Sunday, December 16, 2012

मोहन मै तेरे प्रेम की प्यासी


मोहन मै तेरे प्रेम की प्यासी
तेरे चरण की हो जावूं दासी
मै तेरे प्रेम की प्यासी

मेरे नैन तुझको चाहे
तुझे देखते वहीं सुखावे
मेरे मनकी दूर हो जाय उदासी
मोहन रे मै तेरे प्रेम की प्यासी
हरी मै तेरे प्रेम की प्यासी


{{{मोहन मै तोरे प्रेम की प्यासी
तोरे चरण की हो जावूं दासी
हरी रे मै तोरे प्रेम की प्यासी

मोरे नैन तोहे चाहे
तोहे देखते वहीं सुखावे
मोरे मनकी दूर हो जावे उदासी
मोहन मै तो तोरे प्रेम की प्यासी
हरी रे मै तोरे प्रेम की प्यासी }}}

- पाषाणभेद

Saturday, December 8, 2012

रात्र चांदणी


रात्र चांदणी

ही रात्र चांदणी वाटे कधी संपूच नाही
कोडे मिठीतले वाटे कधी सुटूच नाही

शब्द तुझे ऐकण्यास अधीर कान झाले
बोलण्याचे शब्द मात्र मुके कसे झाले?
मुक्या शब्दांचे गीत कधी झाले
ऐकतांना कळले नाही

आकाशी चंद्र असूनी चांदण्याही आहे
सागरास भेटण्या सरीता अतूर वाहे
वेगळी नव्हेत दोघे एकरूप झाली
कुठे ते कळले नाही

प्रीतीच्या फुलांनी आसमंत धूंद झाला
वार्‍यासही आवडूनी तो वाहवत गेला
तुझ्या असण्यात माझी मी तूझी झाले
कधी कळले नाही

- पाषाणभेद

Monday, October 15, 2012

ह्या कन्नडीगांना आलाय माज

ह्या कन्नडीगांना आलाय माज

ह्या कन्नडीगांना आलाय माज
तो माज आता काढू मोडून
अर्रे 'देत नाही देत नाही' म्हणता कशाला
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||धृ||

लई तुरूंगवास करवला रे तुम्ही
काय सहन नाही केलं आम्ही
मराठीसाठी किती रक्त वाहवलं
ह्या कन्नडीगांना आम्हां डिवचलं
लई झालं आता
उठला मराठी माणूस पेटून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||१||

अरे गल्या-बोळांना नावं आमची
सार्‍या दुकानांना नावं आमची
सार्‍या शाळा रे आमच्या आमच्या
सारी आडनावं आमची आमची
बेळगाव महानगरपालीका आमची
एका ठरावानं होईल का तुमची?
आता चाला तोडू कर्नाटक विधान भवन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||२||

आहे जसं कन्नडी शासन मुजोर
त्याला सामील केंद्रशासन कमजोर
खेळी दोघांनी केली विधानभवनाची
साक्ष आहे जशी उंदराला मांजराची
बास झालं लई झालं
बंद करा तुमचं दडपशाहीचं संमेलन
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||३||

या सीमेपाई एक पिढी गेली की रं आमची
ही सारी जमीन आमच्या बापजाद्याची
जमवून सारी फौज मराठी माणसाची
ईच्छा पुरी करू महाराष्ट्री जाण्याची
सांगून ठेवतो मुस्कटदाबी करू नका
उगा आमच्यावर वार करू नका
महाराष्ट्रात जाण्यासाठी
आमची तर फोडूच पण तुमचीबी डोकी फोडू
सांगून ठेवतो मिशीला पिळ देवून
चलारं बेळगाव कारवार सीमाभाग घेवू ओढून ||४||

-(अपुर्ण - योग आलाच तर पुर्ण करेन)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आपण सार्‍या 'ऑनलाईन मराठी कम्युनिटीजनी' मुजोर कर्नाटक, मरगळलेले मराठी नेते अन नाकर्ते केंद्रशासन यांचा ऑनलाईन निषेध करायला हवा.

- आंतरजालावर आधीच पुर्वप्रकाशीत

-पाषाणभेद

Sunday, October 7, 2012

जंगलातले चालणे


(c) pashanbhed
जंगलातले चालणे


दुर रानात रानात
शीळ घुमली कानात
पाखरांची किलबील
पानात पानात

उभा बाजूला डोंगर
झरा वाहतो समोर
पाणी पिण्यासाठी त्यात
सोडले कुणी जनावर

शिवालय शांत भग्न
गुंतले त्यात मन
थेंब थेंब पाण्याचा
होई अभिषेक अर्पण

होती बरोबर शिदोरी
झाली तीची न्याहरी
दुपारी होईल काहीबाही
त्यालाच काळजी सारी

एकटेच चालायाचे
स्वत:शीच बोलायाचे
जंगल मोठे निबिड
निघून एकटेच जायचे

आला सुर्य माथ्यावर
थेंब घामाचे अंगावर
पायवाट संपता संपेना
चालायाचे खूप अजून

- पाषाणभेद

Sunday, September 9, 2012

हिरवं झालं रानं

हिरवं झालं रानं

हिरवं झालं रानं
हिरवं झालं रानं
तिथंच गाठलं त्यानं
ग बाई
तिथंच गाठलं त्यानं ||धृ||

पायवाट नागमोडी
पांधीतून जायी गाडी
शेतावर सावरूनी
चालले बांधावरूनी
एकल्याच नारंला
तिथंच गाठलं त्यानं ||१||

मोठी झुंबड तिथं झाली
आधाराला नाही सावली
व्दाड वारा पदराशी
खेळला, पाडला पायाशी
सावरू तरी मी कशी
त्यानं ठरवलं झोंबणं ||२||

आधी जरा घाबरले बावरले
पण मी मला नाही सावरले
त्याला अंगाशी ओढले
त्याच्यामधीच भिजले
अस्सा तस्सा आला बरसून
गेला तन चिंब भिजवूनं ||३||

हिरवं झालं रानं
हिरवं झालं रानं ||धृ||

- पाषाणभेद

Sunday, April 29, 2012

पानी आनाया जावू कशी

पानी आनाया जावू कशी

हांडा घेतला बादली घेतली घेतली ग बाई मी कळशी
पन पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||धृ||

दुसरी स्त्री: का गं आसं काय म्हनतीया?

आगं विहीर कोरडी, हापसा तुटका
नाला भाकड, नदी सुकी ग बाई नदी सुकी
मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||१||

दरवर्शाची ही रडगानी पावसाळ्यात म्होप पानी
हिवाळा सरता अंगावर काटा पान्यासाठी लई बोभाटा
प्यायाला नाही पानी आन कशी करावी सांगा शेती
मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||२||

दिस सारा पान्यात जायी त्याच्यासाठी सारी घाई
दोन मैल गेल्याबिगर पानी काही दिसत न्हाई
चार्‍यापायी गाय गेली, गोर्‍ह्याला कशी टाकू ग पेंढी
मग पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||३||

बायकांचं जीनं आबरूचं कोनी नाही तिला वाली ग
बकरू मोठं केलं अन विकलं जसं खाटकाला ग
दुश्काळानं मढं केलं उपेग काय घेवून फाशी
मी पानी आनाया जावू कशी मी जावू कशी? ||४||

- पाषाणभेद

Thursday, April 26, 2012

काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

शेजारचा पोरगा हा मला पाहूनीया जातो
पाहूनीया माझ्याकडे गालात हसूनीया घेतो
काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

रोज रोज काहीतरी नवे नवे बहाणे बनवी
कधी पेपर घेई कधी नवी रिंगटोन देई
त्याच्या मनामध्ये काय आहे कसे समजावे
काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

काल मी गॅलरीत केस वाळवीत होते
उन्हामध्ये थांबून मी समोर बघत होते
म्हणतो त्याच्या परिक्षेचा निकाल परवा आहे
काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

त्याने माझा फेसबूक आयडी विचारला
मी त्यावेळी त्याला रिअल आयडी दिला
ऑनलाईन जावे की न जावे प्रश्न मला पडे
काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

उसके मन मै क्या है मै कैसे समझू
क्या होता है मेरे दिल मे उसे कैसे बतावूं
आग लगी है दोनो तरफ उसे बुझावू मै कैसे
काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

कुणीतरी माझ्या मदतीला का येईल
मनातला निरोप माझा त्याच्या कानी देईल
पण नको उगीचच मी का पुढाकार घेते
काय करू मी माझ्या दिलामधे घकधक होते

- पाभे

Sunday, April 22, 2012

दुष्काळाच्या झळा

दुष्काळाच्या झळा

दुष्काळाच्या झळा लागूनी जळाला शेतमळा
पाण्यासाठी टाहो पोडूनी सुकला ओला गळा

डाळींबाचे होवूनी हाल द्राक्षबाग ती उखडली
गहू होणे दुरच होते मान मोडून बाजरी पडली

कुठून आणावे पाणी विहीरही सुकली
बांधावरची जुनी बाभूळ आताशा वठली

कोरड्या मातीमध्ये कसे कसावे पाण्यावाचून
पान्हा फुटेना आईला अर्भक रडते ओरडून

दुर दिशेला चुकार ढग आस दाखवी
तेथे जावे वाटतसे पण सोडवेना भुई

कसे जगावे कळेना कसे जगवावे न उमजेना
दुष्काळाने मन कोरडे पण पाणी येई डोळा

- पाषाणभेद

Friday, April 20, 2012

|| अवतार शंकरमहाराज ||

श्री. शंकरमहाराज

अवतार शंकरमहाराज
दर्शन देवूनीया
धन्य केले आम्हा आज
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

किती तुमचे गुण गावू
तुम्ही आमचे सखा बंधूभाऊ
किती तुमचे गुण गावू
तुमचे नाव मुखी घेता
सोपे होई कामकाज ||१||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

अजाणबाहू दोन्ही कर
अष्टवक्र लाभले शरीर
आजानुबाहु दोन्ही कर
मस्तक झुकवूनीया
शरण आलो तुम्हा आज ||२||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

देशोदेशी दिल्या भेटी
तुम्ही दीनांचे जगजेठी
देशोदेशी दिल्या भेटी
लीला केल्या अनंत
भक्तीचे उलगडूनी गुज ||३||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

तुम्ही सारे धर्म भजती
सार्‍या भाषा तुम्हा येती
तुम्ही सारे धर्म भजती
अनंत तुमची नावे
स्मरण्या कसली आली लाज? ||४||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

कपाळी भस्म गंध टिळा
मिस्कील तेज नजर डोळा
कपाळी भस्म गंध टिळा
प्रेमळ दृष्टी ठेवा
कृपा करा आम्हांवर रोज ||५||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

उद्धरला जन्माचा पाषाण
तुमच्या भक्तीला लागून
उद्धरला जन्माचा पाषाण
पाप भंगले सारे
मुद्दलासहीत फिटे व्याज ||६||
अवतार शंकरमहाराज ||धॄ||

दुधपोहे

आंतरजालावर "दुधपोहे" (किंवा "दुध पोहे" ) असे शोधले असल्यास काहीच मिळाले नसल्याने ही पाककृती देत आहे.

तसे "दही पोहे" बनवतात पण त्यासाठी लागणारे जिन्नस जसे- दही, मसाला, कोथंबीर आदी बॅचलर असलेल्यांकडे उपलब्ध असेलच असे नाही.

झटपट नाश्टा बनवण्यासाठी व भुक भागविण्यासाठी दुधपोहे उत्त्तम पर्याय आहे.
(लहाणपणी 'मला काहीतरी खायला दे' असली माझी भुणभुण ऐकून माझी आई मला 'दुधपोहे' झटकन बनवून देत असे हे लख्ख आठवतेय! असो.)

जेव्हा तुम्ही घरी एकटे असतात व नाश्टा बनविण्याचा कंटाळा येतो तेव्हा दुधपोहे करणे फारच सोपे असते.

पाककृती:
१) मोठ्या आकाराच्या वाटीत कप-दिड कप दुध घ्या.


२) मुठभर पातळ पोहे त्यात टाका.


३) वरील दुधपोह्यांत चवीनुसार साखर घालून चमच्याने ढवळा. पोहे पातळ असल्याने लगेच एकजीव होतात.

दुधपोहे खाण्यासाठी तयार आहेत.
(फोटो आंतरजालावरून साभार)

Saturday, March 17, 2012

मी पप्पा

मी पप्पा

मी पप्पा तू मम्मी!
आपलं बाळ यम्मी यम्मी

बाळ आपलं गोरं गोरं लाल
टाळ्या वाजवून धरतंय ताल

कधी बसतं तर कधी हासतं
कधी रांगतं कधी उभं राहतं

छोटे छोटे तिचे कान
आवाजाकडे वळवी मान

हात तिचे बारीक इवलेसे!
बोटे तोंडात घाली कसे!

नजरेने ती सारे पाही
पण अजून काही बोलत नाही!

- पाषाणभेद

काशीबाई काशीबाई

काशीबाई काशीबाई

काशीबाई काशीबाई तुमच्या साडीचा कसोटा घट्ट खोचा
वारा येईल भसाभसा तर होईल मोठा लोचा ||धृ||

अशी कशी हो तुम्ही नेहमीच करता घाई
कामावर यायची उगाच करता नवलाई
भांडी निट घासा नाहीतर आणाल त्यांना पोचा ||१||

तुम्ही सांगून बोलून रजा घेत जा हो
न सांगता दांडी मारू नका हो
निट मी सांगते नका असे भांडू कचाकचा ||२||

नगरसेवक पुतण्या अन हवालदार तुमचा भाचा
तालेवार व्याही असून एक नाही काही कामाचा
सोन्याचा चमचा त्यांच्या तोंडी तुम्हां सांगती गौर्‍या वेचा ||३||

बरं जावूद्या शेजारीण काय बोलली ते जरा सांगा
चुगलखोर कळलावी मेली घेतेय माझ्याशी पंगा
बोलणं आपलं दोघींचं काय झालं सांगू नका वचावचा ||४||

- पाषाणभेद

Friday, March 9, 2012

लावणी: शिटी मारून

लावणी: शिटी मारून

{{{रंग माझा गोरा मदनाला दावतोय तोरा
रती मी सुंदर आहे मदभरली अप्सरा
नका जवळ येवू नका ओळख दाखवू
मी नार नखर्‍याची होईल पाणउतारा }}}

(चाल सुरू)
भरल्या बाजारी गर्दी जमली
अहो भरल्या बाजारी गर्दी जमली
तिथं शिटी तुम्ही का मारता?
अहो पाव्हनं शिटी मारून
शिटी मारून
येड्यावानी काय करता? ||धृ||

कोरस: शिटी मारून, हातवारे करून येड्यावानी काय करता? हो दाजी शिटी मारून येड्यावानी काय करता? नका लागू हिच्या नादी, का उगा अपमान करून घेता?

तुमी आहे कोणत्या गावाचं?
हो कोणत्या गावाचं?
गद्य: कोल्हापुरचं का? सांगलीचं का? सातार्‍याचं की ठाण्याचं? अहं? मग नक्कीच पुन्याचं!
तुमी आहे कोणत्या गावाचं?
हो कोणत्या गावाचं?
नाव सांगून बोला पुढंच
वहिनीबाईंना ओळख देण्या
गद्य: जयाबाई का? नाही? करिष्माबाई का? विद्याबाई का? शिल्पाबाई का? हं...
वहिनीबाईंना ओळख देण्या
मी जावू का तुमच्या घराला आता?
कोरस: पाव्हनं शिटी मारून येड्यावानी काय करता? ||१||

घालून आला तुमी फेटा मोठा
नेसून आलं तुमी घोतार
एकलेच नाही आला
संगती आणलं मैतार
तुमी बी तसले अन त्यो बी तसलाच
अवो तुमी बी तसले अन त्यो बी तसलाच
दोघं बी डावा डोळा का मारता
कोरस: पाव्हनं शिटी मारून येड्यावानी काय करता? ||२||

तुमी इकडं पहा; जरा इकडं या
गद्य: तुमी नाही, अहो टोपीवालं तुमी बी नाही, हं फेटेवालं तुमी!
तुमी इकडं पहा जरा कोपर्‍यात या
नजरेनं मी तुम्हां बोलावते पहा
हातामधी हात धरूनी
अहो हातामधी हात धरूनी
पोलीस चौकीत या चला का येता?
कोरस: पाव्हनं शिटी मारून येड्यावानी काय करता? ||३||

कोरस: शिटी मारून, हातवारे करून येड्यावानी काय करता? हो दाजी शिटी मारून येड्यावानी काय करता? नका लागू हिच्या नादी बिनभाड्याच्या खोलीत का र्‍हाता?

- पाषाणभेद (दगडफोड्या)

Thursday, March 8, 2012

(का? का? का?)

(का? का? का?)

(मुळ भांडवल आमचेच, म्हणजे हे!)


अवेळीही कुणी का लिहीत जाती
दिवसा रातीही का जागे राहती

प्रतिसाद नच का कुणी देती
वेळेवर का सारेच झोपती

का न त्यांचे कॉम्पुटर जळती
का न त्यांचे किबोर्ड तुटती

प्रतिसाद देण्या तुम्ही का थांबले
गिनीपिग उगा का प्रथम धजावले

कंपुबाज सारे का जमून येती
येथे येवूनी कट्ट्यावर का जाती

का संपादक उगाच येथे असती
"की, आम्ही येथे आहो" असे सांगती

हा मी एकटाच का कधीचा बोलतो
येथे कविताहूनही का येथेच विडंबतो

- का बे

का? का? का?

का? का? का?

पानांनाही कधी का येतो गंध
फुलासारखे हुंगून होण्या धुंद

पाण्याला कधी चढते निळाई
जंगलात का असते हिरवाई

रंग फुलांचे इतके का आगळे
पाहून असे का होते ते नकळे

डोंगरावर ते वृक्ष उभे का
सावली देण्या ते तेथे का

आकाशात ढग का जमून येती
आता येथे मग कोठे जाती

वारा भणाण उगा का वाहतो
"की, मी येथे आहे" असे सांगतो

{{हा मी येथे आलो का कधीचा
येथे रहायचा बेत का फुकाचा}}

हा मी एकटाच का कधीचा आलो
येथला नसूनही का येथलाच झालो

- पाभे

Tuesday, March 6, 2012

ताप नको देवू माझ्या डोक्याला

ताप नको देवू माझ्या डोक्याला

ताप नको देवू माझ्या डोक्याला
काय करायचं ते जा कर तूला

आधीच मी रात्रपाळी करतो
घाम गाळून मी थकून जातो
दिवसातरी लागूदे डोळा डोळ्याला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

कधी तू सांगते आणा तुम्ही भाजी
निट बघून आणा ताजी ताजी
गोड हसून फसवी भाजीवाली मला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

घरात करतात फार गलका पोरं
खायला उठतं मग घर सारं
जरा पाठव त्यांना आता शाळेला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

ह्या हप्त्यामधे झाला नाही पगार
किराणा आण सारा तू उधार
पैसे नंतर देईन जा सांग वाण्याला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

महागाईने फार कमाल केली
गरीबाची भाकरी पळवीली
काय म्हणावे पाषाणाच्या नशिबाला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

काम करून कावला जीव
तुला जरा तरी येवू दे कीव
संधी साधून जवळ ये दिवसाला
ताप नको देवू माझ्या डोक्याला

- आळशी पाभे

Saturday, March 3, 2012

आशियाड बसेसबद्दल काही

रामदाससरांचा हा लेख वाचला. मागे मी एसटी पुराण हा लेख लिहीला होता. त्यात प्रस्तूत लेखात आलेले मुद्दे विस्ताराने कधीतरी लिहीण्याची मनिषा व्यक्त केली होती. हा लेख प्रतिसाद म्हणून तेथेच टाकणार होतो पण प्रस्तूत लेख अन रामदाससरांचा लेख यांचा विषय वेगळा असल्याने हा लेख वेगळा म्हणून लिहीत आहे. असो.

राज्य परिवहन महामंडळ सार्‍या राज्यात सेवा देते. केवळ पुणे मुंबई म्हणजेच महाराष्ट्र नाही. ग्रामिण भागात अजूनही लाल बसेचच धावतात. तेथे सुखकर प्रवासाची अपेक्षा नसली तरी प्रवास हा गरजेचा असतो. तेथे खाजगी बसेस, एशियाड चालणार नाहीत. त्यामुळे संख्येच्या दृष्टीने लाल बसेस जास्त असणेच चांगले आहे.

प्रस्तूत लेखात केवळ आशियाड बसेसबाबत मुद्दे आलेले असले तरी दुराव्याने ते महामंडळाच्या सगळ्या प्रकारच्या बसेसला लागू होवू शकतात.

आशियाड बस (निमआराम बस सेवा) मधील त्रूटी:

१)आशियाड बस मधील बसण्याचे सिट: - आशियाड बसमधील आसनव्यवस्था सुखकारक जरी वाटली तरी ती वाटते तितकी आरामदायक ठरू शकत नाही. केवळ मऊ, गुबगुबीत आसन म्हणजे तेच प्रवासासाठी चांगले सिट असते ही कल्पना चुकीची आहे. आशियाड बस मधील प्रवास ग्रामीण भागाच्य अंतराच्या तुलनेत जास्त अंतराचा असतो. त्या संपुर्ण प्रवासात केवळ 'बसणे' हीच क्रिया प्रवाशाकडून केली जात नाही. त्यात 'झोपणे' ही शारीरीक अवस्थाही अंतर्भूत आहे.
आशियाड बस मध्ये असलेले आसन बसणे ह्या शारीरीक क्रियेसाठी योग्य आहे पण झोपणे ह्या क्रियेसाठी अजिबात योग्य नाही. हेच वाक्य सध्याच्या 'हिंगणे-नागपुर' येथील कारखान्यात बांधण्यात येणार्‍या दोन आसनी 'परिवर्तन' बस साठीही लागू होते.

हे वाक्याच्या पुष्ट्यर्थ जुन्या काळातील लाल पिवळ्या बसेस (३+२ आसने असलेल्या जनता बस) व आताच्या आशियाड किंवा लाल रंगाच्या परिवर्तन बसेस यामध्ये तुलना करा. अर्थातच वर उल्लेखीलेल्या सगळ्या बस मधून ज्याने सामान्य प्रवाशाप्रमाणे प्रवास केला आहे त्यालाच त्यातील तुलना करता येवू शकते. 'सामान्य प्रवाशी' ही एसटी प्रवासात वेगळीच संकल्पना आहे. सामान्य प्रवाशी हा कधीही आगावू आसन आरक्षण करत नाही. अगदी अकराव्या तासात त्याला प्रवासाला निघायचे असते. त्याच्याबरोबर त्याचे कुटूंबही असू शकते. त्यांचे सामानसुमान, लहान लेकरे बाळे इ. घेवून गर्दीच्या हंगामात एसटीचा प्रवास म्हणजे काय चीज असते त्याचीही कल्पना मनात असू द्या. त्याचप्रमाणे हा होणारा प्रवास केवळ 'मुंबई-पुणे' ह्या मार्गावरचा नसून सर्वसामान्य महाराष्ट्रातील गाव खेड्यांतून होणारा प्रवास आहे हेही लक्षात घ्या.

अ) जुन्या लाल पिवळ्या ३+२ आसनी बस मध्ये एका बाजूला तीन आसने मध्ये जाण्यायेण्याची मार्गीका व पलिकडे दोन आसने अशी व्यवस्था असायची. ही आसने सामान्यपणे पत्रा, रेक्झीन कुशन आणि स्पंज यापासून बनलेली असत. ही आसने सलग असत. आशियाडप्रमाणे त्या दोन आसनांत असणारी मोकळी जागा नसायची. त्या मुळे ह्या ३+२ आसनांवर एकदोन अधीकचे प्रवासी सहजपणे सामावल्या जायचे. मुंबईच्या लोकलमध्ये तीन आसनी बाकड्यावर चौथी सीट कशी हक्काने मागितली जाते तसेच या तीन किंवा दोन आसनांवर एखादे सीट हक्काने बसते. त्यात लहान मुल असले तर त्याला मांडीवर घेण्याची आग्रहवजा विनंती केली जाते. आधीच बसलेले प्रवासीदेखील ही मागणी पुर्ण करतात. काही अडेलतट्टू अपवादाचे असतात. त्यावेळी बोलाचाली होवून मामला मिटवला जातो किंवा पुढच्या आसनावरील प्रवाश्यांना त्या बसण्याची मागणी करणार्‍या प्रवाशाची दया येते व त्याची वर्णी तेथे लागते. प्रवास चालू होतो.

आता आशियाड बस मधील आसने बघू.

ब) आशियाड बसमधील आसने हे फायबर मोल्डींग पासून बनवतात. त्यात जरी स्पंज असले तरी त्यावर रेक्झीन कुशन नसते तर कापडाची खोळ असते. लालपिवळ्या बसमधील रेक्झीन कुशन हे उन्हाळ्याच्या दिवसात गरम होते. त्याप्रमाणे हे कापड गरम जरी होत नसले तरी ते भरपुर मळके असू शकते. रेक्झीन हे कापडाप्रमाणे मळत नाही, धुळ धरून ठेवत नाही. रेक्झीन कुशन हे बसगाडी आतून धुतांना आपोआप पाणी मारून धुतले जाते. आशियाड बस आतून धुतांना बस धुणार्‍या कारागीरांना आसने न भिजवता बस धुवावी लागते. कारण आशियाड बसमध्ये आसने वरती कापडाची खोळ असणारे असतात व कापड ओले करून चालत नाही. ओल्या कापडावर प्रवाशी कसे बसणार?

आशियाड बसमधील आसनव्यवस्था २+२ अशा प्रकारची असते. या दोन आसनातील आडव्या रांगेत असणार्‍या मार्गीकेची जागा ३+२ आसनव्यवस्था असणार्‍या बसच्या तुलनेने अधीक असते. बारकाईने विचार केल्यास असे जाणवते की आशियाड मधील आसनांची रूंदी काही फार मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही. मधल्या मार्गीकेची जागा मात्र वाया गेल्याप्रमाणे वाढवलेली आहे. त्या मोकळ्या मार्गीकेची रूंदी कमी केली व आसनांची रूंदी काही इंचांनी वाढवली तरी प्रवाश्यांना अधीक आरामदायक आसने बसण्यासाठी मिळू शकतात.

क) आशियाड बसमधील आसने आधी सांगितल्याप्रमाणे मोल्डेड फायबरची असतात. त्या आसनांच्या पाठीकडच्या बाजूला पाठीमागून पिण्याच्यी बाटली ठेवण्यासाठी एक गोल खाच केलेली असते व ती बाटली वरती अडकण्यासाठी एक कापडी पट्टी रिबीटच्या सहाय्याने तयार केलेली असते. आसनांच्या पाठीकडे असलीच आणखी एक सोय असते ती म्हणजे वर्तमानपत्रे अडकवण्याची जाळी होय.

ही जाळी आणि वरची कापडी पट्टी आपण प्रवास करतेवेळी आपल्या समोर (पुढल्या आसनाच्या पाठीमागे) असते. नेमक्या आपल्या प्रवासाच्या वेळी ती प्रत्येक वेळी सुस्थितीत राहीलच अशी शक्यता नसते. एकतर बाटली ठेवण्याची सोय असलेली पट्टी तुटलेल्या अवस्थेत असू शकते किंवा वर्तमानपत्रे ठेवण्याची जाळी तुटलेली किंवा तिच्या एका कोपर्‍यातला रिबीट निघालेला असू शकतो.

आणखी एक. प्रवाशी प्रवास करतांना थोडे मोकळेढाकळेपणाने बसू पाहतो. बसण्याच्या तर्‍हा थोड्याथोड्या वेळाने बदलत असतो. त्यातलाच एक प्रकार म्हणजे आपले कंबर पुढे सरकवून बसणे होय. नेमक्या या 'प्रवासी आसनात' पुढल्या आसनाच्या पाठीमागे असलेल्या या वर्तमानपत्राची जाळी आपल्या गुढग्यांना टोचते. आपल्यापैकी बर्‍याच जणांनी याचा अनुभव घेतलेला असावा. मग काही वेळेला आपण एकच गुढगा वरती उचलून पुढल्या आसनाच्या आधाराने ठेवतो. त्या वेळीसुद्धा पुढल्या आसनाची पाठ फायबर मोल्डींगची टणक असल्याने व त्यावर गुळगुळीतपणा नसल्याने ते आसन गुढग्यांना टोचते. त्यातच त्या बाटलीची खाच ज्या बाजूच्या गुढग्याला असते त्या गुढग्याच्या तशा स्थितीला अडथळा आणू शकते.

थोडक्यात ही जी वर्तमानपत्राची जाळी व पाणी ठेवण्याची खाच असते ती सोय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी असते.

ड) पुन्हा बसण्याच्या आसनांच्या पाठीमागच्या बाजूंची तुलना करूयात.

लालपिवळ्या बसमध्ये पत्रा वापरून आसने बनवलेली असतात. त्यांची चौकट लोखंडी पाईपने बनलेली असते. या लोखंडी पाईप असलेल्या चौकटीला वरच्या बाजूला पाठीमागून एक लोखंडी बारीक पाईप आडव्या दांडीसारखा वेल्ड केलेला असतो. या पाईपला आपण आडवी दांडी म्हणूयात. ३+२ आसनी लालपिवळ्या बसमध्ये असली सलग दांडीधारी आसने असतात. या पाईपवर आडवा हात ठेवला व त्या आडव्या हातावर आपले डोके ठेवल्यास छान झोप लागते.

परिवर्तन बसमध्ये २+२ आसने असतात. त्यातील आसनांच्या पाठीलाही असली दांडी असते पण ती सलग नसते. दोन्ही आसनांना वेगवेगळी असते. या बसमधील आडव्या दांडीच्या पाईपचा व्यासही साध्या लाल पिवळ्या बसमधल्या दांडीपेक्षा जास्त असतो. आशियाड बसमध्ये आसने फायबर मोल्डची असल्याने त्यांना अशा प्रकारच्या लोखंडी पाईपची सलग दांडी असू शकत नाही पण त्याच्या ऐवजी प्लास्टिक मोल्डचे हँडल असते. त्याचा आकारही लालपिवळ्या बसमधील आडव्या दांडीपेक्षा कमी असतो. परिवर्तन बसमध्ये व आशियाड बसमध्ये लालपिवळ्याबसमधल्या आडव्या दांडीइतकी लांब दांडी नसल्याने त्यावर आपण आडवा हात टेकवून झोपू शकत नाही.

२) प्रवाशाच्या डोक्यावर सामान ठेवण्याची जागा:

लाल पिवळ्या बसमध्ये प्रवाशाच्या डोक्यावर सामान ठेवण्यासाठी एक जाळीदार पिंजरा असतो. त्यामध्ये सुटकेस, पिशव्या आदी आपण ठेवू शकतो. आपल्याकडे सामान थोडे जास्त असेल किंवा आपल्या बसण्याच्या जागेवर आधीच कुणीतरी सामान ठेवून आपली सामान ठेवण्याची जागा कुणी अडवून ठेवली असेल तर आपण ते सामान दुसरीकडे, पुढेमागे ठेवू शकतो. हा सामान ठेवण्याचा पिंजरा लोखंडी जाळीदार असल्याने त्यातून बसल्या जागेवरून पाहता येवू शकते. आपले सामान अगदी लांबवर जरी असले तरी ते आपणास दिसू शकते. त्याचप्रमाणे आपले सामान लोखंडी साखळदंड किंवा दोरीने त्या जाळीला कुठेही बांधू शकतो. त्यासाठी त्या जाळीला छताला अडकवणारा लोखंडी अँगल आपल्या सामानाशेजारीच असणे जरूरी नसते. आजकालच्या बसमधील चोरीच्या घटना पाहून ही फार मोठी सोय आहे.

आशियाड व परिवर्तन बसमध्येही असली सामान ठेवण्याची जागा असते. परिवर्तन बसमधील ही व्यवस्था अ‍ॅल्युमिनीअम जाळीदार पत्र्याची असते तर आशियाडमध्ये कुशनने आच्छादलेल्या अ‍ॅल्युमिनीअम पत्र्याची असते. या बसेसमध्ये या सामानठेवण्याच्या जागेत सामान ठेवले असता बसण्याच्या जागेवरून खालून दिसू शकत नाही. चालच्या बसमध्ये सामान हालत असल्याने ते मागेपुढे होवू शकते. ते सामान साखळीने, दोरीने बांधू शकत नाही.

लापलिवळ्या बसमधील सामान ठेवण्यासाठी जाळीदार पिंजर्‍याच्या तुलनेत असल्या कुशनने आच्छादलेल्या अ‍ॅल्युमिनीअम पत्र्याचे वजन थोडेफार का होईना पण वाढलेले असेल. हे वाढीव वजन व संपुर्ण सामान ठेवण्याची जागा अ‍ॅल्युमिनीअम पत्र्याची असणे हे बस बांधणी करतांना वजन व खर्चाच्या दृष्टीने अपायकारक आहे.

आशियाड बसमधील प्रवास अधिक आरामदायक करण्याच्या दृष्टीने काही उपायवजा सुचना:

१) २+२ आसनी व्यवस्थेत दोन्ही आसने पुर्वीच्या लालपिवळ्या बसमधील व्यवस्थेप्रमाणे सलग असावीत. एवढा मोठा प्लास्टीक मोल्ड आताच्या तांत्रीक युगात बनविणे सहज शक्य आहे.

२) या प्लास्टिक मोल्डेड सिट्सला मागे सलग दांडी लावण्यात यावी. तंत्रज्ञ म्हणतील की एवढी मोठी प्लास्टीकची दांडी वजनाने वाकेल वैगेरे. यावर उपाय म्हणून ती दांडी लोखंडी बारीक पाईपची ठेवून त्यावर प्लास्टीकचे आवरण द्यावे.

३) २+२ आसनांमधील मार्गीकेची रूंदी थोडी कमी करून बसण्याच्या आसनांची रूंदी थोडी अधीक वाढवता येईल.

४) आसनांच्या पाठीकडच्या बाजूला पाठीमागून पिण्याच्यी बाटली ठेवण्यासाठी असलेली सोय उत्तम असून ती तशीच ठेवावी फक्त वर्तमानपत्रे अडकवण्याची जाळी काढून टाकावी. नाहीतरी चालत्या बसमध्ये वाचन करू नये हे वैद्यक सांगते. ज्याला वाचन करायचे आहे तो वर्तमानपत्र, मासीके वरच्या रॅकवर ठेवू शकतो.

५) प्रवाशाच्या डोक्यावर सामान ठेवण्याची जागा ही जाळीदार असावी. ती जाळी पुर्वीच्या लालपिवळ्या बसमधील व्यवस्थेप्रमाणे लोखंडी असावी. आताच्या आशियाडबसमध्ये कुशनने आच्छादलेल्या अ‍ॅल्युमिनीअम पत्र्याची असते तशी नसावी जेणे करून ती जाळी निर्मीतीचा खर्च व बसचे वजन आटोक्यात राहील.

६) आताच्या सगळ्याच बसेसमध्ये बरेच जण मोबाईलवर गाणी स्पिकरफोनवर वाजवतात. त्यामुळे सहप्रवाशांना त्रास होवू शकतो. काही काही बसेस मध्ये चालक-वाहक यांनी जमविलेल्या पैशातच पुढे मागे स्पिकर लावलेले आढळतात. प्रवासाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अपायकारक आहे. त्यामुळे बसचालकाचे लक्ष विचलीत होवू शकते. असल्या मोबाईलवरील गाण्यासाठी किंवा गाडीत लावलेल्या स्पिकरवरील गाण्यावर प्रवासीदेखील संकोचाने बोलू शकत नाही. त्यासाठी बसेसमध्ये पुर्वीप्रमाणे ठळक अक्षरात 'गाडीत कुठल्याही प्रकारची गाणी वाजवू नयेत' असल्या अर्थाची व इतर सुचना रंगवाव्यात.

७) पुर्वीच्या लालपिवळ्या बसमध्ये प्रवासी आसनांचे क्रमांक हे काळ्या रंगाने त्या त्या आसनांच्या वर चित्रीत केलेले असायचे. आताच्या बसेस मध्ये हे क्रमांक एका अ‍ॅल्युमिनीअमच्या पट्टीवर खोदलेले असतात व ते बसच्या बॉडीवर दोन रिबीटच्या सहाय्याने ठोकलेले असतात. या अ‍ॅल्युमिनीअमची पट्टी व रिबीट यांच्या निर्मीतीसाठी रंगाच्या तुलनेत निश्चितच जास्त खर्च येत असणार. हा खर्च व याचे वाढीव वजन रंग वापरून कमी करता येवू शकतो. तुम्ही म्हणाल की हे दात कोरून पोट भरण्यासारखे आहे. पण लक्षात घ्या की बसचे वजन कमी करणे हे इंधनाच्या उपयोगीतेवर अनुकूल परिणाम करू शकते.

८) आशियाड बसमधील आसनांवरील आच्छादने वेळोवेळी धुण्यात यावीत.

एसटीच्या महामंडळाच्या वेबसाईटवरील या लि़ंकवर आगामी बसेसमध्ये काय काय बदल केले जावू शकतात हे दिलेले आहे. यात अनेक बदल सुखकार प्रवासासाठी येवू घातलेले आहेत.

एसटी महामंडळ हे पुर्ण महाराष्ट्राशी निगडीत आहे. सामाजिक बांधिलकी जपत महामंडळाने वेळोवेळी अनेक सोईसवलती प्रवाशांसाठी राबवल्या आहेत. एसटीमधील वाहक चालक, तेथील व्यवस्थापन, एसटी स्टँड याबाबतीत एक प्रकारचा आपलेपणा मला नेहमी वाटत आलेला आहे. एसटीवरील प्रेमापोटी व रामदास सरांच्या लेखामुळे मी केवळ काही सुचनावजा लिहीले आहे. या लेखात केवळ बसण्याच्या व्यवस्थेबाबत सुचना केल्या आहेत. त्या कदाचित योग्य नसतीलही पण त्यात अगदीच तथ्यही नाही असे नाही. एसटी महामंडळाच्या इतरही कार्यक्षेत्रात अनेक बदलांसाठी अनेक सुचना करता येवू शकतात. त्याबाबत आत्तातरी मी विचार केला नाही. आपल्याही मनात एसटीविषयी काही सुचना, माहीती असेल तर आपण त्या मांडू शकतात. फक्त त्या सुचना संबंधीतांकडे जाव्यात व त्या द्वारे एसटी महामंडळ अधिक विकसीत व्हावे ही इच्छा.

Monday, February 27, 2012

वाघ्या मी मुरळी देवाची ग तू

वाघ्या मी मुरळी देवाची ग तू

सर्वप्रथम '२७ फेब्रुवरी अर्थात मराठी भाषा दिवसाच्या' सर्व मराठी भाषीकांना हार्दीक शुभेच्छा!

यळकोट यळकोट जय मल्हार...
यळकोट यळकोट जय मल्हार...

वाघ्या मी मुरळी देवाची ग तू
मिळून जागरण करू... रात देवाची जागवू ||धृ||

देव खंडोबा मार्तंड मल्हारी
मणी मल्ल दैत्य संहारी
चढलो नवलाख पायरी
देव आहे जेजुरी गडावरी
जवळ बसली म्हाळसा सुंदरी
नवस देवाचा आता पुरा ग करू
वाघ्या मी मुरळी देवाची ग तू ||१||

तळी उचलून करू चौक भरणी
परसन्न करू देवाची करणी
माथा झुकवूनी त्याच्या चरणी
बेल भंडार उधळू गगनी
तेजानं दिवटी बुधली ग पेटवू
वाघ्या मी मुरळी देवाची ग तू ||२||

वाघ्या मी मुरळी देवाची ग तू
मिळून जागरण करू... रात देवाची जागवू ||धृ||

- वाघ्या पाषाणभेद

(हातसफाई - एक समृद्ध प्रयत्न)

(हातसफाई - एक समृद्ध प्रयत्न)

सहज थोडा चवीत बदल म्हणून ही पाककृती करून पाहिली आहे. चाखून चव कशी आहे ते जरूर सांगा.

लोकलमधली गर्दी सटकतांना उडालेली झुंबड, (मला) (चक्क!) नकोनकोशी
वाटणारी खिडकीची सीट, गुदमरवून
टाकत फुप्फुसाकाश, कोंडला
अनंत प्राचीन श्वास, ढकलत कासावीस प्राण.

धनशक्तीचे सकसान्न घेवून
उधळणारी कनकपिढी, विखुरते
लोकलफलाटातून.
होवूदे तुझी बोहणी
वाजताच शीटी ८:५३ सीएसटी फास्टची.

हे वेड्या खिसापाकीटस्तेना,
चलधनरूपी द्रव्यमुद्रा लोकलच्या सिटागर्दीत विखुरले आहे,
ते तुला चोरता येत नाही, कारण
आज मोटरमनचा संप आहे.

- पाषाणभेदचंद्रजी (थोर्ले साहेब)

Wednesday, February 22, 2012

कडाक्याच्या थंडीमुळे रिक्षाचालकाचा मृत्यु

बरं झालं आत्ताच रिक्षा रिझर्वला लागली ते. नायतर आतमध्ये पॅसेंजर बसलेले असतांना रिक्शा रिझर्वला लागली म्हणजे पॅसेंजर नको ते उगाच बोलतात. इतर ठिकाणी टाईमपास करत तासभर थांबतील पण रिक्षा रिझर्वला आली की पेट्रोलकॉक रिझर्वकरेपर्यंत देखील थांबायची त्यांची तयारी नसते. आता रात्रीचे दहा वाजत आले आहेत. पटकन जवळचा कांतीशेटचा पेट्रोलपंप बंद व्हायच्या आता पेट्रोल भरून घेतलं पाहीजे. नाहीतर उगाच लांब हायवेला जावून पेट्रोल भरावे लागेल. अन टाइमाची खोटी होइल ते अलग. रात्री अकराची लोकल सापडली पाहीजे. त्यात बरेच पॅसेंजर मिळतात लांब लांब जाणारे.

आज सुपरवायझर राणे उगाचच तणतणत होता. म्हणे जॉब कमी निघाले. हॅ. जॉब काढणे म्हणजे पोरं काढणं आहे का? घातला की निघाला? साला, मॅनेजमेंटचा पंटर. कामकाज येत नाही लाळघोटेपणा करून मोठा झाला. तरी बरं फिटर सलिम माझ्या बाजूने बोलला. नायतर उगाचच मेमो देत होता तो भडवा. अरे तुला जॉबची एवढीच काळजी आहे तर उभं रहा म्हणावं शॉप फ्लोअरवर, अन चालू कर लेथ मशीन. मग बघ काय होते ते. सालं एकतर स्टोअरमधून रॉ मटेरीयलही आपणच काढून आणा. त्यात त्याची काही मदत होत नाही. आपणच उगाच इतरांची कामं करतो. उद्यापासून असली सामाजिक विकासाची कामं बंद केली पाहीजे.

हा पहा डोक्यात विचार करता करता पेट्रोल पंप आला.

"काय रघू, थंडी काय म्हणते बाबा? तुझं काय पेट्रोल जाळलं की उबच उब."

"काय रामभाऊ? पंप जाळायचा काय आम्हाला? अन आज उशीर केला तुम्ही यायला?"

"लांब निगडी-प्राधिकरणातलं भाडं होतं. त्याला सोडून आलो. दीडशे ऑईल टाक अन तीन लिटर पेट्रोल टाक. ह्या बाटलीत अर्धा लिटर दे. जवळ असलेलं बरं. लवकर आवर अकराची लोकल यायची वेळ होईल. अजून मला चिंचवड रेल्वे स्टेशनवर पोहोचायचं आहे."

"जाल हो. हे काय झालंच."

"हे घे पैसे. चल दे बाकीचे पैसे लवकर. तुलाही पंप बंद करायचा असेल अजून."

"हो ना. हे घ्या उरलेले १२ रुपये परत."

चला. आता कुणी पॅसेंजर मिळते का ते बघू नाहीतर सरळ रेल्वे स्टेशन पर्यंत जातो. गिर्‍हाईक मिळालं पाहिजे. उगाच खाली रिकामी रिक्षा फिरवण्यात काही पॉइंट नाही. पेट्रोल काय वाढलं आहे. रिक्षा काही परवडत नाही. त्यात पुन्हा मेंटेनंन्स अन पोलीस आहेतच. नको तेव्हा पकडतात.

"काय रामभाऊ, आज थंडी तर फार वाढलेली दिसते आहे" रेल्वे स्टेशनवर रमेश खंदारे या रिक्षावाल्याने मला आवाज दिला. हा खंदारे बोलून चालून बरा माणूस आहे. भेटल्यावर बोलतो तरी.

"बोला खंदारे, काय म्हणता? आज बराच धंदा केलेला दिसतोय?"

"नाही हो भाऊ. सकाळी थोडाफार झाला. पण दुपारी घरीच जावं लागलं. मुलगा फार तापला होता. मग त्याला घेवून दवाखान्यात वेळ गेला संध्याकाळपर्यंत. सकाळी झालेली कमाई दवाखान्यात अन औषधपाण्यात गेली. आता बघतो वाट शेवटच्या लोकलची अन निघतो घरी मग. तुम्ही काय नाईट मारणारे लोकं. त्यात तुमची नोकरीही चांगली चालली आहे."

"नाही रे बाबा, आम्ही छोट्या कंपनीत कामं करतो. एकदम बजाज-टेल्को नाही काही. आहे ती नोकरी टिकवायची अन संसार चालवायचा. उगाच नाही रात्रीही जागायची हौस कुणाला असते? पण रिक्षाचा आधार आहे हे नक्की."

"लोकल आली वाटतं. मी मिळेल ते भाडे घेतो अन पळतो."

माझीही तीच इच्छा आहे बाबा. पण मला सकाळपर्यंत थांबून धंदा करण भाग आहे. पैशाचा प्रश्न आहे. बघूया आज किती मिळतात ते.

आता कुणी रिक्षात येईल तर थोडाफार आधार तरी होईल आजच्या दिवसाला म्हणजे रात्रीला. पण येवढ्या मरणाच्या थंडीत कोण कशाला येईल? आपण वाट तर बघू. नाहीच मिळालं गिर्‍हाईक तर रिक्षातच झोप घेवू. पहाटेच्या गाडीतून येणार्‍या प्रवाशांची वाट पाहत थांबू मग.

अरे ह्या दोन बायका इकडेच येताहेत. त्यांनाच विचारू.

"बोला ताई, कुठे जायचं आहे?"

"भोसरी"

"भोसरीला पण कुठे जायचं आहे?"

"आदर्श नगर. नाशिक रस्त्याला आहे."

"अरे बापरे ते तर फारच लांब आहे, ताई. डबल भाडं द्यावं लागेल. ४०० रुपये होतील. नाहितर आसं कराना, तुम्ही नाशिक फाट्यावर उतरा अन तेथून PCMT पकडा. शेवटच्या पाळीसाठीच्या गाड्या मिळतील अन तुम्हालाही परवडेल ते."

"आम्हाला आदर्श नगरच्या थोडं आत जायचं आहे. दगडांच्या खाणी आहेत तेथे. तेथपर्यंत बस जात नाही अन आदर्श नगरहून इतक्या रात्रीच्या रिक्षाही मिळत नाही खाणींपर्यंत जायला. म्हणून आम्ही नेहमी रिक्षानेच जातो. तुम्हाला यायचे असेल तर सांगा नाहीतर आम्ही दुसरी रिक्षा बघू."

"तसं नाही ताई. मला तर धंदा करायचाच आहे ना. त्यासाठीच येवढ्या रात्रीचा उभा आहे रिक्षा घेवू. बोला तुम्ही काय देणार?"

"हे बघा काका, ३५० रुपये घ्या अन लवकर चला. आम्हाला घाई झालेली आहे."

ही तरूण स्त्री जास्तच बोलणारी दिसते आहे. वयस्कर स्री घासाघीस करत नाही अन ही करते आहे.

"अहो ताई, एकतर रात्रीची वेळ आहे, अन तुम्हाला आदर्श नगरच्याही आतमध्ये जायचं आहे. मी सांगीतलेले भाडे एकदम बरोबर आहे. इतर रिक्षावाले असते तर त्यांनी ४५० रुपयांच्या खाली ऐकलेही नसते."

"बरं बरं चला निघूया आता. फक्त रिक्षा लवकर चालवा अन आम्हाला घरापर्यंत सोडा."

चला बरेच लांबचे भाडे मिळाले. दोन्ही बायकांमध्ये एक तरणी आहे अन एक वयस्कर आहे. काय नाते असावे बरं यांचे? अन त्यांच्याकडे सामानदेखील नाही. फक्त दोघींकडे पर्स आहेत. दोघींचे कपडे देखील पांढरे सफेद आहेत. कोणत्यातरी बाबाच्या नादी लागलेल्या दिसतात. अंगावर दागदागिने जवळपास नाहीतच. हल्ली काय दागीने तर घालतच नाही, अन असले तरी ते नकलीच असतात. बहुतेक आई अन मुलगी दिसत आहेत. न जाणो कदाचीत सासू सुनदेखील असू शकतात. जावूद्या आपल्याला काय नसत्या चौकशा. आपली रिक्षा चालू करून त्यांना सोडून यावे हेच उत्तम. ही शाल अंगावर पांघरून घेतो अन ह्या माकडटोपीचा फार उपयोग होतो असल्या थंडीत. आश्चर्य आहे, एवढ्या थंडीतही ह्या दोघींनी काहीच कसे पांघरले नाही?

"काहो ताई, एवढी थंडी आहे, पण तुम्ही काहीच कसे पांघरले नाही? अंगावर स्वेटरदेखील नाही."

"अहो रिक्षावाले तुम्ही पुढे बघून रिक्षा चालवा ना. आम्हाला काही थंडी वाजत नाहीये अन वा़जणारही नाही. तुम्ही नसती काळजी करू नका आमची."

हि पोरगी फार आगावू दिसते आहे. माणूसकी म्हणून विचारले तर म्हणते थंडी वाजत नाही. तरूण रक्त आहे म्हणून. पण ह्या वयस्कर स्रीलाही थंडी नाही वाजत? फारच आश्चर्य आहे. जावूद्या. आपल्याला काय त्याचे. आपली रिक्षा बरी अन आपण बरे.

पण मला या दोघींचे आश्चर्य वाटते. त्यांना भोसरीला जायचे होते तर पिंपरी स्टेशनला का नाही उतरल्या ह्या? अन डायरेक इतक्या लांब रिक्शा? जावूद्या. आपल्याला काय भाडे मिळाल्याशी मतलब. अन आजकाल पुण्यात पैसेवाले लोकं जास्तच झाले आहेत. मन मानेल तितके कमावतात अन उडवतात देखील तितकेच. त्यांच्यामुळेच आपल्यासारख्यांना दोन पैसे मिळतात म्हणा. चला आपण आपली रिक्षा चालवू नीट.

काही काही पॅसेंजर फार मवाळ असतात अन काही काही फार मवाली असतात. आपण रिक्षा चालवतांना असल्या अनेक नमुन्यांना बघतो. अर्थात त्या प्रवाशांनादेखील आपल्या रिक्षावाल्यांचे नमुने पहायला मिळतात म्हणा. काही रिक्षावाले फसवतात. रात्री बेरात्री असल्या वेळी रिक्षातून ह्या दोन बायकांनी रिक्षातून प्रवास करणे म्हणजे फारच डेरींग आहे. माझ्या जागी एखादा लुबाडणारा रिक्षावाला देखील त्यांना भेटू शकतो. त्या बदनाम रिक्षावाल्यांमुळे इतर चांगल्या रिक्षावाल्यांचे नाव खराब होते, अन मग सारे रिक्षावाले एकाच माळेचे मणी असे इतरांना वाटते. आमच्यात पण काही चांगले रिक्षावाले असतात. पण ते समाजाला थोडेच दिसतात? जावूद्या. आपण फार विचार करतो.

चला विचार करता करता भोसरी गेलीदेखील.

"ओ ताई सांगा आता कुठे घेवू?"

"सरळ चला हायवेने. नंतर उजव्या हाताला आदर्श नगर लागेल. तेथे सांगतो."

ह्या वयस्कर स्त्री चा आवाज फारच भसडा आहे. कानांना ऐकवत देखील नाही.

चला आता यांचे ठिकाण जवळ येत चालले आहे. थंडी पण असल्या सुनसान रस्त्यावर जास्त वाजते.

अरे यापैकी वयस्कर स्त्रीचे केस एकाएकी पांढरे कसे दिसायला लागले? अन थोडी जास्तच वयस्कर दिसते आहे समोरच्या आरशात, नाही? जावूद्या आपल्याला काय? रस्त्यात तिने मेकअप उतरवलेला दिसतो. अन त्या तरूण स्त्री कडे पहायचे म्हणजे एकतर मान वळवली पाहिजे किंवा आरसा थोडा तिरका केला पाहीजे. नको. ते बरे दिसत नाही. अन तिने मघाशीच सांगितले की पुढे बघून रिक्षा चालवा म्हणून. फारच राग येतो वाटतं तिला तिच्या चेहेर्‍याकडे कुणी पाहीले की.

"ओ ताई सांगा आता कुनीकडे न्यायची रिक्षा ते?"

"अहो आता उजवीकडे वळवा अन सरळ चालवा दगडांच्या खाणीकडे. तिकडेच राहतो आम्ही."

"अहो ताई हा एरीया फारच सुनसान आहे हो. आजूबाजूला काही सोसायट्या किंवा घरे देखील नाहीत. तुम्ही कशा काय एवढ्या सुनसान भागात राहतात? त्यातच ही दगडांची खाण. फारच भितीदायक वातावरण दिसते आहे येथे. थोडं माझ्या मनाचं चांगलं सांगतो तुम्हाला. तुम्ही बायामाणसांनी असल्या रात्रीच्या वेळी प्रवास करायला नको. काय आहे की वेळ सांगून येत नाही. कुणी चोर भामटा, लुबाडणूक करणारा, अब्रू घेणारा, भुते-खेते, हडळी असली संधी पाहतच असतात."

"बरोबरच आहे तुमचं. एकट्या दुकट्याचं काम नाही या भागात. चोर लुटारू तर असतीलच येथे कुणी सांगाव भुतेही राहत असतील."

चला. ही तरूण स्त्री समजूतदार निघाली. आपण समजत होतो तसली ती नव्हती तर.

"रिक्शावाले काका, जरा वळून मागे बघा तरी एकदा. आम्ही दोघीही कोण आहोत ते लगेच समजेल तुम्हाला."
--------------------------------------------------------------------

कडाक्याच्या थंडीमुळे रिक्षाचालकाचा मृत्यु

पुणे (दि. १५ फेब्रुवारी): भोसरी -नाशिक रोडवर काल रात्री घडलेल्या घटनेत एका तरूण रिक्षाचालकाचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यु ओढवला. या प्रकरणी भोसरी पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार श्री. कांबळे हे करत आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता भोसरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री. बैजनाथ सांगळे यांनी सांगितले की, "रात्री १२:३० च्या सुमारास एका अज्ञात इसमाने भोसरी -नाशिक रोड जवळील आदर्श नगरातील सैलानी दर्ग्याजवळ एक रिक्षा रस्त्यात वाहतूकीला अडथळा येईल अशी उभी असून त्यात एक रिक्षाचालक बसलेला आहे व तो काहीच हालचाल करत नाही अशी खबर दिली. आम्ही त्वरीत घटनास्थळी गेलो असता त्या स्थळी रिक्षा क्र. MH12-5327 स्त्यात मधोमध उभी होती. त्यात रिक्षाचालक बसलेल्या स्थितीत मृत्यू पावलेला आढळला. रिक्षाच्या कागदपत्रांवरून व रिक्षाचालकाच्या ओळखपत्रावरून तो मृतदेह रिक्षाचालक श्री. रामभाऊ पाटील यांचा होता. त्यांच्या शरिरावर मारहाण केल्याची वा रक्त आल्याची कोणतीही खुण दिसली नाही. आम्ही त्वरीत पंचनामा करून मृतदेह जिल्हा सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असता शवचिच्छेदनाच्या अहवालात मृत्यूचे कारण 'कडाक्याच्या थंडीमुळे शरीर काकडल्यामुळे हृदय बंद पडून मृत्यू' असे दिलेले आहे. सदर मृतदेह रामभाऊ पाटील यांच्या नातेवाईकांकडे पहाटे सोपविण्यात आला. या प्रकरणी भोसरी पोलिस स्टेशनात अकस्मित मृत्यू म्हणून नोंद झालेली आहे."

श्री. रामभाऊ पाटील हे चिंचवड एमआयडीसी मधील एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होते. ते मुळचे सातारा जिल्ह्यातले रहिवासी होते. दिवसपाळी झाली की ते कुटूंबाला दोन पैसे मिळावेत म्हणून रात्रीची रिक्षा चालवत असत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले व आईवडील आहेत.

गेल्या आठवड्यापासून येथील थंडीचे प्रमाण वाढले असून कालचे तापमान ३ अंश सेल्सीअस नोंदवले गेले आहे. तापमानाचा हा गेल्या २२ वर्षातील निचांक आहे. सध्याच्या कडाक्याच्या थंडीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत.

दुरवरल्या गावाकडची आठवण

दुरवरल्या गावाकडची आठवण
उदास संध्याकाळी असल्या; त्या उजाड डोंगररांगा पाहून
दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून

शेणगोठा कचरा काढून झाडून साफ केले घर ते
आईची ती घांदल गडबड मजला येथूनी दिसते
कपीला चांदी गाय गरीब चारा खात असते
मायेचा स्पर्श होताच दुधामध्ये प्रेम उतरते
त्याच वेळचे ते निरसे दुध मी टाकतसे पिवून
दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून

धाब्याचे घर पाटाईचे; त्यात झोका बांधलेला
लहान भाऊ त्या झोळीत असे झोपलेला
आठवतो तो परवचा झोका देता देता म्हटलेला
आठवतो तो अभ्यास अजूनही घोकंपट्टी केलेला
जीव वेडा रमतो; जरी तेथे नाही काही उरले अजून
दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून

चुलीतल्या धुरासारखी मंद आठवण थोडी बाबांची
त्यांनीच लावली मजला गोडी अभ्यास करण्याची
वह्या पुस्तके दप्तर देवूनी शाळा केली सवयीची
काळजी घेतली त्यांनी माझी आयुष्य माती न होण्याची
दुर आलो मोठा झालो; का उगाच केला अभ्यास मन लावून?
दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून

दारापुढला लिंब लावलेला असेल आता मोठा झाला
त्याला बघून पाणी घालून काळ कितीक निघून गेला
तेथेच खेळलो पडलो रडलो मित्रांना मार दिला घेतला
अजूनही का येतात कुणी बाजारकरू तेथे विश्रांतीला?
पाणी मागतात का आपल्याकडे ते सारे भाकरी खाऊन?
दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून

फार पुढे निघून आलो मी तुम्हास दिले दुर ठेवून
तुमचे हात रितेच ठेवले टाकले सारे मला देवून
राही वाहत्या गर्दीमध्ये तरी एकटा जाई थिजून
शहराचे वारे परी न लागे मला घ्या तुम्ही समजून
तुम्हास कल्पतो डोंगर समोरचे घेतो त्यांना बघून
दुरवरल्या गावाकडची आठवण मनात येते राहून राहून

- पाषाणभेद

Sunday, January 29, 2012

संसर्गजन्य जिवाणू

आज सकाळी एका माणसाच्या शरीरात नाकावाटे शिरलो.
म्हटले याला चांगला मोठा संसर्गजन्य रोग लावावा.
कारण आम्ही जातीने जीव-जंतू जिवाणू विषाणू.
आम्ही ज्याच्या संपर्कात त्याला लागलेत आजार रोग.
काही अंधश्रध्दाळू म्हणोत बापडे आपल्याच कर्माचे भोग.

तर शरीरात थोडे आतवर - नसांमध्ये पोहोचलो.

इतर माणसांच्या तुलनेत या व्यक्तीचे शरीर काही वेगळेच होते.
इतरांचे रक्त लाल तर याचे रक्त कोठे लाल, कोठे हिरवे, कोठे निळे,
कोठे भगवे, कोठे पिवळे, कोठे दुरंगी, कोठे तिरंगी होते.
जरा जरा वेळाने त्या रक्ताचे रंग बदलत होते.


मी मनात म्हटले की या सर्वरक्तीय प्राण्याच्या शरीरात काही रुजता येणार नाही.
तो माणूस जोरजोतात झिंदाबाद मुर्दाबाद च्या घोषणा देत असतांना त्याच्या तोंडावाटे बाहेर पडलो.

Saturday, January 28, 2012

माझ्या मना

माझ्या मना

माझ्या मना तू माझ्या मना
मला तू तरी समजून घे ना

उगा नको तू प्रश्न विचारू
उत्तर मला माहीत नसेल ना

न ऐकले तुझे अन भेटलो तिला
का भेटलो तेव्हा ते मला कळेना

दुर ती गेली निघूनी सोडून मला
आठवण तिची कधी काढू नको ना

होती का काही तिची मजबूरी?
ती तरी का सांगेल कोणा?


असेल का रे स्थिती तिची अशीच
माहीती का तुला? तू मला सांग ना!

- पाषाणभेद

Friday, January 27, 2012

सरदार सरदार

सरदार सरदार

सरदार सरदार तुम्ही माझं अंमलदार
काळजी तुमची करते लवकर परतावं

सवत चाकरी झाली माझी
ओढून नेई तुम्हा युध्दावर
वाट पाहिल तुमची दारी दासी
सेवा करीते थोडं शेजघरी पडावं

तुम्हाविण व्याकुळ चिमणा जीव
काय घडलं तेथे कुणी सांगावं
मन लागेना कामी दिसभर
घास जाईना ओठी काय करावं

धिर करून देते निरोप आता
माझी काळजी आहे उलीशी
महाराष्ट्राचा पसारा मोठा
पुर्‍या ताकदीनिशी युध्द लढावं

चला नाही अडवीत, तुम्ही  जावं
तेज तलवारीनं दुष्मना मारावं
मस्तकी मोती शिरपेच खोचावं
विजयी विराला पंचारतीनं ओवाळावं

- पाषाणभेद (दगडफोड्या)

Wednesday, January 25, 2012

नाईट शिफ्ट

नाईट शिफ्ट (Night Shift - A Short Story in Marathi Language )

आयटीमधली नोकरी म्हणजे डोक्याला ताप असतो. आयटीशिवाय इतर क्षेत्रात नोकरी करत असणार्‍या व्यक्तिंना तर ही नोकरी म्हणजे स्वर्ग वाटतो. त्यांना असे वाटते की नुसते बसून तर काम असते. अन सोई सुविधा, तगडा पगार आदींबाबत तर फारच मोठे गैरसमज पसरले आहेत. मान्य आहे की इतर इंडस्ट्रीजपेक्षा येथे जास्त पगार असतो, पण तो काही सर्व आयटी प्रोफेशनल्सला असू शकत नाही, किंवा आयटी नोकरदारांच्या सर्वच कंपन्यादेखील जास्त पगार देणार्‍या नसतात. कामाच्या बदल्यात कंपन्या कामेदेखील करवून घेतात. इतर क्षेत्रातली अन आयटी क्षेत्रातली काम करण्याची पद्धत भिन्न असते. असो.

असो अशासाठी की माझी गोष्ट भलतीकडेच वाहवत चालली होती. उगाचच आयटी, नॉनआयटी, जास्त पगार, कमी पगार आदींवर चर्चा होवून ती वादात रूपांतरीत व्हायची. म्हणून असो.

तर मंडळी मी तुम्हाला माझी खाजगी गोष्ट सांगत होतो. अहो ही आमची नाईट शिफ्ट हो. फार वैताग असतो नाईट शिफ्ट म्हणजे. तुम्हाला सांगून समजणार नाही. नाईट शिफ्टचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यावा लागेल तुम्हाला. अन आयटीमधली नाईट शिफ्ट मेकॅनिकल इंडस्ट्रीजमधल्या नाईट शिफ्टपेक्षा सर्व अर्थाने निराळी असते. कामाची वेळ एकतर दुसर्‍या देशांच्या हिशोबाने तयार केलेली असते. म्हणजे युके शिफ्ट, युएस शिफ्ट असल्या शिफ्ट असतात. म्हणजे इतर लोकं ढाराढूर झोपतात तेव्हा आमच्यातले काही जण भुतासारखे कंपनीच्या गाडीची वाट पाहत चौकात उभे असतात तर आमच्यातले काही लोकं काम संपवून कंपनीच्या गाडीतून गल्लोगल्ली सांडत असतात. काही जण झोपायची तयारी करतात तर काही जण जागण्याची, काही जण जेवणाची (दुपारच्या की रात्रीच्या ??) तयारी करतात. बरं हे (दुष्ट)चक्र पुन्हा काही दिवसांनी बदलणार असतं हो. म्हणजे एखाद्याची युके शिफ्ट बदलून युएस शिफ्ट होणार असते किंवा एखाद्याची सेकंड शिफ्ट बदलून मॉर्नींग किंवा नाईट शिफ्ट होणार असते. याशिफ्ट बदलाच्या सत्रामुळे घरच्यांना (किंवा बाहेरच्यांनाही!) वेळ देता येत नाही. सगळीकडे वेळेची अ‍ॅडजेस्टमेंट करावी लागते. पुन्हा असो. कारण हा ही विषय माझ्या गोष्टीचा नव्हताच.

तर मंडळी, कालपर्यंत गेल्या महिनाभरापासून मी नाईट शिफ्ट करत होतो. आमचा एक प्रोजेक्ट गो लाईव्ह होणार असल्याने जबाबदारीचे काम होते. त्यामुळे खरोखरच्या कामात गुंतलो होतो. शिफ्टच्या वेळेपेक्षा दोन एक तास लवकरच घरातून निघावे लागत होते. कामावरून येण्याची वेळदेखील निश्चित नव्हती. म्हणजे रात्री दहाच्या सुमारास निघून सकाळी साडेसातला कंपनीतून निघावे लागे. कधी कधी कंपनीतून निघण्याचे सकाळचे साडेआठही होत. घरची मंडळी (म्हणजे आमची सौ. हो!) फारच वैतागली होती. एकतर नविनच लग्न झालेले त्यात बंगलूरू सारखे अनोळखी भाषा असलेले शहर. घरातली तशी कामे काही नव्हती पण मुख्य कारण म्हणजे माझी सोबत तिला मिळत नव्हती. आता नविनच लग्न झालेल्या जोडप्याला विरह अन त्यातही रात्रीचा एकटेपणा म्हणजे काय असतो याचा ज्याने त्याने आपआपल्या अनुभवावरून विचार करावा. तिची मानसिक स्थिती मला समजत होती पण मी तरी काय करू शकत होतो. काहीतरी टाईमपास व्हावा आणि तिच्या शिक्षणाचा उपयोग व्हावा म्हणून तिच्या नोकरीसाठी दोन एक ठिकाणी सांगितलेही होते. पण आता लगेचच काही तिच्या नोकरीचे काम होणार नव्हते. नाही म्हणायला ती कलाकुसरीची कामे घरातच करत होती. शिवणकामात तर एखाद्या फॅशन डिझायनरच्या तोंडात मारावी अशी कला तिच्या हातात होती. तिचे पंजाबी ड्रेसेस, बाजूच्या लहान मुलांचे कपडे, ब्लाऊजेस ती हौसेखातर घरी दिवसभर शिवत बसे. पण कदाचित रात्रीच्या एकटेपणाला ती वैतागत असावी.

कारण गेल्या पंधरा एक दिवसापासून तिची घरातली धुसफुस वाढली होती. माझी नाईट शिफ्टची वेळ अन ती कधी बदलेल याची काही शक्यता नव्हती. बरे, नाईट करून मी शारिरीक अन मानसिक थकलेलो असल्याने दुसर्‍या दिवशी दिवसभर काहीच 'कामाचा' रहायचो नाही. मी दिवसा झोप घेत असतांना एकदोन वेळा तिने शिलाई मशीन चालवली. पण आवाज होतो म्हणून मी तिला ती मशीन बंद करायला लावली. मला डिस्टर्बन्स नको म्हणून टिव्ही देखील ती म्युट करून पहायची. मलाही पुर्ण दिवस झोपून काढावा लागायचा इतका शारिरीक थकवा आलेला असायचा. काही काम नाही की कोठे फिरणे नाही. बहूदा त्यामुळेच ती वैतागली असावी असा माझा समज झाला.

आता कालचीच गोष्ट. मी सकाळी घरी साडेआठला पोहोचलो. रात्री आमचा प्रोजेक्ट संपल्याने मला मोकळीक मिळाली होती आणि पुढच्या पंधरवड्यासाठी माझी शिफ्ट बदलून फार क्वचित मिळणारी जनरल शिफ्ट झाली होती. कामाचा ताण कमी करण्यासाठी मी शनिवार रविवार जोडून तीन दिवस रजादेखील मंजूर करून घेतली होती. आज जरा खुशीतच सकाळी घरी आलो. आल्याआल्या बायकोला चहा करण्यासा सांगितले. जनरली नाईट करून आल्यानंतर झोप उडू नये म्हणून मी चहा कधीच घेत नसे. आज मात्र मी चक्क चहा टाकण्यास सांगितले. आता दिवसा झोप घेण्याची गरज नव्हती. मस्तपैकी नविन लग्न झालेल्या जोडप्याचे फुलपाखरी दिवस (अन रात्रीही!) अनुभवता येईल असा माझ्या मनात विश्वास आला होता. मन आनंदाने उचंबळत होते.

"अग, एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला", चहा घेतल्यानंतर मी तिला बोललो.

"काय?" तिने थोड्या नाराजीनेच पण चेहेर्‍यावर तसा भाव न दाखवता विचारले.

"अगं, माझी नाईट शिफ्ट आज संपली. आता चारएक दिवस चांगली विश्रांती घेवून मग दिवसाच्या शिफ्टमध्ये कामावर जाणार आहे", मी मनातले मांडे मनात खात मोठ्या आनंदाने चित्कारलो.

"काय!" ती पण आनंदाने मोठ्या आवाजात उद्गारली.

माझ्या मनात जे काही रंगीत संगीत विचार येत होते तसलेच विचार तिच्याही मनात असावेत हे समजून माझ्या मनाला अगदी बरे वाटले. माझ्य मन आनंदाने उचंबळून आले. एखादा जलप्रपात जलाने ओतप्रोत भरून जसा वाहवेल अन कड्यांवरून कोसळत नदीच्या मिलनाकडे धावेल तसे माझे मन त्याच विचारांच्या दिशेने धावू लागले. प्रसिध्द लेखकांसारखे किंवा कविंसारखे असलेच हळूवार, तरल विचार माझ्या मनी उमटू लागले. पण मी काही लेखक किंवा कवी नाही.

"खरंच तुलाही आनंद झालाय?" मी साध्या सरळ माणसासारखा अ-साहित्यीक प्रश्न तिला विचारला.

"खुप बरं वाटलं मला...." ती पुढे काय बोलते ते ऐकण्यासाठी माझे प्राण कानाशी आले.

".... बरं झालं तुमची नाईट शिफ्ट संपली ते. फार वैतागले होते मी त्या नाईट शिफ्टला. दिवसभर तुमची झोप झोप. काम नाही की काही नाही. माझी घरातली कामे किती अडली होती. आता मी मनमोकळेपणे शिलाई मशीन चालवू शकेल. माझ्या चार नव्या साड्यांवरचे ब्लाउजेस शिवायचे बाकी आहेत. शेजारचे दोन तिन कपडेही शिवायचे आहेत. झालंच तर घरातली साफसफाई करायची आहे. बरं झालं ते तुमची नाईट शिफ्ट संपली ते."

तिचे ते बोलणे ऐकून माझ्या मनातला निर्झर पावसाळा संपल्यानंतर लगेचच हिवाळ्याच्या सुरूवातीलाच सुकावा तसा सुकला हे काय मी तुम्हाला सांगावं का?

(डिस्क्लेमर: कथेतील व्यक्ती, घटना, प्रसंग, ठिकाण लेखकाचे असतीलच असे नाही. त्या घटना, प्रसंग, ठिकाणांत तुम्ही स्वत: त्यातील पात्र असल्याचीही कल्पना करू शकतात.)

Monday, January 23, 2012

काय सैपाक काय करू मी बाई

काय सैपाक काय करू मी बाई


घरधनी उठलं सकाळी रामपारी
उसतोडीची आमी केली तैयारी
न्यारी डब्यासाठी आंग खंगाळूनी
चुल पेटवली पाचट काड्या पेटवूनी
हाताशी पोळपाट परात घेवूनी
जाळ केला चुलीवर तवाठेवूनी
धुर डोळ्यात जाई फुकनीनं फुकूनी
पाण्याचा तांब्या शेजारी ठेवूनी
भाईर धन्यानं गाडी केली बैलं जुपूनी
ठेवला विळा कोयता दोर कळशीत पाणी
"घाई कर" म्हनं पोराला उठवूनी
रडत उठलं पोरं...रट्टा दिला ठिवूनी
सारी तयारी झाली झालं त्यांचं आवरूनी
चला उठा निघायचं हाळी आली शेजारूनी
पिठाचा डबा घेई हाती करूनी घाई 
पाहते तर डब्यामधी बाजरीचं पिठच नाही


ऐन वक्ताला काय करावं सुधरंना
बावरली मी खायाला काय नाहीना
त्याच येळेला शेजारीन आली धावूनी
एक शेर उसनं पिठ घेई तिच्या कडूनी
बडवल्या भाकर्‍या उलट्यापालट्या करूनी
पिठलं टाकलं ठेचा केला मिरच्या भाजूनी
घाईतच डबा झाला भाकर्‍या फडक्यात बांधूनी
कपाळी कुकू लावूनी आली झोपड्यातूनी
निघालो सम्दी सारी बैलगाडीतूनी
घरधनी म्हणे "येळ का ग येवढा होई"
सांगीतलं त्याला खरं खोटं बोलले नाही
आवो डब्यामधी बाजरीचं पिठच नाही


आग येडी का खुळी तू हाई
मला सारं कालच व्हतं म्हाईत
सकाळीच शेजारी मीच गेलो पहिलं
शेजारणीला संसाराच रडगाणं सांगीतलं 
तिच्याकडं हिच होती परिस्थिती सारखी
तरी बी तीच म्हणे पिठ देते चटदिशी
म्हणून तीच आली बघ तुझ्याकडं धावूनं
पिठ दिलं भाकर्‍यांसाठी तुझी काळजी पाहूनं
"चला तुम्ही म्हणजे लईच हाईसा" म्या बोलली लाजून
संसाराची काळजी तुम्हालाबी हाये आलं मला समजून
फाटक्या संसाराची विटक्या लुगड्याची लाज मला नाही
उद्याला तिचं तिचं पिठं तिला देवून देई
तिच्याकडं बी कधी पिठं नसतं तेव्हा मी पिठं देई
ती बी कधी मधी तेल मिरच्या पिठं घेवूनी जाई
तिच्या डब्यामधीबी बाजरीचं पिठ राहत नाही


- पाभे

नको रे कान्हा

नको रे कान्हा

नको रे कान्हा आडबाजूला भेटूनी
नको लगट दावू उगीचच खेटूनी ||

नार मी भोळी साधी सरळ हरणी
रस्त्याने जाई येई सलज्ज तरणी
सख्यांसवे मथूरा बाजारी निघाले
अडवूनी दुध दही नको घेवू लुटूनी ||

गोरी माझी काया तू रे सावळा
मनात दुजे काही चेहेरा भोळा
नको छेडाछेडी दिसे मग सार्‍यांना
ओढताच वस्त्र अंगाचे गेले सुटूनी ||

श्रीहरी मनमोहन कृष्णा रे मुकूंदा
केशव मुरलीधर माधवा गोविंदा
अनंत नावे तुझी येती माझ्या मुखी
विनवीते गौळण पाया तुझ्या पडूनी ||

तुझ्याविण दुजे माझे आहे सांग कोण
तुझ्याविण जग सारे होई वैराण
यमुनेच्या वाळवंटी जीवन मज सापडले
तुझ्यासवे त्यात गेले चिंब न्हाऊनी ||

- पाभे

Thursday, January 19, 2012

चांदराती माझ्यासंगती हासलं चांदणं

चांदराती हासलं चांदणं
प्रेरणा: चांदराती हासली तू

चांदराती माझ्यासंगती हासलं चांदणं
पायी वाजे रुनुझुनु रुनुझुनु पैंजनं

रूप माझं कसं दिसंल पाहण्या
तुमी समोर धरा नजरेचा आईना

लाज लाजून धुंद झाल्या दाही दिशा
मुक्यामुक्यानं बोलण्यात आली नशा

काल राती तुमी ओठ चावून गेला
भानावर राहणं जमेना बघा मला

तुमी ओ धाडीलं डोळ्यातून आवतण
पलंगावर बसता मनी सुरू झालं रण

- पाभे

Wednesday, January 18, 2012

थंडी माघाची

थंडी माघाची

थंडी पडलीया माघाची
राया माघाची
घाई करा तुमी येण्याची ||धृ||

लवकर या हो
जवळ घ्या हो
जरातरी फिकीर करा वेळेची ||

नका नका आसं करू नका
जिव माझा फुका जाळू नका
एकटेच का दुर र्‍हाता तिथं
पेटवा शेकोटी माझ्या ज्वानीची ||

थंडीनं जिव केला येडापिसा
उन उन उबेला जवळी बसा
हातावर हात आन पायावर पाय
पहा चोळून राहिलेय मी केव्हाची ||

कालचा दिस आठवा ना
रुसवा गोडीनं मिटवा ना
आणलय काय दावून जरा
मुठ उघडा हाताची ||

- पाभे

Sunday, January 15, 2012

पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

मागे एकदा पाली -रायगड येथील सरसगडावर गेलो होतो. यावेळी मुलगा अनंत व भाचा शुभम आणि भाची आर्या यांनी सरसगडावर येण्याचा फारच आग्रह केला. मागील पावसाळा संपल्यानंतर सरसगडावर त्यांना घेवून जाणे झाले. त्याची काही छायाचित्रे.

sarasgadh pali maharashtra

सुरूवातीची चढण

sarasgadh pali maharashtra

सरसगड किल्यावर येथे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक-गावाच्या पुर्वेकडून व दुसरा पश्चिमेकडून. पुर्वेकडचा मार्ग थोडा सोपा आहे. पश्चिमेकडचा मार्ग बल्लाळेश्वर देवस्थानाच्या मागील बाजूने जातो. आम्ही पश्चिमेकडून गेलो होतो. सुरूवातीची चढाई केल्यानंतर मोठे पठार लागते. तेथून सरसगड असा दिसतो.

sarasgadh pali maharashtra

यावेळी पावसाळ्यानंतर लगेचच गेलो होतो त्यामुळे गवत खुप वाढलेले होते. मला याची अपेक्षा नव्हती. एकतर लहान मुले अन त्यात जनावरांची भिती. त्यामुळे त्यांना आरडाओरड करत व पाय आपटत चालण्यास सांगितले होते. पुन्हा मागे सरसगड दिसतो आहे. (मुले फ्रेममध्ये सतत येत असल्याने कुणाचा रसभंग होत असेल तर क्षमस्व.)

sarasgadh pali maharashtra

विस्तीर्ण पठारावर

sarasgadh pali maharashtra

येथे थोडी झाडी आहे.

sarasgadh pali maharashtra

उंच वाढलेले गवत

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

पाली (ता. सुधागड) गाव. पाली हे रायगड जिल्ह्यातले तालूक्याचे गाव आहे. जरी सरकारी अंमलबजावणीसाठी याला सुधागड तालूका म्हणतात, पण पाली येथील किल्याचे नाव सरसगड असे आहे. प्रत्यक्षात सुधागड हा वेगळा किल्ला येथून सुमारे दहा किलोमिटर दुर आहे.

sarasgadh pali maharashtra

येथे थोडीशी खडकाळ चढण आहे. येथून उतरतांना मात्र बसून उतरावे लागते.

sarasgadh pali maharashtra

वरील चढाई संपल्यानंतर हा एक टोकाचा भाग आहे. खाली अगदी सरळ उतरण आहे. येथील ग. बा. वडेर शाळेतील मुले शालेय स्पर्धेदरम्यान मात्र येथूनच वरती येतात. त्यांना येथे येण्यासाठी अगदी अर्धा तास लागतो.

sarasgadh pali maharashtra

याच्याच थोडे वर ही एक चौकोनी गुहा आहे.

sarasgadh pali maharashtra

गुहा

sarasgadh pali maharashtra

पुर्वी येथे शिवाजी महाराजांचे शिपाई बसत असावेत. आता हि मुले बसलेली!

sarasgadh pali maharashtra

येथून वरती जाण्यासाठी पायर्‍या खोदलेल्या आहेत.

sarasgadh pali maharashtra

क्षणभर विश्रांती...

sarasgadh pali maharashtra

पहिला दरवाजा

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

येथील गवताची उंची थोडी अधिक होती. येथूनच बुरूज चालू होतो.

sarasgadh pali maharashtra

किल्यावर जाण्याचे तिन टप्पे आहेत. हा दुसरा टप्पा.

sarasgadh pali maharashtra


sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

हे गवत पुरूषभर उंचीचे व अंग कापणारे होते. अद्याप किल्यावर वर्दळही नसल्याने पायवाटही तयार झालेली नव्हती.

थोडी काळजी घेत, पाय आपटत, मोठे आवाज काढत येथून मार्ग काढला.

sarasgadh pali maharashtra

राहण्यासाठी खोदलेल्या गुहा

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

प्रशस्त खडक. याच्याच मागे दोन पाण्याचे टाके आहेत. पाणी पिण्यालायक व थंडगार असते. पुर्वेकडचा व पश्चिमेकडचा मार्ग येथे एकत्र येतात. येथे बरोबर आणलेला थोडफार खाऊ खाल्ला.

येथून वरती जाण्यासाठी सरसोट चढाई करावी लागते. लहान मुले असल्याने त्यांना मी खालीच सांभाळले. वरती एक शंकराचे मंदीर आहे. तेथे केवळ शुभम जावून आला. येथे कॅमेरॅची बॅटरी संपली असल्याने पुढील फोटो काढता आले नाहीत.

उतरतांना आर्या एक दोन ठिकाणी व मी सुध्दा एके ठिकाणी उतरणीवरच्या गवतावरून पाय सरकून घसरलो. खाली येतांना फारसा वेळ लागला नाही. आल्यानंतर सुरूवातीच्या चढाईच्या ठिकाणी चंद्रपुर येथून आलेले एक दहा बारा जणांचे कुटुंब भेटले. त्यात चार एक महिला, पाच मुले व एक पुरूष होते. त्यांचे कडे पाणी नसल्याने आमच्या पाण्याच्या बाटल्या त्यांनी संपवल्या. पुढे किती चढाई आहे याची विचारपुस झाली. नंतर आम्ही खाली उतरून देवूळवाड्यात शिरलो. (बल्लाळेश्वर देवळाच्या मागील भागास देवूळवाडा म्हणतात.) मुले दमलेली नसल्याने टणाटण उड्या मारतच घरी आली.

जरी किल्यावरची चढाई सोपी असली तरी मुलांना मजा देवून गेली.

Monday, January 9, 2012

युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले

युगलगीत: ओठ गुलाबी काय नकळत बोलले

तो:
ओठ गुलाबी काय नकळत बोलले
ती:
अं हं
तुझ्यासाठीच ते रे नकळत विलगले

तो:
संध्या आज का फुलूनी आली
रंग तांबडे सोनेरी ल्याली

ती:
दिवसा रातीच्या मिलनवेळी
संध्या असली फुलूनी आली
लाजलाजूनी बघ झाली वेडी
त्या लाजेने गाल तिचे आरक्त रंगले

तो:
पाण्यावरचे तरंग का हालती डुलती
तरंगातूनी काय कोणता संदेश वदती

ती:
शांत पाण्याला जीवन देण्या
तरंग असले आले जन्मा
जळात ते जवळी राहून
लडीवाळ काही गोड गुपीत बोलले

तो:
फुले माळलीस तू या वेणी
गंध तयांचा गेला रानी

ती:
भ्रमर झाला बघ तो वेडा
जवळी आला रस घेण्या चुंबूनी
भ्रमर कुणी का तो नसे काही वेडा
बोल प्रितीचे मी त्यातून ऐकले

- पाभे

पांडूरंग माझा गरीब राहू द्या

पांडूरंग माझा गरीब राहू द्यापांडूरंग माझा गरीब राहू द्या
गरीब राहू द्या
गरीबांना पाहू द्या
पांडूरंग माझा गरीब राहू द्या ||धृ||

नका अर्पू त्याला सोने अन नाणे
त्याला नसे त्याचे देणे घेणे
आपलीच श्रीमंती
आपलीच श्रीमंती
उगा जगाला का दावता ||१||

नका लावू त्याला सुखाचे डोहाळे
नका करू त्याचे उत्सवी सोहळे
तोच दाता असता
तोच दाता असता
कशाला त्याला देणगी तुम्ही देता? ||२||

भक्तासाठी देव पहा थांबला विटेवरी
भक्तीसाठी कर दोन्ही ठेवीले कटेवरी
नको दुजे काही देणे
नको दुजे काही देणे
काही न घेण्यासाठी बध्द करी हाता ||३||

- पाभे

Monday, January 2, 2012

लष्करी हुकूम अर्थात आर्मी कमांड्स

आर्मी कमांड्स

(एनसीसी त असतांना या कमांड्स ऐकायची सवय होती. आता सहज आठवल्या. गेयता येण्यासाठी काही शब्द अ‍ॅडावलेले आहेत. या हुकूमांना कोठेतरी लय असते म्हणून काव्यविभाग निवडला आहे. रोष नसावा. )

परेडss सावधानss
शत्रूला पळून जावू द्यायचं नाय

परेडss विश्रामs
शत्रूकडे लक्ष ठेवण्याचं करा काम

हिलो मत मतलब हिलो मत
एकदम ताठ उभे रहा सख्त

परेडss लाईन बनs
नाहीतर देईन दणादण

परेडss तेज चलs
हात हलवत पाऊल उचल

परेडss आराम से चल
गडबड गोंधळ कर कम

हरकत नही....हरकत नही
बुटात बोटे हलवायचे नाही

परेडsss दहिने / बायें/ पिछे मुड
व्हेरी गुड व्हेरी गुड

परेडsss दहिने / बायें/ सामने देख
तेज नजर फेक

परेडss कदम ताल
एक सुर में पैर लगाव

परेडss सलामी शस्त्र
रायफल सिधी पकड

परेडss बगल शस्त्र
ट्रीगर गार्ड मधे उंगली दबोच

परेडss परेड थाम
सांगतो ते ऐकायचे करा काम

परेडss लाईन तोड
जवान आपापल्या जागा सोड

Sunday, January 1, 2012

नको रे दिवा

नको रे दिवा

नको रे दिवा
तू मालवू असा
उजेड का नकोसा
उलघाल मनाची होई

लाज आली अशी
थोडी वेडी पिशी
जरा थांबलीस का
वेळ निघूनी जाई

मोहरून येई जवळी
स्पर्श घेई करूनी
का उगाच अंगी
काटा फुलूनी येई

चढली ही रात्र
थकले रे गात्र
चिंब यौवन मात्र
तुझ्या हाती येई

नको रे तू असा
नको करू राजसा
हातामधे तुझ्या
नकळत का हात जाई

नको रे तू असा
नको करू राजसा
हात हातामधे
नकळत का जाई

ऐक गोड गुपीत हे
सांगतो मी कानी
सखी तूच माझी
आता एकरूप होई

- पाभे