सांगा पतंग कुणी हा पाहिला?
संक्रांतीचे दिवस जसे जवळ येतात तसे पतंग उडवण्याचेही दिवस येतात. काही ठिकाणी नोव्हेंबर महिन्यातच पतंग उडवायला सुरूवात करतात. पतंग उडवण्याचा आनंद अनेक जण लुटतात. या आनंदाच्या वेळी अनेक वेळा अपघात होतात व अनेक जण आपल्या प्राणाला मुकतात. मी पतंगामुळे होणार्या नेहमीच्याच अपघातांबद्दल- जसे वीज वाहक तारेला स्पर्श होणे, उंच इमारतीवरून पडणे आदी.- बोलणार नाही. हे असले अपघात पतंग उडवणार्यांना होतात. पतंग उडवणारे जर काळजी घेवून उडवत नसतील तर होणार्या परिणामांना तेच जबाबदार असतात. हे ठिक आहे. दुरर्या प्रकारच्या अपघातांच्या प्रकारात पतंग उडवून आनंद एक जण घेतो व त्यामुळे होणार्या अपघात दुसर्यांचेही होतात.
असले अपघात माझ्या बाबतीत दोन वेळा घडले आहेत.
एकदा मी व माझा मित्र मोटरसायकलवरून शहराच्या हमरस्त्याने जात होतो. मोटरसायकल माझा मित्र चालवत होता व मी पाठीमागे बसलो होतो. त्याच वेळी एक पतंगाचा मांजा आडवा आला. म्हणजे पतंग कटली होती व त्याचा मांजा अगदी खाली आलेला होता. पतंग व धागा लुटणारी मुले पतंगाच्या मागे होती. त्याच वेळी तो मांजाचा धागा नेमका माझ्या मित्राच्या गळ्याला लागला. हे सगळे अचानक घडले. एकतर संध्याकाळची वेळ व मांजा बारीक असल्याने दिसण्याचा प्रश्नच नव्हता. माझ्या मित्राला काहीतरी घडल्याची जाणीव झाली त्याने चालत्या गाडीवरूनच गळ्याला हात लावला व गाडी गियरमध्ये असल्याने गाडी बंद पडून व तोल जावून आम्ही दोघेही खाली पडलो. तो पर्यंत माझ्या मित्राचा गळा कापला गेलेला होता. त्यातून रक्त बाहेर येत होते. मांजा लुटणारे पसार झालेले होते. पतंग उडवणारा तर कोठे असेल त्याचा अंदाजपण करणे चुकीचे होते. दवाखान्यात गेल्यानंतर जास्त काही न दुखापत झाल्याचे समजले. मित्राने गाडी लगोलग थांबवल्याने गळा कमी प्रमाणातच कापला गेलेला होता.
त्याच्याच दुसर्या वर्षी मी मोटरसायकलवरूनच जात होतो. नेहमीप्रमाणे माझी हेल्मेट डोक्यावर होती. तोच माझ्या अगदी समोरून मला पतंगाचा मांजा दिसला. पतंगांचे दिवस व मागचा अपघात माझ्या लक्षात होता. मी तो मांजा माझ्या उजव्या हाताने आडवायचा प्रयत्न केला. तो मांजा त्यामुळे हातात आला. मागच्या सारखीच गाडी गियरमध्ये बंद पडली. या वेळी मी खाली पडलो नाही, पण पतंग उडवणारा मांजा ओढत असल्याने माझा तळहात कापला गेला व पुर्ण तळहात भरून दोन ठिकाणी कापल्या गेल्याच्या जखमा झाल्या. जखमेत मांजाला लावलेल्या काचा गेल्या होत्या. लगोलग ड्रेसिंग केले. ती चिघळलेली जखम पुर्ण भरायला जवळपास दिड महिना गेला होता. दोन वेळा इंजेक्शनही घ्यावे लागल्याचे आठवते.
त्याच वर्षी असल्याच कटलेल्या पतंगामुळे मोटरसायकलवरचा अपघात सिन्नर (जि. नाशिक) शहरात होवून अगदी लहान मुलीचा बळी त्यात गेलेला होता. एक मामा आपल्या ५/६ वर्षांच्या भाचीला कायनेटीक या स्कुटरवरून जात होता. कायनेटीकच्या पुढील भागात असणार्या फुटरेस्टवर ही लहाननगी उभी होती. रस्त्यात कधीतरी त्या चिमुरडीच्या गळ्याला कटलेल्या पतंगीचा मांजा चाटुन गेला व तिचा गळा कापला गेला. ते तिच्या मामाच्याही लक्षात आले नाही. ते थोडे पुढे गेल्यानंतर त्या मुलीने मान टाकलेली होती. गळा कापला जावून तिचा तेथेच अंत झाला होता.पतंग उडवणारे आपला आनंद घेत होते पण त्यात तिला प्राणांची बाजी लावावी लागली.
रस्त्यात पतंग उडवणारे फारच खालच्या उंचीवरून पतंग उडवत असतात. मांजा हा मोटरसायकलच्या उंचीवरून जातो. त्यानेच वरीलसारखे अपघात होतात त्यांचे परिणाम पतंगाच्या संबंघीत नसणार्या व्यक्तिही भोगतात.
पतंग उडवणारे पतंग उडवतीलच. चेन्नयी सारख्या शहरातले 'पतंग उडवण्याची बंदीचे' कायदे त्यांना लगाम घालू शकत नाही. आपणच आपली काळजी घेतली पाहीजे.
हा लेख ई सकाळ मध्येही आलेला आहे.
No comments:
Post a Comment