Tuesday, June 15, 2010

बजरंगाचा भक्त पैलवान

बजरंगाचा भक्त पैलवान


हि कविता आपला सगळ्यांचा लाडका टारझन यास अर्पण


मी आहे बजरंगाचा भक्त, त्याचा डोक्यावर वरदहस्त
मेहनत करतो कसूनी, मैदानी कुस्ती करतो फक्त ||धृ||

शाळेत होतो द्वाड, घरी करायचे नाही लाड
चिंचा बोरे आवळे पाडूनी खायी नाही कसली त्याला तोड
लहाणपणी म्हणती सगळे तू अभ्यासात सुस्त
आता मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||१||

दंड बैठका तालीम करतो, जोर मारूनी घाम गाळतो
शड्डू जोरात ठोकतो, गडी समोरचा घाबरतो
दुध, बदाम, खारीक यांचा खुराक करतो मस्त
म्हणून मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||२||

कुस्ती खेळ आहे भारी, धोबीपछाड डावपेच करी
समोरच्याची ओढावी तंगडी, चढावे त्याच्या छाताडावरी
जिरवावी खोडी असेल जर समोरचा पैलवान मत्त
म्हणून मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||३||

पंचक्रोशीत नाव गाजे, जेव्हा कुस्तीत पानी पाजे
पदके अन गदा घेवूनी मी नाचे, संगे ढोल अन ताशे वाजे
सांगतो अंगमेहनत करा अन रहा कायमचे तंदूरूस्त
त्यासाठी मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||४||

मी आहे बजरंगाचा भक्त त्याचा डोक्यावर वरदहस्त
मेहनत करतो कसूनी मैदानी कुस्ती करतो फक्त ||धृ||


- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/५/२०१०

No comments: