Wednesday, November 23, 2011

कला बघा कलाकारांची*

कला बघा कलाकारांची*

Dombari (c) Pashanbhed
छायाचित्रः पाषाणभेद

मायबाप हो तुम्ही कला बघा कलाकारांची
अंगमेहनतची कला दाखवूनी
खळगी भरतो आम्ही पोटाची ||धॄ||

गावोगाव फिरावं उन्हातान्हात राबावं
मिळलं ते खावं अन जमंल तसं रहावं
नाही हक्काचं ठिकान आम्हां
दोन हात करतो जिंदगीशी
अंगमेहनतची कला दाखवूनी
खळगी भरतो आम्ही पोटाची ||१||

दोरीवरून चालणं नशीबी आलं
ढोलकी वाजवत बालपण चाललं
कालचा दिस गेला आजचा चालला
कठीण परीक्षा काळाची
अंगमेहनतची कला दाखवूनी
खळगी भरतो आम्ही पोटाची ||२||

नाही आम्हाला कुठंलं घरदार
जमीनजुमला नाही गायीगुरंवासरं
कसं जवावं कळंना काही
कला बघा तुम्ही शरीराची
दया करा अन
खिशात हात घालून मदत करा गरीबाची ||३||

(* आंतरजालावरती विविध ठिकाणी एकाच वेळी प्रकाशित)

- पाषाणभेद
०५/०४/२०११

अवांतर: सदरची कविता एका मराठी चित्रपटासाठी लिहीलेली होती, पण अद्याप पुढे काहीच हालचाल नसल्याने संबंधितांना विचारून प्रकाशीत केली आहे. वरील छायाचित्र फार पुर्वीच काढलेले होते.

घरात आपण बर्‍याच सटरफटर वस्तू जमवून ठेवतो. त्याचप्रमाणे सदरचे छायाचित्र या कवितेला सुट झाले हा मोठा योगायोग आहे.

No comments: