Wednesday, June 10, 2020

बालकथा: रामूची हुशारी

बालकथा: रामूची हुशारी

एक छोटे गाव होते. त्या गावात रामू नावाचा पोरका मुलगा राहत होता. जवळचे कुणीच नसल्याने तो एकटा राहत होता. बारा तेरा वर्षांचा रामू कोण कुठला कुणालाच माहीत नव्हता. तो सार्‍या गावाचाच मुलगा झाला होता. गावात मिळेल ती कामे तो करायचा. कुणाची गुरे चारून आण, बांधावरचे गवत कापून दे, कुणाचे धान्य पोहचवून दे तर कुणाच्या घरची इतर कामे करून दे असले वरकाम करून तो पोट भरे. गावकरीही त्याच्या एकटेपणाची जाणीव ठेवून होते. त्याचा स्वभावही मनमिळावू आणि पोटात राहून जगण्याचा होता.

असेच एकदा त्याला एका आजीने जळणासाठी लाकडे तोडून आणण्यास सांगितले. तिने एका फडक्यात चटणी भाकरी बांधून दिली अन रामू आपली कुर्‍हाड घेवून जंगलात निघाला. एखादे वठलेले, वाळलेले झाड दिसते का ते पाहत तो  निबीड जंगलात पोहोचला. एका जागी दोन तीन झाडे फांद्या छाटण्याजोगी असलेली होती. एका आठवड्याचा लाकूडफाटा होईल अशा रितीने लाकडे तोडून मोळी बांधू त्यानंतर घरी परतू असा विचार त्याने केला अन तो त्यातील एका झाडावर चढला. तो फांद्यांवर घाव घालणार तोच तेथे एक साधू अवतिर्ण झाला. 

"काय करतो आहेस तू मुला", साधूने रामूला प्रश्न विचारला.

रामूने साधूला नमस्कार केला आणि, "आजीबाईसाठी जळणाचा लाकूडफाटा घेतो आहे" असे उत्तर दिले.

"अरे बाबा, ही येथली झाडे नको तोडू. माझा वावर नेहमीच येथे असतो. तू दुसरीकडे का जात नाही? अन तुझे नाव गाव काय आहे?" साधूबाबांनी रामूला प्रश्न विचारले.

"महाराज, मी रामू, जवळच्याच गावात राहतो. मी काही हिरवीगार झाडे तोडत नसतो. अन हे पहा महाराज, या झाडाच्या बारक्या फांद्याच तोडतो आहे. त्यामुळे झाला तर झाडाच्या वाढीसाठी त्याचा फायदाच होईल."

"रामू, तू आधी झाडावरून खाली उतर कसा. उगाच ही झाडे तोडू नको. तू आपला दुसरीकडे झाडे शोध."

"साधू महाराज, आता एवढ्या वर आलो आहे तर घेतो चार पाच फांद्या अन मग दुसरीकडे जातो."

"नको, नको. तू येथले एक पानही तोडू नको. तू आधी खाली उतर मग मी तुला एक गोष्ट देतो. त्याने तुला कामे करण्यास मदत होईल."

आता साधू बाबा एवढी विनवणी करत आहेत तेव्हा आपण खाली उतरू अन ते काय गोष्ट देतात ते पाहूया असा विचार करून रामू झाडावरून खाली उतरला.

साधूमहाराजांनी रामूला आपल्याकडील एक रुमाल दिला.

"मुला, हा जादूचा रुमाल घे. हा असा हलवला की तुझ्या मनात जे विचार आहे त्यानुसार तुला तो मदत करेल. एखादे तोडण्याजोगे झाड आहे का असा विचार तुझ्या मनात आला अन तू रुमाल हलवला की तो तुला झाडाची दिशा दाखवेल"

"अरे वा! फारच उपयोगी आहे हा रुमाल." 

"अरे, एक सांगायचे राहीलेच बघ. हा रुमाल तू येथून अर्धा फर्लांग गेला की मगच फडकव, बरं का रामू."

"बरं साधूमहाराज", असे म्हणूत रामूने तो रुमाल घेतला. साधूबाबांचे आभार मानून शिदोरी कुर्‍हाडीला बांधली अन तो तेथून निघाला. 

थोडे दुरवर आल्यावर आता आपण तोडण्यासाठीचे झाड शोधूया असा विचार करून त्याने रुमाल हातात घेतला अन उघडून हवेमध्ये फडकावला. रुमालाकडून काहीच हालचाल झाली नाही अन काही नाही. रामूने पुन्हा प्रयत्न केला. नंतर त्याने वेगवेगळ्या प्रकारे रुमाल हलवला. वर फेकला. हाताने गोल गोल फिरवला. हातात उघडून ठेवला. परंतु रुमालाने झाडासाठी कोणतीच दिशा दाखवली नाही. 

नाराज रामू पुन्हा साधू महाराजांकडे जाण्यास निघाला.

थोड्या दुरवरून त्याला साधूमहाराज चपळाईने एक मोठे गाठोडे घेवून त्या झाडाकडून दुसर्‍या झाडाकडे जातांना दिसले. 

"अहो महाराज, हा रुमाल तर काहीच कामाचा नाही. याने तर मला कोणतीच दिशा किंवा झाड दाखवले नाही." घामाघूम झालेल्या साधूला रामूने सांगितले.

"अरे असे कसे होईल. आहेच तो रुमाल जादूचा. दाखव बघू तो इकडे." साधू महाराज उत्तरले.

रामूकडून साधू महाराजांनी रुमाल घेतला अन त्याला ते म्हणाले, "हे बघ रामू, एखादे फांद्या तोडण्याजोगे झाड आसपास आहे का याचा विचार मी आता मनात करतो आहे."

मग तो रुमाल त्यांनी उघडून हवेत फडकावला. रामू ज्या झाडावर आधी चढला होता त्याकडे त्यांचा रुमाल असलेला हात वळला अन ते म्हणाले, "अरे बेटा, हे बघ समोरच झाड आहे. त्याच्या फांद्या तू तोडू शकतोस."

"अहो बाबा, काय चेष्टा करता माझी? अहो, तुम्हीच हात झाडाकडे वळवला अन मी आधी ज्या झाडावर चढलो तेच तर झाड दाखवत आहात तुम्ही. हा रुमाल काही कामाचा नाही. तुम्ही तुमचा रुमाल तुमच्याकडेच ठेवा. मला नको हा असला रुमाल. मी आता इतक्या लांब आलो आहे तर याच झाडाच्या फांद्या तोडतो अन जातो." रामूने शिदोरी खाली ठेवली अन कुर्‍हाड घेत झाडावर चढत तो बोलला. 

साधूमहाराज शांतपणे रामू काय करतो आहे ते पहात बसले. रामू आपला सरसर झाडावर चढला अन शेंड्याकडील फांद्या छाटायला सुरूवात केली. एक मोळी होईल इतपत त्याने फांद्या तोडल्या अन तो खाली उतरायला लागला. झाडावरून उतरतांना त्याला दोन फांद्यांच्या बेचक्यात एक सोन्याची माळ अन एक दोन सोन्याची नाणी दिसली. रामूच्या डोक्यात काहीतरी वेगळे पाहिल्याचा विचार आला. 

'लांबून पाहतांना मला साधूमहाराज धावपळ करत त्यांचे बोचके या झाडाकडूनच घेवून जातांना दिसले होते. एक तर ते मला या झाडावर चढूच नको असे सांगत होते. दुसरे म्हणजे जादूचा रुमाल देतो असे सांगून माझी फसवणूकही केली. तिसरे म्हणजे मला पुन्हा हेच झाड दाखवून फांद्या तोडायलाही मनाई केली नाही. नक्कीच साधूमहाराज खोटे वागत आहेत.'    
       
साधूमहाराजांविषयी रामूला शंका आली परंतु ती व्यक्त केली नाही. आपण काही वावगे पाहीले हे त्याने भासवले नाही. न बोलता त्याने खाली पडलेल्या फांद्यांची मोळी बनवली अन साधूबाबांचा निरोप घेवून तेथून तो गावात परतला. 

साधूविषयी कुणाला सांगावे की नको या द्विधा मनस्थितीत त्याने दुपार काढली. जेवतांना शिदोरीतली भाकरीदेखील गोड लागली नाही. संध्याकाळ झाली अन तो पुन्हा एकदा त्या झाडाजवळ जाण्यास तो निघाला. पूर्ण खात्री झाली की मगच साधूविषयी इतरांना सांगावे असा विचार त्याने केला. अंधारात तो त्या जागेपासून दुर एका उंचवट्यावर लपून बसला. तेथून त्याला ते झाड अन आजूबाजूची जागा चांगली दिसत होती. 

रात्र जशी चढली तसे चांदण्याच्या प्रकाशात त्या जागी त्याला मशालींच्या उजेडात चार व्यक्ती येतांना दिसल्या. त्या चारही व्यक्तींनी डोईवरच्या फेट्याच्या सोग्याने तोंड झाकलेले होते. सकाळचा साधूही त्यात होताच. आल्यानंतर त्यातील एकाने समोरील झाडावर लपवलेल्या तलवारी काढल्या आणि आपसात वाटल्या. मशालींच्या उजेडात तळपत्या तलवारी चकाकत होत्या. नक्कीच चोरी-दरोड्याच्या उद्देशाने ते एकत्र आले होते. 

'अरे बापरे! सकाळचा साधू म्हणजे अट्टल दरोडेखोर आहे तर! मला आता सावधगिरी बाळगली पाहीजे. या दरोडेखोरांना अद्दल घडवलीच पाहीजे. मला झाड तोडू नको असे सांगतो अन स्वत: त्याच झाडावर चोरीचा माल अन शस्त्रे लपवतो काय! थांबा! तुम्हाला तुमच्या चोरीची शिक्षा कशी मिळेल तेच बघतो.'

रामूने गावातल्या राजाच्या अंमलदाराला ही हकीकत सांगण्याचा विचार केला. सावकाश, लपतछपत रामू कसलीही घाई न करता गावात परतला. दिवसभराचे श्रम, मनातले विचार अन दोन वेळा जंगलात जाण्यामुळे खरे तर रामू दमला होता. रात्रीच्या जेवणाचाही विचार न करता रामू गावातल्या अंमलदाराच्या घरी तडक पोहोचला. अंमलदार जेवण करून आराम करत होते. रामूने त्यांना भेटून सकाळपासून आतापर्यंत जे जे घडले ते ते कथन केले. एका मुलावर विश्वास कसा ठेवायचा असा अंमलदारांच्या मनात विचार आला परंतु गेल्या महिन्यापासून दर दोन एक दिवसात आसपास चोरीची घटना घडल्याची वर्दी त्यांच्यापर्यंत येतच होती. रामूच्या माहितीची झाली तर त्यांना मदतच होणार होती.
 
अंमलदारांनी तातडीने हालचाल केली आणि आपल्या शिपायाला हवालदार तसेच सात आठ सैनीकांना बोलावणे धाडले. दरम्यान त्यांनी रामूच्या प्रकृतीची अन जेवणाची चौकशी केली. रामूने जेवण न केल्याचे समजताच त्यांनी त्याला घरात जेवायला बसवले. 

हवालदार, सैनीक आल्यानंतर स्वत: अंमलदार आणि रामू अशी फौज जंगलाच्या दिशेने त्वरीत निघाली. रामूने ज्या ठिकाणापासून साधूची वर्दळ पाहिली तेथपर्यंत ते आले. अजूनही मशालींचा उजेड तेथे होताच. म्हणजेच ते चारही दरोडेखोर तेथे होते. हवालदारांच्या इशार्‍यानिशी दबक्या पावलांनी सैनीकांनी तेथील झाडांभोवती वेढा टाकला. दरोडेखोरांनी त्यांना पाहून पळण्याचा प्रयत्न केला परंतु सैनीकांनी चपळाई करून चारही जणांना पकडले. झाडावर लपवलेले दागीन्यांचे गाठोडे सैनीकांनी हस्तगत केले व चारही जणांना बांधून गावात आणले.

रामूच्या हुशारीने अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला पकडण्यात अंमलदारांना यश मिळाले होते. रामूचे वय, हुशारी अन त्याच्या एकटेपणाची परिस्थिती पाहून अंमलदारांनी रामूच्या शिक्षणाची सोय राजाकडे केली अन मोठा झाल्यानंतर राजदरबारात नोकरी लावून देण्याचे त्याला आश्वासन दिले. 

No comments: