Saturday, August 17, 2013

आहे!?

आहे!?

आहे? आहे? आहे? आहे? साखर आहे?
आहे! आहे! आहे! आहे! साखर आहे!

आहे? आहे? आहे? आहे? गुळ आहे?
आहे! आहे! आहे! आहे! गुळ आहे!

आहे? आहे? आहे? आहे? तेल आहे?
आहे! आहे! आहे! आहे! तेल आहे!

आहे? आहे? आहे? आहे? खोबरे आहे?
आहे! आहे! आहे! आहे! खोबरे आहे!

(नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे? आहे? आहे?)
(नारळ, साबूदाणा, शेंगदाणे, मोहरी, हळद, मीठ..... फिनाईल, घासणी, झाडू इ. आहे! आहे! आहे!)

किती मोजू सांगा? किती घ्यायचे आहे?
साखर ५ किलो, गुळ अर्धा किलो आहे

तेल ३ किलो आहे, तुप पाऊण किलो आहे, मिरची अर्धा किलो आहे
नारळ, साबूदाण, शेंगदाणे, मीठ, मोहरी, हळद मागच्याप्रमाणे आहे

सामान मोजले, चला लवकर ८४३ रुपये काढा, गिर्‍हाईकांची घाई आहे
काय शेठ! इतके पैसे कसे झाले? हा महागाईचा आलेख चढता आहे!

मी काय म्हणतो लिहून ठेवा! आत्ता पैसे नाहीत उधारी आहे!
रामू सगळा माल आत ठेव! माफ करा, उधारी बंद आहे!

- पाभे 

Tuesday, August 13, 2013

शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत

शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी यांची मुलाखत


नमस्कार श्रोतेहो.

आज आपल्या स्टूडीओमध्ये ग्रामीण भागातले शेतसाहित्यीक श्री. भरत कुलकर्णी आलेले आहेत. त्यांच्या कादंबर्‍या, लेख, कथा, निबंध प्रसिद्ध आहेतच तसेच कवितांचे पीक ते जोमाने दर हंगामात घेतात. पंचक्रोशीतील इतर शेतकवी त्यांच्या उत्पादनातून नेहमीच प्रेरणा घेत आलेले आहेत. त्यांच्या शेतसाहित्याविषयी आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत.

मी: नमस्कार भरत कुलकर्णी साहेब.

भरत कुलकर्णी : नमस्कार.

मी: यंदाच्या हंगामाचा "मराठी साहित्य अधिवेशन सेवा संघ परिषदेतर्फे" जाहीर झालेला 'उत्कृष्ट शेतकवी' हा पुरस्कार आपणाला मिळाल्याबद्दल आपले अभिनंदन. मला सांगा हा पुरस्कार मिळाल्यानंतर आपणाला काय वाटले?

भरत कुलकर्णी : हा पुरस्कार देण्यासाठी माझी निवड केल्याबद्दल मी "मसाअसेसपचा" आभारी आहे. मला हे अपेक्षीत नव्हते. ग्रामीण भागातील  शेतकवीला इतका मानाचा पुरस्कार पहिल्यांदाच मिळतो आहे. मला खुप आनंद झाला. या पुरस्काराच्या निमीत्ताने ग्रामीण भागातील शेतकवींमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. शेतकाव्याचे भरघोस उत्पादन यापुढील काळात अपेक्षीत असल्याने शहरकवींनी साहित्याची काळजी करणे सोडून द्यावे असे मला या निमीत्ताने वाटते.

मी: आपण गेल्या वर्षी पाच कवीतासंग्रह प्रकाशीत केले. तीन कथासंग्रह लिहीले. दोन ललीतगद्य निबंध आपले बाजारात आले. ह्या सार्‍या उत्पादनाबद्दल थोडं आमच्या श्रोत्यांना सांगाना.

भकु: अवश्य. सुरूवातीला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करण्याचा अनुभव पाठीशी आहे. त्याचा फार उपयोग झाला. प्राध्यापकीच्या काळात भरपुर वेळ मिळायचा. महाविद्यालयाच्या पुस्तकसंग्रहाचा मला अभिमान आहे. मला हवी ती पुस्तके मिळाली. यामुळे मी साहित्याचा भरपुर अभ्यास केला. जाणीवा प्रगल्भ केल्या. याच काळात पीएचडीचा अभ्यासही मी करत होतो. "आदिवासींचे  मुक्तलोकसाहित्य व त्यातील ग्रामीणता आधुनिकतेकडे कशी झुकते आहे व त्याचे पुढील शतकात होणारे परिणाम" हा माझ्या प्रबंधाचा विषय होता. त्याच वेळी विद्यापिठाच्या वतीने 'महाराष्ट्रातील आदिवासी, गिरीजन यांची साहित्याबद्दल आस्था' यांचा अभ्यास करण्यासाठीच्या समितीत माझा समावेश केला गेला. त्या निमीत्ताने त्या समितीने संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. चंद्रपुर, भंडारदरा, तापीचे खोरे, धुळे, जळगाव, नंदूरबार, सातपुडा पर्वत, अहवा-डांग (गुजरात) झालच तर नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा, हरसूल, कळवण, बागलाण, अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेकडचा पट्टा, दक्षीण कोकणातील संगमेश्वर, कणकवली, ठाणे जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आदी संपुर्ण ठिकाणच्या आदिवासी समाजाचा आम्ही अभ्यास केला. तेथील प्रश्न समजावून घेतले. त्यांच्या जनरीती, उदरनिर्वाह यांचा अभ्यास झाला. तो अनुभव खुपच समृद्ध करून गेला. त्या निमीत्ताने जे जे बघण्यात आले ते ते माझ्या साहित्यपिकात उतरले.

मी: फारच छान. एकुणच तुम्ही केलेल्या कामाची पावती या पुरस्काराने आपणाला मिळाली हे उत्तमच झाले. आता मागच्या वर्षीचा आधीच्या साहित्यउत्पादनाबद्दल अधिक सांगा.

भकु: मागल्या वर्षी जे काही उत्पादन मी घेतले त्याच्या आधीही माझे शेतकवी या प्रकारात उत्पादन मी घेतच होतो. दर पंधरवडी मी दै. लोकजागृतीमंचात ते उत्पादन पाठवायचो. ललीत निबंध हा नगदी माल असतो. तुम्हाला सांगतो, भारतात घडणार्‍या घटना त्यास पुरक ठरतात. त्याच वेळी मी प्राध्यापकपदाचा राजीनामा दिला व पुर्ण वेळ शेतहित्यीक झालो. त्यावेळी मजेचे प्रकाशन या संस्थेने मला शेतसाहित्य या प्रकाराविषयी त्यांच्या दिवाळी अंकात काहीतरी लिहीण्याचा आग्रह केला. माझा लेखसंग्रह तयार होताच. त्यात थोडेफार बदल करून त्यांना तो पाठवला. त्या लेखामुळे माझा उत्साह दुणावला व अधिकाधीक पिक घेण्यास सुरूवात केली.

मी: तुम्ही कोणकोणती साहित्यपिके घेतात?

भकु: शेतकाव्याचा मी पुरस्कर्ता आहे. काव्याची निरनिराळी उत्पादने जसे: समुहगीत, देशभक्तीपरगीत, चित्रपटगीते, विरहकाव्ये, गझला, सुनीते यांचेही मी आंतरपीक घेत असतो. मुक्तछंदकाव्य नेहमीच तयार असते. अर्थात बाकीचेही शेतसाहित्यीक त्याचे उत्पादन घेत असल्याने बाजारात त्याला मागणी कमी असते. भजन, अभंगही हंगामानुसार होते. मागच्या आषाढी एकादशीच्या काळात 'भजनएकसष्ठी ' हा भजनकाव्यसंग्रह देखील बाजारात आला. मजेचे प्रकाशनाचे भटकळांनी त्यासाठी मला अटकळ टाकली होती. कथा, कादंबरी ही पिके तयार होण्यास वेळ लागतो. त्याकडेही लक्ष द्यावे लागते.

'हे कसे करावे?, ते कसे करावे' असे मार्गदर्शन करणारे लेख, लावण्या, चित्रपटगीते ही तशी नगदी पिके आहेत. पण दरदिवशी दोन या प्रमाणात शेतकाव्य किंवा शेतसाहित्य निर्माण करतांना नगदी पिकांकडे थोडे दुर्लक्ष होते हे मान्य करावे लागेल.

मी: शेतकाव्य किंवा शेतसाहित्य ही पिके घेतांनाची प्रक्रिया काय असते?

भकु: शेतकाव्य किंवा शेतसाहित्य तयार करतांना मनाची मशागत चांगली करावी. उन्हाळ्यात प्रखर उन असतांना जातीपातीची ढेकळे संघर्षाचा कुळव वापरून फोडून घ्यावीत. दलितपद्धतीने ढेकळे जास्त चांगली फोडली जातात.
पहिल्या पावसाने शेतपिकासाठी नागरी मनाची जमीन तयार झालेली असतांना सुरूवातीचे दोन आठवड्यात तयार होणारे पावसाळी काव्य हे उत्पादन घ्यावे. आजकाल शहरात या पिकाला फार मागणी आहे. शहरातले काही हौशी लोक आपल्या मित्रमैत्रीणी किंवा कुटूंबासहीत या पिकाचा आस्वाद घेतात. काही जण तर सरळ शेतावरच्या घरात मुक्काम करून त्याचा रस चाखतात. पुणे, मुंबई त्याजवळील मावळ, लोणावळा येथे हे उत्पन्न फार खपते. याप्रकारचे उत्पादन इंटरनेटवरही बरेच केले जाते. इंटरनेटवरील पिकाला स्थळाचे बंधन नसल्याने संकेतस्थळावळ चांगल्या पॅकींगमध्ये ते ठेवले जाते. तेथील ग्राहकही त्याचा आस्वाद घेतात.

हिवाळ्यात पुन्हा मनाची जमीन आनंदाच्या दोन पाळ्या देवून तयार ठेवावी. गादीवाफे करून एखाद्या कादंबरीचे बीज पेरावे. सामाजिक, रहस्यमय किंवा शृंगारीक कंपनीचे बियाणे आजकाल सरकारपुरस्कृत बाजारात मुबलक मिळते. अर्थात त्यात भेसळीचे प्रमाण कितपत आहे ते पाहूनच त्या त्या जातीचे बियाणे घ्यावे. बाजारपेठेत या प्रकारच्या मालाला फार मागणी आहे पण पुरवठा त्यामानाने कमी असल्याने उत्पादनास भाव चांगला मिळतो.

विदेशी त्यातल्या त्यात इंग्रजी (अमेरीका, ब्रिटन) कंपनीच्या सुधारीत वाणांचे संकरीत बियाणे किंवा वाण वापरल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपल्या पिकाला मागणी असते. देशभक्ती या मालाला सध्या मागणी नाही. ते करू नये.
थोडे थोडे पिके घेण्याचे ठिबकसिंचनसाहित्य करण्याचा प्रयत्न करावा. शेतावर मत्सरकिडीचा प्रदुर्भाव झाला असल्यास जाहिरातीच्या पाण्याचा मारा करावा. द्वेषकिडीचा बंदोबस्त करण्यासाठी उलटद्वेष या बुरशीनाशकात साहित्याची बियाणे प्रतिरचना दुप्पट या प्रमाणात बुडवावे मगच पेरणीसाठी वापरावे. अशा प्रकारे साहित्यपिक उत्पादन घ्यावे.

आमच्या कडील काही शेतकाव्यकरी सामुहीक अनुदानीत शेतसाहित्य करून कंटेनर भरून आपला माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवत आहेत.

मी: बरं हे झाले साहित्यनिर्मीतीबाबतीत. आता तयार मलाला बाजारपेठेपर्यंत जाण्यासाठी काय काळजी घ्यावी.

भकु: शेतसाहित्यकर्‍यांनी बाजाराचा नियम पाळला तर त्यांच्या मालाला बाजारात उठाव असेल. अन्यथा व्यापार्‍यांच्या तोंडचा भाव त्यांना घ्यावा लागेल. मागणी कमी असतांनाच साहित्यमाल बाजारात पाठवावा. पुणे-मुंबई येथील काही व्यापारी चांगला भाव देत आहेत. सरकारी हमीभाव शेतसाहित्यासाठी नेहमीच मारक असतो. एखाद दुसर्‍या किंवा प्रतिथयश शेतसाहित्यकर्‍याचाच माल विद्यापिठीय अभ्यासक्रमात जातो. त्यासाठी काय काय करावे लागते तो मुद्दा येथे उपस्थित करत नाही. सरकार तरी कोठे कोठे पाहणार?

शहरातली मध्यमवर्गीयच शेतसाहित्याचे मोठे मागणीदार आहेत. ग्रंथपिक-प्रदर्शनचळवळ हा नविन पायंडा उभा राहत असल्याने तेथे माल विक्रीस ठेवावा. शेतसाहित्यमाल हा आकर्षक पॅकींगमध्ये विकल्यास चांगला भाव मिळतो.

मी: शेतसाहित्य व्यापारात काय काय दुर्गूण आहेत?

भकु: काही शेतसाहित्यकर्ते कमी दर्जाचा माल चांगल्या कंपन्यांना विकतात. कंपन्या जाहिरातबाजी करून तो कनिष्ठ दर्जाचा माल बाजारपेठेत खपवतात. हे शेतसाहित्य खरेदी करणार्‍या ग्राहकांच्या हक्काविरूद्ध आहे. ग्राहकांनीच काळजी करून माल विकत घेतला पाहिजे. अलिकडे 'परकिय शेतसाहित्याचे अनुवाद' ह्या मालाचेही उत्पादन खुप होते आहे. अर्थात जग छोटे होते आहे. हे चांगले की वाईट हे काळच ठरवेल.

मी: "मुंबईपुण्यातच उत्तम शेतसाहित्य निर्माण होते" असा एक प्रवाद आहे. त्याबद्दल आपले काय मत आहे?

भकु: "मुंबईपुण्यातच उत्तम शेतसाहित्य निर्माण होते"हा निव्वळ गैरसमज आहे. मला सांगा मुंबई-पुण्यातले शेकडा किती टक्के शेतसाहित्यीक पणजोबांच्या काळापासून मुळचे तेथले आहेत? मला वाटते तो आकडा एक टक्याच्याही खाली असेल. जे जे मोठे शेतसाहित्यीक आज मुंबईपुण्याचे आहेत असे भासवतात ते मुळचे ग्रामीण भागातलेच होते. केवळ शेतसाहित्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा इतरत्र अर्थार्जन करण्यासाठी ते तेथे गेले व तेथून ते पिके घेतात. मुळचे पाणी उरलेल्या महाराष्ट्राचे आहे.
पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, गोवा-कोकण, सीमावर्ती महाराष्ट्र येथील शेकडो शेतसाहित्य उत्पादक देखील चांगला माल तयार करत आहेत. त्याच मालावर नागरी वस्त्या पोसल्या जात आहेत. एकुणच ग्रामीण भागातच समाधानकारक स्थिती आहे.

मी: भरत कुलकर्णी साहेब, आपल्याबरोबर गप्पा मारण्याचा आनंद काही वेगळाच असतो पण आता वेळेची कमतरता असल्याने आपले विचार अजून ऐकता येणे शक्य नसल्याने या वेळेपुरते आम्ही समाधान मानतो. आपला मौलीक वेळ खर्च करून आपण दिलेल्या मुलाखतीबद्दल आपले आकाशवाणी तसेच आमच्या श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद.

भरत कुलकर्णी: धन्यवाद.
(इतर मराठी संकेतस्थळांवर सदरचे लेखन दुसर्‍या एका नावाने प्रसिद्ध केले आहे.)