Monday, April 12, 2010

नाच नाचूनी नाचू मी किती

नाच नाचूनी नाचू मी किती

पैंजण वाजे छुम छुम छननन | नाचतांना गेले भान हरपून ||
थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ||

सुरूवातीला राही अवखळ अदा | मीच झाले माझ्यावर फिदा ||
नाचण्याचा छंद लागूनी | जडली वेडी प्रिती || ||१||

काळी चंद्रकळा आली नेसून | खडी त्यावरी चमके चमचम ||
मिलन होता जगदिशाशी | तुझी अन माझी एकच मिती || ||२||

थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ||

----------------------------------------------

*****************************
(पैंजण वाजे छुम छुम छननन | नाचतांना गेले भान हरपून ||
काळाचे चक्र चालू आहे. त्यात सेकंदा सेकंदाची भर पडत आहे. | "नाचतांना" म्हणजे जीवन जगतांना भान हरपून गेले ||

थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ||
हे सगळे थांबायची (शेवटाची) भिती मला वाटते आहे. | असे असतांना मी जीवन जगू किती? ||

सुरूवातीला राही अवखळ अदा | मीच झाले माझ्यावर फिदा ||
बालपण/ तरूणपणी मी अवखळ होतो. | मी माझ्याच गुर्मीत होतो. ||

नाचण्याचा छंद लागूनी | जडली वेडी प्रिती || ||१||
जीवन जगण्याचा छंद लागला | तेच मला आवडू लागले. ||

काळी चंद्रकळा आली नेसून | खडी त्यावरी चमके चमचम ||
जन्मा आलो ते मरण (काळी चंद्रकळा) घेवून | जन्मानंतर फक्त जगण्याचा आनंद होता ||

मिलन होता जगदिशाशी | तुझी अन माझी एकच मिती || ||२||
मरणानंतर मी जगदिशाशी एकरूप झालो | त्याची अन माझी मिती एकच झाली (One Dimension)||

थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ||
हे सगळे थांबायची (शेवटची) भिती मला वाटते आहे. | असे असतांना मी जीवन जगू किती? || )
*****************************

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०९/०४/२०१०

No comments: