Wednesday, March 17, 2010

चालू करा तुमचे इंजन

सिचूयेशन: आप्ल्या पिच्चरचा बागाईतदार नायक निसता उंडारेल हाये. त्यो नुसता इकडतिकड पुढारपन करत फिरत आसतूया. त्येच्यावाली हिरवीन बायकू लय आंग मोडून शेतात कामं करतीया. आप्ला हिरो शेतात फिरकना झालाय. तवा काय व्हत त्ये हिरवीन गानं म्हनूनशान सांगती. ऐका:


लावनीच्या आधी आसतं तसं चालीमधलं गद्य:

{शेत आपलं मोठ भारी, निगरानी त्याची व्ह्याया हवी,
तुमी तर काय कामच करीना, फिरत्यात निसतं पुढार्‍यावानी
पाउस पडला, विहीर बी भरली, हिरव्या रानी हिरवी मखमल आली }

अहोss..सजनाs..

(चाल सुरू)

बघून काय राह्यले नुसतं तुम्ही, पिक जाईल ना वाया
अहो राया,
मग भरा हे इंधन अन चालू करा तुमचे इंजन ||घृ ||


औंदाच्या हो सालाला लावल उसाचं हो बेनं
उभ्या आडव्या वाफ्यातून हातान काढल तण
पर काय अक्रीत घडलं, विजमंडळ हे नडलं
सुरू केलया त्याने भारनियमन ||१||


तेव्हा बघून काय राह्यले राया, पिक जाईल ना वाया
अहो राया,
मग भरा हे इंधन अन चालू करा तुमचे इंजन ||घृ ||


पिक आल हाताशी हो नका त्यात घुसू देवू
जनावर ही माजलीत सारी एकेकाला हाकलून लावू
दांडक्यान रट्टा द्या हो, पहारा करा डोळ्यात टाकून अंजन ||२||


बघून काय राह्यले राया, पिक जाईल ना वाया
अहो राया,
मग भरा हे इंधन अन चालू करा तुमचे इंजन ||घृ ||


आडसाली उस झाला, तोडणी केली, उतारा वाढला
कारखान्यान दिलानं हप्ता, सपनात आल सोनं
गंजलं का इंजन? जरा चालना!
मग चोळा की बेरींगांना वंगन ||३ ||


अहो राया,
बघून काय राह्यले राया, पिक जाईल ना वाया
मग भरा हे इंधन अन चालू करा तुमचे इंजन ||घृ ||

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

No comments: