Wednesday, October 26, 2011

युगलगीतः आज पाहणार आहे
(सदर युगलगीत एकाच व्यक्तीने गायले आहे अशीही कल्पना करता येवू शकते.)

तो: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही
ती: आज पाहणार आहे, उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे, उद्या राहणार नाही ||धृ||

तो: दोन दिवसांची भेट आपली; ह्रदयात खोलवर रूतून राहीली
ती: वरवर भासे शांत सागर; आतील त्सुनामी दिसणार नाही ||१||

ती: आनंदाचे गवत पसरले; दु:खाचे डोंगर झाकले
तो: खडकातला विटला पाझर; पाणी आता वाहणार नाही ||२||

तो: आलो, भेटलो, बोल बोललो; रमलो, हसलो, कधीतरी रडलो
ती: मोरपीसी शब्द गोडवे; कंठातून कधी पुटणार नाही ||३||

ती: हेच असे का जीवन जगणे?; शांत, शीतल, उष्णाव्याने धगणे!
तो: आठवणी कुपीतल्या कुलूपबंद; यापुढे कधी उघडणार नाही ||४||

ती: कितीक जन्मे जगली असली; कितीक मरणां मरून जन्मली
तो: नकोच आता जन्ममरण ते; चक्राकार ती गती शमावी ||५||

ती: आज पाहणार आहे उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे उद्या राहणार नाही
तो: आज पाहणार आहे उद्या पाहणार नाही; आज राहणार आहे उद्या राहणार नाही ||धृ||

- पाषाणभेद
२४/०९/२०११

No comments: