Thursday, December 30, 2021

खंडेरायानं करणी केली

यळकोट यळकोट जय मल्हार

बाणाईच्या प्रेमाला भुलूनी देव अवतरले चंदनपुरी
राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥धृ॥

व्हती मेंढरं खंडीभर 
चराया नेली डोंगरावर
हिरवा पाला रानोमाळं
भवती गार गार वारं
आलं भरूनी आभाळं 
काळ्या ढगांच झालं भार
पळात आलं धरणीवर
चकमक दावली विजेनं
कल्लोळ उठला त्या ठाणं
चमत्कार दावला देवानं
वर रोखूनी धरलं त्यानं
बाणाईच्या मेंढरासाठी खंडेरायानं करणी केली
राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥१॥

एका दिशीची कहाणी
तहान लागली मेंढरास्नी
नेली देवानं गिरणेवरी
प्यायला लागली पाणी
नदीला आला पूर भरपूर
जिकडे तिकडे हाहाकार
केला छातीचा बंधार
पाणी अडवती मल्हार
बाणाईच्या मेंढरासाठी खंडेरायानं करणी केली
राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥२॥

वाड्यावरी बाणाई
सज्यामधी वाट पाही
कधी येणारं मेंढपाळ
गेला मेंढरं घेवून सकाळ
भरीत कांदा भाकर लसूण
दिली होती देवाला बांधून 
कधी पोटाला खाईल
नाही माहीत कोणती वेळ
बाणाईची जेवायाची काळजी
मनात जाणी मार्तंड मल्हारी
हाती घेवून कांदा भाकर
देव उधळी बेल भंडार
नैव्येद्य पडला वाड्यावर
बाणाईनं जाणलं सारं
मेंढपाळ आहे मल्हार
पाषाण त्याचा नोकर
संगती राही सेवेला सदा तप्तर
बाणाईच्या मेंढरासाठी खंडेरायानं करणी केली
राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥३॥

बाणाईच्या प्रेमाला भुलूनी देव अवतरले चंदनपुरी
राखूनी मेंढरं वाड्यावरी देव करीतो अशी चाकरी ॥धृ॥

सदानंदाचा यळकोट!
खंडेराव महाराजांचा विजय असो!!

- पाषाणभेद
३०/१२/२०२१

No comments: