Showing posts with label जागा. Show all posts
Showing posts with label जागा. Show all posts

Wednesday, February 22, 2012

कडाक्याच्या थंडीमुळे रिक्षाचालकाचा मृत्यु

बरं झालं आत्ताच रिक्षा रिझर्वला लागली ते. नायतर आतमध्ये पॅसेंजर बसलेले असतांना रिक्शा रिझर्वला लागली म्हणजे पॅसेंजर नको ते उगाच बोलतात. इतर ठिकाणी टाईमपास करत तासभर थांबतील पण रिक्षा रिझर्वला आली की पेट्रोलकॉक रिझर्वकरेपर्यंत देखील थांबायची त्यांची तयारी नसते. आता रात्रीचे दहा वाजत आले आहेत. पटकन जवळचा कांतीशेटचा पेट्रोलपंप बंद व्हायच्या आता पेट्रोल भरून घेतलं पाहीजे. नाहीतर उगाच लांब हायवेला जावून पेट्रोल भरावे लागेल. अन टाइमाची खोटी होइल ते अलग. रात्री अकराची लोकल सापडली पाहीजे. त्यात बरेच पॅसेंजर मिळतात लांब लांब जाणारे.

आज सुपरवायझर राणे उगाचच तणतणत होता. म्हणे जॉब कमी निघाले. हॅ. जॉब काढणे म्हणजे पोरं काढणं आहे का? घातला की निघाला? साला, मॅनेजमेंटचा पंटर. कामकाज येत नाही लाळघोटेपणा करून मोठा झाला. तरी बरं फिटर सलिम माझ्या बाजूने बोलला. नायतर उगाचच मेमो देत होता तो भडवा. अरे तुला जॉबची एवढीच काळजी आहे तर उभं रहा म्हणावं शॉप फ्लोअरवर, अन चालू कर लेथ मशीन. मग बघ काय होते ते. सालं एकतर स्टोअरमधून रॉ मटेरीयलही आपणच काढून आणा. त्यात त्याची काही मदत होत नाही. आपणच उगाच इतरांची कामं करतो. उद्यापासून असली सामाजिक विकासाची कामं बंद केली पाहीजे.

हा पहा डोक्यात विचार करता करता पेट्रोल पंप आला.

"काय रघू, थंडी काय म्हणते बाबा? तुझं काय पेट्रोल जाळलं की उबच उब."

"काय रामभाऊ? पंप जाळायचा काय आम्हाला? अन आज उशीर केला तुम्ही यायला?"

"लांब निगडी-प्राधिकरणातलं भाडं होतं. त्याला सोडून आलो. दीडशे ऑईल टाक अन तीन लिटर पेट्रोल टाक. ह्या बाटलीत अर्धा लिटर दे. जवळ असलेलं बरं. लवकर आवर अकराची लोकल यायची वेळ होईल. अजून मला चिंचवड रेल्वे स्टेशनवर पोहोचायचं आहे."

"जाल हो. हे काय झालंच."

"हे घे पैसे. चल दे बाकीचे पैसे लवकर. तुलाही पंप बंद करायचा असेल अजून."

"हो ना. हे घ्या उरलेले १२ रुपये परत."

चला. आता कुणी पॅसेंजर मिळते का ते बघू नाहीतर सरळ रेल्वे स्टेशन पर्यंत जातो. गिर्‍हाईक मिळालं पाहिजे. उगाच खाली रिकामी रिक्षा फिरवण्यात काही पॉइंट नाही. पेट्रोल काय वाढलं आहे. रिक्षा काही परवडत नाही. त्यात पुन्हा मेंटेनंन्स अन पोलीस आहेतच. नको तेव्हा पकडतात.

"काय रामभाऊ, आज थंडी तर फार वाढलेली दिसते आहे" रेल्वे स्टेशनवर रमेश खंदारे या रिक्षावाल्याने मला आवाज दिला. हा खंदारे बोलून चालून बरा माणूस आहे. भेटल्यावर बोलतो तरी.

"बोला खंदारे, काय म्हणता? आज बराच धंदा केलेला दिसतोय?"

"नाही हो भाऊ. सकाळी थोडाफार झाला. पण दुपारी घरीच जावं लागलं. मुलगा फार तापला होता. मग त्याला घेवून दवाखान्यात वेळ गेला संध्याकाळपर्यंत. सकाळी झालेली कमाई दवाखान्यात अन औषधपाण्यात गेली. आता बघतो वाट शेवटच्या लोकलची अन निघतो घरी मग. तुम्ही काय नाईट मारणारे लोकं. त्यात तुमची नोकरीही चांगली चालली आहे."

"नाही रे बाबा, आम्ही छोट्या कंपनीत कामं करतो. एकदम बजाज-टेल्को नाही काही. आहे ती नोकरी टिकवायची अन संसार चालवायचा. उगाच नाही रात्रीही जागायची हौस कुणाला असते? पण रिक्षाचा आधार आहे हे नक्की."

"लोकल आली वाटतं. मी मिळेल ते भाडे घेतो अन पळतो."

माझीही तीच इच्छा आहे बाबा. पण मला सकाळपर्यंत थांबून धंदा करण भाग आहे. पैशाचा प्रश्न आहे. बघूया आज किती मिळतात ते.

आता कुणी रिक्षात येईल तर थोडाफार आधार तरी होईल आजच्या दिवसाला म्हणजे रात्रीला. पण येवढ्या मरणाच्या थंडीत कोण कशाला येईल? आपण वाट तर बघू. नाहीच मिळालं गिर्‍हाईक तर रिक्षातच झोप घेवू. पहाटेच्या गाडीतून येणार्‍या प्रवाशांची वाट पाहत थांबू मग.

अरे ह्या दोन बायका इकडेच येताहेत. त्यांनाच विचारू.

"बोला ताई, कुठे जायचं आहे?"

"भोसरी"

"भोसरीला पण कुठे जायचं आहे?"

"आदर्श नगर. नाशिक रस्त्याला आहे."

"अरे बापरे ते तर फारच लांब आहे, ताई. डबल भाडं द्यावं लागेल. ४०० रुपये होतील. नाहितर आसं कराना, तुम्ही नाशिक फाट्यावर उतरा अन तेथून PCMT पकडा. शेवटच्या पाळीसाठीच्या गाड्या मिळतील अन तुम्हालाही परवडेल ते."

"आम्हाला आदर्श नगरच्या थोडं आत जायचं आहे. दगडांच्या खाणी आहेत तेथे. तेथपर्यंत बस जात नाही अन आदर्श नगरहून इतक्या रात्रीच्या रिक्षाही मिळत नाही खाणींपर्यंत जायला. म्हणून आम्ही नेहमी रिक्षानेच जातो. तुम्हाला यायचे असेल तर सांगा नाहीतर आम्ही दुसरी रिक्षा बघू."

"तसं नाही ताई. मला तर धंदा करायचाच आहे ना. त्यासाठीच येवढ्या रात्रीचा उभा आहे रिक्षा घेवू. बोला तुम्ही काय देणार?"

"हे बघा काका, ३५० रुपये घ्या अन लवकर चला. आम्हाला घाई झालेली आहे."

ही तरूण स्त्री जास्तच बोलणारी दिसते आहे. वयस्कर स्री घासाघीस करत नाही अन ही करते आहे.

"अहो ताई, एकतर रात्रीची वेळ आहे, अन तुम्हाला आदर्श नगरच्याही आतमध्ये जायचं आहे. मी सांगीतलेले भाडे एकदम बरोबर आहे. इतर रिक्षावाले असते तर त्यांनी ४५० रुपयांच्या खाली ऐकलेही नसते."

"बरं बरं चला निघूया आता. फक्त रिक्षा लवकर चालवा अन आम्हाला घरापर्यंत सोडा."

चला बरेच लांबचे भाडे मिळाले. दोन्ही बायकांमध्ये एक तरणी आहे अन एक वयस्कर आहे. काय नाते असावे बरं यांचे? अन त्यांच्याकडे सामानदेखील नाही. फक्त दोघींकडे पर्स आहेत. दोघींचे कपडे देखील पांढरे सफेद आहेत. कोणत्यातरी बाबाच्या नादी लागलेल्या दिसतात. अंगावर दागदागिने जवळपास नाहीतच. हल्ली काय दागीने तर घालतच नाही, अन असले तरी ते नकलीच असतात. बहुतेक आई अन मुलगी दिसत आहेत. न जाणो कदाचीत सासू सुनदेखील असू शकतात. जावूद्या आपल्याला काय नसत्या चौकशा. आपली रिक्षा चालू करून त्यांना सोडून यावे हेच उत्तम. ही शाल अंगावर पांघरून घेतो अन ह्या माकडटोपीचा फार उपयोग होतो असल्या थंडीत. आश्चर्य आहे, एवढ्या थंडीतही ह्या दोघींनी काहीच कसे पांघरले नाही?

"काहो ताई, एवढी थंडी आहे, पण तुम्ही काहीच कसे पांघरले नाही? अंगावर स्वेटरदेखील नाही."

"अहो रिक्षावाले तुम्ही पुढे बघून रिक्षा चालवा ना. आम्हाला काही थंडी वाजत नाहीये अन वा़जणारही नाही. तुम्ही नसती काळजी करू नका आमची."

हि पोरगी फार आगावू दिसते आहे. माणूसकी म्हणून विचारले तर म्हणते थंडी वाजत नाही. तरूण रक्त आहे म्हणून. पण ह्या वयस्कर स्रीलाही थंडी नाही वाजत? फारच आश्चर्य आहे. जावूद्या. आपल्याला काय त्याचे. आपली रिक्षा बरी अन आपण बरे.

पण मला या दोघींचे आश्चर्य वाटते. त्यांना भोसरीला जायचे होते तर पिंपरी स्टेशनला का नाही उतरल्या ह्या? अन डायरेक इतक्या लांब रिक्शा? जावूद्या. आपल्याला काय भाडे मिळाल्याशी मतलब. अन आजकाल पुण्यात पैसेवाले लोकं जास्तच झाले आहेत. मन मानेल तितके कमावतात अन उडवतात देखील तितकेच. त्यांच्यामुळेच आपल्यासारख्यांना दोन पैसे मिळतात म्हणा. चला आपण आपली रिक्षा चालवू नीट.

काही काही पॅसेंजर फार मवाळ असतात अन काही काही फार मवाली असतात. आपण रिक्षा चालवतांना असल्या अनेक नमुन्यांना बघतो. अर्थात त्या प्रवाशांनादेखील आपल्या रिक्षावाल्यांचे नमुने पहायला मिळतात म्हणा. काही रिक्षावाले फसवतात. रात्री बेरात्री असल्या वेळी रिक्षातून ह्या दोन बायकांनी रिक्षातून प्रवास करणे म्हणजे फारच डेरींग आहे. माझ्या जागी एखादा लुबाडणारा रिक्षावाला देखील त्यांना भेटू शकतो. त्या बदनाम रिक्षावाल्यांमुळे इतर चांगल्या रिक्षावाल्यांचे नाव खराब होते, अन मग सारे रिक्षावाले एकाच माळेचे मणी असे इतरांना वाटते. आमच्यात पण काही चांगले रिक्षावाले असतात. पण ते समाजाला थोडेच दिसतात? जावूद्या. आपण फार विचार करतो.

चला विचार करता करता भोसरी गेलीदेखील.

"ओ ताई सांगा आता कुठे घेवू?"

"सरळ चला हायवेने. नंतर उजव्या हाताला आदर्श नगर लागेल. तेथे सांगतो."

ह्या वयस्कर स्त्री चा आवाज फारच भसडा आहे. कानांना ऐकवत देखील नाही.

चला आता यांचे ठिकाण जवळ येत चालले आहे. थंडी पण असल्या सुनसान रस्त्यावर जास्त वाजते.

अरे यापैकी वयस्कर स्त्रीचे केस एकाएकी पांढरे कसे दिसायला लागले? अन थोडी जास्तच वयस्कर दिसते आहे समोरच्या आरशात, नाही? जावूद्या आपल्याला काय? रस्त्यात तिने मेकअप उतरवलेला दिसतो. अन त्या तरूण स्त्री कडे पहायचे म्हणजे एकतर मान वळवली पाहिजे किंवा आरसा थोडा तिरका केला पाहीजे. नको. ते बरे दिसत नाही. अन तिने मघाशीच सांगितले की पुढे बघून रिक्षा चालवा म्हणून. फारच राग येतो वाटतं तिला तिच्या चेहेर्‍याकडे कुणी पाहीले की.

"ओ ताई सांगा आता कुनीकडे न्यायची रिक्षा ते?"

"अहो आता उजवीकडे वळवा अन सरळ चालवा दगडांच्या खाणीकडे. तिकडेच राहतो आम्ही."

"अहो ताई हा एरीया फारच सुनसान आहे हो. आजूबाजूला काही सोसायट्या किंवा घरे देखील नाहीत. तुम्ही कशा काय एवढ्या सुनसान भागात राहतात? त्यातच ही दगडांची खाण. फारच भितीदायक वातावरण दिसते आहे येथे. थोडं माझ्या मनाचं चांगलं सांगतो तुम्हाला. तुम्ही बायामाणसांनी असल्या रात्रीच्या वेळी प्रवास करायला नको. काय आहे की वेळ सांगून येत नाही. कुणी चोर भामटा, लुबाडणूक करणारा, अब्रू घेणारा, भुते-खेते, हडळी असली संधी पाहतच असतात."

"बरोबरच आहे तुमचं. एकट्या दुकट्याचं काम नाही या भागात. चोर लुटारू तर असतीलच येथे कुणी सांगाव भुतेही राहत असतील."

चला. ही तरूण स्त्री समजूतदार निघाली. आपण समजत होतो तसली ती नव्हती तर.

"रिक्शावाले काका, जरा वळून मागे बघा तरी एकदा. आम्ही दोघीही कोण आहोत ते लगेच समजेल तुम्हाला."
--------------------------------------------------------------------

कडाक्याच्या थंडीमुळे रिक्षाचालकाचा मृत्यु

पुणे (दि. १५ फेब्रुवारी): भोसरी -नाशिक रोडवर काल रात्री घडलेल्या घटनेत एका तरूण रिक्षाचालकाचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यु ओढवला. या प्रकरणी भोसरी पोलिस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस हवालदार श्री. कांबळे हे करत आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती घेतली असता भोसरी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्री. बैजनाथ सांगळे यांनी सांगितले की, "रात्री १२:३० च्या सुमारास एका अज्ञात इसमाने भोसरी -नाशिक रोड जवळील आदर्श नगरातील सैलानी दर्ग्याजवळ एक रिक्षा रस्त्यात वाहतूकीला अडथळा येईल अशी उभी असून त्यात एक रिक्षाचालक बसलेला आहे व तो काहीच हालचाल करत नाही अशी खबर दिली. आम्ही त्वरीत घटनास्थळी गेलो असता त्या स्थळी रिक्षा क्र. MH12-5327 स्त्यात मधोमध उभी होती. त्यात रिक्षाचालक बसलेल्या स्थितीत मृत्यू पावलेला आढळला. रिक्षाच्या कागदपत्रांवरून व रिक्षाचालकाच्या ओळखपत्रावरून तो मृतदेह रिक्षाचालक श्री. रामभाऊ पाटील यांचा होता. त्यांच्या शरिरावर मारहाण केल्याची वा रक्त आल्याची कोणतीही खुण दिसली नाही. आम्ही त्वरीत पंचनामा करून मृतदेह जिल्हा सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला असता शवचिच्छेदनाच्या अहवालात मृत्यूचे कारण 'कडाक्याच्या थंडीमुळे शरीर काकडल्यामुळे हृदय बंद पडून मृत्यू' असे दिलेले आहे. सदर मृतदेह रामभाऊ पाटील यांच्या नातेवाईकांकडे पहाटे सोपविण्यात आला. या प्रकरणी भोसरी पोलिस स्टेशनात अकस्मित मृत्यू म्हणून नोंद झालेली आहे."

श्री. रामभाऊ पाटील हे चिंचवड एमआयडीसी मधील एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होते. ते मुळचे सातारा जिल्ह्यातले रहिवासी होते. दिवसपाळी झाली की ते कुटूंबाला दोन पैसे मिळावेत म्हणून रात्रीची रिक्षा चालवत असत. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले व आईवडील आहेत.

गेल्या आठवड्यापासून येथील थंडीचे प्रमाण वाढले असून कालचे तापमान ३ अंश सेल्सीअस नोंदवले गेले आहे. तापमानाचा हा गेल्या २२ वर्षातील निचांक आहे. सध्याच्या कडाक्याच्या थंडीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत.

Monday, January 16, 2012

पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

पुन्हा एकदा सरसगड, ता. सुधागड (पाली), जि. रायगड

मागे एकदा पाली -रायगड येथील सरसगडावर गेलो होतो. यावेळी मुलगा अनंत व भाचा शुभम आणि भाची आर्या यांनी सरसगडावर येण्याचा फारच आग्रह केला. मागील पावसाळा संपल्यानंतर सरसगडावर त्यांना घेवून जाणे झाले. त्याची काही छायाचित्रे.

sarasgadh pali maharashtra

सुरूवातीची चढण

sarasgadh pali maharashtra

सरसगड किल्यावर येथे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक-गावाच्या पुर्वेकडून व दुसरा पश्चिमेकडून. पुर्वेकडचा मार्ग थोडा सोपा आहे. पश्चिमेकडचा मार्ग बल्लाळेश्वर देवस्थानाच्या मागील बाजूने जातो. आम्ही पश्चिमेकडून गेलो होतो. सुरूवातीची चढाई केल्यानंतर मोठे पठार लागते. तेथून सरसगड असा दिसतो.

sarasgadh pali maharashtra

यावेळी पावसाळ्यानंतर लगेचच गेलो होतो त्यामुळे गवत खुप वाढलेले होते. मला याची अपेक्षा नव्हती. एकतर लहान मुले अन त्यात जनावरांची भिती. त्यामुळे त्यांना आरडाओरड करत व पाय आपटत चालण्यास सांगितले होते. पुन्हा मागे सरसगड दिसतो आहे. (मुले फ्रेममध्ये सतत येत असल्याने कुणाचा रसभंग होत असेल तर क्षमस्व.)

sarasgadh pali maharashtra

विस्तीर्ण पठारावर

sarasgadh pali maharashtra

येथे थोडी झाडी आहे.

sarasgadh pali maharashtra

उंच वाढलेले गवत

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

पाली (ता. सुधागड) गाव. पाली हे रायगड जिल्ह्यातले तालूक्याचे गाव आहे. जरी सरकारी अंमलबजावणीसाठी याला सुधागड तालूका म्हणतात, पण पाली येथील किल्याचे नाव सरसगड असे आहे. प्रत्यक्षात सुधागड हा वेगळा किल्ला येथून सुमारे दहा किलोमिटर दुर आहे.

sarasgadh pali maharashtra

येथे थोडीशी खडकाळ चढण आहे. येथून उतरतांना मात्र बसून उतरावे लागते.

sarasgadh pali maharashtra

वरील चढाई संपल्यानंतर हा एक टोकाचा भाग आहे. खाली अगदी सरळ उतरण आहे. येथील ग. बा. वडेर शाळेतील मुले शालेय स्पर्धेदरम्यान मात्र येथूनच वरती येतात. त्यांना येथे येण्यासाठी अगदी अर्धा तास लागतो.

sarasgadh pali maharashtra

याच्याच थोडे वर ही एक चौकोनी गुहा आहे.

sarasgadh pali maharashtra

गुहा

sarasgadh pali maharashtra

पुर्वी येथे शिवाजी महाराजांचे शिपाई बसत असावेत. आता हि मुले बसलेली!

sarasgadh pali maharashtra

येथून वरती जाण्यासाठी पायर्‍या खोदलेल्या आहेत.

sarasgadh pali maharashtra

क्षणभर विश्रांती...

sarasgadh pali maharashtra

पहिला दरवाजा

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

येथील गवताची उंची थोडी अधिक होती. येथूनच बुरूज चालू होतो.

sarasgadh pali maharashtra

किल्यावर जाण्याचे तिन टप्पे आहेत. हा दुसरा टप्पा.

sarasgadh pali maharashtra


sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

हे गवत पुरूषभर उंचीचे व अंग कापणारे होते. अद्याप किल्यावर वर्दळही नसल्याने पायवाटही तयार झालेली नव्हती.

थोडी काळजी घेत, पाय आपटत, मोठे आवाज काढत येथून मार्ग काढला.

sarasgadh pali maharashtra

राहण्यासाठी खोदलेल्या गुहा

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

sarasgadh pali maharashtra

प्रशस्त खडक. याच्याच मागे दोन पाण्याचे टाके आहेत. पाणी पिण्यालायक व थंडगार असते. पुर्वेकडचा व पश्चिमेकडचा मार्ग येथे एकत्र येतात. येथे बरोबर आणलेला थोडफार खाऊ खाल्ला.

येथून वरती जाण्यासाठी सरसोट चढाई करावी लागते. लहान मुले असल्याने त्यांना मी खालीच सांभाळले. वरती एक शंकराचे मंदीर आहे. तेथे केवळ शुभम जावून आला. येथे कॅमेरॅची बॅटरी संपली असल्याने पुढील फोटो काढता आले नाहीत.

उतरतांना आर्या एक दोन ठिकाणी व मी सुध्दा एके ठिकाणी उतरणीवरच्या गवतावरून पाय सरकून घसरलो. खाली येतांना फारसा वेळ लागला नाही. आल्यानंतर सुरूवातीच्या चढाईच्या ठिकाणी चंद्रपुर येथून आलेले एक दहा बारा जणांचे कुटुंब भेटले. त्यात चार एक महिला, पाच मुले व एक पुरूष होते. त्यांचे कडे पाणी नसल्याने आमच्या पाण्याच्या बाटल्या त्यांनी संपवल्या. पुढे किती चढाई आहे याची विचारपुस झाली. नंतर आम्ही खाली उतरून देवूळवाड्यात शिरलो. (बल्लाळेश्वर देवळाच्या मागील भागास देवूळवाडा म्हणतात.) मुले दमलेली नसल्याने टणाटण उड्या मारतच घरी आली.

जरी किल्यावरची चढाई सोपी असली तरी मुलांना मजा देवून गेली.

Tuesday, January 18, 2011

वाट बघतोय रिक्षावाला

शालिमारे का भौ?

चला सिबीएस, शालिमार...

लगेच निघेल...

"शालिमार?"

चला बसा...

शालिमार... शालिमार...

ए संत्या आवाज दे ना भाडखावू? लायनीत उगाच गप उभा का राहतो? सालं पट्टा मारतो अन धंदा ओरडायची लाज वाटते का मग?

ओ भाई, आवाज कमी. हे काय सकाळपासून ३ ट्रिपा मारल्या पट्यावर. एक नाशिकरोडचं भाडं होतं म्हणून गेलो अन आपली आज दिवसभराची लेवल झाली. आजचं भाडं सुटलं म्हणून निवांत आहे. तुमी मारा पट्टे. मी पुडी घेवून येतो. सकाळपासून खाल्ली नाही. तुमाला कोणती आणू? विमल?

विमल नको बाबा. हिरा आण. लई लागतो डेंजर. हे घे पैसे. आख्खी १० ची माळ आन.

आणतो. तुमी भाडं गोळा करा तवर. आजून दोन पायजे तुमाला हालायला.

चला सिबीएस, शालिमार...शालिमार ए का?

"हो, शालिमार."

किती दोन का?

"हो. किती पैसे?"

बसा. ९ रुपये एकाचे. लगेच निघतो. केव्हाचा दोन शिटची वाट पाहत होतो.
ओ जरा मागेपुढे व्हाना. ओ ताई तुमी पुढे व्हा. काका तुमी मागे व्हा जरासे. हं बसा आता दोघं.
संत्या, पळत येना. दे लवकर. निघतो लगेच. संध्याकाळी माझी लेवल झाली का मग चौकात येतो. शाम्या फिटर ला पैसे द्यायचे आहे अन हुडचे काम पण करायचे आहे.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

सिबीएस?

"अहो आता कुठे बसवता? चार तर बसवले. किती अडचण."

पुढे बसेल तो. चल रे भाऊ लवकर. ती बॅग पायाशी ठेव तिरपी. बस.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

एक दोन तीन चार पाच छे सात आठ नौ दस ग्यारा बारा तेरा

"ओ आवाज जरा हळू करा ओ. डोकं दुखतंय."

बंदच करतो. ठिक?.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

सुट्टे नाही का? ओ ताई, पाच चे दोन डॉलर द्या. हे घ्या. आले?

"हो. मिळाले"

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

"शालिमार आलं का? "

हे काय हेच शालिमार. कुठे नाशिकरोडला जायचे का? तो समोरचा स्टॉप आहे बघा नाशिकरोडचा.

चला त्रिमुर्ती चौक, पवननगर, नविन सिडको...
चला नविन सिडको...पवननगर....
ओ भाऊ पवननगर का?

"हो."

बसा.

"पवननगर म्हणजे सिडको ना? "

हो. तुमाला कुठे जायचे आहे?

"पवननगरलाच. त्रिमुर्ती चौकात."

त्रिमुर्ती आधीचा स्टॉप आहे. बसा.

"कधी निघणार."

हे काय लगेच. शिट तर भरू द्या.

"हा स्टॉप शेअर रिक्षांचा आहे ना?"

हो. सगळे पट्यावाले आहेत इथे.

"पट्टा म्हणजे?"

नविन आहे का तुम्ही.

"हो"

पट्टा मारणारे सगळे रिक्षावाले एकाच भागात ट्रिप मारतात. हा स्टॉप शालिमार ते नविन सिडकोचा आहे.

"दररोज किती पट्टे मारतात?"

सकाळी सकाळी आलो अन मुड असला तर ८/९ ट्रिपा मारतो. कधी उशीरा आलो धंद्यावर तर कमी मारतो. दुसर्‍या दिवशी लेवल करावी लागते.

"किती कमाई होते दिवसभरात?"

कमाई कसली? सगळी गमाई. भाड्याच्या रिक्षात काय सुटते? मिळते पोटापान्याचे. कधी कधी पेट्रोल सुटले तरी भरपूर. त्यात हवालदार लई त्रास देवूं र्‍हायलेत सध्या. पकडलेत पन्नास रुपयाशिवाय ऐकत नाही.

पवननगर, त्रिमुर्ती....पवननगर, त्रिमुर्ती....

"चला लवकर. किती वेळ?"

अहो गाडी भरली तरच निघणार ना? टेप लावू का?

"नको. गाडी भरेपर्यंत गप्पा मारू. स्पेशल ट्रिप मारता का?"

नाही. दिवसभर थांबून इतकीच कमाई होते. स्व:ताची रिक्षा असेल तर परवडते तसे करणे. शाळेची ही ट्रिप मारता काही जण. काही जण कंपनी सुटल्यानंतर रिक्षा चालवतात. तेव्हा परवडते. माझी तर भाड्याची रिक्षा असल्याने मी पट्टेच मारतो.

चला पवननगर, त्रिमुर्ती....पवननगर, त्रिमुर्ती....

"पुडी देवू का? हिराये  माज्याकडे"

"नाही मला नाही लागत. तुम्ही किती खाता? "

जास्त नाही दिवसभरात दोनेक माळी लागतात.

"माळी म्हणजे?"

१० पुड्यांची एक माळ. असल्या दोन माळी लागतात दिवसभरात.

"अरे बापरे एवढ्या पुड्या!"

अहो हे काहीच नाही. आधी ४ माळी संपायच्या. आता कमी केल्यात.

पवननगर, त्रिमुर्ती चौक आहे का?....पवननगर, त्रिमुर्ती....

"गाडीत टेप लागतो का?"

हो तर त्याच्या शिवाय जमत नाही. झंकार सर्कीट टाकलंय. एकदम टकारा. स्पिकर बनवून घेतले. आवाज ऐका. घुंगरांचा आवाज काय मस्त येतो बघा.

चला आता गिर्‍हाईक आलं. लगेच निघतो बघा.

पवननगर का?

"हो"

चला बसा.

डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्र..डूर्रर्रर्रर्रर्र....

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०६/०८/२०१०

शालिमार चौक, नाशिक

Tuesday, January 04, 2011

मळ्यातली सहल


मागच्या आठवड्यात मी माझ्या मामाच्या गावाला गेलो होतो. संध्याकाळचे ४:३० वाजून गेले होते. पावसाळ्याचे वातावरण अन मला घरी पोहोचण्यासाठी २ तासाचा हायवे वरचा प्रवास असल्याने मी लवकर निघण्याची घाई करत होतो. मामा गेल्यानंतर मळ्याचा कारभार मामींनीच हातात घेतला होता.मीही बर्‍याच दिवसात मळ्यात गेलेलो नव्हतो म्हणून मामींनी फारच आग्रह केल्याने मी त्यांच्या मळ्यात जाण्याचे ठरवले.


आपल्यासाठी काही छायाचित्रे:





मळ्यातले घर




"माझ्या बकरीचा समद्यास्नी लागलाय लळा"- यांच्याच ताज्या दुधाचा चहा घेतला



"कोंबडी शेळी बकरं मेंढरं

तसच पाळीतो मी रानपाखरं

गोठ्यामंदी असती गाईगुरं वासरं" (माझ्या जमीनीचं गाणं)

शेती उपयोगी जनावरे कपिला गाय, राजा व सर्जा बैल





"गाय वासरू - .... नका विसरू!"



"हिच्यामंदी करीतो मी जोंधळा

लावीतो कधिमधी हरभरा

पेरावं मुठभर तर धान्य देई पोतभर "

८ तुकडे बाजरी लावलेली आहे. मी गेलो तेव्हा निंदणी चालू होती.




बांधावरून फिरतांना राणी कुत्री आमच्या बरोबर आली.




या कुत्रीला माणसांचा फार लळा होता. फोटोसाठी खास पोज दिली तिनं!





हे गावीत काका. हे शेतातच राहतात अन देखभाल करतात. मिरचीला नुकतेच खत टाकलेले होते. त्याची पाहणी चालू आहे.




"एक तुकडा लावला घास हो खातील जनावरं माझी खास" - जनावरांसाठी लावलेला घास




हे मिरचीच्या वावराचे तुकडे. मी गेलो तेव्हा २ हप्ते काढलेले होते.




मिरचीची रोपे




हे आणखी वेगळे रोप मिरचीचे. ही तिखट जातीची अन मोठ्या आकाराची मिरची होती.




गावित काकांनी मग वानोळा घेवून जाण्यासाठी इतक्या मिरच्या तोडल्या की माझ्या मोटरसायकलची डिक्की तर भरूनच गेली. शेवटी मीच काही मिरच्या कमी केल्या.



नंतर गाईचे दुध काढतांना उशीर झाला. अंधारायला आलेले होते. पावसाचे वातावरण असल्याने मी मग घाईघाईने शेतातून निघालो.


Saturday, July 10, 2010

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील गीत : उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर

उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर

उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर
उचल मराठी झेंडा जावूदे वर वर ||धृ||

उचल तुझे हात नको भिऊ आता
आपूलाच जय होईल सीमेत शिरता
झेंडा मराठीचा फडके बेळगाव मनपावर
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||१||

राज्य आपले एक व्हावे मराठी भाषकांचे
वेगळे न राहू आता एक घर करू बांधवांचे
सुपीक प्रदेश ताब्यात आणू निप्पाणी कारवार
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||२||

पुर्वज आपले खपले तेथे विसरतो कशाला
महाराष्ट्र एकीकरण समिती आहे तुझ्या पाठीला
सामिल करू हलियाल,भालकी, अरूड अन बिदर*
उठ रे मराठी गड्या तू चल सीमेवर ||३||

* महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्तीय मराठी शहरे (BCC's 2005 resolution हा परिच्छेद पहा.) (कृपया शहरांच्या नावांचे उच्चार योग्य आहेत का ते सांगा जेणेकरून बदल करता येईल.)

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०७/२०१०