Sunday, March 1, 2020

२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...

२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...

मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे ज्या व्यक्ती महाराष्ट्रात दिर्घकाळ राहत आहेत त्यांना देखील मराठी भाषा येणे अपेक्षीत आहे. इतर राज्यांत किंवा इतर देशांत तेथील स्थानिक भाषेलाच जास्त महत्व असते. सामान्य व्यवहार भले मग ते टॅक्सीचालक, मॉलमधील विक्रेते किंवा इतर सेवा देणारे असोत किंवा अगदी कार्पोरेट असोत, एकमेकांशी बोलणे हे स्थानिक भाषेतच होते. स्थानिक भाषा आपसूक बोलण्यातून येते. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न तेथील लोकांना करावे लागत नाहीत. अगदी पर्यटक जरी परदेशातून आलेले असले तरी त्यांचे स्वागत आणि इतर आदरातिथ्य स्थानिक भाषेत केले जाते. जेथे जरूर असते तेथे भाषा अनुवादक उपस्थित असतो.

आपल्या मराठी प्रांतात असे होते का याचा विचार प्रत्येक मराठी भाषीकाने मराठी दिनानिमित्त करायला हवा.  मी येथे "मराठी प्रांत"  हा शब्द वापरला आहे तो अशासाठी की मराठी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादीत राहू नये. मराठीसाठी महाराष्ट्र हा केवळ एक पेटीसारखा साचेबद्ध आकार नाही. त्याच्या बाहेरही मराठी गेली पाहिजे. तिचा विकास झाला पाहिजे.

लिखाणाच्या बाबतीतही मराठीचा संकोच होतो आहे असे लक्षात येते. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला तर भरपूर पुस्तके छापलेली दिसत आहेत. नव-नविन प्रकाशने पुस्तके छापत आहेत. वर्तमानपत्रे लाखो वाचक असल्याचा निर्वाळा देत आहेत आणि तुम्ही असे उलट का म्हणत आहात असाही प्रश्न विचाराल. एक लक्षात घ्या, की सर्वच ठिकाणी (म्हणजे सर्व भागात) लोकसंख्या वाढत आहे. त्या लोकसंख्येच्या प्रमाणात तुम्हाला पुस्तकांचा, वाचकांचा खप वाढलेला दिसेल, पण हेच प्रमाण शेकडा किती टक्के असावे त्याचाही विचार करायला हरकत नाही. यात वाचकांचा आकडा सोडला तर मराठीत लिहीणार्‍यांची संख्या अतिशय रोडावलेली दिसेल. मला सांगा किंवा तुमच्या मनालाच सांगा की तुम्ही शेवटचे मराठीतले पत्र म्हणा, मराठीतली चिठ्ठी म्हणा किंवा नातेवाईकांना आताच्या जमानातले मराठीतले ईमेल कधी पाठवले? मला वाटते ते तुम्हाला आठवणारच नाही. गेल्या सहा महिन्यांत किती जणांनी वेबसाईटवर लिखाण केले? किंवा ब्लॉग लिहीला? किती जणांनी मराठीत आपले विचार शब्दबद्ध केलेत? किती जाणांनी कवितेचे पुस्तक विकत किंवा ग्रंथालयातून आणून मनापासून त्याचा आस्वाद घेतला? मला वाटते शेकडा प्रमाण चिंताजन असेल.

थोडक्यात मराठी वाचकांची आणि मराठी भाषेत लिहीणार्‍यांच्या आकड्यांबाबत अचूक संशोधन झाले पाहिजे. केवळ व्हाटसअ‍ॅप किंवा फेसबूकवर एक दोन प्रतिक्रीया लिहील्या किंवा मराठीतील दिवसाच्या शुभेच्छा असलेले निरोप दुसर्‍यांना पाठवले म्हणजे माझी मराठीप्रती असलेली जबाबदारी पूर्ण झाली असे नाही. मराठी बोलण्यासाठी, मराठी लिहीण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले पाहिजे. आणि ते प्रयत्न मनापासून झाले पाहिजे. केवळ आज मराठी दिन आहे, आज एक मे, महाराष्ट्र दिन आहे म्हणून मराठी एका दिवसापुरती मर्यादित ठेवू नये.

आणखी एक विचार मनात आला. मराठीतले लिखाण हे शुद्धलेखनानुसारच व्हायला पाहिजे हा दंडक म्हणा किंवा भिती आपल्याला शालेय वयापासून घातली गेली आहे. पहिला उकार, दुसरा उकार, पहिली मात्रा दुसरी मात्रा यातच आपण अडकून पडलो आहोत. याबाबतीत श्री.शुभानन गांगल यांनी भरपुर संशोधन केले आहे. त्यांच्या मते मराठी भाषा संस्कृतोद्भव नाही. तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि मराठी शुद्धलेखनाचे व्याकरण हे इंग्रजांनी त्यांच्या सोईने मराठी भाषीकांवर लादलेले आहे. त्यामुळे दुसरी वेलांटी, दुसरा उकार वापरणे योग्य आहे. मराठी भाषेच्या लिखाणासाठी, शुद्धलेखनाचा न्युनगंड मनातून काढून टाकण्यासाठी शिक्षणाच्या सुरूवातीच्या का होईना काळात या लिखाणाचा प्रयोग करायला हरकत नाही.

तर या लेखाच्या शिर्षकानुसार केवळ "२७ फेब्रुवरी, मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने...मी मराठी लिहीण्याचा प्रयत्न करेन" असे न होता "दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे", या समर्थांच्या ओवीनुसात मराठीच्या वृद्धीसाठी दररोज काहीतरी लिहायला आणि वाचायला हवे.

- पूर्वप्रकाशित

No comments: