Wednesday, December 28, 2011

शाळेची वेळ

महाराष्ट्रातील बहूतेक शाळा ह्या दोन सत्रात भरतात. एक सकाळ सत्र व दुसरे दुपार सत्र असली त्यात विभागणी असते.
विद्यार्थीसंख्येत वाढ झाल्याने असे करावे लागते. या शाळांत प्राथमिक व माध्यमिक शाळा येतात.
सकाळच्या शाळेची वेळ साधारणत: सकाळी ७ ते १२ व दुपारच्या शाळा ह्या दुपारी १२ ते ५:३० ह्या वेळात असतात.

सकाळ सत्राच्या विद्यार्थ्यांना शाळा संपवून दिवसभर मोकळा वेळ मिळतो. ते विद्यार्थी या वेळेत घरी जावून, ताजेतवाने होवून दुपारच्या दरम्यान एखाद्या शैक्षणीक वर्गाला जावू शकतात. फावल्या वेळेचे छंद, वाचन, घरकाम करू शकतात. एखादा गरजू विद्यार्थी एखादे काम करून हातखर्चाला पैसे मिळवू शकतो. (बालमजूरी योग्य नाहीच पण ती त्या विद्यार्थ्यांची गरज असू शकते.)

जेव्हापासून इयत्ता १२ वी ला स्पर्धा परिक्षेला महत्व आले तेव्हापासून इयत्ता दहावीच्या गुणांचे महत्व कमी झाले. तरीही दहावीचे गुण पुढील प्रवेशासाठी महत्वाचे असतातच असतात. अगदी ०.१ टक्यांवरूनही एखाद्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. आजकाल स्पर्धा परिक्षांची तयारी अगदी नववी पासून होते आहे. अशा नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना हा मोकळा वेळ सोन्यासारखा मौल्यवान ठरू शकतो.

बहूतेक शाळांचे मोठे माध्यमिक वर्ग (आठवी ते दहावी) हे दुपारच्या सत्रात आयोजित केलेले दिसतात. या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोकळा, पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असते. सकाळच्या वेळात या वर्गांचे नियोजन शाळांनी केल्यास तसा वेळ त्या विद्यार्थ्यांना निश्चीत मिळू शकतो.

याच्या नेमके उलट घडते. लहान वर्गाचे विद्यार्थी सकाळच्या सत्रात शाळेत जातात. पाचवी पासून पुढे ठिक आहे पण पहिली ते चौथीचे विद्यार्थी हे खरोखर लहान वयाचे असतात. सकाळच्या वेळी त्यांचे उठणे, तयारी करवून घेणे पालकांना जिकीरीचे असते. त्यातही दुपारचा वेळ हा त्यांच्यासाठी इतका काही महत्वाचा नसतो. त्यावेळेत ते शाळेत जावू शकतात.

शालेय व्यवस्थापनाला या गोष्टी माहीत असतीलच पण याबाबत त्यांनी काही विचार करून वेळेचे योग्य नियोजन केले पाहीजे.

आपल्यालाही शाळेच्या वेळेबाबत असला अनुभव आहे काय?

No comments: