दगडफोडीचं गाणं (मेहनतीची लावणी: घावावर घाव घाला)
मंडळी, लावणी म्हटली की ती शृंगाराची असावी/असते असा आपला समज. पण लावणी ही त्या पलिकडे जावून आध्यात्मिक किंवा सामाजिक पद्धतीचीही असू शकते. खालील लावणीत आपली नेहमीची हिरवीन थोडं वेगळं बोलतेय. ती काय म्हणते ते बघा तर खरं:
दगडफोडीचं गाणं (मेहनतीची लावणी: घावावर घाव घाला)
काम करोनी म्हेनत घ्येवूनी आपन वाढवू सौंसारा
गरज तुमची चिल्यापिल्यांना तशीच गरज आहे मला
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||धृ||
जांभ्याचा खडक आहे कातळ मजबूतीला भारी
अंदाज घेवूनी उभं र्हावूनी विचार करू नका काही
ताकदीनं फोडूनी त्याला ढिगावर ढिग ह्यो झाला
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||१||
पथ्थर काळा मुरमाड माती पहार घेवूनी हाती
मजबूतीनं ठोका त्याला दणक्यानं ठिकर्या उडती
घामानं छाती भिजली अंगरखा झाला ओला
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||२||
फावडं ओढा माती भरा जागा धरून कुदळ मारा
धुरळा उडतो मोठा दांडगा पहार लागता खडकाला
माती जाईल डोळ्यामधी लावून घ्या आता त्याला
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||३||
शिसवी शरीतात ताकद भारी मर्दाचा ह्यो तोरा
मरवणूक माझी झाली तुमच्यासंगती इथं येता
येळेचा विचार करूनी घराचाबी ईचार कवातरी करा
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||४||
- सचिन बोरसे,
९८२३४० २५५४
०२/०४/२०१०
No comments:
Post a Comment