Monday, April 12, 2010

लावणी: मुंबईची सहल

लावणी: मुंबईची सहल


नागपुर पाहून झालं , नांदेड पाहून झालं , अमरावती पाहून झाली, लातूर पाहून झालं....
अहो इकडे बीड झालं, नगर झालं, नाशिक झालं, पुणं पाहून झालं....
तिकडे कोलापूर पाहून झालं, सांगली झाली, सोलापुर ही पाहून झालं....
आख्खा महाराष्ट्र पाहून झाला.....

कोरस : आसं का?

व्ह्यय तर मग....
अहो नागपुर पाहून झालं, नाशिक झालं, पुणं झालं ठाणं झालं, आता पाळी हाये मुंबईची
इथं फिरून फिरून अंग माझं दमलं सवय नाही घामाची
उपाय करा काही लाज राखून या गोड हुकूमाची
अन मला चाखवाना कुल्फी थंडगार मलईची

रगडा खाउन झाला, पॅटीस झालं, चाट झाली, चटकदार भेळ झाली चौपाटीची
बंदूकीनं फुगे फोडून झालं, वाळूत लोळून झालं, हौस झाली घोड्यावरच्या रपेटीची
मजा बघितली हवेत उडणार्‍या फुग्याची
अन मला चाखवाना कुल्फी थंडगार मलईची

दादर पाहून झालं शिवसेनेचे भवन पाहून झालं
क्रिकेटची मॅच पाहून झाली शिवाजी पार्काची
राजगड ला भेटून आलो शिवाजी महारांजांना वंदून झालं
कपड्यांची खरेदी केली फॅशन श्ट्रिटवरची

ताजमहाल हाटेल पाहून झालं, सहल झाली घारापुरीची
चर्चगेट पाहून झालं, आताचं सीएसटी झालं, हद्द ओलांडूनी गेट वे ऑफ इंडियाची
मजा पाहिली उंच उंच बिल्डींगींची

हुतात्मा स्मारकाने आठवण करून दिली हुतात्मांची
प्रभादेवीचा सिद्धिविनायक पावला, महालक्ष्मीचं दर्शन झालं
वांद्रे वरळी सेतू पाहून आरती केली मुंबादेवीची

सेंट्रल लोकल झाली, वेस्टर्न झाली, हार्बरच्या लोकलची गर्दी झाली
बेस्टची बस झाली फेरीची बोट झाली
हौस झाली जुन्या व्हिक्टोरीयाची

तारांगण देखून झालं, पाहून झाली बाग राणीची
संग्राहालय पाहून झालं, मंत्रालय पाहून झालं, मत्सालय फिरून झालं
रेसकोर्सला शर्यत पाहीली घोड्यांची

हाटेलीतलं खाणं झालं, कुल्फीचं चाखून झालं, मनाची शांती झाली
दमून झालं, भागून झालं, सवय नाही मला असल्या गर्दीची
चला आता चला घरी, सर नाही कशाला आपल्या गावाची

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१०/०४/२०१०

No comments: