एक गिअर मेला.
तुम्ही म्हणाल काहीतरीच काय? गिअर कधी मरतो का? गिअर तर तुटतो, कंडम होतो.
मी म्हणतो तो गिअर मेलाच.
असाच एक गिअर होता. परिस्थितीच्या वंगणाने गांजलेला, ओझ्याने पिचत चाललेला.
दररोज कितीक फिर फिर फिरणार? कितीक काम करणार?
तरीही हा गिअर फिरतच होता. एखाद्या घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे.
बैलाच्या मानेवर जसे जू असते तशी त्याच्या मानेवर होती एक क्वार्टर पीन.
आपेक्षांची, मागण्यांची, गरजा पुर्ण करवून घेणार्यांची.
तसा तो काही फार मोठा अन मुख्य गिअर नव्हता त्या गिअर बॉक्स मध्ये.
अन त्या गिअरबॉक्सच्या आजूबाजूला असंख्य इतर गिअर बॉक्स होतेच. सगळे एकजात सारखेच पणे चालणारे.
ह्या गिअरवर अवलंबून लहान मोठे असे ५/६ गिअर्स होतेच.
अन तो एका मुख्य मोटरने जोडलेला असल्याने मुख्य म्हणायचे इतकेच.
हातात हात घालून तो चालत होता, अन जोडलेल्या इतर लहानमोठ्या गिअर्सला चालवत होता.
आताशा त्याला त्याच्या कामाचे ओझे वाटू लागले होते. त्याच्या वरचे गिअर्स आता खुप अवलंबून राहत होते.
त्याला मोटरकडून मिळणारी उर्जा कमी कमी होत होती. तो तरी किती उर्जा परावर्तीत करणार.
हळूहळू त्याचा एकएक दात झिजत होता. वंगण कमी पडत होते. त्याच्या अन इतर गिअरमध्ये अंतर पडू लागले.
त्याच्यामुळे इतरांचा खोळंबा होवून कामे रखडू लागली. उत्पादन कमी पडू लागले.
शेवटी व्हायचे तेच झाले. म्हणजे त्यालाही त्याची कल्पना होतीच. पण ती वेळ इतक्या लवकर येणार नाही ही आशा होती.
एके दिवशी त्याला मालकाच्या सांगण्यावरून काढून टाकण्यात आले.
फॅक्टरीत लागल्यापासून त्याला ओळखणारी मेंटेनन्स ची माणसे आता वेगळीच वागली.
खसाखसा पाने, हातोड्यांचे वार केले गेले अन त्याला बाहेर काढून भंगारात टाकले गेले.
त्याला लावलेली पिन, नट अन बोल्ट काढून त्याच्याच अंगावर फेकले गेले.
आता तो गिअर अगदी गलितगात्र झालेला होता. दात काढलेल्या नागासारखा. असूनही काहीच उपयोगाचा नसण्याचा.
.....................................................................................
मंडळी, म्हणूनच म्हटलो होतो, "एक गिअर मेला!" हो मेला!"
अहो, एखाद्या कामगाराला व्हि.आर.एस. घ्यायला लावली म्हणजे त्या कामगाराचे अन त्याच्यावर अवलंबून असणार्यांचे मरणच नाही तर काय?
म्हणूनच म्हटलो होतो,
"एक गिअर मेला!"
"एक गिअर मेला!"
No comments:
Post a Comment