Tuesday, October 05, 2010

प्रितीचा वृक्ष जेव्हा बहरला

प्रितीचा वृक्ष जेव्हा बहरला

प्रितीचा वृक्ष जेव्हा बहरला
किती वेचली फुले ओंजळ भरून
आताच का लागली पानगळ
शिशिर ऋतू का आला हेमंत सरून
हरदिनी तुझी वाट बघणे
वेळ लागतो म्हणूनी रूसणे
येतील का आठवणी कधी परतून
शिशिर ऋतू का आला हेमंत सरून

मज आठवे ओंजळ फुलांची
घट्ट केलेल्या दोन करांची
तीच निष्प्राण फुले बघते आता वहीतून
शिशिर ऋतू का आला हेमंत सरून

धुक्यात एकदा गेलो पहाटे
फिरावयास दोघे शालीत एकटे
हाती हात धरता उब मिळाली स्पर्शातून
शिशिर ऋतू का आला हेमंत सरून

भारलेले क्षण आले मोहाचे
ताब्यात नव्हते ओझे मनाचे
सुख दिले घेतले डोळे मिटून
शिशिर ऋतू का आला हेमंत सरून

शपथ घेतली दुर न जावू
तीच तोडली दुर तू जावून
वाट बघणे सोडले, जाते आता इथून
शिशिर ऋतू का आला हेमंत सरून

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०७/२०१०

शेतकरी गीत : काळ्या काळ्या मातीमधी पिकलंया सोनं

शेतकरी गीत : काळ्या काळ्या मातीमधी पिकलंया सोनं

काळ्या काळ्या मातीमधी पिकलंया सोनं
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||धृ||
औंदाच्याला बरसला बरसला पानी
मातीचा सुवास आला गर्द हिरव्या रानी
पळापळी करतात खोंडं माजेल ओलं वारं पिऊन
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||१||

विहीरीच्या पान्यामंदी चाले मोटर तासंतास
पाटामधून पानी जाई खालच्या शेतास
वखरणी करतात बैलं वैरण खावून
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||२||

डोईवर पदर हिरवी साडी लेवून
कारभारणी येईल आता न्याहारी घेवून
घाम गाळून कामं करतो हाती येवूदे धन
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||३||

शेतकरी बळीराजा झाला पोरगा धरतीला
अन्नधान्य पिकवून देई आधार देशाला
कणगीत धान्य भरू दे देवा नको काढाया ऋण
शिवार हे फुललं सारं हिरवं झालं रान ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०७/०७/२०१०