Friday, April 02, 2010

दगडफोडीचं गाणं (मेहनतीची लावणी: घावावर घाव घाला)

दगडफोडीचं गाणं (मेहनतीची लावणी: घावावर घाव घाला)

मंडळी, लावणी म्हटली की ती शृंगाराची असावी/असते असा आपला समज. पण लावणी ही त्या पलिकडे जावून आध्यात्मिक किंवा सामाजिक पद्धतीचीही असू शकते. खालील लावणीत आपली नेहमीची हिरवीन थोडं वेगळं बोलतेय. ती काय म्हणते ते बघा तर खरं:


दगडफोडीचं गाणं (मेहनतीची लावणी: घावावर घाव घाला)

काम करोनी म्हेनत घ्येवूनी आपन वाढवू सौंसारा
गरज तुमची चिल्यापिल्यांना तशीच गरज आहे मला
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||धृ||


जांभ्याचा खडक आहे कातळ मजबूतीला भारी
अंदाज घेवूनी उभं र्‍हावूनी विचार करू नका काही
ताकदीनं फोडूनी त्याला ढिगावर ढिग ह्यो झाला
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||१||


पथ्थर काळा मुरमाड माती पहार घेवूनी हाती
मजबूतीनं ठोका त्याला दणक्यानं ठिकर्‍या उडती
घामानं छाती भिजली अंगरखा झाला ओला
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||२||


फावडं ओढा माती भरा जागा धरून कुदळ मारा
धुरळा उडतो मोठा दांडगा पहार लागता खडकाला
माती जाईल डोळ्यामधी लावून घ्या आता त्याला
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||३||


शिसवी शरीतात ताकद भारी मर्दाचा ह्यो तोरा
मरवणूक माझी झाली तुमच्यासंगती इथं येता
येळेचा विचार करूनी घराचाबी ईचार कवातरी करा
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||४||

- सचिन बोरसे,
९८२३४० २५५४
०२/०४/२०१०

Thursday, April 01, 2010

घाट चढा आता

मंडळी, आपली हिरो अन हिरवीन प्रवासाला निघालेय. त्यांची गाडी जोरात जावू द्यायची की हळूहळू ते आपणच ठरवूया.
सादर आहे "घाट चढा आता" लावणीच्या दोन आवृत्या एकाच वेळी, एकाच धाग्यात... (ढॅण.. ढॅण्...ढॅणाण...)

हळूहळू घाट चढा आता


घाई नगा करू सबूरीनं घ्येवा
चढाईचा चिकना ह्यो रस्ता
राया तुमी हळूहळू घाट चढा आता ||धृ||


खाली अन वर अवघड घाट
मधी हाये ही सपाट वाट
आक्शिलेटर दाब दाबूनी...
आक्शिलेटर दाब दाबूनी, वैताग आलाय नुसता
राया तुमी हळूहळू घाट चढा आता ||१||

कोरस :
दाजी हळूहळू घाट चढा हो आता...
पाव्हनं हळूहळू घाट चढा की आता...



दोन बाजूंचे डोंगर दोन मधून जातीया वाट
झर्‍यालाबी पानी सुटलं वाहे दुथडी पाटं
थांबा थोडं हितं जरासं...
थांबा थोडं हितं जरासं, कंटाळा आलाय नुसता
राया तुमी हळूहळू घाट चढा आता ||२||


कोरस :
दाजी हळूहळू घाट चढा हो आता...
पाव्हनं हळूहळू घाट चढा की आता...


मंदिर हाये माथ्यावरती कळस दिसतोया लांबून
ज्येवन खानं करायचं का तिथं थोडं थांबून
ताट करायची तयारी करते...
ताट करायची तयारी करते, ज्येवाया तुमी बसा
राया तुमी हळूहळू घाट चढा आता ||३||


कोरस :
दाजी हळूहळू घाट चढा हो आता...
पाव्हनं हळूहळू घाट चढा की आता...



बगा ह्ये ताट तयार झालं
बघूनशान तोंडाला पानी सुटलं
तुमच्या हातानं लाडीगोडीनं...
तुमच्या हातानं लाडीगोडीनं, घास भरवा की आता
राया तुमी हळूहळू घाट चढा आता ||४||


कोरस :
दाजी हळूहळू घाट चढा हो आता...
पाव्हनं हळूहळू घाट चढा की आता...


मंडळी, ह्यी झाली पयली लावनी. गाडी लय हळूहळू जात व्हती घाटातनं. कोनाला जोरात गाडी हाकायची आसल तर धृपदात खालीलप्रमानं बदल करा अन जोशात घ्येवून जावूद्या गाडी. काय?

घाई जरा करा, पटकन जावा
चढाईचा चिकना ह्यो रस्ता
अहो राया तुमी जोरात घाट चढा आता
अहो सजणा तुमी जोशात घाट चढा आता ||धृ||


-
तुमचाच,
पाषाणभेद (आपलं दगडफोड्या वो)
०१/०४/२०१० (हे एप्रिल चे प्रथम फुल वाचकांना अर्पण करतो.)