Tuesday, April 6, 2010

लावणी : उसाचा रस तुमी पाजा

सिच्युयेशन: आपल्या हिरो चं रसाचं दुकान हाये. त्यो रस काढत आसतो. तवाच हिरवीन तहानेनं व्याकूळ होवून त्याच्या दुकानी येती. उन्हामुळं हिरवीन पानी प्याया मागते. हिरो तिला रसाच्या दुकानात पाहूनशान लय गोंधळून जातो. त्याला काय करावं त्येच समजत नाय. तवा हिरवीनंच उसाचा रस कसा काढायचा त्ये सांगते आन पुढं काय व्हतं त्ये पहा:

लावणी : उसाचा रस तुमी पाजा

गरम उन्हाळ्याचा दिस हा तापला
निसत्या पान्यानं न भागे तहान
राया आता घाई करूनी;
उसाचा गार रस तुमी पाजा
रसासाठी चरकामधी उस आडवा टाका असा ||धृ||

कोरस:
असं काय करता मागं मागं फिरता दाजी हिला उसाचा रस तुमी पाजा
अहो पाव्हनं तुम्ही रसासाठी उस आडवा टाका असा

नाक्यावरलं दुकान हे आपलं
रस काढाया चरक हे असलं
आलेलिंबासहित रस काढूनी;
पुढ्यात तुमी माझ्या बसा
रसासाठी चरकामधी उस आडवा टाका असा ||१||

कोरस:
असं काय करता मागं मागं फिरता दाजी हिला उसाचा रस तुमी पाजा
अहो पाव्हनं तुम्ही रसासाठी उस आडवा टाका असा

{हिरो आन हिरवीन टेबलासमोर बसलेले आहेत. उसाचा रस त्यांच्या पुढ्यात ग्लासमध्ये आलेला आहे. डोळ्यात डोळे टाकून हिरवीन काय म्हणते पहा:-}

तुमची न माझी जोडी जमली
ऐन ज्वानीची काया फुलली
मदनाच्या ताब्यात जाण्याआधी;
हालहवाल तुमी माझी पुसा
रसासाठी चरकामधी उस आडवा टाका असा ||२||

कोरस:
असं काय करता मागं मागं फिरता दाजी हिला उसाचा रस तुमी पाजा
अहो पाव्हनं तुम्ही रसासाठी उस आडवा टाका असा

{हिरो आन हिरवीन एकमेकांत धुंद झालेले आहेत. तो त्याचा ग्लास तिच्या ओठांना लावतो ती तिचा ग्लास त्याच्या ओठांना लावते अन मग काय म्हणते ते पहा:-}

तगमग तगमग करते काया
झुरतो जीव हा लागली वेडी माया
असं असतांना रस प्यावया;
ठेवू उगा कुणावर भरवसा?
रसासाठी चरकामधी उस आडवा टाका असा ||३||

कोरस:
असं काय करता मागं मागं फिरता दाजी हिला उसाचा रस तुमी पाजा
अहो पाव्हनं तुम्ही रसासाठी उस आडवा टाका असा

- सचिन बोरसे
९८२३४०२५५४
०६/०४/२०१०