Sunday, September 22, 2013

असले कसले जेवण केले

असले कसले जेवण केले

जेवण केले अन हात धुतले
धुतलेले हात टॉवेलला पुसले

घरी येतांना खुप भुक लागली
लगेच आयत्या ताटावरती बसले

आमटीत होते पाणीच पाणी
जळक्या पोळ्यांचेही आकार कसले!

ईईई आळणी भेंडी करपा भात
तसेच खावून उपाशी मी उठले

काय नशिबी आले माझ्या
जेवण हे बेचव असले

कित्ती हौसेने आयटीतला नवरा केला
तेथेच आयटीतली बाई मी फसले

सांगितले कितीदातरी त्याला
नको बनवूस जेवण असले कसले

पुढल्या जन्मी एखाद्या शेफशीच
करायचे लग्न मनी ठसले

एकदाचे जेवण केले अन हात धुतले
धुतलेले हात टॉवेलला पुसले

- डू द लुंगीडान्स, पाभे
------------------------
दिर्घोत्तरी प्रश्न:
१) कवितेतली नायिका आधुनिक काळातली असून तिचे विचारही आधुनिक आहेत हे कोठे कोठे जाणवते?
२) कवितेतील नायिकेचा नवरा कसा असावा असे आपणाला वाटते? त्याच्या स्वभाववैशिष्ठ्याची, गुणांचे वर्णन करा. (शिक्षकांसाठी सुचना: हा प्रश्न कविता शिकवून झाल्यानंतर विद्यार्र्थ्यांशी चर्चेला घ्यावा.)
३) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या पुरूषांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलींसाठी आहे.)
४) आयटीत कामाला असणार्‍या व लग्न झालेल्या स्त्रीयांसाठी आपल्या काय सुचना आहेत? (हा प्रश्न मुलांसाठी आहे.)
---------------------------
एका वाक्यात उत्तरे द्या:
१) आयटीत कोण कोण कामाला आहेत?
२) भेंडीची भाजी कशी बनवावी? (एका वाक्यात उत्तर अपेक्षीत)
३) आयटीशिवाय नोकर्‍या आहेत?
---------------------------
जाहिरात:
आमच्याकडे घरगुती चविचे जेवणाचे डबे मिळतील. मंथली मेंबर्सनी चौकशी करावी.
घरगुती चव असलेले अन्नपदार्थ बनवण्याचे क्लासेस घेतो.
- अन्नपुर्णा मेस, आयटी पार्क (फेज २) जवळ, हिंजेवडी
---------------------------
सरकारी जाहिरात:
अन्नका हर दाना महत्वपुर्ण है|

शोध माझ्यातला

शोध माझ्यातला


मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले
समजण्या मला काय गवसले
अन काय हरवले माझ्यातले
मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले

शुद्ध हवा घेतली का कधी?
निर्मळ पाणी चाखले का कधी?
खळाळता निर्झर कधी का पाहीला?
घाम त्वचेतून कधी का वाहीला?

लहान मुलांवर वा कोणत्या प्राण्यावर?
निर्व्याज प्रेम कधी केले का कुणावर?
मदत का कधी कुठे केली?
न ठेवता आशा परतीची?

घनदाट जंगलातून चाललो कधी अनवाणी?
धावता पडता रडता आले का डोळ्यातून पाणी?
पाहून दु:ख गरीबाचे दाटला का कंठ कधी?
भुकेने कधी जीव तळमळला असे झाले कधी?

एकांती बसता कोणताच विचार नाही मनी
लागली समाधी त्यावेळी जिवंत जागेपणी?
रूप रंग गंध हुंगले कधी श्वासात
असे झाले कधी हरवून गेलो त्यात?

दिला का कधी ठोसा एखाद्या उन्मत्त ठगाला?
मार जरी खाल्ला तरी एकतरी फटका लगावला?
चिड आली का सार्‍या दुनियेची, इतरांच्या वागण्याची?
खरेच का, सबूरीने वागण्याची खोटी रीत जगण्याची?

ज्यांची उत्तरे माहीत नाही पडले प्रश्न सारे
उत्तरांसाठी कसे जावे प्रश्नांना सामोरे
का माहीत आहेत उत्तरे म्हणून प्रश्नच पडू नाही दिले?
मला शोधायचं आहे माणूसपण माझ्यातले

- पाभे