Wednesday, March 17, 2010

श्रवण कौशल्य

एखादा आपल्या जीवनातला घडलेला प्रसंग घ्या. आपल्याला कोणीतरी काहीतरी काम सांगते व आपण ते काम जसे सांगितले अगदी त्याबरहुकूम करतोच असे नाही. असेच आपण एखाद्याला सांगितलेल्या कामाच्याबाबतीतही घडते. विद्यार्थीदशेत असल्याप्रसंगी शिक्षकाने शिकविलेले आपल्या जसेच्या तसेच लक्षात राहत नसण्याची शक्यता फारच असण्याची शक्यता असते. आपण टिव्ही, रेडिओ, चित्रपटात अनेक संवाद ऐकतो. हे संवाद आपल्याला जसेच्या तसेच लक्षात काही राहत नाहीत. अर्थात, ते लक्षात ठेवणे एवढे गरजेचेही नसते म्हणा. तरीही, एखादी गोष्ट आपण जशीच्या तशी, वाक्यन वाक्य लक्षात ठेवू शकत नाही.

मानवी जीवनात लेखन, वाचन, बोलणे व ऐकणे या क्रियांमध्ये ऐकणे अर्थात श्रवण करणे ही एक मुलभूत क्रिया घडते. अगदी लहान बाळ बोलण्याच्या आधीही श्रवणाचीच क्रिया करतो. तो जी बोलीभाषा ऐकतो ती त्याची मातृभाषा ठरते. आपण एखादे बोलणे ऐकतो तेव्हा आपण त्या बोलण्याप्रमाणे योग्य कृती केली तर आपण योग्य श्रवण केले आहे असे समजले जाते. म्हणजे, आईने जर तुम्हाला १ किलो शेंगदाणे व अर्धा किलो साबुदाणा आण असे सांगितले व तुम्ही बरोबर १ किलोच शेंगदाणे व अर्धा किलो साबुदाणेच आणले तर ती योग्य कृती ठरेल. अन्यथा तुम्ही वरवर ऐकून चुकीच्या वजनाच्या वस्तू आणल्या तर अयोग्य श्रवण क्रिया घडून अयोग्य कृती ठरेल. हेच जर तुम्ही आईने सांगितलेले जर योग्य रीतीने ऐकले तर तुमच्यात ऐकण्याचे (आज्ञा पाळणे या अर्थाने नव्हे) अर्थात श्रवण करण्याचे योग्य कौशल्य आहे असे मानले जाईल. (जे आईने सांगितले त्या संमती दाखवून आपण त्या वस्तू आणने किंवा टाळणे हा वेगळा मुद्दा आहे.) थोडक्यात एखादी गोष्ट ऐकणे व श्रवण कौशल्य वापरून लक्षपुर्वक ऐकणे ह्या भिन्न क्रिया आहेत. दैनंदिन जीवनात आपण आपले श्रवण कौशल्य वापरून आपले काम आपण सुगम बनवू शकतो. यात आपला तर फायदा आहेच पण कदाचित आपल्या ऐकण्याने समोरील व्यक्तीचे कामही योग्य प्रकारे, योग्य वेळेत होवू शकेल. लक्षपुर्वक ऐकणे ही एक अभ्यास करून उन्नत (Develop) करण्यासारखी कला आहे.

No comments: