्ही पर्वतांमधून चाललो होतो. काही वेळा मध्येच १०-१२ झोपड्या दिसायच्या. रस्त्याचा बराच भाग हा उंचसखल भागातून गेलेला होता. रस्त्यातून अनेक ओहोळ वाहतांना दिसले. तेथे रस्ता किंवा पुल हा भागच नव्हता. भांग्रापाणी ही आश्रमशाळा डोंगरउतारावर आहे. आजुबाजूला मोकळा परिसर होता. निसर्गसानिध्यात असलेल्या या आश्रमशाळा आपल्या शाळांसारख्या नसतात. मुख्याध्यापकांना माझे काम सांगितले. आजुबाजूचे शिक्षक सांगू लागले की येथे पावसाळ्यात तिन तिन महिने लाईट नसते. येथे तुम्ही बसने येवू देखील शकत नाही. रस्त्यात अनेक नद्या ओहोळ वाट अडवतात. तुम्ही देतात त्या कॉम्पुटरचे काय करणार? माझे सह्यांचे काम झालेले होते. आम्ही तेथून निघालो.
हा सातपुड्याच्या घाटाचा रस्ता उंच सखल होता. म्हणजे एकदम उंच चढ वैगेरे काही नव्हते. पण रस्ता वळणदार होता. काही छोटी गावे लागली. उंच घाटातून डोंगरउतारावर शेते मस्त दिसत होती. एकूणच मोसम मस्त होता. नंतर आम्ही मजल मारत मेघा पाटकरांनी प्रसिध्दीला आणलेले धडगाव येथे पोहोचलो. हा अक्राणी तालूका आहे. म्हणजे हेडऑफीस धडगावच आहे पण नाव अक्राणी तालूका आहे. वास्तविक येथून सरदार सरोवर काही किमी आत आहे. पण त्यांचे आंदोलन येथे बहूतेक सरकारी ऑफीसेस असावेत म्हणून येथेच चालले व बाकीच्या अधिकारी नेत्यांना या (शहादा गावाकडून चांगला रस्ता असल्याने) गावापर्यंत येता येत असल्याने ते याच्या पुढे जात नसावेत. येथे मात्र गर्दी होती. बरेचसे गावकरी बाजार करायला आलेले होते. आम्ही तेथे थांबलो. आता दुपारचे ३ वाजले होते. आम्हाला भुक लागली होती, म्हणून आम्ही तेथेच छोट्या हॉटेल मध्ये थोडे खावून घेतले. तेथे सुनिलभाउंच्या ओळखीचे एक शिक्षक भेटले. या भागात बरेचसे नोकरी करणारे लोकं आपले बिर्‍हाड करत नाही. एकटेच राहतात. शनिवार रविवार घरी जातात. बरेचसे शिक्षक हे आठवड्यातून एकदा येतात व पुर्ण आठवड्याच्या सह्या करून जातात. हा भाग म्हणजे सरकारी बदल्यांच्या शिक्षेचा भाग आहे. एखाद्या कर्मचार्‍याला कामाबद्दल शिक्षा द्यायची झाल्यास या भागात त्याची बदली केली जाते. नविन सरकारी कर्मचार्‍याला त्याच्या सुरूवातीची काही वर्षे येथेच काढावी लागतात. आम्ही तेथून निघालो. नंतर आमचे ठिकाण मांडवी हे होते. धडगाव सोडल्यावर मात्र रस्ता चांगला लागला. गावेही थोडी मोठी लागली. डोंगरचढ उतार मात्र तीव्र झाला. घाटात एके ठिकाणी काही छोटी मुले सिताफळे विकत होती. आम्ही ती विकत घेतली. या भागात सिताफळे फार मुबलक प्रमाणात मिळतात. रस्त्याने आम्हाला बरीच नैसर्गीक पणे उगवलेली बरीच सिताफळांची झाडे लागली होती.

साधारणपणे ५ च्या सुमारास आम्ही मांडवी या गावाच्या आश्रमशाळेत पोहोचलो. डोंगरात असल्याने सुर्य बुडाल्यासारखा होता. हि आश्रमशाळा फक्त मुलींसाठी आहे. आम्हाला सही शिक्के घेण्यासाठी ऑफीसात जावे लागले. काम आटोपले तेव्हा सुर्य बुडून अंधार झालेला होता. आता आम्हाला काळोखातून जाणे होते. ह्या रस्त्यांवर लुटालूटीची भिती होती. तरीही निघणे भाग होते. आम्ही तशीच गाडी दामटली. एकतर पुर्ण घाटाचा रस्ता अन त्यात असला भाग. त्यामूळे मनात सतत वाईट विचार येत होते. मोटरसायकल आता सुनिलभाऊच सावधगिरीने चालवत होते. रस्ता पुर्ण अंधारातच होता. केवळ बाजूच्याच रोडसाईन्स मुळे आम्ही कोठे चाललो आहोत ते समजत होते. होता होता आता आम्ही घाटाच्या उतरणीला लागलो. येथून एक रस्ता शहाद्याकडे तर एक रस्ता म्हसावद कडे जात होता. तेथूनच तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणाकडे जाण्याचा मार्ग आहे. तेथे अस्थंबा या गावी अश्वस्थाम्याचे मंदीर आहे. आजही अश्वस्थामा चिरंजीव असल्याने या भागात फिरतो अशी लोकांची श्रद्धा आहे. आम्ही आता बरेच थकलो होतो. शहादा जसेजसे जवळ येत गेले तसे आम्ही तेथेच मुक्काम करायचे ठरवले. साधारण ९ वाजता आम्ही शहाद्यास पोहोचलो. तेथे गेल्यानंतर पहिल्यांदा एक लॉज बुक केली. खुपच थकल्याने मस्त आराम व्हावा म्हणून एसी रुम बुक केली. ताजेतवाने होवून आम्ही जेवण केले. थकव्यामुळे जेवण झाल्यानंतर रुममध्ये टिव्ही चालू असूनही मला झोप लागली.

सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर नाश्टा करून आम्ही नवापूरकडे निघालो. नंदूरबार नंतर विसरवाडीला आल्यानंतर गाडीत पेट्रोल भरले.
दुपारच्या १२ च्या सुमारास आम्ही नवापूरला पोहोचलो. गाडीतील डिक्कीतील सिताफळे बघीतली असता त्यातली बरीचशी सिताफळे खराब झालेली होती.

दुपारचे जेवण करून मी लगेच नाशिककडे प्रयाण केले. अशा रितीने माझा प्रवासाचा एक अध्याय समाप्त झालेला होता, पण अजुन जळगाव, धुळे जिल्ह्यातल्या निम्या आश्रमशाळांना भेटी देणे बाकी होते.