Monday, May 23, 2011

लग्नगीतः पतीची ग वाट पाही, मंडपी सजली नवरी

लग्नगीतः पतीची ग वाट पाही, मंडपी सजली नवरी

पतीची ग वाट पाही, मंडपी सजली नवरी
येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||धृ||

हिरवा शालू तूला सासू आणील ग
शालूत तू खुलून दिसशील ग
शालूसंगे आणायला सांग पैठणी भरजरी
कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||१||

पाटल्या बांगड्या तूला सासरा आणील ग
गळा कोल्हापुरी साज तुला करील ग
वाकेसरी आणायला सांग साजा बरोबरी
कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||२||

अनवट, मासोळ्या तूला दिर आणील ग
पायी घालून तू चालशील ग
गेंद, जोडवी आणायला सांग त्याच्या बरोबरी
कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||३||

तोळबंद, वाकी तूला नणंद आणील ग
हाती घालून तू काम करशील ग
गोठ, बिल्वर आणायला सांग त्याच्या बरोबरी
कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||४||

डूल, कर्णफुले तूला देराणी आणील ग
कानी घालून तू मिरवशील ग
लफ्फा, कुडी आणायला सांग त्याच्या बरोबरी
कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||५||

नको सखे मला शालू अन नको मला पाटल्या ग
नको मला जोडवी वाकी अन मासोळ्या ग
मी माझ्या 'यांची' वाट पाहे खरी
कोरस: येईल ग राजकुमार, घेवून जाईल घोड्यावरी ||६||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
११/१०/२०१०

No comments: