अलिखीत रोजनिशीतील पाने अर्थात माझा मोटरसायकलवरचा प्रवास
पुर्वप्रकाशीत : हा भाग
२००३ साली मी एका मोठया कॉम्पूटरच्या कंपनीत नोकरीला असतांनाची ही गोष्ट आहे. गोष्ट म्हणण्यापेक्षा मी मोटरसायकलवर जो काही २००० ते २५०० किमी प्रवास केला त्याचा हा अनूभव आहे. एखाद्या अलिखीत रोजनिशीतील पाने असे म्हटले तरी चालेल.
पगारपाणी चांगले होते. पण काम मनासारखे नव्हते. काम काही जास्त नसायचे. वेगवेगळ्या सरकारी ऑफीसात भेटून निघणारे टेंडरांवर लक्ष ठेवणे व रिलेशन्स सांभाळणे हे काम होते. कामानिमीत्त फिरणे फार व्हायचे. बरे फक्त पुणे नाही तर मुंबई, नाशिक, नगर, औरंगावाद असलाही चक्कर व्हायचा. त्यातच कधीकधी कॉम्पूटरच्या पार्टस् ची डिलीव्हरी शेड्यूल पाहणे वैगेरे नियमबाह्य कामे पण बघावी लागायची.
२००३ च्या १० व्या महिन्यात (ऑक्टोबर २००३) साली कंपनीला एका मोठ्या राज्यपातळीवरील सरकारी कार्यालयातून कॉम्पूटर्स सप्लाय करण्याची ऑर्डर 'भेटणार' होती. 'भेटणार' म्हणजे अजून टेंडर निघालेले पण नव्हते पण सगळी 'सेटींग' झालेली होती. ते कॉम्पूटर्स विवीध सरकारी कार्यालये, आयटीआय, आमदार निधीसाठी, निरनिराळ्या शाळा, काही एनजीओ व मुख्य म्हणजे ठिकठिकाणच्या आदिवासी शाळांना सप्लाय करायचे होते. कंपनीने व सरकारी अधिकार्यांनी त्या त्या ठिकाणांची यादी आधीच तयार केलेली होती.
या कामाला मला जुंपण्यात आले. सुरवातीला मला पुणे विभाग देण्यात आला होता पण नंतर नाशिक महसूल विभाग देण्यात आला. तेथील विभागातल्या ठिकठिकाणच्या आश्रमशाळांमध्ये जावून 'आमच्या आश्रमशाळेमध्ये कॉम्पूटर फिट करण्यासाठी योग्य जागा व विज आहे. आम्हाला कॉम्पूटर ची आवश्यकता आहे' असल्या अर्थाचा एक अर्ज त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून सहीशिक्यानिशी आणायचा होता. अर्ज तयारच होता. मला जावून फक्त सहिशिक्का आणायचा होता.
मी कंपनीतून पैसे अॅडव्हान्स उचलले. माझी भेट देणार्या आश्रम शाळांची नाशिक विभागातील यादी पण घेतली. नाशिक जिल्हा हा नाशिकमधला अधिकारी सांभाळणार असल्याने त्या शाळा सोडून माझ्या वाट्याला एकूण २०/२१ आश्रमशाळा आल्या. माझ्या वाटेच्या शाळांमध्ये नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा व जळ्गाव जिल्हयातल्या शाळा होत्या.
थोडे आश्रमशाळांबद्दल: आश्रमशाळा ह्या महाराष्ट्र शासनाने चालवलेल्या निवासी शाळा असतात. त्या बहूतेक करून आदिवासी भागातच आहेत. मुले मुली या शाळांत राहतात व शिकतात. काही शाळा फक्त मुलांसाठी किंवा फक्त मुलींसाठी असतात तर बहूतेक शाळा एकत्र आहेत. अगदी गरीब परिस्थीती असणारी लहान लहान मुले या शाळात शिकायला असतात. त्यांच्याकडे बघीतले तर अगदी कणव येते. फक्त दिवाळी व मे च्या सुट्यांत त्यांना घरी जाता येते. सर्व शिक्षकांना त्या त्या शाळांमध्येच असणार्या क्वार्टर्स मध्ये रहावे लागते. मुलांना लागणारे जेवण शाळेतच तयार केले जाते. शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक, शिपाई, कामाठी आदी असतात. मुलांना सकाळी १२ वाजता तर संध्याकाळी ६ वाजता जेवण दिले जाते. (फक्त खिचडी! दोन जेवणात किती कमी अंतर आहे. नंतर सकाळच्या जेवणात किती जास्त अंतर आहे तुम्हीच बघा. कुपोषण होणार नाही तर काय होईल हो त्या गरीब मुलांचे?)
(आश्रमशाळांमध्ये अनेक गैरप्रकार घडतात. ते आपण पेपरात वाचतोच. व्यवस्थापन कसे ढिसाळ असते, मुलांचे काय हाल होतात, शिक्षणाचा दर्जा काय, हा या लेखाचा विषय नाही तरीही लेखनाच्या ओघात तसे उल्लेख येवू शकतात.)
घरी आल्यानंतर आता पुढची वाटचाल कशी करावी या विचारात गुंतलो. एकतर अनोळखी प्रदेशात जायचे होते, आणि मी आश्रमशाळांबाबतच्या दुष्किर्तीबद्दल ऐकून होतो. मला केवळ एका अर्जावर मुख्याध्यापकांचा सहीशिक्का आणायचा होता. माझे काम जरी पाच-दहा मिनीटांचे असले तरी ते त्या त्या आश्रशाळांमध्ये जावून करायचे होते. बरे कंपनीत कोणीही या माझ्या जाण्याच्या ठिकाणांना भेट देवून आलेले नव्हते. सगळे अधिकारी, ईंजीनीयर्स हे ऑफीसात बसणारे होते. माझ्या हातात केवळ आश्रमशाळांची यादी व पैसे होते. यादीत केवळ आश्रमशाळा (यापुढे शाळा) असलेली गावे व त्यांच्या तालूक्यांचा उल्लेख होता. त्या ठिकाणी कसे जावे याबाबत काहीच मार्गदर्शन नव्हते. एकूणच माझी परिस्थीती गंभीर होती.
सगळ्यात पहिल्यांदा मी बाजारात जावून महाराष्ट्राच्या नकाशाचे पुस्तक आणले. बाजारात अनेक नकाशे उपलब्ध होते. मला साधारण जिल्हा लेव्हलचा नकाशा हवा होता. त्या नकाशापुस्तकांत औरंगाबादच्या समर्थ उद्योग प्रकाशनाचा 'रोड अॅटलास महाराष्ट्र' हे पुस्तक मला चांगले वाटले.त्यात नवीन तालूके व नवीन रोड यांसहीत गावांची नावे प्रकाशीत केलेली होती.
मी सगळ्या आश्रमशाळाची यादी परत एकदा बघीतली. त्या त्या ठिकाणच्या आश्रमशाळांची (यापुढे शाळा) गावे त्या नकाशात आहेत काय हे बघीतले. नशीबाने बर्याचशा गावांची नावे नकाशात होती. त्या गावांच्या नावावर मी पेनाने सर्कल केले.
एकूणच परिस्थीतीचा विचार करून यादीतील वीसएक शाळांचे साधारण मी दोन गट केले. ऑफीसात मी एकाचवेळी या सगळ्या शाळांत न जाता दोन वेळात जाणार असे सांगीतले. त्यानंतर मी प्रवासाची तयारी केली. जरूरीपुरते कपडे, पैसे, शाळांची यादी, नकाशा पुस्तक, मोबाईल इ. वस्तू घेतल्या. त्याकाळी माझ्याकडे बीएसएनएल चे पोस्टपेड कनेक्शन होते. मोबाईल ग्रामीण भागात एवढा फोफावला नव्हता, तरी पण केवळ बीएसएनएल आहे म्हणून रेंज मिळेल असे मनात गृहीत धरून चालत होतो.
प्रवासाला निघण्याच्या अदल्या दिवशी मी जसे काही वनवासाला निघालो अशी माझी परिस्थीती होती. अनोळखी भाग, अपुरी माहिती, किती दिवस लागतील याची माहिती नाही. वनवासाला जाणार्या रामाप्रमाणे मी घरच्यांचा निरोप घेतला.
नकाशाचा अभ्यास करून मी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर तालूक्यातील 'सुकापूर' या गावापासून प्रवासला सुरूवात करण्याचे निश्चीत केले. त्यानंतरच्या दिवशी म्हणजे शनिवार ११/१०/०३ ला सकाळी १० ला मी नाशिक-नंदुरबार ही बस पकडली. नकाशात सुकापूर हे गाव पिंपळनेरच्या अलीकडे दिसत होते. बसमध्ये बसल्यानंतर मी एकदोन जणांना सुकापूरला कसे जाणार याविषयी विचारले असता पिंपळनेर पर्यंत न जाता पिंपळनेरच्या अलिकडे सुकापूरला जाण्यार्या रस्त्यावर उतरण्याचा सल्ला मिळाला. कंडक्टरने तिकीट पिंपळनेरचे काढण्यास सांगीतले. बस देवळा, सटाणा, तहाराबाद करत पिंपळनेरच्या २ /१ किमी अलीकडे असलेल्या एका फाट्याजवळ थांबली. मला तेथेच उतरावे लागले.
खाली उतरल्यानंतर रस्त्याच्या एका बाजूला पेट्रोल पंप होता व दुसर्या बाजूला एक हॉटेल होते. दुपारचा १ वाजला असल्याने मला भुक लागली होती. आता पुढील ४/५ दिवस मिळेल ते खावे लागणार ह्या हिशोबाने तयारी ठेवलेली असल्याने त्या हॉटेलात मी काहीतरकाहीतरीखाल्ले. आता आठवत नाही पण बहूतेक मिसळच असणार. (शक्यतो मी पाव टाळतो.) गल्यावर असणार्या माणसाला मी सुकापूर ला कसे जाणार या विषयी विचारले. त्याने मला फाट्यावर उभे रहा व एखादी जीप मिळते का ते पहाण्याविषयी सांगीतले. आश्रमशाळांत जातांना प्रत्येक ठिकाणी बस मिळेलच अशी खात्री नसल्याने मिळेल त्या वाहनाने प्रवास करण्याचे मी ठरवले होते. मी हातात बॅग घेवून फाट्यावर उभा राहीलो.
एकदोन गाड्यांना हात दिला. त्यानंतर एक खच्चून भरलेली प्रवासी जीप आली. एकहीजण खाली उतरला नाही. ड्रायव्हर अर्धा बाहेर राहून जीप चालवत होता. काही लोकं मागच्या फाळक्यावर बसलेले होते. तिनचार जण मागच्या पाय ठेवायच्या जागी उभे होते. त्या परिस्थीतीत आता मी जीपमध्ये कसा चढणार हा प्रश्न मला पडला होता. गाडीत तर माझी बॅगही ठेवायला जागा नव्हती. जीपमधल्या लोकांनी मी तेथील स्थानिक नाही हे ओळखले. एकदोन जणांनी मागे उभे राहायला सांगीतले. मला ते सगळे नवीनच होते. त्या प्रवासातील धोका ओळखून नकार देण्याची माझी तयारी होती पण पुढची सगळी कामे बघून मी बॅग जीपवरील कॅरीयरवर ठेवली व मागच्या पाय ठेवण्याच्या पायरीवर उभा राहीलो. गाडी तर ड्रायव्हर हाणत होता. रस्ता हा ग्रामीण भागातला असल्याने सिंगल असून उखडलेला होता. मला जीपचे कॅरीयर घट्ट पकडून ठेवणे भाग होते. वीसेक मिनीटात सुकापूर आले.
जीप'वरून' उतरल्यावर पाहीले तर सुकापूर अगदी छोटे खडेगाव दिसले. जवळच एका पाझर तलावाचे पाणीही दिसले. एका जणाला आश्रमशाळा कोठे आहे ते विचारले. त्याने जवळच असल्याचा हात दाखवून उल्लेख केला. मी चालत चालत शाळेत पोहोचलो. शनिवार असल्याने मुले आवारात खेळत होती. मी मुख्याध्यापकांची रुम कोणती ते विचारल्यावर त्यांनी ती सांगीतली. मी तेथे गेल्यावर माझी ओळख मी तेथील शिक्षकांना करून दिली. माझे येण्याचे प्रयोजन सांगीतले. त्यांनी मला बसायला सांगून मुख्याध्यापकांना येण्याविषयी निरोप एका मुलाकडे दिला. मी पुण्याहून आलो असे सांगताच कोणीतरी आपल्या डिपार्टमेंटचा माणुस आहे असे समजून ते बोलत होते.
मला वेळ नाही व मला फक्त सही हवी असे त्यांना सांगीतले. तुमच्या शाळेला काही दिवसांनी नवीन कॉम्पुटर मिळतील असे त्यांना सागीतले. त्यानंतर त्यांनी मला एका रुममध्ये नेले. रुमची चावी एका शिक्षकांकडून मागून घेतली. एक धूळ भरलेली रुम उघडल्यावर आत बरेचशे खोके दिसले. ते सगळे कॉम्पुटरचे खोके होते. त्या सगळ्या खोक्यांत ७ कॉम्पुटर होते. मॉनीटर व सिपीयू, प्रिंटर, युपीएस चे जवळपास वीस एक खोके अगदी सिलपॅक होते. एकही खोका फोडलेला नव्हता. त्यांनी मला सांगीतले की हे सगळे कॉम्पुटर मागच्याच वर्षी आलेली आहेत व अजूनपर्यंत इंन्टॉलही झालेले नसतांना अजून तुम्ही कॉम्पुटर्स का देता आहात! मी त्यांना सांगीतले की तो माझा प्रश्न नाही. हे आधीच ठरलेले असते. आपण नोकर माणूस. मला फक्त या या अर्जावर सहीशिक्का द्या, मला लगेचच निघावे लागेल. तेवढ्यात मुख्याध्यापक आले. त्यांना माझे प्रयोजन सांगीतले. त्यांनी काही खळखळ न करता सही शिक्का दिला. मी लगोलग त्यांचा निरोप घेतला.
परत जीपने गावात जेथे सोडले तेथे आलो. चौकशी केल्यानंतर आता अर्ध्या तासाने वरून एक बस येईल किंवा एखादे जीपडे भेटेल तर त्याने जा असे सांगीतले. गाव तर अगदी खेडे होते. मी तेथे एका टपरीवजा जागेत बसलो. जवळपास ५ वाजत आले होते. शेजारच्या एका टपरीतून टाईमपाससाठी चॉकलेटं घेतली, बसलो चघळत. तेवढ्यात तेथे एक मुस्लीम माणूस आला. त्याने एक बकरी पण आणली होती. सराईतपणे तो मी बसलेल्या टपरीत बकरी बांधून तो तयारी करू लागला. मला लगेच कल्पना आली की ती टपरी त्याची असून तो आता बकरीला कापणार. मी शाकाहारी असल्याने मला थोडी किळस आली पण हे जीवन आहे ते जगलेच पाहीजे असा विचार करून मी तेथून उठलो. आता त्या बकरीला कापतांना आपल्याला बघू न लागावे म्हणून थोडा लांब जावून उभा राहीलो. तो पर्यंत तेथे त्याचे गिर्हाईके येवू लागली. माझ्या नशिबाने लगेचच एक बस आल्याने पुढचा प्रसंग मला पाहता आला नाही. मी लगेचच बस मध्ये बसलो व बस पिंपळनेरच्या दिशेने निघाली.
सुकापूरहून निघून पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे) पर्यंत पोहोचेपर्यंत सायंकाळचे ६ वाजायला आले. पिंपळनेर हे एक मोठे व्यापारी गाव आहे. माझ्या बायकोचे हे मामाचे गाव. त्या गावात मी एक दोन वेळा यापुर्वी राहीलोही होतो. आजूबाजूला पुर्णपणे आदिवासी भाग, डोंगर असलेला हे गाव. गावातील लोकं एकूणच प्रेमळ. जेवणानंतर 'गोटीसोडा' पिण्याचा फार आग्रह करतात. अर्थात हे उल्लेख मी मागे राहीलो त्यासंदर्भात आलेले आहेत.
पण आता मला तेथे राहता येणार नव्हते. अंधार पडायला सुरूवात झालेली होती. घरापासून लांब आलेलो असल्याने घरची जास्तच ओढ लागलेली होती. त्यातच अनोळखी भागात जाण्याची अनामिक भिती, पुढील प्रवासाच्या तजविजीची काळजी लागलेली होती. पिंपळनेरपासून निघून नवापूर या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. नवापूर हे माझ्या सासूरवाडीचे गाव. या गावाचा उल्लेख यापुर्वी मी येथे 'दोन राज्यांचे रेल्वे स्टेशन' असा लेख लिहून केलेलाच आहे, तो आपल्या लक्षात असेलच. मी माझ्या प्रवासाचे नियोजन नकाशात पाहून केलेले होते. त्यातल्या बर्याचशा आश्रमशाळा ह्या नंदुरबारच्या आसपास होत्या. त्यामुळे मला नवापुरला मुक्कामाला सोईचे जाणार होते.
मला पिंपळनेरहून नवापुरला (चरणमाळ घाटामार्गे) जाणारी बस मिळाली. पिंपळनेरहून नवापुर (म्हणजेच पुढे सुरत कडे) ला जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे चरणमाळ घाटामार्गे व दुसरा म्हणजे कोंडाईबारी ह्या घाटामार्गे. (कोंडाईबारी मार्गे जाणारा मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग एन.एच. ६ आहे.) दोन्ही मार्गादरम्यान सदर घाट/ बारी लागतात. निसर्गाने या भागात त्याच्या संप्पत्तीची भरभरून उधळण केलेली आहे. आपण शहरी लोक ज्या 'अनटच्ड- व्हर्जीन' असा निसर्ग शोधतो, तो येथे आहे. कोकणात असा निसर्ग आहे पण तेथेही व्यापाराचा शिरकाव झालेला आहे. ज्यांना खरोखरच
निसर्गापुढे लिन व्ह्यायचे आहे ते पर्यटक वृत्तीचे लोक या भागात भेट देवून आपली भुक भागवू शकतात. (या दोन्ही रस्त्यांवरून मी बर्याचदा प्रवास केलेला असल्याने हे मी अधिकाराने सांगतो आहे.)
भरपुर सागाने हरित असलेली वने, पाण्याने भरलेले ओढे, नाले व नद्या. मध्येच दिसणारे डोंगर. उत्तम शेती. त्याचबरोबर प्रेमळ आदिवासी समाज, त्यांच्या वैशिठ्यपूर्ण शैलीने चित्रांकीत केलेल्या झोपड्या असले या भागात असणारे दृष्य आपल्या नजरेला तर सुखावतेच पण प्रवासाचा त्रास पण घालवते. फक्त त्या कडे त्या नजरेने पहाण्याची वृत्ती हवी. अर्थात हे मी दिवसा केलेल्या प्रवासाबद्दल बोलतो आहे.
माझा सध्याचा प्रवास हा संध्याकाळी घडत होता. साधारणत: ८ वाजेच्या दरम्यान मी नवापुरला पोहचलो. जेवण केल्यानंतर मी माझ्या येण्याचे प्रयोजन माझ्या सासरेबुवांना सांगीतले. माझे सासरे हे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये रेंजर होते. पुर्वी त्यांनी नोकरीच्या काळात घोड्यावरून हा सगळा भाग पालथा घातलेला होता. त्यामुळे या भागात कसे फिरायचे याबद्दल ते अधीक चांगले सांगू शकत होते. माझ्याकडील आश्रमशाळांच्या गावांची यादी बघीतल्यानंतर त्यांनी मला होणार्या प्रवासाची कल्पना दिली. बसने प्रवास केल्यास प्रत्येक ठिकाणी बस जात नसल्याने मला जवळपासच्या गावाच्या फाट्यावर उतरून शाळेत जावे लागणार होते. बर्याचशा शाळा नव्याने तयार झाल्याने त्यांनाही माहीत नव्हत्या. बरे त्या शाळा काही एकाच मार्गावरील गावातल्या नव्हत्या. थोडक्यात बसने प्रवास केल्यास एका दिवसात एकच शाळेत जाणे शक्य होते. मला तर जास्त दिवस यात वाया घालवण्याची इच्छा नव्हती. मी त्यांना मोटरसायकलवरून हा प्रवास करण्याबद्दल त्यांना सांगितले. काळजीपोटी त्यांनी त्यास नकार दिला. एकतर या भागात मी अनोळखी, रस्ते माहित नाही, त्यातच मोटरसायकल प्रवास. सासूबाई तर जाण्यास नकार देत पुण्याला कंपनीत फोन करून हे काम न करण्याबद्दल आग्रही होत्या. पण मी स्विकारलेले काम पुर्ण करणे मला भाग होते. हा काही माझा पहिलाच मोटरसायकलवरून लांबचा प्रवास नव्हता. आधीच्या कंपनीत असतांना मी हायवेने मैलोगणती एकट्याने प्रवास केलेला होता. अगदी पावसात मोटरसायकलवरचा कित्येक किमी चा प्रवासाचा अनूभव माझ्या पाठीशी होता. त्यामूळे ठाम निर्णय घेवून त्यांना मी मोटरसाकल घेवूनच पुढिल प्रवास करण्याबद्दल सांगितल्यावर त्यांचा नाईलाज झाला. त्यानंतर त्यांनी मला प्रवासास होकार दिला.
दुसर्या दिवशी सकाळी आन्हीके आवरून मेहूण्यांची मोटरसायकल (TVS Suzuki AX 100 R) माझ्या ताब्यात घेतली. गाडीचे मेंटेनन्स नुकतेच केलेले होते. मी हवा चेक करून पेट्रोल भरून घेतले. मला हेल्मेट असल्याशिवाय मोटरसायकल चालवणे आवडत नसल्याने त्यांच्याकडचे हेल्मेट घेतले. त्याची काच तुटलेली असल्याने पुढे मला माझा गॉगल कामाला आला. (मला हेल्मेट ची ईतकी सवय लागलेली आहे की मला कोणी मला 'हेल्मेट घालून झोप' असे सांगीतले तरी मी झोपू शकेन. कंपनीत बर्याचशा लोकांना मी हेल्मेट घालण्याची सवय लावून दिली आहे. असो.) गाडीच्या डिक्कीत ताईंनी केलेला जेवणाचा डबा, नकाशाचे पुस्तक आदी ठेवले. गाडीचे मेंटेनन्स किट टुल बॉक्स मध्ये ठेवले व गाडीला किक मारली. माझी पुढील शाळा 'नवापाडा' या गावाची होती.
नवापाडा हे ता. साक्री, जि. धुळे यात येते. नवापुर जवळ देखील एक नवापाडा होते. एकाच तालूक्यात किंवा जिल्ह्यात एकसारखी नावे असल्याचे आढळते. नवापुरहून मी निघाल्यानंतर एन. एच. ६ (सुरत-नागपूर) चिंचपाडा, विसरवाडी कोंडाईबारी मार्गे दहिवेल या गावापर्यंत आलो. दहिवेल हे गाव थोडक्यात आपण 'जंक्शन' समजू, कारण या ठिकाणी एन. एच. ६ ला नाशिकहून येणारा राज्यमहामार्ग मिळतो. पुणे तसेच दक्षिण भारतातील मालवाहतूक करणार्या ट्रक्स याच रस्त्याने जातात. साउथ इंडीयातील ट्रक्स साधारण चॉकलेटी रंगाने रंगविलेल्या असतात. यातील बहूतेक ड्रायव्हर आपले जेवण स्वत:च रस्त्याच्या कडेला ट्रक उभे करून बनवतात. चिंचपाड्यात रेल्वे क्रॉसींवर रेल्वे जाणार असल्याने थांबावे लागले. एक मालगाडी गेली. तरीही रेल्वे गेट काही उघडले नाही. नंतर मात्र मी मोटरसायकल गेटखाली तिरपी करून काढून घेतली.
चिंचपाड्यात ख्रिस्ती मिशनरींचा मोठे हॉस्पिटल आहे. बर्याचशा आदिवासी लोकांनी ख्रिस्ती धर्म स्विकारलेला असल्याने छोटे छोटे कुडाच्या झोपड्यांतदेखील चर्चेस आहेत. ख्रिस्ती आदिवासी स्त्रिया इतर (हिंदू) आदिवासी स्त्रियांसारखाच पेहेराव करतात मात्र कपाळावर टिकली किंवा कुंकू लावत नाहीत. मला तर ते फार विचीत्र वाटले. आदिवासी समाजातली नावेही आपल्याला नविन असणारी अशीच असतात. उदा. गामण्या, सुका, हिर्या आदी. हिंदु आदिवासींची 'देवमोगरा माता' ही देवी आहे.
तर मी दहिवेल पर्यंत आलो. नकाशात नवापाड्याच्या जवळील तेच गाव दिसत होते. हायवेलाच कोणालातरी मी नवापाड्याचा रस्ता विचारला. त्याने डाव्या हाताचा मार्ग दाखवला. तो मार्ग एका टेकडीवरून जात होता व तोच जवळचा मार्ग असल्याचे त्याने सांगितले. मी त्या रस्त्याला लागलो. ड्रायव्हर लाईन मध्ये रस्ता किती खराब आहे ते सांकेतीक भाषेत बोलले जाते. म्हणजे अमूक अमूक रस्ता हा '१० चा १२' आहे, हा रस्ता '१० चा १५' आहे, तमूक रस्ता '१० चा १८' किंवा २० आहे वैगेरे वैगेरे. '१० चा १२' म्हणजे १० किमी जायचे व १२ किमी चा वेळ व इंधन नासवायचे. मी आता ज्या रस्त्याने गाडी चालवत होतो तो रस्ता या सांकेतीक भाषेत '१० चा २०' होता. एकतर पावसाळा नुकताच संपलेला. हा रस्ता म्हणजे एक टेकडीच्या बाजूने जो दरीसारखा खोलगट भाग असतो त्यातून दोन टेकड्यांच्या एक चंद्रकोरीसारखा भाग दिसत होता त्यातून जात होता. छोटा घाटच म्हणजेच बारी म्हणाना. रस्त्याच्या आजूबाजूला मोठी खडी येवून पडलेली होती. म्हणजेच 'अजून' रस्त्याचे काम झालेले नव्हते. डोंगरउतार असल्याने मधूनच छोटे छोटे ओहोळ रस्ता पार करत होते व त्यांना रस्त्याने जाणार्यांची अडचण होत होती! असला रस्ता अंदाजे १० किमी चा असावा. ताशी १० च्या 'वेगाने' मी दोन टेकड्यांच्या बारीत पोहोचलो. तेथे दोन रस्ते एकत्र आल्याने परत एका झाडाखाली काहीतरी धार्मीक कार्यक्रम करणार्या समूदायाला मी नवापाड्याचा मार्ग विचारला. परत मी योग्य रस्त्याने जावू लागलो. त्यानंतर एका छोट्या गावातून परत फाटे फुटल्याने योग्य मार्ग विचारावा लागला. नंतर थोडी चढण लागली व मला एक दोन पवनचक्या दिसल्या. (या ठिकाणीच आता शेकड्याने विंन्ड फार्म तयार झालेले आहे ज्यात प्रिती झिंटा, सलमान, सचिन तेंडूलकर यांच्या पवनचक्यांच्या 'विजनिर्मीती कंपन्या' आहेत. आताशा मोठ्या लोकांनी बळजबरी शेतजमीनी बळकावल्याने कायम वाद होत असतात. एकदोन खुनही झाले आहेत. ) तिथेच नवापाडा आश्रमशाळा होती.
दोन डोंगरांच्या उतारावर ह्या आश्रमशाळांच्या तीनचार एकमजली बिल्डींग दिसू लागल्या. मी तडक गाडी गेटजवळ थांबवली व मुख्याध्यापकांची रूम विचारली. तो दिवस रविवार (१२/१०/२००३) असल्याने मला माहिती सांगणार्याने जवळच मुख्याध्यापक राहत असणार्या घराकडे नेले. (आश्रमशाळेतील अध्यापकांना तेथेच राहणे बंधनकारक आहे.) मुख्याध्यापक काही घरी नव्हते. पण त्यांच्या पत्नीने त्यांच्या छोट्या मुलीस बोलवायला धाडले तोपर्यंत मी तेथेच थांबलो. मुख्याध्यापक लगेचच आले. त्यांनी घरात चहा टाकायला सांगीतले. आपण कोण, कोठून आलात, काय काम वैगेरे चौकशी केली. ते जवळच असलेल्या नवापाडा ह्या गावचेच होते. (आश्रमशाळा साधारणत: गावाजवळ असते.) त्यांचे गाव मी आलेल्या रस्त्याच्या दिशेच्या त्याच त्या छोट्या बारीजवळील एका पठारावर दिसले. त्यांच्या घरातून त्यांनी ते दाखवले. त्यांची तेथे शेतीवाडी होती. आज रविवार असल्याने ते तेथेच जाणार होते. मी थोडा उशीरा गेलो असतो तर त्यांची भेट झाली नसती, (व माझे कामही रखडले असते.) असे त्यांनी सांगीतले. चहा घेवून आम्ही पायी त्यांच्या ऑफिसाकडे- शाळेकडे निघालो. रस्त्यात त्यांनी त्यांच्याकडील असणार्या संगणकांच्या तक्रारी केल्या. काही चालत नाही, काही मॉनीटर बंद पडले, युपीएस लवकर बंद होतो, प्रिंटरमधली शाई संपली आदी. मी काही ते काम करण्यासाठी आलो नव्हतो पण नकार देवून आपले काम का लांबवा ? असा विचार करून मी 'काम माझे झाल्यावर बघतो' असे त्यांना सांगीतले. लगोलग आम्ही त्यांची सहीशिक्के घेतले. तेथेचे ३ /४ शिक्षक नव्याने भरती झालेले आले. त्यांनी मला त्यांची प्रयोगशाळा दाखवली. मला तर घाई होती व ते पाहणे परवडणारे नव्हते. तरीही त्यांना टाळता आले नाही. नंतर आमची वरात त्यांच्या संगणकाच्या लॅब असणार्या इमारतीकडे वळली. आता शाळेचे आवार बरेच मोठे होते. त्यामूळे मी येथे मोटरसायकल आणली असती तर बरे झाले असते असे वाटू लागले. लॅबकडे जातांना मागे मोठे डोंगरउतार होते. जवळच्याच नाल्यात शाळेचे विद्यार्थी आपले कपडे धुण्यासाठी आलेले होते. ते वातावरण बघून मला ते सगळे एखाद्या पुराणकालीन आश्रमाचे विद्यार्थीच वाटू लागले. पण ते आधूनिक विद्यार्थी होते व त्यांचे अध्यापकही आताच्या काळातले होते. लॅबमधील बंद असणारे संगणक मी वरवर बघितल्यासारखे केले. मी त्यांना थोडीच दुरूस्त करू शकत होतो? मी त्यांचे सिरीयल नंबर्स घेतले व मी माझ्या वरीष्ठांना सांगतो असे त्यांना सांगीतले. तो सगळा सप्लाय आमच्याकडून झालेलाच नसल्याने आम्ही त्याला खरे तर बांधील नव्हतो पण त्यांचे माझ्या वागण्याने समाधान झाले व मी त्यांना पुढील आश्रमशाळेचा पत्ता विचारला. मला 'लोय' किंवा 'कोठली' (दोन्ही जि. नंदुरबारमध्ये) या कोणत्याही जवळ असणार्या गावी पुढील आश्रमशाळेत जायचे होते. त्यांनी मला 'लोय' या गावाहून नंतर कोठली या गावी जाण्याचा सल्ला दिला. नकाशात तर लोय हे गाव काही दिसत नव्हते व ते कोठे आहे हे त्यांनाही सांगता येईना पण कोठली या गावाजवळ असण्याबद्दल ते ठाम होते. मी त्यांना धन्यवाद देवून त्यांचा निरोप घेतला.
परत मी आलेल्या रस्त्याने गाडी हाकू लागलो. ब्राम्हणवेल या गावामार्गे मी छडवेल (कोर्डे) या गावी आलो. गावातल्या रस्त्यांच्या बाबतीत तर बोलायचे कामच नव्हते. पण या गावांना जोडणारे रस्ते चांगले १० चा १२ किंवा १३ च्या टाईपचे होते. मी जेवण केले नाही पण दुपारचे २ वाजून गेले होते. वातावरण एकदम मस्त होते. मोटरसायकल जर आपण वेगात चालवत नसू तर मोटरसायकल चालवण्याचा आनंद घेता येवू शकतो आणि या रस्त्यांवर मी ठरवूनही वाहन जोरात चालवू शकत नव्हतो. हा आनंद बर्याचदा मी अनूभवला आहे. छडवेल च्या पलीकडे एक बर्यापैकी जंगल असलेला पाचएक किमीचा एक घाट लागला. तो रस्ता आता मला नंदूरबार या जिल्ह्याच्या ठिकाणाकडे नेत होता. घाटात रस्त्याचे काम चालू होते. त्यानंतर लागलेल्या एका गावात मी योग्य मार्गाला आहे का याची खात्री एका शेतकर्याकडून करून घेतली. तो शेतकरी धान्याचे कणसं वार्यावर उफणत होता. धान्याची मोठी रास पडलेली होती. तेथून एक रस्ता कोठली कडे जात होता तर एक नंदुरबारकडे. पण कोठलीकडे जाणार्या रस्त्यावरच्या फरशीवरून बर्याच उंचीवरून पाणी वेगाने वाहत होते. न जाणो मोटरसायकलच्या सायलेन्सर मध्ये पाणी जावून ती बंद पडायची व माझा दिवस फुकट जायचा असा विचार माझ्या मनात आला. माझी काही तेथून जाण्याची धडगत झाली नाही. त्याने सांगीतले की 'मग तुम्ही नंदुरबारच्या अलिकडून आधी लोय करा नंतर कोठली करा'. मी पुढच्या रस्त्याला लागलो. आता रस्ता फारच चांगला व मोठा होता. त्यानंतर मी लोय या गावी जाणार्या रस्त्याला लागलो. साधारणत: कोठेही दोन रस्ते एकत्र आले तर जवळपास माणूस बघून मी त्याला पुढील मार्ग विचारत असे. उगीच आपले डेअरींग करायचे व पुढे चुकीच्या ठिकाणी जायचे मला परवडणारे नव्हते. थोडक्यात मला आता ग्रामीण भागातून प्रवास कसा करायचा याचा अंदाज येत चालला होता. पुढील गावाची दिशा विचारायची व त्या दिशेला वाहन टाकायचे. रस्ता असेलच ही अपेक्षा केली नाही तर बहूतेक गावे एकमेकांना जोडलेली असतात. पायवाट, बैलगाडीवाट, पडीक शेत, पांधी (कोरडा नाला) असल्या रस्त्यांतून वाहन चालवायची डेअरींग केली की पुढचा मार्ग सुकर होतो हेही मी शिकलो. फक्त मोटरसायकलीत काही बिघाड नको किमानपक्षी पंक्चर तरी नको ही अपेक्षा ठेवली पाहीजे.
गाव संपले किंवा सुरू झाले की एखाद दोन किमी रस्ता चांगला असे नंतर मात्र तो खडीचा असे. लोय गावात (गाव खरे तर आश्रमशाळेपासून लांबच असते.) आलो तर आश्रमशाळा एका दाट झाडीत होती. सैनिंकांच्या बर्याक कशा असतात तशा या आश्रमशाळा बांधलेल्या असतात. सरकारी डिपार्टमेंट बहूदा एकच डिझाईन पास करत असल्याने सगळ्या आश्रमशाळा मला एकाच मुशीतून काढलेल्या आढलल्या. अगदी बाहेरचा दिलेला रंगही एकसारखा. दाट झाडीमुळे मला शाळा निट दिसली नाही त्यामुळे एकदोन ठिकाणी विचारावे लागले. तोपर्यंत ४.३० वाजले. तेथे असलेल्या मुलांना मी मुख्याध्यापकांबद्दल विचारले. मला बघण्यासाठी शिक्षकांच्या घरांतील काही व्यक्ती आल्या. ते बहूतेक शिक्षकच असावेत. त्यांनी सांगीतले की दिवाळीच्या सुटीत घरी गेलेली मुले अजून शाळेत आली नाही. आज रविवार असल्याने मुख्याध्यापक येथे नाहीत. मी माझे काम फक्त सहीकरण्यापूरते असल्याचे सांगीतल्यानंतर त्यांनी शिक्यांसाठी मुख्याध्यापकांची शाळेतील रूम उघडण्यासाठी चाव्या शोधायला सुरूवात केली. मुख्याध्यापकांच्या पत्नीने चाव्या त्यांच्याकडेच असल्याचे सांगीतले. आता माझी पंचाईत झाली. तात्काळ निर्णय घेवून मी तेथे नंतर येण्याचे ठरवून व चाव्या त्यांच्याकडेच घरी ठेवण्याची विनंती करून मी गाडीला किक मारली.
पुढचे कोठली हे गाव परत आलेल्या रस्त्याने मागे येवून मुख्य रस्त्याच्या आतमध्ये होते. आता अंधार पडायला सुरूवात होणार होती. मला घाई केली पाहीजे. मी मो.सा. दामटली. अगदी १५/१० मिनीटात मी गावात पोहोचलो. कोठली हे गाव आधी लागले. गावातली वस्ती ही काही वेगळ्याच लोकांची दिसली. आपल्याकडे कसे घुंघट ओढणार्या बाया असतात तसल्या बाया दिसल्या. कोणत्यातरी वेगळ्या समाजाची त्या गावात वस्ती होती. गावाबाहेर आश्रमशाळा होती. मोठे मैदान होते. तेथे गेल्यानंतर ऑफीससमोरच गाडी लावली. ही शाळा जरा वेगळी असल्याचे दिसले. बहूतेक शिक्षक उपस्थीत होते. शाळेचा प्युन, सुपरवायझर, क्लार्क झाडून हजर होते. मला पटापट सह्या दिल्या. नंतर मला संगणकाचे कामकाज बघणार्या बाईंनी मला संगणक असणार्या रुम मध्ये नेले. तेथे संगणक शिकवीतही असावेत कारण बहूतेक संगणक चालू होते. भिंती वर कसलेकसले तक्ते लावलेले होते. त्या बाईंची तक्रार होती की तेथे विज वारंवार जाते. लवकर येतही नाही. (भारनियमन तेव्हापण होते महाराजा.) तुमचा युपीएस लवकर संपतो. मी परत सगळे सिरीयल नंबर घेतले व वर कळवेन असे सांगीतले. बाहेर आलो तर सहा वाजलेले होते. बाहेर मुले रांगेत उभी होती. त्यांच्या हातात जेवणाची ताटे होती. बाईंनी सांगीतले की मुलांची आता जेवणाची वेळ झाली आहे. त्यांना खिचडी घेण्यासाठी एकत्र बोलावले आहे. माझे काम झालेले होते. मी तेथून निघालो व त्यांनी त्यांचे खिचडी वाटपाचे काम सुरू केले.
मी पुढे कसे जायचे हे विचारलेलेच होते. आता सहा वाजून गेलेले होते. अंधार पडायला सुरूवात झालेली होती. जवळपास मुक्कामाची सोय नव्हती. मी नवापुरला जायचे ठरवले होते. कोठलीला आलेल्या रस्त्याच्या विरूद्ध म्हणजे उत्तरेकडच्या रस्त्याने मला जायचे होते. नंतर मी धानोरा गावाहून येणार्या व पुढे खांडबारा या गावाच्या रस्त्याला लागायचे होते. शाळा सोडली व मी रस्त्याला लागलो. रस्ता अतिशय खराब होता. मी लवकर गाडी हाकू शकत नव्हतो. तोच एक छोटा ओहोळ व त्यावरची फरशी लागली. फरशी म्हणजे छोटा पुल किंवा स्लॅब की ज्याची उंची कमी असते. (ज्यांनी ही फरशी पाहीली नाही त्यांचा 'फरशी' नावाने गोंधळ उडू शकतो.) ती नावालाच फरशी होती. नाला पुर्णपणे तेथून वाहत होता. मी अलिकडील काठावर थांबलो असता एक अपंग माणूस व एक धडधाकट माणूस तेथे उभे होते. त्यांनी मला लिप्ट मागीतली. (म्हणजे हायवेला अंगठा दाखवतात तशी नाही तर विचारून). मी केवळ अपंगालाच बसवू इच्छीत होतो पण ते काहीतरी वेगळे समजले व ते दोघेही मागे बसले. तशातच मी ती फरशी पार केली. नंतर पुढच्या २ किमी पर्यंतच्या मुख्यरस्त्याला मी त्यांना सोडले. आता चांगलाच अंधार पडलेला होता. आजूबाजूला तर दाट जंगल लागलेले दिसत होते. झाडांची मोठी मोठी पाने ते सागाची वने असल्याचे सांगत होती. मी मोटरसायकलचा हेडलाईट चालू केला. रस्त्याने कोणीच नाही. तो काही हायवे नव्हता ट्राफीक असायला व आपल्या मुंबई पुण्याकडच्यासारखा रस्ता वाहता असायला. मुख्यरस्त्याला लागताच एक उतार व चढावाचा घाट लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गच्च झाली. काळोख साचायला लागलेला. मोबाईलमध्ये बघितले तर रेंज नव्हती. अर्थात त्या काळी मोबाईलच्या रेंजची या भागात अपेक्षाच करणे चुकीचे होते. अनोळखी भाग. अनोळखी घाटरस्ता. मला थोडी भिती वाटू लागली. असल्या जंगलात मी एकटाच असतांना काय होईल किंवा कोणते जनावर आडवे आले तर काय असले विचार मनात येवू लागले. कोठली येथल्या आश्रमशाळेतच मुक्काम केला असता तर बरे झाले असते असे वाटू लागले. तेथे जेवणाची व झोपायचीदेखील सोय झाली असती. आताशा दुपारचे जेवणदेखील नसल्याने मला भुकेची जाणीव झाली होती. पण आता माघारी जाणे शक्य नव्हते. मी तशीच गाडी पुढे दामटली. घाट जवळपास संपला तेवढ्यातच गाडीच्या हेडलाईटने दगा दिला. रस्त्याने काहीच दिसू नये इतका अंधार अंगावर येत होता. जवळपास काही वस्तीच सोडा पण झोपडी सुद्धा नव्हती. पुर्ण जंगलच होते ते. बरे कोणती मोठी गाडी किंवा टॅक्टर असले वाहन तेथून जात नव्हते की त्याच्या प्रकाशात मी गाडी चालवू शकेन. (अगदी विसरवाडी पर्यंत एकाही वाहनाने मला ओव्हरटेक केले नव्हते. विसरवाडीपासून पुढे नवापुरपर्यंत एन.एच ६ आहे. तो तर कायम वाहता असतो.) थोडक्यात मी थांबू शकत नव्हतो. मी अगदी सावधगीरीने गाडी चालवू लागलो. शहराच्या रस्त्यांचे बरे असते. रेडीयम चे पट्टे किंवा ट्राफिक साईन्स तरी असतात की ज्यांना धरून वाहन चालवता येते. हा तर ग्रामिण भागातला रस्ता होती. आकाशात चंद्रही नव्हता की तो प्रकाश देईल. आता जे गाव, वस्ती किंवा झोपडी लागेल तेथेच मी थांबायचे ठरवले. पण ती वस्ती तर लागली पाहिजे ना तरच मी थांबू शकलो असतो. जवळपास मी पाच एक किमी गाडी चालवली. त्यानंतर एक बैलगाड्यांचा तांडा लागला. त्यांना जवळच्या गावाबद्दल विचारले असता खांडबारा हे गाव जवळच असल्याचे त्यांनी सांगीतले. मी तशीच गाडी चालवू लागलो. पुन्हा पाच एक किमी गेल्यानंतर एका गावाचे लाईट्स दिसू लागले. माझ्या मनाला थोडा धिर आला.
पुढे गेल्यानंतर वस्ती सुरू झाली. आता मी पहिल्यांदा कोणते गॅरेज आहे का ते विचारायचे ठरवले नंतर मुक्कामाची सोय असेल तर घरी फोन करून त्यांना माझी स्थिती सांगायचे ठरवले. एकाने गावातले गॅरेज बंद झाली असल्याचे सांगीतले. तरीही एक मुस्लीम विक्रेता तुम्हाला हेडलाईट देईल असा दिलासा दिला. मी विचारत विचारत त्याच्या घरी गेलो. मी काही विचारायच्या आतच तो बोलला, "पेट्रोल खतम हुवा है. अबी नई मिलेगा. रातकोबी लोग परेशान करते है. पुलीस का डर रहेता है. " अमुक ढमूक. मला फक्त हेडलाईट लागतो आहे हे समजल्यावर त्याने मला हेडलाईट दिला. मी त्याला म्हटले की आता बसवूनच दे ना. त्याने नकार विकतो.'मी फक्त स्पेर पार्ट विकतो' असे त्याने सांगीतले. मी प्रयत्न करायचे ठरवले. टुलबॉक्स मधून स्क्रूड्रायव्हर काढला व हेडलाईटचे नट खोलायला जोर लावला. दोन्ही नट जाम झालेले होते. मी तुटफूट होवू नये म्हणून जोर लावत नव्हतो. हेडलाईटची कॅबीनेट प्लास्टीकच असल्याने जोराने तुटण्याची भिती होती. त्याने सांगीतले की गावात एक न्हाव्याचे दुकान आहे, तो गॅरेजचे काम करतो. मी तडक तिकडे निघालो. उगीच वेळ झाला तर काय घ्या? नशिबाने तो हजर होता. त्याने झटपट कारागीरी केली व हेडलाईट बदलवून दिला. तेथूनच मी कोठे आहे, कसा आहे, याबद्दल काळजी नसावी म्हणून घरी तसेच नवापुरला फोन केला. मी परत निघालो. खांडबारा येथे रेल्वे स्टेशन आहे. गाव सोडतांना मला रेल्वे रूळांवरचा क्रॉसींग पुल लागला. तो ओलांडत असतांना परत हेडलाईटने दगा दिला. परत मी माघारी येवून हेडलाईट खरेदी केला व तेथेच बदलला. आता स्क्रू ढिले असल्याने मला काही जड गेले नाही. माझा प्रवास सुरू झाला. तेथून पुढचे मुख्य हायवेवरचे गाव विसरवाडी हे होते. तीसएक किमी नंतर मी विसरवाडी येथे पोहचलो. रस्ताही चांगला होता. बाकी विसरवाडीहून नवापुरपर्यंत हायवेच असल्याने मला जास्त काही त्रास झाला नाही. रात्रीच्या वेळी मोटरसायकलस्वाराला ट्रक ड्रायव्हर कुत्र्याप्रमाणे वागवतात. आपण आपली लायकी पाहून वाहन चालवले तर बरे, नाहीतर कुत्रांसारखे कधी उडवले जावू याची खात्री नसते. मोठ्या वाहनांचे हेडलाईटस तर ईतके भगभगीत असतात की त्याने डोळे दिपतात. मी सावधगीरीने वाहन चालवत साडेनऊच्या दरम्यान नवापुरला पोहोचलो.
घरी आल्यानंतर सासरेबुवांनी सांगीतले की,' तुम्ही आलात त्या रस्त्याला रात्री रापी लावून वाहने पंक्चर करतात व कायम लुटमार केली जाते. तुम्ही कोठेतरी मुक्कामच केला पाहीजे होता'. आता मी सुखरूप परत आलो होतो त्यामूळे मी जास्त विचार न करता जेवण केले व पुढच्या प्रवासाबद्दल विचार करत झोपी गेलो.
दुसर्या दिवशी चतुर्थी होती. सकाळी सकाळी घरातून निघालो. आता माझे प्रयाण ढोंगसागळी या गावाकडे होते. माझा मार्ग विसरवाडीपर्यंत कालच्या रात्रीच्याच रस्त्याचा होता. मस्त सुर्यप्रकाश, थंड हवा, आजुबाजूची हिरवीगार शेते, चांगला हायवे असलेला रस्ता आणि हातात मोटरसायकल. मी मोटरसायकल चालविण्याचा आनंद पुर्णपणे घेत होतो. मला फोर स्ट्रोक मोटरसायकल पेक्षा टू स्टोक मोटरसायकलच जास्त आवडते. टू स्टोक मोटरसायकलमध्ये इंजीनाचे दोन स्टोक्स अगदी कानात ऐकू येतात. त्यामुळे आपली दोन स्ट्रोक गाडी ही केवळ वाहन न राहता एक जिवंत माणूसच आहे असे फिलींग येते. हेच फोर स्टोक मोटरसायकलमध्ये आपल्याला ऐकू येत नाही.
सासर्यांनी कालच सांगितले होते की ढोंगसागळी हे रस्त्यावरचे गाव आहे. विसरवाडीच्या अलीकडून एक रस्ता नंदुरबार कडे जातो त्या रस्त्याला मी लागलो. दहा एक किमी गेल्यानंतर गाव जसे जवळ आले तसे काही मुले आश्रमशाळेचा गणवेश घालून शाळेत जातांना दिसली. उजव्या हाताला आश्रमशाळांच्या इमारती दिसू लागल्या. हमरस्त्यावरून गावात जाण्यासाठी एक फाटा होता. गावाच्या जवळूनच आश्रमशाळेचा रस्त्याला एक नदी वाहत होती. शाळेच्या बाजूलाच एक छोटा बंधारा होता. शाळेचे आवार मोठे होते. इमारतीही व्यवस्था राखलेल्या, रंगवलेल्या होत्या. बाजूलाच एका इमारतीचे बांघकाम चालू होते. आधीचे संगणकांसाठी स्वतंत्र बैठी इमारत होती. एकूणच येथील वातावरण प्रसन्न होते. तेथील अध्यापकांना माझे काम सांगीतल्यानंतर जास्त काही विचारपूस न होता काम झाले व मी तेथून निघालो.
मला कालच ऑफीसातून नंदुरबारला कलेक्टर ऑफीसात जाण्याचे सांगण्यात आले होते. तेथे लँड रेकॉर्ड विभागातील संगणकाची यादी पुढील संदर्भासाठी लागत होती. तेथे आमचाच सप्लाय झालेला होता. नंदुरबार याच रस्त्याला साधारण ४०-४५ किमी होते. माझ्या नियोजीत मार्गातच ते येत असल्याने तेथे जाण्यासाठी नंतर लागणारा एक दिवस वाचल्याचे समाधान झाले. रस्ता थोडा खडखडीत होता पण आताशा मला अशा रस्त्यांची सवय झालेली होती. रस्त्याने तर एकही वाहन माझ्या पुढे गेलेले आठवत नाही. एकदोन ठिकाणी वन विभागाचे मोठे डेपो दिसले. तेथे सागवान व इतर लाकूड रचून ठेवलेले होते. काही गावे लागली. पन्नास एक किमी पुढे गेल्यानंतर नंदुरबारच्या जवळ तीन रस्ते एकत्र आलेले होते. बर्याचशा सरकारी इमारती होत्या. नंदुरबार हा जिल्हा १९९८ ला तयार करण्यात आला. त्यामुळे सरकारी इमारती 'सरकारी' छापाच्या नव्हत्या. त्यातीलच एका इमारतीत माझे काम होते. मी माझे काम सराईतपणे केले. तेथून लगोलग निरोप घेतला.
आताशा दुपारचा १ वाजलेले होते. सकाळचा चहा सोडला तर पोटात काहीच नव्हते. तशातच आज माझा चतुर्थीचा उपवास होता. नाही म्हणायला बरोबरच्या डब्यात खिचडी होती पण मी कोठेही वेळ वाया घालवायच्या विचारात नव्हतो त्यामुळे डबा नंतरच खावू हा विचार केला. आता मला लोभानी ता. तळोदा या गावी जायचे होते. तेथे जाण्यासाठी मला नंदुरबार गावातून जावे लागले. नंदुरबार शहर बाल हुतात्मा शिरिषकुमार याचे आहे. ब्रिटीशांनी तो आणि त्याचा सवंगड्यावर गोळ्या झाडल्या होत्या. मला काही त्याच्या स्मृती स्थळाच्या रस्त्याने जाता आले नाही. रेल्वे गेट ओलांडून मी माझ्या शहादा रस्त्याला लागलो. रस्त्याने मला पुष्पदंतेश्वर सहकारी साखरकारखाना लागला. अजून तो चालू झालेला नव्हता. एका मेंढपाळाला मी लोभानी गावाबद्दल विचारले. त्याला काही सांगता येईना. बरे हे गाव नकाशातही दिसत नव्हते. मला फक्त लोभानी गावाचा तालूका तळोदा आहे हे सांगण्यात आलेले होते. म्हणजेच मला ते गाव शोधण्यासाठी जास्तीत जास्त तळोदा या तालूक्याच्या ठिकाणी जावे लागेल असा मी विचार केला. पण मी दोन चार जणांना विचारून जवळचा एखादा मार्ग आहे का हे विचारण्याचे ठरवले. एका मोटरसायकल स्वाराला थांबवून मी त्याला त्याबद्दल विचारले. त्याने मला तळोद्याला जाण्याची काहीच आवश्यकता नसल्याचे सांगितले. आता आपण जेथे आहोत त्याच्या पुढे चार एक किमी गेले तर उजव्या हाताला जाणार्या रत्याने तुम्ही निझर या गावाहून पुढे सरळ तळोद्याच्या पुढे निघाल व त्याच्याच पुढे लोभानी हे गाव आहे असे त्याने सांगितले. त्याला त्याची माहीती भक्कम व ठाम असल्याची मला खात्री झाली व मी थोडा निश्चिंत झालो. मी त्याप्रमाणे पुढे निघालो. निझर हे गाव गुजरात मध्ये आहे. मी महाराष्ट्र ओलांडून निझर रस्त्याला लागलो. आजुबाजूला बाभळीची भरपूर झाडे होती. बरेच किमी पुढे गेल्यानंतर मला गाव काही लागले नाही. एक दोन जणांना आश्रमशाळेबद्दल विचारावे लागले. त्यांनी शाळा ही अगदी रस्त्यावरच असल्याचे सांगितले. शेवटी मला शाळेच्या पाच सहा इमारती दिसल्या. गाडी झाडाखाली मोटरसायकल उभी केली. तडक मी शाळेच्या ऑफिसात गेलो. शाळेच्या मैदानातूनच एक ओढा जात होता. त्याला पाणी नव्हते पण पावसाळ्यात एकूणच वातावरण मस्त करत असावा असा देखावा होता. मी शहरातल्या आपल्या शाळांचे आजूबाजूचे वातावरण आठवले. आपल्याकडील शाळांना तर खेळाचे मैदानही नसते. शाळा म्हणजे नुसते कोंडवाडे असतात आपले. येथे तर निसर्गात एकरुप होवूनच शाळा उभी असते. हां, त्यातील शाळेच्या गुणवत्तेबाबत चर्चा होवू शकते. एकूणच गावाकडच्या शाळा मुलांना प्रॅक्टिकल बनवतात. त्या शाळांमधूनही शिकण्याची ईच्छा असणारे शिकतातच.
माझे काम ठरवल्याप्रमाणे लवकर झाले. तेथील शिक्षकांनाच मी पुढच्या म्हणजे शिर्वे या गावाच्या शाळेबद्दल विचारले. ते गाव येथून फार काही लांब नव्हते. असेल ६/७ किमी. हा जो रस्ता होता तो अंकलेश्वर (गुजरात) कडे जात होता. याच रत्याला पुढे शिर्वे गावाचा फाटा होता. तेथून ३ किमी आत आश्रमशाळा होती. पुढे निघाल्यानंतर मला काही विचारण्याची गरज पडली नाही. बाहेर रस्त्याला पाटी होतीच. पण आत जाण्यासाठी रस्ता नव्हता, एक बैलगाडी जाण्याईतपत बैलगाडीच्या चाकांनीच तयार झालेला रस्ता होता. मला थोडी कसतत करावी लागली पण मी शाळेजवळ पोहोचलो. शाळा तर अगदी भकास वाटत होती. तेथे कोणीही विद्यार्थी दिसत नव्हते. मी शाळेच्या आवारात काही शिक्षक भेटतात का ते पाहीले. एक जण मला शाळेच्या मुख्याध्यापकांच्या घरी घेवून गेले. मुख्याध्यापक नुकतेच त्यांच्या घरून म्हणजे धुळ्याहून आलेले होते. आमचा परिचय झाला. त्यांनी मला चहा घेण्याचा आग्रह केला. तीन साडेतीन होत आलेले होते. त्यांनी शेजारून दुध आणून चहा केला. ते एकटेच येथे राहत होते. कुटूंबीय धुळ्याला होते. नंतर आम्ही ऑफीसात गेलो. कागदपत्रांवर सही शिक्के घेतले. नंतर मी तेथून त्यांना लोय या माझ्या कालच्या राहीलेल्या आश्रमशाळेत कसे जायचे ते विचारले. त्यांना काही माहीत नव्हते. नकाशात शिर्वे या गावातून गुजरात ओलांडून परत लोयकडे जावे लागेल असे दिसत होते. मी त्यांचा निरोप घेतला.
आता मी थोडा पुढे अंकलेश्वर रस्त्याला लागलो. वाटेत एक गुजराती आदिवासी जोडपे दिसले. त्यांना मी महाराष्ट्राकडे जाणार्यारस्त्याबद्दल विचारले. मी हिंदीत विचारले असता त्यांना हिंदी येत नव्हते. तरीही त्यांनी मला हावभावावरून पुढे असलेल्या कुकूरमुंडा या गावी जाण्यास सांगीतले. मुख्य रस्त्यापासून २ किमी पुढे जावून मी डाव्या हाताला वळालो. थोड्या अंतरावर कुकूरमुंडा हे गाव लागले. कुकूरमुंडा हे गाव महाराष्ट्रातल्या हद्दीतले पहिले गाव आहे. ते गाव लागेपर्यंत गुजरातमधील रस्ता १० चा १२ होता व महाराष्ट्रात जसा प्रवेश केला तसा हा रस्ता १० चा १६/१७ झाला. सगळीकडे धुळीचाच रस्ता होता. गाव सोडल्यानंतर तापी नदीवरील एक मोठा पुल लागला. नदीचे पात्रही भरपूर मोठे होते. नंतर मी चाररस्ता या ठिकाणी आलो. तेथे चार रस्ते एकत्र येत होते. तेथे एका पानटपरीवर मी लोय कडे जाण्याचा रस्ता विचारला. त्याने त्याच्या टपरीच्या मागे हात दाखवून मागेच लोय गाव आहे असे सांगितले. बहूतेक लोकं दिशा दाखवतांना भलतीकडेच हात दाखवतात. म्हणजे आपण जेथे उभे आहोत तेथून आपले गंतव्य ठिकाण जर डावीकडे असेल तर ते अगदी विरूद्ध दिशेला हात दाखवून सांगतात की, 'ते काय सरळ जा इकडे'. मला त्याच्या सांगण्याची शंका वाटली म्हणून कन्फर्म करण्यासाठी त्याच्या पानटपरीच्या मागे बघीतले तर मला फक्त एक शेत दिसले. त्यातून उस नुकताच काढलेला होता. उस काढतांना बैलगाडीने केलेला रस्ता होता. बाकी डांबरी सडक तर सोडाच पण साधी खडीही तेथे नव्हती. मी त्याला त्याबाबत विचारले तर तो आपल्या मतावर ठाम होता. मी पण जास्त काही विचारले नाही. कदाचित पुढून चांगला रस्ताही असायला हरकत नव्हती. नकाशातही लोय गाव या ठिकाणाच्या जवळच दिसत होते. तसे कालच मी लोय गावी विरूद्ध दिशेने आलेलोच होते. त्या शेतातून एकदोन मोटरसायकलवाले पण गेलेले दिसले. मी तेथूनच जाण्याचे ठरवले. शेतातील रस्तातून / बांधावरून मी 'डर्ट ट्रॅक रेस' प्रमाणे २ किमी गाडी चालवली. थोडे पुढे गेल्यानंतर एक गाव लागले. ते लोय हेच गाव होते. मागे वळून बघीतले असता माझे बरेच अंतर वाचल्याचे नजरेस आले. गावाच्या दुसर्या टोकाला आश्रमशाळा होती. शाळेत गेल्यानंतर कालचे न भेटलेले मुख्याध्यापक भेटले. त्यांनी पटापट मला सह्या दिल्या. आता जवळपास साडेसहा वाजले होते. मी त्यांना माझा पुढील नवापुरपर्यंत प्रवास कसा करावा याबाबत विचारले. त्यांनी लोयपासून सरळ पुढे जावून धानोरा - वेलदा टाकी - उच्छल मार्गे नवापूरला जाता येईल असे सांगितले. रस्त्याने ट्राफीकही असते असेही सांगीतले. साधारण ते ६० ते ७० किमी अंतर असेल असे ते म्हटले. मला तो मार्ग नविनच होता. एकतर आता रात्र झालेली होती. कालसारखी फजीती नको होती. मी नकाशात बघीतले असता मला नंदूरबार मार्गे नवापूर किंवा कालचा रस्ता - खांडबारा मार्गे जंगलातून किंवा आता सांगीतलेला धानोरा - वेलदा टाकी - उच्छल मार्गे नवापूर ला जाण्याचा रस्ता आदी तिन मार्ग उपलब्ध होते. अगदीच शेवटी न जाण्याचे ठरवले तर मुक्काम करण्यासाठी नंदुरबार होतेच. मला मोटरसायकलवरील प्रवासाची आवड आहे. रात्र जरी असेल तर थोडी रिस्क घेवून मी नविन मार्गाने म्हणजेच धानोरा - वेलदा टाकी - उच्छल मार्गे नवापूर ला जाण्याचा निर्णय घेतला तो केवळ मुख्याध्यापकांनी चांगला मार्ग आहे व ट्राफीक असेल असे सांगितल्यामुळेच. कालच्या प्रवासात मला कोणीच रस्त्याने दिसले नव्हते. मी या नविन रस्त्याने जाण्याने कोणीतरी सोबत मला (मुख्याध्यापकांच्या सांगण्यानुसार) भेटणार होती किंवा मला रस्त्याने वाहने तरी दिसणार होती.
आता सुर्य बुडाला होता. जवळपास साडे सात वाजायला आले होते. संधीप्रकाश जाऊन अंधार पडला होता. मी तडक धनोरा रस्त्याला लागलो. कालच मी बाजूच्या कोठली या गावाला गेलो होतो. तो रस्ता व गाव काही किमीच आत असेल. ३ किमी पुढे गेल्यानंतर मला खांडबारा कडे जाण्यार्या रस्त्याची चौफुली लागली. तेथूनच शिवाजी की संभाजी बिडी चा ट्रक खांडबार्याकडे पास झाला. तेवढीच काय ती वर्दळ. तसेच पुढे आलो. आता मी कालचा अनुभव घेवून खांडबारा रस्त्याने जायचे नव्हते तर लोयच्या मुख्याध्यापकांनी सांगितलेल्या 'वर्दळीच्या' रस्त्याने उच्छलमार्गे जायचे ठरवले होते. पुढे तीन एक किमी आल्यानंतर रस्त्यात एक जीप थांबलेली दिसली व त्यातले प्रवासी खाली उतरलेले दिसले. मी काही बरे वाईट झाले का ते पहायला थांबलो. जीपमध्ये काहीतरी बिघाड झालेला होता. ती प्रवासी जीप होती. त्यातील एका माणसाने मला वेलदा टाकी पर्यंत मला लिप्ट विचारली. मला तर सोबत हवीच होती. तो माणूस माझ्या मागे बसला. त्याच्या हातात काहीतरी सामान व प्लॅश्टीकच्या बादल्या होत्या. तो माणूस स्थानिक होता. पुढेच त्याचे गाव होते. मी त्याला पुढील मार्गाबाबत विचारले. त्याने सांगितले की, 'पुढे नवापुरला जाण्यासाठी साधारणता: सत्तर ऐंशी किमी जावे लागेल. मी काही या रस्त्याने कधी गेलो नाही रस्ता चांगला आहे. आता उसतोड करण्यासाठी या भागातून मजूर व त्यांचे तांडे पुढे गुजरात मध्ये याच मार्गाने जातात. तुम्हाला बरीच ट्रॅफीकही लागेल. मी तुम्हाला एकाद्या ट्रक च्या मागे लावून देतो म्हणजे तुम्हाला सोबतही होईल. काही घाबरायचे कारण नाही. रस्त्याने चोरी, लुटमार काही होत नाही. तरीही थोडे सांभाळून जा. थोडे जंगल आहे.'
तो माणूस चांगला बोलत होता. उच्च्चार पण चांगले होते. त्या बद्दल विचारले असता तो म्हणाला की 'मी बरेच वर्ष नाशिकमध्ये नोटप्रेस मध्ये कामाला होतो. आता मी व्हिआरएस घेतली व गावाकडे शेती बघतो.' बोलत असतांना त्याला थांबण्याचे 'वेलदाटाकी' हे ठिकाण आले. आता मी गुजरात राज्याच्या हद्दीत आलो होतो. रस्त्याच्या बाजूलाच एक मोठी पाण्याची टाकी होती. त्यावरूनच त्या भागाला वेलदाटाकी म्हणत असावे. आजूबाजूला परिसरात तापी नदीच्या पात्राचे पाणी व उकई धरणाचे बॅकवॉटर आलेले आहे. रात्रीच्या अंधारात मला दिसले नाही. तो माणूस उतरला. बाजूलाच एक टपरी होती. त्यात काही आदिवासी लोकं बसलेली होती. त्या माणसाने मला चहा पिण्याची विनंती केली. मी पण थोडावेळ आजूबाजूची परिस्थिती पाहण्यासाठी उतरलो. चहा घेताघेता तो इतर आदिवासींशी त्यांच्या भाषेत बोलला. त्याने सांगितले की आत मजुर घेवून ट्रक जातील. काहीवेळाने एक ट्रक मजुरांना घेवून आला. त्या माणसाने त्यातील ड्रायव्हरशी मसलत केली व मला त्या ट्रकच्या मागेपुढे राहायला सांगितले. मी त्याचा निरोप घेतला. ट्रक मधील मजुर आता चहा बिडीसाठी खाली उतरले.
मी पुढे रस्त्याने वर्दळ आहेच असे समजून पुढे निघालो. नाहितरी आता मला एकट्यानेच प्रवास करायचा होता. रस्ता हा काही फार उत्तम होता असे नाही. म्हणजे १० चा १५ च्या लायकीचा होता. रस्त्याने छोटे छोटे खड्डे खुपच होते. त्यामुळे सरळ गाडी चालवणे शक्य नव्हते. पण बाजूला अंधार असल्याने पुरेशा उजेडाअभावी मोटरसायकलच्या हेडलाईट मध्ये त्या खड्ड्यांना टाळणेही अशक्य होते. गाडी खड्य्यांतूनच चालवणे भाग होते. रस्त्याने काहीच ट्रॅफीक साइन्स नव्हते. ना रेडीयम चे पट्टे ना कसली खुण. मोटरसायकलचाच काय तो उजेड. तो मागचा ट्रक तर अजूनही मला क्रॉस झालेला नव्हता. (संपुर्ण प्रवासात मला एकही वाहन पुढे क्रॉस करून गेलेले नव्हते.) मी तशीच गाडी दामटत होतो. कुठले गाव दिसत नव्हते की काही जिवंतपणाची खुण दिसत नव्हती. एक दोन बस स्टॉप दिसले. बाकी कसलाही उजेड नाही. आपल्याकडील रात्रीच्या प्रवासात खेडेगावातील शेतातील घरांमधील /विहीरींवरील लाईट तरी दिसतो. येथे तसल्या काहीच खाणाखूणा दिसत नव्हत्या. मी एका मोठ्या डोंगराच्या सपाट माथ्यावरून चालण्याचा मला भास होत होता. अन डोंगरमाथ्यावर थोडीच शेती वस्ती असते? आजूबाजूला नजर टाकली तर फक्त मोठ्या मोठ्या वृक्षांच्या काळ्या कभीन्न आकृत्याच दिसत होत्या. मध्येच रस्त्याला उतार लागत होता. त्या कडे बघीतले की मनात धडकी बसायची. मी देवाला एकच प्रार्थना करत होतो की गाडीला काही होवू देवू नको. पंक्चर तर नकोच नको. मला ते परवडणारे नव्हते. तसे काही झाले असते तर मी कोठे आसरा घेतला असता? अजूनपर्यंत एकही वाहन येथून गेले नव्हते. फारफार तर आठएक वाजले असतील. तरीही एकही माणूस मला दिसला नव्हता. या रस्त्याने येण्यापेक्षा नंदुरबारला मुक्काम केला असता तर परवडले असते असा विचार मनात येत होता. मी तर आता निम्मा रस्ता पार केला होता. माघारी जाणे वेडेपणाचे होते. मी तसाच पुढे जाण्याचा विचार पक्का केला. काही किमी पुढे गेल्यानंतर मला एक गाव लागले. त्या गावाच्या आसपास भरपुर पाणी होते. ते उकाई धरणाचेच पाणी होते. बांधावरून गेल्यानंतर एक दोन तरूण मुले रस्त्याने येत होती. मी त्यांना उच्छल / नवापुर बद्दल विचारले असता त्यांनी दिशानिर्देश करून मला पुढे जाण्यास सांगितले. आता रस्ता चांगला होता. माझ्या मनात धिर आला. पुढे उच्छल गाव लागले असावे कारण मी फक्त मोटर सायकल चालवत होतो. आजुबाजूला काय आहे त्याचे मला भान नव्हते. तशातच मी नवापुरच्या रेल्वे स्टेशनच्या मागच्या भागात पोहोचलो. माझ्या मनावरचा ताण फटक्यात नाहिसा झालेला होता. एका छोट्या रस्त्याने मी नवापुरात पोहोचलो. तेथील भाग मला अपरीचीत होता. प्रवासामुळे माझी थोडी दिशाभूल झालेली होती. तेथेच काही दुकानाबाहेर युवक बसलेले होते. त्यांना मी दत्तमंदिर कोठे असल्याबद्दल विचारले. त्यांनी मला रस्ता सांगितला. मी योग्यरीतीने मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो होतो.
घड्याळात बघीतले तर रात्रीचे साडेनऊ झालेले होते. जेवण तयारच होते. मी सकाळपासून काहीच खाल्लेले नव्हते. चतुर्थीच्या उपासाची खिचडी तशीच गाडीच्या डिक्कीत होती. रस्त्यात जो काही चहा झाला तोच माझ्या पोटात होता. एकुणच मला कडकडीत उपास घडलेला होता. जेवताजेवता सासरेबुवांनी मला आजचा येण्याचा मार्ग विचारला. मी उच्छलमार्गे आल्याचे समजताच त्यांनी मला कोठेतरी मुक्काम करायला पाहिजे होता असे सांगितले. त्या भागातील जंगलात अस्वले व इतर जनावरे असल्याचे सांगितले. मी सुखरूप परतलो याचेच मला अप्रूप वाटले. त्यांनी मला उद्या कोठे कोठे जायचे ते विचारले. उद्याचा माझा दौरा थेट सातपुडा पर्वतात होता. त्यासाठी त्यांनी एकटे न जाता बरोबर मला माझ्या मेहूण्यांना घेवूण जाण्याची सुचना केली. सातपुड्यातील जंगलाबद्दल मी पण ऐकून होतो. मी काही माझे मत न मांडता त्यांची सुचना मान्य केली.
आज मला अक्कलकुवा तसेच धडगाव तालूक्यातील अनुक्रमे भांग्रापाणी व मांडवी या दोन आश्रमशाळांत जायचे होते. नवापुरहून अक्कलकुव्याला जाण्यासाठी उच्छलमार्गेच रस्ता जवळचा होता. म्हणजेच काल रात्री मी ज्या मार्गाने आलो होतो त्याच जंगली रस्त्यातून आज आम्हाला जायचे होते. मला त्या मार्गाने परत दिवसा जायची उत्सूकता होती. काल रात्रीचा प्रवास व आजचा दिवसाचा प्रवास यात दिवस रात्रीचे अंतर होते. सुनिलही या रस्त्यावरून स्थानिक असुनही कधी गेले नव्हते. त्याचप्रमाणे सातपुड्यातल्या गावांमध्येही त्यांचा पहिलाच चक्कर होता. एक नविन एक्सपीडीशन म्हणून आम्हाला दोघांना उत्सूकता होती. आम्ही कालच्याच रस्त्याने निघालो. काल रात्रीचा रस्ता व आज दिवसा बघीतलेला रस्ता यात खुपच फरक होता. रस्त्याने चार पाच छोटी गावे लागली. काल रात्री दिसणारे भेसूर जंगल आज लोभसवाणे दिसत होते. रस्ता एकूणच जंगली तसेच एका डोंगर चढउताराचा होता. काल रात्री जरा 'जाणवणारा' रस्ता होता तसलाच १० चा १५ चा रस्ता होता. काल रात्री वेलदा टाकी पर्यंत आम्ही आलो. तेथून आम्ही अक्कलकुव्याकडे जाण्यासाठी वळालो. रत्यात एकदोन ठिकाणी सुनिलभाउंना सिग्रेटची तलफ भागवण्यासाठी थांबावे लागले. आम्ही मोटरसायकल आलटून पालटून चालवत होतो. मी मागेही हेल्मेट घालूनच बसायचो. भाऊ मात्र आपले बागाईतदार (उपरणे) घालून होते. होता होता आम्ही अक्कलकुवा येथे पोहोचलो. गावाच्या मागेच सातपुड्याचा मोठा पर्वत दिसत होता. सातपुडा हा पर्वत गुजरात पासून महाराष्ट्र-मध्यप्रदेशात आडवा पसरलेला आहे. महाराष्ट्राची व मध्यप्रदेशाची सीमा याच भागातून जाते. अक्कलकुवा हे गाव डोंगराच्या अगदी पायथ्याशी आहे. आम्ही तेथे चहा घेतला. येथून पुढे घाट चालू झाला. मोटरसायकल बर्याच वेळा पहिल्याच गियरमध्ये चालवावी लागत होती. समोरून काही जिप मधून लोकं थेट टपावरून प्रवास करत होते. एका बाजूला भली मोठी दरी व एका बाजूला पर्वत कडा असा देखावा होता. गाडी गरम होवू नये म्हणून घाटातल्या दोन पर्वतांच्या खिंडीत जावून थांबलो. तेथून अनेक मोटरसायकलस्वार पार होतांना दिसले. थोडावेळ थांबून आम्ही तेथून निघालो. आता आम्ही पर्वतांमधून चाललो होतो. काही वेळा मध्येच १०-१२ झोपड्या दिसायच्या. रस्त्याचा बराच भाग हा उंचसखल भागातून गेलेला होता. रस्त्यातून अनेक ओहोळ वाहतांना दिसले. तेथे रस्ता किंवा पुल हा भागच नव्हता. भांग्रापाणी ही आश्रमशाळा डोंगरउतारावर आहे. आजुबाजूला मोकळा परिसर होता. निसर्गसानिध्यात असलेल्या या आश्रमशाळा आपल्या शाळांसारख्या नसतात. मुख्याध्यापकांना माझे काम सांगितले. आजुबाजूचे शिक्षक सांगू लागले की येथे पावसाळ्यात तिन तिन महिने लाईट नसते. येथे तुम्ही बसने येवू देखील शकत नाही. रस्त्यात अनेक नद्या ओहोळ वाट अडवतात. तुम्ही देतात त्या कॉम्पुटरचे काय करणार? माझे सह्यांचे काम झालेले होते. आम्ही तेथून निघालो.
हा सातपुड्याच्या घाटाचा रस्ता उंच सखल होता. म्हणजे एकदम उंच चढ वैगेरे काही नव्हते. पण रस्ता वळणदार होता. काही छोटी गावे लागली. उंच घाटातून डोंगरउतारावर शेते मस्त दिसत होती. एकूणच मोसम मस्त होता. नंतर आम्ही मजल मारत मेघा पाटकरांनी प्रसिध्दीला आणलेले धडगाव येथे पोहोचलो. हा अक्राणी तालूका आहे. म्हणजे हेडऑफीस धडगावच आहे पण नाव अक्राणी तालूका आहे. वास्तविक येथून सरदार सरोवर काही किमी आत आहे. पण त्यांचे आंदोलन येथे बहूतेक सरकारी ऑफीसेस असावेत म्हणून येथेच चालले व बाकीच्या अधिकारी नेत्यांना या (शहादा गावाकडून चांगला रस्ता असल्याने) गावापर्यंत येता येत असल्याने ते याच्या पुढे जात नसावेत. येथे मात्र गर्दी होती. बरेचसे गावकरी बाजार करायला आलेले होते. आम्ही तेथे थांबलो. आता दुपारचे ३ वाजले होते. आम्हाला भुक लागली होती, म्हणून आम्ही तेथेच छोट्या हॉटेल मध्ये थोडे खावून घेतले. तेथे सुनिलभाउंच्या ओळखीचे एक शिक्षक भेटले. या भागात बरेचसे नोकरी करणारे लोकं आपले बिर्हाड करत नाही. एकटेच राहतात. शनिवार रविवार घरी जातात. बरेचसे शिक्षक हे आठवड्यातून एकदा येतात व पुर्ण आठवड्याच्या सह्या करून जातात. हा भाग म्हणजे सरकारी बदल्यांच्या शिक्षेचा भाग आहे. एखाद्या कर्मचार्याला कामाबद्दल शिक्षा द्यायची झाल्यास या भागात त्याची बदली केली जाते. नविन सरकारी कर्मचार्याला त्याच्या सुरूवातीची काही वर्षे येथेच काढावी लागतात. आम्ही तेथून निघालो. नंतर आमचे ठिकाण मांडवी हे होते. धडगाव सोडल्यावर मात्र रस्ता चांगला लागला. गावेही थोडी मोठी लागली. डोंगरचढ उतार मात्र तीव्र झाला. घाटात एके ठिकाणी काही छोटी मुले सिताफळे विकत होती. आम्ही ती विकत घेतली. या भागात सिताफळे फार मुबलक प्रमाणात मिळतात. रस्त्याने आम्हाला बरीच नैसर्गीक पणे उगवलेली बरीच सिताफळांची झाडे लागली होती.
साधारणपणे ५ च्या सुमारास आम्ही मांडवी या गावाच्या आश्रमशाळेत पोहोचलो. डोंगरात असल्याने सुर्य बुडाल्यासारखा होता. हि आश्रमशाळा फक्त मुलींसाठी आहे. आम्हाला सही शिक्के घेण्यासाठी ऑफीसात जावे लागले. काम आटोपले तेव्हा सुर्य बुडून अंधार झालेला होता. आता आम्हाला काळोखातून जाणे होते. ह्या रस्त्यांवर लुटालूटीची भिती होती. तरीही निघणे भाग होते. आम्ही तशीच गाडी दामटली. एकतर पुर्ण घाटाचा रस्ता अन त्यात असला भाग. त्यामूळे मनात सतत वाईट विचार येत होते. मोटरसायकल आता सुनिलभाऊच सावधगिरीने चालवत होते. रस्ता पुर्ण अंधारातच होता. केवळ बाजूच्याच रोडसाईन्स मुळे आम्ही कोठे चाललो आहोत ते समजत होते. होता होता आता आम्ही घाटाच्या उतरणीला लागलो. येथून एक रस्ता शहाद्याकडे तर एक रस्ता म्हसावद कडे जात होता. तेथूनच तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणाकडे जाण्याचा मार्ग आहे. तेथे अस्थंबा या गावी अश्वस्थाम्याचे मंदीर आहे. आजही अश्वस्थामा चिरंजीव असल्याने या भागात फिरतो अशी लोकांची श्रद्धा आहे. आम्ही आता बरेच थकलो होतो. शहादा जसेजसे जवळ येत गेले तसे आम्ही तेथेच मुक्काम करायचे ठरवले. साधारण ९ वाजता आम्ही शहाद्यास पोहोचलो. तेथे गेल्यानंतर पहिल्यांदा एक लॉज बुक केली. खुपच थकल्याने मस्त आराम व्हावा म्हणून एसी रुम बुक केली. ताजेतवाने होवून आम्ही जेवण केले. थकव्यामुळे जेवण झाल्यानंतर रुममध्ये टिव्ही चालू असूनही मला झोप लागली.
सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर नाश्टा करून आम्ही नवापूरकडे निघालो. नंदूरबार नंतर विसरवाडीला आल्यानंतर गाडीत पेट्रोल भरले.
दुपारच्या १२ च्या सुमारास आम्ही नवापूरला पोहोचलो. गाडीतील डिक्कीतील सिताफळे बघीतली असता त्यातली बरीचशी सिताफळे खराब झालेली होती.
दुपारचे जेवण करून मी लगेच नाशिककडे प्रयाण केले. अशा रितीने माझा प्रवासाचा एक अध्याय समाप्त झालेला होता, पण अजुन जळगाव, धुळे जिल्ह्यातल्या निम्या आश्रमशाळांना भेटी देणे बाकी होते.
No comments:
Post a Comment