Monday, September 18, 2017

वगनाट्य "वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" या नाट्याचे नाट्यवाचन संपन्न

वगनाट्य "वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" या नाट्याचे नाट्यवाचन संपन्न

नाशिक (दि. १७): वगनाट्य "वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" या नाट्याचे नाट्यवाचन दि. १७ सप्टेंबर २०१७ रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतील सभागृहात झाले. यावेळी अध्यक्ष माननिय प्रा. श्री. रविंद्र कदम, कार्यवाह श्री. सुनील ढगे, खजिनदार मुकूंद गायधनी, जेष्ठ नाट्यलेखक श्री. प्रदीप पाटील, शरद निकूंभ, संगिता निकूंभ तसेच इतर नाट्यरसीक उपस्थित होते.

प्रस्तूत नाट्याचे वाचन नाट्यलेखक सचिन बोरसे तसेच नाट्यरसीक मयुर पुराणीक यांनी केले.
कार्यवाह श्री. सुनील ढगे प्रास्ताविक करतांना

आस्मादिकांना स्मृतीचिन्ह देतांना अध्यक्ष माननिय प्रा. श्री. रविंद्र कदम

सहकारी मयुर पुराणीक यांचा सत्कार

नाट्यवाचन करतांना

नाट्यवाचन करतांना

नाट्यवाचन करतांना

'वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही' या नाटकाचे वाचन

दै. सकाळ
नाट्य परिषदेतर्फे रविवारी नाट्यवाचन
नाशिक, ता १४: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेतर्फे रविवारी (ता. १७) सायंकाळी सहाला 'वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही' या नाटकाचे वाचन होणार आहे. जेष्ठ नाट्यलेखक व त्यांचे सहकारी नाटकाचे वाचन करणार आहेत. कालिदास कलामंदिरातील नाट्य परिषदेच्या सभागृहात होणारा कार्यक्रम मोफत असून, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष रवींद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे यांनी केले आहे.Thursday, July 27, 2017

आला पावसाळा आला पावसाळा

(आदरणीय कवी कुसूमाग्रजांची क्षमा मागून)
|| आला पावसाळा आला पावसाळा ||
आला पावसाळा आला पावसाळा
प्रवाशांनो तुमची कंबर सांभाळा

मनपाचे रस्ते खड्डेरी
दुचाकी तयामध्ये घातली
चुकवित चालली पाणी गाळा

समोरून पहा कोण येतसे
त्याचीही अवस्था तशीच असे
उडविल पाणी; त्याला तुम्ही टाळा

चारचाकीवालाही सुरक्षित नसे
खड्डयात आदळता शिव्या देत असे
न जाणो मोठी खोक ये कपाळा

जनांच्या स्मृती गौरवे वंदुनी
पुढिल ऋतूची वाट पाहूनी
आरोग्यासी वित्त आपले जाळा

- पाषाणभेद

Thursday, July 13, 2017

वगनाट्यः वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही :: Comedy Folk Drama
वगनाट्यः वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही
Vagnatya: Vairi Bhedala Arthat Premala Seema Nahi
(Comedy Folk Drama in Marathi Language)

ISBN: 978-93-5267-770-2
Published By: Amigo POD Book Publisher India, Nashik, Maharashtra
amigopublisher@gmail.com
Mobile: 94OThreeO4378Two


जय महाराष्ट्र बोला

जय महाराष्ट्र बोला
अरे बोला बोला जय महाराष्ट्र बोला
कुणाच्या बापाची भीती नाय
बोला दणकूण बोला
तुम्ही जय महाराष्ट्र बोला
अरे बोला बोला जय महाराष्ट्र तुम्ही बोला ||

आता नाही तर कधीच नाही हे ठेवा ध्यानी
सीमाभाग आमच्यात घेवू लक्षात घ्या तुम्ही
उगा पिरपिर करू नका
नाहीतर एकच ठेवून देवू टोला
बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||1||

बापजादे खपले आमचे सीमालढा देवून
लाठ्या काठ्या खाल्या लई हाल सोसून
खोटे गुन्हे नका दाखल करू
कन्नडीगांनो, झाले मराठी आता गोळा
बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||2||

मराठी शाळा तुम्ही संपवल्या की हो
कानडीची सक्ती तुम्ही राबवली हो
सोईचे नियम केले हो केले
दमनशास्त्र तुम्ही राबवले हो राबवले
खेळी केली अन गावं खिशात घातले
एक पिढीच संपवली बंद करूनी मराठी शाळा
आतातरी बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||3||

बेळगाव कारवार भालकी बीदर
आळंगा हल्याळ निपाणी घातले घशात
आतल्या गाठीचे तुम्ही
खोटे आयोग लावले कितीक वेळा
म्हणून बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||4||

मागच्या पिढ्या संपवल्या मुस्कटदाबी करून
बळजबरी केली कानडीची मार मारून
सांगा कितीदा सोसायच्या मराठीसाठी कळा
म्हणून बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||5||

नका आता भाषेचे राजकारण करू
नका आणखी सीमाभागाचे लचके तोडू
मराठीला नका लागू देवू कानडी सक्तीच्या झळा
बोला बोला जय महाराष्ट्र बोला ||6||

- पाषाणभेद

Sunday, March 19, 2017

"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही

तब्बल चार वर्षानंतर, पुन:लेखन करून, संवाद, लावण्या आणि प्रसंगात बदल करून, "वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

तुम्हां सर्व रसिक वाचकांना आणि लेखन करतांना हुरूप देत आपुलकीचे नाते जपणार्‍या  MisalPav.com, Aisiakshare.com, MaayBoli.com येथील संचालक, सभासद यांना सविनय अर्पण.

ऑनलाईन कम्युनिटी वेबसईट्स वरील (म्हणजेच येथील) मित्र - सुहास साळवे, जयपाल पाटील, प्रसन्न केसकर, विशाल विजय कुलकर्णी, चित्रकार शरद सोवनी (चित्रगुप्त), प्रमोद देव, प्रा. डॉ. दिलीप बिरूटे, चंद्रशेखर अभ्यंकर (तात्या), कैवल्य देशमुख, मदणबाण, प्रसाद ताम्हणकर (परा), सागर भंडारे, राजेश घासकडवी, पराग दिवेकर (आत्मा), राज जैन व इतरांनीही लेखनकामी प्रोत्साहन दिले.
प्रस्तूत पुस्तकलेखनकामी येथील सदस्य किरण भावे यांचा 'किरण फॉन्ट' वापरला आहे.
नव्या स्वरूपातील हे वगनाट्य आपणांस आवडेल याची खात्री आहे.

धन्यवाद.

आपला,
पाषाणभेद उर्फ दगडफोड्या उर्फ सचिन बोरसे!

Cover Page

Last Page

Title Page

Verto Page

ArpanPatrika

Manogat 1

Manogat 2

Loknatyachya nimittane 1

Lokanatyachya nimittane 2

Lokanatyachya nimittane 3

Suchana

Ghoshana

Bhumika

Page1

Page 2

Page 3

Page 21

Page 31

वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही

Thursday, November 17, 2016

मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली

मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली


सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी 
सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी
या मोदी सरकारने, या तुमच्या मोदी सरकारने 
या या मोदी सरकारने 
पाचशे हजाराची नोट बंद केली             ||धॄ||

मार्केटात आता आल्या नव्या नव्या साड्या
घेण्यासाठी आम्हा सार्‍यांच्या पडतात उड्या
लेटेस्ट फॅशन करायची आता पंचाईत झाली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली
या या मोदी सरकारने 
पाचशे हजाराची नोट बंद केली              ||१|| 

भाजी पाला घेण्यासाठी मी गेले मार्कॅटात 
मोठ्या नोटा सोडून सार्‍या सुट्टे पैसे नव्हते हातात
दररोजच्या जेवणाचीही पहा कशी चव गेली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली   ||२||

बँकेमध्ये नोटा बदलायला भली मोठी लाईन
लाखो रूपये भरले तर इन्कमटॅक्स फाईन
एटीएम झाले बंद पर्स माझी रिकामी केली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली   ||३||

हे मात्र छान झाले काळा पैसा बाहेर आला
भ्रष्ट्राचार लाचखोरीचा एक मार्ग बंद झाला
ह्या उपायांनी धनदांडग्यांची दातखीळ बसली
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली
या या मोदी सरकारने 
पाचशे हजाराची नोट बंद केली            ||४||

- पाषाणभेद

Monday, May 9, 2016

आखाजीचा सण

गवराईचा सन आला गवराईचा सन आला
या ग सयांनो पुजू तिला या ग सयांनो पुजू तिला

सयांनो ग सयांनो या या तुम्ही सार्‍या या
झोका झाडाला टांगला त्याला तुम्ही झोका द्या

आता आला आला वारा झोक्याला तो झुलवितो
आखाजीच्या सनाला ग माहेराला सुखवीतो

माहेराच्या आंगणात आंबा पहा मोहरला
पानोपानी त्याच्या आता कैर्‍या लगडल्या

कैरी हाले कैरी डुले वार्‍यासंगे मागेपुढे
हेलकाव्याने कैरी तुटे तुटूनीया खाली पडे
मायबापभावाच्या डोळ्याला ग पानी सुटे

नको माय तू ग रडू तुझ्या ग कैरीपाई
कैरी आता तुझी नाही कैरी आता तुझी नाही

- पाभे

आखाजीना सन

खान्देशी लेकी आखाजीच्या सणाला माहेराला येतात अन काय गीत म्हणतात पहा -

नदीनं पानी वाहे झुळूझुळू वाहे झुळूझुळू
चला त्यानामा आंगूळ करू आंगूळ करू

माहेरवास्नी सार्‍या उनात उनात ( उनात = आल्यात)
झोका टांगेल शे दारात

आंबानं पान हिरवंगार
झोका जावूदे जोरदार

गवराई चला वं मांडूया
पुजा तिन्ही करूया

आखाजीना सन शे
माहेराला बरकत दे

माय वं माय वं तुन्ह्या लेकीस्ले
सासर मधार सुख दे

Thursday, January 1, 2015

जमला मेळा संतसज्जनांचा

जमला मेळा संतसज्जनांचा

जमला मेळा संतसज्जनांचा
पांडुरंगाच्या भक्तांचा ||ध्रू||

हाती घेवूनीया विणा आणि टाळ
भजनात विसरती काळवेळ
हरपली तहानभुक हरपले देहभान
जमला मेळा...||1||

नको भेटी आणिक तिर्थक्षेत्री
आम्हा वैष्णवांची पंढरीच काशी
माऊलीच्या घरी आलो माहेराला
जमला मेळा... ||2||

विठूरायाचे सावळे मुख
पाहूनिया झाले सर्वसुख
ओलांडला पर्वत यातनांचा
जमला मेळा...||3||

- पाषाणभेद

हेल्मेट वापरासंदर्भातील सल्ले


सर्वप्रथम आपले अभिनंदन की आपण हेल्मेट वापरण्याचा निर्णय घेतला. हेल्मेट वापरणे आपल्याच हिताचे असते.
हेल्मेट निवडतांना काही काळजी घेणे आवश्यक आहे. दुचाकी वाहन चालवतांना हेल्मेटसंदर्भात खाली दिलेले मुद्दे कृपया निट वाचा.

१) तूमच्या डोक्याला बसणारे हेल्मेट निवडा. हेल्मेट निवड करतांना डोक्याला एकदम फिट्ट बसणारे नको अन त्यातून तूमचे डोके त्याच्या आत फिरेल इतकेही ढिले नको.

२) हेल्मेटच्या बाह्यस्वरूपावर जरा लक्ष देणे गरजेचे आहे. उगाच मित्राकडे आहे म्हणून तसेच, भाव-शायनिंग मारण्यासाठी घेतलेले, स्वस्त, रस्त्यावरचे नको.

३) हेल्मेटवर रंगीत रेडीयम असते. बर्‍याचदा रेडीयम विनाईल प्रकारातले असते. ते तसे नसावे. विनाईल कालांतराने फिके पडते. रेडीयम असेल तर रात्रीच्या वेळी प्रकाशमान होवून इतर वाहनांना ते दिसू शकते हा फायदा रेडीयममुळे मिळतो. बर्‍याच हेल्मेटवर केवळ रंग लावलेले आकार असतात त्यांचा उपयोग तसा नसतो. केवळ हेल्मेट आकर्षक दिसते व किंमत वाढते. (याच कारणामुळे माझ्या पहिल्या हेल्मेटवर मी Intel inside चा मोठा लोगो रेडीयम मध्ये करून चिकटवला होता.)

४) हेल्मेट कोणत्या प्रकारात घ्यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निवडीचा प्रश्न असतो. शारिरीक गरज, खिशाचा सल्ला, चेहेर्‍याचा, डोक्याचा आकार आदी बरेच मुद्दे त्यात येवू शकतात. हेल्मेट घेणे म्हणजे साडी घेण्यासारखे आहे. http://en.wikipedia.org/wiki/Motorcycle_helmet या लिंकवर याची जास्त माहीती करवून घ्या.

५) आपण ढोबळमानाने 'खुले' व 'बंद' प्रकाराचे हेल्मेट (Open and Closed Type of Helmets) असतात असे मानू. 'खुले' म्हणजे केवळ कवटीचे संरक्षण करणारे व 'बंद' म्हणजे कवटी अधिक जबड्याचे (चेहर्‍याचे) संरक्षण करणारे हेल्मेट होय.
'खुल्या' हेल्मेटच्या प्रकारात तुम्ही खर्च केलेल्या पैशांमधून केवळ कवटीचे संरक्षण होते. त्या पैशात थोडी जास्त भर टाकून 'बंद' प्रकारचे हेल्मेट खरेदी करता येवू शकते. पण काही जणांना 'बंद' प्रकारच्या हेल्मेट मध्ये कोंडल्यासारखे भासू शकते. कानांवर इतर वाहनांचे आवाज कमी येवू शकतात असे भासते. (हे केवळ भासच असतात!)
कोंडल्यासारखे भासणे, कमी आवाज येणे आदी भास हेल्मेटच्या वापराच्या सवयीने परिचयाचे होत जातात. कदाचित यामुळे आपल्या वाहनाचा वेग आपसूक मर्यादेत राहतो हा पण एक फायदाच जाणावा.

आता हेल्मेटच्या बाबतीत काही आधिकारीक सुचना:

माझ्या मते भारतातील प्रत्येक दुचाकी चालकाने 'बंद' प्रकारातलेच हेल्मेट घ्यावे. सुरूवातीला नव्या हेल्मेट तुम्हाला त्रासाचे वाटेल पण एकदाका हेल्मेटची सवय झाली की मग चिंता नाही. आवाज कमी येणे, मानेला त्रास होणे, आजूबाजूचे न दिसणे, जीव घाबरणे आदी तक्रारी या 'बहाणे' या प्रकारात मोडतात. माझा तुम्हाला 'बंद' प्रकारातील हेल्मेट घेणे हाच आग्रह असणार आहे.

६) रस्त्यावरचे हेल्मेट कधीही घेवू नये. रस्त्यावरचे हेल्मेट हे रिसायकल केलेल्या हेल्मेटचे असू शकते. त्याचे प्लास्टीक, फायबर कमी दर्जाचे असू शकते. त्याचे पट्टे रिबीटने निट न-बसवलेले असू शकतात. त्याच्या आतील कापडाचा दर्जा कमी असू शकतो. त्यातील फोम, थर्मोकोल कमी दर्जाचे असू शकते. त्याची काच कमी ग्रेडची, अपारदर्शक असू शकते. तो विक्रेता पळून जावू शकतो. तो विक्रेता बिल देवू शकत नाही. आदी.

७) मिलीटरी कँन्टीनमध्ये स्वस्त मिळते म्हणून तेथले हेल्मेट कधीही घेवू नये. मिलीटरी कँन्टीनमध्ये कमी किंवा ठरावीक कंपन्यांचे, ठरावीक आकाराचेच हेल्मेट मिळू शकतात. त्यात तुमचे डोके 'निराळे' असल्यास हेल्मेट तुमच्या डोक्याला निट न-बसणारे असू शकते.

८) हेल्मेटची निवड करतांना एक महत्वपुर्ण पायरी: हेल्मेटचे पुढील फोम किंवा कड तुमच्या भुवईच्या वरतीपर्यंत येवू द्या असेच हेल्मेट निवडा व त्या पद्धतीतच पुढे वापरत चला. ही एक जास्तीच्या संरक्षणासाठीची तरतूद आहे.
सततच्या वापराने पुढेपुढे हेल्मेटच्या आतील थर्मोकोलचा आकार तुमच्या डोक्यानुसार घडेल.

९) हेल्मेट घातल्यानंतर त्याचे पट्टे काळजीपुर्वक बांधा/ लावा. त्याच्या लॉकचा "टक्क" असा आवाज आल्याची खात्री करा. पट्टे न बांधता घातलेले हेल्मेट हे हेल्मेट डोक्यात घालून न घातल्यासारखे आहे.

१०) कालांतराने हे पट्टे ढिले होतात. ते वेळोवेळी हनूवटीला/ मान-चेहेर्‍याला घट्ट होतील असे करत चला.

११) हेल्मेटची काच जास्त वापरामुळे चरे पडलेली असेल, त्यातील गिअरमधून पडत असेल किंवा ढिली झाली असेल तर बदलवून घ्या.

१२) काळ्या रंगाची काच कधीही लावू नका. डोळ्यांना फारच उन दिसत असेल तर हेल्मेटमध्ये गॉगल वापरा.

१३) एकच हेल्मेट हे आयुष्यभरासाठीचे नाही. दोन-पाच वर्षात, आतील थर्मोकोलचा आकार बदलल्यास ऐपतीप्रमाणे बदलणे गरजेचे आहे.

१४) हेल्मेट न वापरणार्‍यांसाठी: एकदा तुम्ही हेम्लेट मोटरसायकल चालवतांना सतत आठ दिवस वापरा. नवव्या दिवशी हेल्मेट न घालता गाडी चालवणे तुम्हाला आवडणार नाही हे नक्की.

वाचकाचा प्रश्नः >>> समोरुन डोळ्यावर उन्हं येत असतील तर काय उपाय करतात?>>>>>>

कृपया सल्ला क्र. ८ वाचा.
८) हेल्मेट निवडतांनातली एक महत्वपुर्ण पायरी: हेल्मेटचे पुढील फोम किंवा कड तुमच्या भुवईच्या वरतीपर्यंत येवू द्या असेच हेल्मेट निवडा व त्या पद्धतीतच पुढे वापरत चला.

या प्रकारात हेल्मेटच्या कडा सरळ कपाळावर येतात. त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. समोरचे उन जरी येत असेल तर काच वर केल्याने फरक पडतो. तसेही डोळ्यावर येणारे उन हे सकाळचे किंवा संध्याकाळचे कोवळे असते. ते डोळ्यांना खुपत नाही. मला सांगा भारतातील शहरांमधील असे कोणते रस्ते एकदम सरळ पुर्व-पश्चिम असतात? अन कोणता प्रवास इतका पुर्व पश्चिम खुप दुरचा असतो?

सर्वात महत्वाचे हेल्मेट वापरणे सुरूवात करणे. यामुळे आपल्या शरिराला, डोळ्याला हेल्मेट ची सवय होते. आधीच पाण्यात पडून बुडेन की काय ह्याची भीती बाळगली तर पोहोता येणार नाही.

वाचकाची शंका: >>> शिवाय हेल्मेट थेट डोक्यावर घातल्याने टाळूला घासून केस गळतात अशी तक्रार मी ऐकली आहे त्यामुळे डोकं आणि हेल्मेटच्या मध्ये आवरण असू दे..

हेल्मेटमुळे आवाज कमी येणे, मानेला त्रास होणे, आजूबाजूचे न दिसणे, जीव घाबरणे आदी तक्रारी आणि हेल्मेट टाळूला घासून केस गळतात या तक्रारी 'बहाणे' या प्रकारात मोडतात.

हेल्मेटमुळे केस गळतात असा कोणताही निश्कर्ष वैद्यकीय संशोधनात निघालेला नाही. १७ वर्ष हेल्मेटच्या वापराने माझ्या टाळूच काय पण डोक्याच्या कोणत्याही भागाला टक्कल पडलेले नाही. डोक्याचे केस गळणे, टक्कल पडणे, (केस अकाली पांढरे होणे) आदी अनुवंशीक-वैद्यकिय आहे. हेल्मेटच्या वापरामुळे झाला तर फायदाच होतो, तोटा नाही.

१५) हेल्मेट घेतेवेळी सोबत दुचाकीला त्याचे लॉक येते ते बसवून घ्या. यामुळे मोटरसायकल चालवल्यानंतर हेल्मेट कोठे ठेवावे हा प्रश्न उद्भवत नाही व त्यामुळे हेल्मेट बरोबर न नेणे हा 'बहाणा' टाळता येतो. लॉकमुळे हेल्मेटचोरीला थोडाफार आळाही घातला जातो.

१६) हेल्मेट सोबत रीप्लेसेबल कुशनिंगची तसेच फोल्डेबल- हिंजेस असलेल्या हेल्मेटची सुद्धा आवश्यकता नाही. यामुळे हेल्मेटची किंमत वाढते. कोणत्याही मशिनरीमध्ये जेवढ्या जास्त असेंब्ली तेवढ्या जास्त तक्रारी. (सोय व संरक्षण हे वेगवेगळे मुद्दे आहेत.)

१७) मुख्य म्हणजे रस्त्यावरचे नियम पाळा. (रस्त्यावरचे नियम पाळण्यामध्ये हेल्मेट घालून वाहन चालवा हा सल्ला असतोच!!)

हॅप्पी ड्रायव्हींग.