Wednesday, September 15, 2010

हाती माझ्या शुन्यच उरले

हाती माझ्या शुन्यच उरले

हाती माझ्या शुन्यच उरले
खिसा फाटकाच, हाती न काही लागले ||धृ||
कोणास माझा म्हणू मी, कोण कोणाचा होतो मी
दैवगतीने सारे मी पण जळले, रक्ताचेही नाते तुटले
हाती माझ्या शुन्यच उरले ||१||

कोठूनी आणावा पैसा आता, कशा बांधू इमले माड्या
काळाबरोबरी काळच आला, जवळचे सारे काही नुरले
हाती माझ्या शुन्यच उरले ||२||

ओळख आता विसरती सारे, मी त्यांना का ओळखावे?
असल्याच प्रसंगातून ओळख पटते, खरे कोण ते मी ओळखले
हाती माझ्या शुन्यच उरले ||३||

कधी सुखात पोहलो, कधी दु:खात अंतरलो
हेच असते शिकणे येथे जीवन जगणे असले
हाती माझ्या शुन्यच उरले ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
३०/०६/२०१०

Wednesday, September 08, 2010

शेतकरी गीत: आज सण हाय बैलपोळा

शेतकरी गीत: आज सण हाय बैलपोळा

शिंगे घासली
बाशींगे लावली
माढूळी बांधली
म्होरकी आवळली
तोडे चढविले
कासरा ओढला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||१||


गोंडे बांधले
वेसनी घातल्या
छमच्या गाठल्या
चवर ढाळली
शिक्के उठविले
गेरू फासला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||२||


नाव लिहीले
झेंडूहार घातला
झुली चढविल्या
पैंजण घातले
पट्टा आवळला
फुगे बांधले
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||३||

घुंगरू वाजविले
बेगड चिकटवली
माठोठ्या बांधल्या
गाववेस फिरवीले
गोडधोड केले
सासुसुनाने ओवाळले
नैवेद्य दावला
घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा
आज सण हाय बैलपोळा ||४||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०८/०९/२०१०