श्रावणमास कहाणी: वर्षभर प्रसिद्ध नारायणाची कहाणी
आटपाट संकेतस्थळ होतं. आंतरजालावरती त्याचं नाव होतं. तेथे येणारा प्रत्येक सदस्य त्याचप्रमाणे सहज म्हणून येणारा पाहूणा तेथे देहभान विसरत होता. तेथील सुविधांना भुलत होता. देशोदेशातील व्यक्तींना तेथे मुक्त प्रवेश होता. म्हणूनच तेथे अनेक व्यक्तीस्वभावांचे प्रदर्शन भरले होते. असल्याच अनेक व्यक्तींपैकी राजा रवी हा एक तेथील सदस्य होता. तो मोठा पराक्रमी, मानी होता. त्याचा स्वभाव दिलदार होता. पण तो तत्वाला जागणारा होता. आपल्या तत्वाच्या बाहेर काही करण्यास त्याचा नकार असे. साहित्याच्या अनेक प्रांतात त्याचा दबदबा होता. कथा, कविता, कादंबरी, लेख, कलाकुसर आदींमध्ये त्याचा हातखंडा होता. कथा कविता तर तो लिलया रचत असे. कवितांच्या अनेक प्रकारांत सशक्त रचना केल्या होत्या.
राजा रवीची भार्या - राणी रूपमती देखील त्याच संकेतस्थळाची एक सदस्या होती. ती स्वःता रूपगर्वीता तर होतीच पण प्रेमगीते, सौंदर्यशास्त्र त्याचप्रमाणे पाककृतींचे लेख लिहीण्यात तीचा हात धरणारा कुणीही नव्हते. विविध पाककृती बनवणे व त्याचे छायाचित्रासकट वर्णन प्रकाशीत करण्यात ती निपूण होती.
संकेतस्थळांच्या अलिखीत नियमानुसार राजा रवी व त्याची भार्या रुपमती या दोहोंनी अनुक्रमे "राजा भिकारी" व "गणीका" ही खोटी नावे धारण केली होती. दोघेही विवाहकरण्याच्या आधीपासून त्या संकेतस्थळावर येत असल्याने अर्थातच त्यांना संकेतस्थळावरील आपल्या खोट्या नावाची कल्पना नव्हती. असली विचित्र नावे आपण का धारणे केली असे काही प्रश्न अनेक सदस्यांनी त्यांस पुसले असता दोहोंचे उत्तर योगायोगाने, "आमची मर्जी" असेच उमटे.
राजा रवी आणि राणी रुपमती हे दोघे "राजा भिकारी" व "गणीका" या नावांनिशी आपआपल्या साहित्यकृती संकेतस्थळावर प्रकाशीत करीत. एकमेकांच्या परंतु हे करतांना आपण एकमेकांचे पतिपत्नी आहोत याचा त्यांना जराही संशय आला नव्हता. दोघेही एकमेकांना संस्थळावर असतांना अजाणतेपणी इतर सदस्य आहोत असेच समजत.
संकेतस्थळावर इतरांच्या प्रकाशीत झालेल्या व आवडणार्या साहित्यकृतींना राजा रवी मनापासून दाद देत असे. त्याच्याही कलाकृतींना इतर सदस्यांकडून प्रतिसाद मिळत असे. भराभर तो लोकप्रिय झाला. थोड्याच कालावधीत "राजा भिकारी" हे नाव संकेतस्थळाच्या प्रत्येक सभासदाच्या लेखी येवू लागले. त्याच्या तत्वाला जागून मात्र एखादी साहित्यकृती न आवडल्यास तो सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त करीत असे.
एकाएकी त्याच्या वैभवाला तडा गेला. तो संकेतस्थळावर सर्वात अप्रिय सदस्य ओळखू जावू लागला. त्याचा स्वभाव तत्वाला चिकटून असण्याचा असल्याने संकेतस्थळावर तो फारसे मित्र जमा करू शकला नव्हता. संकेतस्थळावर तत्वाबाहेरच्या प्रकाशीत झालेल्या लेखाला तो कधीही प्रतिसाद देत नसे. त्याचमुळे संकेतस्थळावर तो दुर्लक्षीत झाल्यासारखा होता. इतर कस नसणार्या साहित्याला शंभराच्या वर मिळणारे प्रतिसाद पाहून त्याचे अंत:करण विदीर्ण होत असे. काही काही व्यक्तींच्या किंमत नसलेल्या प्रतिसादालाही त्याच व्यक्तीच्या मित्रांनी दिलेला प्रतिसाद, तसेच न आवडणार्या साहित्यालाही मिळणारा उठाव पाहून त्याचे मन खंतावून जात असे. इतर सर्व मित्र सदस्यांनी कोंडाळे करून 'राजा भिकारी' या सदस्यनामाला वाळीत टाकले.
अगदी त्याच वेळी 'गणीका' हे नाव सर्व सदस्यांच्या तोंडी झाले. गणीकेच्या लेखाला पैशाला पासरी असल्या मापात प्रतिसाद मिळू लागले. गणीकेची लोकप्रियता पाहून व आपल्या नावाचे पुर्वीचे वैभव लयाला गेलेले पाहून प्रत्यक्षातला राजा रवी दु:खी राहू लागला. इतर सर्व सदस्यांनी केलेले कोंडाळे कसे फोडावे असा प्रश्न त्याच्या मनी दिवसारात्री येवू लागला. दिवसेंदिवस तोच तोच विचार करून राजा रवीची प्रकृती खंगू लागली. प्रत्यक्ष घरातही त्याची वागणूक बदलली. राणी रूपमतीस तो दुरूत्तरे देवून बोलू लागला. घरात आदळआपट करू लागला.
प्रत्यक्षात असणार्या राणी रुपमतीनेही पती राजा रवीस त्याच्या वागणूकीबद्दल, प्रकृतीबद्दल खोदून खोदून विचारले तरीही त्याने आपले मन तिजपाशी मोकळे केले नाही.
एके दिवशी सदनातील एका खोलीत राजा रवीने हातसंगणक घेवून संस्थळावर प्रवेश केला. त्याच सुमारास दुसर्या खोलीत राणी रुपमतीदेखील मेजसंगणकाद्वारे संस्थळावर प्रवेशकर्ती झाली होती. दोघेही एकमेकांना संकेतस्थळाच्या माध्यमातून न्हाहाळीतून न्हाहळत होते. त्याच वेळी राजा भिकारीस गणीकेच्या प्रसिद्धीबाबतचा विचार मनात आला. त्याने तडक गणीकेस विचारले 'हे गणीके तुला संकेतस्थळावर मिळणार्या उदंड प्रसिद्धीचे काय रहस्य आहे? असे कोणते कारण आहे की ज्या योगे तूला एवढी मोठी प्रसिद्धी मिळते? तुझ्या लेखाला एवढे भरभरून प्रतिसाद कसे मिळतात? प्रसिद्धीस्तव तू जे काही करते त्याबाबत तू मला सांगीतले तर मी धन्य होईन.'
गणीकेने राजा भिकारीची मनस्थीती ओळखली. लेखनाच्या माध्यमात ती त्यास चांगल्याप्रकारे ओळखत होती. ती म्हणाली, 'हे राजन, मी जरी गणीका नाम धारण केले असले तरी मी फार मानाची स्री आहे. मी एक "वर्षभर प्रसिद्ध नारायणाचे" व्रत करते. त्या योगे मी संकेतस्थळावर एक प्रसिद्ध गणीका म्हणून नावारूपाला आले आहे.'
राजा भिकारीसही त्या व्रताची माहीती घेवूशी वाटली. तो पुसता झाला, 'हे गणीके, हे "वर्षभर प्रसिद्ध नारायणाचे" व्रत काय आहे? ते कसे करतात? ते केल्याने काय फल मिळते? या सर्वाची माहीती तू मजप्रत कथीत करावी.'
गणीका उत्तरती झाली की, 'हे राजा भिकारी, हे व्रत फार कठीण आहे. या व्रतात आपली तत्वे बाजूस ठेवून अतीसामान्य मानवयोनीच्या मानवाप्रमाणे वागावे लागते. यात आपल्या तत्वांना मुरड बसल्याने आपण कदाचित दु:खी कष्टी होवू शकतो. '
राजा भिकारी पुर्वीचे वैभव प्राप्त करण्यास उताविळ झाला असल्याने त्याने सांगितले की, 'गणीके, तू सांगशील त्या प्रमाणे मी हे "वर्षभर प्रसिद्ध नारायणाचे" व्रत करण्यास तयार आहे. तस्मात तू ह्या व्रताची माहीती द्यावी.'
गणीकेने राजा रवीची "वर्षभर प्रसिद्ध नारायण" व्रताची माहीती घेण्याची व्याकूळता जाणीली. तिने त्यास सांगितले की, 'ह्या व्रताची सुरूवात श्रावण महिन्याच्या आधी येणार्या दिप आवसेच्या दिवसापासून करावी. या आवसेस काही जण गटारी आमावस्या असेही संबोधतात. या दिवशी प्रात:काळापासून आपले संस्थळावरील मित्र गोळा करावे. त्यास निरोप धाडावे. सर्व मित्र गोळा झाले की त्यांचे कोंडाळे तयार करावे. आपल्या या कोंडाळ्याने मग सुरूवातीस उलीशीक मदिरा घ्यावी. तिचे सामुदायिक मदिरापान करावे. त्या सामुदायिक मदिरापानाचे प्रकाशचित्रासहीत वर्णन संकेतस्थळावर प्रकाशित करावे. त्यानंतर येणार्या श्रावण मासात पाउस थोडा कमी होत असल्याने वातावरण तयार झालेले असते. त्याच समयाला एखाद्या पावसाळी जागी सर्व कोंडाळ्याने जमावे. तेथे जास्त मदिरापानाची व्यवस्था करावी. एकमेकांची खिल्ली उडवून मौज करावी. त्याचेही वर्णन साग्रसंगीत प्रकाशित करावे. हे सर्व करतांना इतर सदस्यांच्या बिनमौलीक लेखालाही भरभरून प्रतिसाद द्यावा. दोन प्रतिसाद आपण द्यावे, चार प्रतिसाद इतरांचे घ्यावे. एकाच ओळीचा धागा असेल तरीही त्यास शंभरी प्रतिसाद देण्यासाठी अडेलतट्टू प्रतिसाद द्यावा. वेगवेगळे सदस्यनाम धारण करून आपल्याच धाग्यास विरोधी सुर लावुन प्रतिसाद द्यावा जेणेकरून धाग्यावर खळबळ माजेल. सुरूवातीस उलीशीक असलेली मदिरेचे प्रमाण आता जास्त करावे. मित्र परिवार जमवून कोंडाळे करावे. नविन साहित्य लिहील्यास त्याचा खाजगी निरोप प्रत्येक सदस्याला पाठवून प्रतिसाद देण्यास सांगावे. त्यायोगे तुझ्या साहित्यकृतीस उठाव मिळेल. पुढील वर्षी येणार्या दिप आवसेच्या दिवशी या "वर्षभर प्रसिद्ध नारायण" व्रताची सांगता मदिरेचे आचमने करून करावी.'
गणीकेचे हे सर्व कथन ऐकून राजा भिकारी भारीत झाला. लगोलग येणार्या श्रावणमासाच्या आधीच्या आवसेस त्याने संकेतस्थळ सदस्यांचे कोंडाळे करण्याची पुर्वतयारी केली. मदिरापानाबरोबरच त्याने समिष खाण्याचीही व्यवस्था केली. सर्व सदस्यांनी चांगलाच आनंद मिळविला. त्या आनंदामुळे राजा भिकारी हे सदस्यनाम ज्याच्या त्याच्या तोंडी झाले. त्याच्या भरताड, सुमार लेखांनाही भरभरून पन्नासी - शंभरी प्रतिसाद मिळू लागले. नंतर श्रावणमासात पावसाचा आनंद मिळविण्यासाठी सर्व सदस्यांना राजा भिकारीने लोणागोळा येथे सहलीचे आयोजन केले. असे आचरण राजा भिकारीने वर्षभर केले.
राजा रवीने मनापासून "वर्षभर प्रसिद्ध नारायण" व्रत केल्याने त्यास प्रसिद्ध नारायण प्रसन्न झाला. राजा भिकारी म्हणजेच प्रत्यक्षात असणार्या राजा रवीही प्रत्यक्षात आनंदी राहू लागला. पुर्वीच्याच प्रसिद्धीचे वैभव आता त्यास पुन:प्राप्त झाले होते. घरातील वागणूक व राजा रवीची प्रकृतीही सुधारली होती. हा सर्व बदल पाहून राणी रुपमतीही आनंदी झाली होती. राजा भिकारी नामक असणारा सदस्य म्हणजेच आपला पति राजा रवीच आहे याची तिला खात्री झाली होती. पण खरी गोम तिने राजा रवीला सांगितली नव्हती.
असे करता करता वर्ष सरत आले. राजा भिकारीच्या "वर्षभर प्रसिद्ध नारायणाच्या" व्रताच्या उद्यापनाची वेळ आली. त्यावेळेच्या उद्यापनाच्या अंतिम कोंडाळा मेळाव्याच्या लोणागोळा येथील आयोजनासाठी राजा भिकारीने संकेतस्थळाच्या सर्व सदस्यांना आमंत्रीत केले. त्यात गणीकेसही आवर्जून येण्याची विनंती केली.
प्रत्यक्षात राजा रवीने राणी रुपमतीसही लोणागोळा येथे येण्यास विनवीले. त्याच मेळाव्यात गणीकेने आपणच राजा भिकारीची पत्नी असल्याचे जाहिर केले. आता खोटे नाम धारण करण्यात काही हशील नाही असा विचार करून राणी रुपमतीने आपले संकेतस्थळावरील 'गणीका' हे सदस्यनाम व राजा रवीने 'राजा भिकारी' हे सदस्यनाम खोडून टाकले व आपापली खरी नावे धारण केली व ते सुखी झाले.
प्रसिद्ध नारायण जसा राजा भिकारीस पावला तसा तुम्हा आम्हा सर्वांना पावो हि प्रार्थना. हि साठाउत्तराची कहाणी पाचाउत्तरी सुफळ संपुर्ण.
शुभं भवतू:
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२४/०७/२०११